नमस्कार !
आज अबू धाबी मध्ये आपण सर्वांनी नवा इतिहास घडवला आहे.आपण सर्वजण संयुक्त अरब अमिरातीच्या विविध भागातून आले आहात आणि भारताच्या विविध राज्यांमधून आला आहात.मात्र आपण सर्वजण मनाने जोडलेले आहात.या ऐतिहासिक स्टेडीयममध्ये प्रत्येक जण मनापासून हेच म्हणत आहे भारत- युएई मैत्री झिंदाबाद !प्रत्येक श्वासागणिक म्हणत आहे भारत- युएई मैत्री झिंदाबाद ! प्रत्येक आवाज म्हणत आहे, भारत- युएई मैत्री झिंदाबाद ! हा एक क्षण अनुभवायचा आहे.भरभरून जगायचा आहे.आपल्या बरोबर आयुष्यभर राहतील अशा आठवणी आज इथून घेऊन जायच्या आहेत.
माझ्या बंधू - भगिनींनो,
मी आज माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना भेटायला आलो आहे.समुद्रापार आपण ज्या देशाच्या भूमीत जन्मला त्या मातीचा गंध मी आपणासाठी घेऊन आलो आहे.मी संदेश घेऊन आलो आहे, आपल्या 140 कोटी भारतीय बंधू - भगिनींचा ...आणि हा संदेश आहे की भारताला आपला अभिमान आहे, आपण देशाचा गौरव आहात. भारताला आपला अभिमान आहे.
भारतम् निंगड़ै-और्त् अभिमा-निक्कुन्नु !! उंगलई पार्त् भारतम् पेरुमई पड़गिरदु !!
भारता निम्मा बग्गे हेम्मे पडु-त्तदे !! मी पइ भारतदेशम् गर्विस्तोन्दी !!
एक भारत-श्रेष्ठ भारत दर्शविणारे हे सुंदर चित्र, आपला हा उत्साह,आपला हा आवाज आज अबू धाबीच्या आसमंतापार जात आहे.माझ्यासाठी इतका स्नेह, इतका आशीर्वाद भारावून टाकणारा आहे.आपण वेळ काढून इथे आलात मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे.
मित्रहो,
आज आपल्यासमवेत मिनिस्टर ऑफ टॉलरन्स, महामहीम शेख नाह्यान उपस्थित आहेत.ते भारतीय समुदायाचे चांगले मित्र आणि शुभचिंतक आहेत.भारतीय समुदायाप्रती त्यांचा स्नेह प्रशंसनीय आहे. आजच्या या शानदार आयोजनासाठी मी माझे बंधू महामहीम शेख मोहम्मद बिन झायेद यांचेही आभार मानतो.अतिशय उत्साहपूर्ण हा समारंभ त्यांच्या सहयोगाशिवाय शक्य नव्हता.त्यांची आत्मीयता, माझ्याप्रती त्यांची आपुलकीची भावना ही माझी मोठी ठेव आहे. 2015 मधला माझा दौरा मला आठवतो. केंद्र सरकार मध्ये येऊन मला फार काळ झाला नव्हता. 3 दशकानंतर एका भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला युएई दौरा होता. मुत्सदेगिरीचे जगही माझ्यासाठी नवीन होते.तेव्हा विमानतळावर माझे स्वागत करण्यासाठी तेव्हाचे युवराज आणि आजचे अध्यक्ष आपल्या पाच बंधु समवेत आले होते. तो स्नेह, सर्वांच्या डोळ्यातली ती चमक मी कधी विसरू शकत नाही. त्या पहिल्या भेटीतच आपल्या जवळच्या माणसाच्या घरी आल्याप्रमाणे वाटले. तेही एका कुटुंबाप्रमाणे माझा सत्कार करत होते.मात्र मित्रहो, तो सत्कार केवळ माझा नव्हता. ते स्वागत, तो सत्कार, 140 कोटी भारतीयांचा होता.तो सत्कार युएई मध्ये राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांचा होता.
मित्रहो,
एक तो दिवस होता आणि आज हा एक दिवस आहे.10 वर्षात युएईचा माझा हा 7 वा दौरा आहे.शेख मोहम्मद बिन झायेद आजही विमानतळावर माझे स्वागत करण्यासाठी आले होते.तोच स्नेह होता, तीच आपुलकी होती आणि याच बाबीमुळे ते खास ठरतात.
मित्रहो,
भारतात त्यांचे 4 वेळा स्वागत करण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे.काही दिवसांपूर्वीच ते गुजरात मध्ये आले होते. तेव्हा त्यांचे आभार मानण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक जमले होते. हे आभार कशासाठी होते आपल्याला माहीत आहे का? आभार यासाठी की युएई मध्ये आपणा सर्वांची ते ज्या प्रकारे काळजी घेत आहेत,ज्या प्रकारे आपल्या हिताची चिंता वाहत आहेत तसे फारच क्वचित पाहायला मिळते.म्हणूनच सर्वजण घराबाहेर येऊन त्यांना धन्यवाद देत होते.
मित्रहो,
हे माझे भाग्य आहे की युएई ने मला सर्वोच्च नागरी सन्मान – द ऑर्डर ऑफ झायद ने सन्मानित केले.हा सन्मान केवळ माझा नव्हे तर कोट्यवधी भारतीयांचा हा सन्मान आहे, आपणा सर्वांचा हा सन्मान आहे.मी जेव्हा माझे बंधू, शेख मोहंमद बिन झायेद यांना भेटतो तेव्हा ते आपणा सर्व भारतीयांची खूप प्रशंसा करतात.युएईच्या विकासात आपल्या भूमिकेची प्रशंसा करतात.या झायेद स्टेडीयममधेही भारतीयांच्या श्रमाचा गंध आहे.अमिरातीमधल्या आमच्या मित्रांनी भारतीयांना आपल्या हृदयात स्थान दिले आहे, आपल्या सुख- दुःखात सामावून घेतले आहे याचा मला आनंद आहे. काळाबरोबर हे संबंधही दिवसेंदिवस अधिक दृढ होत चालले आहेत आणि यामध्ये बंधू शेख मोहंमद बिन झायेद यांची मोठी भूमिका आहे.आपणा प्रती त्यांची असलेली मोठी संवेदनशीलता मला कोविड काळातही दिसून आली. तेव्हा मी त्यांना सांगितले होते की आम्ही भारतीयांना परत आणण्याची व्यवस्था करत आहोत.मात्र त्यांनी सांगितले की आपण अजिबात चिंता करू नका. त्यांनी इथे भारतीयांवरच्या उपचारासाठी, लसीसाठी संपूर्ण व्यवस्था केली होती. त्यांच्यामुळे मला खरोखरच कोणतीच चिंता करावी लागली नाही.आपणा सर्वांप्रती त्यांचे हे असीम प्रेम मी क्षणोक्षणी अनुभवत आहे. इतकेच नव्हे तर 2015 मध्ये त्यांच्यासमोर आपणा सर्वांच्या वतीने इथे अबुधाबी इथे एका मंदिराचा प्रस्ताव मांडला तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी होकार देत ज्या जमिनीवर आपण रेषा काढाल ती जमीन देईन असे सांगितले.अबू धाबी इथल्या या भव्य दिव्य मंदिराच्या लोकार्पणाची ऐतिहासिक वेळ आली आहे.
मित्रहो,
भारत- युएई यांची मैत्री जमिनीवर जितकी मजबूत आहे तितकाच त्याचा झेंडा अंतराळातही फडकत आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 6 महिने व्यतीत करणारे अमिरातीचे पहिले अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांचे भारताच्या वतीने अभिनंदन करतो.त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन आणि स्वातंत्र्य दिनी भारताला अंतराळातून शुभेच्छा पाठवल्या यासाठीही मी त्यांना धन्यवाद देतो.
मित्रहो,
आज 21 व्या शतकाच्या या तिसऱ्या दशकात भारत आणि युएई यांच्यातले संबंध एका अभूतपूर्व उंचीवर पोहोचत आहेत.आपण परस्परांच्या प्रगतीत भागीदार आहोत.आपले संबंध प्रतिभेचे आहेत,नवोन्मेशाचे आहेत,संस्कृतीचे आहेत.गेल्या काळात प्रत्येक दिशेने आम्ही या संबंधाना नवी उर्जा दिली आहे. आम्ही दोन्ही देश परस्परांसमवेत वाटचाल करत आहोत,एकत्र आगेकूच करत आहोत.आज युएई भारताचा तिसरा मोठा व्यापार भागीदार आहे.आज युएई सातवा मोठा गुंतवणूकदार आहे.दोन्ही देश जीवन सुलभता आणि व्यापार सुलभता या दोन्हींमध्ये अधिक सहयोग करत आहेत. आजही दोन्ही देशांमध्ये जे करार झाले आहेत ते हीच कटीबद्धता पुढे नेत आहेत.आम्ही आपल्या वित्तीय प्रणाली एकात्मिक करत आहोत.तंत्रज्ञान आणि नवोन्मेश या क्षेत्रात भारत आणि युएई यांची भागीदारी सातत्याने भक्कम होत आहे.
मित्रहो,
समुदाय आणि संस्कृती या संदर्भात भारत – युएई ने जे साध्य केले आहे ते जगासाठी आदर्श आहे. भाषा स्तरावर दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ सबंध आहेत हेही मी अमिरातीच्या आपल्या मित्रांना नक्कीच सांगू इच्छितो.मी अरबी मध्ये काही वाक्ये बोलण्याचा प्रयत्न करत आहे-
“अल हिंद वल इमारात, बी-कलम अल ज़मान, वल किताब अद्दुनिया. नक्तुबु, हिसाब ली मुस्तकबल अफ़दल. व सदाका बयिना, अल हिंद वल इमारात हिया, सरवतना अल मुश्तरका. फ़िल हक़ीका, नहनु, फ़ी बीदएया, साईदा ली मुस्तकबल जईईदा!!!
मी अरबी बोलण्याचा प्रयत्न केला. उच्चारात काही चूक झाली असेल तर युएईच्या माझ्या मित्रांची मी नक्कीच क्षमा मागेन.आणि ज्यांना मी काय म्हटले आहे हे समजू शकले नाही त्यांच्यासाठी मी याचा अर्थही सांगतो. मी अरबीमध्ये सांगितले त्याचा अर्थ आहे भारत आणि युएई, काळाच्या लेखणीने जगाच्या पुस्तकावर एका उत्तम भाग्याचा लेखाजोखा लिहित आहेत.भारत आणि युएई यांची मैत्री आपली सामायिक दौलत आहे,वास्तवात आपण उत्तम भविष्याची उत्कृष्ट सुरवात करत आहोत.आता आपण विचार करा, कलम, किताब, दुनिया, हिसाब, जमीन हे हिंदुस्तान मध्ये किती सहजपणे बोलले जाणारे शब्द आहेत. हे शब्द इथे कसे पोहोचले? या आखाती प्रदेशातून. आपल्या दोन्ही देशांमधले संबंध,शेकडो-हजारो वर्षांपासूनचे आहेत.हे संबंध दिवसेंदिवस अधिक दृढ व्हावेत अशी भारताची कामना आहे.
मित्रांनो,
येथे स्टेडिअममध्ये शेकडो विद्यार्थीही आले असल्याचे मला सांगण्यात आले. आज यूएईमध्ये असलेल्या भारतीय शाळांमधून 1.25 लाखांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. हे युवा साथी भारत-यूएईच्या समृद्धीचे सारथी बनत आहेत. यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद यांच्या साहाय्याने , गेल्या महिन्यातच आयआयटी दिल्लीच्या अबू धाबी कॅम्पसमध्ये मास्टर्स कोर्स सुरू झाला आहे. दुबईमध्ये लवकरच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईचे नवीन कार्यालय सुरू होणार आहे. या संस्था इथल्या भारतीय समुदायाला सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी आणखी साहाय्यभूत ठरतील, असा विश्वास मला आहे.
मित्रांनो,
आज प्रत्येक भारतीयाचे लक्ष्य 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे आहे. जगातील असा कोणता देश आहे ज्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे? आपला भारत! जगात असा कोणता देश आहे, जो स्मार्टफोन डेटा वापरण्यात जगात पहिल्या क्रमांकावर आहे? आपला भारत! जगात असा कोणता देश आहे, जो जागतिक फिनटेक अवलंब दरात प्रथम क्रमांकावर आहे? आपला भारत! जगात असा कोणता देश आहे, जो दूध उत्पादनात अग्रेसर आहे ? आपला भारत! जगात असा कोणता देश आहे, जो इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत जगात दुसरा आहे? आपला भारत! जगात असा कोणता देश आहे, जो दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश आहे? आपला भारत! जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था असलेला देश कोणता आहे? आपला भारत! जगात असा कोणता देश आहे, जो पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचला आहे? आपला भारत! जगातील कोणत्या देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला ध्वज रोवला आहे? आपला भारत! एकाच वेळी शेकडो उपग्रह पाठवण्याचा विक्रम जगातील कोणता देश करत आहे? आपला भारत! जगातील कोणत्या देशाने 5जी तंत्रज्ञान स्वतः विकसित केले आहे आणि सर्वात जलद सुरू केले आहे? आपला भारत!
मित्रांनो,
भारताचे यश हे प्रत्येक भारतीयाचे यश आहे. केवळ 10 वर्षातच भारत जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानावरून पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आणि तुम्हाला ठाऊकच आहे, माझा प्रत्येक भारतीयाच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास आहे. याच विश्वासाच्या बळावर मोदींनी हमी दिली आहे. मोदींची हमी तुम्ही जाणता? मोदींनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याची हमी दिली आहे. आणि मोदींची हमी म्हणजे पूर्ततेची हमी. आमचे सरकार लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सतत काम करत आहे. आम्ही 4 कोटींहून अधिक कुटुंबांना कायमस्वरूपी घरे दिली आहेत. आम्ही 10 कोटींहून अधिक कुटुंबांना नळाच्या पाण्याची जोडणी दिली आहे. आम्ही 50 कोटींहून अधिक लोकांना बँकिंग प्रणालीशी जोडले आहे. आम्ही 50 कोटींहून अधिक लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खेड्यापाड्यातील आणि ग्रामीण भागातील लोकांना उपचारात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आम्ही 1.5 लाखांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे बांधली आहेत.
मित्रांनो,
तुमच्यापैकी ज्यांनी पूर्वी भारताला भेट दिली आहे ते समजू शकतात की आज भारतात किती वेगाने बदल होत आहेत. आज भारत वेगाने आधुनिक द्रुतगती मार्ग बांधत आहे. आज भारत नवनवे विमानतळ बांधत आहे. आज भारत सरस रेल्वे स्थानके निर्माण करत आहे. आज भारताची ओळख नवकल्पना, नवोन्मेषामुळे होत आहे. आज भारताची ओळख मोठमोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे होत आहे. आज भारताची ओळख चैतन्यमयी पर्यटनस्थळ म्हणून होत आहे. आज भारताची ओळख मोठी क्रीडा शक्ती म्हणून होत आहे. आणि हे सर्व ऐकून तुम्हाला अभिमान वाटतो, नक्कीच वाटत असेल, हो ना ?
मित्रांनो,
भारतातल्या डिजिटल क्रांतीबद्दल तुम्हा सर्वांना माहीत आहे. डिजिटल इंडियाचे जगभरातून कौतुक होत आहे. याचा लाभ यूएईमध्ये स्थायिक तुम्हा सर्व मित्रांनाही व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही यूएईसोबत रूपे कार्ड स्टॅक सामायिक केला आहे. यामुळे यूएईला त्यांची देशांतर्गत कार्ड प्रणाली विकसित करण्यात मदत झाली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, यूएईने भारताच्या सहकार्याने बनवलेल्या कार्ड प्रणालीला काय नाव दिले आहे? यूएईने याचे 'जीवन' असे नामकरण केले आहे. किती सुंदर नाव दिले आहे यूएईने !!!
मित्रांनो,
लवकरच यूएईमध्ये यूपीआयची सुरुवात होणार आहे. यामुळे यूएई आणि भारतीय खात्यांमध्ये विना अडथळा पैशांची देवाणघेवाण शक्य होईल. यामुळे तुम्ही भारतातल्या तुमच्या कुटुंबीयांना आणखी सुलभपणे पैसे पाठवू शकाल.
मित्रांनो,
भारताच्या वाढत्या सामर्थ्याने जगालाही स्थैर्य आणि समृद्धीची आशा दिली आहे. विश्वासार्ह जागतिक व्यवस्था प्रस्थापित करण्यात भारत सक्रिय भूमिका बजावू शकतो, असे जगाला वाटत आहे. भारत आणि यूएई मिळून आज जगाचा हा विश्वास दृढ करत आहेत, याचा मला आनंद आहे. आपण सर्वांनी हेदेखील पाहिले आहे की भारताने जी 20 शिखर परिषदेचे अत्यंत यशस्वीरित्या आयोजन केले. यामध्ये आम्ही यूएईला भागीदार म्हणून आमंत्रित केले. अशा प्रयत्नांतूनच आमची धोरणात्मक भागीदारीही नव्या उंचीवर पोहोचत आहे. आज जग भारताकडे विश्वबंधू म्हणून पाहत आहे. आज जगातील प्रत्येक मोठ्या व्यासपीठावर भारताचे म्हणणे ऐकले जाते. कुठेही संकट आले की तिथे सर्वप्रथम पोहोचणाऱ्या देशांमध्ये भारताचे नाव असते. आजचा सशक्त भारत प्रत्येक पावलावर आपल्या लोकांच्या पाठीशी उभा आहे. गेल्या 10 वर्षात तुम्ही पाहिले आहे की, परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना जिथे-जिथे समस्यांचा सामना करावा लागला, तिथे भारत सरकारने त्वरीत पावले उचलली आहेत. युक्रेन, सुदान, येमेन आणि इतर संकटांवेळी अडकलेल्या हजारो भारतीयांची आम्ही सुखरूप सुटका केली आणि त्यांना भारतात आणले. जगाच्या विविध भागात स्थायिक झालेल्या किंवा काम करणाऱ्या भारतीयांच्या मदतीसाठी सरकार अहोरात्र कार्यरत आहे.
मित्रांनो,
भारत आणि यूएई मिळून 21 व्या शतकाचा नवा इतिहास लिहित आहेत आणि या इतिहासाचा मोठा पाया तुम्ही सर्व माझे मित्र आहात. तुम्ही येथे करत असलेल्या मेहनतीतून भारतालाही ऊर्जा मिळत आहे. तुम्ही भारत आणि यूएईमधील विकास आणि मैत्री असेच दृढ करत रहा. या शुभेच्छांसह, या भव्य स्वागतासाठी पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार! माझ्यासोबत म्हणा भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय!
तुमच्यात आणि माझ्यात बरेच अंतर आहे, म्हणून तुम्हाला भेटण्यासाठी मी तुमच्यापाशी येत आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जिथे आहात तिथेच बसून राहिलात तर मला तुम्हाला नीट भेटता येईल. तर मला मदत करणार का तुम्ही ? नक्की ना ?
भारत माता की जय !
भारत माता की जय !
खूप खूप धन्यवाद !