गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भूपेंद्र भाई पटेल, संसदेतले माझे सहकारी श्री सी आर पाटीलजी, गुजरात सरकारमधले मंत्री भाई जगदीश पांचाल, हर्ष संघवी, अहमदाबादचे महापौर किरीट भाई, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोजजी, इतर मान्यवर आणि गुजरातच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो,
साबरमतीचा हा किनारा आज धन्य झाला आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, पंच्याहत्तर शे म्हणजे 7 हजार 500 भगिनी आणि कन्यांनी एकत्रितपणे चरख्यावर सूत कातून एक नवा इतिहास घडवला आहे. हे माझं सद्भाग्य आहे की मलाही चरखा चालवून सूत कातण्याचं भाग्य काही वेळ लाभलं. माझ्यासाठी आज चरख्यावर सूत कातणं म्हणजे काही भावनिक क्षण सुद्धा होते, ते मला माझ्या बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन गेले, कारण आमच्या छोट्याशा घरात एका कोपऱ्यात या सगळ्याच वस्तू असत आणि आमची आई अर्थार्जनाचा एक भाग म्हणून कधीही वेळ मिळाला की सूत कातायला बसत असे. आज तेच जुनं चित्र माझ्या डोळ्यासमोर तरळून माझ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि आज जेव्हा मी या सर्व बाबी पाहतो, आज किंवा या आधी सुद्धा,तेव्हा कधी कधी मला असं वाटतं की जसा एखादा भक्त परमेश्वराची पूजा ज्या प्रकारे करतो, ज्याप्रकारे पूजेची सामुग्री वापरतो, असं वाटतं की सूत कातण्याची ही प्रक्रिया सुद्धा जणू ईश्वराच्या आराधनेपेक्षा काही वेगळी नाही.
चरख्याला स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाच्या हृदयात स्थान मिळाले होते, तीच स्पंदनं आज मी इथे साबरमतीच्या किनारी अनुभवत आहे. मला विश्वास आहे की इथे उपस्थित असलेले सर्व लोक, हा कार्यक्रम पाहत असलेले सर्व लोक, आज इथे होत असलेल्या खादी उत्सवामधलं चैतन्य सुद्धा अनुभवत असतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशानं आज खादी महोत्सव भरवून आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना खूप सुंदर भेट दिली आहे. आजच गुजरात राज्याच्या खादी ग्रामोद्योग मंडळाची नवी इमारत आणि साबरमती नदीवर बांधलेल्या भव्य अशा अटल पुलाचं लोकार्पण सुद्धा झालं आहे. मी अहमदाबादच्या लोकांचं, गुजरातच्या लोकांचं, आज आपण एका नव्या टप्प्यावर पोहोचून आणखी पुढे प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना, खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप शुभेच्छा देतो !!!
मित्रहो,
हा अटल पूल साबरमतीच्या दोन किनाऱ्यांनाच फक्त एकमेकांशी जोडत नाहीये, तर या पुलाची एकंदर रचना आणि त्यातून साधलेला नवोन्मेष अभूतपूर्व असा आहे. या पुलाची रचना करताना गुजरात मधल्या प्रसिद्ध अशा पतंग महोत्सव ध्यानात घेतला गेला आहे. गांधीनगर आणि गुजरातनं अटलजींना नेहमीच खूप प्रेम दिलं. 1996 मध्ये अटलजींनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडणूक जिंकली होती. हा अटल पूल इथल्या लोकांच्या वतीनं अटलजींना एक भावपूर्ण आदरांजली सुद्धा आहे.
मित्रहो,
काही दिवसांपूर्वीच गुजरातसह संपूर्ण देशानं स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं, खूप उत्साहानं अमृत महोत्सव साजरा केला. गुजरातमध्ये सुद्धा ज्या प्रकारे गावागावातून, गल्लोगल्ल्यांतून, घरोघरी तिरंगा मोहिमेचा उत्साह, जोश पाहायला मिळाला आणि चहू बाजूंनी, मन तिरंगा, तन तिरंगा, जन तिरंगा उत्साह सुद्धा तिरंगा, अशा सर्वत्र तिरंगामय झालेल्या वातावरणाचं चित्र आपण सर्वांनी पाहिलं आहे. इथे ज्या तिरंगा यात्रा काढल्या गेल्या, प्रभात फेऱ्या निघाल्या, त्यात राष्ट्रभक्तीचा जोश तर होताच, सोबतीनं पुढच्या अमृतकाळात होऊ घातलेल्या विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प सुद्धा होता. हा संकल्प आज इथे खादी महोत्सवात सुद्धा दिसत आहे. चरख्यावर सूत कातणारे आपले हात, भविष्यातल्या भारताच्या विकासाची वीणच जणू विणत आहेत.
मित्रहो,
खादीचा एक धागा स्वातंत्र्यलढ्याचं सामर्थ्य बनला आणि त्यानं गुलामीच्या बेड्या तोडून टाकल्या, याला इतिहास साक्ष आहे. खादीचा हाच धागा, विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याचा, आत्मनिर्भर-स्वावलंबी भारताचं स्वप्न पूर्ण करण्याचा, प्रेरणास्रोत सुद्धा बनू शकतो. जसा एक दिवा, भले तो कितीही छोटा का असेना, अंधार दूर करतो, त्याचप्रमाणे खादी सारखी आमची पारंपरिक ताकद, भारताला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याची प्रेरणा सुद्धा बनू शकते आणि म्हणूनच हा खादी उत्सव, स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला पुनरुज्जीवित करण्याचा एक प्रयत्न आहे. हा खादी उत्सव, भविष्यातला उज्वल भारत घडवण्याच्या संकल्पसिद्धीची प्रेरणा आहे.
मित्रहो,
या वेळी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून बोलताना मी पंचप्रणां विषयी बोललो. आज साबरमतीच्या किनारी, नदीच्या या पुण्य प्रवाहासमोर, या पवित्र स्थानी, मी त्या पाच निश्चयांची पुनरुक्ती करू इच्छितो. पहिला निश्चय-देशाच्या समोर असलेलं भव्य उद्दिष्ट, विकसित भारत निर्मितीचं लक्ष्य ! दुसरा निश्चय-गुलामीच्या मानसिकतेचा संपूर्ण त्याग ! तिसरा निश्चय-आपल्या वारशाचा अभिमान! चौथा निश्चय-राष्ट्राची एकता मजबूत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न आणि पाचवा निश्चय-प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य.
आज होत असलेला हा खादी उत्सव या पाच निश्चयांचं एक सुंदर प्रतिबिंब आहे. या खादी उत्सवात, एक भव्य लक्ष्य, आपल्या वारशाविषयीचा अभिमान, लोक सहभाग, आपलं कर्तव्य, या सर्वांचा समावेश आहे, या सर्वांचा एकत्रित संगम आहे. आपली खादी सुद्धा गुलामीच्या मानसिकतेची बळी ठरली आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ज्या खादीनं आपल्याला स्वदेशीची जाणीव करून दिली, स्वातंत्र्यानंतर याच खादी कडे अपमानास्पद नजरांनी बघितलं गेलं. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ज्या खादीला गांधीजींनी देशाचा स्वाभिमान बनवलं, त्याच खादीला स्वातंत्र्यानंतर हीन ठरवलं गेलं. त्यामुळेच खादी आणि खादीशी संलग्न असा ग्रामोद्योग पूर्णपणे उध्वस्त झाला. खादीची ही दुरवस्था, विशेष करून गुजरातसाठी खूपच वेदनादायी होती, कारण गुजरातचं खादीशी एक खास नातं राहिलं आहे.
मित्रहो,
मला आनंद वाटतो की खादीला पुन्हा एकदा नवीन जीवन देण्याचं काम गुजरातच्या या मातीनं केलं आहे. मला आठवतं, खादीची स्थिती सुधारण्यासाठी 2003 मध्ये आम्ही, गांधीजींचं जन्मस्थान असलेल्या पोरबंदर इथून एक विशेष मोहीम सुरू केली होती. तेव्हा आम्ही, 'खादी फॉर नेशन' सोबतच 'खादी फॉर फॅशन' असा संकल्प केला होता. गुजरात मध्ये खादीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक फॅशन शो केले गेले, अनेक सुप्रसिद्ध मान्यवरांना या उपक्रमां मध्ये सहभागी करून घेतलं. तेव्हा लोक आमची चेष्टा उडवत होते, अपमान सुद्धा करत होते. मात्र, खादी आणि ग्रामोद्योगाची उपेक्षा गुजरातला मान्य नव्हती. गुजरात समर्पणाच्या भावनेनं पुढे प्रगती करत राहिला आणि त्यानं खादीला जीवनदान देऊन हे सिद्धही करून दाखवलं.
2014 साली जेव्हा तुम्ही मला दिल्लीला जाण्याचा आदेश दिला, तेव्हा गुजरात मध्ये मिळालेली ही प्रेरणा मी पुढे नेली आणि या प्रेरणेचा विस्तार केला. खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन, यासोबतच, खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन हा एक नवा संकल्प सुद्धा आम्ही जोडला. आम्ही गुजरातमध्ये मिळालेल्या यशाच्या अनुभवांचा संपूर्ण देशभर विस्तार सुरू केला. देशभरात खादी बाबत ज्या काही समस्या होत्या त्या दूर केल्या. आम्ही देशबांधवांना खादीची उत्पादनं खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्याचा परिणाम आता संपूर्ण जग पाहत आहे. आज भारतातले सगळ्यात प्रसिद्ध असे फॅशन ब्रँड्स खादीला सामावून घेण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. आज भारतामध्ये खादीचं विक्रमी उत्पादन होत आहे आणि विक्रमी विक्री सुद्धा होत आहे. गेल्या आठ वर्षात खादीच्या विक्रीत चौपटीहून जास्त वाढ झाली आहे. आज पहिल्यांदाच भारतातल्या खादी आणि ग्रामोद्योगाची उलाढाल, एक लाख कोटी रुपयांच्या वर गेली आहे. खादीची विक्री वाढल्याचा सगळ्यात जास्त फायदा आपल्याला झाला आहे. माझ्या गावा खेड्यात राहणाऱ्या, खादीशी निगडीत असलेल्या बंधू भगिनींना झाला आहे. खादीची विक्री वाढल्यामुळे गावात जास्त पैसा खेळू लागला आहे, गावात जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळू लागला आहे. विशेष करून आपल्या माता भगिनींचं सक्षमीकरण झालं आहे. गेल्या आठ वर्षात, निव्वळ खादी आणि ग्रामोद्योगात पावणे दोन कोटी नवे रोजगार निर्माण झाले आहेत आणि मित्रांनो गुजरात मध्ये तर आता ग्रीन खादी म्हणजे हरित खादीची मोहीम सुरू झाली आहे. इथे आता सौर उर्जेवर चालणाऱ्या चरख्यांवर खादी तयार होत आहे. कारागिरांना सौर चरखे दिले जात आहेत. म्हणजे गुजरात पुन्हा एकदा सर्वांना नवा मार्ग दाखवत आहे.
मित्रांनो,
भारताच्या खादी उद्योगाच्या वाढत्या ताकदीमागे देखील महिला शक्तीचं खूप मोठं योगदान आहे. उद्योजकतेची भावना आपल्या भगिनी आणि मुलींमध्ये चांगली रुजली आहे. गुजरातमधील सखी मंडळांचा विस्तार हे देखील याचं उदाहरण आहे. एका दशकापूर्वी आम्ही गुजरातमध्ये भगिनींच्या सक्षमीकरणासाठी मिशन मंगलम सुरु केलं होतं. आज गुजरातमध्ये भगिनींचे 2 लाख 60 हजारापेक्षा जास्त स्वयं सहाय्यता गट तयार झाले आहेत. ग्रामीण भागातल्या 26 लाखापेक्षा जास्त भगिनी याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. या सखी मंडळांना डबल इंजिन सरकारची दुप्पट मदत देखील मिळत आहे.
मित्रांनो,
भगिनी आणि मुलींची शक्तीच या अमृत काळात खरा प्रभाव निर्माण करणार आहे. देशातल्या मुलींनी जास्तीत जास्त संख्येनं रोजगाराशी जोडलं जावं आणि आपल्या मनाजोगं काम करावं हा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये मुद्रा योजना खूप मोठी भूमिका बजावत आहे. एक काळ होता, जेव्हा लहान-मोठं कर्ज घेण्यासाठी देखील भगिनींना ठिकठिकाणी फिरावं लागत होतं. आज मुद्रा योजने अंतर्गत 50 हजारापासून 10 लाख रूपयांपर्यंत विना तारण कर्ज दिलं जात आहे. देशात कोट्यवधी भगिनींनी मुद्रा योजने अंतर्गत कर्ज घेऊन पहिल्यांदाच आपला व्यवसाय सुरु केला आहे. एवढंच नव्हे, तर एक-दोन जणांना रोजगार देखील दिला आहे. यापैकी अनेक महिला खादी ग्रामोद्योगाशी देखील निगडीत आहेत.
मित्रांनो,
आज खादीने जी उंची गाठली आहे, ते बघता आता आपल्याला भविष्याकडे देखील पहावं लागेल. अलीकडे आपण प्रत्येक जागतिक व्यासपीठावर एका शब्दाची मोठी चर्चा ऐकतो- sustainability (शाश्वतता), कोणी म्हणतं, शाश्वत विकास, कोणी म्हणतं शाश्वत ऊर्जा, कोणी म्हणतं शाश्वत शेती, कोणी शाश्वतटिकाऊ उत्पादन बद्दल बोलतं. मानवाच्या वर्तणुकीचा कमीत कमी भार आपली पृथ्वी, आपल्या भूमीवर पडावा, या दिशेनं संपूर्ण जग प्रयत्न करत आहे. जगात अलीकडे बॅक टू बेसिक अर्थात मूलभूततेकडे परत हा मंत्र सुरु आहे. नैसर्गिक संपत्तीच्या रक्षणावर विशेष भर दिला जात आहे. अशा वेळी शाश्वत जीवनशैलीबद्दल देखील बोललं जात आहे.
आपली उत्पादनं पर्यावरण पूरक असणं, त्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ नये, हे अत्यंत महत्वाचं आहे. या ठिकाणी खादी महोत्सवाला आलेले आपण सर्व जण हा विचार करत असाल की मी शाश्वत होण्यावर एवढा जोर का देत आहे. याचं कारण, खादी, शाश्वततेचं उदाहरण आहे. खादीमुळे कार्बन उत्सर्जन कमीत कमी होतं. असे अनेक देश आहेत, ज्या ठिकाणी तापमान जास्त असतं, तिथे खादी आरोग्याच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाची आहे. आणि त्यामुळेच आज खादी जागतिक स्तरावर खूप मोठी भूमिका बजावू शकते. आपल्याला आपल्या या वारशाचा अभिमान असायला हवा, एवढंच.
खादीशी जोडल्या गेलेल्या तुम्हा सर्वांसाठी आज एक खूप मोठी बाजारपेठ विकसित झाली आहे. ही संधी आपण गमावायला नको. मी तो दिवस पाहत आहे जेव्हा जगातल्या प्रत्येक मोठ्या सुपर मार्केटमध्ये, कापड बाजारात सगळीकडे भारताच्या खादीचं वर्चस्व असेल. आपली मेहनत, आपला घाम आता जगावर वर्चस्व गाजवणार आहे. भारताची खादी सगळीकडे दिसेल. पर्यावरण बदलामुळे आता खादीची मागणी आणखी वेगानं वाढणार आहे. खादीला स्थानिक पातळीवरून जागतिक पातळीवर जाण्यापासून आता कोणतीही शक्ती रोखू शकत नाही.
मित्रांनो,
आज साबरमतीच्या घाटावरून मला देशातल्या लोकांना एक आवाहन करायचं आहे. आगामी सणासुदीला यंदा खादी ग्रामोद्योगाचं उत्पादन भेट म्हणून द्या. आपल्याकडे घरी वेगवेगळ्या धाग्यापासून बनवलेले कपडे असू शकतील, पण त्यामध्ये आपण थोडी जागा खादीला देखील द्याल, तर वोकल फॉर लोकल अभियानाला गती मिळेल, एखाद्या गरीबाचं जीवनमान सुधारायला मदत होईल. आपल्यापैकी जे परदेशात राहत आहेत, त्यांनी आपल्या नातेवाईकाकडे किंवा मित्राकडे जाताना भेट म्हणून खादीचं एखादं उत्पादन बरोबर घेऊन जावं. यामुळे खादीचा प्रचार तर होईलच, पण त्याबरोबर इतर देशातल्या नागरिकांमध्ये देखील खादी बद्दल जागरुकता निर्माण होईल.
मित्रांनो,
जे देश आपला इतिहास विसरतात ते देश नवीन इतिहास देखील घडवू शकत नाहीत. खादी आपल्या इतिहासाचा, आपल्या वारशाचा अविभाज्य भाग आहे. जेव्हा आपण आपल्या वारशाचा अभिमान बाळगतो, तेव्हा जग देखील त्याला मान आणि सन्मान देतं. याचं एक उदाहरण भारताचा खेळणी उद्योग देखील आहे. खेळणी, भारतीय परंपरांवर आधारित खेळणी पर्यावरणासाठी देखील चांगली असतात, लहान मुलांच्या आरोग्याचं देखील नुकसान करत नाहीत. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये परदेशी खेळण्यांच्या स्पर्धेत भारताचा स्वतःचा समृद्ध खेळणी उद्योग उद्ध्वस्त होत होता.
सरकारच्या प्रयत्नांनी, खेळणी उद्योगाशी जोडलेल्या आपल्या बंधू-भगिनींच्या परिश्रमांनी आता परिस्थितीत बदल होत आहे. आता परदेशातून मागवल्या जाणाऱ्या खेळण्यांच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्याच वेळी भारतीय खेळणी जगातल्या बाजारात मोठ्या प्रमाणात आपलं स्थान मिळवत आहेत. याचा खूप मोठा लाभ आपल्या छोट्या उद्योगांना झाला आहे, कारागीरांना, श्रमिकांना, कारागीर समाजाच्या लोकांना झाला आहे.
मित्रांनो,
सरकारच्या प्रयत्नांमुळे हस्त-कलाकृतींची निर्यात, हाताने बनवलेल्या कारपेट्सच्या निर्यातीत देखील सतत वाढ होत आहे. आज दोन लाखापेक्षा जास्त विणकर आणि हस्तकला कारागीर GeM (जीईएम) पोर्टलशी जोडले गेले आहेत आणि आपलं सामान सरकारला सुलभतेने विकत आहेत.
मित्रांनो,
कोरोनाच्या या संकटकाळात देखील आमचं सरकार आपले हस्तशिल्प कारागीर, विणकर, कुटीर उद्योगाशी जोडलेल्या बंधू-भगिनींच्या पाठीशी उभं आहे. लघु उद्योगांना, एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम) उद्योगांना आर्थिक मदत देऊन सरकारने कोट्यवधी रोजगार बुडण्यापासून वाचवले आहेत.
बंधुनो आणि भगिनींनो,
अमृत महोत्सवाची सुरुवात गेल्या वर्षी मार्च मध्ये दांडी यात्रेच्या वर्धापन दिनी साबरमती आश्रमामध्ये झाली होती. अमृत महोत्सव पुढल्या वर्षी ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार आहे. या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी खादीशी जोडलेल्या आपल्या बंधू-भगिनींचं, गुजरात सरकारचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. अमृत महोत्सवात आपल्याला अशाच आयोजनांच्या माध्यमातून नवीन पिढीला स्वातंत्र्य चळवळीची ओळख करून देत राहायचं आहे.
मला आपल्या सर्वांना एक आग्रह करायचा आहे, आपण बघितलंच असेल दूरदर्शनवर एक स्वराज मालिका सुरु झाली आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या स्वाभिमानासाठी, देशाच्या काना-कोपऱ्यात काय संघर्ष झाला, काय बलिदान झालं, या मालिकेत स्वातंत्र्य चळवळीशी निगडित गाथांना खूप सविस्तरपणे दाखवलं जात आहे. दूरदर्शनवर रविवारी कदाचित रात्री 9 वाजता दाखवली जाणारी ही स्वराज मालिका, आजच्या युवा पिढीनं, संपूर्ण कुटुंबानं पाहायला हवी. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय-काय सहन केलं, याची येणाऱ्या पिढ्यांना माहिती व्हायला हवी. देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि स्वावलंबनाची ही भावना देशात सतत वाढत राहो, याच आशेने मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो!
मला आज विशेष करून माझ्या या माता-भगिनींना नमन करायचं आहे, कारण चरखा चालवणं ही देखील एक प्रकारची साधना आहे. पूर्ण एकाग्रतेनं, योग भावनेनं या माता-भगिनी देशाच्या विकासामध्ये योगदान देत आहेत. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं इतिहासात पहिल्यांदाच ही घटना घडली असेल. इतिहासात पहिल्यांदाच.
जे लोक वर्षानुवर्ष या विचाराशी जोडले गेले आहेत, या आंदोलनाशी जोडले गेले आहेत, अशा सर्व मित्रांना माझी विनंती आहे की, आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने काम केलं आहे, ज्या रीतीनं काम केलं आहे, आज भारत सरकारद्वारे महात्मा गांधींच्या या मूल्यांच्या पुनरुज्जीवनाचा जो प्रयत्न सुरु आहे, तो समजून घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा. तो स्वीकारून पुढे जायला मदत मिळेल. त्यासाठी मी अशा सर्व सहकाऱ्यांना निमंत्रण देत आहे.
चला, आपण सर्व एकत्र येऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पूज्य बापूंनी जी महान परंपरा घडवली आहे, जी परंपरा भारताच्या उज्ज्वल भविष्याचा आधार बनू शकेल, त्यासाठी पूर्ण ताकद लावूया, सामर्थ्य लावूया, कर्तव्य भाव निभावूया आणि परंपरेचा अभिमान बाळगून पुढे जाऊया. याच अपेक्षेने पुन्हा एकदा आपणा सर्व मातांना-भगिनींना आदरपूर्वक नमन करून मी माझे शब्द पूर्ण करतो.
धन्यवाद!