कार्यक्रमाला उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी हरदीप सिंग पुरीजी, राज्यमंत्री कौशल किशोरजी, मीनाक्षी लेखीजी, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेनाजी, दिल्लीचे इतर सर्व मान्यवर खासदार, इतर सर्व मान्यवर आणि उत्साहाने भारलेल्या लाभार्थी बंधू आणि भगिनींनो!
विज्ञान भवनात कार्यक्रम तर अनेक होतात. कोट, पँट, टाय वाले देखील अनेक लोक असतात. पण आज या ठिकाणी ज्या प्रकारची आपली कुटुंबे आणि त्यांचे सदस्य दिसत आहेत. त्यांच्या आशा-आकांक्षा आणि उत्साह दिसत आहेत, त्या खरोखरच विज्ञान भवनात फार कमी पाहायला मिळतात. आज दिल्लीतील शेकडो कुटुंबांसाठी, आपल्या हजारों गरीब बंधू-भगिनींसाठी हा खूप मोठा दिवस आहे. वर्षानुवर्षे जी कुटुंबे दिल्लीतल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत होती, आज त्यांच्या आयुष्यात एका प्रकारे नवी सुरुवात होत आहे. दिल्लीतील गरीब कुटुंबांना पक्की घरे देण्याची जी मोहीम सुरू झाली आहे, ती आज येथील हजारो गरीब कुंटुंबांची स्वप्ने साकार करत आहे. आज या ठिकाणी शेकडो लाभार्थ्यांना त्यांच्या घराची चावी मिळाली आहे आणि मला ज्या 4 - 5 कुटुंबांची भेट घेण्याची संधी मिळाली आहे, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, समाधानाची भावना आणि ज्या इतर भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या, त्यातून त्यांच्या मनातील आनंद प्रकट होत होता. एक समाधानाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती. एकट्या कालकाजी एक्सटेन्शनच्या पहिल्या टप्प्यातच 3 हजार पेक्षा जास्त घरे बांधून तयार झाली आहेत आणि लवकरच येथे राहणाऱ्या इतर कुटुंबांना देखील गृहप्रवेशाची संधी मिळणार आहे. आगामी काळात भारत सरकारकडून होणारे प्रयत्न दिल्ली शहराला एक आदर्श शहर बनवण्यात मोठी भूमिका बनवतील असा विश्वास मला वाटतो.
मित्रहो,
दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये जो विकास आपण पाहतो, मोठी स्वप्ने आणि यशाची शिखरे पाहतो त्यांचा पाया या गरीब बंधु-भगिनींनी केलेल्या कष्टांनी, त्यांनी गाळलेल्या घामाने, त्यांच्या परिश्रमाने घातला गेला आहे. दुर्दैवाने शहरांच्या विकासासाठी जे गरीब कठोर परिश्रम करतात त्याच गरिबांना या शहरात अतिशय बकाल परिस्थितीत जगावे लागते, हे देखील कटू सत्य आहे. निर्मितीचे कार्य करणाराच जर मागे पडत असेल तर निर्मिती देखील अपूर्ण राहते आणि म्हणूनच गेल्या सात दशकांमध्ये आपली शहरे समग्र विकासापासून, संतुलित विकासापासून वंचित राहिली आहेत. ज्या शहरात एकीकडे उंच-उंच भव्य इमारती आणि झगमगाट आहे, त्याच शहराच्या एका कोपऱ्यात झोपडपट्ट्या आणि बकालपणा पाहायला मिळतो. एकीकडे शहरातील काही भागांना प्रतिष्ठीत म्हटले जाते तर दुसरीकडे अनेक भागातील लोकांना जीवनातील मूलभूत गरजांसाठी तडफडत राहावे लागते. एकाच शहरात इतकी असमानता असेल, इतका भेदभाव असेल तर मग समग्र विकासाची कल्पना तरी कशी करता येऊ शकेल? स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपल्याला ही तफावत दूर करायची आहे आणि म्हणूनच आज देश ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ या मंत्रावर वाटचाल करून सर्वांच्या उत्थानासाठी प्रयत्न करत आहे.
मित्रहो,
अनेक दशके देशात जी व्यवस्था राहिली, त्यामध्ये गरिबी ही केवळ गरिबांची समस्या आहे अशी विचारसरणी निर्माण झाली. मात्र आज देशात जे सरकार आहे ते गरिबांचे सरकार आहे, म्हणूनच ते गरिबांना वाऱ्यावर सोडू शकत नाही आणि म्हणूनच आज देशाच्या धोरणांमध्ये गरीब केंद्रस्थानी आहेत, आज देशाच्या निर्णयांमध्ये गरीब केंद्रस्थानी आहेत. विशेषतः शहरात राहणाऱ्या गरीब बंधु-भगिनींवर देखील आमचे सरकार तितक्याच प्रमाणात लक्ष देत आहे.
मित्रहो,
दिल्लीमध्ये 50 लाखांपेक्षा जास्त लोक असे होते ज्यांच्याकडे बँकेचे खातेसुद्धा नव्हते, हे ऐकून एखाद्याला आश्चर्य वाटेल. हे लोक भारतातील बँकिंग व्यवस्थेशी संलग्न नव्हते, बँकेकडून मिळणाऱ्या प्रत्येक लाभापासून वंचित होते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती ही होती की त्यांना बँकेच्या दारापर्यंत जाण्याची देखील भीती वाटत होती. हे लोक दिल्लीत होते मात्र दिल्ली यांच्यासाठी दूर होती. ही परिस्थिती आमच्या सरकारने बदलली. एक मोहीम राबवून दिल्लीतील गरिबांची, देशातील गरिबांची बँक खाती उघडण्यात आली. याचे फायदे काय असू शकतात, याचा विचारही त्यावेळी कोणी केला नसेल. आज दिल्लीतील गरिबांना देखील सरकारच्या योजनांचे थेट लाभ मिळत आहेत. आज दिल्लीत हजारों बांधव रस्त्यांवर विक्रीची फिरती दुकाने थाटत आहेत. भाज्या आणि फळे विकत आहेत. अनेक बांधव ऑटो-रिक्षा चालवत आहेत. टॅक्सी चालवत आहेत. यापैकी एखादाच कोणी असेल ज्याच्याकडे आज भीम यूपीआय नसेल. पैसे थेट मोबाईलवर येतात आणि मोबाईलवर पैसे दिले सुद्धा जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक सुरक्षा देखील मिळाली आहे. बँकिंग प्रणालीशी जोडले जाण्याची हीच शक्ती पीएम स्वनिधी योजनेचा पाया बनली आहे. या योजनेंतर्गत शहरात राहणाऱ्या, रस्त्यावर फेरीवाल्यांचा व्यवसाय करणाऱ्या बंधु-भगिनींना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते आहे आणि दिल्लीमधील 50 हजारपेक्षा जास्त फेरीवाल्या बंधु-भगिनींनी स्वनिधी योजनेचा लाभ घेतला आहे. याशिवाय मुद्रा योजनेंतर्गत विनातारण देण्यात आलेल्या 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदतीमुळे दिल्लीतील लहान उद्योजकांना देखील खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मित्रहो,
रेशन कार्डशी संबंधित गैरसोयींमुळे देखील आपल्या गरीब बांधवांची मोठी अडचण होत असे. आम्ही ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ ची व्यवस्था करून दिल्लीच्या लाखो गरिबांचे जीवन सुकर केले आहे. दुसऱ्या राज्यातून येणारे स्थलांतरित कामगार काम करण्यासाठी येतात. पूर्वी त्यांचे रेशन कार्ड दुसऱ्या राज्यात निरुपयोगी म्हणजे निव्वळ एक कागदाचा तुकडा ठरत होते. त्यामुळे त्यांना रेशन मिळवण्यामध्ये खूप मोठी अडचण येत असे. ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ च्या माध्यमातून या अडचणीमधून सुटका झाली आहे. या योजनेचा लाभ जागतिक कोरोना साथरोगाच्या काळात दिल्लीतील गरिबांना देखील मिळाला आहे. या जागतिक संकटाच्या काळात दिल्लीतील लाखो गरिबांना केंद्र सरकार गेली दोन वर्षे मोफत रेशन देत आहे. यावर केवळ एकट्या दिल्लीमध्येच केंद्र सरकारने अडीच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. ही जी काही आकडेवारी मी सांगितली, यासाठी मला सांगा किती कोटी रुपयांची जाहीरात मी द्यायला हवी होती. वर्तमानपत्रांची कितीतरी पाने भरून गेली असती. वर्तमानपत्रात मोदींची छायाचित्रे झळकली असती आणि किती देता आली असती. ज्या कामांची मोजणी मी आता करून दाखवतो आहे, ती तर खूपच कमी आहेत कारण अशी मोजणी करण्यात खूप जास्त वेळ जाईल. कारण आम्ही तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी जगत आहोत.
मित्रहो,
दिल्लीत केंद्र सरकारने 40 लाखांपेक्षा जास्त गरीब लोकांना विमा संरक्षण प्रदान केले आहे. औषधांचा खर्च कमी करण्यासाठी जनऔषधी केंद्रांचीही सोय केली आहे. जीवनात अशाप्रकारे हमी मिळते, तेव्हा गरीब माणूस निश्चिंतपणे पूर्ण ताकदीने कष्ट करतो. तो गरिबीतून बाहेर पडण्यासाठी, गरिबीशी लढण्यासाठी, गरिबीला हरवण्यासाठी प्राणपणाने कठोर परिश्रम करतो. अशा प्रकारची हमी गरिबांच्या जीवनात किती महत्त्वाची आहे, याची सार्थ जाणीव त्या गरीब लोकांनाच असू शकते.
मित्रहो,
अनेक दशकांपूर्वी उभारण्यात आलेल्या अनधिकृत वसाहती, ही दिल्लीतील आणखी एक समस्या आहे. आपले लाखो बंधू-भगिनी या वसाहतींमध्ये राहतात. आपल्या घरांचे काय होणार ही विवंचना त्यांना आयुष्यभर राहिली. दिल्लीतील जनतेची ही विवंचना कमी करण्याचे कामही केंद्र सरकारने केले आहे. प्रधानमंत्री –उदय (PM-UDAY) योजनेच्या माध्यमातून दिल्लीतील अनधिकृत वसाहतींमध्ये बांधलेली घरे नियमित करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. दिल्लीतील मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही केंद्र सरकारने मोठी मदत केली आहे. दिल्लीतील निम्न आणि मध्यमवर्गीय लोकांना स्वत:चे घर बांधता यावे, यासाठी केंद्र सरकारने त्यांना व्याजात अनुदान दिले आहे. यासाठी केंद्र सरकारने 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे.
मित्रहो,
देशाची राजधानी म्हणून दिल्ली शोभून दिसेल, अशा पद्धतीनं दिल्लीला एक आलिशान आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण शहर बनवण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट आहे. दिल्लीचे लोक, दिल्लीतली गरीब जनता, दिल्लीमधील विशाल मध्यमवर्ग, हे सगळे दिल्लीच्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही केलेल्या कामाचे साक्षीदार आहेत आणि तशी साक्ष ते आपल्या बोलण्यातून वारंवार देत असतात. यावेळी लाल किल्ल्यावरून मी देशातल्या विशिष्ट ध्येयाची आस बाळगणाऱ्या समाजाबद्दल बोललो होतो. दिल्लीचा गरीब किंवा मध्यमवर्गीय माणूस महत्वाकांक्षी आहे आणि विलक्षण प्रतिभावान सुद्धा आहे. त्यांची सोय बघणे, त्यांच्या सर्व इच्छांची पूर्तता करणे, त्यांच्या प्रतिभेला न्याय देणे, या बाबी, सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांमध्ये समाविष्ट आहेत.
मित्रहो,
2014 साली आमचे सरकार आले तेव्हा दिल्ली - राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एन सी आर) 190 किलोमीटर एवढ्या अंतरापुरतीच मेट्रो रेल्वेचे जाळे मर्यादित होते. आज दिल्ली -एनसीआरमध्ये मेट्रोचा विस्तार जवळपास 400 किलोमीटरपर्यंत वाढला आहे. गेल्या 8 वर्षांत येथे 135 नवीन मेट्रो स्थानके झाली आहेत. दिल्लीतल्या महाविद्यालयांमध्ये जाणारे आपले अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी, मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग, आज मला पत्रे लिहून मेट्रो सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात मेट्रोचा विस्तार होत असल्यामुळे त्यांच्या पैशांचीही दररोज बचत होत असून वेळेचीही बचत होते आहे. वाहतूक कोंडीतून दिल्लीची सुटका करण्यासाठी भारत सरकारने 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, यातून रस्त्यांचे रुंदीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येते आहे. दिल्लीत एकीकडे पेरिफेरल एक्स्प्रेस वे (दिल्लीच्या परिघावरुन इतर राज्यांमधील शहरांना जोडणारा द्रुतगती महामार्ग) बनवला जात आहे, तर दुसरीकडे कर्तव्यपथासारख्या उपक्रमांची निर्मिती होत आहे. द्वारका द्रुतगती महामार्ग असो, अर्बन एक्स्टेंशन रोड असो, अक्षरधाम ते बागपत असा सहापदरी अॅक्सेस कंट्रोल महामार्ग असो किंवा गुरुग्राम-सोहना मार्गाच्या रूपात उन्नत मार्गाचा पट्टा (कॉरीडॉर) असो, देशाच्या राजधानीसाठी आवश्यक आधुनिक पायाभूत सुविधांचा विस्तार करणारी अशी कितीतरी विकासकामे, केंद्र सरकार दिल्लीमध्ये करत आहे.
मित्रहो,
दिल्ली एनसीआर मध्ये, रॅपिड अर्थात जलदगती रेल्वेसारख्या सेवाही येत्या काही काळात सुरू होणार आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या उभारणीच्या भव्य बांधकामांची छायाचित्रेही तुम्ही पाहिली असतील. द्वारकेतील 80 हेक्टर जमिनीवर सुरू असलेल्या भारत वंदना उद्यानाचे बांधकाम आता येत्या काही महिन्यांतच पूर्ण होईल, याचा मला आनंद वाटतो आहे. दिल्लीतील 700 पेक्षा जास्त मोठ्या उद्यानांची देखभाल, दिल्ली विकास प्राधिकरण – डीडीए करत असल्याचे मला समजले आहे. वजिराबाद बॅरेज ते ओखला बॅरेज या यमुना नदीवरील पुलांदरम्यानच्या 22 किलोमीटरच्या पट्ट्यातही डीडीए, विविध उद्याने विकसित करत आहे.
मित्रहो,
आज माझे अनेक गरीब बंधू-भगिनी त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात करणार आहेत, त्यामुळे मी त्यांच्याकडून काही अपेक्षाही नक्कीच ठेवतो. तुमच्याकडून माझ्या काही अपेक्षा असतील तर तुम्ही त्या पूर्ण करणार ना? तुम्हाला मी काही कामे सांगितली तर काही हरकत नाही ना? करणार ना, की विसरणार, विसरणार नाही ना? बरे, ठीक आहे! असे बघा, भारत सरकार गरिबांसाठी कोट्यवधी घरे बांधत आहे. घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा करत आहे. वीज जोडणी देत आहे. माता-भगिनींना धूरमुक्त स्वयंपाक करता यावा यासाठी उज्ज्वला योजनेद्वारे स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर पुरवत आहे. या सर्व सुविधा मिळत असतानाच आपापल्या घरांमध्ये वीजेचे एलईडी बल्ब बसवण्याचा निश्चयही आपल्याला करायचा आहे. कराल ना? दुसरे असे की आपण कोणत्याही परिस्थितीत आपापल्या वसाहतींमध्ये पाण्याची नासाडी करायची नाही, पाणी वाया जाऊ द्यायचे नाही. बरेचदा काही लोक काय करतात ते तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे! नळ उघडा करुन न्हाणीघरात नळाखाली बादली उलटी ठेवून देतात. का, तर सकाळी सहा वाजता उठायचे असते. मग, सकाळी सहा वाजता पाणी आले की उलट्या बादलीवर पाणी पडून जोरात आवाज होतो आणि जाग येते. थोडक्यात नळाच्या पाण्याचा वापर अलार्म म्हणून केला जातो. पण यामुळे पाण्याचा अपव्यय होतो त्याचे काय? हे बघा, पाणी वाचवणे अत्यंत गरजेचे आहे, विजेची बचत करणे खूप गरजेचे आहे आणि त्यापलीकडेही जाऊन आणखी एक गोष्ट म्हणजे इथे आपल्याला झोपडपट्टीतल्यासारखा सावळा गोंधळ निर्माण होऊ द्यायचा नाही. आपली वसाहत स्वच्छ, सुंदर असायला हवी, सगळीकडे टापटीप असावी आणि मी तर म्हणेन की तुम्ही आपल्या वसाहतींमध्येच स्पर्धा करायला हवी. दर महिन्याला, कोणती वसाहत सर्वात स्वच्छ आहे, याची स्पर्धा घ्यायला हवी. इतकी दशके झोपडपट्ट्यांबाबत जो समज निर्माण झाला आहे, झोपडपट्ट्या म्हणजे घाणीचे साम्राज्य असा संबंध जोडला जातो आहे, तो समज, तो संबंध आता संपुष्टात आणण्याची जबाबदारी आपली आहे. मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण दिल्ली आणि देशाच्या विकासात आपले कर्तव्य बजावत राहाल. दिल्लीतील प्रत्येक नागरिकाच्या योगदानामुळे, दिल्ली आणि देशाच्या विकासाचा हा प्रवास अविरत पुढे सुरू राहणार आहे. याच विश्वासासह, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भरपूर शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन ! खूप खूप धन्यवाद !