भगवान श्री नाथजी की जय !
राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा जी, मुख्यमंत्री, माझे मित्र अशोक गेहलोत जी, विधानसभेचे सभापती सी.पी. जोशी, राज्य सरकारचे मंत्री भजनलाल जाटव, संसदेतील माझे सहकारी आणि राजस्थान भाजपाचे अध्यक्ष चंद्रप्रकाश जोशी, संसदेतील माझे सर्व सहकारी, भगिनी दीयाकुमारी, खासदार कनकमल कटारा, खासदार अर्जुनलाल मीना, कार्यक्रमाला उपस्थित असलेले अन्य सर्व प्रतिष्ठित आणि राजस्थानचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,
भगवान श्री नाथजी आणि मेवाडच्या या वीरभूमीवर मला पुन्हा एकदा आपल्यामध्ये येण्याची संधी मिळाली आहे. इथे येण्याआधी मला भगवान श्रीनाथ जींचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळाले. श्रीनाथजींकडे मी स्वातंत्र्याच्या या अमृतकाळामध्ये विकसित भारताच्या संकल्पांच्या सिद्धीसाठी आशीर्वाद मागितले आहेत.
मित्रांनो,
आज इथे राजस्थानच्या विकासाशी संबंधित 5 हजार कोटी रूपयांपेक्षाही अधिक प्रकल्पांची आधारशिला ठेवण्यात आली तसेच काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहेत. हे प्रकल्प राजस्थानच्या संपर्क व्यवस्थेला नवीन उंचीवर घेवून जातील. उदयपूर आणि श्यामलाजी यांच्या दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग-8 हा सहापदरी होत असल्यामुळे उदयपूर, डुंगरपूर आणि बांसवाडा क्षेत्राला खूप मोठा लाभ होणार आहे. यामुळे श्यामलाजी आणि काया यांच्यामधील अंतर आता कमी होणार आहे. बिलाडा आणि जोधपूर विभागाच्या निर्माणामुळे जोधपूर आणि सीमावर्ती क्षेत्रापर्यंत पोहोचणे आता अधिक सुलभ होणार आहे. याचा एक मोठा फायदा असाही होणार आहे की, जयपूर ते जोधपूर हे अंतर कापण्यासाठी आता तीन तास कमी वेळ लागणार आहे. चारभूजा आणि निम्न ओडन या प्रकल्पामुळे जागतिक वारसा स्थळ कुंभलगडला भेट देणे, हळदीघाट पाहणे आणि श्रीनाथजी यांचे दर्शन घेणे आता अधिक सुलभ होईल. श्री नाथव्दारपासून देवगड मदारिया रेल्वे वाहिनी, मेवाड ते मारवाड प्रदेशांना जोडणार आहे. यामुळे संगमरवर, ग्रॅनाईट आणि खाण-खनिज उद्योगांना आणि व्यापा-यांना खूप मोठी मदत मिळेल. या विकास कार्यांबद्दल मी सर्व राजस्थानवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो.
बंधू आणि भगिनींनो,
भारत सरकार, राज्याच्या विकासातून देशाचा विकास होतो, या मंत्रावर विश्वास ठेवते. राजस्थान हे देशातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे. राजस्थान, भारताचे शौर्य, भारताचा वारसा, भारताची संस्कृती, यांचा वाहक आहे. राजस्थान जितके विकसित होईल, तितकीच भारताच्या विकासालाही गती मिळेल. आणि म्हणूनच आमचे सरकार, राजस्थानमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा तयार करण्यावर अधिक भर देत आहे. आणि ज्यावेळी मी आधुनिक पायाभूत सुविधा विकास याविषयी बोलत असतो, त्याचा अर्थ केवळ लोहमार्ग आणि रस्ते इतकाच नसतो. आधुनिक पायाभूत सुविधा - विकासामुळे शहरे आणि गावांमध्ये संपर्क व्यवस्था, साधने वाढतात आणि या दोन्हीमधील अंतर कमी होते. आधुनिक पायाभूत विकासामुळे समाजामध्ये सुविधा वाढतात, समाजाला जोडण्यासाठी मदत होते. पायाभूत विकासामुळे डिजिटल सुविधा वाढतात, लोकांचे जीवन सुकर बनवतात. आधुनिक पायाभूत सुविधांमुळे वारसा संवर्धनाला प्रोत्साहन मिळते आणि विकासाला गतीही मिळते. ज्यावेळी आपण आगामी 25 वर्षांमध्ये विकसित भारताच्या संकल्पाची चर्चा करतो, त्यावेळी त्याच्या मुळाशी हीच पायाभूत विकासाची एक नवीन ताकद बनून उभी राहत आहे. आज देशामध्ये प्रत्येक प्रकारच्या पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. तसेच अभूतपूर्व वेगाने कामे सुरू आहेत. रेल्वे असो, महामार्ग असो, विमानतळांची निर्मिती असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत सरकार हजारो कोटी रूपयांची गुंतवणूक करीत आहे. यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्येही भारत सरकारने पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटी रूपये खर्च करण्याचे निश्चित केले आहे.
