“औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या कौशल्य दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने आज घडला इतिहास”
“विश्वकर्मा जयंती हा खऱ्या अर्थाने परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे, हा श्रम दिवस आहे”
“भारतामध्ये श्रमिकांच्या कौशल्यात आपण नेहमीच परमेश्वर पाहिला , ते विश्वकर्माच्या रुपात आपल्याला दिसतात”
“या शतकावर भारताचे नाव कोरायचे असेल तर भारतातील तरुणांनी शिक्षण आणि कौशाल्यात सारखेच प्रवीण असायला हवे”
“आयटीआय मध्ये तांत्रिक प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांच्या लष्करातील भरती साठी विशेष तरतूद करणार”
“यामध्ये आयटीआयची भूमिका अत्यंत महत्वाची, आपल्या तरुणांनी याचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा”
“भारतात कौशल्यामध्ये गुणवत्ता आणि विविधताही आहे”
“तरुणांकडे जेव्हा शिक्षणाबरोबर कौशल्याचे बळ असते, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आपोआप वाढतो”
“बदलत्या जागतिक परिस्थितीत जगाचा विश्वास भारतावर”
“मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की तुमची सुरुवात जितकी आनंददायी आहे, तेवढाच तुमचा उद्याचा प्रवास देखील अधिक सृजनशील असेल”, ते म्हणाले.

नमस्कार!

मला आज देशातील लाखो आयटीआय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. कौशल्य विकासाशी संबंधित विविध संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणविश्वातील इतर मान्यवर, स्त्री आणि पुरुष!

आपल्या देशाने आज 21 व्या शतकात वाटचाल करत नवा इतिहास रचला आहे. प्रथमच आयटीआयच्या नऊ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा कौशल्य दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.  40 लाखांहून अधिक विद्यार्थी दूरदृश्य माध्यमातून आपल्याशी जोडले गेले आहेत. मी तुम्हा सर्वांना कौशल्य दीक्षांत समारोहासाठी शुभेच्छा देतो. आजचा दिवस देखील खूप शुभ आहे. आज भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे. कौशल्य नवनिर्मितीच्या मार्गावर तुमची पहिली पायरी असलेला कौशल्य दीक्षांत समारोह विश्वकर्मा जयंतीच्या शुभमुहूर्तावर होत आहे हा किती विलक्षण योगायोग आहे!  मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की तुमची सुरुवात जितकी आनंददायी असेल तितकाच तुमचा भविष्यातील प्रवासही अधिक सृजनशील असेल. तुम्हाला आणि सर्व देशवासियांना भगवान विश्वकर्मा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

मित्रांनो,

विश्वकर्मा जयंती हा कौशल्याची प्राण प्रतिष्ठापना करण्याचा उत्सव आहे.  शिल्पकाराने घडवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्याला देवाचे रूप म्हणता येत नाही. आज आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आज विश्वकर्मा जयंती निमित्त तुमच्या कौशल्याचा गौरव केला जात आहे.  विश्वकर्मा जयंती ही खर्‍या अर्थाने कष्ट करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान आहे;  हा श्रमिकांचा दिवस आहे. आपल्या देशात श्रमिकांच्या कौशल्याकडे देवाचा अंश म्हणून पाहिले जाते;  तो विश्वकर्माच्या रूपात दिसतो. म्हणजेच तुमच्याकडे असलेल्या कौशल्यात कुठेतरी देवाचा अंश आहे. हा कार्यक्रम म्हणजे भगवान विश्वकर्मा यांना भावपूर्ण आदरांजली मानतो.  याला ‘कौशलांजली’ म्हणा किंवा ‘कर्मांजली’ म्हणा, विश्वकर्मा जयंतीहून अधिक सुंदर दिवस कोणता असू शकतो.

मित्रांनो,

भगवान विश्वकर्मा यांच्याकडून प्रेरणा घेत गेल्या आठ वर्षांत देशाने अनेक नवीन योजना सुरू केल्या आहेत. ‘श्रमेव जयते’ ही आपली परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा हा प्रयत्न आहे. देश आज पुन्हा एकदा कौशल्य विकासावर समान भर देऊन कौशल्याचा गौरव करत आहे. हे शतक भारताचे शतक बनवायचे असेल तर भारतातील तरुणांनी शिक्षणाबरोबरच कौशल्यातही प्रवीण होणे अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन आमच्या सरकारने तरुणांच्या कौशल्य विकासाला आणि नवीन संस्थांच्या निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आपल्या देशातील पहिल्या आयटीआयची स्थापना 1950 मध्ये झाली. त्यानंतरच्या सात दशकांत सुमारे 10,000 आयटीआय स्थापन करण्यात आले.  आमच्या सरकारच्या आठ वर्षात देशात सुमारे पाच हजार नवीन आयटीआय स्थापन करण्यात आले आहेत. गेल्या आठ वर्षांत आयटीआयमध्ये चार लाखांहून अधिक नवीन जागांची भर पडली आहे.  याशिवाय देशभरात राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, भारतीय कौशल्य संस्था आणि हजारो कौशल्य विकास केंद्रेही उघडण्यात आली आहेत. शालेय स्तरावर कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी 5,000 हून अधिक कौशल्य केंद्रे सरकार सुरु करणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये, अनुभवावर आधारित शिक्षणालाही प्रोत्साहन दिले जात आहे आणि देशातील शाळांमध्ये कौशल्य अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत.

आयटीआयच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे, ज्याचा तुम्हा सर्वांना फायदा होत आहे.  दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मुक्त विद्यालयातून 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्रही सहज मिळत आहे. हे तुम्हाला पुढील अभ्यासात मदत करेल. तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला आहे.  आयटीआयमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांच्या सैन्य भरतीसाठी विशेष तरतूद आहे. म्हणजेच आता आयटीआयमधून पदवी घेतलेल्या तरुणांना लष्करातही संधी मिळणार आहे.

मित्रांनो,

चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या, म्हणजेच 'इंडस्ट्री 4.0' च्या या युगात भारताच्या यशामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) मोठी भूमिका आहे.  कालानुरूप नोकरीचे स्वरूपही बदलत आहे, त्यामुळे आपल्या आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रत्येक आधुनिक अभ्यासक्रम सहज उपलब्ध व्हावा, यासाठी सरकारने विशेष काळजी घेतली आहे.  आज आयटीआयमध्ये कोडिंग, कृत्रिम प्रज्ञा, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, टेली-मेडिसिन इत्यादींशी संबंधित अनेक अभ्यासक्रम सुरू केले आहेत.  नवीकरणीय ऊर्जा, सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात भारत कसा आघाडीवर आहे हे देखील तुम्ही पाहू शकता. आपल्या अनेक आयटीआयमध्ये असे अभ्यासक्रम सुरू केल्याने तुम्हाला रोजगाराच्या संधी मिळणे सोपे होईल.

मित्रांनो,

देशात आज तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे नोकरीच्या संधीही वाढत आहेत.  उदाहरणार्थ, देशात प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर पुरवून लाखो सेवा केन्द्र (कॉमन सर्व्हिस सेंटर्स) सुरू होत असताना, आयटीआयमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी गावागावांत अधिकाधिक संधी निर्माण होत आहेत.

मोबाईल फोन दुरुस्ती, शेतीशी संबंधित नवीन तंत्रज्ञान, खतांची किंवा कीटकनाशकांची ड्रोनच्या सहाय्याने केली जाणारी फवारणी असे अनेक नवीन रोजगार ग्रामीण अर्थव्यवस्थेत उदयाला येत आहेत. या सर्व संधींचा संपूर्ण लाभ आपल्या तरुणांना घेता येण्यासदर्भात आयटीआयची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊन सरकार आयटीआयचा विकास आणि त्यामध्ये काळानुरूप बदल करण्यासाठी सातत्याने काम करत आहे.

मित्रहो,

कौशल्य विकासाबरोबरच तरुणांमध्ये अनेक सुप्त कौशल्ये म्हणजेच सॉफ्ट स्किल्स असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आयटीआयमध्ये यावर खास भर दिला जात आहे. उद्योगासाठीच्या आराखडा तयार करणे, बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठीच्या योजना, आवश्यक अर्ज कसे भरावेत, नवीन कंपनीची नोंदणी कशी करावी इत्यादी गोष्टींचा प्रशिक्षणात सविस्तर अंतर्भाव आहे. सरकारने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून भारताकडे कौशल्यातील दर्जेदारपणाबरोबरच वैविध्यही निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षात आपल्या आयटीआय मधून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्यांनी जागतिक कौशल्य स्पर्धांमध्ये महत्त्वाची बक्षिसे जिंकली आहेत.

मित्रहो,

कौशल्य विकासाची अजून एक बाजूही तेवढीच महत्त्वाची आहे, त्याबद्दलही बोललं गेलं पाहिजे. जेव्हा तरुणाईकडे शिक्षणाच्या सामर्थ्याबरोबर कौशल्य असते तेव्हा त्यांच्या आत्मविश्वासात आपोआपच भर पडते.

जेव्हा युवकांमध्ये कौशल्याचे सामर्थ्य असते तेव्हा स्वतःचे काहीतरी उभारावे असा विचार आपोआपच त्याच्या मनात घर करु लागतो. स्वयंरोजगाराच्या या उर्मीला वाव देण्यासाठी तुम्हाला आज मुद्रा योजना, स्टार्ट अप इंडिया आणि स्टँड अप इंडिया यासारख्या योजना उपलब्ध आहेत ज्या कोणत्याही हमीविना कर्ज देतात. तेव्हा, ध्येय तुमच्यासमोर आहे आणि तुम्हाला फक्त त्या दिशेने वाटचाल करायची आहे. आज देशाने तुम्हाला हात दिलेला आहे आणि उद्या तुम्हीच देश पुढे नेणार आहात. जीवनातील ही पुढील 25 वर्षे जशी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहेत त्याचप्रमाणे 25 वर्षाचा अमृतकाळ हा देशाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. तुम्ही सर्वजण मेक इन इंडिया आणि व्होकल फॉर लोकल अशा मोहिमांचे अग्रणी आहात आणि म्हणूनच तुम्हाला विकसित भारत, स्वनिर्भर भारत साकार करायचा आहे.

मित्रहो,

अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे आज जगातील अनेक प्रमुख देशांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तसेच प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज आहे. तेव्हा देशाबरोबरच देशाबाहेरही अनेक संधी तुमची वाट बघत आहेत. बदलत्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतावरील जगाचा विश्वास सातत्याने वाढत आहे. 

आपल्याकडे कुशल मनुष्यबळ आणि आपल्या तरुणाईकडे मोठ्यातील मोठ्या आव्हानाला समर्थपणे तोंड देण्याची पात्रता आहे हे भारताने कोरोना कालखंडात सिद्ध केलं आहे. आज भारतातील युवक अनेक देशांमध्ये त्याचा ठसा उमटवत आहे. मग ते क्षेत्र कोणतेही असो. आरोग्य सेवा, हॉटेल व्यवस्थापन असो की रुग्णालय व्यवस्थापन, डिजिटल सेवा किंवा आपत्कालीन व्यवस्थापन. मला आठवतंय माझ्या परदेश दौऱ्यांच्या वेळी अमुक एक बिल्डिंग भारतीय मनुष्यबळाकडून बांधली गेली आहे किंवा एखादा विशेष प्रकल्प भारतातील माणसांकडून पूर्णत्वाला गेला आहे कशा प्रकारच्या गोष्टी मोठमोठ्या नेत्यांकडून मला ऐकायला मिळाल्या आहेत या विश्वासाचा पूर्णपणे लाभ घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे.

आज इथे अजून एक विनंती तुम्हाला करावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही आज जे काही शिकला आहात ते तुमच्या भविष्याचा पाया बनणार आहे तरीही पुढील काळानुसार तुम्हाला तुमचे कौशल्य पुढच्या पायरीवर नेणेही तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच जेव्हा कौशल्यांबद्दल बोलले जाते तेव्हा कौशल्य मिळवणे, पुन्हा पुन्हा कौशल्य साध्य करणे, कौशल्यात भर टाकणे हाच तुमचा मंत्र बनला पाहिजे. आपल्या क्षेत्रात काय काय नाविन्यपूर्ण घडत आहे त्यावर नेहमीच तुमची नजर असायला हवी. उदाहरणार्थ, ऑटोमोबाईलमध्ये एखाद्याने साधा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर आता त्याने इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात  स्वतःच्या कौशल्यात भर टाकणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात याचप्रमाणे वेगाने बदल होत आहेत म्हणूनच तुमच्या कौशल्यात सातत्याने भर घालत राहणे आणि बदलत्या काळानुसार स्वतः बदलणे आवश्यक आहे. तुमच्या क्षेत्रातील कोणते नवीन कौशल्य तुमच्या विकासात कित्येक पटीने हातभार लावेल हे जाणून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच  नवीन कौशल्य‌ वाढवण्यासोबतच तुमचे ज्ञान‌‌ इतरांना ‌वाटणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. तुम्ही याच प्रकारे मार्गक्रमणा कराल आणि स्वतःतील कौशल्यांच्या जोरावर भारताच्या भविष्याला दिशा द्याल याची मला खात्री आहे. 

आणि मित्रांनो अजून एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्याकडील कौशल्ये, तुमच्या क्षमता, निर्धार आणि योगदान या गोष्टी भारताच्या उज्वल भविष्यासाठीच्या सर्वात मोठ्या ठेवी आहेत. 

आज विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने मला तुमच्यासारख्या बुद्धी, कौशल्य आणि भव्य स्वप्ने बाळगणाऱ्या तरुणांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे.

भगवान विश्वकर्माचे आशीर्वाद तुमच्याबरोबर सदैव असावेत तसेच तुमच्या कौशल्यात भर पडावी, विकास व्हावा या भावनांसोबतच तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा

धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

Prime Minister Shri Narendra Modi paid homage today to Mahatma Gandhi at his statue in the historic Promenade Gardens in Georgetown, Guyana. He recalled Bapu’s eternal values of peace and non-violence which continue to guide humanity. The statue was installed in commemoration of Gandhiji’s 100th birth anniversary in 1969.

Prime Minister also paid floral tribute at the Arya Samaj monument located close by. This monument was unveiled in 2011 in commemoration of 100 years of the Arya Samaj movement in Guyana.