भारत माता की जय।
भारत माता की जय।
भारत माता की जय।
जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी जितेंद्र सिंह जी, संसदेतील माझे सहकारी जुगल किशोर जी, गुलाम अली जी आणि जम्मू-काश्मीरच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जय हिंद, इक बारी परतियै इस डुग्गर भूमि पर आइयै मिगी बड़ा शैल लग्गा करदा ऐ। डोगरे बड़े मिलन सार ने, ए जिन्ने मिलनसार ने उन्नी गै मिट्ठी…इंदी भाशा ऐ। तां गै ते…डुग्गर दी कवित्री, पद्मा सचदेव ने आक्खे दा ऐ- मिठड़ी ऐ डोगरेयां दी बोली ते खंड मिठे लोग डोगरे।
मित्रहो,
मी म्हटलं तसं , माझे तुमच्याशी 40 वर्षांहून अधिक काळ जुनं नातं आहे. मी अनेक कार्यक्रम केले आहेत, अनेक वेळा इथे आलो आहे आणि आता जितेंद्र सिंह यांनी मला सांगितले की, मी या मैदानातही कार्यक्रमाला आलो आहे. मात्र आजचा हा जनसागर , आजचा तुमचा जोश, तुमचा उत्साह आणि हवामानही प्रतिकूल आहे, थंडी आहे, पाऊस देखील पडत आहे आणि तुमच्यापैकी एक जणही जागेवरून हलत नाही.आणि मला तर सांगण्यात आले की इथे अशी तीन ठिकाणे आहेत, जिथे स्क्रीन लावून खूप मोठ्या संख्येने लोक बसलेले आहेत. जम्मू-काश्मीरच्या लोकांचे हे प्रेम, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने दुरून इथे आला आहात, हा आम्हा सर्वांसाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. विकसित भारताला समर्पित हा कार्यक्रम फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नाही. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि अनेक शैक्षणिक संस्थांमधून लाखो लोक आपल्याशी जोडले गेले आहेत. एवढेच नाही तर आता मनोजजी मला सांगत होते की, 285 तालुक्यांमध्ये अशा स्क्रीन लावून व्हिडिओद्वारे हा कार्यक्रम ऐकला जात आहे ,पाहिला जात आहे. बहुधा इतका मोठा कार्यक्रम इतक्या ठिकाणी इतक्या उत्तम प्रकारे आयोजित केला गेला आहे आणि तोही जम्मू-काश्मीरच्या भूमीवर, जिथे निसर्ग आपल्याला प्रत्येक क्षणाला आव्हान देत असतो , निसर्ग प्रत्येक वेळी आपली परीक्षा घेत असतो . तिथेही इतक्या दिमाखात कार्यक्रम होणे, खरोखरच जम्मू-काश्मीरमधील जनता अभिनंदनास पात्र आहे.
मित्रहो,
मी विचार करत होतो की आज येथे मी भाषण करावे की नाही, कारण आता मला जम्मू-काश्मीरमधील काही लोकांशी बोलण्याची संधी मिळाली , तेव्हा ते ज्या उत्कटतेने , उत्साहाने आणि स्पष्टपणे आपले विचार मांडत होते. देशातील प्रत्येक व्यक्ती जी त्यांचे बोलणे ऐकत असेल त्यांचेही मनोबल वाढले असेल, त्यांचा विश्वास अमर होत असेल आणि त्यांना वाटले असेल गॅरंटी म्हणजे काय हे या 5 जणांनी आमच्याशी संवादातून दाखवून दिले आहे. त्या सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रहो,
विकसित भारत आणि विकसित जम्मू-काश्मीर बाबत जो उत्साह आहे, तो खरोखरच अभूतपूर्व आहे. हा उत्साह आपण विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान देखील पाहिला आहे. मोदी की गारंटीवाली गाडी प्रत्येक गावात पोहोचत असताना तुम्ही लोकांनी तिचे जल्लोषात स्वागत केले. जम्मू-काश्मीरच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे , एखादे सरकार त्यांच्या दारी आले आहे. कुणीही सरकारी योजनेच्या लाभापासून , जो त्यासाठी पात्र आहे, तो त्यापासून वंचित राहणार नाही... आणि हीच तर मोदी की गारंटी आहे, हीच तर कमळाची कमाल आहे ! आणि आता आम्ही विकसित जम्मू-काश्मीरचा संकल्प केला आहे. माझा तुमच्यावर विश्वास आहे. आम्ही विकसित जम्मू-काश्मीर करूनच दाखवू. गेल्या 70 वर्षांपासून अपूर्ण राहिलेली तुमची स्वप्ने येत्या काही वर्षांत मोदी पूर्ण करतील.
बंधू आणि भगिनींनो,
एक काळ असाही होता, जेव्हा जम्मू-काश्मीरमधून केवळ निराशाजनक बातम्या येत होत्या. बॉम्ब, बंदुका, अपहरण, फुटीरतावाद , अशा गोष्टी जम्मू-काश्मीरचे दुर्भाग्य बनले होते. मात्र आज जम्मू-काश्मीर विकसित होण्याच्या संकल्पासह पुढे वाटचाल करत आहे. आजच इथे 32 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी झाली तर काहींचे लोकार्पण देखील झाले आहे. हे प्रकल्प शिक्षण, कौशल्य, रोजगार, आरोग्य, उद्योग आणि कनेक्टिव्हिटीशी संबंधित आहेत. आज इथून देशाच्या विविध शहरांसाठी देखील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे. विविध राज्यांमध्ये आयआयटी आणि आयआयएमसारख्या संस्थांचा विस्तार होत आहे. या सर्व विकास प्रकल्पांसाठी जम्मू-काश्मीरचे , संपूर्ण देशाचे आणि देशातील तरुण पिढीचे खूप खूप अभिनंदन. आज येथील शेकडो युवकांना सरकारी नियुक्तीपत्रेही सुपूर्द करण्यात आली आहेत. सर्व तरुण मित्रांनाही मी शुभेच्छा देतो.
मित्रहो,
जम्मू-काश्मीर गेली अनेक दशके घराणेशाहीच्या राजकारणाचे बळी ठरले आहेत. घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्यांनी नेहमीच फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला, तुमच्या हिताची पर्वा केली नाही. आणि घराणेशाहीच्या राजकारणाचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो आपल्या युवकांना , आपल्या तरुण मुला-मुलींना बसतो. जी सरकारे केवळ एका कुटुंबाला पुढे नेण्याचे काम करत असतात , ती सरकारे आपल्या राज्यातील इतर तरुणांचे भविष्य पणाला लावतात. अशी घराणेशाही सरकारे युवकांसाठी योजना आखण्याला देखील प्राधान्य देत नाहीत. जे लोक केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करतात ते कधीही तुमच्या कुटुंबाची पर्वा करणार नाहीत. जम्मू-काश्मीरला या घराणेशाहीच्या राजकारणातून मुक्ती मिळत आहे, याचे मला समाधान आहे.
बंधू आणि भगिनींनो,
जम्मू-काश्मीर विकसित करण्यासाठी आमचे सरकार गरीब, शेतकरी, युवा शक्ती आणि महिला शक्तीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करत आहे. त्या मुलीला त्रास देऊ नका, अगदी छोटी बाहुली आहे, ती इथे असती तर मी तिला खूप आशीर्वाद दिले असते, मात्र या थंडीत त्या मुलीला त्रास देऊ नका. काही वर्षांपूर्वीपर्यंत इथल्या तरुणांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणासाठी इतर राज्यात जावे लागत होते. आज पहा, जम्मू-काश्मीर हे शिक्षण आणि कौशल्य विकासाचे मोठे केंद्र बनत आहे. आमच्या सरकारने गेल्या 10 वर्षात देशातील शिक्षणाचे आधुनिकीकरण करण्याची जी मोहीम मिशन हाती घेतली होती , तिचा आज येथे अधिक विस्तार होत आहे. मला आठवतंय , डिसेंबर 2013 मध्ये , ज्याचा जितेंद्रजी मगाशी उल्लेख करत होते, मी भाजपच्या ललकार रॅलीला आलो होतो, तेव्हा याच मैदानात मी तुम्हाला काही गॅरंटी देऊन गेलो होतो.
मी प्रश्न उपस्थित केला होता की, जम्मूमध्येही आयआयटी आणि आयआयएम सारख्या आधुनिक शैक्षणिक संस्था का निर्माण होऊ शकत नाहीत?ती आश्वासने आम्ही पूर्ण केली.आता जम्मूमध्ये आयआयटी देखील आहे आणि आयआयएम ही आहे. आणि म्हणूनच लोक म्हणतात- मोदींची हमी म्हणजेच हमीच्या पूर्णत्वाची हमी! आज येथे आयआयटी जम्मूच्या शैक्षणिक संकुल आणि वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले. तरुणाईचा उत्साह मला दिसत आहे .अद्भुत दिसतो आहे. यासोबतच, आयआयटी भिलाई, आयआयटी तिरुपती, आयआयआयटी -डीएम कुर्नूल,भारतीय कौशल्य संस्था कानपूर, उत्तराखंड आणि त्रिपुरामधील केंद्रीय संस्कृत विद्यापीठांच्या स्थायी परिसराचेही लोकार्पण करण्यात आले आहे. आज आयआयएम जम्मूसोबत, बिहारमधील आयआयएम बोधगया आणि आंध्रमधील आयआयएम विशाखापट्टणम परिसराचेही येथून उद्घाटन करण्यात आले आहे. याशिवाय, आज एनआयटी दिल्ली, एनआयटी अरुणाचल प्रदेश, एनआयटी दुर्गापूर, आयआयटी खड़कपूर, आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली, आयआयएसईआर बेहरामपूर, ट्रिपल आयटी लखनौ यांसारख्या आधुनिक उच्च शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक विभाग, वसतिगृहे, वाचनालय, सभागृह अशा अनेक सुविधांचे उद्घाटनही करण्यात आले आहे.
मित्रांनो,
10 वर्षांपूर्वी पर्यंत, शिक्षण आणि कौशल्याच्या क्षेत्रात या प्रमाणात विचार करणे देखील कठीण होते. पण हा नवा भारत आहे. नवा भारत आपल्या सध्याच्या पिढीला आधुनिक शिक्षण देण्यासाठी अधिकाधिक खर्च करतो आहे .गेल्या 10 वर्षात देशात विक्रमी संख्येने शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बांधण्यात आली आहेत. एकट्या जम्मू आणि काश्मीरमध्ये सुमारे 50 नवीन पदवी महाविद्यालये येथे स्थापन करण्यात आली आहेत 50 . पूर्वी जी मुले शाळेत जात नव्हती,अशा 45 हजारांहून अधिक मुलांना शाळांमध्ये दाखल करण्यात आले आहे. आणि मला आनंद आहे की आपल्या मुलींना या शाळांचा सर्वाधिक फायदा झाला आहे.आज त्या घराजवळच चांगले शिक्षण घेऊ शकत आहेत . असे दिवस होते जेव्हा शाळा जाळल्या जायच्या आणि आजचा दिवस आहे शाळा सजवल्या जात आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
आज जम्मू-काश्मीरमध्ये आरोग्य सेवेतही वेगाने सुधारणा होत आहे. 2014 पूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या केवळ 4 होती. आज वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 4 वरून 12 झाली आहे.2014 मध्ये एमबीबीएसच्या 500 जागांच्या तुलनेत आज येथे 1300 पेक्षा जास्त एमबीबीएसच्या जागा आहेत.2014 पूर्वी, येथे एकही वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची जागा नव्हती, परंतु आज त्यांची संख्या साडे सहाशेहून हून अधिक झाली आहे.गेल्या 4 वर्षात येथे सुमारे 45 नवीन नर्सिंग आणि निमवैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये शेकडो नवीन जागांची भर पडली आहे. जम्मू आणि काश्मीर हे देशातील असे एक राज्य आहे जिथे 2 एम्सची उभारणी होत आहे. मला आज यापैकी एका एम्स जम्मूचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले आहे. जे जेष्ठ मित्र इथे आले आहेत, जे मला ऐकत आहेत त्यांच्यासाठी हे कल्पनेपलीकडचे होते.स्वातंत्र्यानंतर अनेक दशके दिल्लीतच केवळ एक एम्स होते. गंभीर आजाराच्या उपचारासाठी दिल्लीला जावे लागायचे पण मी तुम्हाला जम्मूमध्येच एम्स उभारण्याची हमी दिली होती. आणि ही हमी मी पूर्ण केली आहे. गेल्या 10 वर्षात देशात 15 नवीन एम्स मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी एक आज जम्मूमध्ये तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे. आणि एम्स काश्मीरचे कामही वेगाने सुरू आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज आपण एक नव्या जम्मू-काश्मीरची निर्मिती होताना पाहत आहोत. राज्याच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा कलम 370 होता. हा अडथळा भाजप सरकारने दूर केला आहे. आता जम्मू-काश्मीर संतुलित विकासाकडे वाटचाल करत आहे. आणि मी ऐकले आहे की, कदाचित या आठवड्यात 370 वर एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे.मला वाटते तुमचा जयजयकार संपूर्ण देशात होणार आहे. चित्रपट कसा आहे हे मला माहित नाही, मी कालच कुठेतरी , टीव्हीवर ऐकले की 370 वर असा चित्रपट येतो आहे .चांगले आहे, लोकांना योग्य माहिती मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
मित्रांनो,
370 ची ताकद बघा, 370 मुळे आज मी देशवासियांना धैर्याने सांगितले आहे की, पुढच्या निवडणुकीत भाजपला 370 द्या आणि रालोआला 400 चा आकडा पार करून द्या . आता राज्यातील एकही प्रदेश मागे राहणार नाही, सर्वजण मिळून पुढे जातील. अनेक दशके उपेक्षेत जगणाऱ्या इथल्या जनतेलाही आज सरकार असल्याचे अस्तित्व जाणवले आहे. आज तुम्ही बघा, गावागावात नव्या राजकारणाची लाट पसरलेली दिसते.येथील तरुणांनी घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. आज जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक तरुण आपले भविष्य स्वतः घडवण्यासाठी पुढे वाटचाल करत आहे. जिथे एकेकाळी बंद आणि संपामुळे शांतता होती, तिथे आता जनजीवनाची धांदल दिसून येत आहे.जिथे एकेकाळी बंद आणि संपामुळे शांतता पसरलेली असायची आता तिथे जनजीवनाचा उत्साह दिसून येत आहे.
मित्रांनो,
जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दशके सरकार चालवणाऱ्या लोकांनी तुमच्या आशा आणि आकांक्षांची कधीच पर्वा केली नाही. आधीच्या सरकारांनी इथे राहणाऱ्या आपल्या सैनिक बांधवांचा आदरही केला नाही. काँग्रेस सरकार 40 वर्षे वन रँक वन पेन्शन आणणार असे सैनिकांना खोटे बोलत राहिले.मात्र भाजप सरकारने वन रँक वन पेन्शनचे आश्वासन पूर्ण केले. वन रँक वन पेन्शनमुळे जम्मूच्या माजी सैनिक आणि सैनिकांना 1600 कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे. जेव्हा संवेदनशील सरकार असते, तुमच्या भावना समजून घेणारे सरकार असते तेव्हा असेच वेगाने काम करते.
मित्रांनो,
भारतीय राज्यघटनेत ज्या सामाजिक न्यायाची हमी देण्यात आली आहे. ती हमी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरच्या सामान्य जनतेलाही मिळाली आहे. आपली निर्वासित कुटुंबे असोत, वाल्मिकी समाज असो , सफाई कामगार असोत, त्यांना लोकशाही अधिकार मिळाले आहेत.एससी प्रवर्गाचा लाभ मिळावा, ही वाल्मिकी समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. 'पद्दारी जमाती', 'पहाडी जातीय समूह', 'गड्डा ब्राह्मण' आणि 'कोळी' समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. विधानसभेत अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिकेत ओबीसींना आरक्षण देण्यात आले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र विकसित जम्मू-काश्मीरचा पाया आहे.
मित्रांनो,
जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या विकासकामांचा आपल्या माता, भगिनी आणि मुलींना खूप फायदा झाला आहे. आपले सरकार बांधत असलेली बहुतांश कायमस्वरूपी घरे ही महिलांच्या नावावर आहेत...हर घर जल योजना मुळे...हजारो शौचालये बांधल्यामुळे...आयुष्मान योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केल्याने ... इथल्या माता-भगिनींच आयुष्य खूप सोपं केलं आहे. कलम 370 हटवल्यानंतर आमच्या बहिणींना ते अधिकार मिळाले आहेत ज्यापासून त्या आधी वंचित राहिल्या होत्या.
मित्रांनो,
नमो ड्रोन दीदी योजनेबद्दल तुम्हीही ऐकले असेल. आमच्या बहिणींना ड्रोन पायलट बनवण्याची मोदींची हमी आहे. मी काल एका बहिणीची मुलाखत पाहत होतो, ती सांगत होती की मला सायकल कशी चालवायची हे देखील माहित नाही आणि आज प्रशिक्षणानंतर ड्रोन पायलट बनून घरी जात आहे. देशात मोठ्या प्रमाणात भगिनींचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. त्यासाठी हजारो बचत गटांना ड्रोन देण्याचा निर्णय घेतला आहे. लाखो रुपये किमतीचे हे ड्रोन शेती आणि बागकामासाठी मदत करतील. खत असो वा कीटकनाशके, फवारणीचे काम अगदी सोपे होईल. माझ्या सर्व भगिनींना यातून अतिरिक्त उत्पन्न मिळेल.
बंधू आणि भगिनींनो,
पूर्वी भारताच्या इतर भागात एखादे काम व्हायचे आणि जम्मू-काश्मीरमध्ये त्याचे फायदे एकतर अजिबात मिळत नव्हते किंवा खूप उशिरा मिळत होते. आज संपूर्ण देशात सर्व विकास कामे एकाच वेळी होत आहेत. आज देशभरात नवे विमानतळ बांधले जात आहेत. आता यात तर जम्मू-काश्मीरही इतरांच्या मागे नाही. आज जम्मू विमानतळाच्या विस्ताराचे कामही सुरू झाले आहे. काश्मीर ते कन्याकुमारी रेल्वेने जोडण्याचे स्वप्नही आज पुढे सरकले आहे. अलीकडे श्रीनगर ते सांगलदान आणि सांगलदान ते बारामुल्ला या गाड्या धावू लागल्या आहेत. तो दिवस दूर नाही जेव्हा लोक काश्मीरमधून रेल्वेने देशभर प्रवास करू शकतील. आज संपूर्ण देशात रेल्वेच्या विद्युतीकरणाची एवढी मोठी मोहीम सुरू आहे, त्याचाही मोठा फायदा या भागाला झाला आहे. आज जम्मू-काश्मीरला पहिली इलेक्ट्रिक रेल्वे मिळाली आहे. यामुळे प्रदूषण कमी ठेवण्यास खूप मदत होणार आहे.
मित्रांनो,
तुम्ही बघतच आहात की, जेव्हा वंदे भारतच्या रूपात आधुनिक रेल्वे देशात सुरू झाली, तेव्हा आम्ही जम्मू आणि काश्मीर हा त्याच्या सुरुवातीच्या मार्गांपैकी एक म्हणून निवडला होता. आम्ही माता वैष्णोदेवीला जाणे सोपे केले. मला आनंद आहे की आज जम्मू-काश्मीरमध्ये 2 वंदे भारत रेल्वे धावत आहेत.
मित्रांनो,
खेड्यातील रस्ते असोत, जम्मू शहरातील रस्ते असोत किंवा राष्ट्रीय महामार्ग असो, जम्मू-काश्मीरमध्ये चौफेर काम सुरू आहे. आज अनेक रस्त्यांचे उद्घाटने झाले, पायाभरणी झाली. यामध्ये श्रीनगर रिंगरोडच्या दुसऱ्या टप्प्याचाही समावेश आहे. ते तयार झाल्यावर, मानसबल तलाव आणि खीरभवानी मंदिराला भेट देणे सोपे होईल. श्रीनगर-बारामुल्ला-उरी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर त्याचा शेतकऱ्यांना आणि पर्यटन क्षेत्राला आणखी फायदा होईल. दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस वेच्या विस्तारामुळे जम्मू आणि कटरा दरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल. हा एक्स्प्रेस वे तयार झाल्यावर जम्मू ते दिल्ली दरम्यान प्रवास करणे खूप सोपे होईल.
मित्रांनो,
आज संपूर्ण जगात विकसित होत असलेल्या जम्मू-काश्मीरबद्दल प्रचंड उत्साह आहे. मी नुकताच आखाती देशांचा दौरा करून परतलो आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणुकीबाबत बरीच सकारात्मकता आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 चे आयोजन होत असलेले सगळे जग बघत असते, तेव्हा त्याचे प्रतिध्वनी दूरपर्यंत पोहोचत असते. संपूर्ण जग जम्मू-काश्मीरचे सौंदर्य, तिथली परंपरा, तिची संस्कृती आणि तुम्हा सर्वांचे स्वागत पाहून खूप प्रभावित झाले आहे. आज प्रत्येकजण जम्मू-काश्मीरमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. गेल्या वर्षी २ कोटींहून अधिक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये आले होते, हा एक विक्रम आहे. अमरनाथ आणि श्री माता वैष्णोदेवीला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या गेल्या दशकात सर्वाधिक झाली आहे. आज ज्या गतीने येथे पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत ते लक्षात घेता येत्या काळात ही संख्या अनेक पटींनी वाढणार आहे. पर्यटकांच्या या वाढत्या संख्येमुळे येथे अनेक नवीन रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
गेल्या 10 वर्षात भारत 11 व्या क्रमांकाला होता तो आता 5 व्या क्रमांकाची आर्थिक शक्ती बनला आहे. जेव्हा एखाद्या देशाची आर्थिक ताकद वाढते तेव्हा काय होते? मग सरकारला लोकांवर खर्च करण्यासाठी अधिक पैसे मिळतात. आज भारत गरिबांना मोफत धान्य, मोफत उपचार, कायमस्वरूपी घर, गॅस, शौचालय, पीएम किसान सन्मान निधी अशा अनेक सुविधा देत आहे. कारण भारताची आर्थिक ताकद वाढली आहे. आता आपल्याला येत्या 5 वर्षात भारताला जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती बनवायची आहे. यामुळे गरीब कल्याण आणि पायाभूत सुविधांवर खर्च करण्याची देशाची क्षमता अनेक पटींनी वाढेल. काश्मीरच्या खोऱ्यात अशा पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील की लोक स्वित्झर्लंडला जाणे विसरतील. जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक कुटुंबाला याचा फायदा होईल, तुम्हालाही त्याचा फायदा होईल.
तुम्ही आम्हा सर्वांना आशीर्वाद देत राहा. आज जम्मू-काश्मीरच्या इतिहासात एवढा मोठा विकास सोहळा घडला आहे, आपल्या पहाडी बंधू-भगिनींसाठी, आपल्या गुज्जर बंधू-भगिनींसाठी, आपल्या पंडितांसाठी, वाल्मिकी बांधवांसाठी, माता-भगिनींसाठी हा विकास उत्सव आहे. घडली, मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, तुम्ही कराल का? एक काम कराल का? तुमचा मोबाईल फोन काढून आणि फ्लॅश लाईट लावून या विकास महोत्सवाचा आनंद घ्या. सर्वांनी तुमच्या मोबाईलचा फ्लॅश चालू करा. जो कोणी उभा आहे, तुमच्या मोबाईलचा फ्लॅश चालू करा.आपण या विकास उत्सवाचे स्वागत करूया, प्रत्येकाच्या मोबाईलचा फ्लॅश लाईट चालू करा. प्रत्येकाच्या मोबाईलचा फ्लॅश लाईट चालू करा.
हा विकास महोत्सव संपूर्ण देश पाहतोय, संपूर्ण देश पाहतोय की जम्मू चमकत आहे, जम्मू-काश्मीरचा प्रकाश देशभर पोहोचतोय...शाबास. माझ्यासोबत म्हणा – भारत माता की जय. भारत माता की जय.भारत माता की जय.खूप खूप धन्यवाद.