नमस्कार.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी आजच्या अर्थसंकल्पीय वेबिनारचा विषय अतिशय महत्वपूर्ण आहे. 21व्या शतकातील बदलता भारत, आपल्या नागरिकांचे तंत्रज्ञानाच्या शक्तीने सातत्याने सक्षमीकरण करत आहे. गेल्या काही वर्षांत आमच्या सरकारने प्रत्येक अर्थसंकल्पात तंत्रज्ञानाच्या मदतीने देशवासियांची जगण्यातील सुलभता वाढविण्यावर भर दिला आहे. या अर्थसंकल्पात देखील तंत्रज्ञान तर आहेच, मात्र त्या सोबतच मानवी भावनांना प्राथमिकता देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मित्रांनो, एक काळ असा होता, जेव्हा आपल्या देशात सरकरच्या प्राधान्यक्रमांमध्ये खूप जास्त विरोधाभास दिसून येत असे. समाजाचा एक घटक असा होता, ज्याची इच्छा होती, की त्यांच्या आयुष्यात पदोपदी सरकारने कुठला न कुठला हस्तक्षेप करावा, सरकारचा प्रभाव असावा, म्हणजे सरकारने त्यांच्यासाठी काही ना काही करत राहावे. मात्र आधीच्या सरकारांच्या काळात हा घटक नेहमीच वंचित राहिला. त्यामुळे सगळं आयुष्य संघर्ष करण्यातच निघून जात होतं. समाजात अशा लोकांचा देखील एक वर्ग होता, हा दुसऱ्या प्रकारचा होता. जो स्वतःच्या बळावर पुढे जाऊ इच्छित होता, मात्र आधीच्या सरकारांच्या काळात हा वर्ग देखील कायम पावलो पावली दबाव, सरकारी हस्तक्षेप, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, अडथळे यांचा सामना करत होता. आमच्या सरकारच्या गेल्या काही वर्षांच्या प्रयत्नांमुळे आता ही परिस्थिती बदलू लागली आहे. आज सरकारची धोरणे आणि निर्णय यांचा सकारात्मक परिणाम त्या प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे, जिथे त्यांची सर्वात जास्त गरज आहे. आमच्या प्रयत्नाने गरीब आणि वंचित लोकांचे आयुष्य सुखकर होत आहे, त्यांच्या आयुष्यातील सुलभता वाढवत आहे. लोकांच्या आयुष्यात सरकारी हस्तक्षेप आणि दबाव देखील आता कमी झाला आहे. आज लोक सरकारला वाटेतील अडथळा समजत नाहीत. उलट, लोक आमच्या सरकारकडे नव्या संधी निर्माण करणारे उत्प्रेरक म्हणून बघतात. आणि यात निश्चितपणे तंत्रज्ञानाची खूप मोठी भूमिका आहे. आता बघा, तंत्रज्ञान, एक देश एक रेशन कार्डचा आधार झाले आणि यामुळे कोट्यवधी गरिबांना पारदर्शकपणे स्वस्त धान्य मिळेल हे सुनिश्चित झाले. आणि दुसरं, जे स्थलांतरित कामगार आहेत. जे स्थलांतरित मजूर असतात, त्यांच्यासाठी हे एक मोठे वरदान ठरले आहे. तंत्रज्ञान, जनधन खाते, आधार आणि मोबाईल या तीन गोष्टींमुळे कोट्यवधी गरिबांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करणे शक्य झाले आहे. त्याच प्रकारे, तंत्रज्ञान, आरोग्य सेतू आणि कोविन ॲप याचे महत्वपूर्ण साधन बनले अणि यामुळे कोरोना काळात रुग्णांचा शोध घेण्यात आणि लसीकरण करण्यात मोठी मदत मिळाली. आपण बघत आहोत, आज तंत्रज्ञानाने रेल्वे आरक्षण अधिक आधुनिक बनले आहे आणि यामुळे सर्वसामान्य लोकांची किती मोठी डोकेदुखी दूर झाली आहे. सामायिक सेवा केंद्रांचे जाळे देखील गरीबातल्या गरीब व्यक्तीला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकारी सेवांशी मोठ्या सहजतेने जोडत आहे. असे अनेक निर्णय घेऊन आमच्या सरकारने देशवासियांची जगण्यातील सुलभता वाढवली आहे.
मित्रांनो, आज भारताचा प्रत्येक नागरिक हे बदल स्पष्टपणे अनुभवू शकतो आहे. आता सरकारशी संवाद साधणे किती सहज झाले आहे. म्हणजे देशबांधव सरकारपर्यंत आपलं म्हणणं सहजतेने पोचवू शकतात, आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण देखील तत्काळ होत आहे. उदाहरणार्थ करासंबंधी तक्रारी आधी खूप जास्त येत असत, आणि त्यामुळे त्या माध्यमातून करदात्यांना अनेक प्रकारे त्रास दिला जात असे. म्हणूनच आम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण कर प्रक्रिया चेहराविरहित केली आहे. आता आपल्या तक्रारी आणि त्यांचे निराकरण याच्या आड कुणी व्यक्ती नाही, तर केवळ तंत्रज्ञान आहे. हे मी आपल्याला एक उदाहरण दिले आहे. मात्र दुसऱ्या विभागांत देखील तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण अधिक उत्तम प्रकारे समस्यांचे निराकरण करू शकतो. वेगवेगळे विभाग आपल्या सेवा जागतिक स्तराच्या कशा असतील यासाठी एकत्र येऊन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. याच्या एक पाऊल पुढे जाऊन, आपण त्या क्षेत्रांमध्ये देखील आपली ओळख निर्माण करू शकतो जिथे सरकारशी संवाद साधने अधिक सोपे केले जाऊ शकते.
मित्रांनो, आपण जाणताच की आम्ही मिशन कर्मयोगी द्वारे सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहोत. या प्रशिक्षणाच्या मागे आमचा उद्देश हाच आहे, की कर्मचाऱ्यांना नागरीकाभिमुख बनविले जावे. हा प्रशिक्षण अभ्यासक्रम सतत अद्ययावत करत राहणे गरजेचे आहे. मात्र जेव्हा यात होणारे बदल लोकांच्या सूचनांवर आधारित असतील तेव्हाच याचा चांगला परिणाम मिळेल. प्रशिक्षण अभ्यासक्रम सुधारण्यासाठी लोकांच्या सूचना मिळत राहाव्या यासठी आम्ही एक व्यवस्था तयार करू शकतो.
मित्रांनो, तंत्रज्ञानामुळे प्रत्येक व्यक्तीपर्यंत योग्य आणि अचूक माहिती पोहोचवून सर्वांना पुढे जाण्याची समान संधी मिळत आहे. आमचे सरकार तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. आम्ही भारतात आधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा तयार करत आहोत. सोबतच डिजिटल क्रांतीचा फायदा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचला पाहिजे, हे देखील सुनिश्चित करत आहोत. आज GeM पोर्टलमुळे दुर्गम क्षेत्रातले लहान दुकानदार किंवा हातगाडीवाल्यांना देखील आपली उत्पादने थेट सरकारला विकण्याची संधी मिळाली आहे. e-NMA मुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणच्या ग्राहकांशी जोडण्याची संधी मिळाली आहे. आता शेतकरी एकाच ठिकाणी राहून आपल्या पिकांची सर्वात चांगली किंमत मिळवू शकतात.
मित्रांनो,
सध्या 5 जी आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांची चर्चा तर अनेक दिवसांपासून होत आहे. उद्योग, औषध निर्मिती, शिक्षण, कृषी आणि इतर अनेक क्षेत्रात मोठे परिवर्तन घडणार आहे असेही म्हटले जात आहे. मात्र आपण आता काही विशेष लक्ष्य निश्चित करायला हवे. या तंत्रज्ञानाचा उपयोग जनसामान्यांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी कोणत्या पद्धतीने करता येईल ? अशी कोणती क्षेत्रे आहेत ज्याकडे आपल्याला अधिक लक्ष देणे आवश्यक आहे ? कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ज्यांचे निराकरण होऊ शकेल अशा समाजातल्या 10 समस्या आपण जाणू शकतो का ?
हॅकेथॉन आयोजित केले जाते तेव्हा देशाच्या युवा वर्गासमोर तंत्रज्ञानाद्वारे उपाय सुचवण्यासाठी समस्या मांडल्या जातात आणि लाखो युवक त्यावर उत्तम उपाय सुचवतात.
मित्रांनो,
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी डिजीलॉकर सुविधा घेऊन आलो आहोत. आता कंपन्यांसाठी डिजीलॉकर सुविधा आहे. इथे कंपन्या, सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग आपल्या फाइली स्टोअर करू शकतात आणि विविध नियामक आणि सरकारी विभागांसमवेत सामाईकही करू शकतात. डिजीलॉकर संकल्पना आणखी विस्तारण्याची आवश्यकता आहे. लोकांना याचा फायदा आणखी कशा प्रकारे पोहोचवला जाऊ शकेल हे आपण पाहिले पाहिजे.
मित्रांनो,
गेल्या काही वर्षात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पाठबळ देण्यासाठी आम्ही अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. भारतातल्या लघु उद्योगांना, मोठ्या कंपनीत रुपांतर होण्यासाठी कोण-कोणत्या अडचणी येतात यावर विचार मंथन आवश्यक आहे. छोटे व्यवसाय आणि छोटे उद्योग यांसाठी आम्ही अनुपालन खर्च कमी करू इच्छितो. वेळ म्हणजे पैसा असे व्यवसायात म्हटले जाते हे आपल्याला माहित असेलच म्हणूनच अनुपालनासाठी लागणाऱ्या वेळेची बचत म्हणजेच अनुपालन खर्चाची बचत. अनावश्यक अनुपालनाची यादी आपण करणार असाल तर हीच योग्य वेळ आहे कारण 40 हजार अनुपालन आम्ही आधीच रद्दबातल केले आहेत.
मित्रांनो, सरकार आणि जनता यांच्यातल्या विश्वासाचा अभाव म्हणजे गुलामीच्या मानसिकतेचा परिणाम आहे. मात्र आज क्षुल्लक चुकांना गुन्ह्याच्या कक्षेबाहेर करून, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कर्जासाठी हमीदार या रूपाने सरकारने लोकांचा विश्वास संपादन केला आहे. मात्र आपल्याला इथेच थांबायचे नाही. जगातल्या बाकीच्या देशांनी समाजासमवेत विश्वास दृढ करण्यासाठी काय केले आहे हेही आपण पाहायला हवे. त्यांच्याकडून हे शिकून आपल्या देशात आपण असे प्रयत्न करू शकतो.
मित्रांनो,
अर्थसंकल्प किंवा एखाद्या सरकारी योजनेचे यश हे ती योजना किती चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे यावर काही प्रमाणात अवलंबून असते. मात्र त्यापेक्षा त्या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे हे जास्त महत्वाचे असते आणि यामध्ये लोकांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. आपण सर्वांनी दिलेल्या सूचना आणि माहितीच्या आधारावर जीवन सुलभतेला आणखी चालना मिळेल याचा मला विश्वास आहे. आपल्याला निर्मिती केंद्र ठरायचे आहे,झिरो डीफेक्ट, झिरो इफेक्ट याला आपले प्राधान्य असले पाहिजे, दर्जात कोणतीही तडजोड नको असे आपल्याला वाटते आणि यासाठी तंत्रज्ञान आपल्या मदतीला येऊ शकते असे मी सांगू इच्छितो. तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण उत्पादनातल्या छोट्या छोट्या बारकाव्यांकडे लक्ष पुरवून सफाईदार उत्पादन आणू शकतो आणि तेव्हाच आपण जागतिक बाजारपेठेत पाय रोवू शकतो.
21 वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. जीवनात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत जाणार आहे. इंटरनेट आणि डीजीटल तंत्रज्ञानापुरतेच आपण मर्यादित राहता कामा नये. आज ऑप्टीकल फायबरचे जाळे गावोगावी पोहोचत आहे. पंचायत,वेलनेस सेंटरपर्यंत हे जाळे पोहोचेल, टेली मेडिसिन उपयोगात येईल, अगदी आरोग्य क्षेत्रही संपूर्णपणे तंत्रज्ञान आधारित होऊ लागले आहे. आज देशात संरक्षण क्षेत्रात आपण बऱ्याच गोष्टी आयात करतो. आरोग्य क्षेत्रातही मोठी आयात करतो. तंत्रज्ञान अद्ययावत करून माझ्या देशातले उद्योग जगत या दिशेने जाऊ शकत नाही का ? म्हणूनच ऑप्टीकल फायबर गावोगावी पोहोचत आहे.खाजगी जगत जोपर्यंत सेवा घेण्यासाठी पुढे येत नाही, नव-नवी सॉफ्टवेअर आणत नाही तोपर्यंत सर्वसामान्य जनता या ऑप्टीकल फायबरद्वारे कोणत्या सेवा घेऊ शकते, कसा लाभ घेऊ शकते याचे मॉडेल आपण विकसित करू शकतो. आम्हाला सगळ्यामध्ये लोक भागीदारी हवी आहे. सर्व ज्ञान सरकारलाच आहे असा आमचा विचार नाही आणि दावाही नाही.म्हणूनच तंत्रज्ञानाधारीत असलेले हे 21 वे शतक, आपण जितक्या वेगाने त्याचा विस्तार कराल, जितके सुलभ कराल,जितक्या लवकर जनतेला सबल करणारे शतक बनवाल, तितकेच देशाचे आणि जनतेचे कल्याण होणार आहे. 2047 मध्ये विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान आपल्याला मोठे सहाय्यकारक ठरणार आहे. आपण भाग्यवान आहोत कारण आपल्याकडे नैसर्गिक देणगी आहे .आपल्याकडे प्रतिभावान युवाशक्ती आहे,कुशल मनुष्यबळही आहे. भारतातल्या गावांमधल्या लोकांमध्येही तंत्रज्ञान आत्मसात करण्याची मोठी क्षमता आहे. याचा लाभ आपण कसा घेऊ शकतो, अर्थसंकल्पातल्या तरतुदींची उत्तम फलनिष्पत्ती कशी राहील, त्यांचा उत्तम लाभ लोकांपर्यंत कसा पोहोचेल यावर आपण विस्तृत चर्चा करावी, तपशीलवार चर्चा करावी अशी माझी इच्छा आहे. यावर जितकी गहन चर्चा तितकेच अर्थसंकल्पाचे सार्थक होईल.
आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. खूप-खूप धन्यवाद !