गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भूपेंद्र पटेल जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ जितेंद्र सिंह जी, विविध राज्य सरकारांचे मंत्री, स्टार्टअप जगताशी संबंधित सर्व सहकारी, विद्यार्थी मित्र, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,
‘केंद्र - राज्य विज्ञान परिषद’ या महत्वाच्या कार्यक्रमात मी आपले सर्वांचे स्वागतही करतो, अभिनंदन देखील करतो. आजच्या नव्या भारतात ‘सबका प्रयास’ या भावनेवर आपण मार्गक्रमण करत आहोत, हा कार्यक्रम त्याचं जिवंत उदाहरण आहे.
मित्रांनो,
21व्या शतकात भारताच्या विकासात विज्ञान ही एक उर्जा आहे ज्यात प्रत्येक क्षेत्रात विकासाला, प्रत्येक राज्याच्या विकासाला मोठा वेग देण्याचं सामर्थ्य आहे. आज जेव्हा भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, तर त्यात भारताची विज्ञान आणि या क्षेत्राशी संबंधित लोकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. अशा परिस्थितीत धोरणकर्त्यांचे, शासन - प्रशासनाशी संबंधित लोकांची जबाबदारी आणखीनच वाढते. मला आशा आहे, अहमदाबाद सायंस सिटी मध्ये होत असलेले हे विचार मंथन, आपल्याला एक नवी प्रेरणा देईल, विज्ञानाला प्रोत्साहन देऊन त्यांच्यात उत्साह जागवेल.
मित्रांनो,
आपल्या शास्त्रांत म्हटलं आहे -
ज्ञानम् विज्ञान सहितम् यत् ज्ञात्वा मोक्ष्यसे अशुभात्।।
म्हणजे, ज्ञान जेव्हा विज्ञानाशी जोडले जाते, जेव्हा ज्ञान आणि विज्ञानाशी आपली ओळख होते, तेव्हा जगातल्या सगळ्या समस्या आणि संकटांपासून मुक्तीचा मार्ग आपोआप उघडला जातो. समस्या सोडविण्याचा, उत्तर शोधण्याचा, उत्क्रांतीचा आणि नवोन्मेषाचा पाया विज्ञानच आहे. याच प्रेरणेतून नवा भारत, जय जवान, जय किसान, जय विज्ञान या सोबतच 'जय अनुसंधान'हेही आवाहन करत पुढे जात आहे.
मित्रांनो,
भूतकाळाचा एक महत्वाचा भाग आहे, ज्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. इतिहासाची ती शिकवण, केंद्र आणि राज्य दोन्हीसाठी, भविष्याचा मार्ग तयार करण्यात फारच मदतीची असते. जर आपण मागच्या शतकाच्या सुरवातीच्या दशकांकडे बघितलं तर, हे लक्षात येईल की, जगात कशा प्रकारचा विध्वंस आणि कशा प्रकारची संकटं होती. मात्र त्या काळात देखील गोष्ट भले ही पूर्वेची असो की पश्चिमेची, प्रत्येक ठिकाणचे वैज्ञानिक आपल्या महान शोधकार्यात मग्न होते. पश्चिमेत आईनस्टाईन, फर्मी, मॅक्स प्लांक, नील्स बोर, टेस्ला असे अनेक वैज्ञानिक आपल्या प्रयोगांनी जगाला आश्चर्याचा धक्का देत होते. त्याच काळात सी. व्ही. रमण, जगदीश चंद्र बोस, सत्येंद्रनाथ बोस, मेघनाद साहा, एस चंद्रशेखर या सारखे अगणित वैज्ञानिक आपले नवे नवे शोध जगासमोर आणत होते. या सर्व वैज्ञानिकांनी उत्तम भविष्य बनविण्यासाठी अनेक मार्ग उघडले आहेत. मात्र पूर्व आणि पश्चिम यांच्यात एक मोठा फरक हा राहिला आहे, की आपण आपल्या वैज्ञानिकांना पहिजे तितका मान दिला नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. म्हणूनच विज्ञानाविषयी आपल्या समाजाच्या एका मोठ्या वर्गात उदासिनता निर्माण झाली. एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा आपण कलेचा उत्सव करत असतो, तेव्हा आपण अनेक नव्या कलाकारांना प्रेरणा देखील देत असतो, तयार सुद्धा करत असतो. जेव्हा आपण खेळाचा उत्सव साजरा करतो, तेव्हा आपण आणखी नव्या खेळाडूंना प्रेरणा देत असतो, नवे खेळाडू तयार देखील करत असतो. त्याचप्रमाणे, जेव्हा आपण आपल्या वैज्ञानिकांच्या उपलब्धीचा उत्सव केला तर विज्ञान आपल्या समाजाचा एक नैसर्गिक हिस्सा बनते, आपल्या संस्कृतीचा भाग बनते. म्हणूनच आज सर्वात आधी माझा हाच आग्रह आहे, आपण सर्व राज्यांतून आलेले लोक आहात, मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो की, आपण आपल्या देशाच्या वैज्ञानिकांच्या उपलब्धीचा मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला पाहिजे, त्यांचे गुणगान केले पाहिजे, त्याचं महिमामंडन केलं पाहिजे.
