आपणा सर्वाना नमस्कार.
100 वर्षांपूर्वी पूज्य बापूंनी हिंदुस्तान टाईम्सचे उद्घाटन केले होते ... ते गुजराती भाषक होते आणि 100 वर्षांनतर दुसऱ्या गुजराती व्यक्तीला आपण बोलावले आहे. या ऐतिहासिक प्रवासासाठी हिंदुस्तान टाईम्स आणि 100 वर्षांच्या या प्रवासात जे-जे लोक सहभागी आहेत, ज्यांनी-ज्यांनी संघर्ष केला, संकटे झेलत टिकून राहिले .. ते सर्व अभिनंदनाला पात्र आहेत. 100 वर्षांचा प्रवास फार प्रदीर्घ असतो.यासाठी आपण सर्व अभिनंदनाला पात्र आहात, भविष्यासाठीही माझ्याकडून आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. आता मी आलो तेव्हा या कुटुंबातल्या लोकांना भेटता तर आलेच त्याचबरोबर 100 वर्षांचा हा प्रवास दर्शवणारे एक उत्तम प्रदर्शनही पाहण्याची संधी मला मिळाली. आपल्याकडे थोडा वेळ असेल तर या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या असे मी आपल्याला सुचवेन. हे केवळ एक प्रदर्शन नव्हे तर हा एक अनुभव आहे. 100 वर्षांचा इतिहासच आपण पाहतो आहोत असे वाटले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचे आणि संविधान लागू झाले त्या दिवसाचे वृत्तपत्र मी पाहिले. एकाहून एक थोर, दिग्गजांचे लेख हिंदुस्तान टाईम्समध्ये असत.मार्टिन ल्युथर किंग,नेताजी सुभाष बाबू,डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर एम एस स्वामिनाथन. या सर्वांच्या लेखांनी आपल्या वर्तमानपत्राची कीर्ती वृद्धिंगत केली.खरोखरच एक प्रदीर्घ प्रवास करून आपण इथे पोहोचलो आहोत. स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या आशा- आकांक्षांच्या हिंदोळ्यावरून आपण आगेकूच केली आहे. हा प्रवास अभूतपूर्व आणि अद्भुतही आहे. ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर प्रत्येक देशवासीयाचा त्यावेळचा उत्साह मला आपल्या वृत्तपत्राच्या बातमीतून जाणवला.त्याचवेळी ठाम निर्णयाअभावी 7 दशकांपर्यंत काश्मीर हिंसाचारात कसे होरपळत राहिले हेसुद्धा जाणवले. आज आपल्या वर्तमानपत्रात जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या विक्रमी मतदानाच्या बातम्या छापल्या जातात हा विरोधाभास आहे. एका आणखी दिवसाचे वर्तमानपत्र,प्रत्येकाचे तिथे लक्ष जाईल. त्यामध्ये एकीकडे आसामला अशांत क्षेत्र म्हणून जाहीर केल्याची बातमी होती तर दुसरीकडे अटल जी यांच्याकडून भाजपचा पाया घातल्याची बातमी होती.आज आसाममध्ये स्थायी शांतता स्थापन करण्यामध्ये भाजपा मोठी भूमिका बजावत आहे हा किती सुखद योगायोग आहे.कालच बोडो भागातल्या लोकांसमवेत एका शानदार कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि दिल्लीमधल्या माध्यमांनी या मोठ्या घटनेकडे दुर्लक्ष केले याचे मला आश्चर्य वाटते.5 दशकांनंतर बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुल यांचा त्याग करत, हिंसेचा मार्ग नाकारून दिल्लीच्या हृदयस्थानी बोडोचे युवक सांस्कृतिक उत्सव साजरा करत आहेत ही इतिहासातली मोठी घटना आहे याचा त्यांना अंदाज नाही. मी काळ तिथे होतो. मनापासून मला ते जाणवत होते. बोडो शांतता करारामुळे या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. प्रदर्शनादरम्यान मुंबईवरच्या 26/11 च्या हल्ल्यावरच्या वृत्तांकडे माझे लक्ष गेले.शेजारी देशाच्या दहशतवादी कारवायांमुळे आपली जनता स्वतःच्याच घरात आणि शहरात असुरक्षित होती असा तो काळ होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, आता ते दहशतवादीच त्यांच्या घरात सुरक्षित नाहीत.
मित्रहो,
हिंदुस्तान टाईम्सने आपल्या 100 वर्षांच्या कालखंडात गुलामीची 25 वर्षे तर स्वातंत्र्याची 75 वर्षे पाहिली आहेत. या 100 वर्षात भारताचे भाग्य घडवले आहे, भारताला मार्ग दाखवला आहे ती शक्ती म्हणजे भारताच्या सामान्य जनतेचा विवेक, भारताच्या सामान्य जनतेचे सामर्थ्य. भारताच्या सर्वसामान्य नागरिकांचे हे सामर्थ्य ओळखण्यात मोठ-मोठे जाणकारही चुकले. इंग्रज जेव्हा देश सोडून निघाले तेव्हा हा देश छिन्नविछिन्न होईल,या देशाला काही भविष्य उरणार नाही असे म्हटले जात होते. जेव्हा आणीबाणी लादली गेली तेव्हा काही लोकांनी मानले की आता तर आणीबाणी कायमचीच राहणार, आता लोकशाही गेली.काही लोकांनी, काही संस्थांनी आणीबाणी लादणाऱ्यांचाच आश्रय घेतला होता. मात्र तेव्हाही भारताचा नागरिक ठाम उभा राहिला आणि आणीबाणी झुगारण्यासाठी जास्त काळ लागला नव्हता. कोरोनाचा खडतर काळ आठवा, तेव्हा भारत एक मोठे ओझे ठरेल असे संपूर्ण जगाला वाटत होते.मात्र भारताच्या जनतेने कोरोनाविरोधात एक मजबूत लढा दिला.
मित्रहो,
90 च्या दशकातला तो काळही आपल्याला स्मरत असेल जेव्हा भारतात 10 वर्षात 5 निवडणुका झाल्या होत्या. इतक्या विशाल देशात 10 वर्षात 5 निवडणुका, किती अस्थिरता होती.जाणकार, वर्तमानपत्रात लिखाण करणारे, या सर्वांनी, आता हिंदुस्तानमध्ये अशीच परिस्थिती राहणार, भारताला असेच चालवून घ्यावे लागणार असा अंदाज वर्तवला होता. मात्र भारताच्या नागरिकांनी पुन्हा एकदा जाणकारांचा अंदाज चुकीचा ठरवला.आज जगभरात चहू बाजूला अनिश्चितता,अस्थैर्य याचीच चर्चा आहे आणि आणि ते दिसतही आहे. जगातले अनेक देश असे आहेत जिथे प्रत्येक निवडणुकीत सरकारे बदलत आहेत, भारताच्या जनतेने मात्र आमच्या सरकारला तिसऱ्यांदा निवडून दिले आहे.
मित्रहो,
आपल्यापैकी अनेकांनी दीर्घ काळ भारतामधले राजकारण आणि धोरण याचा मागोवा घेतला आहे. पूर्वी आपण हे अनेकदा ऐकत असू की ‘गुड इकॉनॉमीक्स इज बॅड पॉलिटीक्स’. तज्ञ मानले जाणारे लोक हे अतिशय मानत असत. यामुळे याआधीच्या सरकारांना काहीच न करण्यासाठी एक कारण मिळत असे. एक प्रकारे प्रशासनातली ढिलाई लपवण्यासाठी हे एक माध्यम बनले होते.केवळ पुढची निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने पूर्वीची सरकारे चालवली जायची. निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने व्होट बँक बनवली जायची आणि या वर्गाला संतुष्ट करण्यासाठी योजना आखल्या जायच्या. अशा प्रकारच्या राजकारणाने देशाचे मोठे नुकसान झाले की देशामध्ये असमानता मोठ्या प्रमाणात वाढू लागली.विकास मंडळाची पाटी केवळ नावापुरती लागली प्रत्यक्षात काही दिसत नव्हते. असंतुलित व्यवस्थेच्या या प्रारुपाने जनतेचा सरकारवरचा विश्वास उडाला होता. हा विश्वास आम्ही पुन्हा निर्माण केला आहे. आम्ही सरकारचा उद्देश निश्चित केला आहे. मतांसाठी हे राजकारण आहे ना त्यापासून आम्ही कोसो मैल लांब आहोत. आमच्या सरकारचे लक्ष्य विराट आहे, व्यापक आहे.आम्ही, जनतेची प्रगती, ... जनतेद्वारे प्रगती... जनतेसाठी प्रगती हा मंत्र घेऊन वाटचाल करत आहोत. नव भारत घडवण्याचे, विकसित भारत घडवण्याचे आमचे लक्ष्य आहे आणि हे विशाल लक्ष्य घेऊन आम्ही वाटचाल सुरु केली तेव्हा भारताच्या जनतेने आपला विश्वास आमच्याकडे सुपूर्द केला आहे.आपण कल्पना करू शकता, सोशल मिडियाच्या या काळात दिशाभूल करणारी माहिती, अपप्रचार चहुबाजूला बोकाळला आहे.
एवढी अनेक वृत्तपत्रे आहेत , अनेक दूरचित्र वाहिन्या आहेत, अशा काळातही भारतातील नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे, आपल्या सरकारवर विश्वास आहे.
मित्रांनो,
जेव्हा जनतेचा विश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढतो तेव्हा देशाच्या विकासावर वेगळाच परिणाम दिसून येतो. तुम्हाला माहित आहे की, जुन्या विकसित संस्कृतीं पासून ते आजच्या विकसित देशांपर्यंत एक गोष्ट नेहमीच सामाईक…सारखी..समान राहिली आहे, ती समान बाब म्हणजे जोखीम पत्करण्याची प्रवृत्ती. एक काळ असा होता जेव्हा आपला देश संपूर्ण जगाच्या व्यापार - उदीमाचा आणि संस्कृतीचा केंद्रबिंदू होता. एकीकडे आपले व्यापारी आणि विक्रेते आग्नेय आशियामध्ये काम करत होते, तर दुसरीकडे त्यांचे अरबस्तान, आफ्रिका आणि रोमन साम्राज्याशीही घट्ट संबंध होते. त्या काळातील लोकांनी जोखीम पत्करली आणि म्हणूनच भारताची उत्पादने आणि सेवा, समुद्राच्या पलीकडे पोहोचू शकल्या. स्वातंत्र्यानंतर ही जोखीम पत्करण्याची प्रवृत्ती आपल्याला आणखी पुढे न्यायची होती. पण स्वातंत्र्योत्तर काळातील सरकारांनी तत्कालीन नागरिकांना ते प्रोत्साहनच दिले नाही, त्याचा परिणाम असा झाला की अनेक पिढ्या एक पाऊल पुढे टाकण्यात आणि दोन पावले मागे जाण्यातच वाया गेल्या. आता, गेल्या 10 वर्षात देशात झालेल्या बदलांमुळे भारतीय नागरिकांच्या जोखीम पत्करण्याच्या प्रवृत्तीमध्ये पुन्हा नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. आज आपला युवावर्ग, प्रत्येक क्षेत्रात जोखीम पत्करणारे म्हणून उदयास येत आहेत. एकेकाळी कंपनी सुरू करणे धोक्याचे मानले जात असे, 10 वर्षांपूर्वीपर्यंत आपण कोणत्याही स्टार्टअपचे नाव ऐकले नव्हते… आज देशातील नोंदणीकृत स्टार्टअप- नवउद्योगांची संख्या 1.25 लाखांहून अधिक झाली आहे. एक काळ असा होता की खेळात आणि खेळाला व्यवसाय म्हणून स्वीकारण्यात जोखीम असायची, मात्र आज आपल्या छोट्या शहरातील तरुणही ही जोखीम पत्करून देशाचं नाव जगात उंचावत आहेत. तुम्ही बचतगटांशी संबंधित महिलांचेही उदाहरण घेऊ शकता, आज देशात सुमारे एक कोटी लाखपती दीदी तयार झाल्या आहेत. प्रत्येक गावात उद्योजक बनून त्या स्वतःचे काही व्यवसाय चालवत आहेत. काही दिवसांपूर्वी मला एका ग्रामीण महिलेशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्या महिलेने मला सांगितले की तिने कसा…... ट्रॅक्टर खरेदी केला आणि तिच्या कमाईने संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न वाढवले. एका महिलेने एक जोखीम पत्करून तिच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्यच बदलून टाकले. जेव्हा देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोक जोखीम पत्करायला लागतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने बदल दिसून यायला लागतो. आज भारतात हेच घडताना दिसत आहे.
मित्रांनो,
आज भारतीय समाज अभूतपूर्व अशा महत्वाकांक्षांनी भारलेला आहे. या महत्वाकांक्षांना आम्ही आमच्या धोरणांचा मुख्य आधार बनवला आहे. आमच्या सरकारने देशवासीयांना एक अतिशय अनोखी जोड भेट दिली आहे... ही जोड, गुंतवणूक ते रोजगार, विकास ते प्रतिष्ठा अशी आहे. आम्ही विकासाच्या अशा नमुन्याचा पाठपुरावा करत आहोत जिथे गुंतवणूक असेल, गुंतवणुकीमुळे रोजगार निर्माण होईल, विकास होईल आणि तो विकास भारतातील नागरिकांची प्रतिष्ठा वाढवेल आणि प्रतिष्ठा पक्की करेल. आता जसे देशात शौचालय उभारण्याचे उदाहरण समोर आहे. मी छोट्या-छोट्या गोष्टी का सांगतोय…. कारण कधी-कधी आपल्याला वाटतं की त्यांना काही किंमत नाही…पण त्यांचं सामर्थ्य किती मोठं आहे हे मी सोदाहरण सांगू इच्छितो. आपल्या देशात, आम्ही शौचालये बांधण्याचा वसा हाती घेतला, हे माध्यम देशातील मोठ्या लोकसंख्येसाठी सोयी बरोबरच सुरक्षा आणि आत्मसन्मानाचं साधन आहे. जेव्हा या योजनेबद्दल बोललं जातं तेव्हा अनेकदा असं म्हटलं जातं की इतकी कोट्यवधी शौचालयं बांधली गेली… ठीक आहे.. बनली असतील! मात्र ही शौचालयं बांधण्यासाठी, विटा, लोखंड, सिमेंट लागलं आहे… अनेकांनी त्यासाठी काम केले आहे. आणि हे सर्व सामान कुठल्यातरी दुकानातून आले आहे, कुठल्यातरी उद्योगाचे उत्पादन आहे. कुठल्या ना कुठल्या वाहतूकदारानं, ते कुणाच्या तरी घरी पोहोचवले आहे. याचा अर्थ असा की यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळाली असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाले आहेत. जेव्हा शौचालये झाली, तेव्हा लोकांचे जीवन सुकर झाले. लोकांमध्ये आत्मसन्मान आणि स्वाभिमानाची भावना निर्माण झाली… आणि त्याचबरोबर विकासाला चालनाही मिळाली. म्हणजेच, गुंतवणूक ते रोजगार, विकास ते प्रतिष्ठा या मंत्राचे यश वास्तवात उतरलेले दिसत आहे.
मित्रांनो,
आणखी एक उदाहरण एलपीजी गॅस सिलेंडरचे आहे. पूर्वी कुणाच्या घरी गॅस असला की शेजारच्या लोकांना तो कुणीतरी मोठा माणूस वाटायचा, प्रतिष्ठीत समजला जायचा…कारण त्यांच्याकडे गॅसची शेगडी आहे. ज्यांच्याकडे गॅस जोडणी नाही त्यांनाही आपले अन्न गॅसच्या शेगडीवर शिजवावे असं वाटायचं. परिस्थिती अशी होती की गॅस जोडणीसाठी खासदार…संसद सदस्यांकडून शिफारस पत्र लिहून घेतली जायची…आणि मी 21व्या शतकाच्या सुरुवातीबद्दल बोलत आहे… 18 व्या शतकाबद्दल बोलत नाही. 2014 पूर्वी सरकार चर्चा करायचे आणि चर्चा कशावर व्हायची….तर, वर्षभरात 6 सिलिंडर द्यायची की 9 सिलिंडर... यावर वाद व्हायचे. आम्ही, किती सिलिंडर द्यायची यावर वाद घालत बसण्यापेक्षा, प्रत्येक घरात गॅस शेगडीची जोडणी पोहोचवण्यास प्राधान्य दिले. स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात जितक्या गॅस जोडण्या दिल्या गेल्या त्यापेक्षा जास्त गॅस जोडण्या, गेल्या 10 वर्षात आम्ही दिल्या आहेत. 2014 मध्ये देशात 14 कोटी गॅस जोडण्या होत्या…, आज 30 कोटींहून जास्त आहेत. 10 वर्षात ग्राहक एवढे वाढले आहेत….पण गॅसचा तुटवडा असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही ऐकले… हिंदुस्तान टाईम्स मध्ये कधी छापून आलय असं... नाही आलं… कारण असं घडलेलच नाही तर छापून येईल कसं? तुटवडा निर्माण झाल्याचं कधी कानावर आलं नाही, कारण आम्ही एक पायाभूत सुविधांचा आधार तयार केला… त्यासाठी गुंतवणूक केली. आम्ही ठिकठिकाणी बॉटलिंग प्लांट (सिलेंडर मध्ये गॅस भरणा केंद्र) आणि वितरण केंद्रे उभारली. त्यामुळे बॉटलिंग(गॅस भरणा) पासून ते सिलिंडरच्या वितरणापर्यंत सर्वत्र रोजगार निर्माण झाला.
मित्रांनो,
मी तुम्हाला अशी कैक उदाहरणे देऊ शकतो. मोबाईल फोनचे उदाहरण आहे... रुपे कार्डचे उदाहरण आहे... पूर्वी डेबिट-क्रेडिट कार्ड बाळगणे म्हणजे काहींना वेगळच अभिमानास्पद वाटायचं…ते अशा प्रकारे खिशातून काढायचे आणि लोक पहात राहायचे. आणि गरीब माणूस तेच कार्ड बघायचा आणि विचार करायचा...माझ्याही खिशात असतं तर…. पण रुपे कार्ड आलं आणि आज माझ्या देशातील गरीबांच्या खिशातही क्रेडिट-डेबिट कार्ड आहेत, मित्रांनो! आता त्याच क्षणी त्याला इतरांच्या बरोबरीचे असल्यासारखे वाटतं… त्याचा स्वाभिमान.. आत्मसन्मान वाढतो. आज अगदी गरीबातला गरीब माणूसही ऑनलाइन व्यवहार करतो. मोठमोठ्या शॉपिंग मॉलमध्ये महागड्या गाडीतून उतरलेला कुणीतरी तेच UPI (ऑनलाईन आंतरराष्ट्रीय आर्थिक देव-घेव प्रणाली) वापरतो आणि माझ्या देशातील रस्त्यावरचा विक्रेता ही… एक सामान्य माणूसही तेच UPI वापरतो. हे सुद्धा…. गुंतवणूक ते रोजगार, विकास ते प्रतिष्ठा याचे एक उत्तम उदाहरण आहे.
मित्रांनो,
भारत आज ज्या वेगवान विकासाच्या मार्गावर निघाला आहे तो मार्ग समजून घेण्यासाठी आमच्या सरकारचा आणखी एक दृष्टीकोन लक्षात घेणे गरजेचे आहे. हा दृष्टीकोन आहे- जनतेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करणे, मात्र यासोबतच आणखी एक दृष्टीकोन देखील आहे, आणि तो म्हणजे- जनतेसाठी मोठ्या प्रमाणात बचत करणे. आम्ही हे कसे साध्य करत आहोत हे समजून घेणे कदाचित तुमच्यासाठी रंजक ठरेल. वर्ष 2014 मध्ये आपण सुमारे 16 लाख कोटी रुपयांचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला होता. आज हाच अर्थसंकल्प 48 लाख कोटी रुपयांचा झाला आहे. 2013-14 मध्ये आपण भांडवली व्ययासाठी सुमारे सव्वा दोन लाख कोटी रुपये खर्च करत होतो. मात्र आज आपला भांडवली व्यय 11 लाख कोटींहून अधिक आहे. आम्ही हे 11 लाख कोटी रुपये आज नवी रुग्णालये, नव्या शाळा, रस्ते, रेल्वे, संशोधन सुविधा अशा अनेक सार्वजनिक पायाभूत सुविधांवर खर्च करत आहोत.जनतेसाठी अधिक खर्च करण्यासोबतच आम्ही जनतेच्या पैशांची बचत देखील करत आहोत. मी तुमच्यासमोर काही आकडेवारी मांडतो आणि माझी खात्री आहे की ती ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल, अच्छा, असं देखील होऊ शकतं.
उदाहरणार्थ, थेट लाभ हस्तांतरण, डीबीटी... या डीबीटी मुळे जी पैशांची गळती थांबली आहे, त्यामुळे देशाचे साडे तीन लाख कोटी रुपये वाचले आहेत. आयुष्मान भारत योजनेंतर्गत मिळत असलेल्या मोफत उपचारांमुळे गरिबांचे 1 लाख 10 हजार कोटी रुपये वाचले आहेत. जनौषधी केंद्रांमध्ये औषधे 80% सवलतीच्या दरात मिळत असल्यामुळे नागरीकांचे 30 हजार कोटी रुपये वाचले आहेत. स्टेंट आणि गुडघा प्रत्यारोपणासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती नियंत्रणात आणल्यामुळे लोकांचे हजारो कोटी रुपये वाचले आहेत. उजाला योजनेतून लोकांनी एलईडी बल्बचा वापर सुरु केल्यामुळे त्यांच्या वीजबिलात 20 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे आजार होण्याचे प्रमाण कमी झाले आणि त्यायोगे गावांतील प्रत्येक कुटुंबाचे किमान 50 हजार रुपये खर्च होण्यापासून वाचले आहेत. युनिसेफच्या म्हणण्यानुसार, ज्या कुटुंबांकडे स्वतःची शौचालये आहेत त्यांची देखील सुमारे 70 हजार रुपयांची बचत होत आहे.
मित्रांनो,
देशातील ज्या 12 कोटी लोकांच्या घरात पहिल्यांदाच नळाने पाणीपुरवठा सुरु झाला आहे त्यांच्या संदर्भात देखील जागतिक आरोग्य संघटनेने एक अभ्यास अहवाल जारी केला. स्वच्छ पाणी मिळाल्यामुळे आता अशा कुटुंबांच्या खर्चात दर वर्षी 80 हजार रुपयांहून अधिक बचत होऊ लागली आहे.
मित्रांनो,
दहा वर्षांपूर्वी कोणीच हा विचार केला नव्हता की, भारतात इतका मोठा बदल घडून येईल. भारताने करून दाखवलेल्या यशस्वी कामगिरीमुळे आम्हांला आणखी भव्य स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली आहे.आज सर्वत्र एक आशा, एक विचार व्यक्त होत आहे, की हे शतक भारताचे शतक असेल. मात्र असे घडून येण्यासाठी, आणखी वेगाने काम करण्यासाठी आपल्याला अनेकानेक प्रयत्न देखील करावे लागतील. आम्ही त्या दिशेने देखील जलदगतीने काम करत आहोत.प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. संपूर्ण समाजाचीच अशी मानसिकता तयार करावी लागेल की आपल्याला सर्वोत्कृष्ट पेक्षा खालच्या पातळीवरील काहीच स्वीकारार्ह नाही. भारताचा मापदंड जागतिक दर्जाचा म्हणवला जाईल अशा प्रकारच्या प्रक्रिया आपल्याला तयार कराव्या लागतील.आपल्याला अशा उत्पादनांची निर्मिती करावी लागेल की, भारतात उत्पादित वस्तू जागतिक दर्जाच्या म्हणवल्या जातील. बांधकाम क्षेत्रात आपले कार्य असे असले पाहिजे की, भारतातील पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या म्हणवल्या जातील. शिक्षण क्षेत्रात आपण असे कार्य उभारायला हवे ज्यामुळे भारतातील शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होईल. मनोरंजन क्षेत्रात असे काम व्हावे की देशात निर्मित चित्रपट तसेच चित्रपटगृहांना दुनियेत जागतिक दर्जाचा मान मिळेल. आणि या उद्देशाला, या दृष्टीकोनाला सतत सामान्य लोकांच्या डोळ्यांसमोर ठेवण्यात हिंदुस्तान टाईम्स फार मोठी भूमिका निभावत आहे. तुमचा 100 वर्षांचा अनुभव विकसित भारताच्या प्रवासात अत्यंत उपयुक्त ठरेल.
मित्रांनो,
विकासाचा हा वेग आपण कायम राखू असा विश्वास मला वाटतो. आता लवकरच आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ. आणि भारत जेव्हा स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करत असेल, भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला ज्र्व्हा 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा हिंदुस्तान टाईम्स समूह देखील सुमारे सव्वाशे वर्षांचा झालेला असेल. आणि त्या घडीला हिंदुस्तान टाईम्स स्वतःच्या वर्तमानपत्रात लिहित असेल की विकसित भारताचे हे दिमाखदार वर्तमानपत्र आहे. तुम्ही सर्वजण देखील या प्रवासाचे साक्षीदार व्हाल. पण आता मी तुमच्यामध्ये उपस्थित आहे तर तुम्हाला काही काम सोपवू इच्छितो आणि भरतीयाजी ही तुमची जबाबदारी असेल.
असं बघा, आपल्याकडे मोठमोठ्या साहित्यिकांच्या कलाकृतींवर डॉक्टरेट केली जाते. विविध संशोधनांवर डॉक्टरेट केली जाते. शशी जी, कोणी हिंदुस्तान टाइम्सच्या 100 वर्षांच्या प्रवासावर डॉक्टरेट करावी. ही फार मोठी सेवा असेल. यासाठी जे संशोधन होईल त्यातून आपल्या देशातील पत्रकारितेच्या प्रवासाचे दर्शन घडेल. या वर्तमानपत्राने दोन्ही कालखंड पाहिले आहेत, गुलामीचा देखील आणि स्वातंत्र्याचा देखील. स्वातंत्र्याच्या अभावाचे देखील दिवस बघितलेत आणि स्वातंत्र्याच्या प्रभावाचा काळ देखील बघितला आहे. मला वाटते की या संदर्भातील संशोधन ही फार मोठी सेवा असेल. बिर्ला कुटुंब तर पूर्वीपासूनच दानधर्मावर विश्वास असलेले कुटुंब आहे. भारतातील आणि भारताबाहेरील विद्यापीठांमध्ये देखील हिंदुस्तान टाईम्सचा विभाग असेल, जो भारताला वैश्विक संदर्भात स्वतःची खरी ओळख करून घेण्यासाठी संशोधनाचे काम करेल असे घडू शकेल का? इतकी वर्ष एखाद्या वर्तमानपत्राचा कारभार चालवणे हे एक फार मोठे कार्य आहे आणि ते तुम्ही करून दाखवले आहे. गेल्या 100 वर्षांच्या काळात तुम्ही जो मान कमावलात, जो विश्वास कमावलात तो येणाऱ्या पिढ्यांना हिंदुस्तान टाईम्सच्या परिघाबाहेर देखील उपयोगी पडू शकेल. आणि माझा ठाम विश्वास आहे की तुम्ही या 100 वर्षांच्या कार्यक्रमापर्यंत मर्यादित राहणार नाही, या कार्याला पुढे घेऊन जाल. मी येथे जे प्रदर्शन पाहिले ते खरोखरीच प्रभावित करणारे होते. त्याचे डिजिटल व्हर्जन आणि त्यासोबत एक उत्तम समालोचन असा संच आपल्या देशातील सर्व शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकता का? यातून त्या सर्वांना भारतातील हे क्षेत्र कसे असते, भारताच्या विकासाच्या प्रवासात कोणते चढ-उतार आले आहेत, भारताने कोणकोणत्या परिस्थितीला तोंड दिले आहे, हे समजून घेता येईल, आणि हे त्यांना समजणे गरजेचे आहे. मला असे वाटते की तुम्ही इतकी मेहनत तर आधीच केली आहे, तर याचे डिजिटल व्हर्जन तयार करून देशातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवू शकता आणि हे व्हर्जन मुलांसाठी देखील आकर्षणाचे केंद्र बनेल.
मित्रांनो,
शंभर वर्षे हा मोठा कालखंड आहे. मी सध्या थोड्या वेगळ्या कामांमध्ये जास्त गुंतलेलो आहे. मात्र ही अशी संधी होती जी मी दवडू इच्छित नव्हतो. मला स्वतःलाच येथे येण्याची इच्छा होती. कारण, 100 वर्षांचा प्रवास ही खूप मोठी कामगिरी असते. आणि त्यासाठी मी तुमचे, तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.
धन्यवाद!