करुनाड जनतेगे, नन्न प्रीतिय, नमस्कारगड़ु, बैंगलूरिनअ महा जनतेगे, विशेषवाद नमस्कारगड़ु, कर्नाटका राज्यद पालिगे, इंदु महत्वद दिनवागिदे। राज्यदल्लि, हलवारु मूलभूत सउकर्य, कल्पिसुव योजनेगड़न्नु, जारि-गोड़िसलु, ननगे बहड़, संतोष-वागुत्तिदे।
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद जी गहलोत, कर्नाटकचे लोकप्रिय मुख्यमंत्री बसवराज जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी प्रल्हाद जोशी, कर्नाटक सरकारमधले मंत्रीगण, खासदार आणि आमदार, बेंगलुरूमधल्या माझ्या सर्व बंधू-भगिनीनो,
नमस्कार,
दुहेरी इंजिन सरकारने कर्नाटकच्या वेगवान विकासाचा आपल्याला जो विश्वास दिला आहे त्या विश्वासाचे आज आपण पुन्हा एकदा साक्षीदार होत आहोत.आज 27 हजार कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे. उच्च शिक्षण,संशोधन,कौशल्य विकास,आरोग्य, दळणवळण क्षेत्रातले हे प्रकल्प अनेक आयामानी आपल्या सेवेसाठी सज्ज होत आहेत. म्हणजेच हे प्रकल्प जीवन सुखकर करण्याला आणि त्याबरोबरच व्यवसाय सुलभतेलाही बळ देणार आहेत.
बंधू-भगिनीनो,
इथे येण्यापूर्वी मी भारतीय विज्ञान संस्था आणि आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनोमिक्स विद्यापीठात शिक्षण,संशोधन आणि नवोन्मेश याविषयी अधिक जाणण्यासाठी तिथला उत्साह अनुभवण्यासाठी आज मी त्यांच्या समवेत होतो आणि नवी उर्जा घेऊन निघालो आहे. या कार्यक्रमाशी जोडले गेलेल्या देशाच्या खाजगी क्षेत्राची मी प्रशंसा करतो. कनेक्टीव्हिटीशी संबंधित या उत्सवात आपल्यासमवेत येऊन आणि जो उत्साह आपल्यामध्ये सळसळतो आहे, मी सुद्धा आपल्यासमवेत तो साजरा करत आहे. बंगळूरूमधला माझा हा आजचा शेवटचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर मी मैसुरू इथे जात आहे हे आपण जाणताच.कर्नाटकच्या विकासाच्या या प्रवासाला वेग देण्यासाठीचे अभियान तिथेही जारी राहील. थोड्या वेळापूर्वी कर्नाटकमध्ये 5 राष्ट्रीय प्रकल्प आणि 7 रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. कोकण रेल्वेच्या संपूर्ण विद्युतीकरणाच्या महत्वपूर्ण टप्याचेही आपण साक्षीदार झालो. हे सर्व प्रकल्प कर्नाटकच्या युवा,इथला मध्यम वर्ग,आपल्या शेतकरी बंधू-भगिनी, आपले उद्योजक यांना नव्या सुविधा,नव्या संधी प्रदान करतील. या विकास प्रकल्पांसाठी कर्नाटकचे खूप-खूप अभिनंदन. खूप-खूप शुभेच्छा.
मित्रहो,
बंगळुरू , देशातल्या लाखो युवकांच्या स्वप्नाचे शहर झाले आहे. बंगळुरू , एक भारत- श्रेष्ठ भारत या भावनेचे प्रतिबिंब आहे. बंगळुरूचा विकास, लाखो स्वप्नांचा विकास आहे आणि म्हणूनच गेल्या 8 वर्षात बेंगळूरुचे सामर्थ्य अधिक वृद्धींगत करण्यासाठी सरकारचे अखंड प्रयत्न राहिले आहेत. बंगळुरूमध्ये आपल्या स्वप्नांची पूर्तता करणाऱ्या प्रत्येकाचे जीवन सुखकर व्हावे, प्रवासाचा वेळ कमी व्हावा, तो आरामदायी व्हावा, वाहतूक खर्चही कमीत कमी राहावा यासाठी दुहेरी इंजिन सरकार अविरत काम करत आहे. हीच कटीबद्धता आपण आज अनुभवतो आहे.
मित्रहो,
वाहतूक कोंडीपासून बेंगळूरुची सुटका करण्यासाठी रेल्वे,रस्ते,मेट्रो,अंडरपास, उड्डाणपूल,प्रत्येक माध्यमांवर दुहेरी इंजिन सरकार काम करत आहे. बेंगळूरुचे जे उपनगरी भाग आहेत, त्यांनाही उत्तम कनेक्टीव्हिटीने जोडण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे.बेंगळूरुच्या आजूबाजूचे भाग रेल्वेने जोडण्यासाठी 80 च्या दशकापासून चर्चा सुरु असल्याचे मला सांगण्यात आले. चर्चेत 40 वर्षे घालवली, मला सांगा ही काय परिस्थिती आहे. 40 वर्षे चर्चेत गेली. कर्नाटकच्या बंधू- भगिनींना मी विश्वास देण्यासाठी आलो आहे. या बाबी साकारण्यासाठी मी चाळीस महिन्यांची मेहनत करून आपल्या स्वप्नांची पूर्तता करेन. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल 16 वर्षे हा प्रकल्प फाईलमध्ये अडकून पडला होता. कर्नाटकच्या जनतेची , बेंगळूरुच्या जनतेची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दुहेरी इंजिन सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे याचा मला आनंद आहे. बेंगळूरु निम शहरी रेल्वेमुळे बेंगळूरुच्या क्षमता विस्ताराला मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे बेंगळूरु शहरातच राहण्याची आवश्यकता आता कमी होईल. 40 वर्षांपूर्वी जे काम करायला हवे होते, 40 वर्षांपूर्वी जी कामे पूर्ण व्हायला हवी होती, ती कामे आज 40 वर्षांनी करण्याचे काम मी करत आहे. 40 वर्षांपूर्वी ही कामे झाली असती तर बेंगळूरुवरचा ताण वाढला नसता.बेंगळूरुने अधिक जोमाने वाटचाल केली असती. मात्र 40 वर्षे हा काळ कमी नव्हे. मात्र मित्रहो आपण मला संधी दिलीत, मी आता अधिक वेळ गमावू इच्छित नाही. आपल्या सेवेसाठी क्षण- क्षण वेचत आलो आहे.
मित्रहो,
आजूबाजूच्या सॅटेलाइट टाउनशिप, निमशहरी आणि ग्रामीण भाग रेल्वे आधारित जलद वाहतूक प्रणालीने जोडले जातील तेव्हा त्याचा परिणाम अनेक पटींनी होईल. उपनगरी रेल्वेप्रमाणे बेंगळूरु रिंगरोडही शहराची वाहतूक कोंडी कमी करेल. हा 6 राष्ट्रीय महामार्ग आणि 8 राज्य महामार्गांना जोडेल. म्हणजे कर्नाटकच्या दुसऱ्या भागात जाणाऱ्या गाड्यांना मोठ्या संख्येने बेंगळूरु शहरात प्रवेश करण्याची आवश्यकता राहणार नाही. नीलमंगला ते तुमकुरु दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाजवळच्या भागात मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. वाहतुकीचा मोठा ओघ या रस्त्यावर असतो.या महामार्गाचे सहापदरीकरण आणि तुमकुरु बाह्यवळणामुळे या संपूर्ण भागात प्रवास आणि वाहतूक सुकर होईल, आर्थिक घडामोडींना चालना मिळेल.धर्मस्थळ मंदिर,सूर्य मंदिर आणि जोग धबधबा यासारख्या श्रद्धा आणि पर्यटनाशी संबंधित स्थळांची कनेक्टीव्हिटी उत्तम करण्यासाठी जी कामे केली जात आहेत त्यामुळे पर्यटनासाठीही नव्या संधी प्राप्त होणार आहेत.
बंधू-भगिनीनो,
गेल्या आठ वर्षात आम्ही रेल्वे कनेक्टीव्हिटीमध्ये संपूर्ण परिवर्तन घडवण्यासाठी काम केले आहे. 8 वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज रेल्वे प्रवासाचा अनुभव अगदी वेगळा आहे.भारतीय रेल्वे आज वेगवानही होत आहे, स्वच्छही होत आहे, आधुनिकही होत आहे, सुरक्षितही होत आहे आणि नागरिक स्नेहीही होत आहे. देशाच्या ज्या भागात रेल्वे पोहोचण्याबाबत विचारही करणे अशक्य होते अशा भागात आम्ही रेल्वे पोहोचवली आहे. कर्नाटकमधेही गेल्या काही वर्षात 12 शे किलोमीटर पेक्षा जास्त रेल्वे मार्ग नव्याने निर्माण करण्यात आले आहेत किंवा रुंदीकरण करण्यात आले आहे. पूर्वी विमानतळ आणि विमान प्रवासात मिळणाऱ्या सुविधा आणि वातावरण रेल्वे प्रवासात देण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्न करत आहे. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैया, यांच्या नावाचे बेंगळूरु मधले आधुनिक रेल्वे स्थानक याचे प्रमाण आहे. बेंगळूरु मधले लोक एखाद्या पर्यटन स्थळाप्रमाणे या स्थानकावर येतात अशी माहिती मला मिळाली आहे. या रेल्वे स्थानकाच्या रचनेवरून देशातले परिवर्तन त्यांना दिसून येत आहे, युवा पिढी तर सेल्फी घेण्यासाठी रांगेत उभी राहते असे मला समजले आहे. हे कर्नाटकमधले पहिले आणि देशातले तिसरे असे आधुनिक रेल्वे स्थानक आहे. यामध्ये आधुनिक सुविधा तर आहेतच त्याचबरोबर बेंगळूरुसाठी अधिक रेल्वेकरिता मार्गही मोकळा झाला आहे. बेंगळूरु छावणी आणि यशवंतपूर जंक्शनही आधुनिक करण्याचे काम आजपासून सुरु झाले आहे.
मित्रांनो,
एकविसाव्या शतकात आपण रेल्वे, रस्ते, बंदर, विमानतळ यापुरते मर्यादित राहू शकत नाही, तर वाहतुकीच्या या पद्धती एकमेकांशी जोडल्या जाव्यात , एकमेकांना पूरक ठराव्यात अशा बहुआयामी संपर्कव्यवस्थेवर आम्ही भर देत आहोत. या बहुआयामी संपर्कव्यवस्थेला पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याकडून मदत मिळत आहे. बेंगळुरूजवळ बांधण्यात येणारे बहुआयामी लॉजिस्टिक पार्क हे याच ध्येयदृष्टीचा एक भाग आहे. शेवटच्या ठिकाणापर्यंत वितरण सुधारण्यासाठी आणि वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी हे पार्क, बंदर, विमानतळ, रेल्वे आणि रस्ते सुविधांशी जोडले जाईल. गतिशक्तीच्या ध्यासाने बनवल्या जाणाऱ्या अशा प्रकल्पांमुळे हजारो तरुणांना रोजगारही मिळेल, तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला गती मिळेल.
बंधू आणि भगिनींनो,
बंगळुरूची यशोगाथा 21 व्या शतकातील भारताला आत्मनिर्भर भारत बनण्याची प्रेरणा देते. या शहराने दाखवून दिले आहे की उद्योजकता, नवनिर्मिती, खाजगी क्षेत्र, देशातील तरुणांना खरे सामर्थ्य दाखवण्याची संधी दिल्यास किती मोठा प्रभाव पडू शकतो. कोरोना काळात बंगळुरूमध्ये बसलेल्या आपल्या तरुणांनी संपूर्ण जगाला सावरण्यात मदत केली आहे. सरकारने सुविधा दिल्या आणि नागरिकांच्या जीवनात कमीत कमी हस्तक्षेप केला तर भारतातील तरुण काहीही करू शकतो, हे बंगळुरूने दाखवून दिले आहे. देशास कुठल्या कुठे पोहोचवती येते. बंगळुरू ही देशातील तरुणांची स्वप्ननगरी आहे आणि त्यामागे उद्योजकता, नाविन्य, सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्राची योग्य उपयोगिता आहे. बंगळुरू त्या लोकांना त्यांची मानसिकता बदलायलाही शिकवते. बंगळुरूची ताकद बघा, ती त्या लोकांनाही त्यांची मानसिकता बदलायला शिकवते, जे अजूनही भारताच्या खाजगी क्षेत्राला, खाजगी उद्योगाला अश्लाघ्य शब्दांनी संबोधतात. हे हुकूमशाही मनाचे लोक देशाच्या सत्तेला, कोट्यवधी लोकांच्या शक्तीला कमी लेखतात.
मित्रांनो,
21 व्या शतकातील भारत हा संपत्ती निर्माते, रोजगार निर्माण करणारे, नवोन्मेषक यांचा आहे. जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारताची हीच खरी ताकद आहे, ती आपली संपत्तीही आहे. या शक्तीला चालना देण्यासाठी गेल्या 8 वर्षात जे प्रयत्न झाले, त्याची चर्चा केली जाते, परंतु ती फारच मर्यादित व्याप्तीत. पण ही संस्कृती जगणार्या बंगळुरूला मी आलो तेव्हा त्याबद्दल सविस्तर चर्चा करणे ही माझी जबाबदारी समजतो.
बंधू आणि भगिनींनो,
भारतातील कृषी क्षेत्रानंतर जर सर्वात मोठे रोजगार देणारे क्षेत्र असेल, तर ते आपले एमएसएमई आहे. ते देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांच्या अर्थव्यवस्थेला मोठे बळ देत आहे. एमएसएमई क्षेत्राशी देशातील कोट्यवधी लोक जोडले गेले आहेत. पण इथे एमएसएमईची व्याख्याच अशी केली गेली की त्यांना स्वतःचा विस्तार करायचा असेल तर त्यांना नुकसानच होईल. त्यामुळे तो आपला उपक्रम मोठा करण्याऐवजी इतर छोट्या उपक्रमाकडे वळत असे. आम्ही ही व्याख्या स्वतःच बदलली, जेणेकरून एमएसएमई उद्योग विकासाकडे जातील, रोजगार वाढवतील. छोट्या सरकारी प्रकल्पांमध्येही जागतिक निविदांमुळे आमच्या एमएसएमईच्या संधी खूप मर्यादित होत्या. आम्ही 200 कोटी रुपयांपर्यंतच्या निविदांमधील विदेशी संस्थांचा सहभाग संपवला आहे. हा आत्मनिर्भर भारताबद्दलचा आमचा आत्मविश्वास आहे. केंद्र सरकारच्या सर्व विभागांसाठी, केवळ एमएसएमईकडून 25 टक्के खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. एवढेच नाही तर आज सरकारी ई-बाजारपेठेच्या रूपात एमएसएमईंना देशातील प्रत्येक सरकारी विभाग, सरकारी कंपनी, विभाग यांच्याशी थेट व्यापार करण्याचे सोपे माध्यम दिले गेले आहे. आज, 45 लाखांहून अधिक विक्रेते त्यांची उत्पादने आणि सेवा GeM पोर्टलवर देत आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
भारताच्या स्टार्ट-अप परिसंस्थेचीही आजकाल बरीच चर्चा होत आहे, त्यापैकी बंगळुरू हे एक मोठे केंद्र आहे. गेल्या 8 वर्षांत देशाने किती मोठे काम केले आहे, हे गेल्या दशकांवर नजर टाकल्यास लक्षात येईल. गेल्या दशकांत देशात अब्ज डॉलर्सच्या किती कंपन्या उभ्या राहिल्या आहेत हे तुम्ही तुमच्या बोटांवर मोजू शकता. पण गेल्या 8 वर्षात अब्ज डॉलरच्या 100 पेक्षाही जास्त कंपन्या निर्माण झाल्या आहेत, त्यामध्ये दर महिन्याला नवीन कंपन्यांची भर पडत आहे. 8 वर्षांत बनलेल्या या युनिकॉर्नचे मूल्य आज सुमारे 150 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 12 लाख कोटी रुपये आहे. देशात स्टार्ट अप परिसंस्था कशी वाढत आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक आकडेवारी देतो. 2014 नंतर पहिल्या 10,000 स्टार्ट अप्सपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सुमारे 800 दिवस लागले. सेवा करायला तुम्ही मला दिल्लीत बसवले, त्याबद्दल मी बोलतोय. पण या परिसंस्थेत नुकतेच सामील झालेले 10 हजार स्टार्ट-अप 200 दिवसांपेक्षा कमी कालावधीत सामील झाले आहेत. म्हणूनच गेल्या 8 वर्षांत आम्ही काही शंभर स्टार्ट अप्सवरून आज 70 हजारांचा टप्पा पार केला आहे.
बंधू आणि भगिनींनो,
स्टार्ट-अप्स आणि नवोन्मेषाचा मार्ग आरामाचा, सोयीचा नाही. आणि गेल्या 8 वर्षात या मार्गावर देशाला वेगाने नेण्याचा मार्गही सोपा नव्हता, सोयीचा नव्हता. अनेक निर्णय, अनेक सुधारणा तत्कालीक अप्रिय वाटूही शकतील, पण कालांतराने त्या सुधारणांचे फायदे आज देशाला जाणवत आहेत. केवळ सुधारणेचा मार्गच आपल्याला नवीन ध्येये, नवीन संकल्पांकडे घेऊन जातो. आम्ही अंतराळ आणि संरक्षण यासारखे प्रत्येक क्षेत्र तरुणांसाठी खुले केले आहे, ज्यावर अनेक दशके केवळ सरकारची मक्तेदारी होती. आज आम्ही भारतातील तरुणांना ड्रोनपासून विमानापर्यंत प्रत्येक अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये प्रोत्साहन देत आहोत. इथे देशाचा गौरव म्हणजे इस्रो आहे, डीआरडीओची आधुनिक पायाभूत सुविधा आहेत. सरकारने निर्माण केलेल्या या जागतिक दर्जाच्या सुविधांमध्ये आज आम्ही देशातील तरुणांना तुमची ध्येयदृष्टी आणि तुमच्या कल्पना कसाला लावण्यासाठी सांगत आहोत. केंद्र सरकार तरुणांना प्रत्येक आवश्यक व्यासपीठ देत आहे, त्यात देशातील तरुण मेहनत करत आहेत. इथे सरकारी कंपन्याही स्पर्धा करतील, देशातील तरुणांनी निर्माण केलेल्या कंपन्यांशी स्पर्धा करतील. तरच आपण जगाशी स्पर्धा करू शकू. मी स्पष्टपणे मानतो, उपक्रम सरकारी असो वा खाजगी, दोन्ही देशाची संपत्ती आहे, त्यामुळे संधी सर्वांना समानतेने द्यायला हवी. हा सर्वांचाच प्रयत्न आहे. प्रत्येकाच्या प्रयत्नाचा हा मंत्र स्वातंत्र्याच्या अमृतकालात म्हणजेच येत्या 25 वर्षात आत्मनिर्भर भारत घडवण्याची ऊर्जा आहे. या विकास प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा कर्नाटकातील सर्व जनतेचे अभिनंदन करतो आणि बसवराजजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या कर्नाटकला वेगाने पुढे नेण्यासाठी केन्द्र सरकार खांद्याला खांदा लावून काम करण्याकरता तुमच्या पाठीशी उभे आहे. अनेक शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, नमस्कार.