नमस्कार
शिक्षक पर्व या महत्त्वाच्या कार्यक्रमात माझ्यासोबत सहभागी झालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारीश्री धर्मेंद्र प्रधान,श्रीमती अन्नपूर्णा देवी ,डॉ. सुभास सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह, देशाच्या विविध राज्यातील माननीय शिक्षकवर्ग, राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आराखडा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. कस्तुरीरंगन, त्यांच्या टीममधील सर्व मान्यवर सन्माननीय सदस्य, संपूर्ण देशभरातून आपल्यासोबत उपस्थित असलेले सर्व विद्वान प्राचार्यवर्ग, शिक्षकवर्ग आणि प्रिय विद्यार्थ्यांनो,
मी सर्वप्रथम राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या आपल्या शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन करतो. तुम्ही सर्वांनी अतिशय खडतर कालखंडात देशात शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जो एक निष्ठापूर्वक प्रयत्न केला आहे, योगदान दिले आहे ते अतुलनीय आहे, प्रशंसनीय आहे. या कार्यक्रमात जे काही विद्यार्थी उपस्थित आहेत, त्यांचे चेहरे मला पडद्यावर दिसत आहेत. दीड दोन वर्षात पहिल्यांदा एक वेगळीच चमक तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. बहुधा ही चमक शाळा उघडल्यामुळे आली असू शकेल. प्रदीर्घ काळानंतर शाळेत जाणे, मित्रमैत्रिणींना भेटणे, वर्गात अभ्यास करणे याचा आनंद काही वेगळाच असतो. पण उत्साहाबरोबरच कोरोना नियमांचे पालन देखील आपल्या सर्वांना अतिशय कठोरपणे करायचे आहे.
मित्रांनो,
आज शिक्षक पर्व च्या निमित्ताने अनेक नव्या योजनांचा प्रारंभ झाला आहे आणि आपण एका लहानशा ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून त्यांची माहिती घेतली. हे उपक्रम यासाठी देखील महत्त्वाचे आहेत कारण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण झाल्यावर भारत कसा असावा, यासाठी आज भारत नवे संकल्प करत आहे. आज ज्या योजना सुरू झाल्या आहेत त्या भविष्यातील भारताला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. आज विद्यांजलि-2.0, निष्ठा-3.0, टॉकिंग बुक्स आणि यूडीएल आधारित आयएसएल डिक्शनरी सारखे नवे प्रोग्राम आणि व्यवस्था सुरू करण्यात आल्या आहेत. स्कूल क्वालिटी ऍसेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क म्हणजे S.Q.A.A.F सारखी आधुनिक सुरुवात देखील झाली आहे. आपल्या शिक्षण प्रणालीला या केवळ जागतिक पातळीवर स्पर्धात्मकच बनवणार नाहीत तर आपल्या युवकांना भविष्यासाठी सज्ज करण्यामध्येही खूपच सहाय्य करतील, असा मला ठाम विश्वास आहे.
मित्रांनो,
कोरोनाच्या या काळात तुम्ही सर्वांनीच हे दाखवून दिले आहे की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये केवढे मोठे सामर्थ्य आहे. आव्हाने अनेक होती, पण तुम्ही सर्वांनी त्या आव्हानांना अतिशय त्वरेने तोंड दिले. ऑनलाईन क्लासेस, ग्रुप व्हिडिओ कॉल, ऑनलाईन प्रोजेक्ट्स, ऑनलाईन परीक्षा, पूर्वी असे शब्द अनेकांनी ऐकले देखील नव्हते. पण आपल्या शिक्षकांनी, पालकांनी अतिशय सहजतेने या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवल्या.
मित्रांनो,
आता वेळ आली आहे ती म्हणजे आपल्या या क्षमतांचा विकास करण्याची. या अतिशय कठीण कालखंडात आपण जे काही शिकलो आहोत, त्या गोष्टींना आता एक नवी दिशा दिली पाहिजे, आपल्या सुदैवाने आज एकीकडे देशात बदलांचे वातावरण आहे तर दुसरीकडे आधुनिक आणि भविष्याला अनुरुप असे राष्ट्रीय शिक्षण धोरण देखील आहे. म्हणूनच गेल्या काही काळात देश सातत्याने शिक्षण क्षेत्रामध्ये एकामागोमाग एक नवे निर्णय घेत आहे. एक परिवर्तन होताना दिसत आहे आणि यामागे जी सर्वात मोठी शक्ती आहे, त्याकडे मी तुम्हा सर्व विद्वानांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. ही मोहीम केवळ धोरणांवर आधारित नाही आहे तर सहभागावर देखील आधारित आहे. एनईपीच्या निर्मिती प्रक्रियेपासून अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शिक्षणतज्ञ, विशेषज्ञ, शिक्षक या सर्वांचेच योगदान राहिले आहे. तुम्ही सर्व यासाठी प्रशंसेला पात्र आहात. आता आपल्याला ही भागीदारी एक नव्या पातळीपर्यंत घेऊन जायची आहे, यामध्ये समाजाला देखील सहभागी करायचे आहे.
मित्रांनो,
आपल्याकडे असे म्हटले आहे,
“व्यये कृते वर्धते एव नित्यम् विद्याधनम् सर्वधन प्रधानम्”
अर्थात्,विद्या ही सर्व संपत्तींमधील सर्वात मोठी संपत्ती आहे कारण विद्या एक असे धन आहे जे दुसऱ्यांना दिल्यामुळे, दान केल्यामुळे वाढत जाते. विद्येचे दान, शिक्षण देणाऱ्याच्या जीवनात देखील खूप मोठे परिवर्तन घडवते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तुम्हा सर्व शिक्षकांनी याची अगदी अंतःकरणात जाणीव झाली असेल, एखाद्याला नवीन काही तरी शिकवताना जे सुख आणि समाधान मिळते ते काही तरी वेगळेच असते. 'विद्यांजलि 2.0’ याच प्राचीन परंपरेला आता एका नव्या रुपात बळकट करेल. देशाने 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' यासोबत 'सबका प्रयास'चा जो संकल्प केला आहे, 'विद्यांजलि 2.0' त्यासाठी सचेतन मंचाप्रमाणे ,वायब्रंट प्लॅटफॉर्मप्रमाणे आहे. यामध्ये आपल्या समाजाला, आपल्या खाजगी क्षेत्राला पुढे न्यायचे आहे आणि सरकारी शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी तुमचे योगदान द्यायचे आहे.
मित्रांनो,
अनादि काळापासून भारतात समाजाच्या सामूहिक शक्तीवर विश्वास दाखवण्यात आला आहे. अनेक वर्षे आपल्या सामाजिक परंपरेचा तो एक भाग राहिलेला आहे.
जेव्हा समाज एकत्रितपणे काही करतो तेव्हा त्याचे अपेक्षित परिणाम नक्कीच साध्य होतात आणि तुम्ही हे पाहिले असेल आणि गेल्या काही वर्षात लोकसहभाग आता भारताचे राष्ट्रीय वैशिष्ट्य बनू लागले आहे.
गेल्या 6-7 वर्षात लोकसहभागाच्या सामर्थ्यांने भारतात इतकी काही कामे झाली आहेत ज्याची कोणी कल्पना देखील करू शकणार नाही.
मग ती स्वच्छता चळवळ असो, गिव्ह इट अप च्या भावनेने प्रत्येक गरीबाच्या घरात गॅसचे कनेक्शन पोहोचवणे असो, गरीबांना डिजिटल व्यवहारांचे शिक्षण देणे असो, प्रत्येक क्षेत्रात भारताच्या प्रगतीने, लोकसहभागाने उर्जा प्राप्त केली आहे. आता याच मालिकेमध्ये ‘विद्यांजली 2.0’ एक सुवर्ण अध्याय बनू लागली आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी एक आवाहन आहे की त्यांनी 'विद्यांजलि' मध्ये सहभागी व्हावे, देशाच्या भविष्याला घडवण्यामध्ये आपली सक्रिय भूमिका बजावावी. दोन पावले पुढे यावे. तुम्ही एक इंजिनियर असू शकता, एक डॉक्टर असू शकता, एक संशोधक शास्त्रज्ञ असू शकता, तुम्ही एखाद्या ठिकाणी आयएएस अधिकारी बनून जिल्हाधिकारी म्हणून काम करत असाल तरी देखील एखाद्या शाळेत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना बरेच काही शिकवू शकता. तुमच्या माध्यमातून त्या मुलांना जे शिकायला मिळेल, त्यामुळे त्यांच्या स्वप्नांना एक नवी दिशा मिळू शकते. तुम्ही आणि आम्ही अशा कितीतरी लोकांना ओळखतो, जे असे काही तरी करत आहेत. कोणी तरी बँकेतील निवृत्त व्यवस्थापक आहेत, पण ते उत्तराखंडमधील दुर्गम डोंगराळ भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. कोणी तरी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे पण गरीब मुलांचे ऑनलाईन क्लास घेत आहे, त्यांच्यासाठी संसाधने उपलब्ध करून देत आहे. म्हणजेच तुम्ही समाजात कोणत्याही भूमिकेमध्ये असा, यशाच्या कोणत्याही पायरीवर असा, युवकांच्या भविष्य निर्मितीमध्ये तुमची देखील भूमिका आहे आणि भागीदारी देखील आहे. नुकत्याच संपलेल्या टोक्यो ऑलिंपिक आणि पॅरा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी केली. यामुळे आपल्या युवकांना किती मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळाली आहे. मी आपल्या खेळाडूंना अशी सूचना देखील केली आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक खेळाडूने कमीत कमी 75 शाळांना भेट द्यावी. त्या खेळाडूंनी माझी सूचना मान्य केली आहे आणि मी सर्व मान्यवर शिक्षकांना हे सांगेन, प्राचार्यवर्गाला सांगेन की तुम्ही तुमच्या भागातील या खेळाडूंशी संपर्क साधा. त्यांना आपल्या शाळांमध्ये आमंत्रित करा. त्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद घडवून द्या. यामुळे देखील आपल्या विद्यार्थ्यांना किती प्रेरणा मिळेल, किती प्रतिभावान विद्यार्थ्यांना खेळांमध्ये प्रगती करण्याचे बळ मिळेल.
मित्रांनो ,
आज आणखी एक महत्वपूर्ण सुरुवात S.Q.A.A.F अर्थात शालेय दर्जा मूल्यांकन आणि हमी आराखड्याच्या माध्यमातून होत आहे. आतापर्यन्त देशात आपल्या शाळांसाठी कुठलीही सामायिक वैज्ञानिक चौकट नव्हती. सामायिक चौकटीविना शिक्षणाचे सर्व पैलू उदा. -अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र , मूल्यांकन , पायाभूत सुविधा , सर्वसमावेशक पद्धती आणि प्रशासन पद्धती या सर्वांसाठी मानके ठरवणे कठीण होते. यामुळे देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणात असमानतेला सामोरे जावे लागत होते. मात्र S.Q.A.A.F आता ही तफावत दूर करण्याचे काम करेल. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की या चौकटीत आपल्या गरजेनुसार बदल करण्याची लवचिकता राज्यांना असेल. शाळा देखील याच्या आधारे स्वतःचे मूल्यांकन स्वतः करू शकतील. याच्या आधारे शाळांना एका परिवर्तनीय बदलासाठी प्रोत्साहित देखील केले जाऊ शकेल.
मित्रांनो,
शिक्षणातील असमानता संपवून ते आधुनिक बनवण्यासाठी राष्ट्रीय डिजिटल शैक्षणिक व्यवस्था म्हणजेच N-DEAR ची देखील मोठी भूमिका असणार आहे. जसे UPI इंटरफेसने बँकिंग क्षेत्रात क्रांती घडवून आणली, तसेच एन-डियर सर्व शैक्षणिक उपक्रमांमध्ये एक सर्वोच्च दुवा म्हणून काम करेल. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जायचे असेल किंवा उच्च शिक्षणासाठी प्रवेश, बहु प्रवेश -निर्गमन व्यवस्था असेल, किंवा शैक्षणिक क्रेडिट बैंक आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्याची नोंद, सगळे काही एन-डियरच्या माध्यमातून सहज उपलब्ध होईल. हे सर्व परिवर्तन आपल्या 'नव्या युगातील शिक्षणाचा ' चेहरा देखील बनेल आणि दर्जेदार शिक्षणातील भेदभाव देखील नाहीसा करेल.
मित्रांनो,
तुम्हाला माहित आहे की कुठल्याही देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे केवळ सर्वसमावेशक असता कामा नये तर न्याय्य देखील असायला हवे. म्हणूनच आज देश टॉकिंग बुक्स आणि ऑडिओ बुक्स सारख्या तंत्राला शिक्षणाचा भाग बनवत आहे. युनिव्हर्सल डिझाईन ऑफ लर्निंग म्हणजेच UDL वर आधारित 10 हजार शब्दांची भारतीय सांकेतिक भाषेतील डिक्शनरी देखील विकसित करण्यात आली आहे. आसामच्या बिहू पासून भरत नाट्यम पर्यंत, सांकेतिक भाषा आपल्याकडे गेली अनेक शतके कला आणि संस्कृतीचा भाग राहिली आहेत. आता देश प्रथमच सांकेतिक भाषेला एक भाषा म्हणून अभ्यासक्रमाचा भाग बनवत आहे जेणेकरून ज्या निष्पाप मुलांना याची विशेष गरज आहे, ते कुणाच्याही मागे राहणार नाहीत. हे तंत्र दिव्यांग युवकांसाठी देखील एका नव्या जगाची निर्मिती करेल. याचप्रमाणे, निपुण भारत अभियानमध्ये तीन वर्ष ते 8 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मूलभूत साक्षरता आणि सांख्यिक ओळख अभियान सुरु करण्यात आले आहे. 3 वर्षे वयापासूनच सर्व मुलांना पूर्व-प्राथमिक शिक्षण अनिवार्यपणे मिळेल या दिशेने आवश्यक पावले उचलली जातील. हे सर्व प्रयत्न आपल्याला खूप पुढे घेऊन जायचे आहेत, आणि यात तुम्हा सर्वांची विशेषतः आपल्या शिक्षक मित्रांची भूमिका खूप महत्वपूर्ण आहे.
मित्रांनो,
आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले आहे -
"दृष्टान्तो नैव दृष्ट: त्रि-भुवन जठरे, सद्गुरोः ज्ञान दातुः"
म्हणजेच संपूर्ण ब्रह्मांडात गुरुची कुठलीही उपमा नसते, कोणतीही बरोबरी नसते. जे काम गुरु करू शकतो ते कुणी करू शकत नाही. म्हणूनच आज देश आपल्या युवकांसाठी शिक्षणाशी संबंधित जे काही प्रयत्न करत आहे त्याचे नियंत्रण आपल्या या शिक्षक बंधू-भगिनींच्या हातात आहे. मात्र वेगाने बदलणाऱ्या या युगात आपल्या शिक्षकांना देखील नवी व्यवस्था आणि तंत्राच्या बाबतीत वेगाने शिकावे लागते. 'निष्ठा' प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे या प्रशिक्षण कार्यक्रमाची झलक आता तुमच्यासमोर सादर करण्यात आली. या निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे देश आपल्या शिक्षकांना या बदलांसाठीच तयार करत आहे. निष्ठा 3.0' आता या दिशेनं एक पुढचे पाऊल आहे आणि मला हे खूप महत्वपूर्ण पाऊल वाटते. आपले शिक्षक जेव्हा क्षमता आधारित अध्यापन, कलेचे एकात्मीकरण, उच्च स्तरीय आणि सर्जनशील आणि महत्वपूर्ण सखोल विचार करण्याच्या नव्या पद्धतींशी परिचित होतील, तेव्हा ते भविष्यासाठी युवकांना अधिक सहजतेने घडवू शकतील.
मित्रांनो,
कुठल्याही जागतिक निकषांसाठी पात्र ठरण्याची क्षमता भारतीय शिक्षकांमध्ये आहेच , त्याचबरोबर त्यांच्याकडे स्वतःची विशेष ओळख देखील आहे. त्यांची ही विशेष ओळख, ही विशेष ताकद आहे त्यांच्यामधील भारतीय संस्कार . आणि मला तुम्हाला माझे दोन अनुभव सांगायचे आहेत. पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदाच जेव्हा मी भूतानला गेलो तेव्हा तिथला राज परिवार असेल, तिथल्या शासकीय व्यवस्थेचे लोक असतील, अतिशय अभिमानाने सांगत होते की पूर्वी आमच्याकडे बहुतांश सर्व शिक्षक भारतातून यायचे आणि इथल्या सुदूर परिसरात पायी जाऊन शिकवायचे. आणि जेव्हा ते शिक्षकांबद्दल बोलायचे, भूतानचे राजेशाही कुटुंब असेल किंवा तेथील शासक, यांना अभिमान वाटायचा , त्यांच्या डोळ्यांमध्ये चमक दिसायची. तसेच जेव्हा मी सौदी अरेबियाच्या राजांशी बोलत होतो , तेव्हा ते इतक्या अभिमानाने मला सांगत होते की मला भारतातील शिक्षकांनी शिकवले आहे. माझे शिक्षक भारतीय होते . आता बघा, कुठलीही व्यक्ती कुठेही पोहचली तरी शिक्षकांप्रति त्यांच्या मनात काय भावना असते.
मित्रांनो,
आपले शिक्षक आपल्या कामाला केवळ एक पेशा मानत नाहीत, त्यांच्यासाठी शिकवणे ही एक मानवी संवेदनशीलता आहे , एक पवित्र आणि नैतिक कर्तव्य आहे. म्हणूनच आपल्याकडे शिक्षक आणि मुलांमध्ये व्यावसायिक नाते नसते तर एक कौटुंबिक नाते असते.आणि हे नाते , हे संबंध आयुष्यभराचे असतात. म्हणूनच, भारतातले शिक्षक जगात जिथे कुठे जातात , आपला एक वेगळा ठसा सोडून जातात. या कारणामुळे आज भारताच्या युवकांसाठी जगात अपार संधी आहेत. आपल्याला आधुनिक शिक्षण परिसंस्थेनुसार स्वतःला तयार करायचे आहे आणि या शक्यतांना संधींमध्ये बदलायचे आहे. यासाठी आपल्याला नियमितपणे संशोधन करत रहावे लागेल. आपल्याला शिकवणे-शिकणे प्रक्रियेला नियमितपणे नव्याने परिभाषित आणि पुनर्रचना करावी लागेल. जी जिद्द तुम्ही आतापर्यन्त दाखवली आहे, ती आता आपल्याला अधिक वरच्या पातळीवर न्यावी लागेल. आणि उत्साह वाढवावा लागेल. मला सांगण्यात आले आहे की शिक्षक पर्व निमित्त तुम्ही आजपासून 17 सप्टेंबर पर्यंत विविध विषयांवर कार्यशाळा, चर्चासत्र आयोजित करत आहात. 17 सप्टेंबर हा दिवस आपल्या देशात विश्वकर्मा जयंती म्हणून साजरा केला जातो, हे विश्वकर्मा स्वतः निर्माता आहे, सृजनकर्ते आहेत .हा खरोखरच एक स्तुत्य उपक्रम आहे. देशभरातील एवढे शिक्षक, तज्ञ आणि धोरणकर्ते , जेव्हा एकाचवेळी मंथन करतील तेव्हा यातून आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात या अमृताचे महत्व खूप अधिक आहे. तुमच्या या सामूहिक मंथनातून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात खूप मदत होईल. माझी इच्छा आहे की अशाच प्रकारे तुम्ही सर्वांनी आपापल्या शहरांमध्ये, गावांमध्येही स्थानिक पातळीवर प्रयत्न करावेत. मला विश्वास आहे की या दिशेने 'सर्वांच्या प्रयत्नांतून' देशाच्या संकल्पाना नवी गती मिळेल. अमृत महोत्सव काळात देशाने जी उद्दिष्टे ठरवली आहेत, ती आपण सर्व मिळून साध्य करू. याच शुभेच्छांसह तुम्हा सर्वांना खूप-खूप धन्यवाद आणि खूप-खूप शुभेच्छा..