मंत्रीमंडळातील माझे सहकारी सर्वानंद सोनोवाल जी, शंतनु ठाकूर जी, तुतिकोरीन बंदराचे अधिकारी - कर्मचारी, अन्य गणमान्य व्यक्ती, बंधू आणि भगिनींनो !
आज विकसित भारत बनवण्याच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हे नवीन तुतिकोरीन आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल भारताच्या सागरी पायाभूत सुविधा क्षेत्रातील नवा तारा आहे. या नव्या टर्मिनलमुळे व्ही.ओ. चिंदबरनार बंदराचे सामर्थ्य देखील विस्तारले जाईल. 14 मीटरहून अधिक खोलीचा ड्राफ्ट…. 300 मीटरहून अधिक लांबीचा बर्थ असणारे नवे टर्मिनल…या बंदराची क्षमता वर्धित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील. यामुळे व्ही.ओ. चिंदबरनार बंदरावरील लॉजिस्टिक खर्चात कपात होईल आणि भारताच्या परदेशी चलनाची देखील बचत होईल. मी यासाठी तुम्हा सर्वांना, तमिळनाडूच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो.
मला आठवते की.. दोन वर्षांपूर्वी मला व्ही.ओ. चिंदबरनार बंदराशी संबंधित अनेक प्रकल्पांचा शुभारंभ करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा या बंदराची कार्गो हाताळणी क्षमता वाढवण्यासाठी अनेक कामे सुरू झाली होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा मी तुतिकोरीनमध्ये आलो होतो…. तेव्हा देखील बंदराच्या विकासाची अनेक कामे सुरू झाली होती. आज ही सर्व कामे जलद गतीने पूर्ण होत आहेत हे पाहून माझा आनंद दुप्पट होत आहे. नव्या टर्मिनलमधील एकूण कर्मचारी वर्गापैकी 40% महिला कर्मचारी असतील या गोष्टीचा मला खूप आनंद झाला आहे. म्हणजेच हे टर्मिनल सागरी क्षेत्रात महिला प्रणीत विकासाचे देखील प्रतीक बनेल.
मित्रांनो, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. येथील बंदरांच्या पायाभूत सुविधांमध्ये 3 महत्त्वपूर्ण बंदरे आणि 17 गौण बंदरांचा समावेश आहे. या सामर्थ्यामुळे आज तामिळनाडू सागरी व्यापार जाळ्यातील एक प्रमुख केंद्र बनले आहे. बंदराच्या नेतृत्वाखालील विकास या अभियानाला चालना देण्यासाठी भारत बंदराबाहेरील कंटेनर टर्मिनलचा विकास करत आहे. यावर 7,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जात आहे. सरकार व्ही.ओ. चिंदबरनार बंदराची क्षमता देखील निरंतर वाढवत आहे. म्हणजेच, व्ही.ओ. चिंदबरनार बंदर देशाच्या सागरी विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज होत आहे.
मित्रांनो,
आज भारताचे व्यापक सागरी अभियान केवळ पायाभूत विकासापूरते सीमित नाही. भारत आज जगाला शाश्वत आणि भविष्यवेधी विकासाचा मार्ग दाखवत आहे. आणि ही बाब देखील आपल्या व्ही.ओ. चिंदबरनार बंदरामुळे स्पष्ट दिसून येत आहे. या बंदराला हरित हायड्रोजन केंद्र आणि ऑफशोअर पवन ऊर्जेसाठी नोडल पोर्ट म्हणून ओळखले जाते. आज जग हवामान बदलाच्या ज्या आव्हानांना तोंड देत आहे, त्यावर उपाय शोधण्यात हा उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
मित्रांनो,
नवोन्मेष आणि सहयोग ही भारताच्या विकास यात्रेत आपली सर्वात मोठी ताकद आहे. आज ज्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन झाले आहे, ते देखील आपल्या याच सामर्थ्याचा पुरावा आहे. सामूहिक प्रयत्नातून सु-संपर्कीत भारत तयार करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात रस्ते, महामार्ग, जलमार्ग आणि हवाई मार्गांच्या विस्तारातून संपर्क सुविधा वाढल्या आहेत. यामुळे जागतिक व्यापारात भारताने आपली स्टीलची खूपच मजबूत बनवली आहे. भारत आज जागतिक पुरवठा साखळीचा महत्त्वपूर्ण हितधारक बनत आहे. भारताचे हेच वाढते सामर्थ्य आपल्या आर्थिक विकासाचा मुख्य पाया आहे. हेच सामर्थ्य भारताला जलद गतीने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. तामिळनाडू भारताच्या याच सामर्थ्याला आणखी विकसित करीत आहे याचा मला आनंद वाटतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना व्ही.ओ. चिंदबरनार बंदराच्या नव्या टर्मिनलसाठी खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद!
वण्क्कम्!