नमस्कार,
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पीयूष गोयल जी, मनसुख मांडवीया जी, अश्विनी वैष्णव जी, सर्बानंद सोनोवाल जी, पुरुषोत्तम रुपाला जी, जी. किशन रेड्डी जी, पशुपती कुमार पारस जी, जितेंद्र सिंह जी, सोम प्रकाश जी, देशभारातून या कार्यक्रमात सहभागी झालेले स्टार्टअप जगतातील सर्व दिग्गज, आमचे तरुण मित्र, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,
आपण सर्वांनीच भारतीय स्टार्टअप्सचं यश बघितलं आहे आणि काही या क्षेत्रातील काही लोकांनी केलेलं सादरीकरण देखील बघितलं. आपण सर्वच जण अतिशय उत्तम काम करत आहात. 2022 हे वर्ष भारतीय स्टार्ट अप जगतासाठी अनेक नव्या संधी घेऊन आलं आहे. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात आयोजित हा स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताह आणखीनच महत्त्वाचा आहे. जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल, त्या भव्य भारताच्या उभारणीत तुमची फार मोठी भूमिका असणार आहे.
देशाच्या सर्व स्टार्ट अप्सचे, तसेच, स्टार्ट अप्सच्या जगात भारताचा झेंडा उंचावत आहेत अशा सर्व प्रयोगशील युवकांचे खूप खूप अभिनंदन करतो. स्टार्ट अप्सची ही संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, यासाठी 16 जानेवारी हा दिवस आता ‘राष्ट्रीय स्टार्टअप’ दिवस साजरा करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.
मित्रांनो,
स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताह, गेल्या वर्षी मिळालेलं यश साजरं करण्यासाठी देखील आहे आणि भविष्यातील रणनीती ठरविण्यासाठी देखील. या दशकात भारताला टेक-हेड म्हणजेच तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ देश- म्हटलं जात आहे. या दशकात नवोन्मेष, उद्योजकता आणि स्टार्ट अप व्यवस्था सुदृढ करण्यासाठी सरकार जे मोठ्या प्रमाणावर बदल करत आहे, त्याचे तीन महत्वाचे पैलू आहेत -
पहिला, उद्योजकतेला, नवोन्मेषी प्रयोगांना सरकारी प्रक्रियांच्या जंजाळातून, प्रशासनाच्या विळख्यातून मुक्त करणे, दुसरा, नवोन्मेषी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा निर्माण करणे आणि तिसरा, नवोन्मेषी युवकांना, युवा उद्योगपतींना मदतीचा हात देखील देणे. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया सारखे कार्यक्रम अशाच प्रयत्नांचा भाग आहेत.
एंजल कराशी संबंधित समस्यांचं निराकरण आणि कर विवरण भरण्याची प्रक्रिया सुलभ करणे असो, सुलभ कर्ज उपलब्धता असो, हजारो कोटी रुपयांचे सरकारी अर्थसहाय्य उपलब्ध करणे असो, या सुविधा आमची कटीबद्धता दाखवतात. स्टार्ट अप इंडिया अंतर्गत स्टार्ट अप्सना 9 श्रम आणि 3 पर्यावरण कायद्यांच्या अनुपालनात स्वयं-प्रमाणन करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
कागदपत्रांच्या स्वयं-प्रमाणीकरणामुळे सरकारी प्रक्रियांचे सुलभीकरण सुरु झाले होते, ते आज 25 हजारांहून जास्त अनुपालन रद्द करण्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. स्टार्ट अप्स, सरकारला आपली उत्पादनं आणि सेवा सुलभतेने देऊ शकतील यासाठी सरकारी ई-बाजारपेठ या प्लॅटफॉर्मवर निर्माण केलेला स्टार्ट अप रनवे देखील अतिशय उपयोगी पडत आहे.
मित्रांनो,
आपल्या युवकांच्या सामर्थ्यावर विश्वास, त्याच्या सर्जनशीलतेवर विश्वास कुठल्याही देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असतो. भारत आज आपल्या युवकांचे सामर्थ्य ओळखून धोरणं आखत आहे, निर्णय घेत आहे. भारतात एक हजारपेक्षा जास्त विद्यापीठे आहेत, 11 हजारपेक्षा जास्त एकल संस्था आहेत, 42 हजाराहून जास्त महाविद्यालये आहेत आणि लाखो शाळा आहेत. ही भारताची खूप मोठी ताकद आहे.
लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाविषयी आकर्षण निर्माण करणे, नवोन्मेषाचे संस्थात्मीकरण करणे हा आमचा प्रयत्न आहे. 9 हजारपेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅब, आज मुलांना शाळेत नवोन्मेष, नव्या कल्पनांवर काम करणे यासाठी नवनवे मंच मिळत आहेत. याशिवाय देशभरातील शाळा - महाविद्यालयातील हजारो प्रयोगशाळांचे जाळे, प्रत्येक क्षेत्रात नवोन्मेषाला प्रोत्साहन देत आहेत. देशासमोरील आव्हानांचा सामना करायला आपण नवोन्मेष आणि तंत्रज्ञान आधारित समस्या निवारणावर भर देत आहोत. आपण अनेक हॅकॅथॉन आयोजित करून, युवकांना आपल्याशी जोडले आहे, त्यांनी डिजिटल माध्यमातून तंत्रज्ञानाच्या मदतीने विक्रमी वेळात अनेक समस्यांचे निराकरण केले आहे.
सरकारचे विविध विभाग, विविध मंत्रालये कशाप्रकारे युवकांच्या, स्टार्टअप्सच्या संपर्कात असतात, त्याच्या नवीन कल्पनांना प्रोत्साहन देत असतात हे तुम्ही बघितलंच असेल. नवे ड्रोन नियम असोत, की मग नवे अवकाश धोरण, सरकारची प्राथमिकता, जास्तीत जास्त युवकांना नवोन्मेषाची संधी देणे ही आहे.
आमच्या सरकारने, IPR नोंदणीचे नियम देखील खूप सुलभ केले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारे मिळून आज देशात शेकडो इंक्यूबेटर्सला मदत करत आहेत. आज देशात iCreate सारख्या संस्था नवोन्मेष व्यवस्था वाढविण्यात अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. iCreate म्हणजे International Centre for Entrepreneurship and Technology (उद्योजकता आणि तंत्रज्ञानासाठीचे आंतरराष्ट्रीय केंद्र). ही संस्था अनेक स्टार्ट अप्सना एक भक्कम सुरुवात करुन देत आहे, नवोन्मेषाला प्रोत्साहन देत आहे.
आणि मित्रांनो,
सरकारच्या या प्रयत्नांचे परिणाम देखील दिसून येत आहेत. वर्ष 2013-14 मध्ये जिथे 4 हजार पेटंटला मंजुरी मिळाली होती, तिथे मागच्या वर्षी 28 हजारपेक्षा जास्त पेटंट मंजूर करण्यात आले आहेत. वर्ष 2013-14 मध्ये जिथे जवळपास 70 हजार ट्रेडमार्कची नोंदणी झाली होती, तिथे 2021 मध्ये अडीच लाखाहून जास्त ट्रेडमार्क नोंदणी झाली आहे. वर्ष 2013-14 मध्ये जिथे फक्त 4 हजार कॉपीराईट मंजूर करण्यात आले होते, मागच्या वर्षी ही संख्या वाढून 16 हजारपेक्षा जास्त झाली आहे. भारतात जी नवोन्मेष मोहीम सुरु आहे, त्याचा परिणाम म्हणून जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारताची क्रमवारी फारच सुधारली आहे. वर्ष 2015 मध्ये या क्रमवारीत भारत 81व्या क्रमांकावर अडकून पडला होता. आज नवोन्मेष निर्देशांकांत भारत 46व्या क्रमांकावर आहे, 50 च्या खाली आला आहे.
मित्रांनो,
भारताची स्टार्ट अप व्यवस्था, आज जगभरात आपला झेंडा रोवत आहे. आपली गांभीर्याने काम करण्याची वृत्ती आणि प्रामाणिकपणा ही भारताच्या स्टार्टअप व्यवस्थेची खरी ताकद आहे. भारताच्या स्टार्टअप व्यवस्थेची ही शक्ती आहे, की ती सातत्याने स्वतःला विकसित करत आहे, स्वतःला सुधारत आहे, आपली ताकद वाढवत आहे. सातत्याने नवे काही शिकण्याची आपली मनोवृत्ती आहे, आपली स्टार्टअप व्यवस्था स्वतःला बदलत असते, नवनव्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलत आहे. आज भारतातील स्टार्ट अप्स 55 वेगवेगळ्या उद्योगांत कार्यरत आहेत, हे बघून अभिमान वाटतो. पाच वर्षांपूर्वी देशात जिथे 500 देखील स्टार्ट अप्स नव्हते, आज त्यांची संख्या वाढून 60 हजार पर्यंत पोहोचली आहे. तुमच्याकडे नवोन्मेषाची शक्ती आहे, तुमच्याकडे नव्या कल्पना आहेत, तुम्ही उर्जावान नवयुवक आहात, आणि आपण व्यवसायाची पद्धतच बदलत आहात. आपले स्टार्ट अप्स खेळाचे नियमच बदलत आहेत. म्हणून मला असं वाटतं स्टार्ट अप्स नव्या भारताच्या पाठीचा कणा असणार आहेत.
मित्रांनो,
उद्योजकतेपासून सक्षमीकरण या भावनेतून आपल्याकडे विकास तर घडतो आहेच, त्याचसोबत प्रादेशिक आणि लैंगिक असमानता देखील दूर केली जात आहे. पूर्वी, जिथे मोठी शहरे, मेट्रो शहरातच व्यवसाय वाढत होते, आज देशात प्रत्येक राज्यात सव्वा सहाशेपेक्षा जास्त जिल्ह्यांत किमान एक स्टार्ट अप आहे. आज जवळजवळ अर्धे स्टार्ट अप्स द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणीच्या शहरांत आहेत. या स्टार्ट अप्सच्या माध्यमातून, सामान्य, गरीब कुटुंबातील युवकांच्या कल्पना व्यवसायात रूपांतरित होत आहेत. या स्टार्ट अप्समध्ये आज लाखो युवकांना नोकऱ्या मिळत आहेत.
मित्रांनो,
ज्या वेगाने आणि ज्या प्रमाणात आज भारताचे युवक स्टार्ट अप्स स्थापन करत आहेत, ते जागतिक महामारीच्या या काळात भारतीयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि संकल्पशक्तीचे प्रतीक आहे. आधी अगदी अनुकूल वातावरणात देखील एखाद-दुसरी मोठी कंपनी तयार होऊ शकत होती. मात्र गेल्या वर्षी कोविडच्या संकटातही आपल्या देशात 42 युनिकॉर्न तयार झाले आहेत. हजारो कोटींच्या या कंपन्या आत्मनिर्भर होत असलेल्या, आत्मविश्वासपूर्ण भारताची ओळख आहेत. आज भारत वेगाने युनिकॉर्नचं शतक करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मला विश्वास आहे, भारताच्या स्टार्ट अप्सचा सुवर्ण काळ तर आता सुरु होत आहे. भारताची जी विविधता आहे, ती आपली मोठी शक्ती आहे. आमची ओळख, आमची जागतिक ओळख आहे.
आपले युनिकॉर्न आणि स्टार्टअप्स देखील याच विविधतेचा संदेश देत आहेत. साध्या घरपोच सेवेपासून पेमेंट करण्याची सोय आणि कॅब सेवेपर्यंत. आपला विस्तार खूप मोठा आहे. आपल्याकडे भारतातच वैविध्यपूर्ण बाजार, विविध संस्कृती आणि त्यात काम करण्याचा इतका मोठा अनुभव आहे. म्हणूनच, भारताच्या स्टार्ट अप्स सहजतेने जगातील इतर देशांत पाय ठेवू शकतात. म्हणूनच तुम्ही केवळ लोकल न राहता ग्लोबल बनायला पाहिजे. हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा - आपण भारतासाठी नवोन्मेष करूया, भारतातून नवोन्मेष करूया.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात सर्वांनी कामाला लागण्याची वेळ आहे. सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करून ध्येय गाठण्याची ही वेळ आहे. पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याच्या अंमलबजावणीवर काम करणाऱ्या एका समूहाने जेव्हा याविषयी महत्वाचा सल्ला दिला, त्याचा मला विशेष आनंद झाला. गतिशक्ती प्रकल्पांत जी जास्तीची जागा उरेल, त्याचा उपयोग ई व्ही चार्जिंग पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो. या बृहद आराखड्यात आज वाहतूक, उर्जा, दूरसंचार यासह संपूर्ण पायाभूत सुविधा एकाच व्यासपीठावर आणल्या जात आहेत. बहुआयामी आणि बहुउद्देशीय संपत्ती निर्मितीसाठी या अभियानात आपलाही सहभाग अतिशय गरजेचा आहे.
यामुळे आपल्या उत्पादन निर्मिती क्षेत्रात नवीन मोठ्या उद्योजकांच्या (चॅम्पियन्सच्या) निर्मितीला चालना मिळेल. संरक्षण उत्पादन, चिप उत्पादन, स्वच्छ ऊर्जा आणि ड्रोन तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये देशाच्या महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर आहेत. नजीकच्या काळात, नवीन ड्रोन धोरण लागू झाल्यानंतर, देशातील आणि जगातील अनेक गुंतवणूकदार ड्रोन स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक करत आहेत. ड्रोन कंपन्यांना लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून सुमारे 500 कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. स्वामीत्व योजनेसाठी सरकार आज मोठ्या प्रमाणावर गावातील मालमत्तांच्या मोजमापासाठी ( मॅपिंग करण्यासाठी) ड्रोन वापरत आहे. आता औषधांची घरपोच सेवा आणि शेतीमध्ये ड्रोनचा वापर करण्याची व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे त्यात भरपूर वाव आहे.
मित्रांनो,
आपले जलद होणारे शहरीकरण हे देखील एक मोठे लक्ष्यकेन्द्री क्षेत्र आहे. आपली सध्याची शहरे विकसित करण्यासाठी आणि नवीन शहरे वसवण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. शहरी नियोजन, या क्षेत्रातही खूप काम करायचे आहे. यामध्येही आपल्याला अशा प्रकारच्या वॉक टू वर्क संकल्पना आणि एकात्मिक औद्योगिक वसाहती तयार कराव्या लागतील, जिथे श्रमिकांसाठी, कामगारांसाठी उत्तम व्यवस्था असेल. शहरी नियोजनात नवीन शक्यता तुमची वाट पाहत आहेत. उदाहरणार्थ, येथे एका गटाने मोठ्या शहरांसाठी राष्ट्रीय सायकलिंग योजना आणि कारमुक्त क्षेत्राबद्दल सांगितले. शहरांमध्ये शाश्वत जीवनशैलीला चालना देण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मी कॉप-26 च्या परिषदेत गेलो होतो, तेव्हा मी मिशन लाइफबद्दल बोललो होतो आणि ही माझी जीवनाची संकल्पना आहे जी पर्यावरणासाठी जीवनशैली (एलआयएफई) आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही त्या गोष्टी लोकांमध्ये विकसित केल्या आहेत. पी-3 चळवळीसारखी अनिवार्य असलेली गोष्ट घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे आज अत्यावश्यक आहे. प्रो-प्लॅनेट-पीपल, पी-3 चळवळ. जोपर्यंत आपण सर्वसामान्य जनतेला पर्यावरणाविषयी जागरूक करत नाही तोपर्यंत आपण जागतिक तापमानवाढी विरुद्धच्या लढ्याचे सैनिक बनवू शकत नाही, आपण ही लढाई जिंकू शकत नाही आणि म्हणूनच भारत, मिशन लाइफ घेऊन अनेक देशांना आपल्यासोबत जोडण्यासाठी काम करत आहे.
मित्रांनो,
अभिनव संपर्कव्यवस्थेमुळे (स्मार्ट मोबिलिटीमुळे) शहरांचे जीवन सुसह्य होईल आणि कार्बन उत्सर्जनाचे आमचे लक्ष्य साध्य करण्यातही मदत होईल.
मित्रांनो,
जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारत आपली ओळख आणखी सशक्त करत आहे. ती आज त्यांच्या कुटुंबाची समृद्धी आणि राष्ट्राच्या आत्मनिर्भरतेचा आधारस्तंभ आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेपासून ते उद्योग 4.0 पर्यंत, आपल्या गरजा आणि आपल्या क्षमता या दोन्ही अमर्याद आहेत. भविष्यातील तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन आणि विकासावर गुंतवणूक करणे ही आज सरकारची प्राथमिकता आहे. पण उद्योगानेही यात आपले योगदान, त्याची व्याप्ती वाढवली तर बरे होईल.
मित्रांनो,
एकविसाव्या शतकाच्या या दशकात आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. देशातही मोठी बाजारपेठ खुली होत आहे, आपण आता डिजिटल जीवनशैलीत प्रवेश केला आहे. सध्या आपली अर्धी लोकसंख्या ऑनलाइन आहे. ज्या गतीने, ज्या प्रमाणात, ज्या किमतीत सरकार खेडोपाडी डिजिटल सुविधा गरीबातल्या गरिबांपर्यंत, उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे, भारतात अगदी कमी कालावधीत सुमारे 100 कोटी इंटरनेट वापरकर्ते असतील. जसजसे दुर्गम भागात शेवटच्या टोकापर्यंत माल पोहचवण्याची व्यवस्था सक्षम होत आहे, तसतसे ग्रामीण बाजारपेठ आणि ग्रामीण प्रतिभेचा एक मोठा पूल देखील निर्माण होत आहे. म्हणूनच मी भारतातील स्टार्ट अप्सना गावाकडे वळण्याची विनंती करतो. ही एक संधी आणि आव्हानही आहे. मोबाईल इंटरनेट असो, ब्रॉडबँड संपर्कव्यवस्था (कनेक्टिव्हिटी) असो किंवा भौतिक संपर्कव्यवस्था (कनेक्टिव्हिटी) असो, आज गावाच्या आकांक्षा वाढत आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भाग विस्ताराच्या नव्या लाटेची वाट पाहत आहेत. स्टार्ट-अप संस्कृतीने ज्या प्रकारे कल्पनेचे लोकशाहीकरण केले आहे, त्यामुळे महिला आणि स्थानिक व्यवसायांचे सक्षमीकरण झाले आहे. लोणचे-पापडपासून हस्तकलेपर्यंत अनेक स्थानिक उत्पादनांची व्याप्ती आज मोठ्या प्रमाणावर विस्तारली आहे. वाढत्या जागरूकतेमुळे लोक स्थानिकांसाठी आवाज बुलंद करत आहेत. आत्ताच आमचे जयपूरचे मित्र कार्तिक यांनी लोकल ते ग्लोबलबद्दल सांगितले आणि आभासी पर्यटनाचा उल्लेख केला. मी तुमच्या सारख्या मित्रांना विनंती करेन की, स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत आहेत, तुम्ही देशातील शाळा-महाविद्यालयातील मुलांची एक स्पर्धा घेऊ शकता. त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या शहरात स्वातंत्र्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित करावेत, जी स्मारके आहेत, इतिहासाची पाने आहेत त्यासंदर्भात आभासी सर्जनशील कार्य करा आणि तुमच्या सारख्या स्टार्टअप्सनी ते संकलित केले पाहिजे आणि देशाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षांसाठी आभासी सफरीसाठी आमंत्रित केले जावे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवामध्ये स्टार्टअप्स जगताचे मोठे योगदान असेल. त्यामुळे तुमची कल्पना चांगली आहे, ती कल्पना कशी साकारायची, तुम्ही त्याची सुरुवात केली तर ती आपण पुढे नेऊ शकू याची मला खात्री आहे.
मित्रांनो,
कोविड टाळेबंदी दरम्यान, आपण पाहिले आहे की स्थानिक पातळीवरील छोट्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी लोकांचे जीवन कसे सोपे केले आहे. स्टार्ट-अप्सना छोट्या स्थानिक व्यवसायांसोबत काम करण्याची मोठी संधी आहे. स्टार्ट-अप हे स्थानिक व्यवसाय सक्षम बनवू शकतात. अधिक कार्यक्षम बनवू शकतात. लघुउद्योग हा देशाच्या विकासाचा कणा आहे आणि स्टार्ट अप्स हे नवीन बाजी पलटवणारे आहेत. ही भागीदारी आपला समाज आणि अर्थव्यवस्था दोहोंमधे परिवर्तन घडवून आणू शकते. विशेषत: महिलांच्या रोजगाराला यातून खूप बळ मिळू शकते.
मित्रांनो,
कृषी ते आरोग्य, शिक्षण, पर्यटन अशा प्रत्येक क्षेत्रात सरकार आणि स्टार्ट अप यांच्या भागीदारीबाबत अनेक सूचना येथे आल्या आहेत. आमच्या इथे जे दुकानदार आहेत ते त्यांच्या क्षमतेपैकी जास्तीत जास्त 50-60% वापर करु शकतात. एक सूचना होती, त्यांनी एक डिजिटल उपाय दिला होता की कोणते सामान संपले आहे आणि कोणते आणायचे हे त्यांना समजले पाहिजे, इत्यादी. मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छीतो, तुम्ही त्या दुकानदाराला त्याच्याकडे असलेल्या ग्राहकांशी देखील जोडू शकता. त्यामुळे दुकानदार ग्राहकाला कळवू शकतो की तुमच्या या तीन वस्तू तीन दिवसांनी संपणार आहेत, तुमच्या घरातील या सात वस्तू पाच दिवसांनी संपणार आहेत. त्यांना संदेश पाठवला तर घरातील सदस्यांनाही स्वयंपाकघरात काही साहित्य आहे की नाही, हे आहे की नाही, ते आहे की नाही यासाठी डब्बे धुंडाळत बसण्याची गरज नाही. हा तुमचा दुकानदारच त्याला संदेश पाठवू शकते. आणि तुम्ही ते एका मोठ्या मंचामधे रूपांतरित करू शकता. केवळ दुकानासाठीच्या दूरदृष्टीनेच नव्हे, तर कुटुंबाच्या गरजेसाठीही त्यांना डोक्याला त्रास द्यावा लागणार नाही, महिनाभर हळद घेतली, ती तीन दिवसांनी संपणार आहे, असा तुमचाच संदेश जाईल. त्यामुळे तुम्ही खूप मोठे समन्वयक तुम्ही बनू शकता, तुम्ही खूप मोठा पूल बनू शकता.
मित्रांनो,
तरुणांच्या प्रत्येक सूचनेला, प्रत्येक कल्पनेला, प्रत्येक कल्पकतेला सरकारचा पूर्ण पाठिंबा मिळेल याची मी खात्री देतो. देशाला स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षाच्या दिशेने घेऊन जाणारी ही 25 वर्षे खूप महत्वाची आहेत मित्रांनो आणि तुमच्यासाठी सर्वात महत्वाची आहेत. हे नवोन्मेषाचे अर्थात नवकल्पना, उद्योग आणि गुंतवणुकीचे नवीन युग आहे. तुमचे श्रम भारतासाठी आहेत. तुमचा उद्योग भारतासाठी आहे. तुमची संपत्ती निर्मिती भारतासाठी आहे, रोजगार निर्मिती भारतासाठी आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हा तरुणांच्या ऊर्जेचे देशाच्या ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. तुमच्या सूचना, तुमच्या कल्पना... कारण आता नव्या पद्धतीने विचार करणारी नवी पिढी आहे. व्यवस्था समजून घेणे आणि स्वीकारणे फार महत्वाचे झाले आहे. आणि मला विश्वास आहे की सात दिवसांच्या विचारमंथनातून ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्या सरकारचे सर्व विभाग अतिशय गांभीर्याने घेत आहेत. त्याचा सरकारमध्ये कसा उपयोग करायचा, त्याचा सरकारच्या धोरणांवर कसा परिणाम व्हायला हवा, धोरणे कशी आहेत. शासनाचा समाजजीवनावर परिणाम होणार आहे. त्याचा परिणाम झाला तर या सर्व विषयांचा फायदा होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुमचा अमुल्य वेळ दिलात, कारण तुम्ही नवकल्पनांच्या जगातील लोक आहात आणि म्हणूनच तुमचा वेळ नवकल्पनांमध्येच जातो आणि त्या कल्पनांची तुम्ही सर्वांसोबत देवाणघेवाण केली, हेही खूप मोठे काम आहे.
मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मकर संक्रांतीचा पवित्र सण. सध्या हवेत तोच माहौल आहे. या दरम्यान, कोरोनामध्ये स्वतःची काळजी घ्या.
खूप खूप धन्यवाद!