विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी सुरू केली पीएम विश्वकर्मा योजना
पीएम विश्वकर्मा बोधचिन्ह, ‘सम्मान, सामर्थ्य, समृद्धी’ या घोषवाक्याचे आणि पोर्टलचे केले उद्घाटन
कस्टमाईज्ड स्टँप शीट आणि टूलकिट बुकलेटचे केले प्रकाशन
18 लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रमाणपत्रांचे केले वितरण
“देशाच्या प्रत्येक श्रमिकाला, प्रत्येक विश्वकर्म्याला मी ‘यशोभूमी’ समर्पित करतो”
“विश्वकर्मांना ओळख आणि पाठबळ मिळणे ही काळाची गरज”
“आउटसोर्स करण्यात येणारे काम आपल्या विश्वकर्मा मित्रांना मिळाले पाहिजे आणि जागतिक पुरवठा साखळीचा ते महत्त्वाचा भाग बनले पाहिजेत”
“या बदलत्या कालखंडात विश्वकर्मा मित्रांसाठी प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि साधने अतिशय महत्त्वाची आहेत”
“ज्यांची काळजी घेण्यासाठी कोणीच नाही, त्यांच्या पाठिशी मोदी आहेत”
“व्होकल फॉर लोकल ही संपूर्ण देशाची जबाबदारी आहे”
“आजचा विकसित भारत प्रत्येक क्षेत्रात स्वतःची नवी ओळख निर्माण करत आहे”
“यशोभूमीमधून मिळणारा संदेश अतिशय स्पष्ट आणि मोठा आहे. या ठिकाणी होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला यश आणि प्रसिद्धी मिळेल”
“भारत मंडपम आणि यशोभूमी सेंटर दिल्लीला परिषद पर्यटनाचे सर्वात मोठे केंद्र बनवणार आहेत”
“भारत मंडपम् आणि यशोभूमी या दोहोंमध्ये भारतीय संस्कृती आणि अत्याधुनिक सुविधांचा संगम आहे आणि या भव्य वास्तू भारताची गाथा जगासमोर मांडत आहेत”
“आपले विश्वकर्मा सहकारी मेक इन इंडियाचा अभिमान आहेत आणि हे आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र या अभिमानाचे जगाला दर्शन घडवण्याचे माध्यम बनेल”

 

भारत मातेचा विजय असो 

भारत मातेचा विजय असो

भारत मातेचा विजय असो

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे या भव्य वास्तुत आलेले माझे प्रिय बंधू-भगिनी, देशातील 70 होऊन जास्त शहरांतील माझे सर्व सहकारी, अन्य मान्यवर आणि माझ्या कुटुंबियांनो.

आज भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे. हा दिवस आपले पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांना समर्पित आहे. मी सर्व देशवासीयांना विश्वकर्मा जयंतीच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो. मला आनंद वाटतोय की आजच्या या दिवशी मला देशभरातील लाखो विश्वकर्मा सहकाऱ्यांना भेटण्याची संधी मिळाली आहे. काही वेळापूर्वीच मी अनेक विश्वकर्मा बंधू-भगिनींशी बोललो सुद्धा आणि मला इथे यायला उशीर पण यामुळेच झाला की मी त्यांच्याशी जरा गप्पा गोष्टींमध्ये गुंतलो होतो आणि खाली जे प्रदर्शन सुरू आहे ते सुद्धा इतके सुंदर आहे की तिथून बाहेर पडायचं मनच होत नव्हतं आणि माझा आपल्या सर्वांना खूप आग्रह आहे, विनंती आहे की आपण सुद्धा ते प्रदर्शन अगदी जरूर बघा आणि मला हे सांगितलं गेलं की हे प्रदर्शन आणखी दोन-तीन दिवस चालणार आहे. तर मी विशेष करून दिल्ली वासियांना नक्की सांगेन की हे प्रदर्शन तुम्ही नक्की बघा.

मित्रहो,

भगवान विश्वकर्मा यांच्या आशीर्वादाने आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची सुरुवात होत आहे. आपल्या हस्त कौशल्याने, अवजारांनी परंपरागत काम करणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी पीएम विश्वकर्मा योजना आशेचा एक नवा किरण बनून येत आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

या योजनेसोबतच आज देशाला आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र यशोभुमी ही  मिळाले आहे. ज्या प्रकारचे काम इथे झाले आहे, त्यात माझ्या श्रमिक बंधू-भगिनींची, माझ्या विश्वकर्मा बंधू भगिनींची तपश्चर्या दिसून येत आहे, तपस्या दिसून येत आहे. मी आज यशोभूमी, देशातल्या प्रत्येक श्रमिकाला समर्पित करतो, प्रत्येक विश्वकर्मा सहकार्याला समर्पित करतो. मोठ्या प्रमाणात आपले विश्वकर्मा सहकारी सुद्धा यशोभूमीचे लाभार्थी होणार आहेत, त्यांना यशोभूमीचा लाभ मिळणार आहे. आज या कार्यक्रमात जे आपले विश्वकर्मा सहकारी आपल्या सोबत दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी झाले आहेत त्यांना मी विशेष करून हे सांगू इच्छितो, गावागावात आपण जे जिन्नस,  ज्या वस्तू बनवता, जी शिल्प, ज्या कलेचा आविष्कार करता, ती कला, ती आपली कलाकारी संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचे, यशोभूमी हे  खूप मोठे क्रियाशील केंद्र, एक सशक्त माध्यम बनणार आहे. हे केंद्र,आपली कला, आपले कौशल्य, आपली कलाकुसर, संपूर्ण जगासमोर मांडणार आहे. हे केंद्र भारतातील स्थानिक उत्पादनांना जागतिक बनवण्यात खूप मोठी भूमिका निभावणार आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

आपल्याकडे शास्त्रात असे सांगितले गेले आहे- 'यो विश्वं जगतं करोत्येसे स विश्वकर्मा'  अर्थात जे संपूर्ण जगाची रचना, किंवा या जगासाठी काहीतरी निर्माण करायचे काम करतात त्यांना विश्वकर्मा असे म्हणतात. हजारो वर्षांपासून  भारताच्या समृद्धीचा पाया ठरलेले  आपले सहकारी, आपल्यासाठी विश्वकर्माच आहेत. आपल्या शरीरात पाठीचा कणा जसा महत्त्वाची भूमिका बजावतो, त्याचप्रमाणे हे विश्वकर्मा सहकारी समाजजीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.आपले हे विश्वकर्मा मित्र असं  काम करतात, त्यांच्यापाशी असं  कौशल्य आहे, ज्याविना रोजच्या जीवनाची कल्पना करणेसुद्धा कठीण आहे.  आता हेच पहा, लोहार नसेल तर आपल्या कृषी व्यवस्थेचे काय होईल? काहीच शक्य नाही.  गावोगावी चप्पल बनवणारे असोत, केस कापणारे असोत, कपडे शिवणारे असोत, त्यांचे महत्त्व कधीच लोप पावू शकत नाही.  रेफ्रिजरेटरच्या जमान्यातही आज लोक थंडाव्यासाठी मडके आणि रांजणातील पाणी पिणे पसंत करतात.  जगाने कितीही प्रगती केली, तंत्रज्ञान कुठेही पोहोचले तरी या मंडळींची भूमिका आणि महत्त्व कायमच राहणार आहे.  आणि म्हणूनच या विश्वकर्मा सहकाऱ्यांचे कसब ओळखून त्यांना सर्वतोपरी पाठबळ पुरवणे ही काळाची गरज आहे.

आमचे सरकार आज आपल्या विश्वकर्मा बंधू-भगिनींचा मान-सन्मान वाढवण्यासाठी, त्यांचे बळ वाढवण्यासाठी आणि त्यांची समृद्धी वाढवण्यासाठी त्यांचे सहकारी म्हणून आपल्या कडे आले आहे.  सध्या, या योजनेत 18 विविध प्रकारची कामे करणाऱ्या विश्वकर्मा सहयोगींवर लक्ष केंद्रित केले आहे.  आणि क्वचितच असे कोणतेही गाव असेल जिथे ही 18 प्रकारची कामे करणारे लोक नसतील.  यामध्ये लाकूडकाम करणारे सुतार, लाकडी खेळणी बनवणारे कारागीर, लोखंडाचे काम करणारे लोहार, सोन्याचे दागिने घडवणारे सोनार, मातीचे काम करणारे कुंभार, मूर्ती घडवणारे शिल्पकार, जोडे बनवणारे बंधू, गवंडीकाम करणारे, केस कापणारे, कपडे धुणारे लोक, कपडे शिवणारे लोक, हार बनवणारे, मासेमारीचे जाळे विणणारे, होड्या-नौका बनवणारे, विविध प्रकारची कामे करणारे लोक यांचा समावेश करण्यात आला आहे.  पीएम विश्वकर्मा योजनेवर सरकार 13 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारणपणे तीस-पस्तीस वर्षे झाली असतील मी एकदा युरोपात ब्रसेल्स इथे गेलो होतो. तेव्हा मला थोडासा वेळ मिळाला तर  मला तिथल्या माझ्या यजमानांनी एक दागिन्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी नेले. तर मी जरा उत्सुकतेने त्यांना विचारत होतो की भाई, इथे या अशा जिन्नसांची बाजारपेठ कशी असते, काय असते, त्यांचे विपणन कसे होते.

ते  माझ्यासाठी हे एक मोठे आश्चर्य होते, त्यांनी सांगितले, सर, इथे यंत्राच्या सहाय्याने बनवलेल्या दागिन्यांना  मागणी कमी आहे,मात्र  हाताने बनवलेले  महाग दागिने जास्तीत जास्त  पैसे देऊनही ते विकत घ्यायला आवडतात.तुम्ही सर्वजण तुमच्या हातांनी आणि तुमच्या कौशल्याने जे बारीक बारीक जे काम करता त्या  कामाची मागणी जगात वाढत आहे.

आजकाल आपण पाहतो की मोठमोठ्या कंपन्याही आपली उत्पादने बनवण्यासाठी इतर छोट्या कंपन्यांना काम देतात. जगभरात हा एक मोठा उद्योग आहे. बाह्यस्रोतांना दिले जाणारे  काम  आपल्या  या विश्वकर्मा मित्रांकडेही आले पाहिजे, तुम्ही मोठ्या पुरवठा साखळीचा एक भाग व्हावे यासाठी तुम्हाला तयार करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत. जगातील सर्वात मोठ्या कंपन्या तुमच्या दारात येऊन उभ्या राहाव्यात, तुमचे दार त्यांनी ठोठवावे, यासाठीची  क्षमता आम्हाला तुमच्यामध्ये निर्माण करायची आहे.  त्यामुळे ही योजना म्हणजे विश्वकर्मा मित्रांना आधुनिक युगात घेऊन जाण्याचा, त्यांचे सामर्थ्य  वाढवण्याचा प्रयत्न आहे.

मित्रांनो,
या बदलत्या काळात आपल्या विश्वकर्मा बंधू-भगिनींसाठी प्रशिक्षण-तंत्रज्ञान आणि साधने अत्यंत आवश्यक आहेत.  विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना प्रशिक्षण देण्यावर सरकारने भर दिला आहे.  तुम्ही असे लोक आहात जे दररोज कठोर परिश्रम करून आपला उदरनिर्वाह करतात.  त्यामुळे प्रशिक्षणादरम्यानही तुम्हाला सरकारकडून दररोज 500 रुपये भत्ता दिला जाईल.  तुम्हाला आधुनिक साधन संचासाठी (टूलकिट) रु. 15,000 किंमतीचे टूलकिट (साधनसंच )व्हाउचर देखील मिळेल. तुम्ही बनवलेल्या वस्तूंच्या ब्रँडिंग आणि पॅकेजिंगपासून ते विपणनापर्यंत  सरकार सर्वोतोपरी  मदत करेल.  आणि त्या बदल्यात, जीएसटी नोंदणीकृत असलेल्या दुकानातून तुम्ही साधनसंच खरेदी करावेत, अशी सरकारची इच्छा आहे, काळाबाजार चालणार नाही.  आणि दुसरे माझे आवाहन आहे की,  ही साधने भारतातच उत्पादित असावीत.

माझ्या कुटुंबियांनो,

तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर सुरुवातीच्या भांडवलाची अडचण येणार नाही याचीही काळजी सरकारने घेतली आहे.  या योजनेंतर्गत बँक विश्वकर्मा मित्रांना  विनातारण कर्ज उपलब्ध करून देईल,
जेव्हा बँक तुमच्याकडून हमी मागत नाही तेव्हा मोदी तुमची हमी देतात. तुम्हाला कोणतीही हमी न मागता 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकेल .  आणि या कर्जावरील व्याज अत्यंत कमी राहील,हे देखील सुनिश्चित करण्यात आले आहे. पहिल्यांदाच प्रशिक्षण घेऊन नवीन साधने घेतली असल्यास प्रथम एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल, आणि तुम्ही जेव्हा याची परतफेड कराल, तेव्हा  समजेल की तुमचे काम सुरू आहे मग तुम्हाला आणखी 2 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध होईल,अशी तरतूद सरकारने केली आहे.

माझ्या कुटुंबियांनो,
आज देशात वंचितांना प्राधान्य देणारे सरकार आहे.  आमचे सरकार एक जिल्हा एक उत्पादन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील विशेष उत्पादनांना प्रोत्साहन देत आहे.आमच्या सरकारनेच  पहिल्यांदा पीएम स्वानिधी अंतर्गत पदपथावरील विक्रेत्यांना मदत केली आहे आणि त्यांच्यासाठी बँकांचे दरवाजे खुले केले आहेत.
आपल्या सरकारने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भटक्या-विमुक्त जमातींची काळजी घेतली.  हे आमचे सरकार आहे ज्या सरकारने स्वातंत्र्यानंतर प्रथमच प्रत्येक स्तरावर आणि प्रत्येक ठिकाणी दिव्यांगांसाठी विशेष सुविधा विकसित केल्या आहेत. ज्याला कोणी विचारत नाही, अशा लोकांसाठी  हा गरिबाचा मुलगा मोदी आपला सेवक बनून आला आहे.  सर्वांना सन्मानाचे जीवन देणे, सगळ्यांपर्यंत  सुविधा पोहोचवणे, ही मोदींची हमी आहे.

माझ्या कुटुंबीयांनो,
जेव्हा तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येतात तेव्हा काय आश्चर्य घडते, हे संपूर्ण जगाने जी 20 हस्तकला बाजारामध्येही  पाहिले आहे. जी20 मध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांना आम्ही विश्वकर्मा मित्रांनी बनवलेल्या वस्तू भेट दिल्या.'वोकल फॉर लोकल'ला  पाठबळ ही आपल्या सर्वांची, संपूर्ण देशाची जबाबदारी आहे.  आता का थांबलात, मी केले तर टाळ्या वाजवता, तुम्हाला करायची गोष्ट आली की, टाळ्या वाजवण्याचे थांबता. तुम्हीच सांगा, आपल्या कारागिरांनी आणि आपल्या माणसांनी बनवलेल्या वस्तू जागतिक बाजारपेठेत पोहोचायला हव्यात की नाही?  जगाच्या बाजारांमध्ये याची विक्री व्हावी की नाही?  त्यामुळे हे काम आधी लोकल साठी व्होकल व्हावे लागेल आणि नंतर लोकलला ग्लोबल बनवण्याचे काम करावे लागेल.

मित्रांनो,
आता गणेश चतुर्थी, धनत्रयोदशी, दिवाळीसह अनेक सण येत आहेत.  मी सर्व देशवासीयांना स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन करेन. आणि जेव्हा मी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीबद्दल बोलतो तेव्हा काही लोकांना वाटते  केवळ दिवाळीचे दिवे खरेदी करावेत, बाकी काही नाही. आपल्या विश्वकर्मा मित्रांची छाप  असलेली, भारताच्या मातीचा आणि घामाचा वास असलेली प्रत्येक छोटी मोठी वस्तू, कोणतीही मोठी वस्तू खरेदी करा.

माझ्या कुटुंबीयांनो,

आजचा विकसनशील भारत प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.   भारत मंडपमची जगभरात कशाप्रकारे चर्चा झाली ते आपण काही दिवसांपूर्वी पाहिले आहे.हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र-यशोभूमी ही परंपरा अधिक भव्यतेने पुढे नेत आहे. आणि यशोभूमीचा साधा सोपा संदेश आहे की ,या भूमीवर काहीही झाले तरी यश मिळणारच आहे.  भविष्यातील भारताचे प्रदर्शन घडवण्यासाठी  हे एक उत्तम केंद्र बनेल.

मित्रहो,

भारताचे मोठे आर्थिक सामर्थ्य, मोठ्या व्यापारी क्षमतेचे दर्शन घडविण्यासाठी भारताच्या राजधानीत जसे केंद्र असले पाहिजे, तसे हे आहे. यामध्ये मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी आणि पीएम गतिशक्ती एकाच वेळी दिसून येते. आता बघा, हे विमानतळाजवळ आहे. विमानतळाशी जोडण्यासाठी मेट्रोची सुविधा देण्यात आली आहे.

आज येथे मेट्रो स्टेशनचेही उद्घाटन करण्यात आले आहे. हे मेट्रो स्टेशन थेट या संकुलाशी जोडलेले आहे. मेट्रोच्या या सुविधेमुळे दिल्लीच्या विविध भागातील लोक कमी वेळेत येथे सहज पोहोचू शकतील. इथे येणाऱ्या लोकांसाठी या संपूर्ण परीसरात राहण्याची, मनोरंजनाची, खरेदीची, पर्यटनाची संपूर्ण व्यवस्था इथे करण्यात आली आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

बदलत्या काळानुसार विकास आणि रोजगाराची नवीन क्षेत्रेही निर्माण होत असतात. 50-60 वर्षांपूर्वी एवढ्या मोठ्या आयटी उद्योगाचा विचारही कोणी केला नसेल. 30-35 वर्षांपूर्वी सोशल मीडिया ही केवळ कल्पनाच होती. आता जगात आणखी एक मोठे क्षेत्र तयार होत आहे, ज्यात भारतासाठी अनंत संधी उपलब्ध आहेत. हे क्षेत्र म्हणजे परिषद पर्यटन होय. जगभरातील परिषद पर्यटन उद्योग 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचा आहे. दरवर्षी जगभरात 32 हजारापेक्षा जास्त मोठी प्रदर्शने आणि एक्स्पो आयोजित केले जातात. तुम्ही कल्पना करू शकता की ज्या देशाची लोकसंख्या दोन-पाच कोटी असेल, तिथेही लोक अशी प्रदर्शने भरवतात, इथली लोकसंख्या तर 140 कोटी आहे, जो येईल तो श्रीमंत होईल. ही फार मोठी बाजारपेठ आहे. परिषद पर्यटनासाठी येणारे लोक सामान्य पर्यटकापेक्षा कितीतरी पट जास्त पैसे खर्च करतात. एवढ्या मोठ्या उद्योगात भारताचा वाटा फक्त एक टक्का, फक्त एक टक्का आहे. भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांना दरवर्षी त्यांचे कार्यक्रम बाहेर ठेवावे लागतात. कल्पना करा, देशाची आणि जगाची एवढी मोठी बाजारपेठ आपल्यासमोर आहे. आता आजचा नवा भारतही परिषद पर्यटनासाठी स्वतःला तयार करत आहे.

आणि मित्रहो, तुम्हा सर्वांना माहित आहे की साहसासाठी उपयुक्त स्रोत उपलब्ध असतील तिथेच साहसी पर्यटन शक्य होईल. आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील तिथेच वैद्यकीय पर्यटन शक्य होईल. ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम असतील तिथेच अध्यात्मिक पर्यटन शक्य होईल. इतिहास आणि वारसा असेल तिथेच वारसा पर्यटन देखील शक्य होईल. त्याचप्रमाणे कार्यक्रम, सभा आणि प्रदर्शनांसाठी आवश्यक स्रोत उपलब्ध असतील तिथेच परिषद पर्यटन शक्य होईल. त्यामुळे, भारत मंडपम आणि यशोभूमी ही अशी केंद्रे आहेत, जी आता दिल्लीला परिषद पर्यटनाचे सर्वात मोठे केंद्र बनवणार आहेत. एकट्या यशोभूमी केंद्रातून लाखो तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. भविष्यात, यशोभूमी अशी ठिकाण म्हणून नावारूपाला येईल, जिथे जगभरातील लोक आंतरराष्ट्रीय परिषद, संमेलन, प्रदर्शन इत्यादींसाठी रांगा लावतील.

आज मी प्रदर्शन आणि कार्यक्रम उद्योगाशी संबंधित जगभरातील देशांमधल्या लोकांना भारतात दिल्लीमध्ये यशोभूमी येथे आमंत्रित करतो. मी देशाच्या पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण प्रत्येक भागातील चित्रपट उद्योग आणि दूरचित्रवाणी उद्योगाला आमंत्रित करेन. तुम्ही तुमचे पुरस्कार सोहळे, चित्रपट महोत्सव येथे आयोजित करा, तुमच्या चित्रपटांचे पहिले शो येथे आयोजित करा. मी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करणाऱ्या कंपन्या, प्रदर्शन क्षेत्राशी संबंधित लोकांना भारत मंडपम आणि यशोभूमी येथे आमंत्रित करतो.

माझ्या कुटुंबियांनो,

भारत मंडपम असो किंवा यशोभूमी, ही ठिकाणे भारताच्या आदरातिथ्याचे, भारताच्या श्रेष्ठतेचे आणि भारताच्या भव्यतेचे प्रतीक बनतील, असा विश्वास मला वाटतो. भारत मंडपम आणि यशोभूमी ही दोन्ही ठिकाणे भारतीय संस्कृती आणि आधुनिक सुविधांचा संगम आहेत. आज ही दोन्ही भव्य ठिकाणे देशासमोर आणि जगासमोर नव भारताची यशोगाथा गात आहेत. ही ठिकाणे नव भारताच्या आकांक्षा देखील प्रतिबिंबित करतात, ज्या भारताला स्वतःसाठी सर्वोत्तम सुविधा हव्या आहेत.

मित्रहो, माझे शब्द लिहून घ्या, भारत आता थांबणार नाही. आपण पुढे जात राहायचे आहे, नवीन ध्येये बाळगायची आहेत आणि ती साध्य केल्यानंतरच शांत बसायचे आहे. हा आपल्या सर्वांच्या मेहनतीचा आणि परिश्रमाचा कळसाध्याय असेल आणि 2047 साली आपल्या देशाला विकसित भारत म्हणून जगासमोर उभे करू, या संकल्पासह आपल्याला पुढे जायचे आहे. आपण सर्वांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. आपले विश्वकर्मा सहकारी 'मेक इन इंडिया'चा गौरव आहेत आणि हे आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र, जगाला हा गौरव दाखवण्याचे माध्यम ठरेल. या अतिशय आशादायी योजनांबद्दल मी पुन्हा एकदा सर्व विश्वकर्मा सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. या नवीन केंद्राने, यशोभूमीने, भारताच्या यशाचे प्रतीक व्हावे, दिल्लीच्या गौरवात भर घालावी. या मंगल कामनांसह आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अनेकानेक धन्यवाद.

नमस्कार. 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi