नमस्कार!
या कार्यक्रमाला आपल्या सोबत उपस्थित देशाचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक महोदय, आसाम चे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल महोदय, मंत्रिमंडळातील माझे सहकारी शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे महोदय, बोर्ड ऑफ गवर्नर्स चे अध्यक्ष डॉ राजीव मोदी महोदय, सिनेटचे सदस्य, या दीक्षांत सोहळ्यासाठी सर्व मान्यवर निमंत्रित, अध्यापक समूहातील सदस्य आणि माझे प्रिय विद्यार्थी,
आज आयआयटी गुवाहाटीच्या या बाविसाव्या दीक्षांत समारंभात तुमच्या सोबत सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे. तसे पाहायला गेले तर दीक्षांत समारंभ म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक विशेष दिवस असतो. पण यावेळी जे विद्यार्थी दीक्षांत समारंभात सहभागी होत आहेत, त्यांच्यासाठी हा वेगळ्या प्रकारचा अनुभव असेल. जागतिक महामारीच्या या काळात दीक्षांत कार्यक्रमाच्या रितीरिवाजात खूप बदल झाले आहेत. सामान्य परिस्थिती असती तर मी या ठिकाणी तुमच्या सोबत प्रत्यक्षात उपस्थित राहिलो असतो.
पण तरी देखील हा क्षण तितकाच महत्त्वाचा आहे, तितकाच मौल्यवान आहे. मी तुम्हा सर्वांना, माझ्या सर्व युवा मित्रांना खूप खूप शुभेच्छा देतो. भविष्यातील तुमच्या प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो, आपल्याकडे असे सांगण्यात आले आहे- ज्ञानम् विज्ञान सहितम् यत् ज्ञात्वा मोक्ष्यसे अशुभात्। अर्थात, विज्ञाना सहित ज्ञानच केवळ सर्व समस्यांपासून, दुःखांपासून मुक्तीचे साधन आहे. हीच भावना, सेवा घेऊन काही नवीन करण्याची उर्जा, यामुळेच आपल्या देशाला हजारो वर्षांच्या या प्रवासात सचेतन ठेवले आहे जिवंत ठेवले आहे. आपल्या या विचारसरणीला आयआयटीसारख्या आपल्या संस्था पुढे नेत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्हा सर्वांना देखील त्याची जाणीव होत असेल की जेव्हा तुम्ही येथे आला होता, तेव्हा पासून तुमच्यात किती परिवर्तन घडले आहे, तुमची विचार करण्याची प्रक्रिया किती विस्तारित झाली आहे. आयआयटी गुवाहाटीमध्ये जेव्हा तुम्ही या प्रवासाची सुरुवात केली होती तेव्हापासून ते आतापर्यंत तुम्हाला तुमच्यात एक नवीन व्यक्तिमत्त्व दिसू लागले असेल. ही या संस्थेची, तुमच्या प्रोफेसरांची तुमच्यासाठी सर्वात मौल्यवान भेट आहे.
मित्रांनो, माझी अशी ठाम धारणा आहे की एखाद्या देशाचे भवितव्य त्या देशाचे युवक आज काय विचार करतात त्यावर अवलंबून असते. तुमची स्वप्ने या देशाच्या वस्तुस्थितीला आकार देतात. म्हणूनच ही वेळ भवितव्यासाठी सज्ज राहण्याची आहे, ही वेळ भविष्यासोबत स्वतःला जुळवून घेण्याची आहे. जसजसा आज अर्थव्यवस्थेत आणि समाजात बदल होत आहे, आधुनिकता येत आहे, भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या परिदृश्यात अनेक आवश्यक बदल करण्याची गरज आहे. आयआयची गुवाहाटी ने आधीपासूनच हे प्रयत्न सुरू केले आहेत, याबद्दल मला आनंद वाटत आहे. ई- मोबिलिटीवर दोन वर्षांचा संशोधन कार्यक्रम सुरू करणारी आयआयटी गुवाहाटी ही पहिली संस्था आहे, असे मला सांगण्यात आले आहे. मला ही देखील माहिती देण्यात आली आहे की आयआयटी गुवाहाटी बी टेक पातळीच्या सर्व कार्यक्रमात सायन्स आणि इंजिनिअरिंग ज्या एकात्मिकतेचे नेतृत्व करत आहे. हे इंटर- डिसिप्लिनरी कार्यक्रम आपल्या शिक्षणाला अष्टपैलू आणि भविष्यवेधी बनवतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.
अशा प्रकारच्या भविष्यवेधी दृष्टीकोनासोबत ज्यावेळी एखादी संस्था आगेकूच करू लागते तेव्हा त्याचे परिणाम वर्तमानात देखील दिसू लागतात. या महामारीच्या काळात आयआयटी गुवाहाटीने कोविड-19 संबंधित किट्स म्हणजे व्हायरल ट्रान्स्पोर्ट मिडिया, व्हायरल आरएनए एक्स्ट्रॅक्शन किट्स आणि आरटी पीसीआर किट्स विकसित करून हे सिद्ध केले आहे. तसे पाहायला गेले तर या महामारीच्या काळात शैक्षणिक सत्रे चालवणे, आपल्या संशोधनाचे काम सुरू ठेवणे, तुम्हा सर्वांसाठी किती कठीण होते याची मला चांगल्या प्रकारे जाणीव आहे. मात्र, तरीही तुम्ही यश मिळवले आहे. तुमच्या या प्रयत्नांसाठी, देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने तुमच्या या योगदानासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो, आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या शिक्षण प्रणालीचे महत्त्व किती आहे याची तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. गेल्या काही दिवसात आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत तुम्ही बरेच काही वाचले असेल, आपसात बरीच चर्चा केली असेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्या 21व्या शतकातील तुमच्यासारख्या युवकांसाठी आहे. जे युवक जगात नेतृत्व करतील, विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारताला जागतिक नेता बनवतील. केवळ इतकेच नाही तर या शैक्षणिक धोरणात अनेक अशा बाबी आहेत ज्या तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांच्या आकांक्षांच्या यादीत सर्वात वरच्या स्थानी होत्या.
मित्रांनो, आपल्या शिक्षणाच्या या प्रवासात तुम्ही हा अनुभव घेतला असेल की शिक्षण आणि परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक ओझे बनता कामा नये, विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करण्याचे जास्तीत जास्त स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, म्हणूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला बहुआयामी बनवण्यात आले आहे, विषयांना लवचिकता देण्यात आली आहे, विविध स्तरांवर प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या संधी देण्यात आल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाचे नवे शैक्षिणक धोरण शिक्षणाला तंत्रज्ञानाशी जोडणार आहे. तंत्रज्ञानाला आपल्या विद्यार्थ्यांच्या विचारप्रणालीचा अविभाज्य भाग बनवणार आहे. म्हणजेच विद्यार्थी तंत्रज्ञानाचाही अभ्यास करतील आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही अभ्यास करतील. शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व्हावा, ऑनलाईन शिक्षण वाढावे, याचे मार्ग राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खुले करण्यात आले आहेत.
अध्यापन आणि अध्ययनापासून प्रशासन आणि मूल्यमापनापर्यंत तंत्रज्ञानाची भूमिका निर्माण व्हावी, यासाठी राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान मंच देखील तयार करण्यात येत आहे. आपण एका अशा व्यवस्थेच्या दिशेने आगेकूच करत आहोत जिथे आपले युवक तंत्रज्ञानाद्वारे शिकतील आणि शिकवण्याच्या नव्या तंत्रज्ञानाच्या नव्या पद्धती देखील विकसित करतील. आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी तर यामध्ये अगणित शक्यता आहेत. नवे सॉफ्टवेअर, नवी उपकरणे आणि गॅजेट्स अशा अनेक गोष्टी ज्या शिक्षणाच्या मार्गावर क्रांती घडवून आणतील, त्याविषयी तुम्हालाच विचार करायचा आहे. तुम्हा सर्वांसाठी ही एक संधी आहे, तुम्ही तुमच्यातील सर्वोत्तम बाहेर आणायचे आहे, त्याचा वापर करायचा आहे.
मित्रांनो, देशात संशोधन संस्कृतीला समृद्ध करण्यासाठी एनईपीमध्ये एक राष्ट्रीय संशोधन मंच म्हणजे एनआरएफचा देखील प्रस्ताव सुचवण्यात आला आहे. संशोधनासाठी लागणाऱ्या निधीसाठी सर्व प्रकारच्या संस्थांसोबत एनआरएफ समन्वय साधेल आणि सर्व प्रकारच्या शाखा मग ती विज्ञानाची असेल किवा मानव्य शाखा असेल, या सर्वांसाठी तो निधी उपलब्ध करेल. जे काही उपयुक्त ठरू शकणारे संशोधन असेल ज्यामध्ये प्रत्यक्ष वापराचा वाव असेल त्यांना विचारात घेतले जाईल आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यात येईल. त्यासाठी सरकारी संस्था आणि उद्योग यांच्या दरम्यान समन्वय आणि सहजतेने संपर्क करणारी व्यवस्था निर्माण करण्यात येईल.
आज या दीक्षांत कार्यक्रमात आपल्या सुमारे 300 युवा सहकाऱ्यांना पीएचडी प्रदान करण्यात येत आहे आणि हा एक अतिशय सकारात्मक पायंडा निर्माण होत असल्याचा मला आनंद आहे. तुम्ही केवळ एवढ्यावरच थांबणार नाही तर तुमच्यासाठी संशोधन एक सवय होऊन जाईल, तुमच्या विचार प्रक्रियेचा एक भाग बनेल, याचा मला विश्वास आहे.
मित्रांनो, ज्ञानाच्या कोणत्याही सीमा नसतात याची आपल्याला जाणीव आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशाच्या शिक्षण क्षेत्राला खुले करण्याचे सूतोवाच करत आहे. याचा उद्देश हा आहे की परदेशी विद्यापीठांची संकुले देशातही सुरू झाली पाहिजेत आणि जगभरातील विविध संस्थामधील जागतिक वातावरणाचा अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना देशातच मिळावा. त्याच प्रकारे भारतीय आणि जागतिक संस्थांमध्ये संशोधनविषयक सहकार्य निर्माण व्हावे आणि विद्यार्थी देवघेव कार्यक्रमाला देखील चालना देण्यात येईल. परदेशी विद्यापीठांमध्ये आपले विद्यार्थी जी पत प्राप्त करतील त्यांची गणती देखील आपल्या देशातील संस्थांमध्ये होईल. केवळ इतकेच नाही तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताला जागतिक शैक्षणिक केंद्राच्या रुपातही स्थापित करेल. अतिशय उच्च कामगिरी करणाऱ्या आपल्या संस्थांना देखील परदेशात आपली संकुले उभारण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. आपल्या सीमा विस्तारण्याच्या या दृष्टीकोनामध्ये आयआयटी गुवाहाटीला महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. ईशान्येकडील हे स्थान भारताच्या पूर्वाभिमुख धोरणाचे देखील केंद्र आहे.
हेच स्थान, भारताच्या दक्षिण आशियासोबत संपर्काचे आणि संबंधांचे प्रवेशद्वार देखील आहे. या देशांशी संस्कृती, वाणीज्य आणि दळणवळण आणि क्षमता यांवर भारताचे संबंध प्रामुख्याने आधारित आहेत. आता शिक्षण देखील या देशांशी संबंध वृद्धिंगत करण्याचे एक नवे माध्यम बनू लागले आहे. आयआयटी गुवाहाटी याचे एक खूप मोठे केंद्र बनू शकते. यामुळे ईशान्येकडच्या भागांना एक वेगळी ओळख मिळेल आणि येथे नव्या संधी देखील निर्माण होतील. आज ईशान्येकडच्या भागांच्या विकासासाठी या ठिकाणी रेल्वे, महामार्ग, हवाई मार्ग आणि जलमार्गाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. संपूर्ण ईशान्य भागासाठी नव-नव्या संधी निर्माण होत आहेत. आयआयटी गुवाहाटीची विकासाच्या या कार्यात खूप मोठी भूमिका आहे.
मित्रांनो, आज या दीक्षांत कार्यक्रमानंतर बरेचसे विद्यार्थी येथेच राहतील, बरेचसे येथून निघून जातील. आयआयटी गुवाहाटी चे इतर विद्यार्थी देखील यावेळी मला पाहात आहेत, मला ऐकत आहेत. आजच्या या विशेष दिवशी मी तुम्हाला काही आग्रह करेन, काही सूचना देखील करेन, मित्रांनो, तुमच्या आयुष्यात या भागाचे देखील योगदान आहे आणि तुम्ही या भागाला पाहिले आहे, त्याविषयी जाणून घेतले आहे आणि त्याचा अनुभव देखील घेतला आहे. या भागामध्ये जी आव्हाने आहेत, या भागामध्ये ज्या संधी आहेत, त्यांचा संबंध आपल्या संशोधनाशी कशा प्रकारे जोडता येईल, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. उदाहरणादाखल सौर उर्जा, पवन उर्जा, बायो-मास आणि जलविद्युत उर्जा या क्षेत्रांमध्येही अमाप संधी आहेत. या ठिकाणी तांदूळ, चहा, बांबू सारखी संपत्ती आहे, जो पर्यटन उद्योग आहे, त्यामध्ये आपली नवनिर्मिती काही योगदान देऊ शकते का?
मित्रांनो, या ठिकाणी जैव-विविधता देखील आहे आणि अमाप पारंपरिक ज्ञान आणि कौशल्य आहे. या पारंपरिक कौशल्याची, ज्ञानाची आणि अगदी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाणही परंपरांपासून होत आली आहे. एका पिढीने हे ज्ञान दुसऱ्या पिढीला दिले, त्या पिढीने पुढच्या पिढीला दिले आणि ही मालिका पुढे सुरू राहिली आहे. आपल्याला यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देता येईल का? आपण या एकीकरणातून नवे तंत्रज्ञान निर्माण करू शकतो का? एका आधुनिक आणि शास्त्रीय प्रक्रियेच्या माध्यमातून सांस्कृतिक ज्ञान, कौशल्य आणि धारणांना समृद्ध आणि अत्याधुनिक व्यावसायिक विकास कार्यक्रमांमध्ये रुपांतरित करता येईल. आयआयटी गुवाहाटी यामध्ये एक प्रमुख भूमिका बजावावी आणि एका भारतीय ज्ञान प्रणाली केंद्राची स्थापना करावी, अशी माझी सूचना आहे. याच्या माध्यमातून आपण ईशान्येकडच्या भागांना, देशाला आणि जगाला असे बरेच काही देऊ शकतो जे बहुमूल्य असेल.
मित्रांनो, आसाम आणि देशाचा ईशान्य भाग असा प्रदेश आहे जो अनेक संधींनी युक्त आहे. मात्र, हा प्रदेश पूर, भूकंप, भूस्खलन आणि अनेक औद्योगिक आपत्तींसारख्या समस्यांच्या विळख्यात आहे. या समस्यांना तोंड देण्यामध्येच या भागातील राज्यांची उर्जा आणि प्रयत्न खर्च होत राहातात. या समस्यांना प्रभावी पद्धतीने तोंड देण्यासाठी अतिशय उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानविषयक पाठबळाची आणि हस्तक्षेपाची गरज आहे. मी आयआयटी गुवाहाटीला एक सूचना करेन की तुम्ही एक आपत्ती व्यवस्थापन आणि जोखीम कपात केंद्राची देखील स्थापना करा. हे केंद्र या भागातील समस्यांना तोंड देण्यासाठी तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करेल आणि आपत्तींना देखील संधींमध्य रुपांतरित करेल. मला पूर्ण विश्वास आहे की आयआयटी गुवाहाटी आणि तुम्ही सर्व आयआयटीचे विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला तर हा संकल्प नक्कीच पूर्ण होईल. स्थानिक मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच आपली नजर जागतिक तंत्रज्ञानाच्या भव्य कॅनव्हासवर देखील असली पाहिजे. उदाहरणच घ्यायचे झाले तर आपण आपल्या संशोधन आणि तंत्रज्ञानात काही प्रमुख क्षेत्रांचा विचार करू शकतो का? अशी क्षेत्रे, असे विषय ज्यावर देशाला आणखी जास्त लक्ष देण्याची गरज आहे, त्यांचा आपण विचार करू शकतो, त्यांना प्राधान्य देऊ शकतो का?
मित्रांनो, तुम्ही जगात कुठेही जाल तेव्हा तुम्ही अभिमानाने तुमचा एक आयआयटीयन म्हणून उल्लेख कराल. पण माझी तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे की तुमचे यश आणि तुमचे संशोधनातील योगदान असे असले पाहिजे की आयआयटी गुवाहाटी आणखी अभिमानाने हे सांगेल की तुम्ही त्यांचे विद्यार्थी आहात. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही आयआयटी गुवाहाटी आणि आपल्या प्राध्यापकांना ही संधी, ही गुरु दक्षिणा नक्की द्याल. संपूर्ण देश, 130 कोटी देशवासीयांचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही अशाच प्रकारे सातत्याने यशस्वी व्हा, आत्मनिर्भर भारताच्या यशाचे सारथी बना, अनेक अनेक नवी शिखरे सर करत राहा. जीवनात जी स्वप्ने तुम्ही पाहिली आहेत ती स्वप्ने तुमचे संकल्प बनावेत, जो संकल्प कराल तो पूर्ण करण्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा कराल आणि दररोज नव्या यशाच्या पायऱ्या चढत राहाल. अशा अनेक शुभेच्छांसह मी तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी, कोरोनाच्या या काळात जे सर्वाधिक गरजेचे आहे, तुम्ही सुद्धा त्याची चिंता कराल, तुमच्या कुटुंबाची चिंता कराल, आपल्या आजूबाजूच्या लोकांची चिंता कराल, आपल्या परिवाराची चिंता कराल, त्यावेळी स्वतःची देखील काळजी घ्याल, कुटुंबाची काळजी घ्याल, आजूबाजूच्या मित्रपरिवाराची काळजी घ्याल, सर्वांना निरोगी ठेवण्यासाठी मदत कराल, स्वतः देखील निरोगी राहाल.
याच एका भावनेने मी तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देतो
खूप खूप आभार,
सर्वांचे आभार !