भारत माता की जय
भारत माता की जय
व्यासपीठावर उपस्थित प्रफुल्ल पटेल, खासदार विनोद सोनकर, खासदार भगिनी कलाबेन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा भवर जी , भाई राकेश सिंह चौहान जी , वैद्यकीय क्षेत्रातील मित्रगण , इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो! केम छो मजा, सुख मा, संतोष मा, आनंद मा, प्रगति मा, विकास मा...वाह. मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा माझे मन आनंदाने भरून येते. दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीच्या विकासाचा प्रवास पाहणे हा माझ्यासाठीही सुखद अनुभव असतो. आणि आता जी चित्रफित पाहिली , कोणी कल्पना करू शकत नाही की, इतक्या छोट्या क्षेत्रात चहु दिशांना आधुनिक आणि वेगवान विकास कशाप्रकारे होतो आहे , ते आपण चित्रफितीमध्ये अत्यंत चांगल्या रीतीने पाहिले आहे.
मित्रांनो,
या प्रदेशाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आपला सिल्वासा आता पूर्वीसारखा राहिला नाही, तो कॉस्मोपॉलिटन झाला आहे.भारतातील असा एकही कोपरा नसेल जिथले लोक सिल्वासामध्ये राहत नाहीत.तुम्हाला तुमच्या मूळाबद्दल प्रेम आहे पण तुम्ही आधुनिकतेला तितकेच महत्त्व देता . या केंद्रशासित प्रदेशाचा हा गुणधर्म पाहून केंद्र सरकार वेगवेगळ्या स्तरावर वेगाने काम करत आहे. येथे चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा असाव्यात, चांगले रस्ते असावेत, चांगले पूल असावेत, चांगल्या शाळा असाव्यात, उत्तम पाणीपुरवठा असावा, या सर्व गोष्टींवर केंद्र सरकारचा खूप भर आहे. गेल्या 5 वर्षांत या सर्व सुविधांवर 5,500 कोटी रुपये , साडेपाच हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे.वीज देयकाशी संबंधित यंत्रणा असो , सर्व पथदिवे एलईडीने उजळलेले असोत , हा परिसर झपाट्याने बदलत आहे. घरोघरी जाऊन कचरा संकलनाची सुविधा असो किंवा 100% कचरा प्रक्रिया असो, हा केंद्रशासित प्रदेश सर्व राज्यांना प्रेरणा देत आहे.इथे आणलेले नवे औद्योगिक धोरण ,औद्योगिक विकास वाढवण्यासाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.आज पुन्हा एकदा मला सुमारे 5 हजार कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पांचा आरंभ करण्याची संधी मिळाली आहे. हे प्रकल्प आरोग्य, गृहनिर्माण, पर्यटन, शिक्षण आणि शहरी विकासाशी संबंधित आहेत.त्यामुळे जीवन सुलभता वाढेल. यामुळे पर्यटन सुलभता वाढेल. यामुळे वाहतुकीची सुलभता वाढेल. आणि यामुळे व्यवसाय सुलभता देखील वाढेल.
मित्रांनो,
आज मी आणखी एका गोष्टीबद्दल खूप आनंदी आहे. आज लोकार्पण झालेल्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी करण्याचे सौभाग्य तुम्ही सर्वांनी मला दिले होते. वर्षानुवर्षे आपल्या देशातील सरकारी प्रकल्प लटकत असायचे अडकत असत , भरकटत असायचे. अनेकदा पायाभरणीचे दगडही जुने झाल्यावर खाली पडत असत मात्र प्रकल्प पूर्ण होत नसायचे. पण गेल्या 9 वर्षात आपण देशात नवीन कार्यशैली विकसित केली आहे, नवीन कार्यसंस्कृती आणली आहे. आता ज्या कामाचा पाया रचला आहे, ते काम वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.आम्ही एक काम पूर्ण करताच दुसरे काम सुरू करतो. सिल्वासाचा हा कार्यक्रम याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
केंद्रातील भाजप सरकार सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मंत्रानुसार चालत आहे. देशाच्या प्रत्येक क्षेत्राच्या विकासावर, देशाच्या प्रत्येक क्षेत्राचा समतोल विकास करण्यावर आमचा भर आहे. पण गेली अनेक दशके राजकारण आणि मतपेटीच्या तराजूवर विकास तोलला गेला हे देखील देशाचे दुर्दैव आहे.योजना, प्रकल्पांच्या घोषणा तर अनेक होत असत, पण त्या कशा होत असत तर कुठून किती मते मिळणार , कोणत्या वर्गाला खूश करून मते मिळणार. ज्यांची पोहोच नव्हती , ज्यांचा आवाज क्षीण होता, ते वंचित राहिले, ते विकासाच्या प्रवासात मागे राहिले. त्यामुळेच आपला आदिवासी भाग, आपला सीमावर्ती भाग विकासापासून वंचित राहिला.आपल्या मच्छीमारांना त्यांच्या नशीबावर सोडून दुर्लक्ष करण्यात आले. दमण, दीव, दादरा, नगर हवेली यांना देखील या प्रवृत्तीची मोठी किंमत मोजावी लागली आहे.
मी गुजरातमध्ये होतो, या लोकांनी काय काय करून ठेवले आहे हे मी सतत पाहत होतो. आज ज्या वैद्यकीय महाविद्यालयाला स्वत:चा परिसर मिळाला आहे ते या अन्यायाचा खूप मोठा साक्षीदार आहे.तुम्ही विचार करा मित्रांनो, स्वातंत्र्य मिळून दशके उलटली, पण दमण, दीव, दादरा, नगर हवेलीत वैद्यकीय महाविद्यालय बांधलेले नव्हते. इथल्या काही तरुणांना वैद्यकशास्त्र शिकण्याची संधी ही दुसऱ्या ठिकाणी मिळू शकली. यामध्ये आदिवासी कुटुंबातील मुला-मुलींचा सहभाग तर नगण्य होता. ज्यांनी देशावर अनेक दशके राज्य केले, त्यांना इथल्या तरुणांवर होत असलेल्या या भयंकर अन्यायाची कधीच चिंता वाटली नाही. या छोट्याशा केंद्रशासित प्रदेशाचा विकास करून आपल्याला काहीही मिळणार नाही, असे त्यांना वाटत होते. तुमच्या या आशीर्वादाची किंमत त्यांना कधीच कळू शकली नाही. 2014 मध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी दिली तेव्हा आम्ही तुमची सेवा करण्याच्या भावनेने काम करायला सुरुवात केली, समर्पित भावनेने काम करू लागलो.याच्या परिणामी , दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीला त्यांचे पहिले राष्ट्रीय शैक्षणिक वैद्यकीय संस्था (नमो) वैद्यकीय महाविद्यालय मिळाले.आता दरवर्षी सुमारे 150 स्थानिक तरुणांना येथून वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे.काही वर्षांतच, अगदी नजीकच्या भविष्यात येथून तब्बल एक हजार डॉक्टर्स तयार होतील.तुम्ही कल्पना करा, एवढ्या छोट्या भागातून एक हजार डॉक्टर. यामध्येही आपल्या आदिवासी कुटुंबातील तरुणांची संख्या सातत्याने वाढत आहे. इथे येण्यापूर्वी मी एका बातमीत एका मुलीबद्दल वाचत होतो. आदिवासी कुटुंबातून आलेली ही मुलगी सध्या येथे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्या मुलीने तर वर्तमानपत्राच्या लोकांना सांगितले की, माझ्या कुटुंबाला सोडा, माझ्या संपूर्ण गावातही कोणी डॉक्टर होऊ शकले नाही. दादरा आणि नगर हवेलीत हे जे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे आणि या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असल्याबद्दल ती मुलगी आपले भाग्य समजते.
मित्रांनो,
सेवाभावना ही येथील लोकांची ओळख आहे. मला आठवते, कोरोनाच्या काळात येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन लोकांना मदत केली होती. आणि कोरोनाच्या काळात कुटुंबातील कोणालाही एकमेकांना मदत करणे शक्य नव्हते. तेव्हा इथले विद्यार्थी गावोगावी मदतीला पोहोचले होते आणि मला त्या विद्यार्थी मित्रांना सांगायचे आहे. मी मन की बात मध्ये तुमच्याद्वारे चालवलेल्या गाव दत्तक कार्यक्रमाचाही उल्लेख केला होता. येथील डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे आपले कर्तव्य बजावले आहे ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. इथल्या वैद्यकीय सुविधेशी निगडित प्रत्येकजण आज करत असलेल्या कामाबद्दल मला त्यांचे कौतुक करायचे आहे.
बंधू आणि भगिनींनो,
सिल्व्हासाच्या या नव्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे येथील आरोग्य सुविधांवरील ताणही कमी होणार आहे. जवळच नागरी रुग्णालय आहे, त्यावर किती ताण होता हे देखील तुम्हाला माहीत आहे. आता दमण येथे आणखी 300 खाटांचे नवीन रुग्णालय बांधले जात आहे.आयुर्वेदिक रुग्णालयाच्या उभारणीलाही सरकारने मान्यता दिली आहे. म्हणजेच येत्या काळात सिल्वासा आणि हा संपूर्ण परिसर आरोग्य सुविधांच्या बाबतीत अतिशय बळकट होणार आहे.
