उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकुर जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी निशीथ प्रामाणिकजी, उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठकजी, इतर उपस्थित मान्यवर आणि ‘खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय स्पर्धांमधे सहभागी झालेले सर्व खेळाडू, आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन !. आज उत्तरप्रदेश, देशभरातील युवा प्रतिभेचा संगम ठरला आहे. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जे चार हजार खेळाडू इथे आले आहेत, त्यांच्यापैकी बहुतांश, वेगवेगळ्या राज्यांमधील आहेत. वेगवेगळ्या प्रदेशातील आहेत. मी उत्तरप्रदेशाचा खासदार आहे, उत्तरप्रदेशचा लोकप्रतिनिधी आहे. म्हणूनच, उत्तरप्रदेशचा खासदार म्हणून, ‘खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धे’ साठी आलेल्या आणि येणार असलेल्या सर्व खेळाडूंचे मी विशेष स्वागत करतो.
या स्पर्धेचा समारोप काशीमध्ये आयोजित केला जाणार आहे. काशी चा खासदार म्हणून मी त्याविषयी अत्यंत उत्साही आहे. आज जेव्हा आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यावेळी तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेचे आयोजन होणे ही एक विशेष बाब आहे. ही स्पर्धा देशातल्या युवकांमध्ये संघभावना वाढवण्याचे, एक भारत-श्रेष्ठ भारत ही भावना वाढवण्याचे एक उत्तम माध्यम ठरली आहे. या खेळांच्या निमित्ताने, विविध भागांतून आलेल्या युवकांची परस्परांशी भेट होईल, मैत्री होईल. उत्तरप्रदेशातील वेगवेगळ्या शहरात होत असलेल्या सामन्यांमुळे युवकांमधील परस्पर संबंध वाढतील, मला पूर्ण विश्वास आहे, की जे युवा खेळाडू ‘खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांमधे भाग घेण्यासाठी आले आहेत, ते असा अनुभव घेऊन जातील, जो आयुष्यभर त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण असेल, मी तुम्हा सर्वांना येणाऱ्या सर्व सामन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
गेल्या नऊ वर्षात, भारतात खेळाचे एक नवे युग सुरु झाले आहे. हे नवे युग, जगात भारताला केवळ एक मोठी क्रीडा शक्ती बनवण्यावर भर देत नाही, तर खेळाच्या माध्यमातून समाजाच्या सक्षमीकरणाचेही हे नवे युग आहे.एक काळ असा होता, जेव्हा आपल्या देशात खेळांविषयी एक उदासिनतेचाच भाव होता. क्रीडाक्षेत्र देखील एक करियर असू शकते, असा विचार खूप कमी लोक करत असत. आणि याच कारणांमुळे, क्रीडा क्षेत्राला सरकारकडून जितके पाठबळ आणि सहकार्य मिळायला हवे होते, तेवढे मिळाले नाही. क्रीडाविषयक पायाभूत सुविधा वाढवण्याकडेही लक्ष दिले गेले नाही. म्हणूनच, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांसाठी, गाव-खेड्यातल्या मुलांसाठी खेळात प्रगती करणे कठीण होते. समाजात अशीही भावना वाढत चालली होती, की खेळ तर केवळ फावला वेळ घालवण्यासाठी आहेत. बहुतांश पालकांना पण असं वाटत होतं, की मुलांनी अशा व्यवसायात जायला हवे जिथे त्यांचे आयुष्य लवकर स्थिरावू शकेल. कधी कधी मी विचार करतो, की आयुष्यात स्थिरावण्याच्या या मानसिकतेमुळे, देशाने किती तरी खेळाडू गमावले असतील. मात्र आज मला आनंद आहे, की खेळांप्रती आई-वडील आणि समाजाच्या दृष्टिकोनातही आता बदल झाला आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी, एक आकर्षक व्यवसाय आणि करियर म्हणून खेळांकडे बघितले जात आहे. आणि ही मानसिकता रुजवण्यात, ‘खेलो इंडिया’ ने मोठी भूमिका बजावली आहे.
मित्रांनो,
खेळांविषयी आधीच्या सरकारांचा जो दृष्टिकोन होता, त्याचा एक जिवंत पुरावा म्हणजे, राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धांच्या काळात झालेला घोटाळा होता. जी स्पर्धा, जगभरात भारताच्या नावाचा दबदबा तयार करण्यासाठी उपयुक्त ठरली असती, त्यातच भ्रष्टाचार करण्यात आला. आपल्या गांव-खेड्यातील मुलांना खेळण्याची संधी मिळावी, यासाठी आधी एक योजना राबवली जात असे- पंचायत युवा क्रीडा आणि खेल अभियान. नंतर त्याचे नाव बदलून राजीव गांधी खेल अभियान असे करण्यात आले. या अभियानात देखील, भर फक्त नाव बदलण्यावर दिला गेला. देशात क्रीडा विषयक पायाभूत सुविधा वाढवण्यावर, तेवढा भर देण्यात आला नाही.
आधी गांव असो की शहर असो, प्रत्येक खेळाडूसमोर सर्वात मोठे आव्हान हे होते, की त्याला त्याच्या खेळाच्या सरावासाठी घरापासून खूप दूर जावे लागत असे. यात खेळाडूंचा खूप वेळ जात असेल. कित्येकदा तर खेळाडूना दुसऱ्या शहरात जाऊन राहावे लागत असे. आणि खूप युवकांना यामुळे आपली ही आवड, हे ध्येय सोडून देण्याची वेळ येत असे. आमच्या सरकारने, आता खेळाडूंच्या या कित्येक दशकांपासूनच्या आव्हानावर देखील तोडगा काढला आहे. शहरी क्रीडा पायाभूत सुविधांसाठी जी योजना होती, त्यातही आधीच्या सरकारने सहा वर्षात, केवळ 300 कोटी रुपये खर्च केले. तर खेलो इंडिया अभियानाअंतर्गत, आमच्या सरकारने क्रीडाविषयक पायाभूत सुविधांसाठी आतापर्यंत सुमारे 3 कोटी रुपये खर्च केले आहेत. वाढत्या क्रीडाविषयक पायाभूत सुविधांमुळे, आता जास्तीत जास्त खेळाडूंना आपली आवड जोपासणे सोपे झाले आहे. मला समाधान आहे, की आतापर्यंत खेलो इंडिया स्पर्धेत 30 हजार पेक्षा अधिक अॅथलीट्सनी सहभाग घेतला आहे. यापैकी दीड हजार अॅथलीट्स ची निवड करत त्यांना आर्थिक मदत केली जात आहे. त्यांना आधुनिक क्रीडा अकादमीमध्ये, उच्च दर्जाचे प्रशिक्षणही दिले जात आहे. 9 वर्षांपूर्वीच्या तुलनेत, यावर्षी अर्थसंकल्पात क्रीडाक्षेत्रासाठीची तरतूद, तिपटीने वाढवण्यात आली आहे.
आज गावांमध्येही क्रीडा विषयक आधुनिक पायाभूत सुविधाही विकसित होत आहेत. देशाच्या दूरवरच्या भागातही आता उत्तम मैदाने, आधुनिक स्टेडियम, आधुनिक प्रशिक्षण सुविधा निर्माण केल्या जात आहेत. उत्तर प्रदेशातही क्रीडा प्रकल्पांवर हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. लखनऊमध्ये पूर्वीपासून असलेल्या सुविधांचा विस्तार करण्यात आला आहे. आज वाराणसीतील सिग्रा स्टेडियम आधुनिक रूपात समोर येत आहे. सुमारे 400 कोटी रुपये खर्च करून तरुणांसाठी येथे आधुनिक सुविधा उभारल्या जात आहेत. खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत लालपूरमधील सिंथेटिक हॉकी मैदान, गोरखपूरच्या वीर बहादूर सिंग क्रीडा महाविद्यालयातील बहुउद्देशी सभागृह , मेरठमधील सिंथेटिक हॉकी मैदान आणि सहारनपूरमध्ये सिंथेटिक रनिंग ट्रॅकसाठी मदत देण्यात आली आहे. आगामी काळात, खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत अशाच प्रकारच्या सुविधांचा आणखी विस्तार केला जाईल.
मित्रहो,
खेळाडूंना जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी यावरही आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. एखादा खेळाडू क्रीडा स्पर्धांमध्ये जितका जास्त भाग घेतो, तितकाच त्यांना फायदा होतो, तितकीच त्यांची प्रतिभा उजळून निघते. आपली तयारी किती आहे, आपला खेळ कुठे सुधारण्याची गरज आहे, हे देखील त्यांना समजते. आपल्या उणिवा काय आहेत, आपल्या चुका काय आहेत, कुठली आव्हाने आहेत, काही वर्षांपूर्वी खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामागे देखील हे एक प्रमुख कारण होते. आज त्यांचा विस्तार खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांपर्यंत झाला आहे. देशातील हजारो खेळाडू या उपक्रमांतर्गत स्पर्धेत भाग घेत आहेत आणि आपल्या प्रतिभेच्या जोरावर पुढे जात आहेत. मला आनंद आहे की भारतीय जनता पक्षाचे अनेक खासदार , खासदार क्रीडा स्पर्धा चालवतात. त्यात हजारोंच्या संख्येने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात युवक, मुले आणि मुली खेळात सहभागी होतात. आज त्याचे सुखद परिणामही देशाला मिळत आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यावरून आज आपल्या भारताच्या युवा खेळाडूंचा आत्मविश्वास किती उंचावला आहे हे दिसून येते.
मित्रहो,
खेळाशी निगडीत कौशल्य असो किंवा खेळाडूंना सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी इतर विषय असो, सरकार पावलोपावली खेळाडूंच्या पाठीशी उभे आहे. आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खेळ हा विषय म्हणून शिकवण्याचा प्रस्ताव आहे. खेळ हा आता अभ्यासक्रमाचा भाग होणार आहे. देशातील पहिल्या राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या निर्मितीमुळे यात आणखी मदत होणार आहे. आता राज्यांमध्येही क्रीडा विषयक उच्च शिक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश कौतुकास्पद काम करत आहे. मेरठमधील मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाचे उदाहरण आपल्यासमोर आहे. याशिवाय आज देशभरात 1000 खेलो इंडिया केंद्रेही स्थापन केली जात आहेत. सुमारे 2 डझन राष्ट्रीय सर्वोत्कृष्टता केंद्रेही उघडण्यात आली आहेत. कामगिरी सुधारण्यासाठी या केंद्रांवर प्रशिक्षण आणि क्रीडा विज्ञान संबंधी सहाय्य दिले जात आहे. खेलो इंडियाने भारताच्या पारंपारिक खेळांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. गटका, मल्लखांब , थांग-टा, कलरीपयट्टू आणि योगासन यांसारख्या क्रीडा प्रकारांना प्रोत्साहित करण्यासाठी देखील आमचे सरकार शिष्यवृत्ती देत आहे.
मित्रहो,
खेलो इंडिया कार्यक्रमाचा आणखी एक उत्साहवर्धक परिणाम म्हणजे मुलींचा सहभाग वाढला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये खेलो इंडिया महिला लीगचे आयोजन केले जात आहे. यामध्ये आतापर्यंत विविध वयोगटातील सुमारे 23 हजार महिला खेळाडूंनी भाग घेतल्याचे मला सांगण्यात आले. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्येही मोठ्या संख्येने महिला खेळाडूंचा सहभाग आहे. मी या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या मुलींना खास शुभेच्छा देतो.
मित्रहो,
तुम्ही सर्व युवा मित्र एका अशा वेळी खेळाच्या मैदानात उतरला आहात , जो निश्चितपणे भारताचा काळ आहे. तुमची प्रतिभा, तुमची प्रगती यातच भारताची प्रगती आहे. तुम्हीच भविष्यातील चॅम्पियन आहात. तिरंग्याची शान वाढवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवर आहे. म्हणूनच आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपण अनेकदा खिलाडू वृत्ती - सांघिक भावनेबद्दल बोलतो. शेवटी ही खिलाडूवृत्ती म्हणजे काय आहे ? ती केवळ पराभव आणि विजय स्वीकारण्यापुरती मर्यादित आहे का? ती केवळ टीमवर्कपुरती मर्यादित आहे का? खिलाडूवृत्तीचा अर्थ यापेक्षाही विस्तृत आहे, व्यापक आहे. खेळ निहित स्वार्थापलिकडे जाऊन सामूहिक यशासाठी प्रेरणा देतो.
खेळ आपल्याला मर्यादेचे पालन करण्यास शिकवतो, नियमांनुसार चालण्यास शिकवतो. मैदानात अनेकदा परिस्थिती तुमच्या विरुद्ध असू शकते. असेही होऊ शकते की कधीकधी निर्णय तुमच्या विरोधात देखील जातील. मात्र खेळाडू आपला संयम गमावत नाही, नेहमी नियमांशी बांधील असतो. नियम आणि कायद्यांच्या चौकटीत राहून धैर्याने प्रतिस्पर्ध्यावर मात कशी करायची, हीच खेळाडूची ओळख असते. एक विजेता तेव्हाच महान खेळाडू बनतो जेव्हा तो नेहमी खिलाडूवृत्ती आणि मर्यादेचे पालन करतो. एक विजेता तेव्हाच महान खेळाडू बनतो जेव्हा समाज त्याच्या प्रत्येक आचरणातून प्रेरणा घेतो. त्यामुळे तुम्ही सर्व तरुण मित्रांनी तुमच्या खेळात या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. मला खात्री आहे, तुम्हीही या विद्यापीठ स्तरीय स्पर्धांमध्ये खेळाल आणि उत्तम कामगिरी कराल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! खूप खेळा, खूप पुढे जा ! धन्यवाद !