भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय! हर हर महादेव! माता अन्नपूर्णा की जय! गंगामाते की जय!! उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, उत्तर प्रदेश सरकारमधील सर्व मंत्री, खासदार आणि आमदार, विविध योजनांचे सर्व लाभार्थी आणि काशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!!
श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे... बाबा विश्वनाथ आणि गंगामातेचा आशीर्वाद मिळत आहे आणि बनारसच्या लोकांचा सहवास मिळत आहे... याचा अर्थ, जीवन अगदी धन्य झाले आहे. मला माहिती आहे, आजकाल, काशीचे लोक अतिशय व्यग्र आहेत. काशीमध्ये आजकाल जरा जास्तच उत्साह आहे. देश-दुनियेतून हजारो शिवभक्त इथे दररोज बाबा विश्वनाथावर जल अर्पण करण्यासाठी येत आहेत. आणि यंदाच्या वर्षी तर श्रावण महिना जरा अधिक काळ असणार आहे. अशावेळी यंदा विश्वनाथाच्या दर्शनाला विक्रमी संख्येने भाविक येणार हे निश्चित आहे. मात्र या सगळ्याबरोबरच आणखी एक गोष्ट निश्चित आहे. आता जे कोणी बनारसला येतील, ते अगदी खुश होवून -आनंदी होवूनच परत जातील. इतके सारे लोक इथे येणार, तर मग बनारस सगळ्यांचे कसे काय व्यवस्थापन करणार, याची मला आता अजिबात चिंता वाटत नाही. काशीचे लोक तर मला शिकवत असतात, आणि त्यांना मी काही शिकवू शकत नाही. अलिकडेच जी-20 बैठकीसाठी संपूर्ण जगभरातून इतकेजण बनारसला येवून गेले. काशीच्या लोकांनी त्यांचे इतके भव्य स्वागत केले, कार्यक्रमाचे इतके सुंदर, चांगले व्यवस्थापन केले की, आज संपूर्ण जगामध्ये आपल्या लोकांचे आणि काशीचे कौतुक होत आहे. आणि म्हणूनच मला माहिती आहे की, काशीचे लोक सगळं काही छान सांभाळून घेतील. तुम्ही मंडळींनी काशी विश्वनाथ धाम आणि हा संपूर्ण परिसर आता इतका भव्य बनवला आहे, की, इथे येणारा प्रत्येक भाविक हे पाहून गदगदून जातो. आम्ही हे काम पूर्ण करण्याचे एक निमित्त बनू शकलो, खरंतर ही विश्वनाथ बाबांचीच इच्छा होती. आणि हे आपल्या सर्वांचे सौभाग्य आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज काशीसह उत्तर प्रदेशला जवळपास 12 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांची भेट मिळाली आहे. आम्ही काशीचा आत्मा कायम ठेवून शहराचा कायाकल्प करण्याचा संकल्प केला आहे, त्याचा हा विस्तार कार्यक्रम आहे. यामध्ये रेल मार्ग, रस्ते, पाणी, शिक्षण, पर्यटन यांच्याशी संबंधित प्रकल्प आहेत. घाटांचा पुनर्विकास करण्यासंबंधित प्रकल्प आहेत. या विकास कामांबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन!!
मित्रांनो,
काही वेळापूर्वी मी प्रधानमंत्री घरकुल योजना आणि आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थींबरोबर संवाद साधला. आधीच्या सरकारांबद्दल लोकांची सर्वात जास्त तक्रार असायची की, योजना वातानुकूलित कक्षांमध्ये बसून तयार केल्या जातात. प्रत्यक्षात लोकांवर त्या योजनेचा नेमका काय परिणाम होत आहे, याची माहिती तत्कालीन सरकारपर्यंत पोहोचत नव्हती. परंतु भाजपा सरकारने लाभार्थींबरोबर संवाद साधला, त्यांच्या भेटी घेण्याची नवीन परंपरा सुरू केली. याचा अर्थ लाभही थेट देणे आणि प्रतिक्रियाही थेट जाणून घेणे! याचा फायदा असा झाला आहे की, प्रत्येक सरकारी विभाग, प्रत्येक अधिकारी आपली जबाबदारी जाणून घ्यायला लागले. आता कुणाच्याही बाबतीत गुणाकार-भागाकार करण्याची गरजच राहिलेली नाही.
मित्रांनो,
ज्या पक्षांनी भूतकाळामध्ये भ्रष्ट आणि काम न करता सरकार चालवले, ते आज लाभार्थींची नावे ऐकून संताप व्यक्त करत आहेत. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी, लोकशाहीचा योग्य पद्धतीने लाभ, आत्ता कुठे गरजू असणा-या लोकांपर्यंत पोहोचत आहे. नाहीतर आधी लोकशाहीच्या नावाखाली फक्त निवडक लोकांचेच हित पाहिले जात होते. गरीबाला कोणी विचारतही नव्हते. भाजपा सरकारमध्ये लाभार्थी वर्ग आज ख-या सामाजिक न्यायाचे आणि ख-या धर्मनिरपेक्षतेचे उदाहरण बनला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी, प्रत्येक योजना अगदी शेवटच्या लाभार्थ्याला शोधून काढून, त्याच्यापर्यंत पोहोचवतो. योजनेचा लाभ सर्वांना मिळेल, असे आम्ही पाहतो. या सर्व गोष्टींचा नेमका लाभ काय होत आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? बंधूनो, ज्यावेळी सरकार स्वतःहून लाभार्थीपर्यंत पोहोचते, त्यावेळी काय होते? दलाली घेणा-यांचे दुकान.... बंद! दलाली खाणा-यांचे दुकान ....बंद! घोटाळे करणा-यांचे दुकान ....बंद! याचा अर्थ कोणताही भेदभाव नाही आणि कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार नाही.
मित्रांनो,
गेल्या 9 वर्षांमध्ये आम्ही फक्त एका परिवारासाठी आणि एका पिढीसाठी योजना बनवली नाही. तर येणा-या पिढ्यांचे भविष्यही सुधारावे, हे लक्षात घेवून काम केले आहे. आता ज्याप्रमाणे गरीबांसाठी घरकुलाची योजना आहे. त्यामधून आत्तापर्यंत देशामध्ये 4 कोटींपेक्षा जास्त परिवारांना पीएम घरकुल योजनेतून पक्की घरकुले मिळाली आहेत. आजही इथे उत्तर प्रदेशातील साडेचार लाख गरीब कुटुंबांना पक्की घरकुले सुपुर्द करण्यात आली आहेत. श्रावण महिन्यामध्ये महादेवाची किती मोठी कृपा झाली आहे.
मित्रांनो,
ज्या गरीबांना हे घरकुल मिळाले, त्यांची खूप मोठी चिंता मिटली आहे. सुरक्षीततेची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. ज्यांना हे घर मिळते, त्यांच्यामध्ये एक नवीन स्वाभिमान जागृत होतो, नवीन ऊर्जा येते. ज्यावेळी अशा घरामध्ये एखाद्या बाळाचे पालन-पोषण केले जाते, या घरामध्ये ते बाळ लहानाचे मोठे होऊ लागते, त्यावेळी त्याच्या आकांक्षाही वेगळ्या असतात. आणखी एका गोष्टीचे मी आपल्याला वारंवार स्मरण करून देत असतो, पीएम घरकुल योजनेतील ही बहुतेक सर्व घरे महिलांच्या नावे दिली जात आहेत. आज या घरांची किंमत अनेक लाख रूपये झाली आहे. कोट्यवधी भगिनी तर अशा आहेत, ज्यांच्या नावाने पहिल्यांदाच एखाद्या मालमत्तेची नोंदणी झाली आहे. यामुळे गरीब कुटुंबातील भगिनींना जी आर्थिक सुरक्षेची हमी मिळत आहे, त्याचे मोल त्या भगिनीच जाणून आहेत.
मित्रांनो,
आयुष्मान भारत योजना, ही फक्त 5 लाख रूपयांपर्यंत मोफत औषधोपचारापुरतीच मर्यादित नाही. या योजनेचा प्रभाव अनेक पिढ्यांवर पडणार आहे. ज्यावेळी गरीब कुटुंबामध्ये जर कोणी गंभीर स्वरूपात आजारी पडले तर, त्या घरात कोणाचे तरी शिक्षण थांबते, कोणाला तरी लहान वयातच काम करावे लागते. पत्नीलाही रोजच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. एका गंभीर आजारामुळे घरातील मुला-मुलीचे लग्नाचे वय झाले तरी त्यांचा विवाह आई-वडील करू शकत नाहीत. कारण आजारपणामुळे घराची आर्थिक स्थिती अधिकच बिकट बनलेली असते. आणि गरीबासमोर दोनच पर्याय असतात. एक म्हणजे त्यांना आपल्या डोळ्यासमारे जगण्यासाठी संघर्ष करताना आपल्या मुलांना पाहणे, नाहीतर आपल्याकडे जी काही जमीन, घर असेल, ते विकून औषधोपचारासाठी कर्ज घेणे. ज्यावेळी मालमत्ता विकली जाते, कर्जाचे ओझे वाढते, त्यावेळी त्याचा परिणाम येणा-या अनेक पिढ्यांवर होत असतो. आयुष्मान भारत योजना, आज गरीबाला या संकटातून वाचवत आहे. म्हणूनच मी मिशन मोडवर लाभार्थींपर्यंत आयुष्मान कार्ड पोहोचविण्यासाठी अधिक प्रयत्न करीत आहे. आजही इथून एक कोटी 60 लाख लाभार्थींना आयुष्मान भारत योजनेचे कार्ड वितरण सुरू झाले आहे.
बंधू आणि भगिनींनो,
देशातील साधनसंपत्तीवर वंचित, गरिबांचा सर्वाधिक हक्क आहे. पूर्वी फक्त श्रीमंत लोकांनाच बँकांमध्ये प्रवेश मिळत असे. गरिबांसाठी पैसे नाहीत, असा समज होता, मग बँक खात्याचे करायचे काय? काही लोकांना वाटायचे की जर हमी देणारे कोणीच नसेल तर बँकेचे कर्ज कसे मिळणार. गेल्या 9 वर्षांत ही विचारसरणीही भाजप सरकारने बदलली. आम्ही सर्वांसाठी बँकांचे दरवाजे उघडले. आम्ही सुमारे 50 कोटी जन धन बँक खाती उघडली. मुद्रा योजनेंतर्गत हमीशिवाय 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले. इथे उत्तर प्रदेशातही कोट्यवधी लाभार्थ्यांनी मुद्रा योजनेचा लाभ घेऊन आपले काम सुरू केले आहे. यामध्ये गरीब, दलित, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक कुटुंबातील सहकारी आणि महिला उद्योजकांना सर्वाधिक फायदा झाला आहे. हाच तर सामाजिक न्याय आहे, ज्याची हमी भाजप सरकार देत आहे.
मित्रांनो,
रस्त्यावर-गाड्या-ठेले-पदपथावर छोटे-मोठे व्यवसाय करणारे आपले बहुतेक साथीदारही वंचित समाजातीलच असतात. पण आधीच्या सरकारांनी या सहकाऱ्यांना अपमान आणि त्रासाशिवाय काहीही दिले नाही. रस्त्यावर-गाड्या-ठेले-पदपथावरील या दुकानदारांना शिव्या दिल्या जात आणि निघून जात. पण गरीब आईचा मुलगा मोदी हा अपमान सहन करू शकत नाही. म्हणूनच मी रस्त्यावर-गाड्या-ठेले-पदपथावर दुकाने चालवणाऱ्यांसाठी पीएम-स्वानिधी योजना बनवली आहे. पीएम स्वानिधी योजनेंतर्गत आम्ही त्यांचाही सन्मान केला आहे आणि बँकांना मदत करण्यास सांगितले आहे. रस्त्यावरील फेरीवाल्यांना बँका देत असलेल्या पैशाची हमी सरकार स्वतः घेत आहे. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 35 लाखांहून अधिक मित्रांना मदत मंजूर झाली आहे. बनारसमध्येही स्वानिधी योजनेअंतर्गत सव्वा लाख लाखाहून अधिक लाभार्थ्यांना कर्ज देण्यात आले आहे. या कर्जामुळे ते आपले काम आणखी वाढवतील आणि आपल्या दुकानाचा विस्तार करतील. आता त्याला कोणीही शिवीगाळ करू शकणार नाही, त्याचा अपमान करू शकणार नाही. गरिबांना स्वाभिमान, ही मोदींची हमी आहे.
मित्रांनो,
ज्या लोकांनी देशावर अनेक दशके राज्य केले, त्यांच्या राजवटीच्या मुळाशीच अप्रामाणिकपणा होता. आणि जेव्हा असे असते तेव्हा कितीही पैसे जमा झाले तरी ते कमीच पडतात. 2014 पूर्वी भ्रष्ट आणि घराणेशाहीच्या सरकारच्या काळात असाच कारभार चालत असे. अर्थसंकल्पाचा मुद्दा आला की केवळ तोट्याचा, नुकसानीचा बहाणा केला जात असे. आज गरीब कल्याण असो वा पायाभूत सुविधा, निधीची कमतरता नाही. तेच करदाता आहेत, तिच प्रणाली आहे. परंतु सरकार बदलले आहे, नियत बदलली आहे, त्यामुळे त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. पूर्वी वर्तमानपत्रे भ्रष्टाचार आणि काळाबाजाराच्या बातम्यांनी भरलेली असायची. आता नवीन प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनाच्या बातम्या वर्तमानपत्रात दिसतात. गेल्या 9 वर्षात आलेल्या बदलाचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे भारतीय रेल्वे. ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, म्हणजेच मालगाड्यांसाठी विशेष लोहमार्गाची योजना 2006 मध्ये सुरू झाली. मात्र 2014 पर्यंत 1 किलोमीटरचा मार्गही टाकता आला नाही. एक किलोमीटरही नाही. गेल्या 9 वर्षांत त्याचा मोठा भाग पूर्ण झाला आहे. यावर मालगाड्या धावू लागल्या आहेत. आजही दीनदयाळ उपाध्याय जंक्शनपासून नवीन सोननगर विभागाचे उद्घाटन झाले आहे. यामुळे मालगाड्यांचा वेग तर वाढेलच, पण पूर्वांचल आणि पूर्व भारतात रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होतील.
मित्रांनो,
हेतू स्वच्छ असला की कामे कशी होतात याचे आणखी एक उदाहरण मी देतो. देशात अतिजलद वेगाने गाड्या धावल्या पाहिजेत, अशी देशाची नेहमीच इच्छा होती. यासाठी सुमारे 50 वर्षांपूर्वी देशात प्रथमच राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. राजधानी एक्स्प्रेस सुरू झाली. मात्र इतक्या वर्षांतही ही राजधानी एक्स्प्रेस केवळ 16 मार्गांवर धावू शकली आहे. 50 वर्षात फक्त सोळा मार्ग सुरु झाले. तसेच 30-35 वर्षांपूर्वी शताब्दी एक्स्प्रेसही सुरू झाली. मात्र शताब्दी एक्सप्रेस 30-35 वर्षांत केवळ 19 मार्गांवर सेवा देत आहे. या गाड्यांव्यतिरिक्त वंदे भारत एक्सप्रेस आहे. आणि बनारसला देशातील पहिल्या वंदे भारताचा किताब मिळाला आहे. 4 वर्षात ही ट्रेन 25 मार्गांवर धावू लागली आहे. आजही गोरखपूर येथून दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. एक ट्रेन गोरखपूर ते लखनौ तर दुसरी अहमदाबाद ते जोधपूर या मार्गावर धावली आहे. देशातील मध्यमवर्गीयांमध्ये वंदे भारत इतकी लोकप्रिय झाली आहे की, कानाकोपऱ्यातून तिला मागणी येत आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा वंदे भारत देशाच्या कानाकोपऱ्याला जोडेल.
बंधू आणि भगिनींनो,
गेल्या 9 वर्षांत, काशीची संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी अभूतपूर्व काम केले गेले आहे. येथे होत असलेल्या विकासकामांमुळे रोजगाराच्या अनेक नवीन संधीही निर्माण होत आहेत. आता गेल्या वर्षी जसे 7 कोटींहून अधिक पर्यटक आणि भाविक काशीत आले. अवघ्या एका वर्षात काशीला येणाऱ्या पर्यटकांची संख्या 12 पटीने वाढली. पर्यटक 12 पटीने वाढले आहेत, त्यामुळे रिक्षावाले, दुकानदार, ढाबा-हॉटेल्स चालवणारे मित्रमंडळी यांना याचा थेट फायदा झाला आहे. बनारसी साड्यांच्या क्षेत्रातमध्ये काम करणारे असोत किंवा बनारसी पान बनवणारे माझे भाऊ असोत, सर्वांना याचा खूप फायदा होत आहे. पर्यटकांच्या वाढीमुळे आमच्या नाव चालवणाऱ्या सोबत्यांना खूप फायदा झाला आहे. संध्याकाळच्या गंगा आरतीच्या वेळी बोटींवर किती गर्दी असते हे पाहून मलाही आश्चर्य वाटते. तुम्ही बनारसची अशीच काळजी घेत रहा.
मित्रांनो,
बाबांच्या आशीर्वादाने वाराणसीचा झपाट्याने होत असलेला विकासाचा हा प्रवास सुरूच राहणार आहे. आणि यावेळी मला काशीच्या लोकांचे आणखी आभार मानायचे आहेत. नुकत्याच काशीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. विकासाच्या प्रवासाला तुम्ही सर्वांनी साथ दिली, विकासावर विश्वास ठेवणाऱ्यांना जिंकून पाठवले आणि काशीमध्ये चांगली व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने तुम्ही लोकांनी सहकार्य दिले यामुळे तुमच्यामध्ये आलो असता, मी काशीचा खासदार म्हणून तुमचा मनापासून आभारी आहे. माझ्या पुन्हा एकदा विकास कार्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि पवित्र श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हर-हर महादेव !