एम्स (एआयआयएमएस), खत प्रकल्प आणि आयसीएमआर केंद्राचे उद्‌घाटन
दुहेरी इंजिनच्या सरकारने विकासकामांचा वेग दुप्पट केला: पंतप्रधान
"वंचित आणि शोषितांचा विचार करणारे सरकार कठोर परिश्रम करते आणि परिणामही देते"
"आजचा कार्यक्रम काहीही अशक्य नाही अशा नवभारताच्या दृढनिश्चयाचा पुरावा आहे "
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कामाबद्दल पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश सरकारचे केले कौतुक

भारत माता की- जय!

भारत माता की -जय!

धर्म, अध्यात्म आणि क्रांतीची नगरी असलेल्या गोरखपूरच्या देवतुल्य लोकांना मी वंदन करतो. परमहंस योगानंद, महायोगी गोरखनाथ जी, वंदनीय हनुमान प्रसाद पोद्दार जी, आणि महा बलीदानी पंडित रामप्रसाद बिस्मिल यांच्या या पवित्र भूमीला कोटी-कोटी नमन! तुम्हा सर्व मंडळींना खत कारखाना आणि  एम्ससाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी  लागली. मात्र आज या प्रकल्पांच्या पूर्ततेची वेळ आली आहे. यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन!!

माझ्यासमवेत या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे यशस्वी कर्मयोगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, डॉक्टर दिनेश शर्मा, भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, अपना दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मंत्रिमंडळातल्या आमच्या सहकारी भगिनी अनुप्रिया पटेल, निषाद पार्टीचे अध्यक्ष भाई संजय निषाद, मंत्रिमंडळातले माझे सहकारी पंकज चौधरी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री जयप्रताप सिंह, सूर्यप्रताप शाही, दारासिंह चौहान, स्वामी प्रसाद मौर्या, उपेंद्र तिवारी, सतीश व्दिवेदी, जयप्रकाश निषाद, राम चौहान, आनंद स्वरूप शुक्ला, संसदेमधले माझे सहकारी, उत्तर प्रदेश विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्यगण आणि विशाल संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले माझे प्रिय बंधू आणि भगिनी !

ज्यावेळी मी व्यासपीठावार आलो, त्यावेळी इथे जमलेल्या प्रचंड गर्दीविषयी विचार करीत होतो. इथून तर नजरही पोहोचत नाही, इतक्या दूरपर्यंत झालेली लोकांची गर्दी दिसत आहे. या इकडच्या बाजूला पाहिल्यानंतर तर मी हैराणच झालो. इतक्या मोठ्या संख्येने लोक आज आले आहेत. कदाचित त्यांना सर्वकाही दिसत असेल, असेही नाही. तसेच इथे काय बोलले जात आहे, ते ऐकू येत असेल, असेही मला वाटत नाही. इतक्या दूर-दूर पर्यंत जमलेली मंडळी, हातातले ध्वज फडकावित आहेत. हे पाहून जाणवते, हे तर तुमचे प्रेम आहे. तुमच्याकडून मिळणारा आशीर्वाद आहे. हे प्रेम आणि आशीर्वाद मला रात्रं-दिवस काम करण्याची प्रेरणा देत असतात. मला नवीन ऊर्जा देतात, ताकद देतात. पाच वर्षांपूर्वी मी इथे एम्सचा आणि खत निर्मिती कारखान्याचा शिलान्यास करण्यासाठी आलो होतो. आज हे दोन्ही प्रकल्प एकाच वेळी लोकार्पण करण्याचे भाग्यही तुम्ही मला दिले आहे. आयसीएमआरच्या प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रालाही आज स्वतःची नवीन वास्तू मिळाली आहे. यासाठी मी उत्तर प्रदेशच्या लोकांचे खूप-खूप अभिनंदन करतो. 

मित्रांनो,

गोरखपूर खत निर्मिती प्रकल्प सुरू होण्यामुळे , गोरखपूरमध्ये एम्स सुरू होण्यामुळे, अनेक संदेश दिले जात आहेत. ज्यावेळी डबल इंजिनाचे सरकार असते, त्यावेळी डबल वेगाने कामे होत जातात. ज्यावेळी चांगला विचार, विधायक विचार मनाशी पक्का करून काम केले जाते, त्यावेळी कोणत्याही आपत्तीची बाधा निर्माण होत नाही. ज्यावेळी गरीब-शोषित- वंचित यांची चिंता करणारे सरकार सत्तेमध्ये असते, त्यावेळी तेही परिश्रम करतात आणि त्याचे योग्य ते परिणाम आणून दाखवतात. ज्यावेळी हा नवा भारत एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करतो, त्यावेळी त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. गोरखपूरमध्ये आज होत असलेले कार्यक्रम म्हणजे याच गोष्टीची साक्ष देणारे आहेत. 

मित्रांनो,

ज्यावेळी 2014 मध्ये तुम्ही मंडळींनी मला सेवा करण्याची संधी दिली होती, त्यावेळी देशामधल्या खत क्षेत्राची अतिशय वाईट स्थिती होती. देशातले   अनेक मोठे-मोठे खत निर्मिती करणारे कारखाने अनेक वर्षांपासून बंद पडले होते. आणि परदेशातून खतांची होणारी आयात सातत्याने वाढत होती. आणखी एक मोठी समस्या होती, ती म्हणजे; देशामध्ये जे काही खत उपलब्ध होते, ते आडमार्गाने, लपून-छपून शेतीच्या ऐवजी इतर कामांसाठी गुप-चुप वापरण्यासाठी पाठविले जात होते. यामुळे संपूर्ण देशभरामध्ये यूरियाची टंचाई निर्माण होत होती, आणि त्याविषयीच्या वारंवार बातम्या प्रसिद्ध होत होत्या. शेतकरी बांधवांना खतासाठी लाठीमार, तर कधी गोळीबारही सहन करावा लागत होता. अशा स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी  आम्ही एक नवीन संकल्प करून पुढची मार्गक्रमणा करीत राहिलो. आम्ही एकाच वेळी तीन सूत्रांनुसार काम करायला प्रारंभ केला. एक म्हणजे आम्ही यूरियाचा अयोग्य कारणांसाठी होणारा वापर थांबवला. यासाठी यूरियाला शंभर टक्के नीम कोटिंग करण्यास प्रारंभ केला. दुसरे सूत्र म्हणजे आम्ही कोट्यवधी शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतातल्या मातीची माहिती देणारी - मृदा आरोग्य पत्रिका दिली. यामुळे त्यांच्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचे खत वापरणे गरजेचे आहे, हे त्या शेतकरी बांधवांना समजणे सोपे झाले. तिसरी गोष्ट म्हणजे, आम्ही यूरियाच्या उत्पादन वृद्धीवर जोर दिला. बंद पडलेल्या खत निर्मिती प्रकल्पांचे टाळे कसे उघडतील, याकडे विशेष लक्ष दिले. या अभियानामध्ये गोरखपूरच्या या खत निर्मिती प्रकल्पासहीत देशातल्या  चार मोठ्या  खत निर्मिती प्रकल्पांची निवड आम्ही केली आहे. यापैकी आज एका प्रकल्पाचे काम सुरू होत आहे. उर्वरित दोन प्रकल्पही आगामी वर्षात सुरू होतील.

मित्रांनो,

गोरखपूर खत प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आणखी एक भगीरथ कार्य केले गेले आहे. ज्याप्रमाणे भगीरथाने गंगा भूमीवर आणली अगदी त्याचप्रमाणे या खत प्रकल्पापर्यंत इंधन पोहोचविण्यासाठी, ऊर्जा गंगेला आणण्यात आले. पीएम ऊर्जा गंगा गॅस पाइपलाइन योजनेअंतर्गत हल्दिया ते जगदीशपूर पाइपलाइन टाकण्यात आली आहे. या पाइपलाइनमुळे गोरखपूर खत निर्मिती प्रकल्प तर सुरू झाला आहेच, त्याचबरोबर पूर्व भारतातल्या डझनभर जिल्ह्यांना वाहिनीव्दारे स्वस्त गॅसही मिळायला लागला आहे.

बंधू आणि भगिनींनो,

खत निर्मिती प्रकल्पाच्या शिलान्यास कार्यक्रमाच्यावेळी मी आपल्याला सांगितले होते की, या कारखान्यामुळे गोरखपूर या संपूर्ण क्षेत्राच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणून पुढे येणार आहे. आज मी ही गोष्ट सत्य होताना पहात आहे. हा खत कारखाना राज्यातल्या अनेक शेतकरी बांधवांना पुरेसे यूरिया तर देणार आहेच; त्याचबरोबर पूर्वांचलमध्ये रोजगार आणि स्वरोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण करणार आहे. आता याभागात आर्थिक विकासाच्या नवीन शक्यतांची निर्मिती होईल. अनेक नवीन व्यवसाय सुरू होऊ शकतील. खत कारखान्यांशी संबंधित सहायक उद्योगांबरोबरच वाहतूक आणि सेवा क्षेत्रालाही उत्तेजन मिळेल.

मित्रांनो,

देशाला यूरिया उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनविण्यामध्ये गोरखपूर खत निर्मिती कारखान्याची खूप मोठी भूमिका असणार आहे. देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये उभे करण्यात येत असलेल्या खत निर्मिती प्रकल्पांचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर 60 लाख टन अतिरिक्त यूरिया देशाला मिळणार आहे. याचा अर्थ भारताला हजारों कोटी रूपये परदेशात पाठवावे लागणार नाहीत. भारताचा पैसा भारतामध्येच कामी येईल.

मित्रांनो,

खताच्या बाबतीत आत्मनिर्भर होणे, का आवश्यक आहे? याचा अनुभव आपण कोरोनाच्या संकटकाळामध्येही घेतला आहे. कोरोनामुळे संपूर्ण दुनियेत लॉकडाउन लागला होता. एका देशातून दुस-या देशात येणे-जाणे पूर्ण थांबले होते. बाहेरची मालवाहतूक थांबली होती, पुरवठा साखळीच तुटली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खतांच्या किंमती अतिशय वाढल्या होत्या. मात्र शेतकरी बांधवांसाठी समर्पित आणि संवेदनशील असलेल्या आमच्या सरकारने हे सुनिश्चित केले की, जगामध्ये भलेही खतांचे दर कितीही वाढले तरीही तो बोझा आपण शेतकरी बांधवांवर टाकायचा नाही. बळीराजाला कमीतकमी त्रास झाला पाहिजे, याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. तुम्हा लोकांना काही गोष्टी जाणून नवल वाटेल,तर बंधू -भगिनींनो, ऐका; यावर्षी एनपीके खताचे दर संपूर्ण जगभरामध्ये वाढले आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांना जास्त अनुदान देणे आवश्यक ठरले. म्हणून आम्ही शेतक-यांना 43 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त अनुदान दिले. यूरियासाठी असलेल्या अनुदानामध्ये आमच्या सरकारने 33 हजार कोटी रूपयांची वाढ केली आहे. याचे कारण म्हणजे जगामध्ये खतांचे दर वाढले असले तरीही त्याचा बोझा आपल्या शेतकरी बांधवांवर पडू नये, हा विचार आम्ही केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 60-65 रूपये प्रतिकिलो या दराने यूरियाची विक्री होत आहे. तर भारतामधल्या शेतक-यांना हाच यूरिया 10 ते 12 पट स्वस्त देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

बंधू आणि भगिनींनो,

आज खाद्य तेल आयात करण्यासाठीही भारत, दरवर्षी हजारो कोटी रूपये परदेशात पाठवतो. ही स्थिती बदलण्यासाठी आपण देशामध्ये पुरेसे खाद्यतेल उत्पादित व्हावे, यासाठी राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे. पेट्रोल-डिझेल यांच्यासाठी कच्च्या तेलावरही भारत दरवर्षी 5-7 लाख कोटी रूपये खर्च करीत आहे. हा आयातीचा खर्च कमी करण्यासाठी आम्ही इथेनॉल आणि जैवइंधनाच्या निर्मितीवर भर देत आहोत. यासाठी सातत्याने काम सुरू आहे. पूर्वांचल भाग तर ऊस उत्पादक शेतक-यांचा जणू किल्लाच आहे. इथेनॉल म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिरिक्त कमाईचे एक अतिशय चांगले साधन बनत आहे.

उत्तर प्रदेशामध्येच जैवइंधन बनविण्यासाठी अनेक कारखाने उभे करण्याचे काम आता सुरू आहे. आमचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी उत्तर प्रदेशातून फक्त 20 कोटी लीटर इथेनॉल, तेल कंपन्यांना पाठवले जात होते. आज जवळ-जवळ 100 कोटी लीटर इथेनॉल, एकट्या उत्तर प्रदेशातले शेतकरी बांधव भारतातल्या तेल कंपन्यांना पाठवत आहेत. आधी खाडीतून तेल येत होते. आत झाडीचेही तेल येवू लागले आहे. मी आज योगीजींच्या सरकारचे या गोष्टीविषयी कौतुक करतो. त्यांनी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी गेल्या काही वर्षात जे काही अभूतपूर्व काम केले आहे, ते अतिशय कौतुकास्पद आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लाभकारी मूल्यामध्ये अलिकडेच साडे तीनशे रूपयांपर्यंत वाढ केली आहे. आधीच्या दोन्ही सरकारांनी 10 वर्षांमध्ये जितके पैसे ऊस उत्पादक शेतक-यांना दिले होते, जवळपास तितकेच पैसे योगी यांच्या सरकारने आपल्या अवघ्या साडेचार वर्षांच्या  काळात दिले आहेत.

बंधू आणि भगिनींनो

खरा विकास तोच असतो ज्याचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचतो,  खरा विकास संतुलित  असावा,  सर्वांसाठी हितकारक असावा आणि ही गोष्ट तोच समजू शकतो तो संवेदनशील असेल ज्यांना गरीबांची  चिंता असेल. दीर्घकाळापासून गोरखपुरसह हा खूप मोठा  प्रदेश केवळ एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या भरवशावर चालला  होता . तिथल्या गरीब आणि,   मध्यमवर्गीय कुटुंबांना उपचारासाठी बनारस किंवा लखनौला  जावे लागत होते. पाच वर्षांपूर्वी मेंदूज्वरची  या प्रदेशात  काय स्थिती होती हे माझ्यापेक्षा तुम्ही लोक जास्त चांगले जाणता.  इथे  वैद्यकीय महाविद्यालयात देखील जे संशोधन केंद्र सुरू होते त्याची स्वतःची इमारत देखील नव्हती.

बंधू आणि भगिनींनो ,

तुम्ही जेव्हा आम्हाला सेवा करण्याची संधी दिली तेव्हा इथे  एम्स मध्ये देखील , तुम्ही पाहिलं असेल एवढे मोठे एम्स रुग्णालय उभारण्यात आले  आहे . एवढेच नाही , संशोधन केंद्राची  स्वतःची इमारत देखील तयार आहे. जेव्हा मी एम्सचा शिलान्यास करण्यासाठी आलो होतो तेव्हा देखील मी म्हटले होते की आपण या प्रदेशाला  मेंदूज्वरापासून दिलासा देण्यासाठी मेहनत करू. आम्ही मेंदूज्वर पसरवणारी कारणे दूर करण्यावर देखील काम केलं आणि त्याच्यावरील उपचारांवर देखील काम केलं.  आज ती मेहनत प्रत्यक्ष समोर दिसत आहे. आज गोरखपुर आणि बस्ती  विभागाच्या 7 जिल्ह्यांमध्ये मेंदूज्वराचे   रुग्ण सुमारे 90 टक्क्यांपर्यंत  कमी झाले आहेत.  जी मुलं आजारी पडतात त्यातल्या  बहुतांश  मुलांना वाचवण्यात आम्हाला यश आले आहे.  योगी सरकारने  या प्रदेशात जे काम केले  आहे त्याची चर्चा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील होत आहे. एम्स आणि आयसीएमआर संशोधन केंद्र तयार झाल्यामुळे आता इंन्सेफ्लाइटिस पासून मुक्तीच्या अभियानाला आणखी बळ मिळेल . त्यामुळे अन्य  संसर्गजन्य आजार,  महामारी पासून बचाव करण्यात देखील उत्तर प्रदेशला खूप मदत होईल.

बंधू आणि भगिनींनो,

कुठल्याही देशाला पुढे जाण्यासाठी त्या देशातल्या आरोग्य सेवा स्वस्तअसणे, सर्वांना सुलभ असणे, सर्वांना सहज उपलब्ध असणे हे खूप आवश्यक आहे. नाहीतर मीदेखील लोकांना उपचारांसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात चकरा  मारताना , आपली जमीन  गहाण ठेवताना, दुसऱ्यांकडून पैसे उसने घेताना पाहिले आहे.  देशातल्या प्रत्येक गरीब ,दलित, पीडित शोषित, वंचित, कुठल्याही वर्गातला असो, कुठल्याही क्षेत्रात राहणारा असो, त्याला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी मी तनामनाने  प्रयत्न करत आहे. पूर्वी असा विचार केला जात होता की एम्स सारख्या  मोठ्या वैद्यकीय संस्था मोठ्या शहरांमध्ये असतात . मात्र आमचे  सरकार उत्तम  उपचार, मोठ -मोठी रुग्णालये  देशाच्या दूर सुदूर  भागांपर्यंत घेऊन जात आहे . तुम्ही कल्पना करू शकता, स्वातंत्र्यानंतर या शतकाच्या सुरुवातीपर्यंत देशात केवळ 1 एम्स होते, एक.   अटलजींनी त्यांच्या काळात आणखी 6 एम्सला मंजुरी दिली होती .  गेल्या सात वर्षात 16 नवीन एम्स  उभारण्यावर देशभरात काम सुरू आहे.  देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक वैद्यकीय महाविद्यालय असावे हे आमचं उद्दिष्ट आहे. मला आनंद आहे की इथे उत्तर प्रदेशात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे  काम वेगाने प्रगतिपथावर आहे आणि आत्ता योगिजी जे  वर्णन करत होते कुठे-कुठे वैद्यकीय महाविद्यालयाचे काम झाले आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशमधील 9 वैद्यकीय महाविद्यालयांचे एकाचवेळी लोकार्पण करण्याची संधी तुम्ही मला दिली. आरोग्याला  दिल्या जात असलेल्या सर्वोच्च प्राधान्याचा हा   परिणाम आहे की उत्तर प्रदेश लसीकरणाच्या सुमारे 17 कोटी मात्रांच्या टप्प्यावर पोहोचत आहे. 

बंधू आणि भगिनींनो ,

आमच्यासाठी 130 कोटींहून अधिक देशवासीयांचे  आरोग्य ,सुविधा, आणि समृद्धी सर्वोपरि  आहे.  विशेषता आपल्या माता-भगिनी-मुलींसाठी  सुविधा आणि  आरोग्यावर खूप कमी लक्ष देण्यात आले. मात्र गेल्या काही वर्षांत पक्के  घर, शौचालय ज्याला तुम्ही लोक इज्जत घर  म्हणता,  वीज , गॅस  पाणी,  पोषण लसीकरण अशा अनेक सुविधा ज्या  गरीब भगिनींना मिळाल्या आहेत ,  त्याचे परिणाम आता दिसत आहेत.  अलीकडेच कुटुंब आरोग्याचे  सर्वेक्षण आले आहे,  ते देखील खूप सकारात्मक संकेत देतात.  देशात प्रथमच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक झाली आहे . यामध्ये उत्तम आरोग्य सुविधांची देखील खूप मोठी भूमिका आहे.  मागील पाच-सहा वर्षांमध्ये महिलांचा जमीन आणि घरांवरील मालकी हक्क वाढला आहे.  यामध्ये उत्तर प्रदेश अव्वल राज्यांपैकी एक आहे.  अशाच प्रकारे बँक खाती आणि मोबाइल फोनच्या वापरात   देखील महिलांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ नोंदली गेली आहे .

मित्रांनो,

आज तुमच्याशी बोलताना मला पूर्वीच्या सरकारांचे  दुहेरी वर्तन , जनतेप्रति  त्यांची उदासिनता वारंवार  आठवत आहे . मी याचा उल्लेख देखील तुमच्यासमोर नक्कीच  करू इच्छितो . सगळ्यांना माहित  आहे की गोरखपुर खत निर्मिती कारखाना या संपूर्ण प्रदेशातल्या शेतकऱ्यांसाठी , इथल्या  रोजगारासाठी किती आवश्यक होता,  मात्र पूर्वीच्या सरकारांनी तो सुरू करण्यात रस दाखवला नाही. सर्वांना माहित होते की गोरखपुर मध्ये एम्सची मागणी अनेक वर्षांपासून होत होती . मात्र 2017 पूर्वी जे सरकार चालवत होते त्यांनी जमीन देण्यात विविध प्रकारची कारणे  सांगितली.  मला आठवत आहे, जेव्हा खूप प्रयत्न केला गेला तेव्हा अतिशय खेदाने,नाईलाजाने पूर्वीच्या सरकारकडून गोरखपुर एम्स साठी जमीन वितरित केली गेली.

मित्रांनो,

आजचा हा कार्यक्रम त्या लोकांना  देखील एक चोख प्रत्युत्तर देत  आहे ,  ज्यांना समयसूचकतेवर  प्रश्न उपस्थित करण्याचा मोठा छंद आहे . जेव्हा असे प्रकल्प पूर्ण होतात तेव्हा त्यामागे अनेक वर्षांची मेहनत असते,  दिवस-रात्र केले जाणारे परिश्रम असतात. या लोकांना ही गोष्ट कधीही  समजणार नाही की कोरोनाच्या  या संकट काळात देखील दुहेरी  इंजिनचे सरकार  विकासासाठी प्रयत्नशील आहे . त्यांनी काम थांबू दिलं नाही.

माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो ,

लोहियाजी , जयप्रकाश नारायणजी यांचे आदर्श , या महापुरुषांची शिस्त  या लोकांनी कधीच मागे टाकली  आहे. आज संपूर्ण उत्तर प्रदेशला हे चांगले ठाऊक आहे की लाल टोपीवाल्यांना लाल दिव्याशी  देणं घेणं होतं , त्यांना  तुमच्या दुःख , वेदनांशी  काही देणंघेणं नव्हतं . या लाल टोपी वाल्यांना सत्ता हवी होती , घोटाळ्यासाठी आपली तिजोरी भरण्यासाठी , अवैध कब्जा करण्यासाठी,  माफियाना मोकळीक देण्यासाठी लाल टोपी वाल्यांना सरकार बनवायचे  आहे दहशतवाद्यांना मेहेरबानी दाखवण्यासाठी,  दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडण्यासाठी  आणि म्हणूनच लक्षात ठेवा,  लाल टोपीवाले उत्तर प्रदेशासाठी रेड अलर्ट आहेत, रेड अलर्ट म्हणजेच धोक्याची घंटा आहे .

मित्रांनो ,

उत्तर प्रदेशातला  ऊस उत्पादक शेतकरी हे विसरू शकत नाही की योगीजी यांच्यापूर्वी  जे सरकार होते त्यांनी कसे ऊस शेतकऱ्यांना थकीत रक्कम  देताना रडवले होते.  हप्त्यांमध्ये जे पैसे मिळत होते त्यात देखील महिन्यांचे  अंतर पडत होते.  उत्तर प्रदेशात साखर कारखान्यासंदर्भात कसे खेळ खेळले जात होते, घोटाळे होत होते,  हे पूर्वांचल आणि उत्तर प्रदेशच्या  लोकांना चांगल्या प्रकारे माहित आहे.

मित्रांनो ,

आमचे दुहेरी इंजिनचे सरकार तुमची सेवा करण्यात गुंतले  आहे,  तुमचे  जीवन सुखकर बनवण्याचा प्रयत्न करत आहे .  बंधू आणि भगिनींनो तुम्हाला वारसा स्वरूपात जी संकट मिळाली आहेत,  तशी संकटं  तुमच्या मुलांना वारसा म्हणून देण्याची तुमच्यावर पाळी येऊ नये अशी आमची इच्छा आहे . आम्हाला हा बदल घडवून आणायचा आहे . पूर्वीच्या सरकारांचे ते दिवस देखील देशाने पाहिले आहेत , जेव्हा धान्य असूनही गरीबांना  ते मिळत नव्हते.  आज आमच्या सरकारने  सरकारी गोदामी  गरीबांसाठी खुली केली आहेत आणि योगीजी पूर्ण ताकदीनिशी प्रत्येक घरात अन्न पोहचवण्याचा  प्रयत्न करत आहेत. याचा लाभ उत्तर प्रदेशच्या  सुमारे 15 कोटी लोकांना होत आहे . अलीकडेच पीएम गरीब कल्याण योजना होळी पर्यंत वाढवण्यात आली आहे.

मित्रांनो ,

पूर्वी वीज पुरवठ्याच्या बाबतीत उत्तर प्रदेशचे काही जिल्हे व्हीआयपी होते . योगीजींनी  उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्याला आज व्हीआयपी म्हणजेच अतिशय महत्त्वाचं बनवून वीज पोहोचवण्याचं काम केले आहे. आज योगीजींच्या सरकारमध्ये प्रत्येक गावाला समान आणि भरपूर वीजपुरवठा होत आहे. पूर्वीच्या सरकारांनी गुन्हेगारांना संरक्षण देऊन उत्तर प्रदेशला बदनाम केले होते. आज  माफिया तुरुंगात आहेत आणि गुंतवणूकदार उदारपणे उत्तर प्रदेशात गुंतवणूक करत आहे. हाच दुहेरी इंजिनचा दुहेरी  विकास आहे. म्हणूनच दुहेरी इंजिनच्या सरकारवर उत्तर प्रदेशचा विश्वास आहे. तुमचा हा  तुमचा हा आशीर्वाद आम्हाला मिळत राहील   याच अपेक्षेसह पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की जय ! भारत माता की जय! भारत माता की जय ! खूप-खूप  धन्यवाद।

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait

Media Coverage

When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi