जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल श्री मनोज सिन्हा जी,केंद्रीय मंत्री मंडळातले माझे सहकारी श्री प्रतापराव जाधव जी, इतर सर्व मान्यवर आणि जम्मू काश्मिरच्या काना कोपऱ्यातून जोडले गेलेले माझे युवा मित्र आणि सर्व बंधू भगिनींनो !
मित्रांनो,
आज सकाळी मी दिल्लीहून श्रीनगरकडे येण्याची तयारी करत होतो तेव्हा माझे मन उत्साहाने प्रफुल्लित झाले होते. माझ्या मनात आज इतका उत्साह का ओसंडून वाहत आहे याचा मी विचार करत होतो. तेव्हा दोन कारणे माझ्या लक्षात आली. आणखी एक तिसरे कारणही आहे. मी दीर्घ काळ इथे राहून काम केले आहे त्यामुळे अनेक जुन्या लोकांशी मी परिचित आहे. वेग-वेगळ्या भागांशी माझे घट्ट नाते आहे.त्यामुळे त्या आठवणी येणे स्वाभाविक आहे. मात्र दोन कारणांकडे माझे लक्ष अगदी स्वाभाविकपणे गेले आहे. आजच्या या कार्यक्रमात जम्मू- काश्मीरच्या विकासाशी संबंधित प्रकल्पांचे काम आणि दुसरे म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर काश्मीरच्या बंधू-भगिनींशी माझी ही पहिली भेट.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.85726600_1718902950_body-1.jpg)
मित्रांनो,
मी नुकताच गेल्या आठवड्यात इटलीमधून जी-7 बैठकीत सहभागी होऊन परतलो आहे.आताच मनोज जी यांनी सांगितल्याप्रमाणे सलग तिसऱ्यांदा तेच सरकार सत्तेवर येणे, या सातत्याचा मोठा जागतिक प्रभाव असतो. यामुळे आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. जगातले दुसरे देश भारताबरोबरच्या आपल्या संबंधाना प्राधान्य देत हे संबंध मजबूत करतात.आज आपण अतिशय भाग्यवान आहोत.आज भारताच्या नागरिकांच्या ज्या आकांक्षा आहेत त्या आपल्या समाजाच्या सर्वोच्च आकांक्षा आहेत असे आपण म्हणू शकतो.अशा सार्वकालीन उच्च आकांक्षा हे देशाचे सर्वात मोठे सामर्थ्य असते. जे आज भारताला लाभले आहे. जेव्हा आकांक्षा मोठ्या असतात तेव्हा सरकारकडून लोकांच्या अपेक्षाही जास्त प्रमाणात वाढतात.या सर्व कसोट्यांवर पारखल्यानंतर जनतेने आमच्या सरकारला तिसऱ्यांदा निवडून दिले आहे. आकांक्षी समाज कोणाला दुसऱ्यांदा संधी देत नाही. त्याचा एक मापदंड असतो- कामगिरी.आपण आपल्या कार्यकाळात काय कामगिरी केली आहे.ती कामगिरी त्याला नजरेसमोर दिसत असते. सोशल मिडियाद्वारे ती होत नसते,भाषणे देऊन होत नसते,देशाने ही कामगिरी अनुभवली,ही कामगिरी पाहिली त्याचा हा परिणाम आहे आज एका सरकारला तिसऱ्यांदा आपणा सर्वांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.जनतेचा केवळ आमच्यावर विश्वास आहे आणि त्यांच्या आकांक्षांची पूर्तता आमचे सरकारच पूर्ण करू शकते. जनतेचा आमची नियत,आमच्या सरकारच्या धोरणांवर विश्वास आहे त्यावर हे शिक्कामोर्तब आहे.हा जो आकांक्षी समाज आहे त्याला सातत्याने चांगली कामगिरी अपेक्षित असते, त्यांना झपाट्याने परिणाम हवा असतो. त्यांना दिरंगाई चालत नाही.होते,चालतेहोईल,होईल, बघूया,असे करा मग मिळेल हा काळ गेला आता.लोक म्हणतात आज संध्याकाळी काय होईल ? अशी मानसिकता आहे. जनतेच्या आकांक्षा लक्षात घेऊन आमचे सरकार कामगिरी करून दाखवते,परिवर्तन घडवून दाखवते. याच कामगिरीच्या आधारावर आपल्या देशाने 60 वर्षानंतर, 6 दशकानंतर एखाद्या सरकारला सलग तिसऱ्यांदा निवडून दिले आहे. या निवडणुकीच्या निकालांनी,तिसऱ्यांदा सरकार सत्तारूढ झाल्याच्या घटनेने जगाला फार मोठा संदेश दिला आहे.
मित्रांनो,
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जनादेशाचा संदेश स्थिरतेचा आहे, स्थैर्याचा आहे.देशाने मागच्या 20 वर्षांपूर्वी म्हणजे एका प्रकारे मागचे शतक होते, हे 21 वे शतक आहे,ते 20 वे शतक होते. मागच्या शतकाच्या अखेरच्या दशकात अस्थिर सरकारचा मोठा कालखंड देशाने पाहिला आहे. आपणामध्ये मोठ्या संख्येने युवक आहेत, ज्यांचा त्या वेळी जन्मही झाला नव्हता. इतका विशाल देश आणि 10 वर्षात 5 वेळा निवडणुका झाल्या होत्या ! आपण थक्क व्हाल. म्हणजे देश फक्त निवडणूकाच घेत राहिला होता,आणखी कोणते कामच नव्हते. या अस्थिरतेमुळे,अनिश्चिततेमुळे भारताला जेव्हा भरारी घ्यायची होती तेव्हा आपण जमिनीवर खिळलो होतो.देशाचे मोठे नुकसान झाले. तो काळ मागे टाकत स्थिर सरकारच्या नव्या युगात भारताने प्रवेश केला आहे. यातून आपली लोकशाही अधिक भक्कम झाली आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये जम्मू काश्मीरच्या जनतेची,आपणा सर्वांची फार मोठी भूमिका राहिली आहे.अटलजी यांनी इन्सानियत,जम्हुरियत आणि काश्मिरियत हा दृष्टीकोन दिला होता तो आज वास्तवात उतरल्याचे आपण पहात आहोत. या निवडणुकीत आपण जम्हुरियत ला विजयी केले आहे. आपण मागच्या 35-40 वर्षांचा विक्रम मोडला आहे. इथल्या युवकाचा जम्हुरियतवर किती विश्वास आहे हे यातून सिद्ध होत आहे. आज मी या कार्यक्रमाला आलो आहे.पण काश्मीच्या दऱ्याखोऱ्यात जाऊन पुन्हा एकदा माझ्या काश्मिरी बंधू-भगिनींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आभार मानण्याची प्रबळ इच्छा मनात येत होती. या निवडणुकीत त्यांनी भरभरून सहभाग घेतला आहे, जम्हूरियतचा झेंडा फडकवला आहे यासाठी आपले आभार मानण्यासाठी मी आलो आहे. भारताची लोकशाही आणि संविधानाने घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करत नवी गाथा लिहिण्याची ही सुरवात आहे. काश्मीर मध्ये इतक्या उत्साहाने लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात आला, इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले, हे उत्साहाचे वातावरण आहे,यासाठी विरोधी पक्षांनीही माझ्या काश्मिरी बंधू-भगिनींची प्रशंसा केली असती,त्यांचा उत्साह द्विगुणीत केला असता तर मला अधिक आनंद झाला असता.मात्र इतक्या चांगल्या कामातही विरोधी पक्षांनी देशाला निराश केले आहे.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.69194300_1718902963_body-2.jpg)
मित्रांनो,
जम्मू- काश्मीर मध्ये घडत असलेले हे परिवर्तन, आमच्या सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या प्रयत्नांचा परिणाम आहे. स्वातंत्र्यानंतर इथल्या कन्या,समाजातल्या दुर्बल घटकांमधले लोक, आपल्या हक्कांपासून वंचित होते.
आमच्या सरकारने सबका साथ, सबका विकास या मंत्राला अनुसरून सर्वांना हक्क आणि संधी दिली आहे. पाकिस्तानातून आलेले शरणार्थी, आपला वाल्मिकी समुदाय आणि सफाई कामगारांच्या कुटुंबियांना प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला आहे. वाल्मिकी समुदायाला अनुसूचित जाती प्रवर्गाचा लाभ मिळावा ही अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. प्रथमच अनुसूचित जातीच्या समुदायासाठी विधानसभेत आरक्षण देण्यात आले आहे. पहाडी जमाती समुदाय , गड्डा ब्राह्मण आणि कोळी समाजाला देखील अनुसूचित जातीचा दर्जा देण्यात आला आहे. पंचायत, नगर पालिका नगर परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण प्रथमच लागू झाले आहे. संविधानाप्रती समर्पण भाव काय असतो. संविधानातील भावनेचे महत्व काय असते . भारतातील 140 कोटी देशवासीयांचे जीवन बदलण्याची, त्यांना हक्क देण्याची आणि त्यांना भागीदार बनवण्याची संधी संविधान देते.मात्र यापूर्वी संविधानाची एवढी मोठी ताकद आपल्याकडे होती ती अमान्य केली जात होती. दिल्लीत बसलेल्या राज्यकर्त्यांना त्याची फिकीर नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतकी वर्षे केली नाही. आज मला आनंद आहे की आज आपण संविधान जगत आहोत. संविधानाच्या माध्यमातून आम्ही काश्मीरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहोत. जम्मू-कश्मीर मध्ये आज खऱ्या अर्थाने भारताचे संविधान लागू झाले आहे. आणि ज्यांनी अजूनपर्यंत संविधान लागू केले नाही ते दोषी आहेत, गुन्हेगार आहेत , काश्मीरच्या तरुणांचे, काश्मीरच्या मुलींचे, काश्मीरच्या जनतेचे ते गुन्हेगार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व घडत आहे कारण सर्वांना विभाजित करणारी कलम 370 ची भिंत आता ढासळली आहे.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.85794800_1718902976_body-3.jpg)
बंधू आणि भगिनींनो,
काश्मीर खोऱ्यात जे बदल होताना आपण पाहत आहोत , आज संपूर्ण जग देखील ते पाहत आहे. मी पाहिले की जी-20 समूहाचे जे लोक इथे आले होते . त्या देशांचे लोक जे कुणी भेटतात , ते काश्मीरची प्रशंसा करत असतात. ज्याप्रकारे आदरातिथ्य झाले ते खूप कौतुकाने सांगत असतात. आज जेव्हा श्रीनगर मध्ये जी -20 सारखा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम होतो, तेव्हा काश्मिरी जनतेचा ऊर अभिमानाने भरून येतो. आज लाल चौकात संध्याकाळी उशिरापर्यंत लहान मुले खेळत असतात , तेव्हा प्रत्येक भारतीयाला ते पाहून आनंद होतो.आज इथे चित्रपटगृहांमध्ये , बाजारपेठांमध्ये गजबज दिसून येते , ती पाहून प्रत्येकाचा चेहरा समाधानाने उजळून निघतो.
मला काही दिवसांपूर्वीची ती छायाचित्रे आठवतात, जेव्हा दल सरोवराच्या काठावर स्पोर्ट्स कारचा जबरदस्त शो झाला होता. त्या शोमध्ये आपल्या काश्मीरची किती प्रगती झाली हे साऱ्या जगाने पाहिलं, आता इथे पर्यटनाच्या नवनवीन विक्रमांची चर्चा होत आहे. आणि उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. तेही पर्यटकांच्या आकर्षणाचे कारण ठरणार आहे. मनोजजींनी सांगितल्याप्रमाणे, गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये 2 कोटीहून अधिक पर्यटक आले होते , हा एक विक्रम आहे.यामुळे स्थानिक लोकांच्या रोजगाराला चालना मिळते, तेजी येते , रोजगार वाढतो, उत्पन्न वाढते आणि व्यवसायाचा विस्तार होतो.
मित्रांनो,
मी दिवस-रात्र हेच करत असतो. माझ्या देशासाठी काही ना काही करावे. माझ्या देशवासियांसाठी काही तरी करावे. आणि मी जे काही करतो उदात्त हेतूने करतो. मी अतिशय प्रामाणिकपणे समर्पित भावनेने काम करतो जेणेकरून काश्मीरच्या मागील पिढयांना जे सोसावे लागले , त्यातून बाहेर येण्याचा मार्ग काढता येईल. अंतर मग ते मनांचे असो किंवा दिल्लीचे, प्रत्येक अंतर मिटवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. काश्मीरमध्ये जम्हूरियतचा फायदा प्रत्येक परिसर, प्रत्येक कुटुंबाला मिळावा, प्रत्येकाची उन्नती व्हावी यासाठी आपण सर्वानी मिळून काम करायचे आहे. केंद्र सरकारकडून यापूर्वीही पैसे यायचे. मात्र आज केंद्र सरकारकडून आलेली पै-पै तुमच्या कल्याणासाठी खर्च होते.
ज्या कामासाठी पैसे दिल्लीतून मिळाले आहेत , ते त्या कामासाठी वापरले जातील आणि त्याचे परिणामही दिसतील याची आम्ही खात्री करतो. जम्मू-काश्मीरमधील लोक स्थानिक पातळीवर त्यांचे प्रतिनिधी निवडतात, त्यांच्यामार्फतच तुम्हाला समस्या सोडवण्याचे मार्ग सापडतात, यापेक्षा चांगले काय असू शकते? म्हणूनच आता विधानसभा निवडणुकीची तयारीही सुरू झाली आहे. ती वेळ दूर नाही, जेव्हा जम्मू-काश्मीरचे नवे सरकार तुम्ही तुमच्या मताने निवडून द्याल . तो दिवसही लवकरच येईल जेव्हा जम्मू आणि काश्मीर राज्य म्हणून आपले भविष्य घडवेल.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.17205700_1718902989_body-4.jpg)
मित्रांनो,
थोड्या वेळापूर्वी इथे जम्मू-कश्मीरच्या विकासाशी संबंधित 1500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रमुख विकास प्रकल्पांचा प्रारंभ झाला आणि कृषी आणि त्याच्याशी संलग्न क्षेत्रांसाठी देखील 1800 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरु झाले आहेत. मी या प्रकल्पांसाठी जम्मू आणि कश्मीरच्या जनतेचे खूप-खूप अभिनंदन करतो. मी इथल्या राज्य प्रशासनाचे देखील अभिनंदन करतो, सरकारी नोकऱ्यांमध्ये ते वेगाने भरती करत आहेत. गेल्या 5 वर्षांत सुमारे 40,000 भरती झाल्या आहेत. आता सुमारे दोन हजार युवकांना याच कार्यक्रमात नियुक्ती पत्रे मिळाली आहेत. काश्मीरमध्ये होत असलेल्या लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून स्थानिक युवकांसाठी हजारो नवे रोजगार तयार होत आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
रस्ते आणि रेल्वे जोडणी असो, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा असो किंवा वीज आणि पाणी असो, प्रत्येक आघाडीवर जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहे. पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजनेंतर्गत येथे हजारो किलोमीटरचे नवीन रस्ते बांधण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नवीन राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्ग बांधले जात आहेत. काश्मीर खोऱ्यालाही रेल्वेने जोडले जात आहे. चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची छायाचित्रे पाहून प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान दाटून येतो.उत्तर काश्मीरमधील गुरेझ खोऱ्याला प्रथमच वीज ग्रीड कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे.
काश्मीरमध्ये शेती असो, बागायती असो, हातमाग उद्योग असो, क्रीडा असो किंवा स्टार्टअप्स, या सर्वांसाठी संधी तयार होत आहेत. आत्ताच मी स्टार्टअप्स च्या दुनियेशी निगडित असलेल्या नवयुवकांना भेटून आलो आहे. मला येथे यायला उशीर झाला कारण मी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ इच्छित होतो, त्यांच्याजवळ सांगण्यासारखे खूप काही होते, त्यांचा आत्मविश्वास माझ्या मनाला खूपच उत्साहीत करत होता आणि येथील तरुणांनी चांगले शिक्षण सोडून, चांगल्या नोकऱ्या सोडून स्वतःला स्टार्टअप सुरू करण्यात झोकुन दिले आहे. आणि त्यांनी यामध्ये यश मिळवून दाखवले आहे. कोणी दोन वर्षांपूर्वी स्टार्टअप सुरू केला आहे तर कोणी तीन वर्षांपूर्वी स्टार्टअप सुरू केला आहे आणि आज त्या स्टार्टअप चे नाव जगप्रसिद्ध झाले आहे, असे ते मला सांगत होते. आणि यामध्ये विविध प्रकारच्या स्टार्टअप्सचा समावेश आहे. आयुर्वेदाशी संबंधित स्टार्टअप्स देखील आहेत, खाद्य पदार्थांशी संबंधित स्टार्टअप्स आहेत. तेथे माहिती तंत्रज्ञानाचे नवनवे पराक्रम दिसून येतात. सायबर सुरक्षेची चर्चा होत असलेली दिसून येते. फॅशन डिझाइनिंग आहे, पर्यटनाला बळ देणारी होम स्टे ची नवी कल्पना आहे. म्हणजे, माझ्या मित्रांनो! जम्मू-काश्मीरमध्ये कदाचित इतक्या विविध क्षेत्रांमध्ये स्टार्टअप्स असू शकतात आणि माझ्या जम्मू-काश्मीरमधील नवतरुण स्टार्टअप्स च्या दुनियेत आपला डंका वाजवत आहेत हे पाहण्याचा अत्यानंदाचा तो क्षण होता. मी या सर्व तरुणांना शुभेच्छा देत आहे.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.36498300_1718903030_body-5.jpg)
मित्रांनो,
आज जम्मू काश्मीर स्टार्टअप्स, कौशल्य विकास आणि क्रीडा क्षेत्राचे एक मोठे केंद्र बनत आहे. आणि माझे असे मत आहे की, जम्मू काश्मीरकडे क्रीडा क्षेत्रातील जी प्रतिभा आहे, ती अद्भुत आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही ज्या नव्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत, ज्या गोष्टींची व्यवस्था करत आहोत, नव्या नव्या क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देत आहोत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात खूप मोठ्या प्रमाणावर जम्मू-काश्मीरच्या युवकांचे नाव गाजत राहील. आणि जम्मू-काश्मीरचे युवक युवती माझ्या देशाचे नाव उज्वल करतील , हे मी माझ्या नजरेने पाहू शकत आहे.
मित्रांनो,
इथे कृषी क्षेत्राशी संबंधित सुमारे 70 स्टार्टअप्स सुरू झाले आहेत, असे मला सांगण्यात आले. म्हणजेच, कृषी क्षेत्रात क्रांती घडत असल्याचे मी पाहत आहे. आणि कृषी क्षेत्राला आधुनिक बनवण्याचा या नव्या पिढीचा हा जो दृष्टिकोन आहे. जागतिक बाजारपेठेला लक्ष्य बनवण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे, तो खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इथे 50 हून अधिक पदवी महाविद्यालये सुरू झाली आहेत. हा आकडा छोटा नाही. स्वातंत्र्यानंतरच्या 50-60 वर्षांचा कालावधी पाहिला आणि त्याच्याशी मागच्या दहा वर्षांची तुलना केली तर या आकड्यात जमीन आसमानचा फरक दिसून येईल. तंत्र विद्यानिकेतन महाविद्यालयात सीट वाढल्यामुळे येथील युवकांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळाली आहे. आज जम्मू काश्मीरमध्ये आयआयटी आहे, आयआयएम आहे, एम्स निर्माणाधिन आहे, अनेक नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती होत आहेत. पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात स्थानिक पातळीवर कौशल्य तयार केले जात आहे. टुरिस्ट गाईड साठी ऑनलाईन कोर्स असो, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ येथे युवा पर्यटन क्लब ची स्थापना असो, ही सर्व कामे आज काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने होत आहेत.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.65428400_1718903064_body-6.jpg)
मित्रांनो,
जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या विकास कार्यांचा खूप मोठा लाभ काश्मीरच्या लेकींना मिळत आहे. सरकार बचत गटाशी संबंधित भगिनींना पर्यटन, माहिती तंत्रज्ञान आणि इतर कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे अभियान चालवत आहे. दोन दिवसांपूर्वीच देशात ‘कृषी सखी’ या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. आज जम्मू काश्मीर मध्ये देखील 1200 हुन अधिक भगिनी ‘कृषी सखी’ म्हणून काम करत आहेत. नमो ड्रोन दीदी योजने अंतर्गत देखील जम्मू-काश्मीरच्या लेकींना प्रशिक्षण दिले जात आहे. त्या ड्रोन पायलट बनत आहेत. मी काही महिन्यांपूर्वी जेव्हा दिल्लीमध्ये या योजनेचा शुभारंभ केला होता, तेव्हा जम्मू-काश्मीरच्या ड्रोन दीदी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. हे सर्व प्रयत्न काश्मीरमधील महिलांचे उत्पन्न वाढवत आहेत, त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देत आहेत. देशातील तीन कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याच्या उद्दिष्टाकडे आमचे सरकार जलद गतीने अग्रेसर होत आहे.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.17755700_1718903079_body-7.jpg)
बंधू आणि भगिनींनो,
पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रात भारत जगातील एक मोठी सत्ता बनण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. या दोन्ही क्षेत्रात जम्मू-काश्मीरकडे खूप मोठे सामर्थ्य आहे. आज जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यात शानदार क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. इथे खेलो इंडियाच्या सुमारे 100 केंद्रांची निर्मिती केली जात आहे. जम्मू-काश्मीरच्या सुमारे साडेचार हजार युवकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. हा आकडा खूप मोठा आहे. शीतकालीन क्रीडा प्रकारांमध्ये तर जम्मू काश्मीर एक प्रकारे भारताची राजधानी बनत आहे. यावर्षीच्या फेब्रुवारीमध्येच इथे जे चौथ्या खेलो इंडिया शीतकालीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये देशभरातील 800 हून अधिक क्रीडापटूंनी सहभाग नोंदवला होता. अशा आयोजनांमुळे भविष्यात येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धां आयोजनाच्या नव्या संधी निर्माण होतील.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.81368800_1718903093_body-8.jpg)
मित्रांनो,
ही नवी ऊर्जा, हा नवा उत्साह, यासाठी तुम्ही सर्वजण शुभेच्छांसाठी पात्र आहात. पण शांती आणि मानवतेच्या शत्रूंना जम्मू-काश्मीरची प्रगती आवडत नाही. जम्मू काश्मीरचा विकास खंडित व्हावा, येथे शांतता प्रस्थापित होऊ नये यासाठी आज देखील ते शेवटचे प्रयत्न करत आहेत. नुकत्याच ज्या दहशतवादी घटना घडल्या, त्या सरकारने फारच गांभीर्याने घेतल्या आहेत. गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनासोबत संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. जम्मू काश्मीरच्या शत्रूंना धडा शिकवण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली जाणार नाही, याचे मी तुम्हाला आश्वासन देतो. जम्मू-काश्मीरची नवी पिढी स्थिर शांतीच्या वातावरणात जीवन जगेल. जम्मू काश्मीर ने प्रगतीचा जो मार्ग निवडला आहे, त्याला आम्ही आणखी भक्कम करु. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या अनेक विविध नव्या उपक्रमांसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि उद्या संपूर्ण विश्वाला आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदेश श्रीनगरच्या भूमीतून दिला जाईल, यासारखा सुवर्ण क्षण दुसरा काय असू शकतो! जागतिक मंचावर माझे श्रीनगर पुन्हा एकदा चमकेल. माझ्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद!