आजच्या या परिषदेत उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र तोमरजी, मनसुख मांडवीयाजी, पियुष गोयलजी, कैलास चौधरीजी! विदेशातून आलेले काही मंत्रीगण, गयाना, मालदीव, मॉरिशस श्रीलंका, सुदान, सूरिनाम आणि गाम्बियाचे सर्व माननीय मंत्रीगण, जगातील वेगवेगळ्या भागातून शेती पोषण आणि आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक आणि तज्ञ, वेगवेगळे आणि FPO’s आणि Starts-Ups मधील युवा मित्र देशातील कानाकोपऱ्यातून इथे जोडले गेलेले लाखो शेतकरी, इतर मान्यवर आणि आपणं सर्वजण.
आपणा सर्वांना जागतिक भरडधान्य परिषदेच्या आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा. या प्रकारचे आयोजन केवळ विश्वाच्या भल्यासाठीच नाही तर तसे भले होताना भारताच्या वाढत्या जबाबदारीचे प्रतीक आहे.
मित्रहो,
आपणही जाणता की भारताचा प्रस्ताव आणि प्रयत्नानंतरच संयुक्त राष्ट्रांनी 2023 ला आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले. जेव्हा आपण कोणताही संकल्प पुढे नेतो तेव्हा तो पूर्णत्वाला पोहोचवण्याची जबाबदारीही तेवढीच महत्त्वाची असते. आज जग आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करत असताना भारत या मोहिमेचे नेतृत्व करत आहे याचा मला आनंद आहे. जागतिक भरड धान्य परिषद या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामधे भरड धान्याची शेती, त्याच्याशी संलग्न अर्थव्यवस्था, त्यांचा आरोग्यावर प्रभाव, शेतकऱ्यांचे उत्पन्न अशा अनेक विषयांवर सर्व विद्वान आणि अनुभवी लोक विचार विनिमय करणार आहेत. ग्रामपंचायती, कृषी केंद्रे, शाळा महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठे आमच्या बरोबर या परिषदेत सहभागी होत आहेत. भारतीय दूतावासातून आज अनेक देश सुद्धा आपल्याबरोबर आहेत. भारताचे 75 लाख जास्त शेतकरी आज वर्चुअली आपल्याबरोबर या सोहळ्यात उपस्थित आहेत. यावरुन या सगळ्याचे महत्व दिसून येते. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो. आत्ताच इथे भरड धान्यावर स्मारक टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण केले गेले. इथे बुक ऑफ मिलेट स्टॅंडर्ड याचेही प्रकाशन झाले. याच बरोबर ICAR च्या भारतीय भरडधान्य संशोधन संस्थेला जागतिक उत्कृष्टता केंद्र म्हणून घोषित केले गेले. इथे व्यासपीठावर येण्यापूर्वी मी प्रदर्शन बघायला गेलो होतो आपल्या सर्वांना आणि जे लोक या दिवसात दिल्लीमध्ये आहेत किंवा दिल्लीला येणार आहेत त्या सर्वांना आग्रह करतो की एकाच ठिकाणी भरड धान्याची संपूर्ण दुनिया समजून घेण्यासाठी, पर्यावरणासाठी, निसर्गासाठी, आरोग्यासाठी, शेतकऱ्यांच्या उपन्नासाठी, अशा सर्व बाजूंनी भरड धान्यांचे सर्व पैलू समजून घेण्यासाठी हे प्रदर्शन बघावे. माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की हे प्रदर्शन जरूर बघा.
आपले तरुण मित्र कशाप्रकारे नवीन नवीन स्टार्टअप्स घेऊन या क्षेत्रात आले आहेत हे सुद्धा प्रभावित करणारे आहे हे सर्व भारताची कटीबद्धता दाखवून देत आहेत.
मित्रहो,
जागतिक भरडधान्य परिषदेशी संलग्न परदेशी पाहुण्यांना लाखो शेतकऱ्यांच्या समोर एक माहिती पुन्हा देऊ इच्छितो भरड धान्यांचे जगातील ब्रॅण्डिंग, सर्वसाधारण ब्रॅण्डिंग बघून भारतात मिलेट्स म्हणजेच भरड धान्यांना आता श्रीअन्न अशी नवी ओळख मिळाली आहे. श्रीअन्न हे केवळ शेती किंवा अन्न म्हणूनच मर्यादित नाही. जे लोक भारताच्या परंपरांशी परिचित आहेत ते हे सुद्धा ओळखतात की आमच्या इथे कशाचाही पूर्वी श्री असेच जोडले जात नाही जिथे श्री असते तिथे समृद्धीसुद्धा असते आणि समग्रता सुद्धा श्रीअन्न सुद्धा भारतात समग्र विकासाचे एक माध्यम बनले आहे. याच्याशी गाव जोडले गेले आहे आणि गरीबही जोडला गेला आहे. श्रीअन्न म्हणजे देशातील छोट्या शेतकऱ्यांच्या समृद्धीचे दार, श्रीअन्न म्हणजे देशातील करोडो लोकांच्या पोषणाचे कर्णधार, श्रीअन्न म्हणजे देशाच्या आदिवासी समाजाचा सत्कार, श्रीअन्न म्हणजे कमी पाण्यात शेतीची पैदास, श्रीअन्न म्हणजे रसायनमुक्त शेतीचा आधार, श्री अन्न म्हणजे हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठीचा मदतीचा हात.
मित्रहो,
आम्ही श्रीअन्न ही जागतिक चळवळ बनवण्यासाठी सातत्याने काम केले आहे. 2018 मध्ये आम्ही भरड धान्यांना पोषण अन्न म्हणून घोषित केले होते. या बाबतीत शेतकऱ्यांना जागृत करण्यापासून बाजारपेठेत त्याबद्दल रस निर्माण करण्यापर्यंत प्रत्येक पातळीवर काम करण्यात आले. आमच्या इथे बारा तेरा राज्यांमध्ये प्रामुख्याने भरड धान्यांची शेती होते परंतु त्यामध्ये घरगुती खप प्रतिव्यक्ती प्रतिमहिना दोन तीन किलोहून जास्त नाही. हाच खप आज वाढून दर महिना 14 किलोवर गेला आहे. भरड धान्यांच्या उत्पादनांची विक्रीही जवळपास 30 टक्केनी वाढली आहे. आता जागोजागी मिलेट कॅफे दिसतात. समाज माध्यमांच्या चॅनेल्सवर भरड धान्यांच्या रेसिपी होत आहेत. देशातील 19 जिल्ह्यांमध्ये एक जिल्हा एक उत्पादन या योजनेच्या अंतर्गत भरड धान्ये निवडली गेली आहेत.
मित्रहो,
मला हे माहीत आहे, की श्री अन्नाची पैदास करणारे बहुतेक सर्व शेतकरी, हे छोटे आणि गरीब शेतकरी आहेत. आणि भारतात जवळजवळ अडीच कोटी छोटे शेतकरी, भरड धान्याच्या उत्पादनाशी जोडले गेले आहेत, हे समजल्यावर काही जणांना आश्चर्य वाटेल. यापैकी अनेक शेतकऱ्यांकडे अतिशय कमी जमीन आहे, आणि त्यांना हवामान बदलामुळे निर्माण होणार्या आव्हानांचा सामनाही सर्वात जास्त करावा लागतो. भारताचं भरड धान्य मिशन श्री अन्नासाठी सुरु झालेलं हे अभियान, देशाच्या अडीच कोटी शेतकऱ्यांसाठी मोठं वरदान ठरणार आहे. स्वातंत्र्या नंतर पहिल्यांदाच भरड धान्याची पैदास करणाऱ्या अडीच कोटी छोट्या शेतकऱ्यांची एखाद्या सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात दखल घेतली आहे. जेव्हा भरड धान्याची-श्री अन्नाची बाजारपेठ वाढेल, तेव्हा या अडीच कोटी छोट्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही याचा खूप मोठा फायदा होईल. प्रक्रियाकृत आणि वेष्टनामधल्या अन्न पदार्थांच्या माध्यमातून, भरड धान्य आता मोठी दुकानं आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचत आहेत. गेल्या काही वर्षांतच देशात श्री अन्ना च्या क्षेत्रात काम करणारी पाचशे पेक्षा जास्त स्टार्टअप्सही सुरु झाली आहेत. एफपीओ देखील मोठ्या प्रमाणात या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलाही भरड धान्यांची उत्पादनं बनवत आहेत. ही उत्पादनं गावांमधून मॉल आणि सुपर मार्केट्स पर्यंत पोहोचत आहेत. म्हणजेच, देशात एक संपूर्ण पुरवठा साखळी विकसित होत आहेत. यामुळे युवा वर्गाला रोजगारही मिळत आहे, आणि छोट्या शेतकऱ्यांनाही मोठं सहाय्य मिळत आहे.
मित्रांनो,
भारत सध्या जी-20 चं अध्यक्षपदही भूषवत आहे. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य, हे भारताचं ब्रीदवाक्य आहे. संपूर्ण जगाला एक कुटुंब समजण्याच्या या भावनेची झलक, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षामधूनही उमटत आहे. जगा प्रति कर्तव्य भावना आणि मानवतेच्या सेवेचा संकल्प, भारताच्या मनात सदैव राहिला आहे. तुम्हीच पहा ना, योग हा विषय आम्ही जेव्हा जगा पुढे मांडला, तेव्हा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला त्याचा लाभ मिळेल, हे आम्ही सुनिश्चित केलं. आज जगातल्या शंभर पेक्षा जास्त देशांमध्ये योगाभ्यासाला अधिकृत स्वरुपात प्रोत्साहन मिळत आहे. आज जगातल्या तीस पेक्षा जास्त देशांनी आयुर्वेदालाही मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा संघटनेच्या रुपात आज भारताचा हा प्रयत्न, शाश्वत पृथ्वी ग्रहासाठी एक प्रभावी मंच म्हणून काम करत आहे. आणि भारतासाठी ही गोष्टही आनंदाची आहे, की आयएसए बरोबर शंभर पेक्षा जास्त देश जोडले गेले आहेत. आज, LiFE मिशनचं नेतृत्व असो, की हवामान बदलाशी संबंधित उद्दिष्ट निर्धारित वेळेपूर्वी गाठणं असो, आम्ही आमच्या वारशापासून प्रेरणा घेत, समाजात परिवर्तन घडवण्याचं काम सुरु करतो, आणि त्याला जागतिक कल्याणापर्यंत नेऊन पोहोचवतो. आणि आज भारताच्या ‘मिलेट मुव्हमेंट’ (भरड धान्य अभियान) मधूनही हीच गोष्ट दिसत आहे. श्री अन्न हे शतकांपासून भारताच्या जीवनशैलीचा एक भाग राहिला आहे. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, साम, कांगणी, चेना, कोडोन, कुटकी, कुट्टू यासारखं किती तरी श्री अन्न भारतात प्रचलित आहे. श्री अन्नाशी निगडीत आपल्या शेतीच्या पद्धती, आपले अनुभव आम्हाला जगा बरोबर वाटून घ्यायचे आहेत. जगाकडे असलेल्या नव्या गोष्टी, अन्य देशांकडे असलेली वैशिष्ट्य देखील आम्हाला शिकायची आहेत. आमचं शिकण्याचं उद्दिष्टही आहे. म्हणूनच, ज्या मित्र देशांचे कृषी मंत्री इथे उपस्थित आहेत, त्यांना माझं हे विशेष आवाहन आहे, की आपण या दिशेने एक स्थिर यंत्रणा विकसित करू. या यंत्रणेच्या मदतीने, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रापासून बाजारपेठेपर्यंत, एका देशापासून दुसऱ्या देशापर्यंत नवीन पुरवठा साखळी विकसित व्हावी, ही आपल्या सर्वांची सामायिक जबाबदारी आहे.
मित्रहो,
आज या व्यासपीठावर भरड धान्यांच्या आणखी एका सामर्थ्यावर मला भर द्यायचा आहे. हवामानाशी जुळवून घेणं, ही भरड धान्यांची ताकद आहे. अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही भरड धान्यांची सहज पैदास होऊ शकते. याच्या लागवडीसाठी अपेक्षेपेक्षा कमी पाणीही लागतं, त्यामुळे पाण्याचा तुटवडा असलेल्या प्रदेशांसाठी हे एक आवडीचं पीक ठरतं. आपणा सर्व जाणकार लोकांना हे माहीत आहे की भरड धान्यांची लागवड रसायनांच्या वापरा शिवाय नैसर्गिक पद्धतीनेही होऊ शकतं, हे याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच, भरड धान्य मानव आणि माती दोघांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्याची हमी देतं.
मित्रहो,
आपण जेव्हा अन्न सुरक्षेबाबत बोलतो, तेव्हा आपल्याला हे माहीत असतं की आज जग दोन प्रकारच्या आव्हानांचा सामना करत आहे. एकीकडे ग्लोबल साउथ (विकसनशील देश) आहे, ज्यांना आपल्या गरीब जनतेच्या अन्न सुरक्षेची काळजी आहे. दुसरीकडे ग्लोबल नॉर्थ (विकसित देश) आहे, जिथे आहाराच्या सवयींशी संबंधित आजार ही एक मोठी समस्या बनत आहे. या ठिकाणी चुकीचं पोषण हे एक खूप मोठं आव्हान आहे. म्हणजेच, एकीकडे अन्न सुरक्षेची समस्या, तर दुसरीकडे आहाराच्या सवयींचा प्रश्न! पिकांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर होत आहे, या गोष्टीची चिंता दोन्ही ठिकाणी व्यक्त होत आहे. मात्र, श्री अन्न अशा प्रत्येक समस्येवरही उपाय देतं. बहुतेक सर्व भरड धान्यांची लागवड सोपी असते. यासाठी खर्चही कमी येतो, आणि इतर पिकांच्या तुलनेत ते लवकर तयारही होतं. यामध्ये पोषण मूल्य तर जास्त असतातच, त्याबरोबरच त्याची चवही वैशिष्ट्यपूर्ण असते.
जागतिक अन्नसुरक्षेसाठी संघर्ष करत असलेल्या जगासाठी श्री अन्न, ही एक उत्तम भेट आहे. त्याचप्रमाणे आहाराच्या सवयींच्या समस्येवरही श्री अन्न उपाय ठरू शकतो. मोठ्या प्रमाणात तंतुमय असलेल्या या अन्नाला शरीर आणि आरोग्यासाठी उपयुक्त समजलं जात आहे. जीवन पद्धतींशी निगडीत आजार रोखण्यासाठीही याचा मोठा उपयोग होतो. म्हणजेच, वैयक्तिक आरोग्यापासून जागतिक आरोग्यापर्यंतच्या, आपल्या अनेक समस्यांवरचा उपाय श्री अन्नाच्या माध्यमातून मिळू शकतो.
मित्रहो,
भरड धान्यांच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आपल्या समोर असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. आज भारताच्या राष्ट्रीय फूड बास्केटमधलं श्री अन्नाचं योगदान केवळ 5-6 टक्के आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी भारतातले वैज्ञानिक आणि कृषी क्षेत्रातल्या जाणकारांनी पुढे येऊन वेगाने काम करावं, असं माझं आवाहन आहे. प्रत्येक वर्षासाठी आपल्याला साध्य करता येण्या जोगी उद्दिष्ट ठरवावी लागतील. अन्न प्रक्रिया क्षेत्राला चालना देण्यासाठी देशात पीएलआय योजनाही सुरु करण्यात आली आहे. भरड धान्य क्षेत्राला याचा जास्तीत जास्त लाभ मिळेल, भरड धान्यांची उत्पादनं बनवण्यासाठी जास्तीत जास्त कंपन्या पुढे येतील, हे स्वप्न साकारणं ही आपली जबाबदारी आहे. अनेक राज्यांनी आपल्या पीडीएस प्रणालीमध्ये भरड धान्यांचा समावेश केला आहे. अन्य राज्यांमध्येही या दिशेने प्रयत्न करता येईल. मध्यान्ह भोजनामधेही श्री अन्नाचा समावेश करून आपण लहान मुलांना उत्तम पोषण देऊ शकतो, त्यांच्या आहाराला नवीन चव आणि विविधतेची जोड देऊ शकतो. या सर्व मुद्द्यांवर या परिषदेत विस्तृत चर्चा होईल आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा पथदर्शक आराखडाही तयार केला जाईल, असा मला विश्वास आहे. आपले अन्नदाता आणि आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी श्री अन्न भारताच्या आणि जगाच्या समृद्धीला नवीन झळाळी देईल, हीच आशा व्यक्त करून मी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो, आणि आपल्या दोन्ही देशांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी वेळात वेळ काढून आपल्याला जो संदेश पाठवला, त्याबद्दल त्या दोघांचेही मी मनापासून आभार मानतो, खूप खूप धन्यवाद