"भारत माता की – जय,
भारत माता की – जय
सिवरी महाराजेरी, इस पवित्तर धरती अपणे, इक हजार सालवे, पुराणे रिवाजां, ते बिराशता जो दिखांदा चम्बा, मैं अप्पू जो, तुस्सा सबनियां-रे बिच्च, आई करी, अज्ज बड़ा, खुश है बुज्झेय करदा।
सर्वप्रथम, मी चंबावासियांची माफी मागू इच्छितो, कारण यावेळी मला येथे यायला खूप उशीर झाला, मध्ये अनेक वर्ष लोटली. पण हे माझे भाग्य आहे की आज मला तुम्हा सर्वांना भेटण्याची आणि तुमचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली.
दोन दिवसांपूर्वी मी उज्जैनमधील महाकाल नगरीत होतो आणि आज मणिमहेश यांच्या सानिध्यात आलो आहे. आज जेव्हा मी या ऐतिहासिक चौकात आलो आहे तेव्हा जुन्या गोष्टी आठवणे अगदी साहजिक आहे. इथल्या माझ्या मित्रांसोबत घालवलेले क्षण आणि खाल्लेला राजमाचा मदरा हा खरोखरच एक अद्भुत अनुभव असायचा.
चंबाने मला खूप आपुलकी आणि आशीर्वाद दिले आहेत.म्हणूनच काही महिन्यांपूर्वी मिंजर मेळ्यादरम्यान एका शिक्षक मित्राने पत्र लिहून चंबाशी संबंधित अनेक गोष्टी माझ्याशी सामायिक केल्या होत्या.जे पत्र मी 'मन की बात'च्या माध्यमातून देश आणि जगासोबत सामायिक केले होते . त्यामुळे आज इथून चंबासह हिमाचल प्रदेशातील दुर्गम गावांना रस्ते जोडणी आणि रोजगार देणारे ऊर्जा प्रकल्प भेट देण्याचा हा प्रसंग माझ्यासाठी आनंदाचा आहे.
जेव्हा मी इथे तुमच्यामध्ये राहायचो तेव्हा म्हणायचो की ,डोंगराचे पाणी आणि डोंगराचे तारुण्य यांचा डोंगराला काही उपयोग नाही, ही म्हण आपल्याला केव्हा ना केव्हा तरी पुसून टाकावी लागेल.आज या गोष्टीत आपण बदल केला आहे. आता इथले पाणीही तुम्हाला उपयोगी पडेल आणि इथली तरुणाईही हा विकासाचा प्रवास मनापासून पुढे नेईल. तुमचे जीवन सुकर करणाऱ्या या प्रकल्पांसाठी तुमचे खूप खूप अभिनंदन!
बंधु आणि भगिनींनो,
काही दिवसांपूर्वीच भारताने आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली आहेत.यावेळी आपण ज्या टप्प्यावर उभे आहोत तो टप्पा विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे.कारण इथून आपल्याला अशी झेप एक घ्यायची आहे, ज्याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल.भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरू झाला आहे, या कालावधीत आपल्याला विकसित भारताचा संकल्प पूर्ण करायचा आहे. प्रत्येक भारतीयाचा संकल्प आता पूर्ण करायचा आहे.
येत्या काही महिन्यांत हिमाचलच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत.म्हणजेच जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा हिमाचलही आपल्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण करत असेल.त्यामुळे येत्या 25 वर्षांतील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आपल्या सर्वांसाठी, सर्व देशवासियांसाठी आणि विशेषत: हिमाचलच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे.
मित्रांनो,
आज, जेव्हा आपण गेल्या दशकांकडे मागे वळून पाहतो तेव्हा आपला अनुभव काय सांगतो? आपण इथे शांता जी यांना, धूमल जी यांना मी आयुष्य वेचलेले पाहिले आहे.त्यांच्या मुख्यमंत्री काळातल्या त्या दिवसात , जेव्हा हिमाचलच्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी, हिमाचलच्या हक्कासाठी, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना नेऊन दिल्लीत जाऊन विनवणी करावी लागत होती , तेव्हा आंदोलने करावी लागत होती. कधी विजेचा हक्क, कधी पाण्याचा हक्क तर कधी विकासाच्या हक्कासाठी , भागीदारीसाठी पण दिल्लीत त्यावेळी सुनावणी होत नव्हती. हिमाचलच्या मागण्या, हिमाचलच्या फायली भटकत राहिल्या. त्यामुळेच चंबा सारखे नैसर्गिक, सांस्कृतिक आणि श्रद्धेचे समृद्ध क्षेत्र विकासाच्या शर्यतीत मागे राहिले.75 वर्षांनंतर मला एक आकांक्षी जिल्हा म्हणून याकडे विशेष लक्ष द्यावे लागले कारण मला त्याच्या क्षमतेची जाणीव होती, मित्रांनो.
