मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री राजनाथ सिंह जी, श्री अजय भट्ट जी, नौदल प्रमुख, नौदलाचे उप प्रमुख, संरक्षण सचिव, एसआयडीएमचे अध्यक्ष, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व सहकारी, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो
भारतीय सैन्यदले आत्मनिर्भर करण्याचे लक्ष्य, 21 व्या शतकातील भारतासाठी अतिशय गरजेचे आहे, अतिशय आवश्यक आहे. आत्मनिर्भर नौदलासाठी पहिल्या स्वावलंबन चर्चासत्राचे आयोजन होणे, मला असं वाटतं, ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे आणि एक महत्वाचं पाऊल आहे आणि म्हणूनच आपणा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो, आपणा सर्वांना अनेक शुभेच्छा देतो.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.14814100_1658152866_684-8.jpg)
मित्रांनो,
सैन्य सज्जतेत, विशेषतः नौदलात संयुक्त सरावाला विशेष महत्त्व असते. हे चर्चासत्र देखील एक प्रकारे संयुक्त सरावच आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी या संयुक्त सरावात नौदल, उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, शैक्षणिक क्षेत्र म्हणजेच जगातले लोक आणि सरकारचे प्रतिनिधी, प्रत्येक हितसंबंधीय आज एकत्र येऊन एकाच ध्येयाबद्दल विचार करत आहेत. एकत्रित सरावाचा उद्देश असतो की, भाग घेणाऱ्या सर्व प्रतिनिधींना जास्तीत जास्त वाव मिळावा, एकमेकांना समजून घेता यावे, उत्तम पद्धतींचा अवलंब केला जावा. अशा परिस्थितीत या संयुक्त सरावाचं ध्येय अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला सर्वांना मिळून पुढच्या वर्षी 15 ऑगस्ट पर्यंत नौदलासाठी 75 स्वदेशी तंत्रज्ञान निर्माण करायचे आहेत, हा संकल्पच एक मोठी शक्ती आहे आणि आपला पुरुषार्थ, आपला अनुभव, आपलं ज्ञान याच्या जोरावर हा संकल्प नक्कीच पूर्ण होईल. आज जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा साजरा करत आहे, अमृत महोत्सव साजरा करत आहे, तेव्हा अशा ध्येयप्राप्तीसाठी, आत्मनिर्भरतेच्या आपल्या संकल्पाला अधिक गती मिळेल. मी असं देखील म्हणेन की 75 स्वदेशी तंत्रज्ञान निर्माण करून एक प्रकारे पाहिलं पाऊल टाकलं आहे. आपल्याला ही संख्या सातत्याने वाढविण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल, त्यावेळी आपलं नौदल एका अभूतपूर्व उंचीवर असेल, असा आपला संकल्प असायला हवा.
मित्रांनो,
आपले महासागर, आपल्या सागरी सीमा हे आपल्या आर्थिक आत्मनिर्भरतेसाठी मोठे संरक्षक आणि एक प्रकारे संवर्धक देखील आहेत. म्हणून भारतीय नौदलाची भूमिका सातत्याने वाढत जात आहे. म्हणून नौदलासोबतच देशाच्या वाढत्या गरजांसाठी देखील नौदल स्वावलंबी होणं आवश्यक आहे. मला विश्वास आहे, ह्या चर्चासत्रात होणारे मंथन आणि त्यातून निघणारे अमृत, आपल्या सैन्यदलांना आत्मनिर्भर होण्यात मोलाची मदत करेल.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.31154900_1658152884_684-7.jpg)
मित्रांनो,
आज जेव्हा आपण संरक्षण क्षेत्राच्या आत्मनिर्भर भविष्यावर चर्चा करत आहोत, तेव्हा हे देखील आवश्यक आहे, की गेल्या दशकांत जे झालं, त्यातून आपण धडा देखील घेत राहायला पाहिजे. यामुळे आपल्याला भविष्याचा मार्ग तयार करण्यात मदत मिळेल. आज जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला आपल्याला आपल्या समृद्ध सागरी आणि आरमारी वारशाचे दर्शन होते. भारताचा सागरी व्यापार मार्ग देखील या वारशाचा भाग आहे. आपले पूर्वज समुद्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकले कारण, त्यांना वाऱ्यांची दिशा, अंतराळ विज्ञान याची अतिशय उत्तम जाण होती. कुठल्या ऋतूत वाऱ्याची दिशा कुठली असले, वाऱ्यांच्या मदतीने पुढे जाऊन आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचू शकतो, याचं ज्ञान ही आपल्या पूर्वजांची खूप मोठी शक्ती होती. देशातल्या फार कमी लोकांना ही माहिती आहे की भारताचे संरक्षण क्षेत्र, स्वातंत्र्यापूर्वीपासूनच अतिशय सक्षम होते. देश स्वतंत्र झाला त्या वेळी देशात 18 आयुध निर्माणी कारखाने होते. जिथे आर्टलरी बंदुकांसह अनेक प्रकारच्या सैन्य उपकरणांची निर्मिती आपल्या देशात होत असे. दुसऱ्या महायुद्धात आपण संरक्षण उपकरणांचे एक महत्वाचे पुरवठादार होतो. आपल्या हॉवित्झर तोफा, इशापूर रायफल कारखान्यात तयार करण्यात आलेल्या मशीन गन सर्वश्रेष्ठ मानल्या जात होत्या. आपण मोठ्या संख्येने निर्यात करत होतो. मात्र मग असं काय झालं की एक वेळ आली जेव्हा आपण या क्षेत्रातले जगातले सर्वात मोठे आयातदार बनलो? आणि जर आपण थोडा विचार केला, तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात प्रचंड विनाश झाला. जगातले मोठ मोठे देश अनेक प्रकारच्या संकटांत अडकले होते मात्र त्या संकटांना संधीत रुपांतरीत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यांनी शस्त्र निर्मितीत आणि जगाच्या मोठ्या बाजारपेठेवर ताबा मिळविण्याच्या संघर्षातून तो मार्ग शोधला आणि संरक्षण क्षेत्रात स्वतः एक खूप मोठे उत्पादक आणि निर्यातदार बनले. म्हणजे युद्धाच्या झळा सोसल्या, मात्र त्यातूनच त्यांनी हा रस्ता देखील शोधला. आपण देखील करोना काळात इतकं मोठं संकट आलं, तेव्हा आपण खूपच, अगदी खूपच खालच्या पायरीवर होतो, सगळ्या व्यवस्था नव्हत्या, PPE कीट सुद्धा नव्हते आपल्याकडे. लसींची तर आपण कल्पना देखील करू शकत नव्हतो. मात्र ज्याप्रमाणे पहिले महायुद्ध, दुसऱ्या महायुद्धातून जगातल्या त्या देशांनी एक मोठी शस्त्र शक्ती बनण्याच्या दिशेने मार्ग शोधला, भारतानं या कोरोना काळात याच बुद्धिमत्तेच्या जोरावर वैज्ञानिक पातळीवर लस शोधणे असो, इतर उपकरणे बनविणे असो, प्रत्येक बाबतीत पूर्वी कधीच घडले नाही, ती सगळी कामं केली. मी हे उदाहरण यासाठी देतो आहे, की जगात दहा लोकांकडे ज्या प्रकारची उपकरणे, शस्त्रास्त्र आहेत, तीच शस्त्रे घेऊन मी माझ्या सैनिकांना मैदानात का उतरववावे? त्याचं कौशल्य उत्तम असेल, उत्तम प्रशिक्षण असेल, तर त्या शस्त्राचा कदाचित चांगला उपयोग होईलही. पण मी कुठपर्यंत धोका पत्करत राहणार. जी उपकरणे, जी शस्त्रे त्यांच्या हातात आहेत, तशीच शस्त्रे घेऊन माझा जवान कशाला जाईल? त्याच्याकडे अशी शस्त्रे असावीत, ज्यांचा शत्रूनी विचार देखील केला नसेल. त्याला लक्षात यायच्या आधीच त्याचा खातमा झालेला असेल. ही लढावू वृत्ती, ही जिंकण्याची वृत्ती केवळ सैनिक तयार करुन आणता येत नाही, तर ही वृत्ती, त्यांच्या हातात कुठले शस्त्र आहे, यावर देखील अवलंबून असते. म्हणूनच आत्मनिर्भर भारत, हा केवळ आर्थिक संकल्प नाही मित्रांनो आणि म्हणूनच आपल्याला भारतात पूर्ण परिवर्तन घडवून आणायचे आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्यानंतरच्या दीड दशकात आपण एकही नवीन कारखाना तर उभारलाच नाही, जुने कारखाने देखील कमकुवत होत गेले. 1962 च्या युद्धानंतर नाईलाजानं धोरणांत काही बदल करण्यात आले आणि आपले जुने आयुध निर्माणी कारखाने वाढविण्यावर काम सुरु झाले.
पण तरीही संशोधन, नावीन्य आणि विकास यावर भर दिला गेला नाही. त्यावेळी जग नवीन तंत्रज्ञान, नवनवीन शोध यासाठी खाजगी क्षेत्रावर अवलंबून होते, पण दुर्दैवाने संरक्षण क्षेत्र मर्यादित सरकारी संसाधने, सरकारी विचारसरणीखाली ठेवले गेले. मी गुजरातमधून आलो आहे, अहमदाबाद हे माझे दीर्घकाळ कार्यक्षेत्र राहिले आहे. कधी काळी तरी, तुमच्या पैकी अनेकांनी गुजरातमध्ये समुद्रकिनाऱ्यावर काम केले असेल, मोठ्या चिमण्या आणि गिरण्यांचा उद्योग आणि भारतातील मँचेस्टर अशी अहमदाबादचीओळख होती, अहमदाबाद हे कापडाच्या क्षेत्रात मोठे नाव होते. काय झालं? नवोन्मेषी आस नाही, तंत्रज्ञानाचे अद्ययावतीकरण नाही, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण नाही. अशा उंच उंच चिमण्या जमीनदोस्त झाल्या आहेत, मित्रांनो, आम्ही आमच्या डोळ्यांसमोर पाहिले आहे. एका ठिकाणी घडले तर दुसऱ्या ठिकाणी होणार नाही, असे नाही. म्हणूनच नवोन्मेष ही नित्य निरंतर गरज आहे आणि ती स्वदेशीही असू शकते. विकाऊ वस्तूंमधून कोणतेही नावीन्य असू शकत नाही. आपल्या तरुणांसाठी परदेशात संधी आहेत, पण त्यावेळी देशात संधी फारच मर्यादित होत्या. याचा परिणाम असा झाला की, एकेकाळी जगातील आघाडीची लष्करी शक्ती असलेल्या भारतीय लष्कराला रायफलसारख्या साध्या शस्त्रासाठीही परदेशांवर अवलंबून राहावे लागले. आणि मग सवयच झाली, एकदा का एका मोबाईल फोनची सवय झाली की मग कोणी कितीही म्हटलं की हिंदुस्थानचा खूप चांगला आहे, पण वाटतं नाही तो चांगला आहे. आता सवय झाली आहे, त्या सवयीतून बाहेर पडण्यासाठी मानसशास्त्रीय परिसंवादही घ्यावे लागणार आहे. सर्व अडचणी मानसिक आहे. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनांना अंमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी आपण जसे प्रशिक्षण देतो, त्याचप्रमाणे येथेही हे प्रशिक्षण आवश्यक आहे. जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपल्या हातात असलेल्या शस्त्राची ताकद आपण वाढवू शकतो आणि आपले शस्त्र ती शक्ती निर्माण करू शकतो, मित्रांनो.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.09452700_1658152920_684-5.jpg)
मित्रांनो,
अडचण अशीही होती की त्यावेळी संरक्षणाशी संबंधित बहुतेक सौद्यांवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. सारी गटबाजी, झुंडशाही झाली होती. एकाकडून घेतले तर हा गट मैदानात उतरत असे, दुसऱ्याकडून घेतले तर हा गट उतरायचा आणि मग राजकारण्यांना दूषणे देणे ही आपल्या देशात अगदी सोपी गोष्ट झाली आहे. मग दोन-चार वर्षे तेच चालले. परिणामी, आधुनिक शस्त्रे, उपकरणे यासाठी लष्कराला अनेक दशके वाट पाहावी लागली.
मित्रांनो,
संरक्षणाशी संबंधित प्रत्येक लहानसहान गरजेसाठी परदेशावर अवलंबून राहणे हा आपल्या देशाच्या स्वाभिमानाला, आपल्या आर्थिक नुकसानासह धोरणात्मकदृष्ट्याही गंभीर धोका आहे. 2014 नंतर देशाला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. गेल्या दशकांच्या दृष्टिकोनातून शिकून, आज आम्ही आमच्या सर्व प्रयत्नांच्या बळावर एक नवीन संरक्षण परिसंस्था विकसित करत आहोत. संशोधन आणि विकास, खाजगी क्षेत्र, शैक्षणिक संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअपसाठी, संरक्षण क्षेत्र आज खुले करण्यात आले आहे. आमच्या सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण कंपन्यांना आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात संघटित करून नवीन बळ दिले आहे. आपल्या आयआयटीसारख्या प्रमुख संस्थांना संरक्षण संशोधन आणि नवोन्मेषाशी कसे जोडता येईल हे देखील आम्ही आज सुनिश्चित करत आहोत. इथे अडचण अशी आहे की आपल्या तंत्र विषयक विद्यापीठे किंवा तांत्रिक महाविद्यालये अथवा अभियांत्रिकीच्या जगात, तिथे संरक्षण उपकरणांशी संबंधित अभ्यासक्रमच शिकवले जात नाहीत. मागितले की बाहेरून मिळाले, मग इथे अभ्यास करण्याची गरजच काय. म्हणजे एक सवयच बदलली होती. यामध्ये बदल घडवून आणण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे. डीआरडीओ आणि इस्रोच्या अत्याधुनिक चाचणी सुविधांसह आपल्या तरुणांना आणि स्टार्ट अप्सना जास्तीत जास्त ताकद देण्याचा प्रयत्न केला जात आहे. क्षेपणास्त्र प्रणाली, पाणबुड्या, तेजस लढाऊ विमाने यांसारखी विविध उपकरणे, जी अनेक वर्षे त्यांच्या लक्ष्याच्या तुलनेत अनेक वर्ष मागे राहिले होते, त्यांना गती देण्यासाठी आम्ही अडथळे काढून टाकले. देशाची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका कार्यान्वित होण्याची प्रतीक्षाही लवकरच संपणार आहे, याचा मला आनंद आहे. नेव्हल इनोव्हेशन आणि इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशन असो, आयडेक्स असो किंवा टीडीएसी असो, हे सर्व स्वावलंबनाच्या अशा प्रचंड संकल्पांना चालना देणार आहेत.
मित्रांनो,
गेल्या 8 वर्षात आम्ही केवळ संरक्षण निधी वाढवला नाही, तर हा निधी देशाच्याच संरक्षण उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, याचीही खातरजमा केली आहे. आज संरक्षण उपकरणांच्या खरेदीसाठी राखीव असलेल्या निधीचा मोठा भाग भारतीय कंपन्यांकडून खरेदी करण्यात खर्च होत आहे. आणि हे तर तुम्ही मानुनच चाला, तुम्ही तर सर्व कौटुंबिक लोक आहात, तुम्ही कुटुंबाचे जग चांगल्या प्रकारे समजता आणि जाणता. तुम्ही घरी तुमच्या मुलाला आदर आणि प्रेम देणार नाही आणि आसपासच्या लोकांनी तुमच्या मुलावर प्रेम करावे अशी अपेक्षा ठेवली तर असे होईल का? तुम्ही रोज बिनकामाचा म्हणून त्याची संभावना कराल आणि शेजाऱ्याने त्याला चांगले म्हणावे अशी अपेक्षा कराल, तर असे कसे होईल? आम्ही आमच्या शस्त्रास्त्रांच्या उत्पादनाचा आदर करणार नाही आणि जगाने आमच्या शस्त्रांचा आदर करावा अशी इच्छा ठेवली, तर हे शक्य होणार नाही, सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. आणि ब्रह्मोस हे त्याचे उदाहरण आहे. जेव्हा भारताने ब्रह्मोसचे स्वागत केले, तेव्हा मित्रांनो, ब्रह्मोस स्वीकारण्यासाठी आज जग रांगेत उभे आहे. आपण निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अभिमान असायला हवा. आणि मी भारतीय सैन्याचे अभिनंदन करतो की त्यांनी 300 हून अधिक शस्त्रास्त्रे, उपकरणे यांची यादी तयार केली आहे. ही उत्पादने भारतात बनवली जातील आणि आपल्या सैन्याद्वारे वापरली जातील. आम्ही त्या वस्तू बाहेरून घेणार नाही. या निर्णयाबद्दल मी तिन्ही सेवेतील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.02465000_1658152972_684.jpg)
मित्रांनो,
अशा प्रयत्नांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्या 4-5 वर्षांत आपली संरक्षण आयात सुमारे 21 टक्क्यांनी कमी झाली आहे. एवढ्या कमी वेळात, आणि आम्ही पैसे वाचवण्यासाठी आयात कमी केली नाही, आम्ही त्याचा पर्याय येथे दिला आहे. आज आपण सर्वात मोठे संरक्षण आयातदार ते मोठे निर्यातदार या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत.
हे बरोबर आहे की सफरचंद आणि इतर फळांची तुलना होऊ शकत नाही, मात्र भारताच्या मनातील गोष्ट मला सांगायची आहे. हिंदुस्तानच्या जनतेच्या ताकतीची गोष्ट मला सांगायची आहे. या कोरोना काळात मी सहज एक विषय मांडला होता, अतिशय हलका-फुलका विषय होता की, कोरोना काळात, त्या संकटात देशावर मोठं ओझं होईल अशा गोष्टी मला बोलायच्या नाहीत. आता यासाठी मी म्हटलं की मित्रांनो हे पहा, आपण बाहेरून खेळणी का घेतो? छोटासा विषय आहे, बाहेरून खेळणी का घेतो? आपली खेळणी आपण इथे का आणत नाही? आपण आपली खेळणी जगात का विकू शकत नाही? आपल्या खेळण्यांच्या मागे, खेळणी बनवणाऱ्याच्या मागे आपल्या सांस्कृतिक परंपरेचा एक विचार होता, ज्यामधून तो खेळणी बनवतो. एक प्रशिक्षण असतं, छोटीशी गोष्ट होती, एखादा परिसंवाद केला, एखादी दृक्श्राव्य परिषद केली, त्यांना थोडं प्रोत्साहन दिलं. आपण आश्चर्यचकित व्हाल, इतक्या अल्प काळात, या माझ्या देशाची ताकत पहा, माझ्या देशाचा स्वाभिमान बघा, माझ्या सामान्य नागरिकाच्या मनातली इच्छा पहा साहेब, मुलं दुसऱ्याला फोन करून सांगायची की तुझ्या घरी परदेशी खेळणं तर नाही ना? कोरोनामुळे जी संकटं आली, त्यामधून त्याच्यातला हा भाव जागा झाला होता. एक मूल दुसऱ्या मुलाला फोन करून विचारायचं की तुझ्या घरात तुम्ही परदेशी खेळणी तर नाही ठेवत? आणि परिणाम हा झाला की माझ्या देशात खेळण्यांची आयात 70% कमी झाली, गेल्या दोन वर्षांच्या आत. ही समाजाचीच काय, स्वभावाची ताकत पहा आणि हीच आपल्या देशातल्या खेळणी उत्पादकांची ताकत पहा की आपली खेळण्यांची निर्यात 70% वाढली, म्हणजेच त्यात 114% फरक पडला. माझ्या बोलण्याचा अर्थ हा आहे, मला हे माहीत आहे की त्या खेळण्यांची तुलना आपल्याकडे जी खेळणी आहेत, त्याच्याशी होऊ शकत नाही. त्यासाठीच मी म्हटलं, की सफरचंद आणि इतर फळांची तुलना होऊ शकत नाही. मी तुलना करत आहे, भारताच्या सामान्य मानवी मनाची ताकत आणि ती ताकत खेळणी बनवणाऱ्यांच्या उपयोगी पडू शकते, ती ताकत माझ्या देशाच्या सैन्य शक्तीच्या देखील कामी येऊ शकते. आपल्या देशवासीयांबद्दल आपल्याला हा विश्वास असायला हवा. गेल्या आठ वर्षात आपली संरक्षण सामुग्रीची निर्यात 7 पटींनी वाढली आहे. आता काही काळापूर्वीच प्रत्येक देशवासीयाची छाती अभिमानानं फुलली, जेव्हा त्याला हे समजलं की गेल्या वर्षी आपली 13 हजार कोटी रुपयांची संरक्षण सामुग्रीची निर्यात झाली, आणि यात देखील 70 टक्के वाटा आपल्या खासगी क्षेत्राचा आहे.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.32603200_1658152988_684-3.jpg)
मित्रांनो,
21 व्या शतकात सेना दलाची आधुनिकता, संरक्षण सामुग्रीची आत्मनिर्भरता, या बरोबरच आणखी एका पैलूवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपणही जाणता की आता राष्ट्रीय सुरक्षेचे धोके देखील व्यापक झाले आहेत आणि युद्धाच्या पद्धती देखील बदलल्या आहेत. आधी आपण केवळ भूमी, सागर आणि आकाश इथवरच स्वतःच्या संरक्षणाची कल्पना करत होतो. आता याचा आवाका अवकाशाच्या दिशेने पुढे जात आहे, सायबर क्षेत्राच्या दिशेने सरकत आहे, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्राकडे जात आहे. आज प्रत्येक प्रकारच्या व्यवस्थेला शस्त्रास्त्रांमध्ये परिवर्तित केलं जात आहे. जर रेअर अर्थ (rare earth) असेल, तर त्याला शस्त्रामध्ये परिवर्तित करा, कच्चं तेल आहे, त्याला शस्त्रात परिवर्तित करा. म्हणजेच संपूर्ण विश्वाचा दृष्टीकोन आणि पद्धती बदलत आहेत. आता सामोरा-समोरच्या लढाई पेक्षा जास्त लढाई अदृश्य स्वरुपात होत आहे, अधिक घातक होत आहे. आता केवळ आपला भूतकाळ स्मरणात ठेवून आपण आपलं संरक्षण धोरण आणि रणनीती बनवू शकत नाही. आता आपल्याला भविष्यातल्या संभाव्य आव्हानांचा अंदाज घेऊन पुढील पावलं उचलायची आहेत. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, काय बदल होत आहेत, आपलं भविष्य काय असेल, त्यानुसार आपण स्वतःला बदलायचं आहे. आणि आपलं स्वावलंबनाचं लक्ष्य देखील देशाला मोठं सहाय्य करणार आहे.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.44424700_1658153033_684-6.jpg)
मित्रांनो,
देशाच्या संरक्षणासाठी आपल्याला आणखी एका महत्त्वाच्या पैलू कडे लक्ष द्यावं लागेल. आपल्याला भारताच्या आत्मविश्वासाला आपल्या आत्मनिर्भरतेला आव्हान देणाऱ्या शक्तीं विरोधातल्या युद्धाला देखील गती द्यायची आहे. भारत जसजसा जागतिक स्तरावर स्वतःला प्रस्थापित करत आहे, तसतसं चुकीची माहिती, माहितीचा अभाव, अपप्रचार या माध्यमातून आपल्यावर सातत्याने आक्रमण होत आहे. माहितीला देखील एक शस्त्र बनवलं गेलं आहे. स्वतःवर विश्वास ठेवून, भारताच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या शक्ती देशात असोत, की परदेशात त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पडायचे आहेत. देशाचं संरक्षण आता केवळ सीमांपुरतं मर्यादित नाही, तर अत्यंत व्यापक आहे. म्हणूनच प्रत्येक नागरिकाला याबाबत जागरूक करणं देखील तेवढंच आवश्यक आहे. वयं राष्ट्रे जागृयाम, ही घोषणा आपल्या इथे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणं, हे देखील आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आत्मनिर्भर भारतासाठी आपण 'संपूर्ण सरकारी दृष्टीकोन' बरोबर घेऊन पुढे जात आहोत, तसंच देशाच्या रक्षणासाठी देखील 'संपूर्ण देशाचा दृष्टीकोन' ही काळाची गरज आहे. देशाच्या कोटी-कोटी जनतेची हीच सामुहिक राष्ट्र भावना संरक्षण आणि समृद्धीचा भक्कम आधार आहे. या उपक्रमासाठी, हे सर्व एकत्र जोडून पुढे जाण्याच्या प्रयत्नांसाठी, संरक्षण मंत्रालयाचं, आपल्या संरक्षण दलांचं त्यांच्या नेतृत्वाचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, आणि मला हे आवडलं की आपण बनवलेल्या सर्व नवीन गोष्टी पाहण्यासाठी जेव्हा आज मी काही स्टॉल्सना भेट दिली, तेव्हा हे दिसलं की आपलं नौदल बळकट व्हावं, आपलं संरक्षण दल मजबूत व्हावं यासाठी आपल्या नौदलातल्या निवृत्त सहकाऱ्यांनी देखील स्वतःचा अनुभव, आपली शक्ती, आपला वेळ या नवनिर्मितीच्या कामासाठी दिला आहे. हा एक उत्तम प्रयत्न आहे असं मला वाटतं. यासाठी ज्यांनी निवृत्ती नंतर देखील मिशन मोड मध्ये काम केलं आहे, त्याचं मी विशेष अभिनंदन करतो, आणि या सर्वांना सन्मानित करण्याची व्यवस्था सुरु आहे, म्हणूनच आपण सर्व जण देखील अभिनंदनासाठी पात्र आहात. खूप खूप धन्यवाद! खूप खूप शुभेच्छा.