जय जगन्नाथ !
ओदिशाचे मुख्यमंत्री, आमचे ज्येष्ठ सहकरी, श्री नवीन पटनायक जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी रविशंकर प्रसाद जी, ओदिशाचे भूमिपुत्र आणि मंत्रिमंडळातले माझे सहकारी धर्मेंद्र प्रधान जी, अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती पी पी भट्ट जी, ओदिशातले खासदार, आमदार, कार्यक्रमाला उपस्थित इतर मान्यवर आणि मित्रांनो,
भगवान जगन्नाथाच्या आशीर्वादाने प्राप्तिकर अपिलीय न्यायाधीकरणाचे म्हणजेच आयटीएटीचे कार्यालय आज आपल्या स्वतःच्या आधुनिक परिसरात स्थानांतरीत होत आहे. दीर्घकाळ भाड्याच्या इमारतीत काम केल्यानंतर आपल्या स्वतःच्या घरात जाण्याचा आनंद काय असतो, याचा अंदाज, तुम्हा सर्वांचे प्रफुल्लीत चेहरे बघून मला येतो आहे. तुमच्या या आनंदात सहभागी होण्यासाठी, मी प्राप्तिकर अपिलीय न्यायाधिकरणाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. कटकची ही शाखा आता केवळ ओदिशातल्याच नाही, तर पूर्व आणि ईशान्य भारतातल्या लाखो करदात्यांना देखील आधुनिक सुविधा देणार आहे. या नव्या सुविधांमुळे हे पीठ कोलकाता क्षेत्रातील इतर शाखांमध्ये प्रलंबित असलेल्या अपीलांचा निपटारा देखील करु शकेल. यासाठी, ज्यांना या आधुनिक कार्यालयाचा लाभ मिळणार आहे,ज्यांच्या अपिलावर जलद गतीने सुनावणी होऊ शकणार आहे, त्या सर्व करदात्यांना देखील खूप खूप शुभेच्छा!
मित्रांनो,
आजचा हा दिवस, आणखी एका पुण्यात्म्याचे स्मरण करण्याचाही आहे, ज्यांच्या प्रयत्नांशिवाय, प्राप्तिकर अपिलीय न्यायाधिकरणाच्या शाखेचे हे स्वरुप साकार होणे शक्य नव्हते. ओदिशातील जनतेच्या सेवेसाही समर्पित असलेले बिजू पटनायक जी. बिजू बाबूंना देखील मी श्रद्धांजली अर्पण करतो.
मित्रांनो,
प्राप्तिकर अपिलीय न्यायाधिकरणाचा एक गौरवास्पद इतिहास आहे. जे देशभरात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम करत आहेत,त्या सर्व चमूचेही मी अभिनंदन करतो. कटकच्या आधी बेंगळूरु आणि जयपूर येथेही या न्यायाधिकरणाची आधुनिक संकुले बांधण्यात आली आहेत असे मला सांगण्यात आले आहे . याबरोबरच, दुसऱ्या शहरांमध्येही नवी संकुले तयार करणे किंवा आधीची संकुले आधुनिक करण्याचे काम आपण जलदगतीने पूर्ण करत आहात.
मित्रांनो,
आज आपण तंत्रज्ञानाच्या ज्या युगात आहोत, तिथे संपूर्ण व्यवस्थेचे आधुनिकीकरण अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः आपल्या न्यायव्यवस्थेत आधुनिकता, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर, यामुळे देशातल्या नागरिकांची सोय होत आहे. निष्पक्ष, सुलभ आणि त्वरित न्यायाचा जो आदर्श घेऊन आपण वाटचाल करत आहात, तो मार्ग, आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानविषयक सोयींमुळे आणखी सशक्त होणार आहे. आयटी अपिलीय न्यायाधिकरण देशभरातल्या आपल्या शाखांमध्ये आभासी सुनावणीची देखील व्यवस्था करत आहे, ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. आता श्री पी पी भट्ट यांनी सांगितले की ,कोरोना काळातही आभासी पद्धतीनेअतिशय मोठ्या प्रमाणात काम झाले आणि रविशंकर जी यांनी तर पूर्ण देशातल्या कामांचीच माहिती दिली.
