जय स्वामीनारायण !
परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज, परमपूज्य संत गण, सत्संगी परिवारातले सर्व सदस्य, इतर महानुभाव आणि या विशाल स्टेडियमवर उपस्थित महिला आणि सज्जन.
या कार्यकर (कार्यकर्ता) सुवर्ण महोत्सवानिमित्त मी भगवान स्वामी नारायण यांच्या चरणी प्रणाम करतो. आज प्रमुख स्वामी महाराजांच्या 103 व्या जयंतीचा महोत्सवदेखील आहे. गुरुहरी प्रगट ब्रह्म स्वरूप प्रमुख स्वामी महाराजांना मी नमन करतो. भगवान स्वामी नारायण यांची शिकवण, प्रमुख स्वामी महाराजांचे संकल्प... आज परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे सिद्धीस जात आहे. हा एवढा भव्य कार्यक्रम, एक लाख कार्यकर्ता, युवा आणि मुलांद्वारे बीज, झाडे आणि फळे यांचे सार अभिव्यक्त करणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम...... भलेही मी तुमच्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, परंतु या कार्यक्रमाची ऊर्जा मला माझ्या हृदयात जाणवत आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी मी परमपूज्य गुरू हरी महंत स्वामी महाराज आणि सर्व संतांचे अभिनंदन करतो, त्यांना नमन करतो.
मित्रांनो,
कार्यकर सुवर्ण महोत्सव हा 50 वर्षांच्या सेवेच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 50 वर्षांपूर्वी कार्यकर्त्यांची नोंदणी करून त्यांना सेवा कार्याशी जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी कार्यकर्त्यांची नोंदणी करण्याचा विचारही कोणी केला नव्हता. आज लाखो बीएपीएस कार्यकर्ते पूर्ण श्रद्धेने आणि समर्पित वृत्तीने सेवाकार्यात गुंतलेले आहेत, हे पाहून खूप आनंद होत आहे. कोणत्याही संस्थेसाठी हे खूप मोठे यश आहे. यासाठी मी तुमचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
कार्यकर सुवर्ण महोत्सव हा भगवान स्वामी नारायण यांच्या मानवतावादी शिकवणुकीचा उत्सव आहे. ही सेवेच्या त्या दशकांची गौरवगाथा आहे, ज्यामुळे लाखो-करोडो लोकांचे जीवन बदलले. बीएपीएसचे सेवा उपक्रम मी इतक्या जवळून पाहिले आहेत, त्यांच्याशी जोडण्याची संधी मला प्राप्त झाली, हे मी माझे सौभाग्य मानतो. भूजमधील भूकंपामुळे झालेल्या विनाशानंतरची परिस्थिती असो, नरनारायण नगर गावाचे पुनर्निर्माण असो, केरळमधील पूर असो किंवा उत्तराखंडमधील भूस्खलनाचे संकट असो... किंवा कोरोनासारखी जागतिक महामारीची अलीकडची आपत्ती असो.... आपले कार्यकर (कार्यकर्ते) सहकारी सर्व संकटात कुटुंब भावनेने साहाय्यासाठी उभे राहतात आणि करुणेने सर्वांची सेवा करतात. कोविड काळात बीएपीएस मंदिरे सेवा केंद्रात कशी बदलली गेली हे सर्वांनी पाहिले आहे.
आज मी आणखी एका प्रसंगाची आठवण करून देऊ इच्छितो. लोकांना याविषयी फारसे माहीत नाही. युक्रेनचे युद्ध वाढू लागल्यावर भारत सरकारने तातडीने तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. भारतीय मोठ्या संख्येने पोलंडमध्ये पोहोचू लागले. पण पोलंडमध्ये पोहोचलेल्या भारतीयांना युद्धाच्या त्या स्थितीत जास्तीत जास्त मदत कशी पोहोचवायची, हे आव्हान होते. त्यावेळी मी बीएपीएसच्या एका संतांशी बोललो.... आणि तेव्हा मध्यरात्र उलटून गेली असावी, माझ्या अंदाजे तेव्हा रात्रीचे 12 किंवा 1 वाजले असावेत .. तेव्हा मी बोललो. मी त्यांना विनंती केली की पोलंडमध्ये मोठ्या संख्येने पोहोचणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे.आणि मी पाहिले, रातोरात संपूर्ण युरोपातून बीएपीएसच्या कार्यकर्त्यांना आपल्या संस्थेने कसे एकत्र आणले. तुम्ही युद्धाच्या त्या परिस्थितीत पोलंडला पोहोचलेल्या लोकांना खूप मोठी मदत केली. बीएपीएसचे हे सामर्थ्य, जागतिक स्तरावर मानवतेच्या हितासाठी तुमचे हे योगदान अत्यंत प्रशंसनीय आहे. आज या कार्यकर सुवर्ण महोत्सवात मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आज बीएपीएसचे कार्यकर्ते जगभरात सेवेच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवत आहेत. ते आपल्या सेवेने कोट्यवधी लोकांच्या हृदयात स्थान मिळवत आहेत आणि समाजातल्या शेवटच्या तळाशी असलेल्या व्यक्तीला सक्षम बनवत आहेत. आणि म्हणूनच तुम्ही प्रेरणास्थान आहात, पूजनीय आहात, वंदनीय आहात.
मित्रांनो,
बीएपीएसचे कार्य, संपूर्ण विश्वात भारताचे सामर्थ्य, भारताचा प्रभाव याला बळ देते. जगातील 28 देशांमध्ये भगवान स्वामी नारायणाची 1800 मंदिरे, जगभरातील 21 हजारांहून अधिक अध्यात्मिक केंद्रे, वेगवेगळे सेवा उपक्रम ... जग जेव्हा हे पाहते तेव्हा त्यातून त्यांना भारताचा आध्यात्मिक वारसा, आध्यात्मिक ओळख याचे दर्शन घडते. ही मंदिरे भारताचे सांस्कृतिक प्रतिबिंब आहेत. जगातील सर्वात प्राचीन चैतन्यमयी संस्कृतीची ही केंद्र आहेत. कुठलीही व्यक्ती जेव्हा या मंदिरांशी जोडली जाते तेव्हा ती भारताच्या समृद्ध संस्कृती आणि आध्यात्मिकतेकडे साहजिकच आकर्षित होते.
आता काही महिन्यांपूर्वी अबुधाबीमध्ये भगवान स्वामी नारायण मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली . त्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य मला लाभले. त्या कार्यक्रमाची, त्या मंदिराची जगभरात किती चर्चा होत आहे. जगाने भारताचा आध्यात्मिक वारसा पाहिला, जगाने भारताची सांस्कृतिक विविधता पाहिली... अशा प्रयत्नांमुळे जगाला भारताचा सांस्कृतिक गौरव आणि मानवी उदारतेची माहिती मिळते. आणि यासाठी कार्यरत माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मोठे - मोठे संकल्प इतक्या सहजतेने सिद्धीला जाणे हे भगवान स्वामी नारायण आणि सहजानंद स्वामींच्या तपश्चर्येचे फळ आहे. त्यांनी प्रत्येक जीवाची, प्रत्येक पीडिताचा विचार केला. त्यांनी प्रस्थापित केलेल्या मूल्यांचा प्रकाश आज बीएपीएस जगभरात पसरवत आहे. बीएपीएस चे हे कार्य एका गीताच्या काही ओळींद्वारे समजून घेता येऊ शकते, तुम्ही देखील ऐकले असेल, घरोघरी गायले जाऊ शकते
नदिया न पिये कभी अपना जल वृक्ष न खाये कभी अपने फल
नदिया न पिये कभी अपना जल वृक्ष न खाये कभी अपने फल
अपने तन का मन का धन का दूजो को दे
जो दान है वो सच्चा इंसान अरे...इस धरती का भगवान है।
मित्रांनो,
हे देखील माझे सौभाग्य राहिले आहे की मला लहानपणापासूनच बीएपीएस आणि भगवान स्वामी नारायण यांच्याशी जोडले जाण्याची संधी मिळाली, या महान प्रवृत्तीशी जोडले जाण्याची संधी मिळाली. प्रमुख स्वामी महाराजांकडून मला मिळालेले प्रेम आणि आपुलकी हीच माझ्या आयुष्याची संपत्ती आहे. त्यांच्यासोबतचे अनेक वैयक्तिक प्रसंग आहेत, जे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. जेव्हा मी सार्वजनिक जीवनात नव्हतो, जेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो आणि जेव्हा मी मुख्यमंत्री होतो , जेव्हा मी पंतप्रधान बनलो,त्या प्रत्येक क्षणी त्यांचे मार्गदर्शन लाभले. नर्मदेचे पाणी साबरमतीत आले ... तेव्हा त्या ऐतिहासिक प्रसंगी परमपूज्य प्रमुख स्वामीजी स्वत: आशीर्वाद देण्यासाठी आले होते. अनेक वर्षापूर्वी एकदा स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली स्वामीनारायण महामंत्र महोत्सव आयोजित करण्यात आला होता…आणि त्याच्या पुढच्या वर्षी स्वामी नारायण मंत्रलेखन महोत्सव होता. तो क्षण मी कधीच विसरत नाही. मंत्र लेखनाचा तो विचार अद्भुत असाच होता. माझ्याबद्दल त्यांच्या मनात असलेला आत्मिक स्नेह ही पुत्रवत भावना होती, ती शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. लोककल्याणाच्या कामात मला प्रमुख स्वामी महाराजांचा आशीर्वाद नेहमीच लाभला. आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमात, मी एक कार्यकर म्हणून प्रमुखस्वामी महाराजांच्या आठवणी , त्यांचे आध्यात्मिक अस्तित्व जाणवत आहे.
मित्रांनो,
आपल्या संस्कृतीत ‘सेवा परमो धर्म’, म्हणजेच सेवा हा सर्वात मोठा धर्म मानला जातो. हे केवळ शब्द नव्हे, तर आपली जीवनमूल्ये आहेत . सेवेला श्रद्धा, आस्था आणि उपासनेपेक्षा वरचे स्थान देण्यात आले आहे. असे म्हटले देखील आहे , जनसेवा ही जनार्दन सेवा आहे.सेवा म्हणजे ती भावना ज्यामध्ये स्वत्वाची भावना उरत नाही. जेव्हा तुम्ही वैद्यकीय शिबिरांमध्ये रुग्णांची सेवा करता, जेव्हा एखाद्या गरजवंताला अन्न देता ,जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला शिकवता , तेव्हा तुम्ही केवळ दुसऱ्यांची मदत करत नसता …त्यावेळी तुमच्या अंतर्मनात परिवर्तनाची एक अद्भुत प्रक्रिया सुरु होते . यामुळे तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला दिशा मिळते, बळ मिळते, आणि ही सेवा नियोजनबद्ध पद्धतीने लाखो कार्यकर्त्यांसह संघटित स्वरूपात केली जाते, एक संस्था म्हणून केली जाते , एक आंदोलन म्हणून केली जाते तेव्हा अद्भुत परिणाम प्राप्त होतात.
अशा प्रकारच्या संस्थात्मक सेवेत समाजातील व देशातील मोठमोठ्या समस्यांवर उपाय शोधण्याचे सामर्थ्य असते. यामुळे अनेक वाईट प्रथांचे समूळ उच्चाटन करता येऊ शकते. एका समान उद्देशाने जोडलेले लाखो कार्यकर्ते देशाची आणि समाजाची एक मोठी शक्ती बनतात. आणि म्हणूनच , आज देश जेव्हा विकसित भारताचे ध्येय घेऊन पुढे वाटचाल करत आहे, तेव्हा स्वाभाविकपणे लोकांचे एकत्र येणे आणि काहीतरी मोठे करून दाखवण्याची भावना , आपल्याला प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे. स्वच्छ भारत अभियान असेल , नैसर्गिक शेती असेल , पर्यावरणाबाबत जागरूकता असेल, मुलींचे शिक्षण असेल, आदिवासी कल्याणाचा विषय असेल... देशातील जनता पुढे येऊन राष्ट्र उभारणीच्या प्रवासाचे नेतृत्व करत आहे. तुमच्याकडून देखील त्यांना खूप प्रेरणा मिळते. म्हणूनच आज माझी इच्छा आहे, मला मोह होत आहे की तुम्हाला काहीतरी आवाहन करावे. माझी इच्छा आहे की सर्व कार्यकर्त्यांनी इथून काहीतरी संकल्प करून जावे. तुम्ही दरवर्षी नवीन संकल्प घ्यावा आणि ते वर्ष खास बनवून त्या संकल्पाला समर्पित करावे. जसे एखादे वर्ष रसायनमुक्त शेतीसाठी समर्पित करू शकतात, एखादे वर्ष देशाच्या विविधतेतील एकतेच्या उत्सवासाठी समर्पित करा. आपल्याला युवा सामर्थ्याच्या सुरक्षेसाठी अमली पदार्थांविरुद्ध लढा देण्याचा संकल्प करावा लागेल. आजकाल अनेक ठिकाणी लोक नद्यांचे पुनरुज्जीवन करत आहेत, तर तुम्हीही अशा प्रकारचे काम पुढे नेऊ शकता. पृथ्वीचे भविष्य वाचवण्यासाठी आपल्याला शाश्वत जीवनशैलीचा संकल्प करावा लागेल. भारताने संपूर्ण जगाला दिलेल्या मिशन लाईफ संकल्पनेची सत्यता आणि प्रभाव सिद्ध करून दाखवायचा आहे. सध्या एक पेड़ मां के नाम अभियानाची जगभर चर्चा आहे. या दिशेने तुमचे प्रयत्नही खूप महत्त्वाचे आहेत. भारताच्या विकासाला गती देणारे अभियान - फिट इंडिया ,वोकल फॉर लोकल, एक पेड माँ के नाम, भरड धान्याला प्रोत्साहन अशा अनेक गोष्टी तुम्ही करू शकता. युवा कल्पनांना नवीन संधी देण्यासाठी येत्या काही आठवड्यांत जानेवारीमध्ये 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग'चेही आयोजन केले जाईल. यामध्ये आपले युवक विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कल्पना मांडतील, त्यांच्या योगदानाची रूपरेषा तयार करतील. तुम्ही सर्व युवा कार्यकर यात सामील होऊ शकता.
मित्रांनो,
परमपूज्य प्रमुख स्वामी महाराजांचा भारताच्या कुटुंब संस्कृतीवर विशेष भर होता. त्यांनी ‘घर सभे’च्या माध्यमातून समाजात एकत्रित कुटुंबाची संकल्पना बळकट केली. आपल्याला या मोहिमा पुढे न्यायच्या आहेत. आज भारत 2047 पर्यंत विकसित होण्याच्या ध्येयावर काम करत आहे. पुढील 25 वर्षांचा देशाचा प्रवास हा भारतासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो बीएपीएसच्या प्रत्येक कार्यकर साठी देखील महत्वाचा आहे. भगवान स्वामी नारायण यांच्या आशीर्वादाने बीएपीएस कार्यकरांची ही सेवा मोहीम अशाच प्रकारे अव्याहतपणे सुरू राहील असा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना कार्यकर सुवर्ण महोत्सवाच्या शुभेच्छा देतो.
जय स्वामीनारायण।