


नमस्कार !
की मानियेर मोरिस?
आप लोग ठीक हव जा ना?
आज हमके मॉरीशस के धरती पर
आप लोगन के बीच आके बहुत खुसी होत बातै !
हम आप सब के प्रणाम करत हई !
मित्रांनो,
10 वर्षांपूर्वी याच दिवशी मी मॉरिशसला आलो होतो तेव्हा इथे येण्यापूर्वी एकच आठवडा आधी होळी साजरी केली होती. मी इथे येताना भारतातून फागुआचा उत्साह माझ्यासोबत घेऊन आलो होतो. यावेळी मी मॉरिशसमधून होळीचे रंग भारतात घेऊन जाईन. आपण एक दिवसानंतर तिथे होळी साजरी करू. 14 तारखेला चारी दिशांना रंग असतील.
राम के हाथे ढोलक सोहै
लछिमन हाथ मंजीरा।
भरत के हाथ कनक पिचकारी...
शत्रुघन हाथ अबीरा...
जोगिरा........
आणि जेव्हा आपण होळीबद्दल बोलतो तेव्हा गुजियाची गोड चव विसरून कसे चालेल? एक काळ असा होता की मॉरिशस भारताच्या पश्चिमेकडील भागांना त्यांच्या मिष्टान्नांमध्ये गोडवा आणण्यासाठी साखर पुरवत असे. कदाचित म्हणूनच गुजरातीमध्ये साखरेला 'मोरास' असेही म्हटले जाते. काळानुसार, भारत आणि मॉरिशसमधील संबंधांतील गोडवाही हळूहळू वाढत आहे. याच गोडव्यासह, मी मॉरिशसच्या सर्व नागरिकांना राष्ट्रीय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
मी जेव्हा जेव्हा मॉरिशसमध्ये येतो तेव्हा मला असे वाटते की मी माझ्याच लोकांमध्ये आहे. येथील हवेत… मातीत आणि पाण्यात…. गायल्या जाणाऱ्या गाण्यात…, ढोलकाच्या तालात… दाल पुरीच्या चवीत… एक आपुलकीची भावना जाणवते. कुच्चा आणि गातो पीमा या पदार्थांमध्ये भारताचा परिचित सुगंध दरवळतो आणि, हे नाते स्वाभाविक आहे, कारण येथील मातीत कैक भारतीयांचे.. आपल्या पूर्वजांचे रक्त आणि घाम मिसळलेला आहे. आपण सर्वजण एकाच कुटुंबाचा भाग आहोत आणि याच भावनेने पंतप्रधान नवीन रामगुलाम जी आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. पंतप्रधान नवीन जी आता जे बोलले ते केवळ मनातूनच उमटू शकते. हृदयातून उमटलेल्या त्यांच्या बोलण्याचे मी हृदयपूर्वक आभार मानतो.
मित्रांनो,
पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे मॉरिशसच्या लोकांनी, येथील सरकारने मला त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे… मी तुमच्या निर्णयाचा नम्रपणे स्वीकार करतो. हा भारत आणि मॉरिशसमधील ऐतिहासिक संबंधांचा सन्मान आहे. हा त्या भारतीयांचा सन्मान आहे ज्यांनी समर्पणाच्या भावाने पिढ्यानपिढ्या या भूमीची सेवा केली आणि मॉरिशसला आज या उंचीवर पोहोचवले आहे. या सन्मानाबद्दल मी मॉरिशसच्या प्रत्येक नागरिकाचे आणि येथील सरकारचे आभार मानतो.
मित्रांनो,
गेल्या वर्षी, मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. हे मॉरिशस आणि भारत यांच्यातील वाढत्या संबंधांची ताकदीचे दर्शक आहे. आणि मॉरिशसचा राष्ट्रीय दिन म्हणून 12 मार्च हा दिवस निवडणे हे आपल्या दोन्ही देशांच्या सामायिक इतिहासाचे प्रतिबिंब आहे. हा तोच दिवस आहे जेव्हा महात्मा गांधींनी गुलामगिरीविरुद्ध दांडी सत्याग्रह सुरू केला होता. हा दिवस दोन्ही राष्ट्रांच्या स्वातंत्र्यलढ्यांची आठवण करून देतो. मॉरिशस मध्ये येऊन लोकांच्या हक्कासाठी लढा देणारे बॅरिस्टर मणिलाल डॉक्टर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाला कोणीही विसरू शकत नाही. आपले चाचा रामगुलाम जी यांनी नेताजी सुभाष आणि इतरांबरोबर गुलामगिरीविरुद्ध एक असाधारण संघर्षाचे नेतृत्व केले. बिहारमधील पटना येथील ऐतिहासिक गांधी मैदानावरील शिवसागर जी यांचा पुतळा या समृद्ध परंपरेची आठवण करून देतो. नवीन जी यांच्यासोबत शिवसागर जी यांना आदरांजली वाहण्याचे भाग्य मला लाभले आहे.
मित्रांनो,
जेव्हा मी तुमच्यामध्ये येतो, तुम्हाला भेटतो, तुमच्याशी बोलतो तेव्हा मी इतिहासात दोनशे वर्षे मागे जातो, ज्या काळाबद्दल आपण फक्त वाचले आहे - वसाहतवादाच्या काळात असंख्य भारतीयांना कपटाने येथे आणले गेले होते. त्यांनी प्रचंड वेदना, दुःख आणि विश्वासघात सहन केला. त्या कठीण काळात भगवान राम, रामचरित मानस, भगवान राम यांचा संघर्ष, त्यांचा विजय, त्यांची प्रेरणा आणि त्यांची तपश्चर्या हाच या भारतीयांच्या शक्तीचा स्रोत होती. भगवान रामामध्ये ते स्वतःला पाहत होते आणि रामाकडून शक्ती आणि आत्मविश्वास मिळवत होते.
राम बनिइहैं तो बन जइहै,
बिगड़ी बनत बनत बन जाहि।
चौदह बरिस रहे बनवासी,
लौटे पुनि अयोध्या माँहि॥
ऐसे दिन हमरे फिर जइहैं,
बंधुवन के दिन जइहें बीत।
पुनः मिलन हमरौ होई जईहै,
जइहै रात भयंकर बीत॥
मित्रांनो,
मला आठवते की 1998 मध्ये 'आंतरराष्ट्रीय रामायण परिषदे'साठी मी येथे आलो होतो. त्यावेळी मी कोणतेही सरकारी पद भूषवत नव्हतो. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मॉरिशसला आलो होतो. योगायोग म्हणजे, नवीनजी तेव्हाही पंतप्रधान होते. आणि आता, जेव्हा मी पंतप्रधान झालो तेव्हा नवीनजींनी दिल्लीत माझ्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहून माझा सन्मान केला.
मित्रांनो,
भगवान राम आणि रामायणाबद्दल अनेक वर्षांपूर्वी मी येथे अनुभवलेली गाढ श्रद्धा आणि भावना आजही तितकीच मजबूत आहे. भावनेचा असा पूर गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अयोध्येत प्राण प्रतिष्ठा समारंभात दिसून आला होता. आपली 500 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणत प्राणप्रतिष्ठा महोत्सव झाला होता. संपूर्ण भारतात पसरलेला उत्साह आणि उत्सव येथे मॉरिशसमध्येही दिसून आला. तुमचे हे मनापासूनचे नाते समजून घेत, मॉरिशस सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी देखील जाहीर केली. भारत आणि मॉरिशसमधील श्रद्धेचे हे सामायिक बंधन आपल्या चिरस्थायी मैत्रीचा भक्कम पाया रचते.
मित्रांनो,
मला माहिती आहे की मॉरिशसमधील अनेक कुटुंबे अलीकडेच महाकुंभ मेळ्यातून परतली आहेत. सुमारे 65-66 कोटी लोकांची उपस्थिती असलेल्या या मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या मेळाव्याने जगाला अचंबित केले आहे. आणि मॉरिशसमधील लोक देखील या ऐतिहासिक कार्यक्रमाचा भाग झाले होते. परंतु मला हे देखील माहिती आहे की मॉरिशसमधील माझे अनेक बंधू आणि भगिनी, मनापासून इच्छा असूनही, एकतेच्या या महाकुंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. मी तुमच्या भावना जाणतो. म्हणूनच मी महाकुंभाच्या वेळी गोळा केलेले पवित्र संगमातील पवित्र जल माझ्यासोबत आणले आहे. उद्या, हे पवित्र जल येथील गंगा तलावात विसर्जित केले जाईल. 50 वर्षांपूर्वी गोमुख येथील गंगेचे पाणी येथे आणून गंगा तलावात विसर्जित करण्यात आले होते. उद्या, आपण पुन्हा एकदा अशाच पवित्र क्षणाचे साक्षीदार होऊ. गंगा मातेच्या आशीर्वादाने आणि महाकुंभातील या प्रसादाने, मॉरिशस समृद्धीच्या नवीन उंचीवर पोहोचेल, अशी मी प्रार्थना करतो.
मित्रांनो,
मॉरिशसला 1968 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, परंतु या देशाने सर्वांना एकत्र घेऊन ज्या पद्धतीने प्रगती केली आहे ते जगासाठी एक उल्लेखनीय उदाहरण आहे. जगाच्या विविध कोपऱ्यांतील लोकांनी मॉरिशसला आपले घर बनवून संस्कृतींचा एक जिवंत नमुना - विविधतेचे एक सुंदर उपवन तयार केले आहे. आपल्या पूर्वजांना बिहार, उत्तर प्रदेश आणि भारताच्या इतर भागांमधून येथे आणण्यात आले होते.
जर तुम्ही भाषा, बोली आणि खाण्याच्या सवयींचे निरीक्षण केले तर तुम्हाला दिसेल की मॉरिशस मध्ये एक छोटा भारतच दिसतो. भारतीयांच्या पिढ्यांनी रुपेरी पडद्यावर मॉरिशसचे कौतुक केले आहे. जेव्हा तुम्ही गाजलेली हिंदी गाणी पाहता, तेव्हा तुम्हाला इंडिया हाऊस, इले ऑक्स सर्फ, ग्रिस-ग्रिस समुद्र किनाऱ्याची सुंदर दृश्ये, कॉडन वॉटरफ्रंट आणि रोचेस्टर धबधब्यांचे आवाज ऐकू येतील. कदाचित, मॉरिशसचा असा क्वचितच एखादा कोपरा असेल ज्याला भारतीय चित्रपटात स्थान मिळाले नाही. किंबहुना, जेव्हा संगीत भारतीय असेल आणि चित्रिकरण स्थळे मॉरिशस मधील असतील तर चित्रपट गाजणारच म्हणून समजा !
मित्रांनो,
संपूर्ण भोजपूर प्रदेश आणि बिहारशी असलेले तुमचे खोल भावनिक संबंध मी जाणून आहे.
पूर्वांचलचा खासदार या नात्याने बिहारमध्ये किती क्षमता आहेत हे मला माहीत होते... एक काळ होता जेव्हा बिहार हे जगाच्या समृद्धीचे केंद्र होते.. आता एकत्र येऊन बिहारचे वैभव परत मिळवून देण्यासाठी काम करत आहोत.
मित्रांनो,
ज्या काळात जगातील अनेक भागात शिक्षण पोहोचले नव्हते, त्या काळात भारतात बिहारमध्ये नालंदासारखे जागतिक शिक्षण केंद्र होते. आमच्या सरकारने नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन केले आहे आणि नालंदामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. आज, भगवान बुद्धांची शिकवण जगाला शांततेच्या शोधकार्यात प्रेरणा देत आहे. हा समृद्ध वारसा आपण केवळ जपत नाही तर जागतिक स्तरावर त्याचा प्रचारही करत आहोत. आज, बिहारच्या मखाणाला संपूर्ण भारतात व्यापक मान्यता मिळत आहे. जगभरातील न्याहारीच्या पदार्थांमध्ये बिहारच्या मखाणाला स्थान मिळणे आता फार दूर नाही.
इथे मखाणा किती प्रिय आहे हे मला माहीत आहे. मला देखील मखाणा खूप आवडतात.
मित्रांनो,
आज, भारत भविष्यातील पिढ्यांसाठी मॉरिशसशी आपले खोलवर रुजलेले संबंध जोपासत आहे आणि जपत आहे. मॉरिशसमधील भारतीय समुदायाच्या सातव्या पिढीलाही परदेशस्थ भारतीय नागरिक पत्र(ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया-ओसीआय कार्ड) मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा मला आनंद आहे. मला मॉरिशसचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी वृंदाजी यांना ओसीआय कार्ड सादर करण्याचा बहुमान मिळाला. पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी वीणाजी यांना ओसीआय कार्ड देण्याचा मानही मला मिळाला. या वर्षीच्या प्रवासी भारतीय दिवसादरम्यान, मी जगभरात स्थायिक झालेल्या स्थलांतरीत भारतीय कंत्राटी कामगारांसाठी (गिरमिटिया समुदाय) काही उपक्रम राबवण्याचा प्रस्तावही दिला होता. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की भारत सरकार गिरमिटिया समुदायाचा सर्वसमावेशक विदासंग्रह (डेटाबेस) तयार करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. गिरमिटिया समुदायाचे सदस्य ज्या गावांमधून आणि शहरांमधून स्थलांतरित झाले त्यांची माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय गिरमिटीया समुदाय कुठे कुठे स्थायिक झाला त्याचा थांगपत्ता लावण्याचे काम देखील आम्ही करत आहोत. गिरमिटिया समाजाचा संपूर्ण इतिहास - त्यांचा भूतकाळापासून ते वर्तमानापर्यंतचा प्रवास - एकाच ठिकाणी नोंदवला जात आहे. आमचा प्रयत्न आहे की, विद्यापीठाच्या सहकार्याने गिरमिटीयांच्या वारशाचा अभ्यास केला जावा आणि वेळोवेळी जागतिक गिरमिटीय परिषदा आयोजित केल्या जाव्यात. गिरमिटिया समुदाय कुठल्या मार्गाने, कशा प्रकारे स्थलांतरीत झाला(‘इंडेंटर्ड लेबर रूट्स’) याचा अभ्यास करण्यासाठी मॉरिशस आणि गिरमिटिया समुदाय वास्तव्य करुन असलेल्या इतर देशांसोबत सहयोग करण्याचीही भारताची योजना आहे. मॉरिशसमधील ऐतिहासिक आप्रवासी घाटासह(माॅरिशस मध्ये गिरमिटीया पहिल्यांदा उतरले ते ठिकाण) या मार्गांवरील प्रमुख वारसा स्थळांचे जतन करण्याचे आमचे ध्येय आहे.
मित्रांनो,
मॉरिशस हा केवळ एक भागीदार देश नाही. आमच्यासाठी मॉरिशस हे कुटुंब आहे. इतिहास, वारसा आणि मानवी भावना या अनुषंगाने, हे बंध खोल आणि मजबूत आहेत. मॉरिशस हा भारताला, विस्तीर्ण ग्लोबल साउथशी (आर्थिक दृष्ट्या विकसनशील राष्ट्रांचा समूह)जोडणारा सेतू आहे. एक दशकापूर्वी 2015 मध्ये, पंतप्रधान म्हणून मॉरिशसच्या माझ्या पहिल्या भेटीत, मी भारताच्या SAGAR व्हिजन या संकल्पाची घोषणा केली होती. सागर म्हणजे सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रिजन अर्थात ‘प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास’. आज, मॉरिशस अजूनही या संकल्पाच्या केंद्रस्थानी आहे. गुंतवणूक असो वा पायाभूत सुविधा, वाणिज्य असो किंवा आपत्ती प्रतिसाद असो, भारत नेहमीच मॉरिशसच्या पाठीशी उभा आहे. आफ्रिकी महासंघामधील मॉरिशस हा पहिला देश आहे ज्यांच्यासोबत आम्ही 2021 मध्ये सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. यामुळे नवीन संधींची कवाडे उघडून मॉरिशसला भारतीय बाजारपेठांमध्ये प्राधान्याने प्रवेश मिळाला आहे. भारतीय कंपन्यांनी मॉरिशसमध्ये लाखो-कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. आम्ही मॉरिशसच्या लोकांसाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यासाठी भागीदारी केली आहे. यामुळे विकासाला चालना मिळत आहे, नोकऱ्या निर्माण होत आहेत आणि उद्योगांमध्ये परिवर्तन होत आहे. मॉरिशसमधील क्षमतावृद्धी करण्यामध्ये भारत हा अभिमानास्पद भागीदार आहे.
मित्रांनो,
विशाल सागरी प्रदेश लाभलेल्या मॉरिशसला अवैध मासेमारी, समुद्री चाचेगिरी आणि गुन्ह्यांपासून आपली साधनसंपत्ती सुरक्षित राखण्याची आवश्यकता आहे. एक भरवशाचा आणि विश्वासार्ह मित्र म्हणून, भारत आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदी महासागर क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी मॉरिशससोबत कार्यरत आहे. संकटकाळात भारत नेहमीच मॉरिशसच्या पाठीशी उभा राहिला आहे. जेव्हा कोविड-19 चा प्रादुर्भाव झाला तेव्हा 1 लाख लसी आणि आवश्यक औषधे वितरीत करणारा भारत हा पहिला देश होता. जेव्हा मॉरिशसला संकटाचा सामना करावा लागतो तेव्हा भारत हा हाकेला धावून जाणारा पहिला देश असतो. जेव्हा मॉरिशसची भरभराट होते, तेव्हा आनंद साजरा करणारा भारत हा पहिला देश असतो. शेवटी, थोडक्यात काय तर, आमच्यासाठी मॉरिशस हे कुटुंब आहे.
मित्रांनो,
भारत आणि मॉरिशस हे केवळ इतिहासानेच जोडलेले नाहीत तर सामायिक भविष्यातील संधींनीही जोडलेले आहेत. जिथे जिथे भारत झपाट्याने प्रगती करत आहे, तिथे तो मॉरिशसच्या विकासाला सक्रिय पाठिंबा देत आहे. मेट्रो वाहतूक व्यवस्था आणि विजेवर धावणाऱ्या बसेसपासून ते सौरऊर्जा प्रकल्पांपर्यंत, यूपीआय आणि रुपे कार्ड सारख्या आधुनिक सेवा आणि संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम - भारत मैत्रीच्या भावनेने मॉरिशसला आपला पाठिंबा देत आहे. आज, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता म्हणून उभा आहे आणि लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. मॉरिशसला आपल्या विकासाचा पुरेपूर फायदा होईल अशी भारताची नेहमीच मनापासून इच्छा असते. म्हणूनच, जेव्हा भारताने जी-20 चे अध्यक्षपद भूषवले तेव्हा आम्ही मॉरिशसला विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित केले होते. भारतातील शिखर परिषदेदरम्यान, आफ्रिकी महासंघाला प्रथमच जी-20 चे स्थायी सदस्य बनवण्यात आले. ही दीर्घकाळची मागणी अखेर भारताच्या अध्यक्षतेखाली पूर्ण झाली.
मित्रांनो,
इथे एक प्रसिद्ध गाणे आहे..
तार बांधी धरती ऊपर
आसमान गे माई...
घुमी फिरी बांधिला
देव अस्थान गे माई...
गोर तोहर लागीला
धरती हो माई...
("पृथ्वी धाग्याने बांधलेली आहे,
आणि मातृत्वाचा हा धागा आकाशाशी जोडतो...
मी जगभर फिरतो,बांधलकी जपतो
तरी दैवी स्थान, माझी आई...
तुझी सावली पडते माझ्यावर,
हे पृथ्वी, माझी आई...")
आपण पृथ्वीला आपली माता मानतो. 10 वर्षांपूर्वी जेव्हा मी मॉरिशसला भेट दिली, तेव्हा मी संपूर्ण जगाला ओरडून सांगितले होते की हवामान बदलाबद्दल मॉरिशसचे काय म्हणणे आहे ते आपण ऐकले पाहिजे. मला आनंद होत आहे की आज मॉरिशस आणि भारत मिळून जगभरात या विषयावर जनजागृती करत आहेत. मॉरिशस आणि भारत हे इंटरनॅशनल सोलर अलायन्स ( आंतरराष्ट्रीय सौर आघाडी) आणि ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स (जागतिक जैव इंधन आघाडी) सारख्या उपक्रमांचे प्रमुख सदस्य आहेत. आज, मॉरिशस देखील, एक पेड माँ के नाम ( एक झाड आईच्या नावे) ही मोहिम राबवत आहे. आज मी, पंतप्रधान नवीन रामगुलाम जी यांच्यासमवेत एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण केले. ही मोहीम केवळ आपल्याला जन्म देणाऱ्या आईशीच नाही तर पृथ्वी मातेशीही नाते निर्माण करते. मी मॉरिशसच्या सर्व नागरिकांना या मोहिमेत भाग घेण्याचे आवाहन करतो.
मित्रांनो,
21 व्या शतकात मॉरिशससाठी अनेक संधी निर्माण होत आहेत. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, भारत प्रत्येक पावलावर मॉरिशसच्या सोबत आहे. मी पुन्हा एकदा पंतप्रधान, त्यांचे सरकार आणि मॉरिशसच्या जनतेचे आभार मानतो
पुन्हा एकदा, राष्ट्रीय दिनानिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद.
नमस्कार.