पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री भगवंत मान, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ.जितेंद्र सिंह, संसदेतील माझे सहकारी मनीष तिवारी, सर्व डॉक्टर्स, संशोधक, निम-वैद्यकीय विभागातील कर्मचारी, इतर कर्मचारी तसेच पंजाबच्या कानाकोपऱ्यातून येथे आलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो!
स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देश नव्या उद्दिष्टांची पूर्ती करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. आजचा हा कार्यक्रम देखील देशात अधिक दर्जेदार होत गेलेल्या आरोग्य सुविधांचे प्रतिबिंबित रूप आहे. होमी भाभा कर्करोग रुग्णालय तसेच संशोधन केंद्रामुळे पंजाब आणि हरियाणामधील जनतेबरोबरच, हिमाचल प्रदेशातील लोकांनाही फायदा होणार आहे. मी आणखी एका कारणाने या भूमीचे आभार मानू इच्छितो. पंजाब ही स्वातंत्र्य सैनिकांची, क्रांतीवीरांची आणि देशभक्तीने भारलेली पवित्र भूमी आहे. आणि ही प्राचीन परंपरा पंजाबातील जनतेने ‘हर घर तिरंगा’ अभियानादरम्यान देखील सुरु ठेवली आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी केल्याबद्दल आज मी पंजाबातील लोकांचे, विशेषतः येथील युवा वर्गाचे मनापासून आभार मानतो.
मित्रांनो,
इतक्यातच, काही दिवसांपूर्वी लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाच्या वेळी आपण सर्वांनी आपल्या देशाला विकसित भारत म्हणून घडविण्याचा निर्धार केला आहे. विकसित भारताची उभारणी करण्यासाठी देशातील आरोग्य सेवा विकसित होणे तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा देशातील लोकांना उपचारासाठी आधुनिक रुग्णालये उपलब्ध होतील, आरोग्य विषयक आधुनिक पद्धतीच्या सुविधा त्यांना मिळतील तेव्हा ते लवकर तंदुरुस्त होतील, त्यांची शक्ती योग्य दिशेला वळवली जाईल आणि ती अधिक उत्पादनक्षम असेल. आज देखील होमी भाभा कर्करोग रुग्णालय तसेच संशोधन केंद्राच्या रुपात देशाला एक अत्याधुनिक रुग्णालय मिळाले आहे. या आधुनिक सोयीच्या उभारणीत टाटा मेमोरियल सेंटरने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. फार पूर्वीपासून हे केंद्र देशविदेशातील रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करुन देऊन कर्करोग ग्रस्त रुग्णांचा जीव वाचवत आहे. देशात कर्करोगावरील उपचारासाठी आधुनिक सुविधांची उभारणी करण्यात भारत सरकारने आघाडीची भूमिका घेतली आहे. मला अशी माहिती देण्यात आली आहे की टाटा मेमोरियल केंद्रात आता दर वर्षी दीड लाख नव्या कर्करोग ग्रस्तांवर उपचार होऊ शकतील अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे. कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही फार दिलासादायक गोष्ट आहे. मला आठवतंय की, हिमाचल प्रदेशातील दूरदूरच्या, दुर्गम भागातून कर्करोगासह अनेक गंभीर आजारांवरील उपचारासाठी लोकांना चंदीगड येथील पीजीआय संस्थेत यावे लागत असे. या संस्थेत रुग्णांची फार गर्दी असल्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना, त्यांच्या कुटुंबियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. आता हिमाचल प्रदेशात विलासपूर येथे एम्स रुग्णालय उभारण्यात आले आहे आणि आज येथे कर्करोगावरील उपचारासाठी इतक्या भव्य प्रमाणात सोय झाली आहे. ज्या रुग्णांना विलासपूर जवळ असेल ते उपचारासाठी तिथे जातील आणि जे रुग्ण मोहाली जवळ स्थायिक असतील ते या रुग्णालयात येतील.
मित्रांनो,
आपल्या देशाच्या आरोग्यव्यवस्थेमध्ये गरीबातील गरीब व्यक्तीच्या उपचारासाठी लाभदायक ठरेल अशी यंत्रणा उभारली जाणे ही फार पूर्वीपासून देशाची गरज होती. देशात एक अशी व्यवस्था असावी जिचा फायदा गरिबांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी होईल, जी गरिबांना आजारांपासून सुटका करून देईल, आजार झाल्यास त्यावर उत्तम उपचाराची सोय करून देईल ही मागणी बराच काळ प्रलंबित होती. उत्तम आरोग्यसुविधांची तरतूद करणे म्हणजे केवळ चार भिंतींची उभारणी करणे नव्हे. एखाद्या देशातील आरोग्य व्यवस्था संपूर्णपणे समाधानकारक सेवा देत असेल, पावलापावलावर जनतेच्या मदतीला धावून येत असेल तेव्हाच तिला सशक्त आरोग्य सुविधा असे म्हणता येईल. म्हणूनच गेल्या आठ वर्षांत देशातील समग्र आरोग्य सुविधा क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. भारताच्या आरोग्य क्षेत्रात जितके कार्य गेल्या साताठ वर्षात झाले तितके गेल्या 70 वर्षांच्या काळात देखील होऊ शकले नव्हते. आज देशातील गरीबात गरीब व्यक्तीला आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी देश केवळ एक दोन नव्हे तर सहा आघाड्यांवर एकाच वेळी काम करून देशातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणत आहे. पहिली आघाडी आहे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांना प्रोत्साहन, दुसरी आघाडी आहे गावागावांमध्ये लहान-लहान पण आधुनिक रुग्णालयांची उभारणी करणे. तिसरी आघाडी आहे शहरांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये तसेच वैद्यकीय संशोधन करणाऱ्या मोठ्या संस्थांची उभारणी तर चौथी आघाडी आहे ती म्हणजे जनतेच्या सेवेसाठी देशभरात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स तसेच निम-वैद्यकीय कर्मचारी यांची संख्या वाढविणे.
पाचवी आघाडी आहे- रूग्णांना परवडणा-या दरामध्ये औषधे, स्वस्त दरामध्ये उपकरणे उपलब्ध करून देणे. आणि सहावी आघाडी आहे -तंत्रज्ञानाचा उपयोग करून रूग्णांच्या अडचणी कमी करणे. या सहा आघाड्यांवर केंद्र सरकार आज विक्रमी गुंतवणूक करीत आहे. गुंतवणूक करत आहे त्याबरोबरच हजारों कोटी रूपये खर्चही करत आहे.
मित्रांनो,
आपल्याकडे नेहमीच असे सांगितले जाते की, रोगापासून बचाव करणे, हाच सर्वात चांगला उपचार आहे. हाच विचार घेवून देशामध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. अलिकडेच काही दिवसांपूर्वीच एक अहवाल आला आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, जल जीवन मिशनमुळे दुषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांमध्ये खूप घट झाली आहे. याचा अर्थ आपण बचावासाठी काम केले की त्यामुळे आजार येण्याची संख्या कमी होत आहे. असा काही विचार करून आधीची सरकारे कामच करीत नव्हते. मात्र आज आमच्या सरकारने अनेक मोहिमा राबवून, जन जागरूकता घडवून, अभियान चालवून लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे आणि आजारी होण्यापासून लोकांना वाचवतही आहे. योग आणि आयुष यांच्याविषयी आज देशामध्ये अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. जगामध्ये योगविषयी आकर्षण वाढत आहे. ‘फिट इंडिया’ अभियान देशातल्या युवकांमध्ये लोकप्रिय होत आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे अनेक आजारांना पायबंद घालण्यासाठी मदत मिळत आहे. पोषण अभियान आणि जल जीवन मिशन यामुळे कुपोषणाला नियंत्रित करण्यासाठी मदत मिळत आहे. आपल्या माता-भगिनींना एलपीजी जोडणीची सुविधा देवून आम्ही त्यांची धूरापासून होणा-या आजारातून मुक्त केले आहे. धूरामुळे होणा-या कर्करोगासारख्या संकटातूनही वाचवले आहे.
मित्रांनो,
आपल्या गावांमध्ये जितकी रूग्णालये असतील, तपासणीच्या जितक्या सुविधा असतील, त्यामुळे तितक्याच लवकर रोग झाल्याची माहिती मिळू शकणार आहे. आमच्या सरकारने, या दुस-या आघाडीवरही देशभरामध्ये अतिशय वेगाने काम सुरू केले आहे. आमचे सरकार गावांगावांमध्ये आधुनिक आरोग्य सुविधांबरोबर सर्वांना जोडण्यासाठी दीड लाखांपेक्षा जास्त आरोग्य आणि निरामय केंद्रे बनवत आहे. मला आनंद वाटतो की, यापैकी जवळपास सव्वा लाख आरोग्य आणि निरामय केंद्रांचे कामही सुरू झाले आहे. इथे पंजाबमध्येही जवळपास तीन हजार आरोग्य आणि निरामय केंद्रे सेवा देत आहेत. देशभरामध्ये या आरोग्य आणि निरामय केंद्रामध्ये आत्तापर्यंत जवळपास 22 कोटी लोकांची कर्करोगाशी संबंधित तपासणी करण्यात आली आहे. यापैकी जवळपास 60 लाख तपासण्या या माझ्या पंजाबमध्ये झाल्या आहेत. यामध्ये ज्यांना कर्करोग झाला आहे, आणि तो पहिल्या टप्प्यातला आहे, हे लक्षात आले आहे, त्यांना गंभीर संकटापासून वाचविणे शक्य झाले आहे.
मित्रांनो,
एकदा जर आजाराची माहिती समजली तर अशा रूग्णालयांची गरज असते की, ज्याठिकाणी या गंभीर आजारांवर अगदी चांगल्या प्रकारे उपचार होवू शकतील. असाच विचार करून केंद्र सरकारने देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे लक्ष्य निश्चित करून काम सुरू केले आहे. आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा मिशनअंतर्गत जिल्हा स्तरावर आधुनिक आरोग्य सुविधा तयार करण्यासाठी 64 हजार कोटी रूपये खर्च केले जात आहेत. एके काळी देशामध्ये फक्त सात एम्स होते. आज एम्सची संख्या वाढून 21 झाली आहे. येथे पंजाबातल्यसा भठिंडामध्येही एम्स उत्तम सुविधा देत आहे. जर मी कर्करोग रूग्णालयाविषयी बोलूया असे म्हटले तर देशाच्या प्रत्येक कानाकोप-यामध्ये कर्करोगाशी संबंधित औषधोपचार करण्यासाठी आधुनिक सुविधा सज्ज केल्या जात आहेत. पंजाबमध्ये हे इतके मोठे केंद्र बनले आहे. हरियाणातल्या झज्जरमध्ये ही राष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था स्थापन केली आहे. राष्ट्रीय कर्करोग संस्थेची आणखी एका परिसरातही स्थापना करण्यात आली आहे. पूर्व भारताच्या दिशेने गेले तर वाराणसी आता कर्करोगाच्या उपचाराचे केंद्रस्थान बनत आहे. कोलकातामध्ये राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या दुस-या परिसराचे काम सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच आसाममधल्या दिब्रुगढ येथे मला एकाच वेळी सात नवीन कर्करोग रूग्णालयांचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली होती. आमच्या सरकारने देशभरामध्ये कर्करोगाशी संबंधित जवळपास 40 विशेष संस्थांना मंजुरी दिली आहे. यापैकी अनेक रूग्णालयांनी सेवा देण्यास प्रारंभही केला आहे.
मित्रांनो,
रूग्णालय बनविणे जितके आवश्यक आहे, तितकेच आवश्यक आहे, तिथे पुरेशा संख्येने चांगले डॉक्टर्स उपलब्ध असणे. तसेच इतर निमवैद्यकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठीही आज देशामध्ये मिशन मोडवर काम केले जात आहे. 2014 च्या पूर्वी देशामध्ये 400 पेक्षाही कमी वैद्यकीय महाविद्यालये होती. याचा अर्थ 70 वर्षांमध्ये 400 पेक्षाही कमी वैद्यकीय महाविद्यालये. तेच आता गेल्या 8 वर्षांमध्ये 200 पेक्षा जास्त नवीन वैद्यकीय महाविद्यालये देशात बनविण्यात आली आहेत. वैद्यकीय महाविद्यालयायंचा विस्तार याचा अर्थ आहे की, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जागांची संख्या वाढणे.
वैद्यकीय महाविद्यालयांचा विस्तार म्हणजे वैद्यकीय जागांची संख्या वाढली आहे . वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी वाढल्या आहेत. आणि देशाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. म्हणजेच आरोग्य क्षेत्रातही रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. आमच्या सरकारने 5 लाखाहून अधिक आयुष डॉक्टरांना देखील ऍलोपॅथिक डॉक्टरांप्रमाणे मान्यता दिली आहे. यामुळे भारतात डॉक्टर आणि रुग्णांमधील गुणोत्तरात देखील सुधारणा झाली आहे.
मित्रांनो,
इथे बसलेले आपण सगळे अगदी सामान्य कुटुंबातील आहोत. आपण सर्वांनी अनुभवले आहे की गरीबांच्या घरात जेव्हा आजारपण यायचे , तेव्हा घर जमीन विकली जायची. असा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. म्हणूनच आमच्या सरकारने रुग्णांना स्वस्त औषधे, स्वस्त उपचार उपलब्ध करून देण्यावर देखील तेवढाच भर दिला आहे. आयुष्मान भारतने गरीबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा दिली आहे. या अंतर्गत आतापर्यंत साडेतीन कोटी रुग्णांवर उपचार झाले असून त्यांना एक रुपयाही खर्च करावा लागला नाही. आणि त्यात अनेक कर्करोगाचे रुग्णही आहेत. आयुष्मान भारत ही योजना नसती तर गरीबांना स्वतःच्या खिशातून 40 हजार कोटी रुपये खर्च करावे लागले असते. ते 40 हजार कोटी रुपये तुमच्यासारख्या कुटुंबांचे वाचले आहेत. एवढेच नाही तर पंजाबसह देशभरात जनऔषधी केंद्रांचे जे जाळे आहे, जी अमृत दुकाने आहेत, तिथेही कर्करोगावरील औषधे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत. 500 पेक्षा जास्त कर्करोगावरील औषधे, जी पूर्वी खूप महाग होती, त्यांच्या किमती जवळपास 90 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. म्हणजेच जे औषध 100 रुपयात मिळायचे, ते औषध जनऔषधी केंद्रात 10 रुपयांना उपलब्ध करून दिले जाते. यातूनही रुग्णांची दरवर्षी सरासरी 1 हजार कोटी रुपयांची बचत होत आहे. देशभरातील सुमारे 9000 जनऔषधी केंद्रांवर परवडणारी औषधे गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या समस्या दूर करण्यात मदत करत आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
आधुनिक तंत्रज्ञानाने सरकारच्या सर्वांगीण आरोग्य सेवा अभियानाला नवा आयाम दिला आहे. आरोग्य क्षेत्रात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचाही समावेश करण्यात येत आहे. आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य अभियान हे सुनिश्चित करत आहे की प्रत्येक रुग्णाला कमीत कमी त्रासासह वेळेवर दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील. टेलिमेडिसिन, टेलिकन्सल्टेशनच्या सुविधेमुळे आज दुर्गम खेड्यातील व्यक्तीही शहरांतील डॉक्टरांकडून प्राथमिक सल्ला घेऊ शकत आहेत. ई-संजीवनी ऍपवरूनही आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. आता तर देशात मेड इन इंडिया 5जी सेवा सुरू होत आहे. यामुळे दुर्गम आरोग्य सेवा क्षेत्रात क्रांतीकारक परिवर्तन तेव्हा गावातील गरीब कुटुंबांमधील रुग्णांना मोठ्या रुग्णालयांमध्ये पुन्हा पुन्हा जावे लागणे देखील कमी होईल.
मित्रांनो,
कर्करोगातून पूर्ण बरे झालेल्या देशातील प्रत्येक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो. तुमच्या वेदना , दुःख मी समजू शकतो. मात्र कर्करोगाला न घाबरता त्याविरुद्ध लढण्याची गरज आहे. तो बरा होऊ शकतो. कर्करोगाविरुद्धची लढाई जिंकून आनंदाने आयुष्य जगणाऱ्या अनेक लोकांना मी ओळखतो. या लढ्यात तुम्हाला जी काही मदत हवी आहे, ती आज केंद्र सरकार उपलब्ध करून देत आहे. या रुग्णालयाशी संबंधित तुम्हा सर्व सहकाऱ्यांना मी आवाहन करतो की कर्करोगामुळे जे नैराश्य येते, त्याविरुद्ध लढण्यासाठी आपण रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही मदत करायला हवी. एक प्रगतीशील समाज म्हणून मानसिक आरोग्याबाबतच्या आपल्या दृष्टिकोनात बदल आणि मोकळेपणा आणणे ही आपली देखील जबाबदारी आहे. तेव्हाच या समस्येवर योग्य तोडगा निघेल. आरोग्य सेवेशी निगडित माझ्या सहकाऱ्यांना मी असेही सांगेन की तुम्ही जेव्हा गावोगावी शिबिरे आयोजित करता, तेव्हा या समस्येवरही लक्ष केंद्रित करा. सर्वांच्या प्रयत्नाने आपण कर्करोगाविरुद्ध देशाचा लढा अधिक बळकट करू, याच विश्वासाने पंजाब आणि हिमाचलच्या जनतेला ही बहुमोल भेट तुमच्या चरणी अर्पण करताना मला समाधान वाटत आहे , अभिमान वाटत आहे . तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद !