मेरठ, हापूर, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बुदौन, शाहजहानपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगढ आणि प्रयागराजमधून हा गंगा द्रुतगती मार्ग जाणार
पंडित राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाह खान, ठाकूर रोशन सिंह यांना उद्याच्या हुतात्मा दिवसनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
"गंगा द्रुतगती मार्ग उत्तर प्रदेशासाठी प्रगतीची नवी दारे खुली करेल "
“जेव्हा संपूर्ण उत्तर प्रदेशचा एकत्र विकास होतो, तेव्हा देशाची प्रगती होते. त्यामुळे दुहेरी इंजिन सरकारचे लक्ष उत्तर प्रदेशच्या विकासावर''
“समाजात मागे राहिलेल्या आणि मागासलेल्यांना विकासाचे फायदे मिळवून देणे हे सरकारचे प्राधान्य. हीच भावना आपल्या कृषी धोरणात आणि शेतकऱ्यांशी संबंधित धोरणात प्रतिबिंबित''
"उत्तर प्रदेशचे लोक म्हणत आहेत - यूपी प्लस योगी, बहुत है उपयोगी- U.P.Y.O.G.I."

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

श्री बाबा विश्वनाथ आणि भगवान परशुराम यांच्या चरणी माझा प्रमाण! हर हर गंगे! उत्तरप्रदेशचे कार्यक्षम आणि ऊर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी बी.एल. वर्मा जी, संसदेतले माझे सहकारी संतोष गंगवार जी, उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश कुमार खन्ना जी, सतीश महाना जी, जितीन प्रसाद जी, महेश चन्द्र गुप्ता जी, धर्मवीर प्रजापती जी, संसदेतले माझे इतर सहकारी, उत्तरप्रदेश विधानसभा आणि विधान परिषदेतील इतर सहकारी, पंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो!

 काकोरी इथून क्रांतीची ज्योत प्रज्वलित करणारे वीर हुतात्मे क्रांतिकारक, रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान आणि रोशन सिंह या वीरांना मी हात जोडून वंदन करतो. त्यांना दंडवत घालतो. ज्यांचा इथल्या लोकांना आशीर्वाद मिळाला आहे, मला, इथली माती कपाळाला लावायचं सौभाग्य मिळालं. इथूनच ओजस्वी कवी दामोदर स्वरूप विद्रोही, राजबहादूर विकल, आणि अग्निवेश शुक्ल यांनी वीररसाने क्रांतीची ज्योत पेटवली होती. इतकंच नाही, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा संकल्प देणारे स्काऊट गाईडचे जनक, पंडित श्रीराम वाजपेयी यांची ही जन्मभूमी आहे. या सर्व महापुरुषांना मी वंदन करतो.

मित्रांनो,

योगायोगाने कालच पंडित रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्लाह खान आणि ठाकूर रोषण सिंग यांचा बलिदान दिवस देखील होता. ब्रिटीश सत्तेला आव्हान देणाऱ्या शहाजहानपूरच्या या तिन्ही सुपुत्रांना 19 डिसेंबरला फाशी देण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या अशा वीरांचं आपल्यावर फार मोठं ऋण आहे. हे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. मात्र देशाच्या विकासासाठी रात्रंदिवस मेहनत करून, ज्या भारताचं स्वप्न स्वातंत्र्य सैनिकांनी बघितलं होतं, तो भारत निर्माण करून, आपण त्यांना खरी कार्यांजली देऊ शकतो. आज शाहजहानपूरमध्ये, अशीच एक पुण्याची संधी आहे, ऐतिहासिक संधी आहे. आज उत्तर प्रदेशाच्या सर्वात मोठ्या द्रुतगती मार्गाचं - गंगा द्रुतगतीमार्गाचं काम सुरु होत आहे.

रामचरितमानसमध्ये म्हटलं आहे - गंग सकल मुद मंगल मूला। सब सुख करनि हरनि सब सूला।। म्हणजे, गंगा माता सर्व मांगल्याची, सर्व उन्नती प्रगीतीची जननी आहे. गंगा माता सर्व सुख देते, आणि सर्व पीडा - दुःख हरण करते. त्याचप्रमाणे गंगा द्रुतगतीमार्गदेखील उत्तर प्रदेशाच्या प्रगतीचे नवे दरवाजे उघडेल. मी आज मीरत, हापुड, बुलंदशहर, अमरोह, संभल, बदायूं, शाहजहानपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराजच्या प्रत्येक नागरिकाचे, सर्व लोकांचे विशेष अभिनंदन करतो. जवळपास 600 किलोमीटरच्या या एक्स्प्रेसवेवर 36 कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे. हा गंगा द्रुतगतीमार्ग आपल्यासोबत या क्षेत्रात नवे उद्योग आणेल, अनेक रोजगार, हजारो-हजारो नवयुवकांसाठी नव्या संधी घेऊन येईल.

मित्रांनो,

उत्तर प्रदेश लोकसंख्येप्रमाणेच क्षेत्रफळाच्या बाबतीतही मोठा आहे, एका टोकापासून दुसरं टोक, जवळजवळ एक हजार किलोमीटर आहे. इतकं मोठं राज्य चालवायला मोठी शक्ती लागते, जी दमदार कामं करायची आहेत, त्यासाठी डबल इंजिनचे सरकार पाहिजे, ते आज डबल इंजिनचे सरकार करून दाखवत आहे. तो दिवस आता दूर नाही, जेव्हा उत्तर प्रदेश, पुढल्या पिढीच्या पायाभूत सुविधांचे राज्य म्हणून ओळखले जाईल. उत्तर परदेशात जे एक्स्प्रेसवेचे जाळे विणले जात आहे, विमानतळ बनत आहेत, रेल्वेचे नवे मार्ग बनत आहेत, ते उत्तर प्रदेशच्या लोकांसाठी अनेक वरदान घेऊन येत आहेत. पाहिलं वरदान वेळेची बचत. दुसरं वरदान लोकांच्या सोयींत वाढ, सुविधांमध्ये वाढ . तिसरं वरदान उत्तर प्रदेशच्या स्रोतांचा योग्य आणि सर्वोत्तम उपयोग, चौथं वरदान उत्तर प्रदेशाच्या सामर्थ्यात वाढ, पाचवं वरदान उत्तर प्रदेशचा चौफेर विकास आणि समृद्धी.

मित्रांनो,

एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी आता तुम्हाला तितका वेळ लागणार नाही, जितका पूर्वी लागत असे. आपला वेळ वाहतूक कोंडीत वाया जाणार नाही, आपण त्या वेळेचा सदुपयोग करू शकाल. उत्तर प्रदेशच्या 12 जिल्ह्यांना जोडणारा हा एक्स्प्रेसवे, पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशाला जवळच आणणार नाही तर, एकप्रकारे दिल्लीहून बिहारला येण्या-जाण्याचा वेळ दिखील कमी होईल. जेव्हा हा द्रुतगतीमार्ग पूर्ण तयार होईल, तेव्हा याच्या आसपास अनेक उद्योग उभे राहतील. ज्यांमुळे इथल्या शेतकरी, पशुपालकांसाठी नव्या संधी तर निर्माण होतीलच, इथल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी, लघु उद्योगांसाठी देखील नव्या संधी निर्माण होतील. विशेषतः अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी अफाट शक्यता इथे निर्माण होतील, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल. म्हणजे शेतकरी असो की युवक - या सर्वांसाठी अनंत संधी देणारा द्रुतगतीमार्ग आहे.

मित्रांनो,

उत्तरप्रदेशात आज ज्या आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, त्यातून आपल्याला कळते की संसाधनांचा योग्य उपयोग कसा केला जाऊ शकतो? याआधी जनतेच्या पैशांचा कुठे आणि कसा-कसा उपयोग झाला आहे, हे आपण सगळ्यांनी नीट पहिले आहेच. पहिले आहे ना? काय काय होत असे माहीत आहे ना? आठवतंय की विसरलात? मात्र आज उत्तर प्रदेशाचा पैसा उत्तरप्रदेशाच्याच विकासकामांसाठी वापरला जात आहे. याआधी,असे प्रकल्प केवळ कागदावर यासाठी सुरु केले जात, जेणेकरुन ते लोक आपल्या तिजोऱ्या भरु शकतील.आज अशा प्रकल्पावर यासाठी काम होत आहे जेणेकरुन उत्तरप्रदेशच्या लोकांचा पैसा वाचू शकेल. तुमचे पैसे तुमच्या खिशातच राहतील.

आणि बंधू- भगिनींनो,

जेव्हा वेळ वाचतो, सुविधा वाढतात, संसाधनांचा योग्य वापर होतो, त्यावेळी आपले सामर्थ्य वाढते आणि ज्यावेळी सामर्थ्य वाढते, त्यावेळी समृद्धी येणे आपोआप सुरु होते. आज दुहेरी इंजिनाच्या सरकारात उत्तरप्रदेशचे वाढते सामर्थ्य आपण सगळे बघू शकतो आहोत. पूर्वाचल द्रुतगती मार्ग असो किंवा मग दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्ग असो, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ असो किंवा मग समर्पित मालवाहू मार्गिकेचे महत्वाचे टप्पे असोत, असे अनेक प्रकल्प, लोकसेवेसाठी समर्पित केले जात आहेत. बूंदेलखंड एक्सप्रेस वे, गोरखपूर लिंक एक्सप्रेस वे, प्रयागराज लिंक एक्सप्रेस वे, दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वे, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली-मेरठ जलदगती कॉरिडॉरसारखे भव्य प्रकल्प असोत, या सगळ्या प्रकल्पावर आता अतिशय वेगाने काम सुरु आहे. या जेवढ्या पायाभूत सुविधा आपण उभरतो आहोत, त्या बहुपयोगी तर आहेतच, त्याशिवाय त्यात बहुपर्यायी वाहतूक संपर्कव्यवस्था असेल, त्यावर देखील लक्ष दिले जात आहे.

मित्रांनो,

एकविसाव्या शतकात, कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी, कोणत्याही प्रदेशाच्या प्रगतीसाठी द्रुतगती संपर्कव्यवस्था, ही सर्वात मोठी गरज असते. जेव्हा माल जलदगतीने आपल्या इच्छित स्थळी पोचवला जातो, त्यावेळी खर्चाची बचत होते.

जेव्हा खर्च कमी होतो, त्यावेळी व्यापार वाढतो. जेव्हा व्यापार वाढतो, त्यावेळी निर्यातीतही वाढ होते, देशाची अर्थव्यवस्था सुधारते म्हणूनच गंगा द्रुतगती मार्ग, उत्तरप्रदेशच्या विकासाला गती देखील देईल आणि उत्तरप्रदेशला ताकदही देईल. यामुळे पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडयाला देखील मोठी मदत मिळणार आहे. या द्रुतगती मार्गाला विमानतळांशी जोडले जाईल. मेट्रोशी जोडले जाईल, जलमार्गांशी जोडले जाईल, संरक्षण मार्गिकांशी जोडले जाईल. गतिशक्ती बृहद आराखड्याअंतर्गत ह्या द्रुतगती मार्गावर टेलिफोनच्या तारा टाकण्यासाठी, ऑप्टिकल फायबर नेटवर्क लावणे असो, वीजेच्या तारा लावण्याचा विषय असो, गॅस ग्रीडचा विषय असो, गॅसची पाईपलाईन टाकायची असो, वॉटर ग्रीडचा विषय असो, उच्च जलद गती रेल्वे प्रकल्पांच्या शक्यता लक्षात घेत, या सगळ्या गरज लक्षात घेत, भविष्यात कोणत्या गोष्टींची गरज पडेल, त्या सगळ्या गरजा लक्षात घेऊन हे प्रकल्प उभारले जात आहेत. या द्रुतगती मार्गांची उभारणी करण्यात जे पूल तयार केले जातील, उड्डाणपूल बनवले जातील, ज्या काही इतर गरजा असतील, त्यांच्यासाठी परवानग्या देण्याचे कम ही आता जलद गतीने केले जाईल. भविष्यात उत्तर प्रदेशचे मालवाहू कंटेनर्स, वाराणसीच्या ड्राय पोर्टच्या माध्यमातून थेट हल्दिया पोर्टपर्यंत पाठवले जाऊ शकतील. म्हणजे, गंगा द्रुतगती मार्गाचा उपयोग होईल- पीक घेणाऱ्यांना, आपल्या उद्योगांना, उद्योजकांना, उत्पादन क्षेत्राशी संबंधित सर्व लहान-मोठ्या उद्योजकांना, व्यावसायिकांना, कष्टकरी नागरिकांना.

बंधू आणि भगिनींनो,

जेव्हा संपूर्ण उत्तरप्रदेश एकाच दिशेने, एकाच वेळी, वाटचाल करतो, त्यावेळी देशही प्रगतीपथावर जातो. म्हणूनच दुहेरी इंजिनाच्या सरकारचा भर उत्तरप्रदेशच्या विकासावर आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मंत्रासह आम्ही उत्तरप्रदेशच्या विकासासाठी संपूर्ण शक्तिनिशी काम करतो आहोत, प्रामाणिकपणे काम करतो आहोत. आपण जरा आपले जुने दिवस आठवून बघा. जुने निर्णय आठवून बघा. आधीच्या सरकारांची काम करण्याची पद्धत आठवून बघा. आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल. आता उत्तरप्रदेशात भेदभाव नाही, सर्वांचेच कल्याण होत असते. आपण पांच वर्षांपूर्वीची स्थिती आठवून बघा. राज्याचे काही भाग सोडले, तर इतर शहरे आणि गांव –खेड्यात वीज शोधूनही सापडत नसे. हे खरे आहे ना? असे होत होते ना? जरा आणखी मोठ्या आवाजात सांगा, असे होत असे ना? केवळ काही लोकांचेच कल्याण होत होते ना ? केवळ काही लोकांच्या फायद्याचीच कामे होत असत ना? मात्र, आता उत्तरप्रदेशांतील दुहेरी इंजिनाच्या सरकारने केवळ उत्तरप्रदेशातच सुमारे 80 लाख घरांमध्ये मोफत वीजजोडण्या दिल्या. एवढेच नाही, तर प्रत्येक जिल्हयाला आम्ही आधीच्या तुलनेत अधिक वीज दिली जात आहे. गरिबांच्या घरांबाबत याधीच्या सरकारने कधीच गांभीर्य दाखवले असतील. आता योगी जी सांगत होते, की काशीमध्ये मोदींनी शिवशंभूची पूजा केली आणि तिथून बाहेर पडल्यावर लगेचच कामगारांची पूजा केली. 

बंधू आणि भगिनींनो,

ते कवळ कॅमेरासमोर काम करत असत, हे आता आपल्या लक्षात आलेच असेलल, मात्र आमचे सरकार गरिबांसाठी अहोरात्र काम करते . आमच्या सरकारने उत्तरप्रदेशात, 30 लाख गरिबांना पक्की घरे बांधून दिली आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

स्वत:चे पक्के घर तयार झाल्यावर मानाने जगावेसे वाटते की नाही? मान ताठ होते की नाही? छाती अभिमानाने फुलते की नाही? गरीबांनाही देशासाठी काही करण्याची इच्छा असते की नाही? मोदींनी हे काम केले तर चांगले आहे की नाही? चांगले आहे ना? 30 लाख गरिबांना पक्के घर मिळाले तर त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळणार की नाही? त्यांच्या आशीर्वादाने बळ मिळेल की नाही? त्या शक्तीने आम्ही तुमची अधिक सेवा करू शकू की नाही? आम्ही तुमच्यासाठी मनापासून काम करू की नाही करणार ?

बंधू आणि भगिनींनो,

शहाजहानपूर इथं कुणी कधी विचार केला असेल. संपूर्ण उत्तर प्रदेशात इतकं काम कधी होत नव्हते. एकट्या शाहजहांपूरमध्ये 50 हजार लोकांना पक्की घरं मिळाली आहेत, त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. ज्या लोकांना अद्याप पीएम आवास योजनेची घरे मिळालेली नाहीत, त्यांना लवकरात लवकर घरे मिळावीत यासाठी मोदी आणि योगी दिवसरात्र काम करत आहेत आणि यापुढेही करत राहतील. अलीकडेच आमच्या सरकारने यासाठी 2 लाख कोटी रुपये मंजूर केले आहेत. किती - दोन लाख कोटी रुपये आणि कोणत्या उद्देशाने - गरिबांसाठी पक्की घरे बांधण्याच्या. हा खजिना तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे, मित्रांनो, तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. तुमच्या पैशाचा आम्ही पाच ते पन्नास कुटुंबांच्या भल्यासाठी दुरुपयोग करू शकत नाही. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही फक्त तुमच्यासाठीच काम करतो.

बंधू आणि भगिनींनो,

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गरिबांच्या वेदना समजून घेणारे आणि गरिबांसाठी काम करणारे सरकार स्थापन झाले आहे. घर, वीज, पाणी, रस्ता, शौचालय, गॅस कनेक्शन अशा मूलभूत सुविधांना प्रथमच प्राधान्य दिले जात आहे. अशा विकास कामांमुळे गरीब, दलित, वंचित, मागासलेल्यांचे जीवन बदलते. तुम्हाला या परिसराची स्थिती आठवत असेल, पूर्वी इथे रात्री-अपरात्री जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, कुणाला रुग्णालयाची गरज भासली तर हरदोई, शाहजहानपूर, फर्रुखाबादच्या लोकांना लखनौ, कानपूर, दिल्लीला धाव घ्यावी लागायची. इथे फारशी रुग्णालये नव्हती आणि इतर शहरात जाण्यासाठी रस्तेही नव्हते. आज इथे रस्तेही बनले आहेत, द्रुतगती मार्गही तयार होत आहेत, वैद्यकीय महाविद्यालये सुद्धा सुरू झाली आहेत. हरदोई आणि शाहजहानपूर या दोन्ही ठिकाणी एक एक वैद्यकीय महाविद्यालय! त्याचप्रमाणे योगीजींनी संपूर्ण उत्तर प्रदेशात डझनभर नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली आहेत, त्यांच्या संपूर्ण चमूने. असेच होते खंबीर काम, प्रामाणिक काम.

बंधू आणि भगिनींनो,

समाजात जे कोणी मागे आहेत, मागासलेले आहेत, त्यांना सक्षम करणे, विकासाचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. हीच भावना आमच्या कृषी धोरणात, शेतकऱ्यांशी संबंधित धोरणातही दिसून येते. बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंतच्या सर्व व्यवस्थांमध्ये आम्ही 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या देशातील 80 टक्क्यांहून अधिक छोट्या शेतकर्‍यांना प्राधान्य दिले आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत हजारो कोटी रुपये थेट बँक खात्यात पोहोचले असून, याचा सर्वाधिक फायदा छोट्या शेतकऱ्यांना झाला आहे. आज आम्ही त्या कोट्यवधी छोट्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या सुविधेने जोडत आहोत, माझ्या छोट्या शेतकऱ्यासाठी बँकेचे दरवाजे कधीच उघडले नव्हते. एमएसपीमध्ये विक्रमी वाढ, विक्रमी सरकारी खरेदी आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे वर्ग झाल्याने छोट्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मित्रांनो, 

देशातील सिंचनाखालील क्षेत्राचा विस्तार, सिंचन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान यावर आमचा भर आहे. त्यामुळे आज एक लाख कोटी रुपये ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांवर, गोदामे, शीतगृह सारख्या पायाभूत सुविधांवर खर्च केले जात आहेत. गावाजवळच अशी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून शेतकरी नाशवंत, अधिक मोबदला देणारी फळे आणि भाजीपाल्याची अधिकाधिक लागवड करू शकतील आणि त्यांना लवकर बाहेर पोहचवू शकतील. यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगांचा झपाट्याने विस्तार होईल आणि गावाजवळच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

बंधू आणि भगिनींनो,

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक दशकांपासूनचे जुने प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी आम्ही नवे पर्याय, नवीन उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. आज, उसाच्या किफायतशीर किमतीच्या बाबतीत उत्तर प्रदेश हे देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक आहे. योगीजींच्या सरकारने देयकांच्या बाबतीतही नवीन आदर्श घालून दिला आहे. आज, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यास देखील अभूतपूर्व चालना दिली जात आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीत देशाचा पैसा वाचत असून, देशाचे साखर क्षेत्रही मजबूत होत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आपल्याकडे असे काही राजकीय पक्ष आहेत ज्यांना देशाच्या वारशाच्या आणि देशाच्या विकासाच्या देखील समस्या आहेत. देशाच्या वारशाची समस्या आहे कारण त्यांना त्यांच्या व्होटबँकेची चिंता जास्त सतावते. देशाच्या विकासाची समस्या अशासाठी आहे कारण, गरीब आणि सामान्य माणसांचे त्यांच्यावरचे अवलंबित्व दिवसेंदिवस कमी होत आहे. तुम्हीच बघा या लोकांना काशीमध्ये बाबा विश्वनाथांचे भव्य धाम बांधण्याची समस्या आहे. या लोकांना अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर उभारण्यात अडचण आहे. या लोकांना गंगाजीच्या स्वच्छता अभियानाची अडचण आहे. हे लोकच दहशतवाद्यांच्या विरोधात लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. हेच लोक भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेल्या मेड इन इंडिया कोरोना लसीवर प्रश्नचिन्ह लावतात. 

बंधू आणि भगिनींनो,

हे राज्य, हा देश खूप मोठा आहे, खूप महान आहे, याआधीही सरकारे आली आणि गेली. आपण सर्वांनी देशाचा विकास आणि देशाच्या सामर्थ्याचा उत्सव खुल्या मनाने साजरा केला पाहिजे. पण खेदजनक गोष्ट ही कि, हे लोक असा विचार करत नाहीत. जेव्हा सरकार योग्य हेतूने काम करते तेव्हा काय परिणाम होतात हे उत्तर प्रदेशने गेल्या 4-5 वर्षांत नुभवले आहे. योगीजींच्या नेतृत्वाखाली इथे सरकार स्थापन होण्यापूर्वी पश्चिम उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय होती हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. इथे आधी काय म्हणायचे? इथे लोक म्हणायचे- दिवसाउजेडी घरी परत या! सूर्य मावळतीला गेल्यावर बंदुका बाळगणारे लोक रस्त्यावर यायचे. ह्या बंदुका गेल्या की नाही गेल्या? ते जायला हवे होते की नाही? दिवसेंदिवस मुलींच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होत होते. मुलींना शाळा-महाविद्यालयात जाणे सुद्धा अवघड झाले होते. व्यापारी-उद्योजक सकाळी घरातून निघायचे, कुटुंब काळजीत असायचे. गरीब कुटुंबे इतर राज्यांत कामासाठी गेल्यावर घर आणि जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्याची चिंता होती. केव्हा, कुठे दंगल होईल, कुठे जाळपोळ होईल हे कोणीच सांगू शकत नव्हते. हे तुमचे प्रेम, हे तुमचे आशीर्वाद आम्हाला रात्रंदिवस काम करण्याची प्रेरणा देतात बंधूं-भगिनींनो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माहिती आहे, या परिस्थितीमुळे अनेक गावांतून स्थलांतराच्या बातम्या रोज येत होत्या. मात्र गेल्या चार साडेचार वर्षांत योगीजींच्या सरकारने परिस्थिती सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आज त्या माफियांवर बुलडोझर चालतो, बेकायदा इमारतीवर बुलडोझर फिरतो. पण त्याचे पालनपोषण करणाऱ्यांना त्रास होतो. म्हणूनच आज संपूर्ण उत्तर प्रदेशची जनता म्हणत आहे – उत्तर प्रदेश आणि योगी, खूप आहेत उपयोगी. यूपी प्लस योगी खूप उपयुक्त आहेत, यूपी प्लस योगी खूप उपयुक्त आहेत. मी पुन्हा म्हणेन - U.P.Y.O.G.I, युपी अधिक योगी, खूप उपयोगी!

मित्रांनो,

याचे आणखी एक उदाहरण मी देतो. काही दिवसांपूर्वी एक बातमी पाहिली. ही बातमी तर आपल्या बलाढ्य शहर मेरठची आहे, पण संपूर्ण उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि देशातील इतर राज्यांनाही हे माहित असणे आवश्यक आहे.

बंधू आणि भगिनींनो,

मेरठमध्ये एक रास्ता आहे, एक बाजार आहे - सोतीगंज. देशात कुठेही वाहन चोरी असो, ती लपवण्यासाठी, चुकीच्या पद्धतीने वापरासाठी ती मेरठमधील सोतीगंज येथे येत असे. अनेक दशके हे असेच चालू होते. चोरीची वाहने मोडीत काढण्यात जे महारथी होते, त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत पूर्वीच्या सरकारांमध्ये नव्हती. हे काम शक्तिशाली योगीजींचे सरकार आणि स्थानिक प्रशासन यांनी केले आहे. आता सोतीगंजचा हा काळाबाजार बंद झाला आहे.

बंधू आणि भगिनींनो,

ज्यांना माफियांची संगत आवडते, ते माफियांचीच भाषा बोलतील. ज्यांनी आपल्या जिद्द आणि बलिदानाने हा देश घडवला आहे, त्यांचा आम्ही गौरव करू. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याच भावनेचे प्रतीक आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले त्यांना त्यांचे योग्य स्थान देणे हे आपल्या सर्व देशवासीयांचे कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. या शृंखलेत शाहजहांपूरमध्ये शहीद संग्रहालय बांधले जात आहे. शहिदांच्या स्मृती संग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. अशा प्रयत्नांमुळे येथे येणाऱ्या नव्या पिढीला राष्ट्राप्रती समर्पणाची प्रेरणा नेहमीच मिळेल. तुमच्या आशीर्वादाने उत्तर प्रदेशच्या विकासाचा हा कर्मयोग असाच चालू राहील. पूर्व असो वा पश्चिम, अवध असो की बुंदेलखंड, उत्तर प्रदेशच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा विकास करण्याची मोहीम सुरूच राहील. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे गंगा द्रुतगती मार्गासाठी अभिनंदन करतो, तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.

माझ्याबरोबर मोठ्याने बोला,

भारत माता की जय !

भारत माता की जय !

भारत माता की जय !

भारत माता की जय !

खूप खूप धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage