“Gujarat is leading the country’s resolution of achieving the goals of the Amrit Kaal”
“The Surat Model of natural farming can become a model for the entire country”
“‘Sabka Prayas’ is leading the development journey of New India”
“Our villages have shown that villages can not only bring change but can also lead the change”
“India has been an agriculture based country by nature and culture”
“Now is the time when we move forward on the path of natural farming and take full advantage of the global opportunities”
“Certified natural farming products are fetching good prices when farmers export them”

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे लोकप्रिय मृदू आणि खंबीर मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, गुजरात सरकारमधील मंत्रीवर्ग, उपस्थित खासदार आणि आमदार, सूरतचे महापौर आणि जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, सर्व सरपंच मंडळी, कृषी क्षेत्रातले सर्व तज्ञ मित्र आणि भारतीय जनता पार्टी गुजरात प्रदेशचे अध्यक्ष सी आर पाटील आणि  माझ्या सर्व  प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो!

काही महिन्यांपूर्वीच गुजरातमध्ये नैसर्गिक शेतीविषयी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. या योजनेमध्ये संपूर्ण देशातले शेतकरी बांधव जोडले गेले होते. नैसर्गिक शेतीविषयी देशामध्ये किती मोठे अभियान सुरू आहे, याची एक प्रकारे झलकच त्यातून दिसली होती. गुजरात राज्य कशा प्रकारे देशाच्या अमृत संकल्पांना गती देत आहे, याचे प्रतीक म्हणजे आज सूरतमध्ये होत असलेला हा महत्वपूर्ण कार्यक्रम आहे.प्रत्येक ग्राम पंचायतीने 75 शेतक-यांना नैसर्गिक शेती प्रकल्पाबरोबर जोडण्याचे मिशन ठेवले आहे आणि या मिशनमध्ये सूरतने मिळवलेले यश म्हणजे देशासाठी एक उदाहरण बनले आहे. यासाठी सूरतच्या लोकांचे अभिनंदन! सूरतच्या शेतकरी बांधवांचे यासाठी अभिनंदन, सरकारमधल्या सर्व सहकारी मंडळींचे अभिनंदन!

‘नैसर्गिक कृषी संमेलन’प्रसंगी मी या अभियानामध्ये जोडले गेलेल्या प्रत्येक व्यवतीला, आपल्या सर्व शेतकरी बांधवांना अनेक- अनेक शुभेच्छा देतो. ज्या शेतकरी बांधवांना, सरपंच मंडळींना आज इथे सन्मानित करण्यात आले, त्यांचेही मी हार्दिक अभिनंदन करतो आणि विशेष करून शेतक-यांबरोबरच सरपंचांचीही भूमिका अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांनीच हा संकल्प केला आहे आणि म्हणूनच आमचे हे सर्व सरपंच बंधू-भगिनी तितकेच  कौतुकास पात्र आहेत. शेतकरी बांधवांचे तर कौतुक आहेच.

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त, देशाने अनेक उद्दिष्टांवर काम सुरू केले आहे. हे कार्य आगामी काळामध्ये खूप मोठ्या परिवर्तनाचा आधार बनतील.अमृतकाळामध्ये देशाच्या गती-प्रगतीचा आधार ‘सबका प्रयास‘ ही भावना आहे. ती भावनाच आमच्या या विकास यात्रेचे नेतृत्व करीत आहे. विशेषत्वाने गावातील मंडळी, गरीब आणि शेतकरी यांच्यासाठी जे काही काम होत आहे, त्याचे नेतृत्वही देशवासीय  आणि  ग्राम पंचायतींवर सोपविण्यात आले आहे. गुजरातमध्ये नैसर्गिक शेतीच्या या मोहिमेकडे मी सातत्याने अगदी बारकाईने पहात आहे आणि जवळून लक्ष देत आहे. या मोहिमेची प्रगती पाहून खरेच सांगतो,  मला खूप आनंद होतो. आणि विशेष करून शेतकरी बांधव आणि भगिनींनी ही गोष्ट आता अगदी मनापासून स्वीकारत नैसर्गिक शेतीला आपलेसे केले आहे.याच्याइतकी चांगली गोष्ट दुसरी असूच शकत नाही. सूरतमध्ये प्रत्येक गाव पंचायतीतून 75 शेतकरी बांधवांची निवड करण्यासाठी  ग्राम समिती, तालुका समिती आणि जिल्हा समिती बनविण्यात आल्या. गावस्तरावर पथके बनविण्यात आली. त्याचे प्रमुख ठरवण्यात आले. तालुका स्तरावर नोडल अधिका-यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली. या काळामध्ये सातत्याने प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले, असेही मला याविषयी सांगण्यात आले आणि आज, इतक्या कमी कालावधीमध्ये साडेपाचशे पेक्षा जास्त पंचायतींमधून 40 हजारांपेक्षा जास्त शेतकरी आता नैसर्गिक शेतीशी जोडले गेले आहेत. याचा अर्थ एका लहानशा क्षेत्रामध्ये इतके मोठे काम होणे, हा खूप चांगला प्रारंभ आहे. ही गोष्ट अतिशय  उत्साहवर्धक आहे. यामुळेच प्रत्येक शेतक-याच्या मनामध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण होणार आहे. आगामी काळामध्ये तुम्हा सर्वांचे प्रयत्न, तुम्हा सर्वांचा अनुभव संपूर्ण देशातल्या शेतकरी बांधवांना खूप काही शिकवणारा, अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सूरतमध्ये तयार झालेले नैसर्गिक शेतीचे मॉडेल, संपूर्ण हिंदुस्तानचे मॉडेलही बनू शकते.

बंधू आणि भगिनींनो,

ज्यावेळी एखादे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशवासीय स्वतःहून संकल्पबद्ध होतात, त्यावेळी त्या लक्ष्याच्या प्राप्तीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. तसेच अशा संकल्पासाठी काम करताना आपण थकलो आहोत, असेही जाणवत नाही. ज्यावेळी मोठ मोठाली कार्ये लोकसहभागाच्या ताकदीने होतात, त्यावेळी त्या कामामध्ये मिळणारे यश हे देशाच्या लोकांनी आधीच सुनिश्चित केलेले असते. जल जीवन मिशनचे उदाहरण आपल्या समोरच आहे. गावांगावांमध्ये स्वच्छ पाणी पोहोचविण्यासाठी इतके मोठे अभियान राबविण्यात आले. अर्थात,  या अभियानाची जबाबदारी देशातल्या गावांवर आणि गावांतल्या लोकांवर, गावांमध्ये बनविण्यात आलेल्या पाणी समित्यांवर टाकण्यात आली. सगळी कामे ही सर्व लोकच तर सांभाळत आहेत. स्वच्छ भारतासारखे इतके मोठे अभियान, ज्याचे कौतुक आज सर्व विश्वस्तरीय संस्थाही करीत आहेत. या अभियानाच्या यशस्वीतेचे मोठे श्रेय आमच्या गावांनाच आहे. याचप्रमाणे जे लोक गावांमध्ये परिवर्तन होणे इतके सोपे नाही, असे म्हणत होते, त्यांना  डिजिटल इंडिया मिशनला मिळालेल्या असामान्य यशाने उत्तर दिले आहे. गावांमध्ये तर असेच जगणे असते, त्यामध्ये कोणताही बदल घडून येणे खूप  अवघड आहे, असे मानणारे काही लोक होतेच. मात्र आमच्या गावांनी दाखवून दिले की, गावांमध्ये फक्त बदल घडून येतो इतकेच  नाही तर परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये गावे नेतृत्वही करू शकतात. नैसर्गिक शेतीविषयी देशात सुरू झालेले ही लोक चळवळ आगामी वर्षांमध्ये व्यापक स्वरूपामध्ये यशस्वी होईल. जे शेतकरी बांधव या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये  जितक्या लवकर सहभागी होतील, तितके ते यशाचे उंच शिखर गाठतील.

मित्रांनो,

आपले जीवन, आपले आरोग्य, आपल्या समाजाचा सर्वांचा आधार आपली कृषी व्यवस्थाच आहे. आपल्याकडे असे म्हणतात ना, ‘जसे अन्न तसे मन’. भारत तर स्वभावाने आणि संस्कृतीने कृषी आधारित देश आहे. म्हणूनच, जस- जसा  आपला शेतकरी बंधू पुढे जाईल, तस-तसे आपले कृषी क्षेत्र उन्नत आणि समृद्ध होईल. त्याचबरोबर आपला देशही पुढे जाईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून, मी देशातल्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा स्मरण देवू इच्छितो की, नैसर्गिक शेती आर्थिक यशस्वीतेचा एक मार्ग आहे. आणि त्याहीपेक्षा एक मोठी गोष्ट म्हणजे, आपली माता, आपली धरणीमाता, आपल्यासाठी तर ही भूमाताच आहे, जिची आपण रोज पूजा करतो, सकाळी अंथरूणावरून उठल्यानंतर पहिल्यांदा आपण धरणीमातेची माफी मागतो. हे आपले संस्कार आहेत. धरणीमातेची सेवा करण्याचे हे एक मोठे माध्यम आहे. आज आपण ज्यावेळी नैसर्गिक शेती करतो, त्यावेळी शेतीसाठी आवश्यक सामुग्री जमा करतो ती ,शेती आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांमधून आपण उभी करतो. गाय आणि पशुधनाच्या माध्यमातून आपण ‘जीवामृत’ आणि ‘घन जीवामृत’ तयार करतो.यामुळे शेतीवर होणारा खर्च कमी होतो. त्याचबरोबर पशुधनामुळे अतिरिक्त उत्पन्नाचे मार्गही मोकळे होतात. पशुधनामुळे पूर्वीपेक्षा जास्त उत्पन्न नैसर्गिक शेती करताना होते. याचप्रमाणे, ज्यावेळी तुम्ही नैसर्गिक शेती करता, त्यावेळी तुम्ही धरणीमातेची ख-या अर्थाने सेवा करीत असता कारण तुम्ही  मातीचा दर्जा, जमिनीचे आरोग्य, भूमीची उत्पादकता यांचे रक्षण करीत असता. ज्यावेळी तुम्ही नैसर्गिक शेती करता, त्यावेळी तुम्ही निसर्ग आणि पर्यावरणाचीही सेवा करीत असता. ज्यावेळी तुम्ही नैसर्गिक शेतीबरोबर जोडले जाता, त्यावेळी तुम्हाला अगदी सहजतेने गोमातेची सेवा करण्याचे भाग्यही मिळते. एका जीव सेवेचा आशीर्वादही मिळतो. सूरत मध्ये 40-45 गोशाळांच्या बरोबर करार करून त्यांच्याकडे गौ-जीवामृत उत्पादनाची जबाबदारी सोपविण्यात येईल , अशी माहिती आज मला देण्यात आली. आता आपणच विचार करा, यामुळे किती गोमातांची सेवा होणार आहे. याबरोबरच, नैसर्गिक शेतीतून उत्पादित झालेल्या  अन्नधान्याने ज्या कोट्यवधी लोकांचे पोट भरणार आहे, त्यांचा कीटकनाशक आणि रसायनांमुळे होणा-या घातक रोगांपासून बचाव हेाणार आहे. कोट्यवधी लोकांना चांगल्या आरोग्याचा लाभ होणार आहे आणि आपल्याकडे तर, आरोग्य आणि आहार यांचा प्रत्यक्ष संबंध असल्याचे स्वीकारले गेले आहे. आपण ज्या प्रकारचा आहार घेतो, त्यावर आपल्या शरीराचे आरोग्य अवलंबून असते.

मित्रांनो,

जीवनाचे अशा प्रकारे रक्षण करणे म्हणजे, आपल्याला सेवा आणि पुण्यसंचयाची अगणित संधी देते. म्हणूनच नैसर्गिक शेती व्यक्तिगत आनंदाचे मार्ग उघडत आहे. ही शेती ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः’ ही भावनाही साकार करीत आहे.

 मित्रांनो,

आज संपूर्ण जगात ‘शाश्वत जीवनशैली’ ची चर्चा आहे, शुद्ध आहार-विहार  यावर चर्चा होत आहे. हे एक असं क्षेत्र आहे, ज्यात भारताकडे हजारो वर्षांचा अनुभव आहे, ज्ञान आहे. आपण शतकानुशतके यात जगाचे नेतृत्व केले आहे. म्हणूनच आज आपल्याला संधी चालून आली आहे, की आपण नैसर्गिक शेती सारख्या उपक्रमांत पुढे येऊन शेतीशी संबंधित जागतिक शक्यतांचा लाभ सर्वांपर्यंत पोचवायला हवा. देश या दिशेने गेल्या आठ वर्षांत गांभीर्यानं प्रयत्न करत आहे.

‘पारंपारिक शेती विकास योजना’ आणि ‘भारतीय कृषी पद्धत’ या सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संसाधनं, सुविधा आणि मदत दिली जात आहे. या योजनेअंतर्गत देशात 30 हजार क्लस्टर बनवले गेले आहेत, लाखो शेतकरी याचा लाभ घेत आहेत. पारंपारिक शेती विकास योजने अंतर्गत देशात जवळपास 10 लाख हेक्टर जमीनीचा समावेश केला  जाणार आहे. आपण नैसर्गिक शेतीचे सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रभाव बघून ही योजना नमामि गंगे प्रकल्पाशी जोडली आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आज देशात गंगेच्या काठांवर वेगळी मोहीम चालवली जाते आहे, मार्गिका बनविली जाते आहे. नैसर्गिक पिकांना बाजारपेठांत वेगळी मागणी असते, त्याला किंमत देखील जास्त मिळते. अलीकडेच मी दाहोदला आलो होतो, तर दाहोदमध्ये मला आपल्या आदिवासी भगिनी भेटल्या, त्या नैसर्गिक शेती करतात आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे एक महिना आधीच मागणी नोंदवली जाते. आणि रोज पिकवल्या जाणाऱ्या भाज्या, त्याच दिवशी विकल्या जातात, ज्या अधिक किमतीला विकल्या जातात. ज्या प्रमाणे गंगेच्या आजूबाजूला पाच पाच किमी क्षेत्रात नैसर्गिक शेतीचे प्रकल्प चालवले गेले आहेत, ज्यामुळे रसायने नदीत जाणार नाही, पिण्याच्या पाण्यात रसायने मिसळणार नाहीत. भविष्यात आम्ही तापी नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर, नर्मदा मातेच्या दोन्ही किनाऱ्यांवर हे सगळे प्रयोग करू शकतो. म्हणूनच आम्ही नैसर्गिक शेतीच्या उत्पादनाना प्रमाणित करण्यासाठी, कारण यात जे उत्पादन होईल त्याचे वैशिष्ट्य असायला हवे, त्याची ओळख असायला हवी, आणि यासाठी शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळायला हवेत, म्हणून आम्ही ही उत्पादने प्रमाणित करण्याची व्यवस्था केली आहे. त्या प्रमाणिकरणासाठी गुणवत्ता सुनिश्चित करणारी व्यवस्था देखील बनविली आहे. अशा प्रकारे प्रमाणित पिकं आपले शेतकरी चांगल्या किमतीला निर्यात करत आहेत. आज जगाच्या बाजारपेठेत रसायन मुक्त उत्पादने ही सर्वात मोठे आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. आपण याचा लाभ देशातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवला पाहिजे.

मित्रांनो,

सरकारच्या प्रयत्नांसोबतच आपण या दिशेने आपल्या प्राचीन ज्ञानाकडे देखील बघितले पाहिजे. आपल्याकडे वेदांपासून तर कृषी ग्रंथ आणि कौटिल्य, वराहमिहिर यासारख्या विद्वानांपर्यंत, नैसर्गिक शेतीशी संबंधित अथांग ज्ञान सागर उपलब्ध आहे. आचार्य देवव्रतजी आपल्यामध्ये आहेत, ते या विषयातले खूप मोठे जाणकार देखील आहेत आणि त्यांनी तर आपला जीवन मंत्रच बनवला आहे. त्यांनी स्वतः अनेक प्रयोग करून यश मिळवलं आहे  आणि आता त्या यशाचा लाभ गुजरातच्या शेतकऱ्यांना मिळावा म्हणून ते जीव तोडून प्रयत्न करत आहेत. मात्र, मित्रांनो, मला जितकी माहिती आहे, मी बघितलं आहे की आपल्या शास्त्रांपासून लोक - ज्ञान यापर्यंत, लोक कथांमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्यात खोलवर अनेक  सूत्र लपली  आहेत. आपल्याला माहिती आहे आपल्या इथे घाघ आणि भड्डरी सारख्या विद्वानांनी सोप्या भाषेत शेतीचे मंत्र सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. उदाहरणार्थ एक म्हण आहे, आता आपल्या शेतकऱ्यांना ही म्हण माहित आहे - ‘गोबर, मैला, नीम की खली, या से खेत दूनी फली’. म्हणजे शेण आणि तेल काढल्यानंतर उरलेले कडूलिंबाचे अवशेष  जर का शेतात टाकले  तर पिक दुप्पट येतं. याच प्रमाणे आणखी एक प्रचलित लोक कथा आहे, वाक्य आहे - ‘छोड़े खाद जोत गहराई, फिर खेती का मजा दिखाई’, म्हणजे, शेतात खत टाकून मग नांगरणी केली तर शेतीची खरी मजा दिसून येते, तिची ताकद दिसून येते.

माझी इच्छा आहे की इथे ज्या संस्था, ज्या स्वयंसेवी संस्था आणि तज्ञ लोक आहेत, त्यांनी यावर आपलं लक्ष केंद्रित करावं. आपले जे समज आहेत त्यांची खुल्या मानाने एकदा उजळणी करावी. या जुन्या अनुभवांतून काय निघू शकतं, हिंमत करून तुम्ही पुढे या, वैज्ञानिकांना माझा विशेष आग्रह आहे. आपण नवनवे शोध लावावे, आपल्याला उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर आपले शेतकरी अधिक शक्तिशाली कसे होतील, आपली शेती चांगली कशी होईल, आपली धरती माता सुरक्षित कशी राहील, यासाठी आपल्या वैज्ञानिकांनी, आपल्या शैक्षणिक संस्थांनी समोर आलं पाहिजे. काळानुरूप शेतकऱ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी कशा पोचवल्या जाऊ शकतात, प्रयोगशाळेत सिद्ध झालेलं विज्ञान शेतकऱ्यांच्या भाषेत त्यांच्यापर्यंत कसं पोचेल यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा.मला विश्वास आहे की देशात नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जी सुरवात केली आहे, त्यामुळे केवळ अन्नादाताच सुखी होणार नाही, तर नव्या भारताचा मार्ग देखील प्रशस्त होईल. मी काशीचा खासदार आहे, तर मला काशीच्या शेतकऱ्यांना भेटायची जेव्हा जेव्हा  संधी मिळते, मी त्यांच्याशी बोलतो, मला आनंद होतो की माझ्या काशीचे शेतकरी नैसर्गिक शेती संबंधात पुष्कळ माहिती गोळा करत असतात, स्वतः प्रयोग करतात, दिवस रात्र मेहनत करतात आणि त्यांना वाटू लागलं आहे आता ते जे पिकवतात, ते जगाच्या बाजारपेठेत विकण्यासाठी तयार आहे आणि म्हणूनच माझी इच्छा आहे आणि सुरत तर असं आहे, एकही गाव असं नसेल जिथले लोक विदेशात नाहीत. सुरतची तर एक विशेष ओळख देखील आहे, आणि म्हणूनच सुरतचा पुढाकार, चमकदार ठरेल.

मित्रांनो,

तुम्ही जी मोहीम सुरु केली आहे तर प्रत्येक गावात 75 शेतकरी आणि मला पूर्ण विश्वास की आज भले ही 75 चे लक्ष्य ठरवले आहे प्रत्येक गावात 750 शेतकरी तयार होतील असं बघा आणि जेव्हा पूर्ण जिल्हा या कामात लागेल तेव्हा जगातले जे ग्राहक आहेत ते नेहमी पत्ता शोधत - शोधत तुमच्याकडेच येतील कारण इथे रसायने नाहीत, कीटकनाशके नाहीत, सरळ सरळ नैसर्गिक उत्पादन आहेत, तर आपल्या आरोग्यासाठी लोक दोन पैसे जास्त देऊन हा माल विकत घेऊन जातील.  सुरत शहरात तर भाजी तुमच्या कडूनच जाते, जर सुरत शहराला समजलं की तुमच्या भाज्या नैसर्गिक शेतीच्या आहेत, मला पक्का विश्वास आहे, की आमचे सुरतचे  लोक यावेळचा उंधियू तुमच्या नैसर्गिक शेतातल्या भाज्यांपासूनच बनवतील  आणि मग सुरतचे लोक पाट्या लावतील, नैसर्गिक शेतीतल्या भाज्यांचा उंधियू. तुम्ही बघा एक बाजारपेठ या क्षेत्रात तयार होत आहे. सुरतची स्वतःची शक्ती आहे, सुरतचे लोक जसे हिऱ्याला तेल लावतात, तसंच तेल याला पण लावतील, तर सुरत मध्ये ही जी मोहीम सुरु आहे, त्याचा फायदा घ्यायला सर्व लोक पुढे येतील. आपणा सर्वांशी बोलण्याची संधी मिळाली, इतकी चांगली मोहीम सुरु केली आहे आणि मी यासाठी आपणा सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि या सोबतच, आपणा सर्वांना पुन्हा एकदा अनेक अनेक धन्यवाद!

खूप-खूप  शुभेच्छा!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage