आयओसीचे अध्यक्ष श्रीयुत थॉमस बाख, आययोसीचे सन्माननीय सदस्य, सर्व आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ, भारताच्या राष्ट्रीय महासंघाचे प्रतिनिधी, महिला आणि पुरुषहो
140 कोटी भारतीयांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे या विशेष आयोजनात स्वागत करतो, अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक असोसिएशनच्या या 141 व्या सत्राचे भारतात आयोजन होणे अतिशय विशेष आहे. 40 वर्षांनंतर भारतामध्ये आयओसीचे हे सत्र आयोजित होणे आमच्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे.
मित्रहो,
अगदी काही मिनिटांपूर्वीच भारताने अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये अतिशय दिमाखदार विजयाची नोंद केली. मी टीम भारताला, सर्व भारतवासियांना या ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा देतो.
मित्रहो,
खेळ, भारतात आमच्या संस्कृतीचा, आमच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. तुम्ही भारतातील गावांमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे दिसेल की खेळांशिवाय आमचे सण अपूर्ण आहेत. आम्ही भारतीय केवळ क्रीडा प्रेमीच नाही आहोत तर आम्ही खेळांसह जीवन जगणारे लोक आहोत. आणि आमच्या हजारो वर्षांच्या इतिहासात ते प्रतिबिंबित होत आहे. सिंधु खोऱ्यातील संस्कृती असो, हजारो वर्षांपूर्वीचा वैदिक कालखंड असो किंवा त्यानंतरचा कालखंड असो, प्रत्येक कालखंडात भारताचा क्रीडा वारसा अतिशय समृद्ध राहिलेला आहे. आमच्याकडे हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये 64 कलांमध्ये पारंगत असल्याची गोष्ट सांगितली जाते. यापैकी अनेक कलांचा संबंध अश्वारोहण, धनुर्विद्या, जलतरण, कुस्ती यांसारख्या अनेक कौशल्यांचे शिक्षण घेण्यावर भर दिला जात होता. आर्चरी म्हणजेच धनुर्विद्या शिकण्यासाठी तर एक संपूर्ण धनुर्वेद संहिताच लिहिली गेली होती. याच संहितेमध्ये एका ठिकाणी सांगितले गेले आहे-
धनुश चकरन्च् कुन्तन्च् खडगन्च् क्षुरिका गदा।
सप्तमम् बाहु युद्धम्, स्या-देवम्, युद्धानी सप्तधा।
म्हणजेच- धनुर्विद्येशी संबंधित 7 प्रकारची कौशल्ये अंगी असली पाहिजेत. ज्यामध्ये धनुष्य बाण, चक्र, भाला म्हणजे आजच्या काळातील जॅवेलिन थ्रो,तलवारबाजी, खंजीर, गदा आणि कुस्ती समाविष्ट होती.
मित्रहो,
खेळांच्या या हजारो वर्षांच्या आमच्या प्राचीन वारशाचे अनेक शास्त्रीय पुरावे आहेत. मुंबईत ज्या ठिकाणी आता आपण आहोत, तिथून सुमारे 900 किलोमीटर अंतरावर युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे- धोलावीरा. धोलावीरा हे पाच हजार वर्षांपेक्षाही आधीच्या काळात एक समृद्ध बंदराचे शहर होते. या प्राचीन शहरात, शहरी नियोजनसोबतच क्रीडाविषयक पायाभूत सुविधांचे देखील एक दिमाखदार मॉडेल सापडले आहे. खोदकामाच्या वेळी या ठिकाणी 2 स्डेडियम्स आढळली. यापैकी एक तर जगातील सर्वात प्राचीन आणि त्या काळातील जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. 5 हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन भारतात या स्टेडियममध्ये एकाच वेळी दहा हजार लोकांना बसण्याची क्षमता होती. भारताचे आणखी एक प्राचीन स्थान असलेल्या राखीगढी येथे देखील खेळांशी संबंधित पायाभूत सुविधा आढळल्या आहेत. भारताचा हा वारसा संपूर्ण जगाचा वारसा आहे.
मित्रहो,
खेळामध्ये कोणीही पराभूत असत नाही. खेळांमध्ये केवळ विजेते आणि शिकणारे असतात. खेळांची भाषा सार्वत्रिक आहे. भावना सार्वत्रिक आहे. खेळ म्हणजे केवळ स्पर्धा नाही आहेत. खेळ, मानवतेला आपल्या विस्ताराची संधी देतात. विक्रम कोणीही तोडू देत, संपूर्ण जग त्याचे स्वागत करते. आमच्या वसुधैव कुटुंबकम् म्हणजेच एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या आमच्या भावनेला देखील खेळ बळकटी देतात. म्हणूनच आमचे सरकार प्रत्येक स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेने काम करत आहे. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा, संसद सदस्य क्रीडा स्पर्धा आणि लवकरच आयोजित होणार असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स ही याची उदाहरणे आहेत. आम्ही भारतात खेळांच्या विकासासाठी समावेशकता आणि विविधतेवर सातत्याने भर देत आहोत.
मित्रहो,
खेळांवर भारताने ज्या प्रकारे लक्ष केंद्रित केले आहे, त्यामुळेच आज भारत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दिमाखदार कामगिरी करत आहे. गेल्या ऑलिंपिक्समध्ये भारतीय खेळाडूंनी अधिक चांगल्या कामगिरीचे दर्शन घडवले. अलीकडेच झालेल्या आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यापूर्वी झालेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्येही आमच्या युवा खेळाडूंनी नवे विक्रम स्थापित केले आहेत. भारतामध्ये बदलत जाणाऱ्या आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या क्रीडा परिदृश्याचे हे संकेत आहेत.
मित्रहो,
गेल्या काही वर्षात भारताने प्रत्येक प्रकारच्या जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. आम्ही अलीकडेच बुद्धीबळ ऑलिंपियाडचे आयोजन केले, ज्यामध्ये जगातील 186 देश सहभागी झाले. 17 वर्षांखालील महिलांचा फूटबॉल विश्वचषक, पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा, महिलांची जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धा आणि नेमबाजी विश्वचषक स्पर्धा या स्पर्धांचे देखील आयोजन केले. भारत दरवर्षी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचे देखील आयोजन करत असतो. यावेळी भारतात विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. उत्साहाच्या या वातावरणात सर्वांना हे ऐकून देखील आनंद झाला आहे की आयओसीच्या कार्यकारी मंडळाने ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. याविषयी लवकरच आम्हाला काही तरी सकारात्मक बातमी ऐकायला मिळेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रहो,
जागतिक कार्यक्रमांचे आयोजन, आमच्यासाठी जगभरातील देशांचे स्वागत करण्याची संधी असते. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि आपल्या उत्तम प्रकारे विकसित पायाभूत सुविधांमुळे बड्या जागतिक सोहळ्यांसाठी भारत सज्ज आहे. हे जगाने भारताच्या जी-20 अध्यक्षतेदरम्यान देखील पाहिले आहे. देशभरातील 60 पेक्षा जास्त शहरांमध्ये आम्ही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. लॉजिस्टिक्स पासून प्रत्येक प्रकारच्या आमच्या आयोजन क्षमतेचा हा दाखला आहे. म्हणूनच आज मी तुम्हा सर्वांसमोर 140 कोटी भारतवासियांच्या भावना नक्कीच मांडणार आहे. आपल्या भूमीवर ऑलिंपिकचे आयोजन करण्यासाठी भारत अतिशय उत्सुक आहे.
2036 या वर्षात भारतामध्ये ऑलिंपिकचे यशस्वी आयोजन व्हावे, यासाठी भारत आपल्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर ठेवणार नाही. 140 कोटी भारतीयांचे हे जुने स्वप्न आहे, त्यांची आकांक्षा आहे. हे स्वप्न आता आम्हाला तुम्हा सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्याची इच्छा आहे. आणि 2036च्या ऑलिंपिक्सच्या आधी 2029 मध्ये होणार असलेल्या युवा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवण्यासाठी देखील भारत इच्छुक आहे. मला खात्री आहे, भारताला आयओसीचे सहकार्य सातत्याने मिळत राहील.
मित्रहो,
खेळ हे केवळ पदके जिंकण्याचे नव्हे तर मने जिंकण्याचे देखील माध्यम आहे. खेळ सर्वांचे आहेत, सर्वांसाठी आहेत. खेळ किंवा अजिंक्यवीरच तयार करत नाहीत तर शांतता, प्रगती आणि निरामयतेला देखील प्रोत्साहन देतात. म्हणूनच खेळ, जगाला जोडण्याचे एक सशक्त माध्यम आहेत. ऑलिंपिक्सच्या घोषवाक्याचा मी तुमच्या समोर पुनरुच्चार करेन. ‘फास्टर, हायर, स्ट्रॉन्गर, टुगेदर.’ आयओसीच्या 141व्या सत्रामध्ये आलेल्या सर्व अतिथींचे, अध्यक्ष थॉमस बाख यांचे आणि सर्व प्रतिनिधींचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आगामी काही तासांमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. त्यामुळे आता या सत्राचे उद्घाटन झाल्याची मी घोषणा करतो!