महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्य मंत्री अजित पवार, अशोक जी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, या ठिकाणी उपस्थित अन्य मान्यवर आणि स्त्री-पुरुष, आज वट पौर्णिमा ही आहे आणि संत कबीर यांची जयंती देखील आहे. सर्व देशवासियांना मी अनेक-अनेक शुभेच्छा देतो.
एका अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी, आपण आज सारे एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्य समरातील वीरांना समर्पित क्रांती गाथा, ही वास्तु समर्पित करताना मला अतिशय आनंद होत आहे.
मित्रांनो,
महाराष्ट्राचे हे राजभवन गेल्या दशकांमध्ये अनेक लोकशाही घटनांचे साक्षीदार राहिले आहे. हे त्या संकल्पांचे देखील साक्षीदार आहे जे संविधान आणि राष्ट्राच्या हितासाठी या ठिकाणी शपथेच्या स्वरुपात घेतले गेले. आता या ठिकाणी जल भूषण इमारतीचे आणि राजभवन येथे बनवलेल्या क्रांतिकारकांच्या गॅलरीचे उद्घाटन झाले आहे. मला राज्यपाल महोदयांचे निवास स्थान आणि कार्यालयाच्या द्वार पूजनामध्ये देखील सहभागी होण्याची संधी मिळाली.
ही नवी इमारत महाराष्ट्राच्या सर्व जनतेसाठी, महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी नवी ऊर्जा देणारी ठरो, तसेच राज्यपाल साहेब म्हणाले की हे राजभवन नसून लोक भवन आहे, ते खर्या अर्थाने जनता-जनार्दनासाठी एक आशेचे किरण म्हणून उदयाला येईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि या महत्त्वाच्या प्रसंगासाठी इथले सर्व बांधव अभिनंदनास पात्र आहेत. क्रांती गाथेच्या निर्मितीशी जोडलेले इतिहास कार विक्रम संपत आणि अन्य सर्व सहकाऱ्यांचे देखील मी अभिनंदन करतो.
मित्रांनो,
मी राजभवनात यापूर्वीही अनेकदा आलो आहे. या ठिकाणी अनेकदा मुक्कामही केला आहे. मला आनंद आहे की आपण या इमारतीच्या एवढ्या जुन्या इतिहासाला, त्याचे शिल्प जोपासत , आधुनिकतेचे एक रूप म्हणून स्वीकारले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या महान परंपरेला साजेसे शौर्य, भक्ती , अध्यात्म आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनामधील या स्थानाच्या भूमिकेचे देखील दर्शन होते. इथून ती जागा दूर नाही, ज्या ठिकाणाहून पूज्य बापूंनी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली होती. या इमारतीने स्वातंत्र्याच्या वेळी गुलामीचे प्रतीक खाली उतरताना आणि तिरंगा डौलाने फडकावला जात असताना पहिला आहे. आता ही जी नवी निर्मिती झाली आहे, स्वातंत्र्याच्या आपल्या क्रांती वीरांना इथे जे स्थान मिळाले आहे, त्यामुळे राष्ट्र भक्तीची मूल्ये आणखी दृढ होतील.
मित्रांनो,
आजचा हा कार्यक्रम यासाठी देखील महत्त्वाचा आहे, कारण देश स्वातंत्र्याची 75 वर्ष, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाचे स्वातंत्र्य, देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देणारा प्रत्येक वीर-वीरांगना, प्रत्येक सेनानी, प्रत्येक महान व्यक्तिमत्व, त्यांना स्मरण्याची ही वेळ आहे. महाराष्ट्राने तर अनेक क्षेत्रांमध्ये देशाला प्रेरणा दिली आहे. सामाजिक क्रांतीबद्दल बोलायचे झाले तर जगतगुरू संत तुकाराम महाराजांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत समाज सुधारकांचा एक अतिशय समृद्ध वारसा आहे.
इथे येण्यापूर्वी मी देहू मध्ये होतो, जिथे संत तुकाराम शिळा मंदिराच्या लोकार्पणाचे भाग्य मला लाभले. महाराष्ट्रामधील संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, समर्थ रामदास, संत चोख मेळा यांच्यासारख्या संतांनी देशाला ऊर्जा दिली आहे. स्वराज्याबद्दल बोलायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आजही प्रत्येक भारतीयामधील राष्ट्रभक्तीची भावना आणखी प्रबळ करते. स्वातंत्र्याबद्दल जेव्हा बोलले जाते, तेव्हा महाराष्ट्राने तर असे अगणित वीर सेनानी दिले आहेत, ज्यांनी स्वातंत्र्याच्या यज्ञात आपल्या सर्वस्वाची आहुती दिली. आज दरबार हॉल मधून मला अथांग सागर दिसत आहे, अशा वेळी आपल्याला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या शौर्याचे स्मरण होते. त्यांनी प्रत्येक यातनेला स्वातंत्र्याच्या चेतनेमध्ये कसे परिवर्तित केले, हे प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारे आहे.
मित्रांनो,
जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्याबद्दल बोलतो, तेव्हा कळत-नकळत त्याला काही घटनांपर्यंतच सीमित ठेवतो. पण भारताच्या स्वातंत्र्यामध्ये तर अगणित लोकांचे तप आणि त्यांच्या तपस्येचा समावेश आहे. स्थानिक पातळीवरच्या अनेक घटनांचा एकत्रित प्रभाव राष्ट्रीय होता. साधने वेगवेगळी होती, पण संकल्प एकच होता. लोकमान्य टिळकांनी स्वतःच्या साधनांनी, तर त्यांच्याकडून ज्यांना प्रेरणा मिळाली, त्या चापेकर बंधूनी आपल्या पद्धतीने स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त केला.
वासुदेव बळवंत फडके यांनी आपली नोकरी सोडून सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला, तर तिथे मॅडम भिखाजी कामा यांनी आपल्या संपन्न जीवनाचा त्याग करून स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. आपल्या आजच्या तिरंग्याच्या प्रेरणेचा जो स्रोत आहे, त्या झेंड्याची प्रेरणा मॅडम कामा आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या सारखे सेनानीच होते. सामाजिक, कौटुंबिक, वैचारिक भूमिका कुठल्याही असोत, आंदोलनाचे ठिकाण देश-विदेशात कुठेही असो, लक्ष्य एकच होते- भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य.
मित्रांनो,
स्वातंत्र्याचे जे आपले आंदोलन होते, त्याचे स्वरूप लोकलही (स्थानिक) होते आणि ग्लोबलही (जागतिक) होते. जशी गदर पार्टी हृदयाने राष्ट्रीय देखील होती, पण प्रमाण लक्षात घेतल्यास जागतिकही होती. श्यामजी कृष्ण वर्मा यांचे इंडिया हाउस, लंडनमधील भारतीयांचा मेळावा होता, मात्र त्याचे उद्दिष्ट भारताचे स्वातंत्र्य हेच होते. नेताजींच्या नेतृत्वाखालचे आझाद हिंद सरकार भारतीयांच्या हितासाठी समर्पित होते, पण त्याची व्याप्ती जागतिक होती. याच कारणामुळे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाने जगातील अनेक देशांच्या स्वातंत्र्य आंदोलनांना प्रेरित केले.
लोकल ते ग्लोबल ही भावना आपल्या आत्मनिर्भर भारत अभियानाची ताकद आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाद्वारे भारतातील स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली जात आहे. मला विश्वास आहे की, येथे येणाऱ्यांना क्रांतिकारकांच्या गॅलरीच्या माध्यमातून,राष्ट्रीय संकल्प पूर्ण करण्याची नवी प्रेरणा मिळेल, देशासाठी कार्य करण्याची भावना वाढीस लागेल.
मित्रांनो,
गेल्या 7 दशकांमध्ये देशाच्या विकासात महाराष्ट्राने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबई हे तर स्वप्नांचे शहर आहेच मात्र महाराष्ट्रात अशी अनेक शहरे आहेत, जी 21व्या शतकात देशाच्या विकासाची केंद्रे बनणार आहेत. याच विचाराने एकीकडे मुंबईतील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण होत आहे आणि त्याचवेळी इतर शहरांमध्येही आधुनिक सुविधा वाढवल्या जात आहेत.
आज जेव्हा आपण मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये होत असलेल्या अभूतपूर्व सुधारणा पाहतो, अनेक शहरांमधील मेट्रो नेटवर्कचा विस्तार पाहतो, महाराष्ट्राचा प्रत्येक कानाकोपरा आधुनिक राष्ट्रीय महामार्गाने जोडला जात असलेला पाहतो तेव्हा विकासाची सकारात्मकता जाणवते. विकासाच्या प्रवासात मागे राहिलेल्या आदिवासी जिल्ह्यांमध्येही आज विकासाची नवी आकांक्षा जागृत झाल्याचेही आपण सर्वजण पाहतो आहोत.
मित्रांनो,
आपण जे काही कार्य करत आहोत, आपली भूमिका कोणतीही असो, त्यातून आपला राष्ट्रीय संकल्प अधिक दृढ होईल हे आपल्याला स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात सुनिश्चित केले पाहिजे. हा भारताच्या गतिमान विकासाचा मार्ग आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी ‘सबका प्रयास’ या आवाहनाचा मला पुनरुच्चार करायचा आहे. एक देश म्हणून आपल्याला परस्पर सहकार्य आणि सहकाराच्या भावनेने पुढे जायचे आहे, एकमेकांना बळ द्यायचे आहे. त्याच भावनेने मी पुन्हा एकदा जलभूषण भवन आणि क्रांतिकारकांच्या गॅलरीसाठी सर्वांचे अभिनंदन करतो.
आणि आता बघा, कदाचित जगभरातील लोक आपली चेष्टा करतील की राजभवन, इथे 75 वर्षांपासून वावर आहे, पण खाली एक बंकर आहे याची माहिती सात दशकांपर्यंत कोणालाच नव्हती. म्हणजे आपण किती उदासीन आहोत, आपल्या स्वतःच्या वारशाबद्दल किती उदासीन आहोत. आपल्या इतिहासाची पाने शोधून समजून घेताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशासाठी या दिशेने एक कारण ठरावा.
मला आठवते की आता आपण शामजी कृष्ण वर्मा यांच्या चित्रातही पाहिले आहे, देशात आम्ही कशा प्रकारे निर्णय घेतले याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल.लोकमान्य टिळकांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांना पत्र लिहिले. आणि त्यांना सांगितले की, मी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या होतकरू तरुणाला पाठवत आहे. कृपया त्याच्या निवासाची - अभ्यासाची व्यवस्था करण्यात थोडी मदत करा. श्यामजी कृष्ण वर्मा हे असे व्यक्तिमत्व होते.
स्वामी विवेकानंद त्यांच्यासोबत सत्संगाला जात असत. त्यांनी लंडनमधील इंडिया हाऊस , जे क्रांतिकारकांसाठी एक प्रकारचे तीर्थक्षेत्र बनले होते आणि इंडिया हाऊसमध्ये इंग्रजांच्या नाकावर टिचून क्रांतिकारकांच्या हालचाली चालत असत.1930 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांचे निधन झाले. 1930 मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की,माझा अस्थिकलश जपून ठेवावा आणि भारत स्वतंत्र झाल्यावर माझा अस्थिकलश त्या स्वतंत्र भारताच्या भूमीत घेऊन जावा.
1930 ची घटना, 100 वर्षे होत आली आहेत. पण माझ्या देशाचे दुर्दैव बघा, 1930 साली देशासाठी हुतात्मा झालेली व्यक्ती, ज्याची एकच इच्छा होती की माझा अस्थीकलश स्वतंत्र भारताच्या भूमीत घेऊन जावा, जेणेकरून माझे स्वातंत्र्याचे जे स्वप्न आहे ते मी नाही , तर माझ्या अस्थी त्याची अनुभूती घेऊ शकतील आणि इतर कोणतीही अपेक्षा नव्हती. हे काम 15 ऑगस्ट 1947 च्या दुसऱ्या दिवशी व्हायला हवे होते की नाही? झाले नाही. कदाचित ईश्वराचाच हा संकेत असावा.
2003 मध्ये, 73 वर्षांनंतर, तो अस्थिकलश भारतात आणण्याचे भाग्य मला लाभले. भारतमातेच्या एका सुपुत्राचा अस्थीकलश वाट पाहत राहिला मित्रांनो.जो खांद्यावर घेऊन येण्याचे भाग्य मला लाभले आणि इथेच मुंबई विमानतळावर उतरलो होतो आणि इथून वीरांजली यात्रा काढून गुजरातला गेलो आणि त्यांचे जन्मस्थान कच्छ, मांडवी येथे आज लंडनमध्ये होते तसे इंडिया हाऊस बांधले आहे. हजारो विद्यार्थी तिथे जातात, क्रांतिकारकांची ही गाथा अनुभवतात.
मला विश्वास आहे,आज ज्या बंकरबद्दल कुणालाही माहिती नव्हती, एकेकाळी भारतातील क्रांतिकारकांच्या जीवावर बेतणारे सामान ठेवण्यात आले होते,याच बंकरमध्ये आज माझ्या क्रांतिकारकांचे नाव आहे, ही भावना देशवासियांमध्ये असायला हवी. तरच देशातील तरुण पिढीला प्रेरणा मिळते. म्हणूनच राजभवनाचा हा प्रयत्न खूप कौतुकास्पद आहे.
मी विशेषत: शिक्षण विभागातील लोकांना आवाहन करेन की, आपण आपल्या विद्यार्थ्यांना तिथे घेऊन गेलात, वर्षातून एकदा दोनदा , काही जण त्यांना मोठ्या सहलीला घेऊन जातात. अंदमान निकोबारमध्ये वीर सावरकरांनी ज्या तुरुंगात आपली उमेदीची वर्षे कंठली ते पहा. या बंकरमध्ये कधीतरी या आणि बघा किती किती शूरवीरांनी देशासाठी आयुष्य वेचले होते, या गोष्टी जाणून घेण्याची आणि पाहण्याची सवय लावा, स्वातंत्र्यासाठी असंख्य लोक लढले आहेत आणि हा देश असा आहे की हजार-बाराशे वर्षांच्या गुलामगिरीत असा एकही दिवस नसेल की, भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याची चेतना जागृत झाली नसेल.1200 वर्षांपासून हा एक विचार, ही मनःस्थिती या देशातील जनतेची आहे. आपण ते जाणून घेतले पाहिजे, ते ओळखले पाहिजे आणि ते मनाने अनुभवण्याचा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण ते करू शकतो.
मित्रांनो,
म्हणूनच आजचा हा प्रसंग मी अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानतो. देशाच्या तरुण पिढीसाठी हे ठिकाण खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान व्हावे असे मला वाटते. या प्रयत्नाबद्दल सर्वांचे अभिनंदन करून, सर्वांचे आभार मानून मी माझ्या भाषणाचा समारोप करतो.