मित्रांनो,
पारतंत्र्याच्या दीर्घ काळाने, करदाते आणि कर संकलक यांच्यातले संबंध, शोषित आणि शोषक अशा स्वरुपाचेच विकसित झाले आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही आपली करप्रणाली जशी होती, त्यात ही प्रतिमा बदलवण्याचे जेवढे प्रयत्न व्हयला हवे होते, तेवढे ते केले गेले नाही. खरे तर भारतात प्राचीन काळापासूनच कराचे महत्व आणि करव्यवहार याविषयी अनेक वर्षांची निकोप परंपरा आहे. गोस्वामी तुलसीदास यांनी म्हटले आहे —
बरसत हरसत सब लखें, करसत लखे न कोय
तुलसी प्रजा सुभाग से, भूप भानु सो होय’
म्हणजेच, जेव्हा मेघ बरसतात, तेव्हा त्याचा लाभ सर्वांना दिसतो. मात्र, जेव्हा मेघ तयार होतात, तेव्हा सूर्य त्यातील पाणी शोषून घेतो, मात्र त्याचा त्रास कोणालाही होत नाही. सरकारलाही असेच असायला हवे. जेव्हा सरकार सर्वसामान्य माणसांपासून कर वसूल करेल, तेव्हा त्याचा त्रास कोणालाही होऊ नये, मात्र जेव्हा हाच कर सुविधा रुपात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचेल, तेव्हा लोकांना त्याचे लाभ अनुभवता आले पाहिजेत, त्याचे महत्व कळले पाहिजे.
मित्रांनो,
आजचा करदाता, संपूर्ण कर व्यवस्थेत मोठे बदल आणि पारदर्शकतेचा साक्षीदार बनतो आहे. जेव्हा त्याला आज करपरताव्यासाठी कित्येक महिने वाट बघावी लागत नाही, काही आठवड्यातच त्याला करपरतावा मिळतो, तेव्हा त्याला या पारदर्शकतेच लाभ मिळतो.विभागाने स्वतः पुढाकार घेऊन दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले जुने वादविवाद सोडवले आहेत, त्याला वादविवादांच्या कोर्टकचेरीच्या फेऱ्यातून मुक्त केले आहे, हे जेव्हा तो बघतो, तेव्हा त्याला पारदर्शकतेचा अनुभव येतो. जेव्हा त्याला चेहराविरहित सुविधा मिळते, त्यावेळी त्याला ही पारदर्शकता अधिकच जाणवते. जेव्हा तो बघतो, की प्राप्तीकर सातत्याने कमी होत आहे, तेव्हा त्याला कर पारदर्शकता अधिक चांगल्या पद्धतीने अनुभवता येते. आधीच्या सरकारांच्या काळात कर-दहशतवादाच्या तक्रारी असत. सगळीकडे हाच शब्द ऐकू येत असे- कर-दहशतवाद! मात्र आज, ते वातावरण मागे टाकून आपला देश कर पारदर्शकतेकडे वळतो आहोत. कर दहशतवादापासून ते करपारदर्शकतेपर्यंतचा हा बदल यासा ठी झाला कारण आपण रिफॉर्म (सुधारणा),परफॉर्म (कामगिरी) आणि ट्रान्स्फफॉर्म (परिवर्तन) या दृष्टीकोनातून वाटचाल करतो आहोत. आपण सुधारणा करतो आहोत, नियम आणि प्रक्रियांच्या जुनाट व किचकट प्रक्रियांमध्ये, ज्यात आपण तंत्रज्ञानाची भरपूर मदत घेत आहोत. आपण काम करत आहोत अगदी शुध्द मनाने आणि स्पष्ट उद्दिष्टांसह, आणि त्यासोबतच, आपण कर प्रशासनाच्या मानासिकतेत परिवर्तन घडवत आहोत.
मित्रांनो,
आज देशभरात पाच लाख पर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर आहे, ज्याचा खूप मोठा लाभ मध्यमवर्गातील आपल्या युवकांन मिळतो आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात, प्राप्तिकराला जो नवा पर्याय देण्यात आला आहे, तो अत्यंत सुलभ तर आहेच, त्याशिवाय करदात्याला अनावश्यक ताण आणि खर्चापासून वाचवणारा आहे. याचप्रमाणे, विकासाचा वेग वाढवण्यासाठी, भारताला अधिकाधिक गुंतवणूक स्नेही बनवण्यासाठी अलीकडेच कॉर्पोरेट करात देखील कपात करण्यात आली. उत्पादन क्षेत्रात, देश पुढे जावा, यासाठी नव्या देशांतर्गत, उत्पादन कंपन्यांसाठी कराचा दर 15 टक्के करण्यात आला आहे.भारताच्याभांडवली बाजारात , गुंतवणूक वाढवण्यासाठी लाभांश कर देखील रद्द करण्यात आला आहे. याआधी जे डझनभर करांचे जाळे होते, ते देखील जीएसटी मध्ये कमी करण्यात आले आहे आणि अधिकधिक वस्तू तसेच मालावरील जीएसटी सुद्धा कमी करण्यात आला आहे.
मित्रांनो,
पाच-सहा वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की जर प्राप्तीकर आयुक्त करदात्याला जेव्हा 3 लाख रुपयांपर्यंतची सवलत देत असत, तर त्यालाही आयटीएटी मध्ये आव्हान दिले जात असे. ही मर्यादा मध्य सरकारने 3 लाखांपासून 50 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाही तेच खटले जाऊ शकतात, ज्यात कर अपिलाचा विषय, 2 कोटींपेक्षा अधिक असतो. या सर्व प्रयत्नांमुळे देशात उद्योगसुलभता तर वाढते आहेच, त्याशिवाय या सर्व संस्थांवर असलेल्या खटल्यांचा भारही कमी होतो आहे.
मित्रांनो,
करात कपात आणि सुलभ प्रक्रिया यासोबतच ज्या सर्वात मोठ्या सुधारणा करण्यात आल्या, त्या प्रामाणिक करदात्याच्या सन्मानाशी संबधित आहेत, कराच्या त्रासातून त्यांची सुटका करणाऱ्या आहेत. आज भारत, जगातल्या त्या मोजक्या देशांमध्ये आहे, जिथे करदात्यांचे अधिकार आणि कर्तव्ये दोन्हीचे संहितीकरण करण्यात आले आहे, त्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. करदाते आणि कर संकलक यांच्यात परस्पर विश्वास निर्माण व्हावा, पारदर्शकता यावी, यासाठी हे खूप महत्वाचे पाऊल आहे. जे व्यक्ती आपले श्रम, आपले कष्ट, देशाच्या विकासासाठी खर्च करत आहेत, देशातील अनेकांना रोजगार देत आहेत , अशा व्यक्तींना कायम सन्मान मिळायलाच हवा. मी पंधरा ऑगस्टला लाल किल्यावरुन देखील, मोठ्या आग्रह आणि सन्मानाने याचा उल्लेख केला होता, की देशाची संपत्ती निर्माण करणाऱ्या लोकांच्या अडचणी जेव्हा कमी होतात, त्याला सुरक्षा मिळते, तेव्हा देशातल्या व्यवस्थांवरचा त्याचा विश्वास अधिकच दृढ होतो. याच वाढत्या विश्वासाचा परिणाम म्हणून आज अधिकाधिक करदाते देशाच्या करव्यवस्थेचा भाग बनण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. सरकार कशाप्रकारे करदात्यांवर विश्वास ठेवून वाटचाल करते आहे, याचे आणखी एक उदाहरण मी आज आपल्याला देऊ इच्छितो.
मित्रांनो,
देशात व्यवसाय करणारे लोक यापूर्वी जेव्हा प्राप्तिकर विवरणपत्रे भरत तेव्हा त्यातील बहुतांश व्यक्तींना प्राप्तिकर विभागाच्या छाननीचा सामना करवा लागत असे. मात्र, आता असे नाही. आता सरकारचा हा विचार असतो की जो प्राप्तीकर विवरण भरतो आहे, त्यावर आधी पूर्णपणे विश्वास ठेवा. याचाच परिणाम म्हणून आज देशात जी करविवरण पत्रे भरली जातात, त्यातली 99.75 टक्के विवरणपत्रे कुठल्याही हरकतीविना स्वीकारली जातात. केवळ 0.25 टक्के प्रकरणांचीच छाननी केली जाते. आज देशाच्या करप्रणालीत झालेला हा सर्वात मोठा बदल आहे.
मित्रांनो,
देशात सुरु असलेल्या कर सुधारणांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्यासारख्या न्यायाधिकरणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ज्या प्रकारे आताच्या काळात आपणही आभासी स्वरुपात काम पुढे सुरु ठेवले आणि आज चेहराविरहित मूल्यांकनाच्या दिशेने पुढे जात आहोत,त्यावर कदाचित आपणही असा विचार करत असाल की चेहराविरहीत मूल्यांकन आणि अपीलप्रमाणेच, आय टी न्यायाधिकरणासाठी सुद्धा आपण चेहराविरहीत व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करु शकतो का? प्रत्यक्ष सुनावणीच्या ऐवजी ई-सुनावणीला प्राधान्य दिले जाऊ शकते का? कोरोना काळात केली गेलेली ही व्यवस्था पुढेही चालू ठेवता येईल का?
मित्रांनो,
कोरोनाच्या या काळात, आपण सगळ्यांनीच अनुभव घेतला की व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून सुद्धा सगळी कामे, तितक्याच पारदर्शकतेने आणि प्रभावीपणे पूर्ण होऊ शकतात. आज जेव्हा देशभरातल्या शाखांमध्ये आपण आधुनिक सुविधा असलेले परिसर निर्माण करतो आहोत, त्यावेळी, या सुधारणा आपल्यासाठी कठीण नाहीत. यात करदात्यांचा वेळ, पैसा आणि उर्जा सगळ्यांचीच बचत होईल आणि खटल्यांचा निपटारा देखील लवकरात लवकर होऊ शकतो.
मित्रांनो,
विद्वानांनी सांगितले आहे—
– न्यायमूलं सुराज्यं स्यात्, संघमूलं महाबलम् ॥
न्याय हा सुराज्याचा पाया असतो आणि संघटन महाशक्तीचे मूळ असते. म्हणूनच न्याय आणि संघटनेच्या शक्तीला आत्मनिर्भर भारताची उर्जा बनवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. भारतात, एकापाठोपाठ होत असलेल्या सुधारणांच्या मालिकेमागेही हीच प्रेरणा आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की आपल्या सर्वांच्या संघटीत प्रयत्नांमुळे आपले सर्व प्रयत्न यशस्वी होतील.
आयटी अपिलीय न्यायाधिकरणाशी संबंधित सर्व सहकाऱ्यांना,ओदिशातील सर्व नागरिकांना या आधुनिक संकुल परिसरासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना दिवाळीसह येणाऱ्या सर्व सणवारांसाठी देखील मंगल शुभेच्छा. आणखी एक गोष्ट नक्की सांगेन. कोरोनाचा धोका अद्याप आहे. आपण त्याबाबतीत निश्चिंत होऊ नये. सावधगिरीच्या उपाययोजना, जसे की मास्क घालणे, अंतर राखणे, हात धुणे, याची काळजी नक्कीच घ्यायची आहे. ओडिशातील नागरिकांना माझा आणखी एक आग्रह आहे, ओदिशाची तपोभूमी कला आणि संस्कृतीची भूमी आहे, तपस्येची भूमी आहे. आज इथे मंत्र गुंजतो आहे – व्होकल फॉर लोकल!
भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक वस्तूंमध्ये देशबांधवांच्या श्रमाचा घाम मिसळला आहे. ज्या वस्तूंमध्ये भारतातील युवकांचे कौशल्य आहे, त्याच गोष्टी विकत घेण्याचा आग्रह धरा. स्थानिक वस्तू घेण्याचा आग्रह धरा. भारताच्या घामातून तयार झालेल्या वस्तू घेण्याचा आग्रह ठेवा. हे आज मी भगवान जगन्नाथ यांच्या या भूमीवरुन ओदिशातील जनतेला, संपूर्ण देशबांधवांना आवाहन करतो आहे, की त्यांनीही लक्षात ठेवावे – व्होकल फॉर लोकल ! स्थानिक उत्पादनांच्या खरेदीतूनच दिवाळी साजरी करा. खरेतर दिवाळीच नाही तर आपण 365 दिवस स्थानिक वस्तूंच्या खरेदीसाठी असाच उत्साह कायम कायम ठेवा. मग बघा, देशाची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढण्याला सुरुवात होईल. आमच्या श्रमिकांच्या घामात अशी शक्ती आहे, की ते देशाला नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतील. याच विश्वासासह, आजच्या या शुभप्रसंगी माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मंगल कामना!
खूप खूप धन्यवाद !