आसामचे मुख्यमंत्री श्री हिमंता बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री अनुराग ठाकूर जी, आसाम सरकारचे मंत्री, इतर मान्यवर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले युवा खेळाडू!
खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये तुम्हा सर्वांना भेटताना मला खूप आनंद होत आहे. यावेळी ईशान्येकडील सात राज्यांतील वेगवेगळ्या शहरांमध्ये या स्पर्धा होणार आहेत. अष्टलक्ष्मी या फुलपाखराला, या स्पर्धेचा शुभंकर बनवण्यात आले आहे. मी अनेकदा ईशान्येकडील राज्यांना भारताची अष्टलक्ष्मी म्हणतो. या स्पर्धेत फुलपाखराला शुभंकर बनवणे हे ईशान्येच्या आकांक्षांना नवीन पंख कसे मिळत आहेत याचेही प्रतीक आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या सर्व खेळाडूंना मी माझ्या शुभेच्छा देतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तुम्ही सर्व खेळाडूंनी गुवाहाटीमध्ये एक भारत-श्रेष्ठ भारताचे भव्य चित्र उभे केले आहे. तुम्ही जोर लावून खेळा, मेहनत घ्या...स्वतः जिंका...तुमच्या संघाला जिंकून द्या...आणि तुम्ही हरलात तरी काळजी करु नका. हरलात तरी इथून खूप काही शिकून जाल.
मित्रांनो,
मला आनंद वाटतो की आज उत्तर ते दक्षिण आणि पश्चिम ते पूर्व भारतापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात, खेळांशी संबंधित असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आज आपण इथे ईशान्य भारतात, खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे साक्षीदार बनत आहोत. काही दिवसांपूर्वी लडाखमध्ये खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी तमिळनाडूमध्ये खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या. त्याआधी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीवमध्ये किनारी क्रीडा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या आयोजनांवरुनच हे दिसून येते की देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुण-तरुणींना खेळण्याची आणि बहरण्याची अधिकाधिक संधी मिळत आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी आसाम सरकार आणि इतर राज्य सरकारांचे देखील अभिनंदन करतो.
मित्रांनो
आज समाजातील खेळाबाबतची मानसिकता आणि मनस्थितीही बदलली आहे. पूर्वी, एखाद्याशी आपल्या मुलांची ओळख करून देताना, पालक त्याच्या/तिच्या खेळातील यशाबद्दल सांगणे टाळायचे. ते विचार करायचे की खेळाबद्दल बोललो तर मुले शिकत आहेत की नाही असा समज होईल. आता समाजाची ही विचारसरणी बदलत आहे. आता पालकही अभिमानाने सांगतात की त्यांची मुले राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर खेळली आहेत किंवा त्यांनी आंतरराष्ट्रीय पदक जिंकले आहे.
मित्रांनो
आज काळाची गरज आहे की, खेळांना प्रोत्साहन देण्याबरोबरच आपण खेळांचा आनंदही साजरा केला पाहिजे. आणि ही खेळाडूंपेक्षा समाजाची जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे दहावी-बारावी बोर्डाच्या निकालानंतर चांगले गुण मिळवणाऱ्या मुलांचा सन्मान केला जातो...ज्याप्रमाणे मोठ्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुलांचा सन्मान केला जातो...त्याचप्रमाणे समाजाने अशा मुलांचा आदर करण्याची परंपराही विकसित करणे तितकेच गरजेचे आहे. आणि याबाबतीत आपण ईशान्य भारताताकडून खूप काही शिकू शकतो. संपूर्ण ईशान्य भारतात असलेला खेळांबद्दलचा आदर, तिथले लोक ज्या प्रकारे खेळ साजरे करतात, हे सर्व विस्मयकारक आहे. त्यामुळे फुटबॉलपासून ते ॲथलेटिक्सपर्यंत, बॅडमिंटनपासून मुष्टियुद्धापर्यंत, भारोत्तोलनापासून ते बुद्धिबळापर्यंत इथले खेळाडू आपल्या गुणवत्तेने रोज नवनवीन शिखरे गाठत आहेत. ईशान्येकडील या भूमीने खेळाची संस्कृती विकसित केली आहे. मला विश्वास आहे की या स्पर्धेसाठी येथे आलेले सर्व खेळाडू नवीन गोष्टी शिकतील आणि त्या संपूर्ण भारतभर पोहोचवतील.
मित्रांनो,
खेलो इंडिया असो, टॉप्स (टार्गेट ऑलिंपिक पोडीयम स्कीम-TOPS अर्थात ऑलिम्पिक लक्ष्य योजना) असो किंवा इतर तत्सम असे उपक्रम असो, आज आपल्या तरुण पिढीसाठी नवीन संधींची संपूर्ण परिसंस्था तयार होत आहे. प्रशिक्षणापासून ते शिष्यवृत्ती देण्यापर्यंत आपल्या देशात खेळाडूंसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जात आहे. यंदा खेळांसाठी साडेतीन हजार कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. देशातील क्रीडा गुणवत्तेला आम्ही वैज्ञानिक दृष्टीकोनातून नवे बळ दिले आहे. याचाच परिणाम म्हणजे आज भारत प्रत्येक स्पर्धेत पूर्वीपेक्षा जास्त पदके जिंकत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत नवे विक्रम करणाऱ्या भारताकडे आज जग लक्षपूर्वक पाहत आहे. आज जग अशा भारताकडे पाहत आहे जो संपूर्ण जगाशी स्पर्धा करू शकेल. जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्येही भारताने चकीत करणारे यश संपादन केले आहे. 2019 मध्ये आम्ही या स्पर्धेमध्ये 4 पदके जिंकली होती. मी अभिमानाने सांगू शकतो की 2023 मध्ये आपल्या तरुणतरुणींनी 26 पदके जिंकली आहेत. आणि मी पुन्हा म्हणेन की ही केवळ पदकांची संख्या नाही, तर आपल्या युवावर्गाला वैज्ञानिक दृष्टिकोनाची साथ मिळाल्यास ते काय करू शकतात याचा हा पुरावा आहे.
मित्रांनो
काही दिवसांनी तुम्ही विद्यापीठाबाहेरच्या जगात जाल. निश्चितच, अभ्यास आपल्याला जगाला सामोरे जाण्यासाठी तयार करतो, पण हेही खरे आहे की खेळ आपल्याला जगाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य देतात. तुम्ही पाहिले असेल की यशस्वी लोकांमध्ये नेहमीच काही ना काही खास गुण असतात. त्या लोकांमध्ये केवळ गुणवत्ताच असते असे नाही, तर तो त्यांचा स्थायीभाव-पिंड (टेंपरामेंट) देखील असतो. नेतृत्व कसे करायचे हे ही त्यांना माहीत असते आणि संघभावनेने काम कसे करायचे हे देखील त्यांना माहीत असते. या लोकांना यशाची भूक असतेच, पण हरल्यानंतर पुन्हा कसे जिंकायचे हे देखील त्यांना माहीत असते. दडपणाखाली काम करताना आपले सर्वोत्तम कसे द्यायचे हे त्यांना माहीत असते.हे सर्व गुण आत्मसात करण्यासाठी खेळ हे उत्तम माध्यम ठरतात. जेव्हा आपण खेळू लागतो तेव्हा स्वाभाविकपणे हे गुणही आपल्या मध्ये उतरत जातात. म्हणूनच मी म्हणतो - जो खेळतो तो बहरतो.
मित्रांनो
आणि आज मला माझ्या तरुण मित्रांना खेळाव्यतिरिक्तही काही काम द्यायचे आहे.आपल्या सर्वांना ईशान्य भारताच्या सौंदर्याबद्दल माहिती आहे. स्पर्धा आटोपल्यानंतर, वेळात वेळ काढून आपण आजुबाजुला परिसरात नक्की फिरायला जा! आणि फक्त फिरूच नका, तर समाज माध्यमांवर तुमची छायाचित्रे देखील टाकत रहा! तुम्ही #North-Est Memories हा हॅशटॅग वापरू शकता. स्पर्धे दरम्यान तुम्ही ज्या राज्यात खेळायला जाल तिथल्या स्थानिक भाषेतील 4-5 वाक्ये शिकण्याचाही प्रयत्न करा. तिथल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी तुम्ही भाषिणी ॲपचा (मोबाईल अनुप्रयोग) देखील वापर करुन पाहू शकता. तुम्हाला यातून खरोखर खूप मजा येईल.
मित्रांनो,
मला खात्री आहे की या कार्यक्रमात तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखे अनुभव मिळतील. याच सदिच्छेसह, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
खूप खूप आभार!