नमस्कार, पश्चिम बंगालच्या आदरणीय मुख्यमंत्री सुश्री ममताजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनसुख मांडवियाजी, सुभाष सरकारजी, शांतनु ठाकुरजी, जॉन बरलाजी, नीतीश प्रमाणिकजी, विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारीजी, सीएनसीआय कोलकाताच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळातील सदस्यगण, आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्व समर्पित सहकारी, अन्य महानुभाव, बंधूंनो आणि भगिनींनो!
देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहचवण्याचा राष्ट्रीय संकल्प दृढ करत आज आपण आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या या दुसऱ्या संकुलामुळे पश्चिम बंगालमधील अनेक नागरिकांची मोठी सोय झाली आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती कर्करोगाशी झुंज देत आहे अशा, गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबांना यामुळे विशेषकरुन मोठा दिलासा मिळेल. कोलकाता येथील या आधुनिक रुग्णालयामुळे कर्करोगाशी संबंधित उपचार, शस्त्रक्रिया आणि त्यासंबंधी उपचार आता अधिक सुलभ होणार आहेत.
मित्रांनो,
देशाने आजच आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. देशाने वर्षाची सुरुवात १५ ते १८ वयोगटातील किशोरांच्या लसीकरणाने केली. त्याचवेळी, वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, भारत 150 कोटी- 1.5 अब्ज लसी मात्रांचा ऐतिहासिक टप्पाही गाठत आहे. 150 कोटी लसमात्रा, तेही वर्षभरासारख्या कमी काळात! आकडेवारीचा विचार करता ही खूप मोठी संख्या आहे, जगातील बहुतांश मोठ्या देशांसाठीही ही संख्या आश्चर्यापेक्षा कमी नाही, परंतु भारतासाठी ही 130 कोटी देशवासियांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. भारतासाठी, हे नवीन इच्छाशक्तीचे प्रतीक आहे ज्यामध्ये अशक्य ते शक्य करण्यासाठी काहीही करण्याची हिंमत आहे. भारतासाठी ते आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे, स्वाभिमानाचे प्रतीक आहे! आज या निमित्ताने मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आपला हा लसीकरण कार्यक्रम कोरोनाविरुद्धच्या लढाईत तितकाच महत्त्वाचा आहे जितका हा छुपा कोरोना विषाणू धोकादायक आहे. आज पुन्हा एकदा जगाला कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन प्रकाराचा सामना करावा लागत आहे. या नवीन प्रकारामुळे आपल्या देशातही रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे 150 कोटी लसमात्रांचे हे कवच आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आज, भारतातील 90 टक्क्यांहून अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीची एक मात्रा देण्यात आली आहे. अवघ्या 5 दिवसांत 1.5 कोटींहून अधिक मुलांना लसमात्रा देण्यात आल्या आहेत. हे यश संपूर्ण देशाचे आहे, प्रत्येक सरकारचे आहे. या यशाबद्दल मी विशेषतः देशातील शास्त्रज्ञ, लस उत्पादक, आरोग्य क्षेत्रातील आमचे सहकारी यांचे आभार मानतो. सर्वांच्या प्रयत्नांमुळेच देशाने हा संकल्प शिखरापर्यंत नेला आहे, ज्याची सुरुवात आपण शून्यातून केली होती.
मित्रांनो,
100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीविरुद्धच्या लढाईत, "सबका प्रयास" ही भावना देशाला बळ देत आहे. कोविडशी लढण्यासाठी मूलभूत आणि महत्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करण्यापासून ते जगातील सर्वात मोठ्या, जलद, मोफत लसीकरण मोहिमेपर्यंत, ही शक्ती आज सर्वत्र दिसून येते. भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिक विविधता असलेल्या आपल्या देशात, चाचणीपासून लसीकरणापर्यंत एवढी मोठी पायाभूत सुविधा आपण ज्या वेगाने विकसित केली आहे, ते संपूर्ण जगासमोर एक आदर्श निर्माण करत आहे.
मित्रांनो,
अंधार जितका गडद तितके प्रकाशाचे महत्त्व जास्त. आव्हाने जितकी मोठी तितके धैर्य महत्वाचे. आणि लढाई जितकी कठीण तितकी शस्त्रे महत्त्वाची असतात. आतापर्यंत, सरकारकडून पश्चिम बंगालला कोरोना लसीच्या सुमारे 11 कोटी मात्रा मोफत देण्यात आल्या आहेत. बंगालला दीड हजारहून अधिक व्हेंटिलेटर, नऊ हजारांहून अधिक नवीन ऑक्सिजन सिलिंडरही देण्यात आले आहेत. 49 पीएसए नवीन ऑक्सिजन प्लांट देखील कार्यरत झाले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे पश्चिम बंगालच्या लोकांना मदत करतील.
मित्रांनो,
चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या संकुलातील देशबंधू चित्तरंजन दासजी आणि महर्षी सुश्रुत यांचे पुतळे आपल्या सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहेत. देशबंधूजी म्हणायचे – मला या देशात पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे जेणेकरून मी या देशासाठी जगू शकेन, त्यासाठी काम करू शकेन.
महर्षी सुश्रुत हे आरोग्य क्षेत्रातील प्राचीन भारतीय ज्ञानाचे प्रतिबिंब आहेत. अशाच प्रेरणांमुळे, देशवासीयांच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण उपायांसाठी अनेक वर्षांपासून सर्वांगीण उपाय शोधले जात आहेत. सर्वांचे प्रयत्न, या भावनेने आज देशातील आरोग्य पायाभूत सुविधा, आरोग्य नियोजन आणि त्यांना राष्ट्रीय संकल्पांशी जोडण्याचे काम वेगाने होत आहे. आरोग्य क्षेत्रासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच भविष्य सुरक्षित करण्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत. आजारांना कारणीभूत घटक दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजारपणात उपचार स्वस्त आणि सुलभ व्हावेत हे आमच्या सरकारचे लक्ष्य आहे. आणि त्याच वेळी, डॉक्टरांची क्षमता आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांचा विस्तार करून आरोग्य सेवा अधिक उत्तम केल्या जात आहेत.
मित्रांनो,
म्हणूनच, आपल्या आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी, आज देश प्रतिबंधात्मक आरोग्य, परवडणारी आरोग्य सेवा, पुरवठा साखळीत हस्तक्षेप आणि युद्धपातळीवरील अभियानांना चालना देत आहे. योग, आयुर्वेद, फिट इंडिया मूव्हमेंट, सार्वत्रिक लसीकरण यांसारख्या माध्यमांद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा प्रचार केला जात आहे. स्वच्छ भारत मिशन आणि हर घर जल यासारख्या राष्ट्रीय योजनांमुळे गावांना आणि गरीब कुटुंबांना अनेक आजारांपासून वाचवण्यात मदत होत आहे. आर्सेनिक आणि इतर कारणांमुळे प्रदूषित होणारे पाणी हे देशातील अनेक राज्यांमध्ये कर्करोगासाठीही एक प्रमुख कारण आहे. हर घर जल अभियानामुळे ही समस्या सोडवण्यात खूप मदत होत आहे.
मित्रांनो,
बऱ्याच काळापासून आपल्या इथे गरीब आणि कनिष्ठ मध्यम वर्ग, आरोग्यसुविधां पासून वंचित राहिले कारण एक तर उपचार सुलभ नव्हते, किंवा खूप महाग होते. जर का गरीबाला गंभीर आजार झाला तर, त्याच्यापुढे दोनच पर्याय असायचे. एक तर कर्ज काढा नाही तर आपले घर किंवा जमीन विका. नाहीतर उपचाराचा विचारच रहीत करा. कर्करोग हा आजारच असा आहे त्याचे नाव ऐकताच गरीब आणि मध्यम वर्ग हवालदिल होतो. गरिबांना याच दुष्टचक्रातून, याच चिंतेतून बाहेर काढण्यासाठी देश स्वस्त आणि सुलभ उपचारांसाठी निरंतर पावले उचलत आहे.
गेल्या काही वर्षांत, कर्करोगाच्या उपचारांसाठी आवश्यक औषधांच्या किंमतीं लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्या आहेत. आताच मनसुख भाई यांनी याबद्दल सविस्तर सांगितले. पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात स्थापन झालेल्या 8 हजारांहून अधिक जनऔषधी केंद्रांमध्ये औषधे आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध करून दिली आहे या केंद्रांमध्ये कर्करोगाच्या उपचाराची 50 हून अधिक औषधेही अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत. कर्करोगावरील औषधे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी देशभरात विशेष अमृत स्टोअर्स सुरू आहेत. गरीबांना स्वस्त दरात उपचार मिळावेत हे सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, हा सेवाभाव ,सरकारची ही संवेदनशीलता सहाय्य करत आहे.
सरकारने 500 हून अधिक औषधांच्या किमतीं नियंत्रित ठेवल्या आहेत. यामुळे रुग्णांची दरवर्षी 3000 कोटींहून अधिक रुपयांची बचत होत आहे. कोरोनरी स्टेंटच्या किंमती निश्चित केल्यामुळे हृदयरोगाच्या रुग्णांचीही दरवर्षी 4500 कोटी रुपयांहून अधिक बचत होत आहे.गुडघे प्रत्यारोपणाचा खर्च कमी करण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फायदा आपल्या ज्येष्ठ नागरिकांना , आपल्या वृद्ध माता-भगिनी, पुरुषांना झाला आहे.त्यामुळे वृद्ध रुग्णांची दरवर्षी 1500 कोटी रुपयांची बचत होत आहे. सरकारच्या वतीने सुरु असलेल्या पंतप्रधान राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमाच्या मदतीने, 12 लाख गरीब रुग्णांना विनामूल्य डायलिसिसची सुविधा मिळाली आहे. यामुळे त्यांचीही 520 कोटींहून अधिक रुपयांची बचत झाली आहे.
मित्रांनो,
आज आयुष्मान भारत योजना किफायतशीर आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेच्या बाबतीत जागतिक मापदंड बनत आहे. पीएम -जेएवाय अंतर्गत, देशभरातील रुग्णालयांमध्ये 2 कोटी 60 लाखांहून अधिक रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत. जर ही योजना नसती तर या रुग्णांना त्यांच्या उपचारांवर अंदाजे 50 ते 60 हजार कोटी रुपये खर्च करावे लागले असते.
मित्रांनो,
17 लाखांहून अधिक कर्करोग रुग्णांनाही आयुष्मान भारतचा फायदा झाला आहे.केमोथेरपी असो, रेडिओथेरपी असो की शस्त्रक्रिया असो, या रुग्णांना रुग्णालयात सर्व सुविधा विनामूल्य मिळतात.सरकारने हे प्रयत्न जर केले नसते तर किती गरीबांचे जीवन संकटात सापडले असते किंवा किती कुटुंबे कर्जाच्या दुष्टचक्रात अडकली असती, याची कल्पना करा.
मित्रांनो,
आयुष्मान भारत हे केवळ मोफत उपचाराचेच साधन नाही, तर यामुळे आजाराचे लवकर निदान, लवकर उपचार यासाठी हे खूप प्रभावी ठरत आहेत. कर्करोगासारख्या सर्व गंभीर आजारांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे.नाहीतर आपल्या येथे बहुतेक रुग्णांमध्ये शेवटच्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाले. त्यामुळे कर्करोगावर इलाज शक्य झाला नाही. या समस्येवर मात करण्यासाठी 30 वर्षांवरील नागरिकांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगाच्या तपासणीवर भर दिला जात आहे.आयुष्मान भारत योजनेंतर्गत गावोगावी उभारली जाणारी हजारो आरोग्य आणि निरामयता केंद्रे आज यासाठी खूप उपयुक्त ठरत आहेत.बंगालमध्येही अशी 5 हजारांहून अधिक आरोग्य आणि निरामयता केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. देशभरात सुमारे 15 कोटी लोकांची तोंडाची , स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली आहे.त्यांच्या उपचारासाठी हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना गावपातळीवर विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
मित्रांनो,
आणखी एक मोठी समस्या आपल्या आरोग्य क्षेत्रासमोर आहे ती म्हणजे – मागणी आणि पुरवठा यातील मोठी तफावत. डॉक्टर आणि इतर आरोग्य व्यावसायिक असोत किंवा आरोग्याच्या पायाभूत सुविधा असोत मागणी आणि पुरवठा यांची ही तफावत भरून काढण्यासाठी आज देशात मिशन मोडवर काम केले जात आहे. वर्ष 2014 पर्यंत देशात पदवी आणि पदव्युत्तर जागांची संख्या सुमारे 90 हजार होती. गेल्या 7 वर्षात यात 60 हजार नवीन जागांची भर पडली आहे.2014 मध्ये आपल्या इथे फक्त 6 एम्स होती, आज देश 22 एम्सचे मजबूत जाळे तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय असावे यादृष्टीने काम केले जात आहे.या सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचाराच्या सुविधा जोडल्या जात आहेत.देशातील कर्करोग उपचार पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी 19 राज्य कर्करोग संस्था आणि 20 तृतीय स्तरावरील कर्करोग उपचार केंद्रांनाही मंजुरी देण्यात आली आहे.30 हून अधिक संस्थांमध्ये काम वेगात सुरू आहे.पश्चिम बंगालमध्येही आता कोलकाता, मुर्शिदाबाद आणि वर्धमानच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांवर आता आणखी सहजतेने उपचार केले जातील.आपले आरोग्यमंत्री मनसुख भाई यांनी यासंदर्भात सविस्तर सांगितले आहे. या सर्व प्रयत्नांचा मोठा परिणाम आपल्या देशातील डॉक्टरांच्या उपलब्धतेवर होईल. गेल्या 70 वर्षात देशात जितके डॉक्टर तयार झाले , तितके डॉक्टर येत्या 10 वर्षात देशात बनणार आहेत.
मित्रांनो,
गेल्या वर्षी देशात सुरू झालेली दोन मोठी राष्ट्रीय अभियानेही भारताच्या आरोग्य क्षेत्राच्या आधुनिकीकरणात मोठी मदत करतील.आयुष्मान भारत - डिजिटल आरोग्य अभियानामुळे देशवासीयांच्या उपचारासाठीच्या सुविधा वाढणार आहे.रुग्णाच्या वैद्यकीय इतिहासाच्या डिजिटल नोंदीमुळे उपचार सोपे आणि प्रभावी होतील, किरकोळ आजारांसाठी रुग्णालयात वारंवार जाण्याचा त्रास कमी होईल आणि उपचारांच्या अतिरिक्त खर्चापासूनही नागरिकांची सुटका होईल. त्याचप्रमाणे, आयुष्मान भारत - पायाभूत सुविधा अभियानाच्या माध्यमातून गंभीर आजारासंदर्भातील आरोग्य सेवेशी संबंधित वैद्यकीय पायाभूत सुविधा आता मोठ्या शहरांसह जिल्हा आणि तालुका स्तरावर उपलब्ध असतील.या योजनेंतर्गत पश्चिम बंगालला पाच वर्षांत अडीच हजार कोटींहून अधिक रुपयांचे सहाय्य प्राप्त होईल हे सुनिश्चित करण्यात आले आहे. यासह राज्यभरात शेकडो आरोग्य उपकेंद्रे उभारली जातील, सुमारे 1 हजार नागरी आरोग्य व निरामयता केंद्रे कार्यान्वित होतील, डझनभर जिल्हा एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सुरू केल्या जातील.आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी शेकडो क्रिटिकल केअर खाटांची नवीन क्षमता निर्माण केली जाईल. यांसारख्या प्रयत्नांमुळे भविष्यात आपल्याला कोरोनासारख्या महामारीविरोधात अधिक चांगल्या पद्धतीने लढा देता येईल. भारताला निरोगी आणि सक्षम बनवण्याची ही मोहीम अशीच सुरु राहील.मी पुन्हा सर्व नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी दक्ष राहावे, आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मी ,पुन्हा एकदा या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. मी तुम्हा सर्वाना अनेक अनेक शुभेच्छा देतो ! खूप खूप धन्यवाद !!