मित्रांनो,
ज्यावेळी पायाभूत सुविधांवर इतक्या प्रचंड प्रमाणावर गुंतवणूक होत असेल, तर त्याचा थेट प्रभाव त्या क्षेत्राच्या विकासावर होत असतो. त्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधींवर होत असतो. ज्यावेळी नवीन मार्ग, रस्ता बनतो, नवीन लोह मार्ग बनतो, ज्यावेळी गावामध्ये पीएम घरकुल योजनेतून कोट्यवधी घरे बनतात, काही कोटी शौचालये बनतात, गावांमध्ये लाखो किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे जाळे टाकले जाते, प्रत्येक घरामध्ये नळाव्दारे पेयजल पुरविण्यासाठी पाण्याच्या वाहिन्या टाकल्या जातात, त्यावेळी त्याचा लाभ स्थानिक लहान-मोठ्या व्यापारी वर्गाला होतो. कारण या सर्व कामासाठी लागणा-या अनेक लहान-मोठ्या वस्तूंचा पुरवठा हे व्यापारी करीत असतात. तसेच त्या भागातल्या लहान-मोठ्या दुकानदारांनाही फायदा होतो. त्या भागातील श्रमिकांना यामुळे खूप मोठा लाभ मिळतो. भारत सरकारच्या या योजनांमुळे अर्थव्यवस्थेला एक नवीन गती मिळाली आहे.
परंतु मित्रांनो, आपल्या देशामध्ये काही लोक अशा विकृत विचारधारेचे शिकार बनले आहेत. त्यांच्यामध्ये खूप नकारात्मकता भरली आहे. देशामध्ये काहीही चांगले होत असेल तर ते त्यांना पहावत नाही. आणि त्यांना फक्त वाद निर्माण करणेच चांगले वाटते. आता तुम्ही मंडळींनी असे काही ऐकले असेल की, काही लोक उपदेश देताना विचारतात की, ‘आटा आधी की डाटा आधी? रस्ता आधी की उपग्रह आधी? मात्र इतिहास साक्षीदार आहे की, स्थायी, शाश्वत विकासासाठी, वेगाने विकासासाठी मूळ व्यवस्थांबरोबरच आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करणेही गरजेचे आहे. जे लोक पावला-पावलावर प्रत्येक गोष्ट मतांच्या तराजूने तोलतात, ते कधीच देशाचे भविष्य नजरेसमोर ठेवून, देशाचा विचार करून योजना बनवू शकत नाहीत.
आपण अनेकवेळा पाहतो आहे, गावांमध्ये पाण्याची टाकी बनली आहे, परंतु 4-5 वर्षांमध्येच ती टाकी अपूरी पडते. कितीतरी रस्ते आणि उड्डाण पूल असे असतात की, 4-5 वर्षात ते पुरेसे नाहीत, असे वाटायला लागते. आपल्या देशामध्ये याच विचारांमुळे पायाभूत सुविधांच्या निर्माणाला प्राधान्य दिले गेले नाही. याचे खूप मोठे नुकसान देशाला सहन करावे लागले आहे. जर आधीच याविषयी पूर्ण विचार करून पुरेशा संख्येमध्ये वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली असती, तर देशामध्ये डॉक्टरांची संख्या आधीपासून, तसेच आज कमी पडली नसती. जर पहिल्यापासून रेल्वे मार्गिकांचे विद्युतीकरण केले गेले असते तर आज हजारों कोटी रूपये खर्च करून हे काम करण्याची गरज पडली नसती. जर पहिल्यांदाच प्रत्येक घरामध्ये नळाव्दारे पेयजल पुरविले असते तर आज साडेतीन लाख कोटी रूपये खर्चून जल जीवन मिशन सुरू करण्याची वेळ आली नसती. नकारात्मकतेने भरलेल्या लोकांमध्ये दूरदृष्टी नव्हती आणि हे लोक राजकीय स्वार्थातून बाहेर पडून कधी काही विचारही करू शकले नाहीत.
आपण विचार करा, नाथद्वाराची जीवनरेखा मानले जाणारे नंदसमंध धरण किंवा टांटोल धरण जर बांधले नसते तर काय झाले असते ? राजस्थान आणि गुजरातच्या लोकांच्या तोंडी लाखा बंजारांचे नाव वारंवार येते, लाखा बंजारांची आपण चर्चा करतो. पाण्यासाठी लाखा बंजारांनी आपले आयुष्य वेचले. पाण्यासाठी इतके काम करणारे आणि बावडी कोणी खोदली तर लाखा बंजारांनी, तलावांची निर्मिती कोणी केली तर लाखा बंजारांनी, हे गुजरात मध्येही म्हंटले जाते, राजस्थान मध्येही म्हटले जाते. एक प्रकारे प्रत्येकालाच असे वाटते की पाण्याच्या समस्येचे निराकरण कोणी करत होते तर लाखा बंजारा करत होते. मात्र आज अशी परिस्थिती आहे की लाखा बंजारा आज निवडणुक लढवण्यासाठी उभे राहिले तर नकारात्मक मानसिकता बाळगणारे त्यांचा पराभव करण्यासाठी निवडणुकीत उतरतील. त्यासाठी राजकीय पक्ष भाऊगर्दी करत एकत्र येतील.
मित्रहो,
पायाभूत सुविधांसाठी दूरदृष्टीचा अभाव यामुळे राजस्थानचे मोठे नुकसान झाले आहे. या मरुभूमीमध्ये कनेक्टिव्हिटीच्या अभावी ये- जा करणे किती कठीण होते हे आपण जाणताच. ही समस्या केवळ ये - जा करण्यापूरतीच मर्यादित नव्हती यामुळे शेती, व्यापार, व्यवसाय सर्वांनाच याचा फटका बसत होता. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना 2000 मध्ये अटल जी यांच्या सरकारने सुरू केली होती. त्यानंतर 2014 पर्यंत सुमारे 3 लाख 80 हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते बांधण्यात आले. तरीही देशात लाखो गावे अशी होती जिथे रस्ता संपर्क अजूनही दूरच होता. 2014 मध्ये आम्ही प्रत्येक गावापर्यंत पक्का रस्ता पोहोचवायचा संकल्प केला. गेल्या नऊ वर्षात आम्ही सुमारे साडे तीन लाख किलोमीटरचे रस्ते गावात निर्माण केले आहेत. यापैकी 70 हजार किलोमीटर पेक्षा अधिक रस्ते इथे आपल्या राजस्थानमधल्या गावांमध्ये बांधण्यात आले आहेत. आता देशात बहुतांश गावे पक्क्या रस्त्यांनी जोडली गेली आहेत. हेच काम जर आधी आले असते तर गावात, वाड्या वस्तीमध्ये राहणाऱ्या आपल्या बंधू - भगिनींसाठी किती सुविधा झाली असती.
मित्रांनो,
भारत सरकार आज गावांपर्यंत रस्ते पोहोचवण्याबरोबरच शहरांनाही आधुनिक महामार्गांनी जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. 2014 पूर्वी देशात ज्या गतीने राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती होत होती आता त्यापेक्षा दुप्पट वेगाने काम केले जात आहे. याचाही लाभ राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांना मिळत आहे. काही काळापूर्वीच मी दौसा इथे दिल्ली - मुंबई द्रुतगती महामार्गाच्या एका भागाचे लोकार्पण केले आहे.
बंधू - भगिनींनो,
आज भारताचा समाज आकांक्षी समाज आहे. आज 21 व्या शतकात या दशकात लोक कमी वेळेत लांबचा पल्ला गाठू इच्छितात, त्यांना जास्तीत जास्त सुविधा हव्या आहेत. भारताच्या लोकांच्या या आकाक्षांची, राजस्थानच्या लोकांच्या या आकाक्षांची सगळ्यांनी मिळून पूर्तता करणे हे सरकार या नात्याने आपणा सर्वांचे दायित्व आहे. रस्त्याबरोबरच वेगाने प्रवासासाठी रेल्वे किती आवश्यक आहे हे आपण सर्व जण जाणतोच. आजही गरीब किंवा मध्यम वर्गाची सहकुटुंब प्रवासासाठी पहिली पसंती रेल्वेलाच आहे. म्हणूनच आज भारत सरकार, दशकांपासूनच्या रेल्वे जाळ्यात सुधारणा करत आहे, आधुनिक करत आहे. आधुनिक रेल्वे गाड्या असोत, आधुनिक रेल्वे स्थानके असोत, आधुनिक रेल्वे मार्ग असोत, प्रत्येक स्तरावर चहू बाजूंनी काम सुरू आहे. राजस्थानलाही पहिली वंदे भारत एक्सप्रेस गाडी मिळाली आहे. इथे मावली- मारवाड गेज परिवर्तनाची मागणी फार वर्षांपासून प्रलंबित होती, ती आता पूर्ण होत आहे. अशाच प्रकारे अहमदाबाद - उदयपूर दरम्यान रेल्वे मार्ग ब्रॉड गेज करण्याचे कामही काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. या नव्या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेचा उदयपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना मोठा लाभ होत आहे.
मित्रहो,
संपूर्ण रेल्वे नेटवर्क मानव रहित फाटकांपासून मुक्त करण्यात आल्यानंतर आता आम्ही वेगाने संपूर्ण जाळ्याचे विद्युतीकरण करत आहोत. उदयपूर रेल्वे स्थानकाप्रमाणे देशामधली शेकडो रेल्वे स्थानके आधुनिक करण्यात येत आहेत, त्यांची क्षमता वाढविण्यात येत आहे. या बरोबरच मालगाड्यांसाठी विशेष मार्ग, समर्पित मालवाहतूक मार्गिका आम्ही निर्माण करत आहोत.
मित्रहो,
गेल्या नऊ वर्षात राजस्थानच्या रेल्वे बजेट मध्ये 2014 च्या तुलनेत 14 पट वाढ झाली आहे. गेल्या नऊ वर्षात राजस्थानमध्ये सुमारे 75 टक्के रेल्वे जाळ्याचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. गेज परिवर्तन आणि मार्ग दुहेरीकरण याचा मोठा लाभ डुंगरपुर, उदयपुर, चितोड, पाली, सिरोही आणि राजसमंद यासारख्या जिल्ह्यांना मिळाला आहे. रेल्वे मार्गाचे शंभर टक्के विद्युतीकरण झालेल्या राज्यांच्या यादीत राजस्थानचाही समावेश होईल तो दिवस आता फार लांब नाही.
बंधू - भगिनींनो,
उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे राजस्थानच्या पर्यटन क्षेत्राला, आपल्या तीर्थ स्थळांना मोठा लाभ होत आहे. मेवाडचा हा भाग तर हळदी घाटाची भूमी आहे. राष्ट्र रक्षणासाठी राणा प्रताप यांच्या शौर्याच्या, भामाशाह यांच्या समर्पणाच्या आणि वीर पन्नाधायच्या त्यागाच्या गाथा इथल्या मातीच्या कणाकणात सामावल्या आहेत. देशाने कालच महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त त्यांचे आदरपूर्वक स्मरण केले. आपला हा वारसा आपल्याला जगापर्यंत अधिकाधिक पोहोचवणे आवश्यक आहे. म्हणूनच आज भारत सरकार आपल्या वारसा स्थळांच्या विकासासाठी वेगवेगळया सर्किट साठी काम करत आहे. कृष्ण सर्किटच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांशी संबंधित तीर्थ स्थळे जोडण्यात येत आहेत. राजस्थान मध्ये गोविंद देव जी, खाटू श्याम जी आणि श्री नाथ जी यांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी कृष्ण सर्किटचा विकास करण्यात येत आहे.
बंधू - भगिनींनो,
भारत सरकार, सेवाभाव हाच भक्ती भाव मानून अहो रात्र काम करत आहे. जनतेचे जीवन सुखकर करण्याला आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, सुविधा आणि सुरक्षितता वृद्धींगत करण्यासाठी सरकारचे सातत्याने काम सुरु आहे. श्रीनाथ जी यांचा आशीर्वाद आपण सर्वांवर सदैव राहावा या कामनेसह आपणा सर्वाना विकासकामांसाठी पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा देतो. खूप-खूप धन्यवाद.
भारत माता की जय।
भारत माता की जय।
भारत माता की जय।
धन्यवाद !