देशाच्या वेगवेगळ्या भागातून केवडिया मधील एकता नगर येथे आलेले पोलीस दलातले पोलीस,एनसीसीचे युवक,कला क्षेत्रातले सर्व कलाकार,देशाच्या विविध भागात एकता दौड, रन फॉर युनिटी मध्ये सहभागी होत असलेल्या नागरिक बंधू-भगिनी,देशातल्या सर्व शाळांमधले विद्यार्थी-विद्यार्थिनी, इतर मान्यवर आणि सर्व देशबांधवानो,
मी एकता नगर मध्ये आहे, मात्र मन मोरबी पीडितांमध्ये गुंतले आहे. आयुष्यात फार कमी वेळा अशी वेदना मी अनुभवली असेल. एकीकडे शोकाकुल मन आणि दुसरीकडे कर्म आणि कर्तव्य यांचा मार्ग आहे. या कर्तव्य पथाची जबाबदारी पेलत मी आपणा सर्वांसमवेत आहे मात्र दुःखी मन त्या शोकग्रस्त कुटुंबांसमवेत आहे.
दुर्घटनेत ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. दुःखाच्या या क्षणी सरकार सर्वतोपरी शोकाकुल कुटुंबियांसमवेत आहे. गुजरात सरकार काल संध्याकाळपासूनच बचाव आणि मदत कार्यात सर्व शक्तीनिशी गुंतले आहे. केंद्र सरकारकडूनही राज्य सरकारला सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे.एनडीआरएफची पथके बचाव कार्यात मग्न आहेत. सैन्य आणि हवाई दल देखील मदतकार्यात सहभागी झाले आहे. ज्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तिथेही तत्परतेने काम सुरु आहे. लोकांच्या अडचणी कमीतकमी व्हाव्यात यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती प्राप्त होताच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई रात्रीच मोरबीला पोहोचले. कालपासूनच त्यांनी मदत आणि बचाव कार्याची सूत्रे हाती घेतली आहेत. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. देशातल्या जनतेला मी आश्वस्त करतो की मदत आणि बचाव कार्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही.आपण सर्वांनी एकजूटीने या कठीण क्षणाला तोंड देण्याची, कर्तव्य पथावर अविचल राहण्याची प्रेरणा राष्ट्रीय एकता दिनाचा हा कार्यक्रम आपल्याला देत आहे.खडतर प्रसंगातही सरदार पटेल यांचे धैर्य, त्यांची तत्परता यांची शिकवण घेत आम्ही काम करत आलो, पुढेही करत राहू.
मित्रहो,
2022 मधला राष्ट्रीय एकता दिन मी विशेष संधी या रुपात पाहत आहे. हे वर्ष म्हणजे आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली ते वर्ष आहे. नवे संकल्प घेऊन आपण आगेकूच करत आहोत.आज एकता नगर मध्ये जे संचलन झाले ते आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देत आहे की आपण सर्वजण जेव्हा मिळून वाटचाल करतो, एकत्र पुढे जात राहतो तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य करता येतात. देशभरातून आलेले काही कलाकार आज इथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार होते. भारतातले विविध नृत्याविष्कार होणार होते. मात्र कालच्या दुःखद घटनेनंतर हे कार्यक्रम रद्द करण्यात आले. हे सर्व कलाकार इथवर आले, मागील दिवसात त्यांनी मेहनत केली मात्र त्यांना आज कलाविष्कार सादर करण्याची संधी मिळाली नाही, त्यांचे दुःख मला समजू शकते मात्र परिस्थितीच अशी आहे.
मित्रहो,
ही एकजूट, ही शिस्त, कुटुंब, समाज, गाव, राज्य आणि देश अशा प्रत्येक स्तरावर आवश्यक आहे आणि देशाच्या काना-कोपऱ्यात आपण याचे दर्शन घडवत आहोत. आज देशभरात 75 हजार एकता दौड,रन फॉर युनिटी होत आहेत, लाखो लोक यात सहभागी होत आहेत. देशातली जनता, लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संकल्पशक्तीतून प्रेरणा घेत आहे. देशातली जनता अमृतकाळातले ‘पंच प्रण’ जागृत करण्यासाठी देशाची एकता आणि अखंडता यासाठी संकल्प करत आहे.
