हर हर महादेव ! हर हर महादेव ! कार्यक्रमात माझ्याबरोबर उपस्थित उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल , ऊर्जावान आणि लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , भारतातील जपानचे राजदूत सुजुकी सातोशी , संसदेतील माझे सहकारी राधा मोहन सिंह , काशीचे सर्व प्रबुद्धजन, आणि सन्माननीय मित्रहो,
नुकतंच माझ्या याआधीच्या कार्यक्रमात मी काशीवासियांना म्हटले होते की यावेळी खूप दिवसांनंतर तुम्हाला भेटण्यासाठी इथे येण्याचे सौभाग्य लाभले. मात्र बनारसचा स्वभाव असा आहे की भले दीर्घ कालावधीनंतर असेल,मात्र जेव्हा हे शहर भेटते तेव्हा एकाचवेळी भरपूर काही देते. आता तुम्ही बघा , भले बरेच दिवस झाले असतील मात्र जेव्हा काशीने बोलावले, तेव्हा बनारसवासियांनी एकाचवेळी इतक्या विकास कामांची जंत्री लावली. एक प्रकारे आज महादेवाच्या आशिर्वादाने काशीवासियांनी विकासाची गंगा वाहू दिली आहे. आजच शेकडो कोटी रुपये खर्चाच्या अनेक योजनांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली आणि आता हे रुद्राक्ष संमेलन केंद्र. काशीचे प्राचीन वैभव आपले आधुनिक रूप म्हणजे एक प्रकारे आधुनिक स्वरूपात अस्तित्वात येत आहे. काशीबद्दल असे म्हणतात की , बाबांची ही नगरी कधी थांबत नाही, कधी थकत नाही. विकासाच्या या नव्या शिखराने काशीचा हा स्वभाव पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. कोरोना काळात जेव्हा संपूर्ण जग जणू थांबले होते तेव्हा काशीने संयम बाळगला, शिस्त पाळली मात्र सृजन आणि विकासाची धारा अविरत वाहत राहिली. काशीच्या विकासाचे हे आयाम, हे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संमेलन केंद्र - रुद्राक्ष’ आज याच रचनात्मकतेचा , याच गतिशीलतेचा परिणाम आहे. मी तुम्हा सर्वांचे , काशीच्या प्रत्येक नागरिकाचे या विकासाबद्दल हार्दिक अभिनंदन करतो. विशेषतः भारताचा परम मित्र जपानला, जपानच्या लोकांना, पंतप्रधान शुगा योशीहिदे यांना आणि राजदूत सुजुकी सातोशी यांना खूप-खूप धन्यवाद देतो. आणि आताच आपण पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश देखील पाहिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे काशीला ही भेट मिळाली आहे. पंतप्रधान शुगा योशीहिदे हे त्यावेळी मुख्य कॅबिनेट सचिव होते. तेव्हापासून आता पंतप्रधान म्हणून ते नियमितपणे या प्रकल्पात वैयक्तिकरित्या सहभागी होते. भारताप्रति त्यांच्या या आपुलकीबद्दल देशाचा प्रत्येक नागरिक त्यांचा आभारी आहे.
मित्रांनो ,
आजच्या या आयोजनात आणखी एक व्यक्ती आहे ज्यांचे नाव घ्यायला मी विसरणार नाही. जपानचेच माझे आणखी एक मित्र- शिंजो आबे . मला आठवतंय , शिंजों आबे जेव्हा पंतप्रधान म्हणून काशीमध्ये आले होते , तेव्हा रुद्राक्ष कल्पनेबाबत त्यांच्याशी माझी प्रदीर्घ चर्चा झाली होती. त्यांनी त्वरित आपल्या अधिकाऱ्यांना या कल्पनेवर काम करायला सांगितले. त्यानंतर जपानची जी संस्कृती आहे चिरपरिचित, त्यांचे वैशिष्ट्य आहे अचूक आणि नियोजन. यासह या कल्पनेवर काम सुरु झाले आणि आज ही भव्य इमारत काशीची शोभा वाढवत आहे. या इमारतीत आधुनिकतेची चमक देखील आहे, आणि सांस्कृतिक तेज देखील आहे. यात भारत जपान संबंधांची जोड देखील आहे आणि भविष्यासाठी अनेक संधींना वाव देखील आहे. माझ्या जपान दौऱ्यादरम्यान आम्ही दोन्ही देशांमधील संबंधांमधील , लोकांच्या संबंधांमधील याच आपुलकीच्या भावनेचा उल्लेख केला होता , आम्ही जपानबरोबर अशाच सांस्कृतिक संबंधांची रूपरेषा आखली होती. मला आनंद आहे की आज दोन्ही देशांच्या प्रयत्नांमुळे विकासाबरोबरच संबंधांमध्येही गोडव्याचा नवा अध्याय लिहिला जात आहे. काशीच्या रुद्राक्ष प्रमाणेच नुकतेच काही आठवड्यांपूर्वी गुजरात इथेही जपानी झेन गार्डेन आणि कायझेन अकादमीचे लोकार्पण झाले होते. जसे हे रुद्राक्ष जपानकडून भारताला दिलेल्या प्रेमाच्या माळेप्रमाणे आहे तसेच झेन गार्डन देखील दोन्ही देशांच्या परस्पर प्रेमाचा सुगंध पसरवत आहे. याचप्रमाणे मग ते सामरिक क्षेत्र असो किंवा आर्थिक क्षेत्र , जपान आज भारताच्या सर्वात विश्वासार्ह मित्रांपैकी एक आहे. आपल्या मैत्रीला या सम्पूर्ण प्रांतातील सर्वात नैसर्गिक भागीदारीपैकी एक मानले जाते. आधुनिक पायाभूत सुविधा आणि विकास संबंधी अनेक महत्वपूर्ण आणि सर्वात मोठ्या प्रकल्पांमध्ये जपान आपला भागीदार आहे. मुंबई - अहमदाबाद हाइस्पीड रेल्वे असेल, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर असेल किंवा समर्पित फ्रेट कॉरिडॉर असेल, जपानच्या सहकार्याने बनत असलेले हे प्रकल्प नवीन भारताची ताकद बनणार आहेत.मित्रहो,
आपला विकास आणि आनंद एकमेकांशी जोडलेले असले पाहिजे अशी भारत आणि जपान यांची विचारसरणी आहे विकास हा सर्वमुखी असला पाहिजे, सर्वांसाठी असला पाहिजे, आणि सर्वांना एकत्र आणणारा असला पाहिजे. आमच्या पुराणांमध्ये म्हटले गेले आहे की--
तत्र अश्रु बिन्दुतो जाता, महा रुद्राक्ष वृक्षाकाः। मम आज्ञया महासेन, सर्वेषाम् हित काम्यया॥
म्हणजेच, सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी भगवान शंकराच्या डोळ्यातून पडलेल्या अश्रूबिंदूतून रुद्राक्ष प्रगट झाले आहे. शिव सर्वांसाठी आहे. त्याचे अश्रूबिंदू मानवतेसाठी स्नेह, प्रेम यांचे प्रतीक आहेत. या प्रकारे हे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर ‘रुद्राक्ष’ संपूर्ण जगाला आपापसातील प्रेम, कला आणि संस्कृती यांच्याद्वारे एकत्र आणण्याचे एक माध्यम होईल. तशीही काशीची गोष्टच वेगळी आहे. काशी हे तसेही जगातले सर्वात प्राचीन, आज अस्तित्वात असलेले शहर आहे. शंकरापासून सारनाथ मधील भगवान बुद्धांपर्यंत काशीने अध्यात्मासह कला आणि संस्कृतीची जोपासना शतकानुशतके केली आहे. आजही तबल्यामध्ये बनारसबाज ही शैली, ठुमरी, दादरा, ख्याल, ध्रुपद, धमार, कजरी, चैती, होरी यासारख्या बनारसच्या चर्चेत असलेल्या आणि प्रसिद्ध गायन शैली असोत. सारंगी आणि पखवाज असोत किंवा सनई असो माझ्या बनारसच्या रंध्रारंध्रातून गीत, संगीत आणि कला वाहते आहे. इथे गंगेच्या घाटांवरच कितीतरी कला विकसित झाल्या, ज्ञानाने शिखर गाठले आणि मानवतेशी संबंधित भरपूर गंभीर चिंतन या मातीमध्ये घडून आले. म्हणून बनारस हे गीत-संगीत धर्म-अध्यात्म आणि ज्ञान-विज्ञान यांचे एक मोठे ग्लोबल सेंटर बनू शकते.
मित्रहो,
बौद्धिक चर्चा, मोठ-मोठे सेमिनार , कल्चरल इव्हेंट्स यांसाठी बनारस हे एक आयडियल लोकेशन आहे. देश-विदेशातून लोक येथे येऊ इच्छितात, थांबू इच्छितात. असे असताना जर याप्रकारे इव्हेंट्ससाठीची सोय असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर साहजिकच कला विश्वातील लोक मोठ्या संख्येने बनारसची प्रामुख्याने निवड करतील. येणाऱ्या दिवसात ‘रुद्राक्ष’ हीच शक्यता प्रत्यक्षात आणेल. देश-विदेशातील कल्चरल एक्सचेंजचे सेंटर होईल. उदाहरणार्थ बनारस मध्ये होणाऱ्या कवी संमेलनांचे फॅन्स संपूर्ण देशभर तसेच जगभर आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये ही कवी संमेलने जागतिक स्वरूपात या सेंटरमध्ये आयोजित करता येतील. येथे बाराशे लोकांच्या बैठकीची व्यवस्था आहेच, त्याशिवाय सभागृह आणि संमेलन केंद्र सुद्धा आहे पार्किंगची सुविधा सुद्धा आहे तसेच अपंगांसाठी विशेष सोय आहे या प्रकारे गेल्या सहा सात वर्षांमध्ये बनारसचे हँडीक्राफ्ट आणि शिल्प यांना प्रमोट करणे , त्यांना दृढरुप देणे या दिशेने बरेच काम झाले आहे. त्यामुळे बनारसी सिल्क आणि बनारसी शिल्प यांना पुन्हा नवीन ओळख मिळते आहे. येथे व्यापारी उपक्रमांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे या उपक्रमांच्या वाढीसाठीही ‘रुद्राक्ष’ची मोठी मदत होईल. व्यापारी उपक्रमांसाठी या इन्फ्रास्ट्रक्चरचा कितीतरी प्रकारे उपयोग करता येईल.
मित्रहो,
भगवान विश्वनाथ यांनी स्वतःच सांगितले आहे.
सर्व क्षेत्रेषु भूपृष्ठे काशी क्षेत्रम् च मे वपुः।
म्हणजे काशीचे संपूर्ण क्षेत्रच माझे स्वरूप आहे. काशी म्हणजेच साक्षात शिव आहे. आता गेल्या सात वर्षांमध्ये एवढ्या विकास योजनांनी काशी शृंगारली जात आहे तेव्हा हा शृंगार ‘रुद्राक्ष’शिवाय पूर्ण कसा होऊ शकला असता? आता काशीने रुद्राक्ष धारण केले आहे. तेव्हा काशीच्या विकासाला तेज चढेल आणि काशीची शोभा वाढेल.
ही आता सर्व काशीवासीयांचीही जबाबदारी आहे. म्हणून आपल्याला माझा खास आग्रह आहे की ‘रुद्राक्ष’च्या शक्तीचा संपूर्ण उपयोग आपल्याला करुन घ्यायचा आहे. काशीचे सांस्कृतिक सौंदर्य, काशीमधील प्रतिभा यांना या सेंटरशी जोडून घ्या. आपण या दिशेने काम कराल तर संपूर्ण देशाला आणि जगाला काशीसोबत जोडून घ्याल.
जसजसे सेंटर सक्रिय होईल तसे याच्या माध्यमातून भारत आणि जपान यांच्यामधील नात्याला विश्वात एक वेगळी ओळख मिळेल. मला संपूर्ण विश्वास आहे की महादेवाच्या आशीर्वादाने भविष्यात हे सेंटर म्हणजे काशीची नवीन ओळख बनेल. या शुभेच्छांसह मी माझे बोलणे संपवतो. मी पुन्हा एकवार जपान सरकारचे, जपान पंतप्रधानांचे विशोष आभार मानतो. आणि बाबाला हीच प्रार्थना करतो की त्याने आपणा सर्वांना निरोगी राखावे, आनंदी राखावे, सजग राखावे आणि कोरोनाचे प्रोटोकॉल पाळण्याची सवय लावावी. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. हर हर महादेव.