भारत माता की जय !
भारत माता की जय !
भगवान बुद्ध यांच्या परिनिर्वाण स्थळी, कुशीनगर येथे आज आपण विमानतळाचे उद्घाटन , वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन केले. इथे आता विमानसेवा उपलब्ध होईल तसेच गंभीर आजारांवर उपचार देखील होतील. इथल्या लोकांचे मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल , उत्तर प्रदेशचे लोकप्रिय आणि यशस्वी कर्मयोगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश भाजपाचे ऊर्जावान अध्यक्ष स्वतंत्र देव , उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सूर्यप्रताप साही , सुरेश कुमार खन्ना , स्वामी प्रसाद मौर्या , डॉक्टर नीलकंठ तिवारी , संसदेतील माझे सहकारी विजय कुमार दुबे, डॉक्टर रमापति राम त्रिपाठी , अन्य लोकप्रतिनिधिगण, आणि मोठ्रया संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, !! दिवाळी आणि छठ पूजा खूप लांब नाही. हा उत्सव आणि उत्साहाचा काळ आहे. आज महर्षि वाल्मिकी यांची जयंती देखील आहे. या पवित्र प्रसंगी कनेक्टिविटी , आरोग्य आणि रोजगार संबंधी शेकडो कोटी रूपयांचे नवीन प्रकल्प कुशीनगरकडे सोपवताना मला खूप आनंद होत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
महर्षी वाल्मिकींनी आपल्याला रामायणाच्या माध्यमातून प्रभु श्रीराम आणि माता जानकी यांचे केवळ दर्शन घडवले नाही तर समाजाची सामूहिक शक्ती, सामूहिक प्रयत्नांद्वारे कशा प्रकारे प्रत्येक लक्ष्य साध्य केले जाते याचे प्रबोधनही केले. कुशीनगर याच दर्शनाचे अतिशय समृद्ध आणि पवित्र स्थान आहे.
बंधू आणि भगिनींनो,
नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे इथे गरीबांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत , गावांपासून शहरांपर्यंत , संपूर्ण परिसराचे चित्रच बदलणार आहे. महाराजगंज आणि कुशीनगर यांना जोडणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाला उत्तम कनेक्टिविटी मिळेल, त्याचबरोबर रामकोला आणि सिसवा साखर कारखान्यांपर्यंत पोहचण्यात ऊस शेतकऱ्यांना होणारा त्रास देखील दूर होईल. कुशीनगर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आल्यावर तुम्हाला आता उपचारांसाठी एक नवी सुविधा मिळाली आहे. बिहारच्या सीमावर्ती भागांनाही याचा लाभ मिळेल. इथल्या अनेक युवकांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. आणि तुम्हाला माहित आहे आम्ही जे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणले आहे , त्यात निर्णय घेतला आहे , स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर हा निर्णय घेतला आहे की आता आपल्या मातृभाषेत शिकणारी मुले देखील , गरीब मातेचा मुलगा देखील डॉक्टर बनू शकतो, इंजीनियर बनू शकतो. भाषेमुळे आता त्याच्या विकास यात्रेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही. अशाच प्रयत्नांमुळे पूर्वांचल मध्ये मेंदूज्वर - एन्सेफलाइटिस सारख्या जीवघेण्या आजारांपासून हजारो निष्पाप मुलांना वाचवता येऊ शकेल.
मित्रांनो ,
गंडक नदीच्या आसपासच्या शेकडो गावांना पुरापासून वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी तटबंधची निर्मिती असेल, कुशीनगर शासकीय महाविद्यालयाची उभारणी असेल, दिव्यांग मुलांसाठी महाविद्यालय असेल ,या परिसराला अभावातून बाहेर काढून आकांक्षाच्या दिशेने घेऊन जाईल. गेल्या 6-7 वर्षांत गाव, गरीब, दलित, वंचित, मागास, आदिवासी, अशा प्रत्येक घटकाला मूलभूत सुविधांशी जोडण्याचे जे अभियान देशात सुरु आहे, हा त्याचाच एक महत्वाचा भाग आहे.
मित्रांनो ,
जेव्हा मूलभूत सुविधा मिळतात, तेव्हा मोठी स्वप्ने पाहण्याचा उत्साह आणि स्वप्ने पूर्ण करण्याची आकांक्षा निर्माण होते. जे बेघर आहेत किंवा झोपडीत राहत आहेत त्यांना पक्के घर मिळाले, घरात शौचालय आहे, वीज आहे, गॅस आहे, नळाद्वारे पाण्याची सोय असते तेव्हा गरीब व्यक्तीचाही आत्मविश्वास अनेक पटींनी आता या सुविधा जलद गतीने गरीबांपर्यंत पोहचत आहेत , त्यामुळे गरीबांना देखील प्रथमच जाणीव होत आहे की आज जे सरकार आहे, ते त्यांच्या वेदना समजून घेते, त्यांच्या अडचणी समजून घेते. आज अतिशय प्रामाणिकपणे केंद्र आणि राज्य सरकार, उत्तर प्रदेशच्या विकासात, या क्षेत्राच्या विकासात योगदान देत आहे. डबल इंजिनचे सरकार, दुहेरी सामर्थ्यानिशी स्थिती सुधारत आहे. नाहीतर 2017 पूर्वी, योगी जी यांच्या येण्यापूर्वी तिथे जे सरकार होते, त्यांना तुमच्या अडचणींशी, गरीबांच्या त्रासाशी काहीही देणेघेणे नव्हते. त्यांना वाटतच नव्हते की केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ उत्तर प्रदेशच्या गरीबांच्या घरापर्यंत पोहचावा. म्हणूनच पूर्वीच्या सरकारच्या काळात उत्तर प्रदेशात गरीबांशी संबंधित , पायाभूत विकासाशी संबंधित प्रत्येक प्रकल्पात विलंब होत गेला. ,राममनोहर लोहिया म्हणायचे की
- कर्माला करुणेची, भरपूर करुणेची जोड द्या
मात्र पूर्वी जे सरकार चालवत होते, त्यांनी गरीबांच्या वेदनेची पर्वा केली नाही, पूर्वीच्या सरकारांनी आपल्या कर्माला घोटाळे आणि गुन्हेगारीशी जोडले. उत्तर प्रदेशच्या लोकांना चांगले माहित आहे की या लोकांची ओळख समाजवादी म्हणून नाही तर परिवारवादी अशी झाली आहे. या लोकांनी केवळ आपल्या कुटुंबाचे भले केले, आणि उत्तर प्रदेशचे हित विसरले.
मित्रांनो ,
देशातील एवढे मोठे राज्य, एवढी मोठी लोकसंख्या असलेले राज्य असल्यामुळे एकेकाळी उत्तर प्रदेश, देशातील प्रत्येक मोठ्या अभियानासाठी आव्हान मानले जात होते. मात्र आज उत्तर प्रदेश देशातील प्रत्येक मोठ्या अभियानाच्या यशात आघाडीची भूमिका पार पाडत आहे. मागील वर्षांमध्ये स्वच्छ भारत अभियानापासून कोरोना विरोधी अभियानात देशाने याचा सातत्याने अनुभव घेतला आहे. देशात दररोज सरासरी सर्वात जास्त लसीकरण करणारे राज्य जर कुठले असेल तर त्या राज्याचे नाव आहे उत्तर प्रदेश . टीबी विरुद्ध देशाच्या लढाईत देखील उत्तर प्रदेश उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. आज जेव्हा आपण कुपोषण विरुद्ध आपली लढाई पुढील टप्प्यात घेऊन जात आहोत , तेव्हा यातही उत्तर प्रदेशची भूमिका खूप महत्वाची आहे.
मित्रांनो ,
उत्तर प्रदेशात कर्मयोगींचें सरकार बनण्याचा सर्वाधिक लाभ इथल्या माता-भगिनींना झाला आहे. जी नवी घरे बनली, त्यापैकी बहुतांश घरांची नोंदणी महिलांच्या नावाने झाली, शौचालय बांधली गेली, इज्ज़त घर उभी राहिली, सुविधांबरोबरच त्यांची प्रतिष्ठा देखील जपली गेली , उज्वला गॅस जोडणी मिळाल्यामुळे त्यांना धुरापासून मुक्ती मिळाली आणि आता महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये , त्रास सोसावा लागू नये म्हणून घरापर्यंत पाईपद्वारे पाणी पोहचवण्याचे अभियान सुरु आहे. केवळ 2 वर्षांच्या आतच उत्तर प्रदेशच्या 27 लाख कुटुंबांना शुद्ध पेयजल जोडणी मिळाली आहे.
मित्रांनो ,
केंद्र सरकारने आणखी एक योजना सुरु केली आहे जी भविष्यात उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागांमध्ये समृद्धीचे नवीन दार उघडणार आहे. या योजनेचे नाव आहे - पीएम स्वामित्व योजना. या अंतर्गत गावांमधील घरांच्या मालकीची कागदपत्रे देण्याचे काम अर्थात घरांचा ताबा देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गावागावांमधील जमिनीची, मालमत्तांची ड्रोनच्या सहाय्याने मोजणी केली जात आहे. आपल्या मालमत्तेचे कायदेशीर दस्तावेज मिळाल्यामुळे अवैधरित्या कब्जा होण्याची भीती संपुष्टात येईलच , बँकांकडून मदत मिळणे देखील खूप सोपे होईल. उत्तर प्रदेशचे जे युवक , गावातील आपल्या घरांच्या , आपल्या जमिनीच्या आधारे आपला उद्योग सुरु करू इच्छित होते आता त्यांना स्वामित्व योजनेमुळे खूप मोठी मदत मिळणार आहे.
बंधू आणि भगिनींनो,
मागील साडेचार वर्षात उत्तर प्रदेशात कायदयाच्या राज्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. 2017 पूर्वी जे सरकार इथे होते त्यांचे धोरण होते - माफियांना उघडपणे सूट, उघडपणे लूट . आज, योगीजींच्या नेतृत्वाखाली माफिया माफी मागत फिरत आहेत आणि सर्वात जास्त भिती देखील , याचा सर्वाधिक त्रास योगीजींच्या उपाययोजनांचे दुःख देखील माफियांना होत आहे. योगी जी आणि त्यांची टीम त्या भूमाफियांना उध्वस्त करत आहे जे गरीब, दलित, वंचित, मागास लोकांच्या जमिनीवर वाईट नजर ठेवून होते, अवैध रित्या ताब्यात घेत होते.
मित्रांनो,
ज्यावेळी कायद्याचे राज्य असते, त्यावेळी गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होते आणि विकासाच्या योजनांचा लाभही वेगाने गरीब-दलित, शोषित-वंचिंतांपर्यंत पोहोचतो. नवीन रस्ते, नवीन रेलमार्ग, नवीन वैद्यकीय महाविद्यालये, वीज आणि पाणी यांच्यासंबंधातील पायाभूत सुविधांची निर्मितीही झपाट्याने होऊन वेगाने विकास होऊ शकतो. हेच काम आज योगी यांच्या नेतृत्वाखालील त्यांची संपूर्ण टीम उत्तर प्रदेशच्या जमिनीवर उतरून-राहून काम करून दाखवत आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये औद्योगिक विकास फक्त एक किंवा दोन शहरांपुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर संपूर्ण पूर्वांचलातल्या जिल्ह्यांपर्यंत तो पोहोचत आहे.
मित्रांनो,
उत्तर प्रदेशाविषयी नेहमी एक गोष्ट सांगितली जाते. हे असे राज्य आहे की, या राज्याने देशाला सर्वात जास्त पंतप्रधान दिले. हे उत्तर प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. मात्र उत्तर प्रदेशची ही ओळख म्हणून याकडे इतकेच मर्यादेने पाहून चालणार नाही. उत्तर प्रदेशाला 6-7 दशकांपर्यंतच सीमित ठेवून चालणार नाही. ही अशी भूमी आहे, जिचा इतिहास कालातीत आहे. या भूमीचे योगदान कालातीत आहे. या भूमीवर मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम यांनी अवतार घेतला, भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर, उत्तर प्रदेशातच अवतरले होते. तुम्ही मध्यकाळाकडे पाहिले तर तुलसीदास आणि कबीरदास यांच्यासारख्या युगनायकांनीही याच मातीमध्ये जन्म घेतला होता. संत रविदास यांच्यासारख्या समाज सुधारकांना जन्म देण्याचे भाग्यही या प्रदेशाच्या मातीला मिळाले आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जावे, त्यामध्ये उत्तर प्रदेशाने दिलेल्या योगदानाशिवाय त्या क्षेत्राचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यही अपूर्णच असल्याचे दिसून येईल. उत्तर प्रदेश हा असा एक प्रदेश आहे, जिथं पावलो-पावली तीर्थ आहे, आणि कणाकणांमध्ये ऊर्जा आहे. वेद आणि पुराणांना लिपीबद्ध स्वरूपात जतन करण्याचे काम इथल्या नैमिषारण्यामध्ये झाले आहे. अवध क्षेत्रामध्येच, इथल्या अयोध्येसारखेच तीर्थ आहे. पूर्वांचलामध्ये शिवभक्तांची पवित्र काशी आहे, बाबा गोरखनाथांची तपोभूमी गोरखपूर आहे, महर्षी भृगू यांचे स्थान बलिया आहे. बुंदेलखंडामध्ये चित्रकूटसारखे अनंत महिमा असणारे तीर्थस्थान आहे. आणि इतकेच नाही तर तीर्थराज प्रयागही आपल्या उत्तर प्रदेशातच आहे. ही सूची काही इथेच थांबणारी नाही. तुम्ही काशीला जाणार असाल तर तुमची यात्रा सारनाथला गेल्याशिवाय पूर्ण होणार नाही. सारनाथ इथेच भगवान बुद्धांनी आपला पहिला उपदेश दिला होता. कुशीनगरमध्ये तर आपण आत्ता सर्वजण उपस्थित आहोतच. संपूर्ण दुनियेतून बौद्ध अनुयायी इथे येतात. आज तर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय विमानसेवेने लोक इथे आले आहेत. वेगवेगळ्या देशांतून लोक ज्यावेळी कुशीनगरला येतील, त्यावेही श्रावस्ती, कौशांबी आणि संकिसा यासारख्या तीर्थस्थानांनाही जातील. याचे श्रेय उत्तर प्रदेशकडेच जाणार आहे. श्रावस्तीमध्येच जैन तीर्थंकर संभवनाथ जी यांचे जन्मस्थान आहे. याचप्रमाणे अयोध्येमध्ये भगवान ऋषभदेव आणि काशीमध्ये तीर्थंकर पार्श्वनाथ आणि सुपार्श्वनाथ जी यांची जन्मस्थाने आहेत. याचा अर्थ इथल्या एका-एका स्थानाचा महिमा असा आहे की, अनेक अवतार एकाच स्थानी जन्मले आहेत. इतकेच नाही, आपल्या गौरवशाली महान शीख गुरू परंपरेचाही उत्तर प्रदेशाबरोबर अतिशय खोलवर संबंध आहे. आगरामध्ये ‘‘गुरू का ताल’’ गुरूव्दारा आजही गुरू तेगबहादूर यांचा महिमा सांगतो. त्यांच्या शौर्याची इथे साक्ष मिळते. इथेच त्यांनी औरंगजेबाला आव्हान दिले होते. आगरा इथल्याच गुरूव्दाराने, गुरूनानक देव आणि पीलिभीतच्या सहावी पादशाही गुरूव्दाराच्यावतीनेही गुरूनानक देव यांच्या ज्ञान आणि उपदेशांचा वारसा जतन केला जात आहे. इतके सगळे काही देशाला आणि दुनियेला देणा-या उत्तर प्रदेशाचा महिमा खूपच मोठा आहे. उत्तर प्रदेशातल्या लोकांचे सामर्थ्य खूप मोठे आहे. या सामर्थ्याच्या हिशेबानेच उत्तर प्रदेशाला वेगळी ओळख मिळाली पाहिजे. या राज्याला आपला हा वारसा पुढे नेण्यासाठी संधी मिळावी, या दिशेने आम्ही काम करीत आहोत.
मित्रांनो,
ज्यावेळी मी उत्तर प्रदेशाच्या सामर्थ्याची, उत्तर प्रदेशाची देश-दुनियेला होत असलेली नवीन ओळख याविषयी प्रशंसा करतो, त्यावेळी ते काही लोकांना खूप त्रासदायक वाटते, हे मला चांगले माहिती आहे. मात्र सत्य बोलण्याने जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी गोस्वामी तुलसीदास जी यांचे वचन योग्य आहे-
गोस्वामी जींनी म्हटले आहे की -
जहां सुमति तहं संपति नाना।
जहां कुमति तहं बिपति निदाना ।।
याचा अर्थ असा की, ज्याठिकाणी सद्बुद्धी असते, तिथे नेहमीच सुखाची स्थिती निर्माण होत असते. आणि ज्याठिकाणी कुबुद्धी असते, तिथे नेहमीच संकटाची सावली असते. आम्ही तर गरीबांची सेवा करण्याचा संकल्प करून पुढे जात आहोत. कोरोना काळामध्ये देशाने दुनियेतला सर्वात मोठा मोफत रेशनधान्य वितरणाचा कार्यक्रम राबविला. उत्तर प्रदेशातल्या जवळपास 15 कोटी लाभार्थींना या कार्यक्रमाचा लाभ मिळत आहे. आज दुनियेतला सर्वात मोठा आणि सर्वात वेगवान लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. ‘सर्वांना लस, मोफत लस’ - लसीच्या 100 कोटी मात्रा देण्याचा टप्पा वेगाने गाठण्यासाठी आम्ही तयारी करीत आहोत. उत्तर प्रदेशमध्येही आत्तापर्यंत लसीच्या 12 कोटींपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
डबल इंजिनाचे सरकार इथल्या शेतकरी बांधवांकडून कृषी मालाच्या खरेदीचे नवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे. उत्तर प्रदेशातल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांमध्ये आत्तापर्यंत जवळपास 80 हजार कोटी रूपये त्यांच्या धान्याच्या खरेदीपोटी जमा केले गेले आहेत. 80 हजार कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यांमध्ये ही रक्कम पोहोचली आहे, इतकेच नाही तर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेतून उत्तर प्रदेशातल्या शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये 37 हजार कोटी रूपयांपेक्षाही जास्त निधी जमा करण्यात आला आहे. आणि हे सर्व लहान शेतक-यांच्या कल्याणासाठी केले जात आहे. लहान -लहान शेतकरी बांधवांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केले जात आहे.
भारत, इथेनॉलविषयी आज जे धोरण राबवत आहे, त्याचाही खूप मोठा लाभ उत्तर प्रदेशातल्या शेतकरी बांधवांना होणार आहे. ऊस आणि इतर खाद्यान्न यांच्यापासून निर्माण होणारे जैवइंधन, परदेशातून आयात होणा-या कच्च्या तेलाला एक अतिशय महत्वाचा पर्याय बनत आहे. ऊस उत्पादक शेतक-यांसाठी तर गेल्या काही वर्षांमध्ये योगी जी आणि त्यांच्या सरकारने अतिशय कौतुकास्पद काम केले आहे. आज ज्या राज्याचे सरकार आपल्या ऊस उत्पादक शेतक-यांना सर्वात जास्त भाव देत आहे, त्या राज्याचे नाव आहे- उत्तर प्रदेश!! आधी जी सरकारे राज्यात होती, त्यांच्या कार्यकाळामध्ये, म्हणजेच योगी जी येण्याआधी पाच वर्षांमध्ये ऊस उत्पादक शेतक-यांना एक लाख कोटी रूपयांपेक्षाही कमी पैसे वितरीत करण्यात आले होते. एक लाख कोटींपेक्षाही कमी! आणि आता योगी जी यांच्या सरकारला तर अजून पारच वर्षेही पूर्ण झालेली नाहीत. तरीही त्यांच्या सरकारने ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना आत्तापर्यंत जवळपास दीड लाख कोटी रूपये मूल्यभाव म्हणून दिले आहेत. आता जैवइंधन बनविण्यासाठी, इथेनॉलसाठी उत्तर प्रदेशामध्ये जे कारखाने उभे केले जात आहेत, त्यांच्यामुळेही ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना आणखी मदत मिळेल.
बंधू आणि भगिनींनो,
आगामी काळ हा उत्तर प्रदेशच्या आकांक्षांच्या पूर्ततेचा काळ आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात, आपण सर्वांनी एकजूट होण्याचा काळ आहे. आता इथून उत्तर प्रदेशसाठी केवळ पाच महिन्यांसाठी योजना बनवायची नाही. तर आगामी 25 वर्षांची पायाभरणी करून उत्तर प्रदेशाला खूप पुढे न्यायचे आहे. कुशीनगरच्या आशीर्वादाने, पूर्वांचलच्या आशीर्वादाने, उत्तर प्रदेशाच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्वांच्या प्रयत्नांनीच हे सर्व शक्य होणार आहे. उत्तर प्रदेशच्या आशीर्वादानेच तर हे नक्कीच शक्य होणार आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना अनेक नवीन सुविधा मिळत असल्याबद्दल सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! दिवाळी आणि छठ पूजा यांच्यानिमित्त आधीच शुभेच्छा देतो. एक आग्रह मात्र मी आपल्याला पुन्हा एकदा करणार आहे. लोकलसाठी व्होकल होण्याचे विसरू नका. स्थानिक उत्पादनेच खरेदी करण्याचा आग्रह कायम ठेवा. दिवाळी सण आपल्या आजूबाजूच्या, भवतालच्या बंधू-भगिनींच्या श्रमाने-घामाने बनलेल्या वस्तूंनी साजरा केला तर त्या दिवाळीमध्ये अनेक रंग भरले जातील. एक नवीन प्रकाश निर्माण होईल. एक नवीन ऊर्जा-शक्ती प्रकट होईल. याचाच अर्थ सण-उत्सवांमध्ये आपली- स्थानिक, देशी उत्पादने आपण जास्तीत जास्त खरेदी केली पाहिजेत. या आग्रहाबरोबरच तुम्हा सर्वांचे खूप- खूप आभार!
धन्यवाद!!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!