मित्रांनो,
गुजरात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी अनेकदा येथे आलो आहे, तुम्हांला भेटून गेलो आहे हे तुमच्या लक्षात असेल. मी जेव्हा राज्याच्या सरकारमध्ये सहभागी झालो होतो तेव्हा मी पाहिले होते की अंबाजी पासून उमरगाव पर्यतच्या आदिवासी पट्ट्यात कोणत्याही शाळेत विज्ञान विषयाचा अभ्यासच होत नसे. जर विज्ञान विषयाचा अभ्यासच झालेला नसेल तर येथील मुले डॉक्टर आणि इंजिनीयर कशी होतील? म्हणून मी तेथील शाळा-महाविद्यालयांमध्ये अध्यापनात विज्ञान विषयांचा समावेश करून घेतला. आपल्या आदिवासी मुलांची मोठी समस्या म्हणजे त्यांना परक्या भाषेतून शिक्षण घेणे कठीण वाटते. कोणत्याही मुलाला ही समस्या येऊ शकते. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असल्यामुळे, गावातील गरीब, दलित, वंचित तसेच आदिवासी कुटुंबांतील हुशार मुले-मुली डॉक्टर, इंजिनियर होऊ शकत नाहीत. आपल्या सरकारने आता या समस्येवर देखील उपाय शोधला आहे. आता वैद्यकीय-अभियांत्रिकी शिक्षणाचा पर्याय भारतीय भाषांमध्ये, तुमच्या स्वतःच्या भाषेत देखील उपलब्ध झाला आहे. याचा या भागातील मुलांना मोठा लाभ होणार आहे. आता गरीब मातेचा मुलगा देखील डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो आहे.
मित्रांनो,
आज याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयासोबतच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे देखील लोकार्पण झाले आहे. या महाविद्यालयामुळे येथील सुमारे 300 युवकांना दर वर्षी अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. मला या गोष्टीचा फार आनंद झाला आहे की देशातील मोठमोठ्या शिक्षण संस्था सुद्धा दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली भागात आपापल्या संस्थांच्या शाखांची स्थापना करत आहेत. दमण येथे निफ्टचा सॅटेलाईट कॅम्पस सुरु झाला आहे, सिल्व्हासा येथे गुजरात राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कामकाज सुरु झाले आहे, दीव येथे बडोद्याच्या ट्रिपल आयटी संस्थेने स्वतःची शाखा सुरु केली आहे. हे नवे वैद्यकीय महाविद्यालय तर सिल्व्हासाला आरोग्य सुविधांच्या बाबतीत नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले सरकार कोणतीही उणीव राहू देणार नाही अशी खात्री मी या भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला देतो.
बंधू आणि भगिनींनो,
मी गेल्या वेळी जेव्हा सिल्व्हासाला आलो होतो तेव्हा मी विकासाच्या पंचधारेची चर्चा केली होती. विकासाची पंचधारा म्हणजे लहान मुलांना शिक्षण, तरुणांना उत्पन्न, वृद्धांना औषधे, शेतकऱ्यांना सिंचन आणि सामान्य लोकांचे म्हणणे ऐकून घेणे. मी आज यामध्ये आणखी एक धारा जोडू इच्छितो. आणि ती म्हणजे महिलांना स्वतःचे घर मिळाल्याच्या शुभेच्छा. आपल्या सरकारने, गेल्या काही वर्षांमध्ये देशातील 3 कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना पक्की घरे बांधून दिली. इथे देखील आमच्या सरकारने गरिबांना 15 हजार घरे बांधून देण्याचा निश्चय केला आहे. यापैकी बहुतांश घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आज या भागात 1200 हून अधिक कुटुंबांना त्यांच्या मालकीची घरे मिळाली आहेत. आणि तुम्हांला हे माहितच आहे की, पंतप्रधान गृह योजनेतून ज्या घरांचे वितरण केले जाते त्यामध्ये महिलांना समान भागीदारी देण्यात येत आहे. म्हणजेच आपल्या सरकारने दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली या भागातील हजारो महिलांना त्यांच्या स्वतःच्या घराचा, मालकीहक्क देण्याचे कार्य केले आहे. नाहीतर, आपल्या सगळ्यांना माहित आहेच, आपल्याकडे काय परिस्थिती असते ते. घराचा मालक पुरुष, शेतीचा मालक पुरुष, दुकानाचा मालक पुरुष, गाडीचा मालक पुरुष, समजा घरात स्कूटर असेल तर तिचाही मालक पुरुषच. महिलांच्या नावावर कोणतीच वस्तू नसते. आम्ही या घरांचे मालकीहक्क महिलांना दिले आहेत. आणि तुम्हाला हे देखील माहित असेल की पंतप्रधान गृह योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांची किंमत काही लाख असते. म्हणजेच, ज्या महिलांना ही घरे मिळाली आहेत त्यांना लाखो रुपये किमतीचे घर नावावर करून मिळाले आहे. म्हणजेच आपल्या गरीब घरांतील माता-भगिनी, महिला या लखपती ताई झाल्या आहेत. आता त्या सर्वजणी लखपती ताई म्हणून ओळखल्या जातील कारण एक लाख रुपयांहून कितीतरी अधिक किंमतीच्या घराच्या आता त्या मालकिणी झाल्या आहेत. या सर्व लखपती ताईंचे मी जेवढे अभिनंदन करीन तेवढे कमीच आहे. त्यांचे मी विशेष अभिनंदन करतो.
मित्रांनो,
भारताच्या अथक प्रयत्नांमुळे, आज संपूर्ण विश्व, हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करत आहे. भरड धान्यांना आपल्या सरकारने श्रीअन्न असे नाव दिले आहे. येथील शेतकरी, रागी, किंवा इथल्या भाषेत बोलायचे तर नागली किंवा नाचणी यांसारखी भरड धान्ये पिकवतात, त्यांना देखील आमचे सरकार प्रोत्साहन देत आहे. रागीचे पीठ असो, रागीपासून बनवलेल्या कुकीज असो, इडली असो, लाडू असो, या सगळ्या पदार्थांना असलेली मागणी आज वाढत आहे. मी तर मन की बात या कार्यक्रमात नेहमीच या सर्वांचा उल्लेख करत असतो.आणि तुम्हाला तर माहितच आहे की येत्या रविवारी मन की बात कार्यक्रमाचे शतक होणार आहे, शंभरावा भाग प्रसारित होणार आहे. मन की बात हा कार्यक्रम म्हणजे भारतातील लोकांच्या विविध प्रयत्नांना सर्वांसमोर आणण्यासाठी, भारताच्या वैशिष्ट्यांचा सन्मान करण्यासाठी, अत्यंत उपयुक्त मंच आहे. तुम्हा सर्वांप्रमाणेच मी देखील शंभराव्या भागाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे, रविवारची वाट पाहतो आहे.
मित्रांनो,
या सतत वाढत्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर मी दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली या भागांना भारताचा तटवर्ती पर्यटनासाठीचा उत्तम भाग म्हणून देखील संकल्पित करतो आहे. दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली यांच्यामध्ये देशाची अत्यंत महत्त्वाची पर्यटनस्थळे म्हणून उदयाला येण्याची क्षमता आहे. आपण आज भारताला जगातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे काम करत असताना, या भागाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. दमण येथील रामसेतू तसेच नमो पथ म्हणजेच नानी दमण सागरी अवलोकन पथ या नावांनी जे दोन सागर किनारे तयार झाले आहेत, ते देखील येथील पर्यटन क्षेत्राचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. सप्ताहाच्या अखेरीस जे पर्यटक येथे येतात, त्यांच्यासाठी तर हे अत्यंत आवडीचे ठिकाण झाले आहे. मला अशी माहिती मिळाली आहे की पर्यटकांच्या सोयीसाठी किनाऱ्यालगतच्या भागात टेंट सिटी म्हणजे तंबूचे समूह उभारले जाणार आहेत. काही वेळाने मी स्वतःच नानी दमण सागरी अवलोकन पथाला भेट देणार आहे. हा सागरकिनारा नक्कीच देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करेल. यासोबत, खानवेल नदीकिनारा, दुधनी जेट्टी, पर्यावरणस्नेही रिसॉर्टची उभारणी यांमुळे देखील येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. कोस्टल प्रोमोनेड, सागर किनारा विकासाचे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील तेव्हा या ठिकाणची आकर्षणे आणखीनच वाढतील. आणि या सगळ्यामुळे, या भागात रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
बंधू आणि भगिनींनो,
देशात आज काही लोकांच्या तुष्टीकरणावर नव्हे तर सामान्य जनतेच्या संतुष्टीकरणावर भर देण्यात येत आहे. वंचितांना प्राधान्य ही गेल्या 9 वर्षांमधील सुशासनाची ओळख बनली आहे. देशातील प्रत्येक गरजू, प्रत्येक वंचित घटक, वंचित क्षेत्र यांच्यापर्यंत सोयीसुविधा पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार वेगाने काम करत आहे. जेव्हा योजनांचे संपृक्तीकरण होते, जेव्हा सरकार स्वतःच जनतेच्या दारात पोहोचते तेव्हा भेदभाव संपतो, भष्टाचार संपतो, घराणेशाही संपते. दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली हा भाग सरकारच्या योजनांच्या बाबतीत संपृक्तीकरणाच्या खूप जवळ पोहोचला आहे. तुम्हा सर्वांच्या अशा प्रयत्नांमुळेच समृद्धता येईल आणि विकसित भारत साकारण्याचा निर्धार तडीस जाईल. या विकासकामांबद्दल पुन्हा एकदा तुम्हां सर्वांचे अभिनंदन.
भारत मातेचा विजय असो।
भारत मातेचा विजय असो।
खूप खूप आभार!