केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान जी , मुख्यमंत्री पिनाराई विजयन जी , केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी , इतर मान्यवर , भगिनी आणि सज्जनहो !
मी श्री सर्बानंद सोनोवाल जी , श्री श्रीपाद येसो नाईक जी आणि आमचे सहकारी श्री व्ही . मुरलीधरन जी , श्रीमान शांतनु ठाकूर जी यांच्या चमूचे आभार मानतो !
एल्ला केरालीयरकुम एन्डे नल्ला नमस्कारंl
आजचा दिवस माझ्यासाठी खूप भाग्याचा आहे. सकाळी मला गुरुवायूर मंदिरात भगवान गुरुवायुरप्पन यांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले आणि आता मी केरळच्या ईश्वररूपी जनता-जनार्दनाचे दर्शन घेत आहे. मला येथे केरळच्या विकासाच्या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे .
मित्रांनो,
काही दिवसांपूर्वी, अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करताना, मी केरळमधील रामायणाशी संबंधित चार पवित्र मंदिरे नालम्बलमबद्दल बोललो होतो. ही मंदिरे राजा दशरथाच्या चार पुत्रांशी संबंधित आहेत हे केरळच्या बाहेरील लोकांना फारसे माहीत नाही. अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या काही दिवस आधी मला त्रिप्रयारच्या श्री रामास्वामी मंदिरात जाण्याची संधी मिळाली ही भाग्याची गोष्ट आहे. महान कवी एऴुतचन् यांनी लिहिलेल्या मल्याळम रामायणातील काही श्लोक ऐकणे हे स्वतःतच अद्भुत आहे.केरळमधील अनेक महत्त्वाच्या कलाकारांनीही आपल्या भव्य सादरीकरणाने मंत्रमुग्ध केले. केरळच्या लोकांनी तिथे कला, संस्कृती आणि अध्यात्माचे असे वातावरण निर्माण केले आहे, जणू संपूर्ण केरळच अवधपुरी आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात देशातील प्रत्येक राज्याची स्वतःची भूमिका आहे. भारत जेव्हा समृद्ध होता, जेव्हा जागतिक जीडीपीमध्ये आपला सहभाग प्रचंड होता, तेव्हा आमची ताकद होती आमची बंदरे, आमची बंदर शहरे. आज भारत पुन्हा जागतिक व्यापाराचे प्रमुख केंद्र बनत असताना आपण पुन्हा आपली सागरी शक्ती वाढवण्यात सक्रीय आहोत. यासाठी केंद्र सरकार समुद्रकिनारी वसलेल्या कोचीसारख्या शहरांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. आम्ही येथील बंदरांची क्षमता वाढवण्यावर काम करत आहोत आणि बंदराच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करत आहोत.सागरमाला प्रकल्पांतर्गत बंदरांची संपर्क व्यवस्था वाढवली जात आहे.
मित्रांनो,
आज देशाला येथे सर्वात मोठे ड्राय डॉक मिळाले आहे. याशिवाय जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि एलपीजी आयात टर्मिनलच्या पायाभूत सुविधांचेही आज उद्घाटन करण्यात आले. या सुविधा केरळ आणि भारताच्या या दक्षिणेकडील प्रदेशाच्या विकासाला गती देतील. मेड इन इंडिया विमानवाहू युद्धनौका आय . एन . एस . विक्रांत तयार करण्याचा ऐतिहासिक गौरव कोचीन शिपयार्ड कडे आहे. या नवीन सुविधांमुळे शिपयार्डची क्षमता अनेक पटींनी वाढेल. या सुविधांसाठी मी केरळच्या जनतेचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
बंदरे, नौवहन आणि अंतर्देशीय जलमार्ग क्षेत्रात व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांत अनेक सुधारणा हाती घेतल्या आहेत. यामुळे बंदरांमध्ये अधिक गुंतवणूक झाली आहे आणि अधिक रोजगार निर्माण झाला आहे. भारतीय नाविकांशी संबंधित नियमांमधील सुधारणांमुळे गेल्या 10 वर्षांत भारतीय नाविकांची संख्या 140 टक्क्यांनी वाढली आहे. देशातील जलमार्गाच्या वापरामुळे आता प्रवासी आणि मालवाहतुकीमध्ये नवीन तेजी आली आहे.
मित्रांनो,
जेव्हा सर्वजण प्रयत्न करतात , तेव्हा त्याचे परिणामही आणखी चांगले मिळतात. गेल्या दहा वर्षांत आपल्या बंदरांनी दोन अंकी वार्षिक वृद्धि साध्य केली आहे. 10 वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या बंदरांवर जहाजांना बराच वेळ वाट पाहावी लागत होती, त्यांना माल उतरवायला खूप वेळ लागत होता.आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज भारताने जहाजांच्या माला चढवणे-उतरवणे आदी कामकाज वेळेत जगातील अनेक विकसित देशांनाही मागे टाकले आहे.
मित्रांनो,
आज जागतिक व्यापारातील भारताची भूमिका जगालाही उमजत आहे. जी-20 शिखर परिषदेदरम्यान भारताच्या मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरच्या प्रस्तावावर झालेले एकमत याच भावनेचा दाखला आहे. हा कॉरिडॉर विकसित भारताच्या उभारणीला मोठी चालना देईल. यामुळे आपल्या किनारपट्टीच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. अलीकडेच सागरी अमृतकाळ ध्येयदृष्टी देखील सुरू करण्यात आली आहे. विकसित भारतासाठी आपण आपली सागरी शक्ती कशी बळकट करू याचीच पथदर्शक रुपरेषा या लक्ष्यामधे आहे. भारताला जगातील एक प्रमुख सागरी शक्ती बनवण्यासाठी आम्ही अतिविशाल बंदरे, जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती क्लस्टर यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत आहोत.
मित्रांनो,
केरळमध्ये आज ज्या 3 प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे, त्यामुळे सागरी क्षेत्रात या क्षेत्राचा वाटा आणखी वाढेल. नवीन ड्राय डॉक हा भारताचा राष्ट्रीय अभिमान आहे. त्याच्या बांधकामामुळे मोठी जहाजे, मोठी मालवाहू जहाजे येथे येऊ शकतात, तसेच जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्तीचे काम येथे शक्य होईल. यामुळे भारताचे परदेशावरील अवलंबित्व कमी होईल आणि आपण परदेशात पाठवत असलेला पैसा देशात गुंतवला जाईल. यामुळे येथे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती क्षेत्रात नवीन कौशल्ये निर्माण होतील.
मित्रांनो,
आज आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधेचेही उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे कोची हे भारत आणि भारत तसेच आशियाचे मोठे जहाज दुरुस्ती केंद्र बनणार आहे. आयएनएस विक्रांतच्या बांधणीदरम्यान कशाप्रकारे अनेक एमएसएमईंना पाठबळ मिळाले हे आपण पाहिले आहे. आता जहाज बांधणी आणि दुरुस्तीसाठी एवढ्या मोठ्या सुविधा येथे उभारल्या गेल्या आहेत, त्यामुळे एमएसएमईची एक नवीन परिसंस्था तयार होईल. नवीन एलपीजी आयात टर्मिनल बांधले गेले आहे ते कोची, कोईम्बतूर, इरोड, सेलम, कालिकत, मदुराई आणि त्रिचीच्या एलपीजी गरजा पूर्ण करेल. यामुळे या क्षेत्रातील उद्योग आणि इतर आर्थिक विकासालाही मदत होईल आणि नवीन रोजगारही निर्माण होतील.
मित्रांनो,
कोचीन शिपयार्ड आज आधुनिक आणि हरित तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या मेड इन इंडिया जहाजांच्या निर्मितीमध्येही आघाडीवर आहे. कोची जल मेट्रोसाठी बांधण्यात आलेली विद्युत जहाजे वाखाणण्याजोगी आहेत. अयोध्या, वाराणसी, मथुरा आणि गुवाहाटीसाठी विद्युत-हायब्रीड प्रवासी बोटीही येथे बांधल्या जात आहेत. याचा अर्थ कोचीन शिपयार्ड देशातील शहरांमध्ये आधुनिक आणि हरित जल संपर्क व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मला सांगण्यात आले आहे की तुम्ही नुकतेच शून्य उत्सर्जन, विजेवर चालणाऱ्या मालवाहू बोटीही नॉर्वेला वितरित केल्या आहेत. येथे हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या जगातील पहिल्या फीडर कंटेनर जहाजांच्या बांधणीवरही काम सुरू आहे. यामुळे मेक इन इंडिया - मेक फॉर द वर्ल्ड ची आमची ध्येयदृष्टी मजबूत होते. कोचीन शिपयार्ड भारताला हायड्रोजन इंधनावर आधारित वाहतुकीकडे नेण्याचे आमचे ध्येय आणखी मजबूत करत आहे. मला विश्वास आहे की लवकरच देशाला स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल बोटी मिळतील.
मित्रांनो,
नील अर्थात सागरी अर्थव्यवस्था आणि बंदरांच्या नेतृत्वाखालील विकासामध्ये आपल्या मच्छिमार बंधू - भगिनींची मोठी भूमिका मला दिसते. आज पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेद्वारे मासेमारीसाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी आधुनिक नौका पुरवण्यासाठी केंद्र सरकार अनुदान देत आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही किसान क्रेडिट कार्डची सुविधा देण्यात आली आहे. अशा प्रयत्नांमुळे गेल्या 10 वर्षांत मत्स्य उत्पादन आणि निर्यात या दोन्हींमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. आज केंद्र सरकार सागरी खाद्यप्रक्रियेतील भारताचा वाटा आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे भविष्यात आपल्या मच्छिमार बांधवांच्या उत्पन्नातही मोठी वाढ होई , ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक सुलभ होईल. केरळचा वेगाने विकास व्हावा या मनोकामनेसह, मी पुन्हा एकदा या नवीन प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद !