It is a very special day for entire India: PM Modi at Bodo Peace Accord ceremony in Kokrajhar
Bodo Peace Accord done by bringing on all stakeholders together with a sincere effort to resolve the decades old crisis: PM Modi
After we came to power, most regions of Tripura, Mizoram, Meghalaya, and Arunachal Pradesh are free from AFSPA: PM

भारत माता की जय….

भारत माता की जय….

भारत माता की जय….

व्यासपीठावर उपस्थित आसामचे राज्यपाल, संसदेतील माझे मित्र, विविध मंडळ आणि संघटनांशी निगडित नेतेमंडळी, येथे उपस्थित एनडीएफबी च्या विविध गटातील मित्रपरिवार, येथे आलेले मान्यवर आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला विशाल संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

मी खूपवेळा आसामला आलो आहे. येथे देखील आलो आहे. मी या संपूर्ण क्षेत्रात मागील कित्येक दशकांपासून येत आहे. परंतु आज जो उत्साह आणि आनंद मी तुमच्या चेहऱ्यावर पाहत आहे, तो इथल्या 'आरोनाई' आणि 'डोखोना' पेक्षा अधिक आनंद देणारा आहे.

सार्वजनिक आयुष्यात, राजकीय जीवनात अनेक मिरवणूका पाहिल्या आहेत, अनेक रॅलीना संबोधित केले आहे परंतु आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा जनसमुदाय बघण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. राजकीय विश्लेषक कधी ना कधीतरी स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी राजकीय रॅली म्हणून याचा उल्लेख करतील, आज तुम्ही हा विक्रम प्रस्थापित केला आहे, हे तुमच्यामुळे शक्य झाले आहे. मी हेलिकॉप्टर मधून बघत होतो, जिथवर नजर पोहोचत होती तिथपर्यंत मोठा जनसमुदायच दिसत होता. त्या पुलावर इतके लोक उभे आहेत की कोणी पडले असते तर…मला खूप दुःख होईल.

बंधू आणि भगिनींनो, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने येथे आशीर्वाद देण्यासाठी आला आहात, इतक्या मोठ्या संख्येने माता भगिनी आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत. त्यामुळे माझा विश्वास अजून दृढ झाला आहे. कधी कधी लोक मला काठीने मारण्याची भाषा करतात परंतु ज्या मोदीला इतक्या मोठ्या प्रमाणात माता भगिनींचे सुरक्षा कवच मिळाले आहे त्याला कितीही काठीने मारले तरी त्याला काही होणार नाही. मी तुम्हा सगळ्यांना नमन करतो.

माता-भगिनींनो, माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज अगदी हृदयापासून तुम्हाला आलिंगन देण्यासाठी मी आलो आहे, आसामच्या माझ्या बंधू-भगिनींना नवा विश्वास द्यायला आलो आहे. गावो गावी तुम्ही मोटारसायकल वरून रॅली काढली, संपूर्ण क्षेत्रात दिवे लावून दिवाळी साजरी केली हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. मला आश्चर्य वाटते की दिवाळीत देखील इतके दिवे प्रज्वलित होत नसतील.

मी काल सोशल मीडियावर देखील पाहिले, चहूबाजूला तुम्ही जे दिवे प्रज्वलित केले होते त्याचे दृश्य टीव्ही वर, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दाखवत होते. संपूर्ण भारत तुमच्याबद्दलच बोलत होता. बंधू भगिनींनो, ही काही हजारो, लाखो दिवे प्रज्वलित करण्याची घटना  नाही तर देशातील या महत्वपूर्ण भूभागात एक नवीन प्रकाशाची सुरुवात झाली आहे.

बंधू आणि भगिनींनो, देशासाठी कर्तव्य पार पाडताना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आजचा दिवस त्या हजारो शहीदांचे स्मरण करण्याचा आहे. आजचा दिवस उपेंद्रनाथ ब्रह्माजी, रूपनाथ ब्रह्माजी यांच्यासारख्या बोडोफाच्या सक्षम नेतृत्वाच्या योगदानाची स्मरण करण्याचा आहे. ऑल बोडो स्टूडंट्स युनियन (एबीएसयू), नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड (एनडीएफबी) शी संबंधित सर्व तरुण कॉम्रेड, बीटीसी प्रमुख हाग्रमा महिलेरे आणि आसाम सरकार, तुम्ही सगळे माझ्याच नाही तर संपूर्ण भारताच्या अभिनंदनास पात्र आहात. आज 130 कोटी भारतीय तुमचे अभिनंदन करीत आहेत. तुमचे आभार मानत आहेत.

मित्रांनो, आजचा दिवस तुम्हा सर्व बोडो मित्रांचा, या संपूर्ण प्रांतातील प्रत्येक समाज आणि येथील गुरू, विचारवंत, कला, साहित्यिक या सर्वांच्या प्रयत्नांना साजरा करण्याचा आहे. गौरवगीत  गाण्याची संधी आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने हा कायमस्वरुपी शांतीचा मार्ग सापडला आहे. आजचा दिवस आसामसह संपूर्ण ईशान्येसाठी 21 व्या शतकातील नवीन सुरुवात, नवीन सकाळ, एक नवीन प्रेरणा यांचे स्वागत करण्याची संधी आहे. विकास आणि विश्वासाचा मुख्य आधार अधिक दृढ व्हावा हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. आता या पृथ्वीवर हिंसाचाराचा अंधार पुन्हा येऊ देणार नाही. आता या पृथ्वीवर, कोणत्याही आईच्या मुलाचे, कोणत्याही आईच्या मुलीचे, कोणत्याही बहिणीच्या भावाचे, कोणत्याही भावाच्या बहिणीचे रक्त सांडणार नाही, हिंसाचार होणार नाही. आज त्या माता देखील मला आशीर्वाद देत आहेत. ती  बहिणीही मला आशीर्वाद देत असेल जिचा मुलगा बंदूक घेऊन जंगलात भटकायचा. जो कधी मृत्यूच्या छायेत जगायचा. तो  आज तो आईच्या मांडीवर डोके ठेवून शांत झोपू शकतो. मला त्या आईचा आशीर्वाद, त्या बहिणीचा आशीर्वाद मिळत आहे. अशी कल्पना करा की अनेक दशके दिवस-रात्र बंदुकीच्या फैरी सुरु होत्या. आज त्या जीवनातून त्यांना मुक्तता मिळाली आहे. मी नव भारताच्या नवीन संकल्पांमध्ये तुम्हा सर्वांचे, शांतीप्रिय आसामचे, शांती आणि विकास प्रिय ईशान्येचे मनापसून स्वागत करतो, त्यांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो, ईशान्येत शांतता आणि विकासाचा एक नवीन अध्याय सुरू होणे खूप ऐतिहासिक आहे. देश महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरा करत असतानाच हा एक अतिशय आनंदाचा योगायोग आहे आणि तेव्हाच या ऐतिहासिक घटनेची प्रासंगिकता आणखी वाढते. आणि ते केवळ भारतासाठी नव्हे तर हिंसाचाराचा मार्ग सोडून अहिंसेचा मार्ग निवडण्यासाठी जगासाठी प्रेरणास्थान बनले आहे. महात्मा गांधी म्हणायचे की अहिंसेच्या मार्गावरुन आपल्याला जे काही प्राप्त होते ते सर्वांना मान्य असते. आता आसाममधील अनेक सहकाऱ्यांनी शांतता आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारण्या सोबतच लोकशाही स्वीकारली आहे आणि त्यांनी भारतीय राज्यघटनेला शिरोधार्य मानले आहे.

मित्रांनो, मला आता सांगितले की, आज जेव्हा आपण येथे कोकराझार मध्ये हा ऐतिहासिक शांती करार साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत, त्याचवेळी गोलाघाट येथे श्रीमंत शंकरदेव संघ यांचे वार्षिक संमेलन देखील सुरू आहे

मोई मोहापुरुख श्रीमंतो होंकोर देवोलोई गोभीर प्रोनिपात जासिसु।

मोई लोगोत ओधिबेखोन खोनोरु होफोलता कामना कोरिलों !!

(मी महापुरुष शंकरदेव यांना नमन करतो. मी या अधिवेशनाच्या यशाची कामना करतो.)

बंधू आणि भगिनींनो, श्रीमंत शंकरदेव यांनी आसामची भाषा आणि साहित्याला समृद्ध करण्यासोबतच संपूर्ण भारताला, संपूर्ण विश्वाला आदर्श जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे.

शंकरदेव यांनी आसामसह संपूर्ण जगाला सांगितले आहे की –

सत्य शौच अहिंसा शिखिबे समदम।

सुख दुख शीत उष्ण आत हैब सम ।।

याचा अर्थ – सत्य, स्वच्छता, अहिंसा आदींचे शिक्षण प्राप्त करा. सुख, दुःख, उष्णता, थंडी हे सगळे सहन करण्यासाठी स्वतःला तयार करा. त्यांच्या या विचारांमध्ये व्यक्तीच्या स्वतःच्या विकासासोबत समाजाच्या विकासाचा संदेश देखील आहे. आज कित्येक दशकांनंतर सामाजिक विकासाचा हाच मार्ग बळकट झाला आहे.

बंधूंनो, बोडो भूमी चळवळीचा भाग असलेल्या सगळयांचे देशाच्या मुख्य प्रवाहात मी मनःपूर्वक स्वागत करतो. पाच दशकांनंतर, संपूर्ण सौहार्दासह, बोडो भूमी चळवळीशी संबंधित प्रत्येक साथीदाराची अपेक्षा आणि आकांक्षांचा आदर केला आहे. स्थायी शांतीसाठी, समृद्धी आणि विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येवून संयुक्तपणे हिंसाचाराला पूर्णविराम दिला आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज संपूर्ण भारत हे बघत आहे आणि म्हणूनच आज मला देशाला ही माहिती द्यायची आहे. सर्व टीव्ही चॅनेल्स कॅमेरे आज तुमच्यावर रोखले आहेत. कारण आपण एक नवीन इतिहास रचला आहे. भारतात एक नवीन विश्वास निर्माण केला आहे. तुम्ही शांततेच्या मार्गाला अधिक बळकटी प्रदान केली आहे.

बंधू आणि भगिनींनो, मी आपणा सर्वांचे अभिनंदन करू इच्छितो, आता या चळवळीशी संबंधित प्रत्येक मागणी संपली आहे. आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे. 1993 मध्ये जो करार झाला होता, 2003 मध्ये जो करार झाला होता, त्यानंतर शांतता प्रस्थापित होऊ शकली नव्हती. आता केंद्र सरकार, आसाम सरकार आणि बोडो चळवळीशी संबंधित संघटनांनी ज्या ऐतिहासिक करारावर सहमती दर्शविली आहे, ज्यावर स्वाक्षरी केली आहे त्यानंतर आता कोणतीही मागणी शिल्लक नाही आणि आता पहिले आणि शेवटचे प्राधान्य देखील विकास हेच आहे.

मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून जे काही शक्य आहे ते करण्यापासून मी कधीच मागे हटणार नाही. कारण मला माहित आहे की तुम्ही बंदूक, बॉम्ब आणि पिस्तूलाचा मार्ग मागे सोडून परत आला आहात, तेव्हा तुम्ही कोणत्या परिस्थितीत आला असाल हे मला माहित आहे. मला अंदाज आहे आणि म्हणूनच या शांतीच्या मार्गावर तुमच्या पायाला एक काटाही टोचू नये याची मी काळजी घेईन. कारण हा शांततेचा, प्रेमाचा आदर करणारा, अहिंसेचा मार्ग आहे, तुम्ही बघालच संपूर्ण आसाम तुमची मने जिंकून घेईल. संपूर्ण भारत तुमची मने जिंकेल. कारण आपण योग्य मार्ग निवडला आहे.

मित्रांनो, या कराराचा लाभ बोडो जमातीतील सदस्यांसह इतर समाजातील लोकांना देखील होईल. कारण या करारा अंतर्गत बोडो प्रादेशिक परिषदेच्या अधिकारांची व्याप्ती विस्तृत केली आहे, अधिक मजबूत केली आहे. या करारामध्ये प्रत्येकाचा विजय झाला आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शांतता विजेती आहे, मानवता विजेती आहे. आता तुम्ही सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवून माझा सन्मान केला, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पुन्हा उभे राहून टाळ्या वाजवा, माझ्यासाठी नाही, शांततेसाठी नाही, माझ्यासाठी नाही, शांततेसाठी, मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे.

करारानुसार बीटीएडीच्या क्षेत्रात येणाऱ्या परिसराची हद्द निश्चित करण्यासाठी एक आयोग नेमला जाईल. या प्रदेशाला 1500 कोटी रुपयांचे विशेष विकास पॅकेज मिळणार असून कोकराझार, चिराग, बक्सा आणि उलदगुडी अशा मोठ्या जिल्ह्यांनाही याचा फायदा होईल. याचा थेट अर्थ असा आहे की बोडो जमातीचा प्रत्येक अधिकार बोडो संस्कृतीचा विकास सुनिश्चित करेल, संरक्षण सुनिश्चित केले जाईल. या करारानंतर या क्षेत्रात राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक सर्व प्रकारची प्रगती होणार आहे.

माझ्या बंधू आणि भगिनींनो, आसाम करारातील कलम 6 लवकरात लवकर लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मी आसामच्या लोकांना आश्वासन देतो की या प्रकरणाशी संबंधित समितीच्या अहवालानंतर केंद्र सरकार पुढील कार्यवाही करेल. आम्ही कोणतीही गोष्ट अधांतरी ठेवणारे लोकं नाही. आम्ही जबाबदारी स्वीकारणारे लोक आहोत. म्हणून बऱ्याच वर्षांपासून आसामची जी गोष्ट अधांतरी होती, अडकली होती,  ती देखील आम्ही पूर्ण करू.

मित्रांनो, आज बोडो प्रांतात नवीन अपेक्षा, नवीन स्वप्ने, नवीन धैर्य स्थापित होत असताना, आपणा सर्वांची जबाबदारी वाढली आहे. मला विश्वास आहे की बोडो प्रादेशिक परिषद आता इथल्या प्रत्येक समाजात कोणताही भेदभाव न ठेवता विकासाचे नवीन मॉडेल विकसित करेल. आसाम सरकारने बोडो भाषा आणि संस्कृती संदर्भात काही मोठे निर्णय घेतले आहेत आणि मोठ्या योजना तयार केल्या आहेत हे ऐकून मला फार आनंद झाला. मी राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन करतो. बोडो प्रादेशिक परिषद, आसाम सरकार आणि केंद्र सरकार आता एकत्रितपणे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास याला नवीन दिशा देतील. बंधू आणि भगिनींनो, यामुळे आसामला बळकटी प्राप्त होईल आणि एक भारत-श्रेष्ठ भारत ही भावना अधिक दृढ होईल.

मित्रांनो, एकविसाव्या शतकातील भारताने आता दृढ निश्चय केला आहे की, भूतकाळातील समस्यांमध्ये अडकून राहणार नाही. आज, देशाला कठीण आव्हानांचे निराकरण करण्याची इच्छा आहे. देशासमोर अशी अनेक आव्हाने आहेत जी कधीकधी राजकीय कारणांमुळे, तर कधी सामाजिक कारणास्तव दुर्लक्षित राहिली आहेत. या आव्हानांमुळे देशातील विविध भागात हिंसा, अस्थिरता आणि अविश्वास वाढला आहे.

देशात अनेक दशकांपासून हे सुरू होते. ईशान्येचा विषय तर अगदीच दुर्लक्षित होता. त्याकडे लक्ष द्यायला कोणीच तयार नव्हते. आंदोलने होत होती, होऊ दे, नाकाबंदी होत आहेत, होऊ दे, हिंसाचार होत आहे, कसे तरी यावर नियंत्रण ठेवा, ईशान्येसाठी हाच दृष्टीकोन होता. मला माहित आहे की, या दृष्टिकोनामुळे ईशान्येमधील आमचे काही बंधू आणि भगिनी आमच्यापासून इतके दूर गेले होते…….इतके दूर गेले होते की त्यांचा राज्यघटनेवरील आणि लोकशाहीवरील विश्वास डगमगायला लागला होता. मागील दशकांत ईशान्येकडील हजारो निर्दोष लोक मारले गेले, हजारो सुरक्षा कर्मचारी शहीद झाले, कोट्यावधी लोक बेघर झाले, विकास म्हणजे काय हे लाखो लोक कधीच पाहू शकले नाहीत. ही सत्ये, मागील सरकारांना माहित होती,  त्यांना ती समजली होती, त्यांनी ती स्वीकारली देखील होती, परंतु ही परिस्थिती कशी बदलली पाहिजे यावर त्यांनी कधीही परिश्रम घेतले नाहीत. इतक्या मोठ्या भानगडीमध्ये कोण हात घालणार,  जसे सुरु आहे तसेच सुरु राहूदे, हाच विचार करून लोकं गप्प बसायचे.

बंधू आणि भगिनींनो, जेव्हा राष्ट्रीय हित सर्वोपरी असते, तेव्हा परिस्थिती अशीच सोडली जाऊ शकत नाही. ईशान्येचा संपूर्ण विषय संवेदनशील होता, म्हणूनच आम्ही नवीन पध्दतीने कार्य करण्यास सुरवात केली. आम्ही ईशान्येकडील वेगवेगळ्या प्रदेशांतील भावनिक पैलू, त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या. येथे राहणाऱ्या लोकांशी खूप आपुलकीने, आत्मीयतेने संवाद साधला. आम्ही त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. त्यांना  परके मानले नाही, तुम्हाला परके मानले नाही, किंवा त्यांच्या नेत्यांना परके मानले नाही, आपले समजले. आज त्याचा परिणाम हा आहे की ज्या ईशान्येमध्ये उग्रवादामुळे दरवर्षी सरासरी हजाराहून अधिक लोक आपला जीव गमावत होते,  तिथे जवळजवळ संपूर्ण शांतता प्रस्थापित झाली आहे आणि उग्रवाद संपण्याच्या मार्गावर आहे.

ज्या ईशान्य भारताच्या जवळपास सर्व क्षेत्रामध्ये सशस्त्र दल विशेष बल कायदा (एएफएसपीए) लावण्यात  आलेला होता,  तिथं आता आमची सत्ता आल्यानंतर हा कायदा फारसा लागू राहिलेला नाही. इतकंच नाही तर त्रिपुरा, मिजोरम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातल्या बहुतांश भाग ‘एएफएसपीए’तून मुक्त झाला आहे. ज्या ईशान्य राज्यांमध्ये उद्योजक  गुंतवणूक करण्यासाठी तयार होत नव्हते, जिथं अजिबातच गुंतवणूक होत नव्हती, तिथं आता गुंतवणूक होण्यास प्रारंभ झाला आहे. नवे उद्योग ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरू होत आहेत.

ज्या ईशान्येकडील राज्यात उद्योजक गुंतवणूक करण्यासाठी तयार नसायचे, तिथंच आता मोठ्या प्रमाणावर नवीन उद्योग सुरू झाले आहेत. ज्या ईशान्येमध्ये आपआपल्या ‘होमलँड’ अर्थात गृहभूमीवरून भांडणे, मारामारी होत असे, तिथंच आता ‘एक भारत- श्रेष्ठ भारत’ ही भावना अधिक मजबूत झाली आहे. ज्या ईशान्येमध्ये हिंसक कारवायांमुळे हजारों लोक आपल्याच देशामध्ये शरणार्थी बनले होते, आता त्याच लोकांना अगदी सन्मानानं आणि चांगल्या पद्धतीनं पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. ज्या ईशान्येमध्ये उर्वरित देशातले लोक जाण्यासाठी घाबरत होते, त्याच ईशान्येकडील राज्यांना सर्व भारतातले लोक आता पर्यटनासाठी उत्तम स्थळ मानत आहेत, आणि लोक मोठ्या संख्येने जातही आहेत.

मित्रांनो, हे सगळं परिवर्तन कसं काय घडून आलं? हा बदल काय फक्त एका दिवसात घडून आला का? अजिबात नाही! हा परिणाम आम्ही पाच वर्षे जी अथक मेहनत घेतली आहे, त्याचा आहे. आधी ईशान्येकडील राज्यांना ‘रेसिपिएंट’म्हणून पाहिलं जात होतं. आज त्यांच्याकडे विकासाचं इंजिन म्हणून पाहिलं जात आहे.  आधी ईशान्येकडील राज्यांना दिल्लीपासून खूप दूर समजले जात होते. काही वर्षांपूर्वी देशाचा ईशान्य भाग राजधानी दिल्लीपासून दूर आहे, असे मानले जात होते. आज मात्र दिल्ली तुमच्या दाराशी आली आहे. तुमची सुख-दुःखे काय आहेत, ते जाणून घेत आहे. आणि मलाच पहा ना…. मला आपल्या बोडो साथीदारांबरोबर, आसामच्या लोकांबरोबर चर्चा करायची होती तर मी काही दिल्लीतून संदेश पाठवत बसलो नाही. तर उलट तुमच्यामध्ये येवून तुमच्याबरोबर डोळ्याला डोळा भिडवत, तुमचे आशीर्वाद घेवून तुमच्याबरोबर जोडला गेलो आहे. आपल्या सरकारमधल्या मंत्रीवर्गासाठी अगदी नियम घालून दिल्याप्रमाणे मी ‘रोस्टर’ बनवून दिलं आहे. आणि हे सुनिश्चित केलं की, दर 10-15 दिवसांनी केंद्र सरकारमधला कोणी ना कोणी मंत्री ईशान्येकडील राज्यांमध्ये जरूर गेला पाहिजे. एक रात्रभर या भागात तो मंत्री राहील. लोकांना भेटेल. त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यावर उत्तर शोधेल. मंत्री इथं आला तरच या समस्या सुटतील, हे लक्षात घेवून आम्ही योजना तयार केली. इतकंच नाही तर आम्ही ही योजना यशस्वी करून दाखवलीही. आमच्या साथीदारांनी प्रयत्न केले आणि ते जास्तीत जास्त काळ या भागात आले, त्यांनी वास्तव्य केलं. सगळे मंत्री असंख्य लोकांना प्रत्येकवेळी भेटत होते. त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहिले. मी आणि माझे सरकार निरंतर आपल्यामध्ये येवून  तुमच्या नेमक्या समस्या काय आहेत, हे मुळातून जाणून घेत राहिले. थेट आपल्याकडूनच त्यांना ‘फीडबॅक’ मिळत होता आणि तुमच्या गरजांचा, तुमच्या समस्या सुटण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, याचा विचार करून केंद्र सरकार त्याअनुरूप नीतीधोरण निश्चित करीत होती. 

मित्रांनो, 13व्या वित्त आयोगाच्या काळामध्ये ईशान्येकडच्या आठ राज्यांना मिळून 90 हजार कोटी रूपयांपेक्षाही कमी निधी मिळत होता. चौदाव्या वित्त आयोगामध्ये आम्ही आल्यानंतर हा निधी वाढून जवळपास तीन लाख कोटी रूपये करण्याचा निर्णय घेतला आहे. कुठे 90 हजार कोटी रूपये आणि कुठं 3 लाख कोटी रूपये?

गेल्या तीन-चार वर्षांमध्ये ईशान्य भारतामध्ये 3,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते बनले. नवीन राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी दिली आहे. ईशान्य भागामध्ये रेल्वेचे पूर्ण नेटवर्क बनवून ब्रॉडगेजमध्ये बदलण्यात आले आहे. पूर्वोत्तर मध्ये नवी विमानतळांची निर्मिती करण्यात येत आहे. आणि जुन्या विमानतळांचं आधुनिकीकरण करण्याचं काम वेगानं प्रगतीपथावर आहे.

ईशान्येकडील राज्यांमध्ये इतक्या नद्या आहेत, इतकं मोठ्या प्रमाणावर जल भंडार आहे की, त्याचा प्रचंड उपयोग होवू शकतो. 2014  पर्यंत यापैकी केवळ एका नदीवर जलमार्ग होता. आता मला सांगा, पाण्याने भरलेल्या नद्या अगदी 365 दिवस खळाळत असलेल्या नद्या परंतु या नद्यांना पाहणारच कोणी नाही. आता इथंच एका डझनापेक्षा जास्त जलमार्ग बनवण्याचे काम होत आहे. पूर्वोत्तरच्या यूथ ऑफ एज्यूकेशन, कौशल्य आणि क्रीडा संस्थांना नव्याने मजबूत करण्याच्या  कामाकडेही लक्ष देण्यात येत आहे. याशिवाय, ईशान्येकडील विद्यार्थी वर्गासाठी दिल्ली आणि बंगलोरमध्ये नवीन वसतिगृहे बनवण्याचे काम आता झाले आहे.

मित्रांनो, रेल्वे स्थानक, नवीन रेल मार्ग, नवीन विमानतळे, नवीन जलमार्ग असो, किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी असो आज जितकं काम ईशान्य भागात होत आहे, तितके काम याआधी कधीच झालेले नाही. आम्ही दशकांपूर्वीचे जुने प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच नवीन प्रकल्पांचे काम वेगानं सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. हे सर्व प्रकल्प लवकर पूर्ण झाले तर ईशान्य भागामध्ये कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होईल. पर्यटन क्षेत्र मजबूत करण्यावर आम्ही भर देत आहोत. आणि त्यामुळे रोजगारांच्या लाखो नवीन संधी निर्माण होणार आहेत. अलिकडे म्हणजे गेल्याच महिन्यात ईशान्येकडील आठही राज्यांमध्ये चालू शकणारी गॅस ग्रिड परियोजनेसाठी जवळपास 9 हजार कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

मित्रांनो, पायाभूत सुविधा म्हणजे काही फक्त सीमेंट काँक्रीटचं जंगल नसते. त्याचा माणसांवर होणारा प्रभाव आणि त्यामुळे लोकांची घेतली जाणारी काळजी पाहणे महत्वाचे आहे. ज्यावेळी बोगीबील पूलासारख्या योजना दशकांपासून प्रलंबित पडल्यामुळे कामे खोळंबली होती, त्यावेळी आमच्या सरकारने हा प्रकल्प तातडीने पूर्ण केला. अनेक प्रकल्प  आम्ही पूर्ण केल्यामुळे लाखो लोकांना कनेक्टिव्हिटी मिळत आहे. त्यामुळेच तर आमच्या सरकारवर सर्वांचा असलेला विश्वास वाढला आहे. ईशान्य भागाचा चोहोबाजूंनी विकास होत आहे, त्यामुळेच तर आमच्या सरकारवर असलेला जनतेचा विश्वास वाढला आहे. आणि कोणत्याही राहिलेल्या कार्यामध्ये ‘अलगाव’ असताना त्याचे रूपांतर ‘लगाव’मध्ये करण्याची खूप मोठी भूमिका आम्ही बजावली आहे. त्यामुळेच आता ईशान्येमध्ये ‘अलगाव’ अजिबात नाही. आणि ज्यावेळी ‘लगाव’ असतो, त्यावेळी प्रगती सर्वांपर्यंत समान रूपाने पोहोचते. त्यामुळे लोकही बरोबरीने काम करायला तयार होतात. ज्यावेळी  लोक एकसाथीनं काम करायला तयार होतात, त्यावेळी मोठ्यात मोठ्या आणि प्रश्नावर सहजपणे उत्तर सापडते.

मित्रांनो, असाच एक मोठा मुद्दा होता ब्रू-रियांग या आदिवासी जमातीच्या पुनर्वसनाचा होता. काही दिवसांपूर्वीच त्रिपुरा आणि मिजोरममध्ये नाईलाजानं जगत असलेल्या ब्रू-रियांग आदिवासी लोकांच्या पुनर्वसनाविषयी ऐतिहासिक सामंजस्य करार झाला. जवळपास अडीच दशकानंतर झालेल्या सामंजस्य करारामुळे हजारो कुटुंबांना आता आपले हक्काचे स्थायी निवासस्थान मिळणार आहे. त्यांना कायमचा पत्ता मिळणार आहे. ब्रू- रियांग आदिवासी समाजाच्या या मित्रांचे व्यवस्थित पुनर्वसन करण्यासाठी सरकारव्दारे एक विशेष पॅकेजही दिले जाणार आहे.

मित्रांनो, आज देशामध्ये आमचे सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करून अशी सामंजस्याची भावना विकसित करीत आहे. कारण सर्वांनी बरोबरीने पुढे जाण्यातच देशाचे हित आहे. या भावनेने, काही दिवसांपूर्वी गुवाहाटीमध्ये वेगवेगळ्या आठ गटांमधले जवळपास साडे सहाशे लोकांनी हिंसेचा रस्ता सोडून शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. या लोकांनी आधुनिक हत्यारे, मोठ्या प्रमाणात विस्फोटके आणि गोळ्या यांच्यासह स्वतःला समर्पित केलं आहे. अहिंसेचा मार्ग पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांचे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांनुसार पुनर्वसन करण्यात येत आहे. 

मित्रांनो, गेल्यावर्षीच नॅशनल लिबरेशन फ्रंट आॅफ त्रिपुरा आणि सरकार यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झाला. आणि मला असं वाटतं की, असा सामंजस्य करार करणे म्हणजे अतिशय महत्वपूर्ण पाऊल होते. ‘एनएलएफटी’ वर 1997 पासून बंदी घालण्यात आली होती. अनेक वर्षे ही संघटना हिंसेच्या रस्त्यानेच चालली होती. आता आमच्या सरकारने 2015 मध्ये ‘एनएलएफटी’बरोबर चर्चेला प्रारंभ केला होता. त्यांचा विश्वास संपादन करण्याचे प्रयत्न केले. या प्रक्रियेत काही लोकांना सहभागी करून चर्चेसाठी मदत घेतली. यानंतर काही काळानंतर हे लोकही… जे बॉम्ब आणि बंदुकीवर विश्वास ठेवतात… तेही सर्व हिंसक कारवाया सोडून देण्यास आणि हिंसक कारवाया बंद करण्यास तयार झाले. सातत्याने प्रयत्न केल्यानंतर गेल्या 10 ऑगस्ट रोजी सामंजस्य करार करण्यात आले. आणि त्यानंतर या संघटनेने हत्यारे सोडून आणि भारताच्या घटनेचे पालन करण्याची तयारी दाखवली. आणि सर्वजण मुख्यधारेमध्ये आले. या सामंजस्य करारानंतर ‘एनएलएफटी’च्या डझनभर कॅडर्सनी आत्मसमर्पण केले.

बंधू आणि भगिनींनो, मतासाठी, राजकीय हितासाठी कोणत्याही मुद्यांना कायमचं पेटवत ठेवणे आणि मूळ प्रश्न न सोडवता तो चिघळत कसा राहील, हे पाहिले गेल्यामुळे आसामचे आणि ईशान्येकडील भागाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. देशाचेही यामुळेच नुकसान झाले आहे.

मित्रांनो, कोणत्याही कामात अडथळा निर्माण करून असुविधा निर्माण करण्याच्या या राजकारणामुळे देशाच्या विरूद्ध काम करणाऱ्यांची एक मानसिकता निर्माण केली जात आहे. जो विचार, जी प्रवृत्ती, जे राजकारण अशा मानसिकतेला प्रोत्साहन देते. असे लोक भारत नेमका कसा आहे, हे जाणून नाहीत तसंच त्यांना आसामही समजत नाही. आसामचा भारताशी असलेले नाते हृदयापासून जोडलेले आहे. ते आत्म्याचे आहे. आसाम श्रीमंत शंकरदेव जी यांच्या संस्कारामध्ये जगतो. श्रीमंत शंकरदेव जी म्हणतात –

कोटि- कोटि जन्मांतरे जाहार, कोटि- कोटि जन्मांतरे जाहार,

आसे महा पुण्य राशि सि सि कदाचित मनुष्य होवय, भारत वरिषे आसि!!

याचा अर्थ असा की, ज्या व्यक्तीने अनेक जन्मांमध्ये निरंतर पुण्य कमावले आहे, ती व्यक्ती या भारत देशामध्ये जन्म घेते. ही भावना आसामच्या कानाकोप-यामध्ये, आसामच्या कणा-कणामध्ये, आसामच्या जना-जनामध्ये आहे. या भावनेला स्मरून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामापासून ते भारताच्या नवनिर्माणामध्ये आसामने आपल्या घामाचं आणि रक्ताचं बलिदान दिलं आहे. ही भूमी स्वातंत्र्यासाठी त्याग-तपस्या करणा-यांची आहे. मी आज आसामच्या प्रत्येक साथीदाराला आश्वस्त करण्यासाठी आलो आहे. आसामविरोधी, देशविरोधी प्रत्येक मानसिकतेला, समर्थकाला देश कधीच खपवून घेणार नाही. तसंच देश कधीच माफ करणार नाही.

मित्रांनो, हीच ताकद आहे. आणि त्या संपूर्ण ताकदीनिशी आसाम आणि ईशान्य भागामध्ये अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे. सिटिजनशिप अमेंडमेंट अॅक्ट- ‘सीएए’मुळे इथं बाहेरचे लोक येतील, बाहेरचे लोक येवून इथंच वास्तव्य करायला लागतील, अशा अफवा आहेत. आसामच्या लोकांना मी आश्वस्त करू इच्छितो की, असं काहीही होणार नाही.

बंधू आणि भगिनींनो, आसाममध्ये, इथल्या लोकांमध्ये राहून मी खूप दीर्घकाळ भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. इथल्या लहान -लहान गावांमध्ये, वस्त्यांमध्येही मी फिरलो आहे. आणि आपल्या त्या प्रवासाच्या काळामध्ये ज्यावेळी आपल्या इथल्या सहकारी मंडळींबरोबर मी गप्पा मारत असे, त्यांच्याबरोबर माझी  उठ-बस होती, त्यावेळी नेहमीच भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या लोकप्रिय गीतांच्या ओळी मी त्यांच्याबरोबर वारंवार ऐकत होतो. विशेष म्हणजे भूपेन हजारिकांविषयी मला खास ओढही आहे. त्याचं कारण म्हणजे माझा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. आणि भूपेन हजारिका -भारतरत्न भूपेन हजारिका हे माझ्या गुजरातचे जावई आहेत. याचाही आम्हाला अभिमान आहे. आणि त्यांची मुलं तर आजही छान गुजरातीमध्ये बोलतात, याचासुद्धा आम्हाला अभिमान वाटतो. आणि ज्यावेळी मी ऐकत होतो….

गोटई जीबोन बिसारिलेउ, अलेख दिवख राती,

अहम देहर दरे नेपाऊं, इमान रहाल माटी !!

आसामसारखा प्रदेश, आसामसारखी माती, इथले लोक यांच्याकडून जो काही आपलेपणा मिळाला आहे, खरंच त्याबद्दल मी स्वतः फारच भाग्यवान आहे, असं मानतो.  इथं वेगवेगळ्या समाजाचे लोक, संस्कृती, भाषा, खाद्यपदार्थ यांची परंपरा किती समृद्ध आहे, हे मला चांगलं माहिती आहे. आपल्या आशा-आकांक्षा, आपली सुख-दुःखे अशा प्रत्येक गोष्टीची मला पूर्ण माहिती आहे. ज्याप्रकारे तुम्ही आपल्या मनात असलेले सर्व भ्रम, चुकीच्या समजुती दूर करून, सर्व मागण्या संपवून बोडो समाजाबरोबर जोडले जावून सहकारी बनून आले आहात, ते पाहून मला आशा आहे की, इतर आणखी कोणाच्या मनात जर काही गैरसमज निर्माण झालेले असतील तर तेही लवकरच संपुष्टात येतील.

सहकारी मंडळींनो, गेल्या 5 वर्षामध्ये भारताच्या इतिहासामध्ये आणि वर्तमानामध्ये आसामने जे योगदान दिले आहे, ते संपूर्ण देशामध्ये पोहोचवण्याचे काम झाले आहे. पहिल्यांदाच राष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये आसामसहित पूर्ण ईशान्य भागातली कला, संस्कृती, इथल्या युवकांमध्ये असलेली प्रतिभा, इथली क्रीडाप्रेमी संस्कृती यांचा पूर्ण देश आणि दुनियेमध्ये प्रसार आणि प्रचार केला जात आहे. तुम्हा लोकांकडून मिळणारा स्नेह, तुमचे आशीर्वाद, तुमच्यासाठी निरंतर काम करण्याची प्रेरणा देत राहतील. हे आशीर्वाद कधीच वाया जाणार नाहीत. कारण तुमच्या आशीर्वादामध्ये खूप मोठी ताकद आहे. तुम्ही आपल्यामध्ये असलेल्या सामर्थ्‍यावर विश्वास ठेवा, आपल्या सहकारी वर्गावर विश्वास ठेवा, माता कामाख्याची कृपा आपल्यावर असणार आहे, असा विश्वास मनामध्ये कायम बाळगा. माता कामाख्यावर असणारी श्रद्धा आणि तिचा आशीर्वाद आपल्या सर्वांना विकासाच्या नवीन उंचीवर घेवून जाईल. 

मित्रांनो, गीतेमध्ये भगवान कृष्णाने पांडवांना सांगितलं होतं आणि ती गोष्ट अतिशय महत्वाची होती. भगवान कृष्ण युद्धभूमीवर म्हणाले होते, हातामध्ये शस्त्र होते, शस्त्र आणि अस्त्रही काम करत होते. त्या युद्धाच्या भूमीवर भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये म्हटले आहे की –

निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव !!

याचा अर्थ असा की, कोणत्याही प्राण्याशी कसलीही वैरभावना न बाळगणारा व्यक्तीच माझा आहे.

थोडा विचार करा, महाभारताच्या त्या ऐतिहासिक युद्धामध्येही भगवान श्रीकृष्ण यांचा संदेश होता की – कोणाशीही वैर करू नका, कोणाशीही शत्रुत्व करू नका.

देशामध्ये अगदी थोडीशीही, कोणा व्यक्तीविषयी वैरभावना तुमच्या मनामध्ये निर्माण होवू नये असे मला वाटते, यावर मला असं सांगायचं आहे की, तुमच्या मनात असलेली वैराची, शत्रुत्वाची भावना अगदी काढून टाका.

सर्वजणांनी विकासाच्या मुख्य धारेमध्ये सहभागी व्हावं. सर्वांच्या साथीनंच सर्वांचा विकास करता येणार आहे. हिंसेमुळे कधीच कोणाला काहीही साध्य झालेलं नाही. तसंच यापुढंही साध्य होईल, अशी संभावनाही नाही.

मित्रांनो, पुन्हा एकदा बोडो सहकारी  बांधवांना आसाम आणि ईशान्य भागाला मी आज खूप-खूप शुभेच्छा देतो. आणि या शुभकामनांबरोबरच पुन्हा एकदा या विशाल जनसागराला काही सांगू इच्छितो… असे दृश्य जीवनामध्ये मला पुन्हा पहायला मिळेल नाही हे तर मला माहिती नाही. हे संभव होईल, असं वाटतही नाही. कदाचित हिंदुस्तानच्या कोणत्याच  राजकीय नेत्याला असा आशीर्वाद प्राप्त करण्याचं सौभाग्य याआधी मिळाले असेल अथवा भविष्यात मिळेल की नाही, हे मी सांगू शकत नाही. मी स्वतःला मात्र खूप भाग्यवान समजतो याचे कारण म्हणजे तुमच्याकडून इतकं प्रेम, आपुलकी, इतके भरभरून आशीर्वाद मिळाले आहेत.

तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम हीच माझी प्रेरणा आहे. या प्रेरणांमुळे मला देशासाठी, तुमच्यासाठी रात्रंदिवस काही न काही करत राहण्यासाठी ताकद देतात. तुम्हा लोकांचे जितके आभार व्यक्त करू, तुम्हा लोकांचे जितके अभिनंदन करू, तितके कमी आहे. तुम्ही अहिंसेचा मार्ग स्वीकारलात, त्यासाठी पुन्हा एकदा, आपल्या हातातली शस्त्रे खाली टाकलीत, त्यासाठी पुन्हा एकदा आणि या नवयुवकांनी हे चांगलं काम स्वीकारलंय, त्यासाठी एकदा मला तुमचं अभिनंदन करावं वाटतंय. तुमच्या आयुष्यामध्ये हे नवीन खूप चांगले पर्व सुरू झाले आहे. यावर तुम्ही विश्वास ठेवा. संपूर्ण देशाचा तुम्हाला आशीर्वाद आहे. 130 कोटी देशवासियांचे आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळतील. आणि मी ईशान्य भागामध्ये, नक्षली भागामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये ज्यांच्या हातामध्ये अजूनही बंदूक आहे, ज्यांना अजून पिस्तुलावर विश्वास वाटतो, त्यांना सांगू इच्छितो की, माझ्या बांधवांनो, मागे फिरा, या माझ्या बोडो नवयुवकांकडून काही तरी शिका. माझ्या बोडो नवयुवकांकडून चांगली प्रेरणा घ्या आणि हिंसेच्या मार्गावरून मागे फिरा. पुन्हा या मुख्य धारेमध्ये सहभागी व्हा. आपल्या आयुष्याला नव्याने प्रारंभ करा, हे जीवन म्हणजे उत्सव आहे, तो उत्सव शांततेच्या मार्गाने साजरा करा. या एकाच अपेक्षेने पुन्हा एकदा या भूमीला प्रणाम करून, या भूमीसाठी आयुष्याचे बलिदान देणा-या महापुरूषांना प्रणाम करून तुम्हा सर्वांना वंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. मी आपलं बोलणं समाप्त करतो. आपल्या सर्वांना खूप-खूप धन्यवाद!!

भारत माता की जय….

पूर्ण ताकद लावून म्हणा, 130 कोटी देशवासियांच्या हृदयाला स्पर्श होईल, अशा आवाजात म्हणा….

भारत माता की जय….

भारत माता की जय….

भारत माता की जय….

भारत माता की जय….

भारत माता की जय….

महात्मा गांधी अमर रहे, अमर रहे! 

महात्मा गांधी अमर रहे, अमर रहे!

महात्मा गांधी अमर रहे, अमर रहे! 

आपल्या सर्वांना खूप-खूप धन्यवाद !!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait

Media Coverage

Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to attend Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India
December 22, 2024
PM to interact with prominent leaders from the Christian community including Cardinals and Bishops
First such instance that a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India

Prime Minister Shri Narendra Modi will attend the Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India (CBCI) at the CBCI Centre premises, New Delhi at 6:30 PM on 23rd December.

Prime Minister will interact with key leaders from the Christian community, including Cardinals, Bishops and prominent lay leaders of the Church.

This is the first time a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India.

Catholic Bishops' Conference of India (CBCI) was established in 1944 and is the body which works closest with all the Catholics across India.