कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, कर्नाटक सरकारमधील मंत्री, खासदार आणि आमदार मंडळी आणि विशाल संख्येने आज इथे आलेले माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो!
आज भारताच्या सागरी शक्तीच्या दृष्टीने खूप मोठा दिवस आहे. राष्ट्राची लष्करी सुरक्षा असो अथवा राष्ट्राची आर्थिक सुरक्षा, भारत आज मोठ्या संधींचा साक्षीदार बनत आहे. आत्ताच काही वेळा पूर्वी कोच्चीमध्ये भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू तळाच्या लोकार्पण कार्यक्रमाने प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. आणि आता इथे मंगळूरूमध्ये 3 हजार 700 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण, शिलान्यास आणि भूमिपूजन कार्यक्रम होत आहे. ऐतिहासिक मंगळूरू बंदराची क्षमतेच्या विस्ताराबरोबरच इथे शुद्धीकरण आणि आमच्या मच्छिमार मित्रांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि शिलान्यासही झाला आहे. या प्रकल्पांसाठी मी कर्नाटकवासियांचे, तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.
या प्रकल्पांमुळे कर्नाटकमध्ये व्यापार-कारभाराला, उद्योगांना अधिक ताकद मिळेल. व्यवसाय सुलभीकरणाला बळ मिळेल. विशेष करून ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या अंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या कर्नाटकातल्या शेतकरी आणि मच्छीमार बांधवांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत पोहोचणे अधिक सुकर होईल.
मित्रांनो,
यावेळी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून ज्या पंच प्रतिज्ञांविषयी मी बोललो आहे, त्यापैकी सर्वात पहिली प्रतिज्ञा आहे - विकसित भारताची निर्मिती! विकसित भारताच्या निर्माणासाठी देशाच्या उत्पादन क्षेत्रामध्ये ‘मेक इन इंडिया’चा विस्तार करणे खूप गरजेचे आहे. विकसित भारताच्या निर्माणासाठी आवश्यक आहे, ते म्हणजे आपली निर्यात वाढली पाहिजे. संपूर्ण जगामध्ये आपली उत्पादने, किंमतीच्या बाबतीत स्पर्धेमध्ये टिकणारी पाहिजेत. हा स्वस्त आणि सुगम तार्किक मार्ग स्वीकारल्याशिवाय काही शक्य होणार नाही.
याच विचाराने गेल्या 8 वर्षांपासून देशामध्ये पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व काम केले जात आहे. आज देशातल्या फार कमी भागामध्ये पायाभूत सुविधा नाहीत. किंवा तिथे कोणता न कोणता मोठा प्रकल्प सुरू नाही, अशी खूप कमी स्थाने आहेत. भारतमालामुळे सीमावर्ती राज्यांमध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण करून तिथे पायाभूत सुविधा सशक्त केल्या जात आहेत. तर सागरी किना-यांवर पायाभूत सुविधांना सागरमालामुळे शक्ती मिळत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
गेल्या वर्षांमध्ये देशााने बंदरांच्या विकासासाठी, जणू एक महत्वाचा मंत्र जपत काम केले आहे. याच प्रयत्नांचा परिणाम म्हणजे फक्त 8 वर्षांमध्ये भारताच्या बंदरांच्या क्षमतेमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. याचा अर्थ वर्ष 2014 पर्यंत आपल्याकडे बंदरांची जितकी क्षमता होती, त्याला गेल्या 8 वर्षांमध्ये तितकीच क्षमता नव्याने जोडली गेली आहे.
मंगळूरू बंदरामध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित ज्या नवीन सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, त्यामुळे बंदराची क्षमता आणि कार्यक्षमता असे दोन्ही वाढणार आहे. आज गॅस आणि लिक्विड कार्गो यांच्या साठवणुकीसंबंधित ज्या चार प्रकल्पांचा शिलान्यास इथे केला गेला आहे, त्यामुळे कर्नाटक आणि देशाला खूप मोठा लाभ होणार आहे. यामुळे खाद्य तेलाची, एलपीजी गॅसची, बिटुमिनच्या आयातीचा खर्च कमी होईल.
मित्रांनो,
अमृतकाळामध्ये भारत हरित वृद्धीच्या नव्या संकल्पासह पुढे जात आहे. हरित वृद्धी आणि हरित नोकरी यांच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. इथल्या शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये ज्या नवीन सुविधा आज सुरू करण्यात आल्या आहेत, त्यावरूनही आम्ही कशाला प्राधान्य देतो, याचे दर्शन घडवित आहेत. आज आपले शुद्धीकरण प्रकल्प नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. डिसॅलिनेशन प्रकल्पामुळे शुद्धीकरणासाठी नदीच्या पाण्यावरचे अवलंबित्व कमी होईल.
बंधू आणि भगिनींनो,
गेल्या 8 वर्षांमध्ये देशभरामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ज्या प्रकारे देशाने प्राधान्य दिले आहे, त्याचा खूप मोठा लाभ कर्नाटकला मिळाला आहे. कर्नाटक सागरमाला योजनेचा सर्वात मोठा लाभार्थीपैकी एक आहे. कर्नाटकमध्ये फक्त राष्ट्रीय महामार्गाच्या क्षेत्रामध्येही गेल्या 8 वर्षांमध्ये जवळपास 70 हजार कोटीं रूपयांच्या प्रकल्पांचे काम झाले आहे. इतकेच नाही, जवळपास 1 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्तीचे प्रकल्प आता सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. बंगलुरू- चेन्नई द्रुतगती मार्ग, बंगलुरू - म्हैसूर महामार्ग सहापदरी करण्यासाठी रूंद करणे. बंगलुरू -पुणे यांना जोडणारा हरित मार्ग पट्टा, बंगलुरू सॅटेलाइट रिंग रोड अशा अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे.
रेल्वेमध्ये तर 2014 च्या आधीच्या तुलनेत कर्नाटकच्या अंदाजपत्रकामध्ये चौपट वाढ झाली आहे. रेल्वे मार्गांचे रूंदीकरणही गेल्या 8 वर्षांमध्ये चौपटीपेक्षा जास्त वेगाने काम होत आहे. कर्नाटकमध्ये रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचा खूप मोठा भाग गेल्या 8 वर्षांमध्ये पूर्ण केला गेला आहे.
मित्रांनो,
आजचा भारत, आधुनिक पायाभूत विकासावर इतके लक्ष्य केंद्रीत करत आहे, याचे कारण म्हणजे, हाच विकसित भारताच्या निर्माणाचा मार्ग आहे. आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती अधिक करण्यामुळेच मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. अमृतकाळामध्ये आपल्या मोठ्या संकल्पांच्या सिद्धीचे मार्गही हेच आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
देशाचा वेगाने विकास व्हावा, यासाठी झाला पाहिजे की, देशातल्या लोकांची ऊर्जा योग्य दिशेने कार्यरत राहिली पाहिजे. ज्यावेळी लोकांची ऊर्जा, मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लावली जाईल, त्यावेळी त्याचाही प्रभाव देशाच्या विकासाच्या गतीवर होईल. सन्मानाने जीवन जगण्यासाठी पक्के घरकूल, शौचालय, स्वच्छ पाणी, वीज आणि धूरमुक्त स्वयंपाकघर पाहिजे. या आजच्या युगामधल्या स्वाभाविक गरजा आहेत.
याच सुविधांवर आमचे डबल इंजिन सरकार सर्वात जास्त भर देत आहे. गेल्या 8 वर्षांमध्ये देशामध्ये गरीबांसाठी तीन कोटींपेक्षा अधिक घरकुले बनविण्यात आली आहेत. कर्नाटकमध्येही गरीबांसाठी 8 लाखांपेक्षा जास्त पक्की घरकुले बनविण्याच्या कामाला स्वीकृती दिली आहे. मध्यम वर्गातल्या हजारो परिवारांना स्वतःचे घरकुल बनविण्यासाठी कोट्यवधी रूपयांची मदत दिली गेली आहे.
जल जीवन अभियानाअंतर्गत फक्त तीन वर्षांमध्ये देशातल्या 6 कोटींपेक्षा अधिक घरांमध्ये नळाव्दारे पेयजलाची सुविधा पोहोचविण्यात आली आहे. कर्नाटकमध्येही 30 लाखांपेक्षा जास्त ग्रामीण परिवारांपर्यंत पहिल्यांदाच जलवाहिनीने पाणी पोहोचविण्यात आले आहे. मला आनंद होतो की, या सुविधांचा सर्वाधिक लाभ आमच्या भगिनी आणि कन्यांना होत आहे.
मित्रांनो,
गरीबाला सर्वात आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे, त्याला परवडणा-या स्वस्त दरामध्ये औषधोपचार मिळण्याची सुविधा आणि सामाजिक सुरक्षा आहे. ज्यावेळी गरीबावर संकट येते, त्यावेळी त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या आणि अनेकदा तर येणा-या पिढ्यांच्याही अडचणीमध्ये वाढ होते. गरीबाला या चिंतेतून मुक्त करणारी आयुष्मान भारत योजना आम्ही सुरू केली. आयुष्मान भारत योजने अंतर्गत देशातल्या जवळपास 4 कोटी गरीबांना रूग्णालयांमध्ये दाखल होवून मोफत औषधोपचाराची सुविधा मिळाली आहे. यामुळे गरीबांचे जवळ-जवळ 50 हजार कोटी रूपये खर्च होण्यापासून वाचले आहेत. आयुष्मान भारत योजनेचा लाभ कर्नाटकातल्याही 30 लाखांहून अधिक गरीब रूग्णांना मिळाला आहे. आणि त्यांचीही 4 हजार कोटींपेक्षा जास्त बचत झाली आहे.
बंधू आणि भगिनींनो,
स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत आपल्याकडे अशी स्थिती होती की, फक्त सधन-संपन्न लोकांनाच विकासाचा लाभ मिळू शकत होता. आता मात्र जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते, त्यांना पहिल्यांदाच विकासाचे लाभ मिळू शकतील, अशा पद्धतीने जोडले आहे. ज्यांना आर्थिक दृष्ट्या लहान समजून त्यांचे विस्मरण झाले होते, त्यांच्या बरोबरीने आमचे सरकार ठामपणे उभे आहे. अल्पभूधारक शेतकरी, लहान व्यापारी, मच्छीमार, पथारीवाले, पदपथावरचे किरकोळ सामानाचे विक्रेते, अशा कोट्यवधी लोकांना पहिल्यांदाच देशाच्या विकासाचा लाभ मिळण्यास प्रारंभ झाला आहे. हे सर्वजण विकासाच्या मुख्यधारेमध्ये सहभागी होत आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे दोन लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. कर्नाटक मधल्याही 55 लाखाहून अधिक छोट्या शेतकऱ्यांना सुमारे 10 हजार कोटी रुपये मदतीच्या स्वरुपात देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत देशातील 35 लाख फेरीवाल्या बंधू भगिनींना आर्थिक मदत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कर्नाटकातल्या दोन लाख फेरीवाल्यांना देखील झाला आहे.
मुद्रा योजनेच्या माध्यमातून देशभरातील छोट्या उद्योजकांना सुमारे 20 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम कर्जाच्या स्वरूपात देण्यात आली आहे. कर्नाटकातल्या लाखो छोट्या उद्योजकांना सुमारे 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज बँकेकडून देण्यात आले आहे.
मित्रांनो,
समुद्र किनाऱ्यालगत असलेली गावे, बंदराच्या परिसरात राहणारे लोक, मत्स्य व्यवसाय करत असलेल्या बंधू भगिनींचे जीवनमान उंचावण्यासाठी डबल इंजिनचे सरकार विशेष प्रयत्न करत आहे. थोड्यावेळापूर्वीच इथे मत्स्यपालन व्यवसाय करणाऱ्या मित्रांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले. खोलसमुद्रात जाऊन मच्छीमारी करण्यासाठी आवश्यक असलेल्या बोटी आणि आधुनिक व्हेसल्सही देण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान असो किंवा मग मच्छीमारांना मिळणारी किसान क्रेडिट कार्ड सुविधा किंवा मच्छीमारांच्या कल्याणासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी प्रथमच या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. आज कुलई इथे मच्छीमारी बंदराचे भूमिपूजन देखील झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मच्छीमारी व्यवसायात असलेल्या बंधू भगिनी यांची ही मागणी होती. हे बंदर जेव्हा पूर्ण बांधून तयार होईल, तेव्हा मच्छीमारांच्या अनेक समस्यांचे निराकरण होईल. या प्रकल्पामुळे शेकडो मच्छीमार कुटुंबांना मदत मिळेल तसेच अनेक लोकांना रोजगारही प्राप्त होईल.
मित्रांनो,
डबल इंजिनचे सरकार देशातील जनतेच्या आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहे. देशातील जनतेची आकांक्षा आमच्या सरकारसाठी जनतेच्या आदेशाप्रमाणे आहे. देशाच्या जनतेची आकांक्षा आहे की, भारतात जगातिक स्तरावरच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असाव्यात. आज देशाच्या कानाकोपऱ्यात आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. देशातील जनतेची आकांक्षा आहे की, आपल्या जास्तीत जास्त शहरांमध्ये मेट्रो संपर्क व्यवस्था उपलब्ध असावी. आमच्या सरकारच्या प्रयत्नामुळे गेल्या आठ वर्षात मेट्रो संपर्क सुविधा उपलब्ध असलेल्या शहरांची संख्या चार पटीने वाढली आहे.
देशातील लोकांची इच्छा आहे की, त्यांना हवाई वाहतूक सहज उपलब्ध व्हावी. उडान योजनेअंतर्गत आतापर्यंत एक कोटीहून जास्त प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे.
देशाच्या जनतेची अपेक्षा आहे की, भारतात पारदर्शक अर्थव्यवस्था असावी. आज डिजिटल पेमेंट प्रणाली ऐतिहासिक स्तरावर कार्यरत आहे आणि BHIM-UPI सारखे आपले Innovation जगाचे लक्ष आकर्षित करत आहेत.
देशाचे नागरीकांची मागणी आहे की, आज देशात गतीशील इटरनेट, स्वस्त इंटरनेट, देशाच्या कानाकोप-यात इंटरनेटची सुविधा असावी. आज सुमारे ६ लाख कि.मी. ऑप्टीकल फायबरचे नेटवर्क बसवून ग्रामपंचायतींना जोडण्यात येत आहे.
5G ची सुविधा या क्षेत्रात नवी क्रांती घडवेल. मला याचा आनंद आहे की, कर्नाटकामध्ये डबल इंजिनचे सरकार देखील तीव्र गतीने लोकांच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करत आहे.
मित्रांनो,
भारताला साडेसात हजार किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. देशाच्या या सामर्थ्याचा आपण पूर्णपणे फायदा करून घेतला पाहिजे. येथील करावली समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट देखील पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. मला अशी माहिती मिळाली आहे की, प्रत्येक क्रुझ सीझनमध्ये न्यू मेंगलोर पोर्टला किमान 25 हजार पर्यटक भेट देतात. यामध्ये सर्वात जास्त संख्या असते ती परदेशी पर्यटकांची. खूप जास्त संधी आहेत, आणि ज्या प्रकारे भारताच्या मध्यमवर्गाच्या सामर्थ्यात वाढ होत आहे, भारतात क्रूझ पर्यटनाची शक्यता आणखी जास्त वाढत आहे.
जेव्हा पर्यटनात वाढ होते त्याचा खूप मोठा लाभ आपल्या कुटीर उद्योगांना, आपल्या स्थानिक कलाकारांना, ग्राम उद्योगांना, फेरीवाल्या बंधू भगिनींना, ऑटो रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना अशा प्रकारच्या समाजाच्या निम्न वर्गातील लोकांना पर्यटनाचा जास्तीत जास्त लाभ होईल. मला आनंद आहे की, न्यू मेंगलोर पोर्ट क्रुझ पर्यटन वाढावे यासाठी सतत नव्या सुविधांची निर्मिती करत जात आहे.
मित्रांनो,
जेव्हा कोरोनाचा संकट काळ सुरू होता, तेव्हा मी या संकटाला संधीमध्ये परिवर्तित करण्याबद्दल बोललो होतो. आज देशाने या संकटाला संधीमध्ये बदलून दाखवले आहे. काही दिवसांपूर्वी सकल देशांतर्गत उत्पादनाचे जे आकडे प्रसिद्ध झाले ते हे दर्शवतात की, भारताने कोरोना काळात जी धोरणे तयार केली, जे निर्णय घेतले, ते किती महत्त्वपूर्ण होते. मागच्या वर्षी इतक्या मोठ्या जागतिक संकट काळात देखील भारताने 670 बिलियन डॉलर म्हणजे अंदाजे 50 लाख कोटी रुपये किमतीच्या उत्पादनाची निर्यात केली. प्रत्येक आव्हानांचा सामना करत भारताने 418 बिलियन डॉलर म्हणजेच 31 लाख करोड रूपयांचा Merchandize निर्यातीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
आज देशाच्या विकास इंजिनाला जोडले गेलेले प्रत्येक क्षेत्र पूर्ण क्षमतेने प्रगतीकडे वाटचाल करत आहे. सेवा क्षेत्र देखील वेगाने प्रगतीकडे वाटचाल करत आहे. विविध योजनांचा परिणाम उत्पादन क्षेत्रावरही झाल्याचे दिसून येत आहे. मोबाईल फोन सह संपूर्ण इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात अनेक पटीने वाढ झाली आहे.
खेळण्यांची आयात गेल्या तीन वर्षात जेवढी घटली आहे, जवळपास तितकीच खेळण्याची निर्यात देखील वाढली आहे. या सर्व गोष्टींचा लाभ प्रत्यक्षरीत्या देशाच्या त्या समुद्री किनाऱ्यालगतच्या भागांनाही होत आहे, जे भारतीय उत्पादनांच्या निर्यातीसाठी आपली संसाधने उपलब्ध करून देतात, जिथे मेंगलुरु सारखी मोठी बंदरे आहेत.
मित्रांनो,
सरकारच्या प्रयत्नांमुळे देशात गेल्या काही वर्षात किनारी वाहतुकीमध्येही वाढ झाल्याचे निदर्शनास येते आहे. देशातील वेगवेगळ्या बंदरांमध्ये सुविधा आणि संसाधने वाढल्यामुळे किनाऱ्यावरील वाहतूक आता आणखी सुलभ झाली आहे. सरकार बंदरांचा संपर्क वाढवण्यासाठी आणि त्याला गती मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. म्हणूनच प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजनेअंतर्गत रेल्वे आणि रस्त्यांचे अडीचशेहून जास्त प्रकल्प योजण्यात आले आहेत जे विना अडथळा बंदर संपर्क सुविधा प्रदान करतील.
बंधू आणि भगिनींनो,
आपली वीरता आणि व्यापारासाठी प्रसिध्द असलेले हे किनाऱ्याचे क्षेत्र विलक्षण प्रतिभांनी युक्त आहे. भारताचे अनेक उद्योजक इथलेच रहिवासी आहेत. भारताचे अनेक सुंदर द्विप आणि पर्वत कर्नाटकातच आहेत. भारतातील अनेक प्रसिध्द मंदिरे आणि तीर्थक्षेत्र देखील इथेच आहेत. आज जेव्हा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, तेव्हा मी राणी अब्बक्का आणि राणी चेन्नभैरा देवी यांचे स्मरण करू इच्छितो. भारताच्या धरतीला आणि भारताच्या व्यापाराला गुलामीपासून वाचवण्यासाठी यांनी केलेला संघर्ष अभूतपूर्व होता. आज निर्यात क्षेत्रात अग्रेसर होत असलेल्या भारताच्या या वीर महिला सर्वांसाठी खूप मोठ्या प्रेरणास्रोत आहेत.
घरोघरी तिरंगा अभियानाला ज्या प्रकारे कर्नाटकातल्या जनतेने आणि आपल्या युवा साथींनी यशस्वी बनविले आहे, हा देखील याच समृध्द परंपरेचा विस्तार आहे. कर्नाटकातल्या करावली भागात येऊन राष्ट्रभक्तीच्या, राष्ट्रीय संकल्पाच्या या ऊर्जेपासून मला सदैव प्रेरणा मिळते. बेंगलुरु मध्ये अनुभवास येत असलेली ही ऊर्जा याच प्रकारे विकासाच्या मार्गाला उज्वल बनवत राहील, या कामनेसह विकासाच्या या प्रकल्पाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
माझ्यासोबत मोठ्या आवाजात म्हणा-
भारत माता की – जय !
भारत माता की – जय !
भारत माता की – जय !
खूप खूप धन्यवाद!