Quoteकुवेतमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाने दाखवलेला सौहार्द आणि जिव्हाळा विलक्षण : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Quote43 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांची कुवेतला भेट : पंतप्रधान
Quoteभारत आणि कुवेत यांच्यातील संबंध हे नागरी संस्कृती, सागरी संबंध आणि व्यापाराचे : पंतप्रधान
Quoteभारत आणि कुवेत हे कायम एकमेकांच्या पाठीशी: पंतप्रधान
Quoteकौशल्यप्रधान प्रतिभेची जगाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारत सुसज्ज : पंतप्रधान
Quoteभारतात आता स्मार्ट डिजिटल व्यवस्था ही चैनीची गोष्ट उरली नसून ती सर्वसामान्यांच्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग बनली आहे : पंतप्रधान
Quoteभविष्यातील भारत हा जागतिक विकासाचे केंद्र आणि जगाच्या विकासाचे इंजिन असेल : पंतप्रधान
Quoteविश्वमित्र या नात्याने भारत जगाच्या व्यापक कल्याणाचा दृष्टीकोन बाळगून पुढे वाटचाल करत आहे : पंतप्रधान

भारत मातेचा विजय असो,

भारत मातेचा विजय असो,

भारत मातेचा विजय असो,

नमस्कार,

मी आत्ताच अवघ्या अडीच तासांपूर्वी कुवेतला पोहोचलो आणि इथे पाऊल ठेवल्यापासून आजूबाजूला एक वेगळीच आपुलकी, एक वेगळीच मायेची ऊब जाणवत आहे.  तुम्ही सर्व भारतातील विविध राज्यांतून आला आहात.  पण तुम्हा सगळ्यांकडे बघून असं वाटतंय की जणू भारताचे लघुरूपच (मिनी इंडिया) माझ्यासमोर उभे राहिले आहे.  इथे भारताच्या उत्तर-दक्षिण-पूर्व पश्चिमे कडील प्रत्येक प्रदेशातून वेगवेगळ्या भाषा आणि बोली बोलणारे लोक माझ्यासमोर दिसत आहेत.  पण प्रत्येकाच्या हृदयात एकच पडसाद आहे….  प्रत्येकाच्या हृदयात एकच निनाद आहे - भारत मातेचा विजय असो….,.भारत मातेचा विजय असो!

येथे हाल संस्कृतीचा उत्सव आहे.  सध्या तुम्ही नाताळ आणि नवीन वर्षाची तयारी करत आहात.  मग पोंगल येत आहे.  मकर संक्रांत असो, लोहरी असो, बिहू असो, असे अनेक सणही फार दूर नाहीत.  मी तुम्हा सर्वांना नाताळ, नवीन वर्ष आणि देशाच्या कानाकोपऱ्यात साजऱ्या होणाऱ्या सर्व सणांच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

आज हा क्षण माझ्यासाठी व्यक्तिगत खूपच विशेष आहे.  43 वर्षांनंतर, चार दशकांहून अधिक काळानंतर, एक भारतीय पंतप्रधान कुवेतमध्ये आला आहे.  भारतातून इथे यायचे असेल तर चार तास लागतात….पंतप्रधानांना चार दशके लागली.  तुमच्यापैकी अनेक मित्र पिढ्यानपिढ्या कुवेतमध्ये राहत आहेत.  अनेकांचा तर जन्मच इथे झाला.  आणि दरवर्षी शेकडो भारतीय तुमच्या समुहामध्ये समाविष्ट होतात.  कुवेतच्या समाजात तुम्ही भारतीयत्वाचा स्वाद निर्माण केला आहे, तुम्ही कुवेतच्या चित्रपटालावर (कॅनव्हास) भारतीय प्रतिभेचे रंग भरले आहेत.  कुवेतमध्ये भारतीय गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा मसाला तुम्ही मिसळला आहे.  आणि म्हणूनच मी आज इथे फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो नाही तर तुम्ही सर्वांनी मिळवलेलं यश साजरं करण्यासाठी आलो आहे.

 

|

मित्रांनो

थोड्याच वेळापूर्वी मी येथे काम करणाऱ्या भारतीय कामगार- व्यावसायिकांना भेटलो.  हे मित्र इथल्या बांधकाम क्षेत्रात काम करत आहेत.  इतर अनेक क्षेत्रातही ते मेहनत घेत आहेत.  कुवेतच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि निमवैद्यकीय (पॅरामेडिक्स) सेवांच्या रूपात भारतीय समुदायाने मोठी ताकद उभी केली आहे.  तुमच्यातील शिक्षक कुवेतची पुढची समर्थ  पिढी घडवण्यासाठी मदत करत आहेत.  तुमच्यापैकी जे अभियंते आणि वास्तुविशारद आहेत ते कुवेतच्या पुढच्या पिढीतील पायाभूत सुविधा निर्माण करत आहेत.

आणि मित्रांनो,

मी जेव्हा जेव्हा कुवेतच्या नेतृत्वाशी बोलतो….तेव्हा ते तुम्हा सर्वांचे खूप कौतुक करतात. कुवेतचे नागरिक देखील तुमची मेहनत, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमच्या कौशल्यामुळे तुम्हा सर्व भारतीयांचा आदर करतात.  आज भारत रक्कम भरणा सुविधांच्या (रेमिटन्स) बाबतीत जगात आघाडीवर आहे, त्यामुळे याचे खूप श्रेय तुम्हा सर्व कष्टकरी मित्रांना जाते.  देशवासियांनाही तुमच्या योगदानाबद्दल आदर आहे.

मित्रांनो

भारत आणि कुवेत यांच्यातील संबंध सभ्यतापूर्ण आहेत.., सागरी आहेत…. स्नेहाचे आहेत….व्यापाराचे व्यावसायिक आहेत.  भारत आणि कुवेत,  अरबी समुद्राच्या दोन बाजूला वसलेले आहेत.  केवळ मुत्सद्देगिरीच नाही तर मनांनी आपल्याला एकत्र जोडले आहे.  आपला वर्तमानच नाही तर आपला भूतकाळ देखील आपल्याला जोडतो.  एके काळी कुवेतमधून मोती, खजूर आणि जातिवंत घोडे भारतात जायचे.  आणि भारतातूनही येथे भरपूर माल येत आला आहे.   भारतीय तांदूळ, भारतीय चहा, भारतीय मसाले, कपडे आणि लाकूड इथे यायचे. कुवेती खलाशी भारतीय सागवानी लाकडापासून बनवलेल्या जहाजांतून लांबचा प्रवास करत असत.  कुवेतचे मोती भारतासाठी हिऱ्यांपेक्षा कमी नाहीत.  आज भारतीय दागिने जगभर प्रसिद्ध आहेत आणि त्यात कुवेतच्या मोत्यांचाही वाटा आहे.  गुजरातमध्ये आम्ही वाडवडिलांकडून ऐकत आलो आहोत की गेल्या शतकांमध्ये कुवेतमधून लोक आणि व्यापारी- व्यावसायिक कसे येत-जात असत.  विशेषत: एकोणिसाव्या शतकातच कुवेतमधील व्यापारी सुरतला येऊ लागले.  त्यावेळी सुरत ही कुवेतच्या मोत्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होती.  सुरत, पोरबंदर, वेरावळ असो…गुजरातची बंदरे या जुन्या संबंधांची साक्षीदार आहेत.

 

|

कुवेती व्यापाऱ्यांनी गुजराती भाषेतही अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.  गुजरातनंतर कुवेतच्या व्यापाऱ्यांनी मुंबईसह इतर बाजारपेठेतही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. इथले  प्रसिद्ध उद्योगपती अब्दुल लतीफ अल अब्दुल रज्जाक यांनी लिहिलेले मोत्याचे वजन कसे तोलायचे ( हाऊ टू कॅल्क्युलेट पर्ल वेट) या पुस्तकाची छपाई मुंबईत झाली होती.  अनेक कुवेती व्यापाऱ्यांनी, निर्यात आणि आयातीसाठी मुंबई, कोलकाता, पोरबंदर, वेरावळ आणि गोव्यात आपली कार्यालये उघडली आहेत.  मुंबईतील मोहम्मद अली मार्ग परिसरात आजही अनेक कुवेती कुटुंबे राहतात.  अनेकांना हे जाणून आश्चर्य वाटेल….60-65 वर्षांपूर्वी कुवेतमध्ये भारतीय रुपये चलनात होते, जसे ते भारतात चालतात.  म्हणजे असे की इथल्या दुकानातून एखादी वस्तू विकत घेताना फक्त भारतीय रुपये स्वीकारले जायचे.  त्या काळी भारतीय चलनातले रूपया, पैसा, आणा असे शब्दही कुवेतच्या लोकांसाठी परिचयाचे होते… सामान्य होते.