सोयीसुविधांअभावी येथे राहणाऱ्या आपल्या लोकांचे जगणे कठीण झाले होते.बाहेरून येणारे पर्यटक इथे कसे पोहोचले असते ? आणि आमच्याकडे चंबाचे गाणे आता जयरामजी आठवत होते-
जम्मू ए दी राहें, चंबा कितना अक् दूर,
ती परिस्थिती सांगण्यासाठी हे पुरेसे आहे.म्हणजे इथे येण्याची खूप उत्सुकता होती, पण इथपर्यंत पोहोचणे तितके सोपे नव्हते. आणि जेव्हा हे जयरामजींनी सांगितले, केरळची मुलगी दिव्या बद्दल, देविका विषयी आणि अशा प्रकारे एक भारत श्रेष्ठ भारताचे स्वप्न पूर्ण होते.केरळच्या भूमीवर चंबाची लोकगीते, ज्या मुलीने कधी हिमाचल पाहिले नाही, जिचा हिंदी भाषेशी संबंध राहिलेला नाही , ती मुलगी जेव्हा चंबाची गाणी पूर्ण मनोभावे गाते तेव्हा चंबाच्या सामर्थ्याची साक्ष मिळते . मित्रांनो.आणि मी चंबाचा आभारी आहे,त्यांनी कन्या देविकाचे इतके कौतुक केले की एक भारत, श्रेष्ठ भारत हा संदेश देशभर पोहोचला. एक भारत-श्रेष्ठ भारताप्रती चंबाच्या लोकांची ही भावना पाहून मीही थक्क झालो.
मित्रांनो,
आज हिमाचलमध्ये दुहेरी इंजिन सरकारची ताकद आहे.या दुहेरी इंजिनच्या सामर्थ्याने हिमाचलच्या विकासाला दुप्पट गती देण्यात आली आहे.पूर्वीची सरकारे जिथे काम सोपे होते तिथे सुविधा देत असत. जिथे मेहनत कमी करावी लागत असे आणि राजकीय फायदा अधिक मिळत असे. त्यामुळे दुर्गम भाग, आदिवासी भागात सुविधा सगळ्यात शेवटी पोहोचत असत. मात्र सर्वाधिक गरज तर या भागांना होती आणि यामुळे काय झाले? रस्ते असो, वीज असो, पाणी असो, अशा प्रत्येक सुविधेसाठी डोंगराळ भाग, आदिवासी भागांचा क्रमांक शेवटपर्यंत येत असे. पण दुहेरी इंजिन सरकारचे काम, आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. लोकांचे जीवनमान सुकर करणे हे आमचे प्राधान्य आहे. म्हणूनच आम्ही आदिवासी भाग, डोंगराळ भागावर सर्वाधिक भर देत आहोत. पण डबल इंजिन सरकारने ही गोष्ट घरोघरी पोहोचवली.
ज्यांच्या घरी पाण्याचे नळ असायचे, त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की ती तर खूप श्रीमंत माणसं असतील, त्यांची राजकीय पोहोच असेल, पैसेही भरपूर असतील, म्हणूनच त्यांच्या घरात नळ आले आहेत, असा काळ होता. पण आज पहा, हर घर जल अभियानाअंतर्गत हिमाचलमध्ये सर्व प्रथम चंबा, लाहौल स्पीती आणि किन्नौर मध्येच शंभर टक्के नळानं पाणी पोहोचलं आहे.
याच जिल्ह्यांबाबत याआधीची सरकारे म्हणत होती की हे दुर्गम भाग आहेत, त्यामुळे विकास होऊ शकत नाही. आता फक्त पाणी पोहचवलं आहे, भगिनींना सुविधा मिळाली एवढ्यापुरतंच हे मर्यादित नाही. तर पिण्याच्या शुद्ध पाण्यामुळे नवजात बालकांचे जीवही वाचवले जात आहेत. याचप्रमाणे गरोदर भगिनी असोत की लहान मुले, त्यांच्या लसीकरणासाठी यापूर्वी कितीतरी अडचणी येत होत्या. आज गावातील आरोग्य केंद्रामध्येच सर्व प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. आशा आणि अंगणवाडीशी जोडलेल्या भगिनी घरोघरी जाऊन सुविधा पोचवत आहेत. गरोदर मातांनाही मातृवंदना योजनेंतर्गत हजारो रुपयांची मदतही दिली जात आहे.
आज आयुष्मान भारत योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जात आहेत. या योजनेचे सर्वात मोठे लाभार्थीही असे लोक आहेत जे कधीही रुग्णालयात जाऊ शकत नव्हते.आणि आमच्या माता-भगिनी, त्यांना कितीही गंभीर आजार असला, कितीही वेदना झाल्या, तर त्या घरातही कळू देत नसत की आपण आजारी आहोत. घरातील सर्वांची जितकी सेवा करू शकत असत तितकी त्या कायमच करत असत. त्याच्या मनावर एक ओझं होतं असायचं की जर मुलांना, कुटुंबाला कळलं मी आपण आजारी आहोत, तर ते मला रुग्णालयात घेऊन जातील. रुग्णालयं महागडी असतात, खूप खर्च येतो, आपली मुलं कर्जबाजारी होतील, आणि त्या विचार करत की मी वेदना तर सहन करेन पण मुलांना कर्जात बुडू देणार नाही, आणि त्या सहन करायच्या. माता-भगिनींनो, तुमच्या या वेदना, तुमच्या या व्यथा तुमचे हे मूल समजून नाही घेणार तर दुसरं कोण समजून घेईल? आणि म्हणूनच आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत कुटुंबांना मोफत आरोग्यविषयक व्यवस्था मिळावी, याचीच तरतूद केली आहे बंधूंनो.
सहकाऱ्यांनो,
रस्त्यांअभावी या भागात तर शिक्षण घेणंही कठीण झालं होतं. अनेक मुलींना तर शाळेतून यासाठी काढून टाकलं जायचं, कारण त्यांना दूरवर पायी जावं लागत असे. म्हणूनच आज एकीकडे आम्ही गावाजवळ चांगले दवाखाने बनवत आहोत, आणि त्याचवेळी त्याच जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयही सुरु करत आहोत बंधुंनो.
जेव्हा आपण लसीकरणाची मोहीम राबवत होतो, तेव्हा माझ्या मनात एक बाब स्पष्ट होती की हिमाचलमधल्या पर्यटनात कोणताही अडथळा येऊ नये, त्यासाठीच सर्वप्रथम हिमाचलमधल्या लसीकरणाचे काम वेगाने झाले पाहिजे. इतर राज्यांनी नंतर केले, हिमाचलमध्ये लसीकरण सर्वात आधी पूर्ण केले. आणि मी जयरामजी आणि त्यांच्या सरकारचे अभिनंदन करतो की तुमच्या आयुष्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली बंधूंनो.
आज डबल इंजिन सरकारचा हा ही प्रयत्न आहे की प्रत्येक गावात पक्के रस्ते जलदगतीने पोहोचायला हवेत. तुम्ही कल्पना करा, 2014 पूर्वीच्या 8 वर्षांमध्ये हिमाचलमध्ये 7 हजार किलोमीटरचेच ग्रामीण रस्ते बांधले गेले होते. तुम्ही सांगा, मी सांगेन, लक्षात ठेवाल. सात हजार किलोमीटरचे रस्ते, किती? सात हजार, आणि त्यावेळी खर्च किती केला होता 18 शे कोटी. आता बघा सात हजार आणि इथे बघा आम्ही 8 वर्षांमध्ये, हे मी स्वातंत्र्यानंतरचं बोलत आहे सात हजार, आम्ही आठ वर्षांमध्ये आत्तापर्यंत 12 हजार किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते बांधले आहेत. आणि 5 हजार कोटी रुपये खर्च करून, तुमचे जीवनमान बदलण्यासाठी जीवाच्या परीने प्रयत्न केला आहे बंधुंनो. म्हणजेच पूर्वीपेक्षा जवळपास दुपटीपेक्षाही जास्त रस्ते बांधले आहेत, दुपटीपेक्षाही जास्त हिमाचलमधील रस्त्यांसाठी गुंतवणूक केली गेली आहे.
हिमाचलमधील शेकडो गावे पहिल्यांदाच रस्त्यांनी जोडली गेली आहेत. आजपासून जी योजना सुरू झाली आहे, त्यातूनही 3 हजार किलोमीटरचे रस्ते गावांमध्ये नव्याने बांधले जाणार आहेत. याचा सर्वाधिक लाभ चंबा आणि इतर आदिवासी भागातील गावांना होईल. चंबामधील अनेक भागांना अटल टनेलचाही भरपूर लाभ मिळत आहे. यामुळे हे क्षेत्र पूर्ण वर्षभरासाठी देशाच्या इतर भागांशी जोडले जात आहे. याचप्रमाणे केंद्र सरकारने आणलेली विशेष पर्वतमाला योजना, आपल्या अर्थसंकल्पात जाहीर केली होती, पाहिलं असेल. याअंतर्गत चंबासह कांगडा, बिलासपूर, सिरमौर, कुल्लू या जिल्ह्यांमध्ये रोपवेचे जाळेही उभारले जात आहे. यामुळे स्थानिक लोक आणि पर्यटक, दोघांनाही खूप फायदा होईल, खूप सोय होईल.
बंधू आणि भगिनींनो,
गेल्या आठ वर्षात तुम्ही मला जी सेवा करण्याची संधी दिली आहे, तुमचा एक सेवक या नात्याने हिमाचलला अनेक योजनां देण्याचे सौभाग्य मला लाभले, आणि माझ्या आयुष्यात समाधानाची अनुभूती येत आहे. आता जयराम जी दिल्लीत येतात, पूर्वी लोक जायचे तर का जायचे, अर्ज घेऊन जात असत, जरा काहीतरी करा, काहीतरी द्या, देव तुमचं भलं करेल, असे हाल केले होते दिल्लीकरांनी. आज, आज जर हिमाचलचे मुख्यमंत्री माझ्याकडे आले तर सोबत अत्यंत आनंदाने कधी चंब्याचा रुमाल घेऊन येतात, कधी चंब्याची थाळ भेट म्हणून आणतात. आणि सोबतच ही माहिती देतात की मोदीजी, आज मी एक चांगली बातमी घेऊन आलो आहे, अमूक एक प्रकल्प आम्ही पूर्ण केला आहे. नव्या अमूक एका प्रकल्पावर आम्ही काम सुरू केले आहे.
आता हिमाचलचे लोक हक्कांसाठी याचना करत नाहीत, आता दिल्लीत ते हक्क दाखवतात आणि आम्हाला आदेशही देतात. आणि तुम्हा सर्व जनता- जनार्दनाचा आदेश, आपला आदेश आणि आपणच माझे हायकमांड आहात. आपल्या आदेशाला मी माझे सौभाग्य समजतो बंधु - भगिणिंनो. त्यामुळेच तुमची सेवा करण्याचा आनंदही काहीसा वेगळाच असतो, मिळणारी ऊर्जाही काही औरच असते.
सहकाऱ्यांनो,
आज जितक्या विकासकामांची भेट हिमाचलला एकाच फेरीत मिळते आहे, त्याची याआधीच्या सरकारांच्या काळात कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं. मागच्या 8 वर्षांमध्ये संपूर्ण देशभरातल्या डोंगराळ भागांत, दुर्गम भागांत, आदिवासी भागांत वेगवान विकासाचा एक महायज्ञ सुरू आहे. याचा लाभ हिमाचलमधल्या चंबाला मिळत आहे, पांगी-भरमौरला मिळत आहे, लहान - मोठे भंगाल, गिरीपार, किन्नौर आणि लाहौल स्पिती सारख्या क्षेत्रांना मिळत आहे.
विकासातील सुधारणांच्या बाबतीत गेल्या वर्षी चंबा जिल्हा देशातील 100 पेक्षा जास्त आकांक्षीत जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या स्थानावर होता. मी चंबाचे विशेष अभिनंदन करतो, येथील सरकारी कर्मचाऱ्यांचेही मी अभिनंदन करतो. त्यांनी देशासमोर एवढे मोठे काम करून दाखवले आहे. काही काळापूर्वी आमच्या सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिरमौरच्या गिरिपार भागातील हाटी समाजाला आदिवासींचा दर्जा देण्याच्या निर्णयावरून, आमचे सरकार आदिवासींच्या विकासाला किती प्राधान्य देते, हे दिसून येते.
मित्रहो,
दिल्ली आणि हिमाचलमध्ये दीर्घ काळ सरकार चालवणाऱ्यांना निवडणुका आल्यावरच आपल्या या दुर्गम भागांची आठवण येत असे. पण दुहेरी इंजिन सरकार रात्रंदिवस, चोवीस तास, आठवड्यातील सातही दिवस तुमच्या सेवेत गुंतलेले आहे. कोरोनाचा कठीण काळ आला, तेव्हा त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना आज मोफत शिधा दिला जातो आहे. जगभरातील लोक ऐकतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते की दीड-दोन वर्षांपासून भारत सरकारने देशात कोणाच्याही घरातली चूल विझू दिलेली नाही, प्रत्येक घरातली चूल पेटते आहे, मोफत अन्नधान्य पोहोचवले जाते आहे, जेणेकरून माझ्या कोणत्याही गरीब कुटुंबाने उपाशी झोपू नये.
बंधु आणि भगिनींनो,
प्रत्येकाचे वेळीच लसीकरण व्हावे, यासाठी तातडीने व्यवस्था करण्यात आली. हिमाचल प्रदेशाला प्राधान्यही देण्यात आले आहे. आणि त्याबद्दल मी अंगणवाडी भगिनी, आशा भगिनी तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा अभिनंदन करतो. जयरामजींच्या नेतृत्वाखाली तुम्ही कोविड लसीकरणाच्या बाबतीत हिमाचलला देशात आघाडीवर ठेवले आहे.
मित्रहो,
सेवा भाव हाच स्वभाव होतो, सेवा भाव हाच संकल्प होतो, सेवा भाव हीच साधना होते, तेव्हा अशी विकासाची कामे घडतात, सगळी कामे होऊन जातात. डोंगराळ आणि आदिवासी भागात रोजगार हे आणखी एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे येथील लोकांची जी ताकद आहे, ती जनतेची ताकत व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आदिवासी भागातील जल आणि जंगलातील संपत्ती अनमोल आहे. चंबा हे देशातील अशा भागात आहे, जेथे जलविद्युत निर्मितीला सुरू झाली होती.
आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली, त्या प्रकल्पांमुळे वीज निर्मिती क्षेत्रात चंबा आणि हिमाचलची भागिदारी वाढणार आहे. या ठिकाणी जी वीज निर्माण होईल, त्यामुळे चंबाला, हिमाचलला शेकडो कोटी रूपयांचे उत्पन्न मिळेल. येथील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. मागच्या वर्षी सुद्धा मला चार मोठ्या जलविद्युत प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याची संधी मिळाली होती. बिलासपूरमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या हायड्रो इंजिनिअरिंग महाविद्यालयाचाही हिमाचलमधील तरुणांना फायदा होणार आहे.
मित्रहो,
बागकाम, कला, कलाकुसर अशी आणखी एक ताकद येथे आहे. चंब्याची फुले, चंब्याचे चुख, राजमाचे मदरा, चंबा चप्पल, चंबा थाळी आणि पांगी येथील अक्रोड, अशी अनेक उत्पादने हा आपला वारसा आहे. बचत गटांच्या भगिनींचेही मी कौतुक करतो कारण या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांना, म्हणजेच व्होकल फॉर लोकल मोहिमेला त्या चालना देत आहेत. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट योजनेंतर्गतही अशा उत्पादनांचा प्रचार केला जातो आहे. ही उत्पादने परदेशी पाहुण्यांसमोर मांडण्याचा माझाही प्रयत्न असतो, जेणेकरून हिमाचलचे नाव संपूर्ण जगात व्हावे, जगातील जास्तीत जास्त लोकांना हिमाचलच्या उत्पादनांबद्दल माहिती मिळावी. मी अशा वस्तू घेऊन जातो. मला कोणाला भेट द्यायची असेल तर मी माझ्या हिमाचलमधल्या गावांमध्ये बनवलेल्या वस्तू देतो.
बंधु आणि भगिनींनो,
दुहेरी इंजिन सरकार हे आपली संस्कृती, वारसा आणि श्रद्धा यांचा आदर करणारे सरकार आहे. चंबाबरोबरच संपूर्ण हिमाचल ही श्रद्धेची आणि वारशाची भूमी आहे, ही तर देवभूमी आहे. एकीकडे पवित्र मणिमहेश धाम आहे, तर दुसरीकडे भरमौरमध्ये चौरासी मंदिर आहे. मणिमहेशची यात्रा असो किंवा शिमला, किन्नौर, कुल्लूमधून जाणारी श्रीखंड महादेवाची यात्रा असो, भोलेनाथांच्या जगभरातील भक्तांसाठी या यात्रा खूप महत्त्वाच्या आहेत. आताच जयरामजी सांगत होते, दसऱ्याच्या दिवशी कुल्लू येथील आंतरराष्ट्रीय दसरा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मला लाभली. काही दिवसांपूर्वी मी दसरा मेळ्यात होतो आणि आज मिंजर जत्रेच्या या भूमीत येण्याचे भाग्य मला लाभले.
एकीकडे ही वारसा स्थाने आहेत, तर दुसरीकडे डलहौसी, खज्जियार अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत. ही स्थानेच विकसित हिमाचलची ताकद बनणार आहेत. केवळ दुहेरी इंजिनच्या सरकारने ही क्षमता ओळखली आहे. त्यामुळेच यावेळी हिमाचलने आपला निर्णय घेतला आहे. हिमाचल यावेळी जुनी प्रथा बदलेल, हिमाचल यावेळी नवीन परंपरेचा स्वीकार करणार आहे.
मित्रहो,
मी येथे मैदानात पोहोचलो, तेव्हा मी सर्व काही पाहत होतो. मला हिमाचल ठाऊक आहे. मला प्रत्येक रस्ता, गल्ली आणि परिसर माहीत आहे. संपूर्ण राज्याची सभा घ्यायची झाली ना संपूर्ण राज्याची, हिमाचलमध्ये एवढी मोठी सभा घ्यायची म्हटले की डोळ्यात पाणी यायचे. त्यामुळे मी ही गर्दी बघूनच मुख्यमंत्र्यांना विचारले की संपूर्ण राज्याची सभा आहे का? ते म्हणाले, नाही, हे लोक तर चंबा जिल्ह्यातून आले आहेत.
मित्रहो,
ही सभा नाही तर मी हिमाचलच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प पाहतो आहे. मला आज येथे सभा नाही तर हिमाचलच्या उज्ज्वल भविष्याची क्षमता दिसते आहे आणि मी तुमच्या या सामर्थ्याचा पुजारी आहे. तुमच्या या संकल्पामागे मी भक्कम पहाडासारखा उभा राहीन, मी तुम्हाला ही ग्वाही द्यायला आलो आहे. मी एक ताकत म्हणून तुमच्या पाठीशी राहीन, याची ग्वाही देण्यासाठी आलो आहे. एवढा मोठा कार्यक्रम करण्यासाठी आणि इतके उत्कृष्ट कार्यक्रम करण्यासाठी. खरे तर सणांचे दिवस आहेत. अशा सणासुदीच्या दिवसांत माता-भगिनींना घराबाहेर पडणे कठीण होते. तरीही इतक्या माता-भगिनी मला आशीर्वाद देण्यासाठी आल्या, आम्हां सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आल्या, आयुष्यात याहून मोठे सौभाग्य काय असू शकते?
या अनेक विकास प्रकल्पांबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि आता तर वंदे भारत ट्रेन दिल्लीपर्यंत वेगाने धावते आहे, तेव्हा मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा देतो.
दोन्ही हात वर करून माझ्यासोबत बोला,
भारत माता की जय !
भारत माता की जय !
भारत माता की जय !
अनेकानेक आभार.