नम: पार्वती पतये… हर हर महादेव!
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, गुजरात विधानसभेचे अध्यक्ष आणि बनास डेयरीचे अध्यक्ष आणि आज विशेष रूपाने शेतकऱ्यांना भेट, उपहार देण्यासाठी आलेले शंकर भाई चौधरी, राज्याच्या मंत्रिमंडळातले सदस्य, आमदार, इतर मान्यवर आणि बनारसच्या माझ्या कुटुंबीयांनो…
बाबा शिव यांच्या पवित्र जमिनीवर आपल्या सर्व काशीच्या लोकांना माझा सप्रेम नमस्कार.
माझ्या काशीच्या लोकांच्या या उत्साहामुळे थंडीच्या या वातावरणात सुद्धा गर्मी वाढविली आहे. काय म्हणतात बनारस मध्ये ...जिया रझा बनारस!!! ठीक आहे, सुरुवातीला आमची एक तक्रार आहे... काशीच्या लोकांशी. का आम्ही आपली तक्रार करत आहोत? एक वर्ष देव दिवाळीला आम्ही इथे राहिलो नाही आणि पुढच्या वर्षी देव दिवाळीला काशीच्या लोकांनी मिळून विक्रम मोडीत काढला.
आपण सर्व विचार करत असाल की जेव्हा सर्व काही चांगलेच झाले आहे तर मग मी का तक्रार करत आहे, मी यासाठी तक्रार करत आहे कारण दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी देव दिवाळीला इथे आलो होतो तेव्हा आपण त्या वेळच्या विक्रमालाही मोडीत काढले आहे.
आता घरातला एक सदस्य या नात्याने मी तर तक्रार करणारच ना, कारण आपले हे परिश्रम बघायला मी त्यावेळेस इथे नव्हतो. यावेळेस जे लोक देव दिवाळीचा अद्भुत असा देखावा पाहून आले आहेत, परदेशातले पाहुणे सुद्धा आले होते, त्यांनी दिल्लीमध्ये मला संपूर्ण परिस्थिती विषयी सांगितले. जी-20 मध्ये आलेले सर्व पाहुणे असतील किंवा बनारस मध्ये येणारा कोणताही पाहुणा असेल..जेव्हा ते बनारसच्या लोकांची प्रशंसा करत असतात तेव्हा माझी सुद्धा मान अभिमानाने उंच होते. काशी वासियांनी जे काम करून दाखवले आहे त्याबद्दल जेव्हा संपूर्ण विश्व त्याचे गुणगान करत असते तेव्हा सर्वात जास्त आनंद हा मला होत असतो. भगवान महादेवांच्या काशीमध्ये मी जेवढी काही सेवा करत राहील ..ती सुद्धा मला खूपच कमी वाटत असते.
माझ्या कुटुंबीयांनो,
जेव्हा काशीचा विकास होत असतो तेव्हा उत्तर प्रदेशचा सुद्धा विकास होत असतो आणि जेव्हा उत्तर प्रदेशाचा विकास होत असतो तेव्हा देशाचा सुद्धा विकास होत असतो, याच भावनेतून आज सुद्धा इथे जवळजवळ 20 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे.
बनारसच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची जोडणी असो, बीएचयु ट्रॉमा सेंटरमध्ये क्रिटिकल केअर युनिट असेल, रस्ते, वीज, गंगा घाट, रेल्वे, विमानतळ, सौर ऊर्जा आणि पेट्रोलियम यासारख्या अनेक क्षेत्रांशी संबंधित उपक्रम असतील हे सर्व या क्षेत्राच्या विकासाच्या प्रगतीला आणखी गती देतील. काल सायंकाळीच मला काशी कन्याकुमारी तामिळ संगमम रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवण्याची संधी प्राप्त झाली होती.
आज वाराणसी पासून दिल्लीपर्यंत एक आणखी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडी सुरू झालेली आहे. आज पासून मऊ-दोहरीघाट रेल्वे सुद्धा सुरू झालेली आहे. ही रेल्वे सुविधा सुरू झाल्याने दोहरीघाट याबरोबरच बड़हलगंज, हाटा, गोला- गगहा पर्यंतच्या सर्व लोकांना लाभ मिळणार आहे. या सर्व विकास कार्यासाठी मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत आहे.
माझ्या कुटुंबीयांनो,
आज काशीबरोबरच संपूर्ण देश विकसित भारत घडवण्यासाठी कटिबद्ध झालेला आहे. विकसित भारत संकल्प यात्रा हजारो गावे, हजारो शहरांपर्यंत पोहोचलेली आहे. कोट्यवधी लोक या यात्रेबरोबर जोडले जात आहेत. इथे काशीमध्ये सुद्धा मला विकसित भारत संकल्प यात्रेचा एक भाग बनण्याची संधी मिळाली आहे. या यात्रेमध्ये जी गाडी चालत आहे त्या गाडीला देशातली जनता मोदी की गारंटी वाली गाडी असे बोलत आहेत.
आपण सर्व लोकांनी मोदींची गॅरंटी अनुभवली आहे..ना ? आमचा प्रयत्न आहे की भारत सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी, लोकांच्या कल्याणासाठी ज्या काही योजना बनवल्या आहेत त्या योजनांपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये. याआधी गरीब, सरकारकडे सुविधा मिळवण्यासाठी फेऱ्या मारत असायचा आता मोदी यांनी म्हटले आहे की, सरकार स्वतः चालत गरिबांच्या जवळ जाणार आहे आणि यासाठीच मोदी की गॅरंटी वाली गाडी खूपच सुपरहिट झाली आहे.
काशीमध्ये सुद्धा हजारो नवीन लाभार्थी सरकारी योजनांशी जोडले गेले आहेत, जे याआधी या योजनांपासून वंचित राहिले होते. कोणाला आयुष्यमान कार्ड मिळाले आहे, कोणाला मोफत राशन कार्ड प्राप्त झालेले आहे, कोणाला पक्क्या घराची गॅरंटी मिळालेली आहे, कोणाला पिण्याचे पाणी नळाच्या जोडण्यांमधून मिळत आहे, कोणाला मोफत स्वयंपाकाच्या गॅस जोडण्या मिळालेल्या आहेत. आमचा हाच प्रयत्न आहे की, कोणताही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये सर्वांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे.
आणि या अभियानाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची गोष्ट जी लोकांना मिळालेली आहे…ती म्हणजे विश्वास. ज्यांना योजनांचा लाभ मिळालेला आहे त्यांना हा विश्वास सुद्धा मिळालेला आहे की आता त्यांचे जीवन आणखी चांगले होणार आहे, जे वंचित होते त्यांना सुद्धा हा विश्वास मिळालेला आहे की, एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा नक्कीच या योजनांचा लाभ मिळणार आहे. याच विश्वासाने, देशाच्या याच विश्वासाला आणखी मजबूत केले आहे की वर्ष 2047 पर्यंत भारत विकसित देश झालाच पाहिजे.
आणि नागरिकांना जो लाभ मिळतो आहे, लाभ खरच मिळतो आहे, ते पाहून मला सुद्धा लाभ मिळतो. मी दोन दिवसांपासून या संकल्प यात्रेमध्ये जात आहे आणि माझ्या नागरिकांशी गाठीभेटी होत आहेत.
काल मी जिथे गेलो तिथे शाळकरी मुलांना भेटण्याची मला संधी मिळाली, केवढा आत्मविश्वास होता..केवढ्या चांगल्या प्रकारे कविता म्हणत होत्या त्या मुली, संपूर्ण विज्ञान समजावून सांगत होत्या आणि एवढ्या सुंदर प्रकारे अंगणवाडी मधील लहान मुले गीत गाऊन स्वागत करत होते.
हे पाहून मला खूप खूप आनंद होतो. आताच इथे आपल्या भगिनी चंदा देवी यांचे भाषण मी ऐकले, इतके उत्तम भाषण होते, मी तर म्हणेन मोठ-मोठे लोकही असे भाषण करू शकत नाहीत. सगळ्या गोष्टी इतक्या तपशिलात जाऊन सांगत होत्या मी काही प्रश्नही विचारले, त्यांची उत्तरेही दिली आणि त्या आपल्या लखपती दीदी आहेत.
मी जेव्हा सांगितले आपण लखपती दीदी झाल्या आहात तेव्हा त्यांनी सांगितले की साहेब, मला बोलण्याची संधी मिळाली आहे, मात्र आमच्या गटात आणखी 3-4 भगिनी लखपती झाल्या आहेत आणि सर्वांना लखपती करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्प यात्रेने मला आणि माझ्या सहकाऱ्यांना, समाजातल्या सामर्थ्याचे, एकाहून एक सामर्थ्यवान आपल्या माता-भगिनी, कन्या, मुले, यांच्यातल्या सामर्थ्याचे, खेळामध्ये ही मुले किती हुशार आहेत, ज्ञानाने किती प्रगल्भ आहेत, या साऱ्या गोष्टी पाहण्याची, जाणण्याची, अनुभवण्याची मोठी संधी मला या संकल्प यात्रेने दिली आहे. म्हणूनच सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येकाला मी सांगतो की ही विकसित भारत संकल्प यात्रा आपल्यासारख्या लोकांसाठी शिक्षणाचे चालते फिरते विद्यापीठ आहे. आपल्याला शिकायला मिळते. मी दोन दिवसात इतक्या गोष्टी जाणल्या आहेत, इतके शिकलो आहे की माझे जीवन धन्य झाले.
माझ्या कुटुंबियांनो,
कहल जाला: काशी कबहु ना छाड़िए, विश्वनाथ दरबार।
आमचे सरकार काशीमध्ये वास्तव्य सुलभ करण्याबरोबरच काशी समवेत संपर्क सुविधा वाढवण्यासाठीही तितकीच मेहनत करत आहे. इथे गाव असो किंवा शहर क्षेत्र, संपर्काच्या उत्तम सुविधा होत आहेत. आज ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले त्यामुळे काशीच्या विकासाला आणखी वेग प्राप्त होईल. यामध्ये आजूबाजूच्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचाही समावेश आहे. शिवपुर-फुलवरिया-लहरतारा रस्ता आणि ओव्हरब्रिज मुळे वेळ आणि इंधन अशा दोन्हींची बचत होणार आहे. या प्रकल्पांमुळे शहराच्या दक्षिण भागातून बाबतपूर विमानतळावर जाणाऱ्या लोकांचीही सोय होणार आहे.
अच्छा एक बात बतावा, एक बात बतावा, गदौलिया से लंका तक टूरिस्टन का संख्या बढ़ल हौ की नाहीं ?
मित्रांनो,
काशीमध्ये लोकांचे उत्पन्न वाढावे,इथे येणाऱ्या पर्यटकांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी आमचे सरकार सातत्याने काम करत आहे. आज वाराणसी इथे स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत इकात्मिक पर्यटक पास प्रणाली–काशी दर्शन याचाही प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे वेग-वेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना वेगवेगळी तिकिटे घेण्याची आवश्यकता उरणार नाही. एका पासमुळे प्रत्येक ठिकाणी प्रवेश शक्य आहे.
मित्रांनो,
काशीमधली प्रेक्षणीय स्थळे, खाद्य पदार्थांची प्रसिद्ध ठिकाणे, मनोरंजन आणि ऐतिहासिक महत्वाची ठिकाणे कोणती आहेत याबाबतची सगळी माहिती देश आणि विदेशातल्या पर्यटकांना मिळावी यासाठी वाराणसीचे पर्यटन संकेतस्थळ-काशी सुरु करण्यात आले आहे.
मित्रांनो,
आज गंगेवरील अनेक घाटांच्या नूतनीकरणाचे कामही सुरू झाले आहे. आधुनिक बस निवारे असोत किंवा विमानतळ आणि रेल्वे स्थानकात बांधल्या जाणाऱ्या आधुनिक सुविधा असोत, यामुळे वाराणसीत येणाऱ्या लोकांना आणखी चांगला अनुभव मिळेल.
माझ्या कुटुंबीयांनो,
काशीसह देशाच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी आजचा मोठा दिवस आहे. रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी देशात मोठी मोहीम सुरू आहे हे तुम्हाला माहीत आहे. मालगाड्यांसाठी पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या उभारणीमुळे रेल्वेचे चित्र बदलेल. या मालिकेत आज पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन ते न्यू भाऊपूर जंक्शन दरम्यानच्या विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे पूर्व भारतातून कोळसा आणि इतर कच्चा माल उत्तर प्रदेशात आणणे सोपे होईल. यामुळे काशी क्षेत्रातील उद्योगधंदे आणि शेतकऱ्यांचा उत्पादित माल पूर्व भारतात आणि परदेशात पाठवण्यातही मोठी मदत होईल.
मित्रांनो,
आज बनारस रेल्वे इंजिन कारखान्यात बनवलेले 10 हजारावे इंजिनदेखील कार्यान्वित करण्यात आले आहे. हे मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड बद्दलची आपली बांधिलकी बळकट करणारे आहे. उत्तर प्रदेशाच्या विविध भागांमध्ये औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी, परवडणारी आणि पुरेशी वीज आणि गॅस या दोन्हींची उपलब्धता आवश्यक आहे. मला आनंद आहे की, डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे उत्तर प्रदेश सौरऊर्जेच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. चित्रकूट येथे 800 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क उत्तर प्रदेशमध्ये पुरेशी वीज उपलब्ध करून देण्याची आपली वचनबद्धता मजबूत करेल. यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील आणि जवळपासच्या गावांच्या विकासालाही गती मिळेल. आणि सौर ऊर्जेबरोबरच, पूर्व उत्तर प्रदेशात पेट्रोलियमशी संबंधित एक मजबूत नेटवर्क देखील तयार केले जात आहे. देवरिया आणि मिर्झापूरमध्ये उभारल्या जाणाऱ्या या सुविधांमुळे पेट्रोल-डिझेल, जैव-सीएनजी, इथेनॉलवर प्रक्रिया करण्यातही मदत होणार आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
विकसित भारतासाठी देशातील महिला शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि प्रत्येक गरीबाचा विकास करणे अत्यंत आवश्यक आहे. माझ्यासाठी या चार जातीच सर्वात मोठ्या जाती आहेत. या चार जाती मजबूत झाल्या तर संपूर्ण देश बलवान होईल. हा विचार करून आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात 30 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही अशा छोट्या शेतकऱ्यांनाही ही सुविधा दिली जात आहे. नैसर्गिक शेतीवर भर देण्याबरोबरच आपले सरकार शेतकऱ्यांसाठी आधुनिक व्यवस्थाही करत आहे. सध्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत ड्रोन पाहून सर्वच शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. हे ड्रोन आपल्या कृषी व्यवस्थेचे भविष्य घडवणार आहेत .औषध असो वा खत, त्यांची फवारणी सुलभ होईल. यासाठी सरकारने नमो ड्रोन दीदी मोहीमही सुरू केली आहे, खेड्यापाड्यातील लोक याला नमो दीदी म्हणतात.या मोहिमेंतर्गत बचत गटांशी संबंधित भगिनींना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तो दिवस आता दूर नाही जेव्हा काशीमधील भगिनी आणि मुलीही ड्रोनच्या जगात क्रांती घडवतील.
मित्रांनो,
तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे बनारसमध्ये अमूल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आधुनिक बनास डेअरी संयंत्राचे काम अतिशय वेगाने सुरू आहे आणि शंकरभाई मला सांगत होते की हे काम कदाचित दीड एक महिन्यात पूर्ण होईल. बनारसमध्ये बनास डेअरी 500 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करत आहे. दुग्धोत्पादनात आणखी वाढ व्हावी म्हणून ही डेअरी गायींच्या संवर्धनासाठी मोहीम राबवत आहे. बनास डेअरी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.लखनौ आणि कानपूरमध्ये बनास डेअरीची संयंत्र सुरू आहेत. यावर्षी बनास डेअरीने उत्तर प्रदेशाच्या 4 हजारांहून अधिक गावांतील शेतकऱ्यांना एक हजार कोटींहून अधिक रक्कम दिली आहे.या कार्यक्रमात आणखी एक मोठे काम झाले आहे. लाभांश म्हणून, बनास डेअरीने आज उत्तर प्रदेशातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 100 कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे. हा लाभ मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो.
माझ्या कुटुंबीयांनो,
काशीत वाहत असलेली विकासाची ही अमृतधारा या संपूर्ण प्रदेशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. पूर्वांचलचा हा संपूर्ण परिसर अनेक दशकांपासून दुर्लक्षित आहे. पण महादेवाच्या आशीर्वादाने आता मोदी तुमच्या सेवेत कार्यरत आहेत. अवघ्या काही महिन्यांवर देशभरात निवडणुका आहेत आणि मोदींनी देशाला हमी दिली आहे की त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात ते भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवतील. आज जर मी देशाला ही हमी देत असेल तर ते तुम्हा सर्वांमुळे, माझ्या काशीतील सुहृदांमुळे आहे. तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभे राहता, माझे संकल्प बळकट करता.
चला, दोन्ही हात वर करून पुन्हा एकदा म्हणा, नम: पार्वती पतये....हर हर महादेव.
खूप खूप शुभेच्छा.