मित्रांनो,

कुवेतला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मान्यता देणाऱ्या जगातील पहिल्या देशांपैकी भारत एक होता.  आणि म्हणूनच आपले वर्तमान, आपल्या आठवणी, ज्या देशाशी…ज्या समाजाशी जोडल्या गेल्या आहेत…तिथे येणे माझ्यासाठी खूप संस्मरणीय आहे.  मी कुवेतच्या जनतेचा…. येथील सरकारचा खूप आभारी आहे.  मी विशेषत: माननीय अमिर यांचे त्यांनी दिलेल्या निमंत्रणाबद्दल  आभार मानतो.

मित्रांनो

भूतकाळात संस्कृती आणि व्यापारउदीम यांनी बांधलेले नाते आज नव्या शतकात नव्या उंचीकडे वाटचाल करत आहे.  आज कुवेत हा भारताचा अतिशय महत्त्वाचा ऊर्जा आणि व्यापार भागीदार आहे.  कुवेती कंपन्यांसाठीही भारत हे गुंतवणुकीचे मोठे ठिकाण आहे.  मला आठवते,  कुवेतचे माननीय अभिषिक्त राजपुत्र (क्राऊन प्रिन्स) यांनी, न्यूयॉर्कमध्ये आमच्या भेटीदरम्यान एका म्हणीचा उल्लेख केला होता.  ते म्हणाले होते- “ कुठलीही गरज भासली कुठलीही मदत लागली तर भारत हे हक्काचे स्थान आहे”.  भारत आणि कुवेतच्या नागरिकांनी दु:ख आणि संकटाच्या वेळी एकमेकांना नेहमीच मदत केली आहे.  कोरोना महासाथीच्या काळात दोन्ही देशांनी एकमेकांना प्रत्येक स्तरावर मदत केली.  जेव्हा भारताला  सर्वात जास्त गरज भासली तेव्हा कुवेतने भारताला लिक्विड ऑक्सिजनचा… द्रवरूप प्राणवायूचा पुरवठा केला. माननीय क्राउन प्रिन्स यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रत्येकाला अधिक वेगाने काम करण्याची प्रेरणा दिली.  मला समाधान आहे की भारतानेही कुवेतला लस आणि वैद्यकीय पथके पाठवून या संकटाशी लढण्यासाठी बळ दिले.  भारताने आपली बंदरे खुली ठेवली, जेणेकरून कुवेत आणि  आसपासच्या भागात खाण्यापिण्याच्या पदार्थांची उणीव  भासू नये.  याच वर्षी जूनमध्ये कुवेतमध्ये किती हृदयद्रावक दुर्घटना घडली.  मंगफ येथे लागलेल्या आगीत अनेक भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले.  ही बातमी कळताच मला खूप चिंता वाटली होती.  पण त्या वेळी कुवेत सरकारने जे सहकार्य केले, ते केवळ एक भाऊच करू शकतो.  कुवेतच्या या वृत्तीला… स्थायीभावाला मी नमस्कार करेन.

 

|

मित्रांनो

प्रत्येक सुख दुखात साथ देण्याची ही परंपरा आपले परस्पर नातेसंबंध…. परस्पर विश्वास यांचा पाया आहे. येणाऱ्या दशकांमध्ये आपण आपल्या समृद्धीचेही खूप मोठे भागीदार बनू. आपली उद्दिष्ट सुद्धा खूप वेगळे नाहीयेत. कुवेतचे लोक नवंकुवेतच्या निर्मितीसाठी झटत आहेत. भारताचे लोक सुद्धा 2047 सालापर्यंत देशाला एक विकसित राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी  झटत आहेत. कुवेत, व्यापार आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून एक धडाडीची अर्थव्यवस्था बनू इच्छित आहे.

आज भारत देखील नवोन्मेषावर भर देत आहे, आपल्या अर्थव्यवस्थेला निरंतर मजबूत बनवते आहे. ही दोन्ही उद्दिष्टे एकमेकांना समर्थन देणारी आहेत. नव्या कुवेतच्या निर्मितीसाठी जो नवोन्मेष, जे कौशल्य, जे तंत्रज्ञान, जे मनुष्यबळ पाहिजे ते भारताकडे आहे. भारतातील स्टार्ट अप्स, फिनटेक पासून आरोग्यसेवेपर्यंत, स्मार्ट सिटीपासून हरित तंत्रज्ञानापर्यंत, कुवेतची प्रत्येक गरज भागवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पर्याय तयार करू शकतात. भारताचा कौशल्य प्रशिक्षित युवक कुवेतच्या भविष्यातील प्रवासासाठी देखील नवीन बळ देऊ शकतो.

मित्रांनो,

जगाचे कौशल्य केंद्र बनण्याचे सामर्थ्य देखील भारताकडे आहे. भविष्यातील अनेक दशके भारत जगातील सर्वात तरुण देश असणार आहे. अशा स्थितीत जगाची कौशल्य मागणी पूर्ण करण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे. आणि यासाठी भारत जगाच्या गरजा लक्षात घेत आपल्या युवकांच्या कौशल्याचा विकास करत आहे, कौशल्याचे अद्यतनिकरण करत आहे. भारताने गेल्या काही वर्षात सुमारे दोन डझन देशांबरोबर स्थलांतर आणि रोजगाराशी संबंधित करार केले आहेत. खाडी देशांसह जापान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, मॉरिशस, युनायटेड किंगडम आणि इटली यासारख्या देशांचा यामध्ये समावेश आहे. भारताच्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळासाठी जगातील इतर देशही आपले दरवाजे खुले करत आहेत.

मित्रांनो,

परदेशात जे भारतीय काम करत आहेत त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांना सुविधा प्रदान करण्यासाठी देखील अनेक देशांबरोबर करार केले जात आहेत. तुम्हाला ई - मायग्रेट पोर्टलबद्दल माहिती असेलच. या पोर्टलद्वारे, परदेशातील कंपन्या आणि नोंदणीकृत एजंटांना एकाच व्यासपीठावर आणण्यात आले आहे. यामुळे मनुष्यबळाची गरज कुठे आहे, कोणत्या प्रकारच्या मनुष्यबळाची गरज आहे, कोणत्या कंपनीला गरज आहे, या सर्व बाबी सहज माहिती होतात. या पोर्टलच्या मदतीने, गेल्या चार-पाच वर्ष लाखो मित्र, इथे खाडी देशात देखील आले आहेत. अशा प्रत्येक प्रयत्नाच्या मागे एकच उद्दिष्ट आहे. भारताच्या प्रतिभेतून जगाची प्रगती साधणे आणि जे नोकरी व्यवसायासाठी परदेशात गेली आहेत त्यांना नेहमी सुविधा उपलब्ध करून देणे. भारताच्या या प्रयत्नांचा कुवेतमध्ये देखील तुम्हा सर्वांना खूप फायदा होणार आहे.

 

|

मित्रांनो,

तुम्ही जगातील कोणत्याही देशात राहत असो, त्या देशाचा सन्मानच करता आणि भारताला नव्या उंचीवर पोहोचताना पाहून देखील आनंदी होता. तुम्ही सर्वजण भारतातून इथे आला आहात, इथे राहिला आहात, पण तुम्ही आपल्या हृदयात भारतीयत्व जपून ठेवले आहे. तुम्ही मला सांगा, असा कोणता भारतीय असेल ज्याला मंगलयानाच्या यशाबाबत अभिमान वाटला नाही? मी खरे बोलत आहे की नाही? आजचा भारत एका नव्या स्वभावाने पुढे मार्गक्रमण करत आहे. आज भारत जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था आहे. आज जगातील प्रथम क्रमांकाची फिनटेक परिसंस्था भारतात आहे. आज जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था भारतात आहे. आज भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल हँडसेट निर्माण करणारा देश आहे.

मी तुम्हाला एक आकडा सांगतो, तो ऐकून तुम्हाला देखील आनंद वाटेल. गेल्या दहा वर्षात भारताने जितके ऑप्टिकल फायबर टाकले आहेत, भारताने जितके ऑप्टिकल फायबर टाकले आहेत, त्याची लांबी, पृथ्वी आणि चंद्र यातील अंतराच्या आठ पटीहून अधिक आहे. आज भारत जगातील सर्वात जास्त डिजिटली कनेक्टेड देशांपैकी एक देश आहे. छोट्या छोट्या शहरांपासून गावापर्यंत, प्रत्येक भारतीय डिजिटल उपकरणांचा वापर करत आहे. भारतात स्मार्ट डिजिटल प्रणाली आता विलासाचे, चैनीचे साधन नाही, तर सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात ही प्रणाली समाविष्ट झाली आहे. भारतात जेव्हा टपरीवर चहा पिला जातो किंवा फेरीवाल्यांकडून फळांची खरेदी केली जाते तेव्हा डिजिटल पेमेंट केले जाते. किराणा सामान मागवायचे असेल, अन्नपदार्थ मागवायचे असतील, फळे भाज्या मागवायच्या असतील, घरातील किरकोळ सामान मागवायचे असेल तर अगदी कमी वेळात डिलिव्हरी केली जाते आणि त्याचे पैसे देखील फोन द्वारे दिले जातात. कागदपत्रे ठेवण्यासाठी देखील लोकांकडे आता डीजी लॉकर आहे, विमानतळावर विना त्रास प्रवास करण्यासाठी लोकांकडे आता डीजीयात्रा आहे, टोल केंद्रावर वेळ वाचवण्यासाठी आता लोकांकडे फास्ट टॅग आहे, भारत निरंतर डिजिटल स्मार्ट होत आहे आणि आत्ता तर या सर्वांची सुरुवात झाली आहे. भविष्यातील भारत अशा नवोन्मेषाकडे वाटचाल करणार आहे जो संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरेल. भविष्यातील भारत जगातील विकासाचे केंद्र बनेल, जगाचे प्रगतीचे इंजिन बनेल. ती वेळ दूर नाही, जेव्हा भारत जगातील हरित ऊर्जा हब बनेल, औषध निर्माणाचे हब बनेल, इलेक्ट्रॉनिक्स हब बनेल, ऑटोमोबाईल उद्योगाचे हब बनेल, सेमी कण्डक्टर उद्योगाचे हब बनेल, कायद्याचे, विम्याचे हब बनेल, कंत्राटाचे आणि व्यापाराचे हब बनेल. जगातील मोठ-मोठे आर्थिक केंद्र भारतात स्थापित झाल्याचे तुम्ही पहालच. जागतिक कार्यक्षमता केंद्र असो, जागतिक तंत्रज्ञान केंद्र असो, जागतिक अभियांत्रिकी केंद्र असो, या सर्वांचे खूप मोठे हब भारतात बनेल.

मित्रांनो,

आम्ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. भारत एका विश्वबंधुच्या रूपात जगाच्या कल्याणाच्या विचाराने पुढे मार्गक्रमण करत आहे. आणि जग देखील भारताच्या या भावनेचा सन्मान करत आहे. आज 21 डिसेंबर 2024, या दिवशी जग आपला पहिला जागतिक ध्यान दिवस साजरा करत आहे. हा दिवस भारताच्या हजारो वर्षांच्या ध्यानाच्या परंपरेला समर्पित आहे. 2015 पासून जग 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहे. हा दिवस देखील भारताच्या योग परंपरेला समर्पित आहे. 2023 हे वर्ष जगाने आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या रूपात साजरे केले, हे देखील भारताच्या प्रयत्नातून आणि प्रस्तावातूनच शक्य होऊ शकले. आज भारताचा योग जगातील प्रत्येक भागाशी जोडला जात आहे. आज भारतातील पारंपरिक औषधे, आपला आयुर्वेद, आपली आयुष उत्पादने, जागतिक तंदुरुस्तीला समृद्ध करत आहेत. आज आपले सुपरफुड भरड धान्ये, आपली श्री अन्न, पोषण आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे मोठे आधारस्तंभ बनत आहेत. आज नालंदापासून आयआयटीपर्यंत, आपली ज्ञान प्रणाली जागतिक ज्ञान परिसंस्थेला मजबूत बनवत आहे. आज भारत जागतिक संपर्क सुविधा साखळीचा एक महत्त्वपूर्ण दुवा बनत आहे. मागच्या वर्षी भारतात झालेल्या जी-20 परिषदे दरम्यान, भारत - मध्यपूर्व - युरोप कॉरिडॉरची घोषणा झाली होती. हा कॉरिडॉर भविष्यातील जगाला नवीन दिशा दाखवणारा आहे.

मित्रांनो,

तुम्हा सर्वांचे सहकार्य, भारतीय वंशाच्या लोकांच्या भागीदारी शिवाय विकसित भारताची यात्रा अपूर्ण आहे. मी आपणा सर्वांना विकसित भारताच्या संकल्प अशी जोडले जाण्यासाठी आमंत्रित करत आहे. नव्या वर्षाचा पहिला महिना, 2025 जानेवारी, यावेळी अनेक राष्ट्रीय उत्सवांचा महिना असेल. यावर्षी आठ ते दहा जानेवारी पर्यंत भुवनेश्वर मध्ये प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन केले जाणार आहे, जगभरातील लोक या उत्सवासाठी येतील. तुम्हा सर्वांना मी या कार्यक्रमासाठी आमंत्रित करतो. या यात्रेत तुम्ही पुरीमध्ये महाप्रभू जगन्नाथांचा आशीर्वाद घेऊ शकता. त्यानंतर  प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी तुम्ही प्रयागराजला येऊ शकता, हा कुंभमेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान म्हणजे जवळपास दीड महिना सुरू राहील. त्यानंतर 26 जानेवारीला तुम्ही प्रजासत्ताक दिनाचे विशेष कार्यक्रम पाहूनच परत जा. आणि हो तुम्ही तुमच्या कुवेत मधील मित्रांना देखील भारतात घेऊन या, त्यांना भारतामध्ये पर्यटनासाठी घेऊन जा. इथे एकेकाळी दिलीप कुमार साहेबांनी पहिल्या भारतीय उपहारगृहाचे उद्घाटन केले होते. भारताचा खरा स्वाद तर तिथे जाऊनच माहिती करून घेता येईल. म्हणूनच आपल्या कुवेती मित्रांना यासाठी जरूर राजी करा.

मित्रांनो,

आज पासून सुरू होणाऱ्या अरेबियन गल्फ कप साठी तुम्ही सर्वजण खूप उत्सुक आहात हे मी जाणतो. तुम्ही कुवेतच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी तत्पर आहात. मी महामहीम, श्रीमान अमीर यांचा आभारी आहे की त्यांनी मला उद्घाटन समारंभात विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले. कुवेतचे शाही घराणे, कुवेतचे सरकार, तुम्ही सर्वजण भारताचा किती सन्मान करता, हे यातून दिसून येते. भारत - कुवेत संबंधांना तुम्ही सर्वजण निरंतर दृढ बनवत रहाल, याच कामनेसह, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार!

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय!

खूप खूप धन्यवाद !

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
How GeM has transformed India’s public procurement

Media Coverage

How GeM has transformed India’s public procurement
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister wishes Mr. Joe Biden a quick and full recovery
May 19, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed concern for the health of former US President Mr. Joe Biden and wished him a quick and full recovery. "Our thoughts are with Dr. Jill Biden and the family", Shri Modi added.

The Prime Minister posted on X;

"Deeply concerned to hear about @JoeBiden's health. Extend our best wishes to him for a quick and full recovery. Our thoughts are with Dr. Jill Biden and the family."