पावला पावलावर आपल्या देशाचे वैज्ञानिक आपल्या शोधांतून आपल्याला ही संधी देत आहेत. जरा विचार करा, आज भारत जर कोरोनाची लस विकसित करू शकतो, 200 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा देऊ शकला आहे, तर त्याच्या मागे आपल्या वैज्ञानिकांची किती मोठी ताकद आहे. अशातच आजे प्रत्येक क्षेत्रात भारताचे वैज्ञानिक कमालीचं काम करत आहेत. भारताच्या वैज्ञानिकांच्या प्रत्येक लहान - मोठ्या उपलब्धींचे उत्सव केल्याने देशात विज्ञानाविषयी रस निर्माण होईल, तो या अमृत काळात आपल्याला मोठी मदत करेल.
मित्रांनो,
मला आनंद वाटतो आहे, की आपलं सरकार विज्ञानाधारीत विकासाच्या विचाराने पुढे जात आहे, 2014 नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या प्रयत्नांनी आज भारत जागतिक नवोन्मेष निर्देशांकात शेहेचाळीसाव्या स्थानावर आहे, तर, 2015 मध्ये भारत एक्क्यांशीव्या स्थानावर होता. इतक्या कमी काळात आपण 81 पासून 46 पर्यंत आलो आहोत, मात्र इथेच थांबायचं नाही, अजून आणखी वर जायचं आहे. आज भारतात विक्रमी संख्येने पेटंट नोंदवले जात आहेत, नवनवे नवोन्मेष होत आहेत. आपण सगळे देखील बघत आहात की आज या कार्यक्रमात इतके सगळे विज्ञानाच्या क्षेत्रातले इतके स्टार्टअप्स इथे आले आहेत. देशात स्टार्टअप्सची लाट हेच सांगत आहे, की किती गती आली आहे.
मित्रांनो,
आजच्या तरुणाईच्या डीएनएमधेच विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या दिशेने त्यांचा कल आहे. अंतराळ मोहीम असो, खोल समुद्रातील मोहीम असो, राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग अभियान असो, सेमीकंडक्टर अभियान असो, हायड्रोजन अभियान असो, ड्रोन तंत्रज्ञान असो, अशा अनेक अभियानांवर वेगाने काम सुरू आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेत उपलब्ध करून देण्यासाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात विशेष भर देण्यात आला आहे.
मित्रांनो,
भारताला संशोधन आणि नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी या अमृत काळात अनेक आघाड्यांवर आपल्या सर्वांना एकत्र काम करायचे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आपले संशोधन स्थानिक पातळीवर नेले पाहिजे. प्रत्येक राज्याने त्यांच्या स्थानिक समस्यांनुसार स्थानिक उपाययोजना तयार करण्यासाठी नवोन्मेषावर भर देणे ही काळाची गरज आहे. आता बांधकामाचे उदाहरण घ्या, हिमालयीन प्रदेशात जे तंत्रज्ञान उपयुक्त आहे, ते पश्चिम घाटात तितकेच प्रभावी असेल असे नाही; वाळवंटी प्रदेशाची स्वतःची आव्हाने आहेत आणि किनारी भागांना त्यांच्या स्वतःच्या समस्या आहेत. म्हणूनच आज आपण परवडणाऱ्या घरांसाठी दीपगृह प्रकल्पांवर काम करत आहोत, ज्यामध्ये अनेक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहेत, ते वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे, कोणत्याही हवामानात लवचिक असलेल्या पिकांबद्दल आपण जितके अधिक स्थानिक होऊ, तितके चांगले उपाय आपण देऊ शकू. आपल्या शहरांमधून बाहेर पडणारा जो कचरा आहे त्या कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेमध्ये, चक्रीय अर्थव्यवस्थेत विज्ञानाचीही मोठी भूमिका आहे. अशा प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक राज्याने विज्ञान-नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आधुनिक धोरण तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
मित्रांनो,
एक सरकार म्हणून, आपल्याला आपल्या शास्त्रज्ञांसोबत अधिकाधिक सहकार्याने आणि एकत्रितपणे काम करावे लागेल, त्यामुळे देशात वैज्ञानिक आधुनिकतेचे वातावरण वाढीस लागेल. नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी, राज्य सरकारांनी अधिकाधिक वैज्ञानिक संस्थांच्या निर्मितीवर आणि प्रक्रिया सुलभ करण्यावर भर दिला पाहिजे. राज्यांमधील उच्च शिक्षण संस्थांमध्येही नवोन्मेष प्रयोगशाळांची संख्या वाढवायला हवी. सध्या हायपर स्पेशलायझेशनचे युग सुरू आहे. राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ प्रयोगशाळा स्थापन होत आहेत, त्याचीही नितांत गरज आहे. यामध्ये आमचे सरकार केंद्रीय स्तरावर, राष्ट्रीय संस्थांच्या तज्ञांच्या पातळीवर सर्व प्रकारे मदत करण्यास तत्पर आहे. शाळांमध्ये आधुनिक विज्ञान प्रयोगशाळांसोबतच 'अटल टिंकरिंग प्रयोगशाळा' तयार करण्याच्या मोहिमेलाही गती द्यावी लागेल.
मित्रांनो,
राज्यांमध्ये अनेक राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्था असतात, राष्ट्रीय प्रयोगशाळाही असतात. राज्यांनी त्यांच्या क्षमतेचा आणि त्यांच्या कौशल्याचा पुरेपूर लाभ घ्यावा. आपल्या विज्ञानाशी संबंधित संस्थांनाही दबलेल्या अवस्थेतून बाहेर काढावे लागेल. राज्याच्या क्षमता आणि संसाधनांचा अधिक चांगला वापर करण्यासाठी सर्व वैज्ञानिक संस्थांचा योग्य तो वापर तितकाच आवश्यक आहे. तळागाळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाणाऱ्या कार्यक्रमांची संख्या तुम्ही तुमच्या राज्यात वाढवावी. पण यामध्येही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता ज्याप्रकारे अनेक राज्यांमध्ये विज्ञान महोत्सव भरवले जातात; पण हे सत्य आहे की, त्यात अनेक शाळा सहभागी होत नाहीत. याच्यामागील कारणांवर आपण काम केले पाहिजे, अधिकाधिक शाळांना विज्ञान महोत्सवाचा भाग बनवले पाहिजे. तुम्हा सर्व मंत्र्यांना माझी सूचना आहे की, तुमच्या राज्याच्या तसेच इतर राज्यांच्या 'विज्ञान अभ्यासक्रमावर' बारकाईने लक्ष ठेवा. इतर राज्यांमध्ये जे काही चांगले आहे, ते तुम्ही तुमच्या येथे तयार करू शकता. देशात विज्ञानाला चालना देण्यासाठी प्रत्येक राज्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करणे तितकेच आवश्यक आहे.
मित्रांनो,
भारतातील संशोधन आणि नवोन्मेषी व्यवस्थेमध्ये, जगात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी, अमृत काळामध्ये आपल्याला पूर्ण प्रामाणिकपणे काम करावे लागेल. या दिशेने, ही परिषद सार्थ आणि कालबद्ध उपाय घेऊन येईल या शुभेच्छांसह, मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की, तुमच्या विचारमंथनाने विज्ञानाच्या प्रगतीत नवे आयाम जोडले जातील, नवे संकल्प जोडले जातील आणि आपण सर्व मिळून आपल्या समोर असलेली संधी आगामी काळात वाया जाऊ देणार नाही, कोणत्याही परिस्थितीत ती संधी गमावता कामा नये. आपल्याकडे खूप मोलाची 25 वर्षे आहेत. ही 25 वर्षे भारताची एक नवी ओळख, नवे सामर्थ्य, भारताची नवी क्षमता घेऊन जगासमोर भारताला उभी करतील आणि म्हणून मित्रांनो, तुमची ही वेळ खर्या अर्थाने तुमच्या राज्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला बळ देणारी ठरली पाहिजे. मला विश्वास आहे की, तुम्ही या मंथनातून जे अमृत घेऊन बाहेर पडाल ते अमृत तुमच्या तुमच्या राज्यात अनेक संशोधनांसह देशाच्या प्रगतीत जोडले जाईल.
खूप खूप शुभेच्छा !
खूप खूप धन्यवाद !