मित्रहो,
राष्ट्रीय एकता दिन, ही संधी, केवडिया-एकतानगरची ही भूमी, स्टँच्यू ऑफ युनिटी आपल्याला सदैव याची जाणीव करून देतात की स्वातंत्र्य काळात भारताकडे सरदार पटेल यांच्यासारखे नेतृत्व नसते तर काय झाले असते ? साडे पाचशेहून जास्त संस्थाने विलीन झाली नसती तर काय झाले असते ? आपल्या बहुतांश राजे-रजवाड्यांनी त्यागाची पराकाष्ठा दर्शवली नसती, भारतमाते प्रती आस्था दाखवली नसती तर काय झाले असते ? आज आपण जो भारत पाहतो त्याची आपण कल्पनाही करू शकलो नसतो. हे कठीण कार्य, हे अशक्यप्राय कार्य फक्त आणि फक्त सरदार पटेल यांनीच पूर्णत्वाला नेले.
मित्रहो,
सरदार साहेबांची जयंती आणि ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आपल्यासाठी केवळ तारीख नव्हे. भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याचे हे महापर्वही आहे. भारतासाठी एकता ही कधीही विवशता नव्हती तर एकता ही भारतासाठी नेहमीच विशेषता राहिली आहे.एकता आपले वैशिष्ट्य राहिले आहे. एकतेची ही भावना भारताच्या जन मानसात, आपल्या अंतर्मनात किती खोलवर वास करत आहे याची जाणीव आपल्याला बरेचदा होत नाही, ही जाणीव कधी-कधी धूसर होते.मात्र आपण पहा ना, देशात जेव्हा एखादे नैसर्गिक संकट येते तेव्हा अवघा देश एकजुटीने उभा राहतो. नैसर्गिक संकट उत्तरेत आलेले असो किंवा दक्षिणेत, पूर्व भागात असो किंवा पश्चिम भागात, संपूर्ण भारत एकजुटीने सेवा, सहकार्य,सहानुभूतीच्या भावनेने एकत्र उभा राहतो.कालचेच पहा ना, दुर्घटना मोरबी इथे झाली त्यानंतर प्रत्येक देशवासीय, या दुर्घटनेतल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे.स्थानिक लोक, दुर्घटना स्थळी, रुग्णालयात सर्वतोपरी मादीसाठी सरसावले आहेत. हीच तर एकजूटीची ताकद आहे. कोरोनाचे इतके मोठे उदाहरण तर आपल्यासमोर आहेच.टाळ्या- थाळ्या वाजवण्याच्या भावनिक एकजुटीसह रेशन, औषधे आणि लस सहकार्यापर्यंत देश एखाद्या कुटुंबाप्रमाणे पुढे आला. सीमेवर किंवा सीमापार भारताचे सैन्य शौर्य प्रदर्शन करते तेव्हा संपूर्ण देशात एकसारखीच भावना असते. ऑलिम्पिकमध्ये भारताचे युवक तिरंगा ध्वजाची शान उंचावतात तेव्हा संपूर्ण देशात एकसारखाच आनंदोत्सव साजरा होतो. देश क्रिकेटचा सामना जिंकतो तेव्हा संपूर्ण देशभरात एकसमान जोश असतो. आनंदोत्सवाच्या सांस्कृतिक पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी भावना एकसारखीच असते. देशाची ही एकता, ही एकजूट, परस्पराप्रती आपुलकी, एक राष्ट्र म्हणून भारताची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत याचे दर्शन आपल्याला घडवते.
आणि मित्रांनो,
भारताची हीच एकता आपल्या शत्रू देशांना खटकते. वर्तमानातच नाही तर शेकडो वर्षांपूर्वी गुलामगिरीच्या मोठ्या कालखंडात देखील शत्रू देशांना भारताची एकता रुचत नव्हती. त्यामुळेच गुलामगिरीच्या कालखंडात भारतावर आक्रमण करणाऱ्या या विदेशी आक्रमकांनी भारतात दुही निर्माण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यांनी भारताचे विभाजन करण्यासाठी, भारताला तोडण्यासाठी सर्व प्रयत्न केले. तरीही आपण त्याचा सामना करु शकलो, कारण एकतेचे अमृत आपल्या आत जिवंत होते, जिवंत धारेच्या रुपात आपल्या आत प्रवाहीत होते. पण तो कालखंड खुपच मोठा होता. जे विष त्या काळात पसरवण्यात आले त्याचे दुष्परिणाम देश आजही भोगत आहे. त्यामुळेच आपण देशाची फाळणी पाहीली आणि भारताचे शत्रू त्याचा गैरफायदा घेतानाही पाहीले. म्हणूनच आज आपल्याला सावधगिरीने राहीले पाहिजे. भूतकाळाप्रमाणेच भारताचा उत्कर्ष आणि विकास पाहू न शकणाऱ्या विदेशी शक्ती आजही अस्तित्त्वात आहेत. त्या शक्ती आजही आपल्यात दुही पसरवण्याचे, गट पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. जातींच्या आधारे आपल्यामध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी वेगवेगळे नकारात्मक विचार पसरवले जात आहेत. प्रांतांच्या नावावर आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कधी कधी एका भारतीय भाषेला दूसऱ्या भारतीय भाषेचा शत्रू बनवण्यासाठी अभियान चालविले जाते. इतिहास देखील याच स्वरूपात मांडला जातो, जेणेकरून देशातील जनतेत एकोपा न वाढता ते एकमेकांपासून दूर जातील.
आणि बंधू - भगीनींनो,
आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे आपल्यासाठी आवश्यक आहे. हे जरुरी नाही की देशाला कमजोर बनवणाऱ्या शक्ती नेहमीच प्रत्यक्ष रुपात शत्रू म्हणून आपल्यासमोर येतील. कित्येक वेळा ही ताकद गुलामगिरीच्या मानसिकतेच्या रुपात आपल्या मनात घर करून राहते. कित्येक वेळा ही ताकद आपल्या व्यक्तिगत स्वार्थाद्वारे संधी साधण्याचा प्रयत्न करते. तुष्टीकरणच्या रुपात तर कधी परिवारवादाच्या रुपात, कधी लालुच तर कधी भ्रष्टाचाराच्या रुपात दार ठोठावते, आणि देशाला विघटित करते, दुर्बल बनवते. पण आपण त्यांना एक भारतीय म्हणून उत्तर दिले पाहिजे. आपण त्यांना भारत मातेची संतान म्हणून उत्तर दिले पाहिजे. आपण त्यांना सच्चा हिंदूस्थानी म्हणून उत्तर दिले पाहिजे. आपल्याला एकजूट राहिले पाहिजे, एकत्र राहिले पाहिजे. भेदाच्या विषाला उतारा म्हणून आपण एकतेचे अमृत दिले पाहिजे. हीच नव्या भारताची ताकद आहे.
मित्रांनो,
आज राष्ट्रीय एकता दिनी, मी सरदार साहेबांनी आपल्याला सोपवलेल्या दायित्वाचा पुनरुच्चार करु इच्छितो. त्यांनी आपल्याला देशाची एकता वृद्धिंगत करण्याची आणि एक राष्ट्र म्हणून देशाला मजबूत करण्याची जबाबदारी सोपवली होती. ही एकता तेव्हांच मजबूत होईल जेंव्हा प्रत्येक नागरिक समान कर्तव्य भावनेने जबाबदारी उचलेल. आज देश याच कर्तव्य भावनेने ' सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ हा मंत्र जपत विकासाच्या दिशेने आगेकूच करत आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक वर्गासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी भेदभावाशिवाय एक समान धोरणानुसार सुविधा मिळत आहेत. आज जर गुजरातमधील सुरतच्या सामान्य नागरिकाला मोफत लस मिळत आहे तर अरुणाचल प्रदेशच्या सियांगमध्येही त्याच सहजतेने लस उपलब्ध आहे. आज जर गोरखपूरमध्ये एम्स कार्यरत आहे तर बिलासपूर, दरभंगा, गुवाहाटी आणि राजकोटसह देशाच्या इतर शहरांमध्येही ही संस्था कार्यरत आहे. आज एकीकडे तामिळनाडूमध्ये डिफेंस कॉरिडॉर बनत आहे तर उत्तर प्रदेशातही डिफेंस कॉरिडॉरचे काम वेगाने प्रगती करत आहे. आज ईशान्येकडील राज्यांमध्ये कुठल्यातरी स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवला जात असो किंवा तामिळनाडूमध्ये कुठल्यातरी समयल-अरई” मध्ये स्वयंपाक बनवला जात असो, भाषा भलेही वेगळी असो, पदार्थ भलेही वेगळे असो, पण, माता भगिनींना धूरापासून मुक्ती देणारा उज्ज्वला सिलेंडर सर्वत्र आहे. आपले धोरण कोणतेही असो, उद्देश मात्र एकच आहे - समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहचून त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे.
मित्रांनो,
आपल्या देशात कोट्यवधी लोकांनी पायाभूत सुविधांसाठी देखील अनेक दशके वाट पाहिली आहे. पायाभूत सुविधांदरम्यानची दरी जितकी कमी असेल एकता तितकीच मजबूत होईल. म्हणूनच आज देशात संपृक्ततेच्या सिद्धांतानुसार काम केले जात आहे. उद्दिष्ट हेच की - प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचला पाहिजे. म्हणूनच आज सर्वांसाठी निवारा, सर्वांसाठी डिजिटल संपर्क सुविधा, सर्वांसाठी स्वच्छ इंधन, सर्वांसाठी वीज जोडणी यासारखे अनेक अभियान चालवले जात आहेत. आज शंभर टक्के नागरिकांपर्यंत पोहचण्याची ही मोहीम केवळ एकसारख्या सुविधांची मोहीम नाही. ही मोहीम एकत्रित उद्दिष्ट, एकत्रित विकास आणि एकत्रित प्रयत्न याचीही मोहीम आहे. आज जीवनाच्या मूलभूत गरजांसाठी शंभर टक्के कव्हरेज देश आणि संविधानातल्या सामान्य माणसाच्या विश्वासाचे माध्यम बनत आहे. सामान्य माणसाच्या आत्मविश्वासाचे माध्यम बनत आहे. प्रत्येक भारतीयाला समान संधी प्राप्त व्हाव्यात - समानतेची भावना असावी हीच सरदार पटेल यांच्या स्वप्नातील भारताची संकल्पना आहे. आज देश ही संकल्पना साकार होताना पाहत आहे.
मित्रांनो,
गेल्या 8 वर्षांत देशाने अशा प्रत्येक समाजाला प्राधान्य दिले आहे ज्या समाजाला अनेक दशकांपर्यंत उपेक्षा सहन करावी लागली होती. त्यामुळे, देशाने आदिवासींच्या गौरवाशाली कर्तृत्वाचे स्मरण करण्यासाठी आदिवासी दिन साजरा करण्याची परंपरा सुरू केली आहे. देशाच्या अनेक राज्यांमध्ये आदिवासींनी स्वातंत्र्यसंग्रामात बजावलेल्या भूमिकेची दखल घेऊन संग्रहालयेही स्थापन केली आहेत. उद्या मी मानगढला जाणार असून त्यानंतर जांबूघोडालाही जाणार आहे. मी देशवासियांना विनंती करतो की त्यांनी मानगढ धाम आणि जांबूघोडाच्या इतिहासाची माहिती अवश्य करून घ्यावी. परदेशी आक्रमकांकडून केल्या गेलेल्या कित्येक नरसंहारांचा सामना केल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. आजच्या तरूण पिढीला हे सर्व माहित असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण स्वातंत्र्याची किमत काय आहे ते समजू शकू, आणि ऐक्याची किमतही समजू शकू. .
मित्रांनो,
आपल्याकडे असे म्हटले गेले आहे की,
ऐक्यं बलं समाजस्य तद्भावे स दुर्बलः! तस्मात ऐक्यं प्रशंसन्ति दृढं राष्ट्रं हितैषिणः!!
म्हणजे, कोणत्याही समाजाची ताकद त्याची एकता हीच असते. म्हणून, मजबूत राष्ट्राची इच्छा बाळगणारे नेहमी ऐक्याच्या याच भावनेची प्रशंसा करतात आणि त्यासाठी प्रयत्नही करतात. त्यामुळे, देशाचे ऐक्य आणि एकजूट ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. हे एकता नगर, भारताचे असे मॉडेल शहर म्हणून विकसित होत आहे, जे देशातच नव्हे तर संपूर्ण जगातच अभूतपूर्व असेल. लोकांच्या ऐक्याने , लोकसहभागाच्या शक्तीमुळे विकसित होत असलेले हे एकता नगर आज भव्य होत आहे आणि दिव्यही होत आहे. स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या रूपात विश्वातील सर्वात विशाल अशा पुतळ्याची प्रेरणा आपल्यासमोर आहे. भविष्यात, एकता नगर भारताचे असे शहर बनणार आहे, जे अभूतपूर्वही असेल आणि अविश्वसनीयही असेल. जेव्हा देशात पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एखाद्या आदर्श अशा शहराची चर्चा होईल, तेव्हा एकता नगरचे नाव प्रकर्षाने समोर येईल. जेव्हा देशात वीज बचत करणाऱ्या एलईडी दिव्यांमुळे प्रकाशमय झालेल्या एखाद्या आदर्श शहराची चर्चा होईल, तेव्हा सर्वात प्रथम एकता नगरचेच नाव आठवेल. जेव्हा देशात सौर उर्जेवर चालणाऱ्या स्वच्छ वाहतूक व्यवस्थेची चर्चा होईल,तेव्हा सर्वात प्रथम एकता नगरचेच नाव समोर असेल. जेव्हा देशात पशुपक्ष्यांच्या संरक्षणाविषयी चर्चा होईल, वेगवेगळ्या प्रजातींच्या जीव-जंतुंच्या संरक्षणाची चर्चा होईल, तेव्हा सर्वात प्रथम एकता नगरचे नाव समोर येईल. कालच मला मियावाकी वन आणि मेज उद्यानाचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली. येथील एकता मॉल, एकता नर्सरी, विविधतेतूनही एकतेचे प्रदर्शन घडवणारे विश्व वन, एकता फेरी, एकता रेल्वे स्थानक हे सारे उपक्रम राष्ट्रीय ऐक्य मजबूत करण्याची प्रेरणा म्हणून समोर आहेत. आता तर एकता नगरमध्ये आणखी एक तारा जोडला जात आहे. आज मी त्याबाबतीत आपल्याला सांगू इच्छितो. आता आपण जेव्हा सरदार साहेबांचे भाषण ऐकत होतो. त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या, त्या भावनांना यात आम्ही प्रतिबिंबित करत आहोत. स्वातंत्र्यानंतर देशाच्या ऐक्याबाबत सरदारसाहेबांनी जी भूमिका निभावली, त्यात खूप मोठे सहकार्य देशातील राजे रजवाड्यांनी दिले होते. ज्या राजघराण्य़ांनी शतकानुशतके सत्ता गाजवली होती, देशाच्या ऐक्यासाठी त्यांनी एका नव्या व्यवस्थेत आपल्या अधिकारांना कर्तव्यभावनेने समर्पित केले. त्यांच्या या योगदानाची स्वातंत्र्यानंतर कित्येक दशके उपेक्षाच झाली आहे. आता एकता नगरात त्या राज घराण्यांना, त्या राज्यव्यवस्थांच्या त्यागांच्या कथांना समर्पित असे एक संग्रहालय उभारण्यात येईल. हे संग्रहालय देशाच्या ऐक्यासाठी करण्यात आलेल्या त्यागाची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहचवेल आणि मी गुजरात सरकारचाही आभारी आहे. त्यांनी या दिशेने भरपूर प्राथमिक काम पूर्ण केले आहे. मला विश्वास आहे की, सरदारसाहेबांचे प्रेरणादायी जीवन आपल्याला सात्तत्याने मार्गदर्शन करत राहील. आपण सर्व मिळून सशक्त भारत बनवण्याचे स्वप्न पूर्ण करू. याच विश्वासासह, मी आपल्या सर्वांना विनंती करतो की, मी जेव्हा सरदार पटेल असे उच्चारेन , तेव्हा तुम्ही दोन वेळा म्हणा , अमर रहे, अमर रहे!
सरदार पटेल-अमर रहे, अमर रहे |
सरदार पटेल-अमर रहे, अमर रहे |
सरदार पटेल-अमर रहे, अमर रहे |
भारत माता की जय,
भारत माता की जय,
भारत माता की जय,
खूप खूप धन्यवाद !