भारत माता की जय
भारत माता की जय
भारत माता की जय
वणक्कम तामिळनाडू!
तामिळनाडूचे राज्यपाल श्री आर एन रवी जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री आर के स्टॅलिन जी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जी, श्री ज्योतिरादित्य सिंदिया जी आणि तामिळनाडूमधील बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा
मित्रहो,
तामिळनाडूत येणे ही नेहमीच मोठी गोष्ट आहे. इतिहास आणि वारशाचे हे आलय आहे. ही भाषा आणि साहित्याची भूमी आहे. हे देशभक्ती आणि राष्ट्रीय चेतनेचे केंद्र देखील आहे. आपले अनेक प्रमुख स्वातंत्र्यसैनिक तामिळनाडूचे होते.
मित्रहो,
मला माहित आहे की मी सणासुदीच्या काळात तुमच्याकडे आलो आहे. काही दिवसातच तामिळ पुथंडूचे आगमन होईल. नवीन ऊर्जा , नवीन आशा , नवीन आकांक्षा आणि नवीन सुरुवातीचा हा काळ आहे . अनेक नवीन पिढीचे पायाभूत सुविधा प्रकल्प आजपासून लोकांना सेवा देण्यास सुरुवात करतील. इतर काही प्रकल्पांची कामे आता सुरू होणार आहेत. रस्ते , रेल्वे आणि हवाई मार्ग विकासाचा समावेश असलेले हे प्रकल्प नवीन वर्षाच्या उत्सवाचा उत्साह वाढवतील
मित्रहो,
गेल्या काही वर्षात भारतामध्ये पायाभूत सुविधा क्षेत्रात क्रांती घडून येत आहे. ते वेग आणि प्रमाणाच्या माध्यमातून ती होत आहे. प्रमाणाचा विचार करायचा झाला तर या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर तुम्हाला नजर टाकता येईल. आम्ही पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विक्रमी 10 लाख कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत. रेल्वे पायाभूत सुविधांसाठी देखील आतापर्यंतची विक्रमी रक्कम बाजूला ठेवली आहे.
मित्रहो,
वेगाचा विचार केला तर काही वस्तुस्थितींमधून आपल्याला योग्य दृष्टीकोनाचे आकलन होऊ शकते. दरवर्षी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीत जी भर घातली जात आहे ती 2014 पूर्वीच्या लांबीच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट झाली आहे. 2014 पूर्वी दरवर्षी 600 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण होत असे. आज दरवर्षी 4000 किलोमीटरपर्यंत विद्युतीकरण होऊ लागले आहे. 2014 पर्यंत उभारण्यात आलेल्या विमानतळांची संख्या 74 होती. 2014 पासून आम्ही ही संख्या दुप्पट करून जवळपास 150 पर्यंत नेली आहे. तामिळनाडूला व्यापारासाठी महत्त्वाची असलेली विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. आपल्या बंदरांच्या क्षमतेत 2014 पूर्वीच्या काळाच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट वाढ झाली आहे.
वेग आणि प्रमाण केवळ भौतिक पायाभूत सुविधांच्या बाबतीतच विचारात घेतले जात नसून सामाजिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या बाबतीतही ते पाहायला मिळत आहे. 2014 पर्यंत देशात सुमारे 380 वैद्यकीय महाविद्यालये होती. आज आपल्याकडे 660 आहेत! गेल्या 9 वर्षात आपल्या देशातील एम्सची संख्या तिप्पट झाली आहे. डिजिटल व्यवहारात आपण जगात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे, आपला देश जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटाधारक देशांपैकी एक बनला आहे, सुमारे 2 लाख ग्राम पंचायतींना जोडणारे सहा लाख किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे ऑप्टिकल फायबरचे जाळे बसवले आहे आणि आज भारतामध्ये शहरी वापरकर्त्यांपेक्षा ग्रामीण भागात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे.
मित्रहो,
ही कामगिरी कशामुळे शक्य झाली आहे? दोन गोष्टींमुळे- कार्य संस्कृती आणि दृष्टीकोन. यापूर्वी पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणजे ‘डिले’ असा अर्थ होता. आता त्याचा अर्थ आहे ‘डिलिव्हरी’. ‘डिले’ पासून ‘डिलिव्हरी’ पर्यंत झालेला हा प्रवास आमच्या कार्यसंस्कृतीमुळे घडला आहे. आपले करदाते देत असलेल्या प्रत्येक रुपयाला आम्ही उत्तरदायी आहोत असे आम्हाला वाटते. आम्ही निश्चित कालमर्यादा निर्धारित करून काम करतो आणि त्यापूर्वीच अपेक्षित परिणाम साध्य करतो.
पायाभूत सुविधांबाबतचा आमचा दृष्टीकोन सुद्धा पूर्वीपेक्षा वेगळा आहे. आम्ही पायाभूत सुविधा म्हणजे काँक्रिट, विटा आणि सिमेंट म्हणून पाहात नाही. आम्ही पायाभूत सुविधा एका मानवी चेहऱ्यासह पाहतो. आकांक्षाना साध्यतेसोबत, लोकांना शक्यतांसोबत आणि स्वप्नांना वास्तवासोबत ते जोडत आहे. आजच्या प्रकल्पांनाच याचे उदाहरण म्हणून घ्या. रस्ते प्रकल्पांपैकी एक प्रकल्प विरुद्धनगर आणि तेनकाशी येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना इतर बाजारपेठांशी जोडत आहे. चेन्नई आणि कोईम्बतूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस लहान व्यवसायांना ग्राहकांशी जोडत आहे आणि चेन्नई विमानतळावरील नवे टर्मिनल जगाला तामिळनाडूमध्ये आणत आहे. यामुळे गुंतवणूक आकर्षित होणार आहे जी येथील युवकांसाठी नव्या संधी निर्माण करेल. एक रस्ता, एक रेल्वेमार्ग किंवा मेट्रो मुळे केवळ वाहनांनाच वेग प्राप्त होत नाही. लोकांची स्वप्ने आणि उद्यमशीलतेच्या भावनेला देखील गती मिळत असते. अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असते. प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्प कोट्यवधी कुटुंबांच्या जीवनात परिवर्तन घडवतो.
मित्रहो,
तमिळनाडूच्या विकासाला आमचे मोठ्या प्रमाणावर प्राधान्य आहे. तामिळनाडूसाठी यावर्षी रेल्वेच्या पायाभूत सुविधांकरता सहा हजार कोटींहून अधिक रुपयांची आतापर्यंतची सर्वात मोठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. 2009-2014 दरम्यान दरवर्षी तरतूद करण्यात आलेली सरासरी रक्कम नऊशे कोटी रुपयांपेक्षा कमी होती.
2004 ते 2014 दरम्यान तामिळनाडूमध्ये बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गांची लांबी सुमारे 800 किमी होती. 2014 ते 2023 या काळात जवळपास दोन हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग जोडले गेले. 2014-15 मध्ये, तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या विकास आणि देखभालीसाठी अंदाजे एक हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. 2022-23 मध्ये ती 6 पटीने वाढून 8 हजार दोनशे कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
गेल्या काही वर्षात तामिळनाडूमध्ये अनेक महत्त्वाचे प्रकल्प झाले आहेत. डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉर भारताच्या संरक्षणाला बळकटी देत आहे आणि येथे रोजगारांची निर्मिती करत आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्कशी संबंधित घोषणेचा तामिळनाडूमधील टेक्स्टाईल पार्कना देखील फायदा होणार आहे. गेल्या वर्षी आम्ही बंगळूरु-चेन्नई द्रुतगती मार्गाची पायाभरणी केली. चेन्नईजवळ एका मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्कची उभारणी सुरू आहे. ममल्लापुरम ते कन्याकुमारी दरम्यान संपूर्ण पूर्व किनारपट्टी रस्त्याची भारतमाला प्रकल्पांतर्गत सुधारणा केली जात आहे. तामिळनाडूमध्ये असे अनेक प्रकल्प आहेत जे विकासाला पुढे नेत आहेत आणि आज आणखी काही प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे किंवा त्यांची पायाभरणी केली जात आहे.
मित्रहो,
तामिळनाडूमधील चेन्नई, मदुराई आणि कोईम्बतूर या तीन महत्त्वाच्या शहरांना उद्घाटन करण्यात आलेल्या किंवा सुरू झालेल्या प्रकल्पांचा थेट लाभ होत आहे. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करता येईल. या नव्या टर्मिनल इमारतीची रचना तामिळ संस्कृतीचे सौंदर्य प्रदर्शित करणारी आहे. तुम्ही यापूर्वीच काही थक्क करणारी छायाचित्रे पाहिली असतील. मग ती छतांची रचना असो, जमिनीची, सिलिंग किंवा म्युरल्स असोत, या प्रत्येकामधून तुम्हाला तामिळनाडूच्या संस्कृतीची आठवण होईल. एकीकडे या विमानतळावर परंपरा उठून दिसत असताना शाश्वत विकासाच्या आधुनिक गरजांचा देखील विचार यामध्ये करण्यात आला आहे. पर्यावरणस्नेही सामग्रीचा वापर करून याची उभारणी करण्यात आली आहे आणि एलईडी प्रकाशयोजना आणि सौर ऊर्जा यांसारख्या हरित तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे.
मित्रहो,
चेन्नईला कोईम्बतूरसोबत जोडणारी आणखी एक वंदे भारत ट्रेन देखील मिळत आहे. ज्यावेळी पहिली वंदे भारत ट्रेन चेन्नईला आली, त्यावेळी तामिळनाडूमधील माझ्या युवा मित्रांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला होता असे मला आठवते. त्यानंतर समाजमाध्यमांवर खूप जास्त प्रमाणात प्रसारित झालेले वंदे भारत ट्रेनचे काही व्हिडिओ मला पाहायला मिळाले. ‘मेड इन इंडिया’ विषयीचा हा अभिमान VO चिदंबरम पिल्लई यांच्या भूमीमध्ये नैसर्गिक आहे.
मित्रहो,
वस्त्रोद्योग क्षेत्र असो, एमएसएमई असोत किंवा उद्योग असोत, यामध्ये कोईम्बतूर हे औद्योगिक ऊर्जाकेंद्र राहिले आहे. आधुनिक कनेक्टिविटीमुळे लोकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होणार आहे. आता चेन्नई आणि कोईम्बतूरमधील प्रवासाचा वेळ आता केवळ 6 तासांवर आला आहे. या वंदे भारत एक्स्प्रेसचा वस्रोद्योगाला आणि सालेम, ईरोडे आणि तिरुपूर या औद्योगिक केंद्रांना फायदा होणार आहे. मित्रहो,
मदुराई ही तामिळनाडूची नैसर्गिक राजधानी असल्याचे सांगितले जाते. जगातील सर्वाधिक प्राचीन शहरांपैकी हे एक आहे. आजच्या प्रकल्पांमुळे या प्राचीन शहराच्या आधुनिक पायाभूत सुविधांना देखील चालना मिळणार आहे. यामुळे मदुराईला प्रवासाची सुविधा आणि जीवनमान सुलभता मिळणार आहे. तामिळनाडूच्या नैऋत्य आणि किनारी भागातील अनेक जिल्ह्यांना देखील आजच्या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्पांचे लाभ मिळणार आहेत.
मित्रहो,
तामिळनाडू हे भारताच्या विकासाच्या इंजिनांपैकी एक आहे. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमुळे तामिळनाडूच्या जनतेच्या आकांक्षाना मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळेल अशी मला खात्री आहे. ज्यावेळी उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा येथे रोजगार निर्माण करतील, उत्पन्नात वाढ होईल आणि तामिळनाडूचा विकास होईल. ज्यावेळी तामिळनाडूचा विकास होईल, भारताचा विकास होईल. तुमच्या स्नेहाबद्दल खूप खूप आभार, वणक्कम!