जय सोमनाथ.
कार्यक्रमाला उपस्थित गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्र भाई पटेल, प्रदेश भाजप अध्यक्ष आणि संसदेतील माझे सहकारी श्री सी आर पाटील जी, गुजरात सरकारमधील मंत्री, पूर्णेश मोदी, अरविंद रायानी, देवाभाई मालम, जुनागढचे खासदार राजेश चुडासामा, सोमनाथ मंदिर न्यासाचे अन्य सदस्य, इतर गणमान्य व्यक्ती, बंधू आणि भगिनींनो!
भगवान सोमनाथाच्या पूजेमध्ये आपल्या शास्त्रात सांगितले आहे-
भक्तिप्रदानाय कृपा अवतीर्णम्, तम सोमनाथम् शरणम् प्रपद्ये।
म्हणजेच भगवान सोमनाथाची कृपा होते तेव्हा कृपेचे भांडार उघडते. ज्या पद्धतीने येथे एकामागून एक विकासकामे होत आहेत, ती सोमनाथदादांची विशेष कृपा आहे. सोमनाथ न्यासाशी जोडला गेल्यावर मला खूप काही घडताना दिसत आहे, हे मी माझे सौभाग्य समजतो. काही महिन्यांपूर्वी याठिकाणी प्रदर्शन दालन आणि प्रदक्षिणामार्गासह अनेक विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. पार्वती मंदिराची पायाभरणीही झाली आणि आज सोमनाथ सर्किट हाऊसचेही उद्घाटन होत आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी मी गुजरात सरकार, सोमनाथ मंदिर न्यास आणि तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
मित्रांनो,
ही जी सर्किट हाऊसची कमतरता होती, सर्किट हाऊस नसताना बाहेरून येणाऱ्यांच्या निवासाच्या व्यवस्थेबाबत मंदिर न्यासावर मोठा ताण होता. आता हे सर्किट हाऊस बांधल्यानंतर, स्वतंत्र व्यवस्था झाल्यानंतर, आता ती देखील मंदिरापासून फार दूर अंतरावर नाही आणि त्यामुळे मंदिरावरचा ताणही कमी झाला आहे. आता ते त्यांच्या मंदिराच्या कामात अधिक लक्ष केंद्रित करू शकणार आहेत. मला सांगण्यात आले आहे की या इमारतीची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की येथे राहणाऱ्या लोकांना समुद्रही पाहायला मिळेल. म्हणजे इथे लोक शांतपणे आपल्या खोल्यांमध्ये बसतील तेव्हा त्यांना समुद्राच्या लाटाही दिसतील आणि सोमनाथचे शिखरही दिसेल! समुद्राच्या लाटांमध्ये, सोमनाथच्या शिखरावर, काळाच्या तडाख्यांना भेदून अभिमानाने उभी असलेली भारताची चेतनाही दिसेल. या वाढत्या सुविधांमुळे, दीव असो, गीर असो, द्वारका असो, वेद द्वारका असो, भविष्यात जो कोणी या संपूर्ण प्रदेशाला भेट देईल, सोमनाथ एक प्रकारे संपूर्ण पर्यटन क्षेत्राचा केंद्रबिंदू बनेल. अतिशय महत्त्वाचे ऊर्जा केंद्र बनेल.
मित्रांनो,
जेव्हा आपण आपल्या सभ्यतेचा आव्हानांनी भरलेला प्रवास पाहतो तेव्हा आपल्याला शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत भारताने काय भोगले आहे याची कल्पना येते. ज्या परिस्थितीत सोमनाथ मंदिराचा विध्वंस झाला आणि ज्या परिस्थितीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून मंदिराचा जीर्णोद्धार झाला, या दोन्हीतून आपल्यासाठी खूप मोठा संदेश मिळतो. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशाच्या भूतकाळातून आपल्याला जो बोध घ्यायचा आहे त्याचे महत्वाचे केंद्र म्हणजे सोमनाथसारखी श्रद्धा आणि संस्कृतीची ठिकाणे आहेत.
मित्रांनो,
विविध राज्यातून, देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी सुमारे एक कोटी भाविक सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी येतात. जेव्हा हे भक्त इथून परत जातात, तेव्हा ते अनेक नवीन अनुभव, अनेक नवीन कल्पना, नवीन विचार घेऊन जातात. त्यामुळे प्रवास जितका महत्त्वाचा असतो, तितकाच महत्त्वाचा त्यांचा अनुभव असतो. विशेषत: तीर्थयात्रेत, आपले मन भगवंतामध्ये स्थिर असावे, प्रवासाशी संबंधित इतर समस्यांमध्ये संघर्ष करावा लागू नये, अडकायला लागू नये अशी आपली इच्छा असते. शासन आणि संस्थांच्या प्रयत्नांनी अनेक तीर्थक्षेत्रे कशी सुशोभित केली आहेत, याचेही जिवंत उदाहरण म्हणजे सोमनाथ मंदिर. आज येथे येणाऱ्या भाविकांसाठी चांगली व्यवस्था केली जात आहे, रस्ते, वाहतुकीच्या सुविधांमध्ये वाढ होत आहे. याठिकाणी उत्तम पर्यटनस्थळ विकसित करण्यात आले आहे, पार्किंगची सोय करण्यात आली आहे, पर्यटक सुविधा केंद्र बांधण्यात आले आहे, स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापनाची आधुनिक व्यवस्थाही करण्यात आली आहे. भव्य यात्रेकरू प्लाझा आणि संकुलाचा प्रस्तावही अंतिम टप्प्यात आहे. आम्हाला माहीत आहे, आत्ताच आमचे पूर्णेश भाई पण वर्णन करत होते. असाच विकास आणि प्रवासी सुविधा माता अंबाजी मंदिरात निर्माण करण्याचा विचार सुरू आहे. द्वारकाधीश मंदिर, रुक्मिणी मंदिर, गोमतीघाट यासह अनेक विकासकामे आम्ही यापूर्वीच पूर्ण केली आहेत. ते प्रवाशांना सुविधाही देत आहेत आणि गुजरातची सांस्कृतिक ओळखही मजबूत करत आहेत.
या कामगिरी दरम्यान, मी या निमित्ताने गुजरातमधील सर्व धार्मिक आणि सामाजिक संघटनांचे आभार मानू इच्छितो, अभिनंदन करू इच्छितो. तुमच्या वैयक्तिक पातळीवर ज्या प्रकारे विकास आणि सेवा कार्य अविरतपणे केले जात आहे, ते सर्व माझ्या दृष्टीकोनातून 'सबका प्रयास' या भावनेचे उत्तम उदाहरण आहे. सोमनाथ मंदिर न्यासाने ज्या प्रकारे कोरोनाच्या संकटात प्रवाशांची काळजी घेतली, समाजाची जबाबदारी उचलली, त्यात जीव हाच शिव असल्याची भावना प्रतीत होते.
मित्रांनो,
आपण जगातील अनेक देशांबद्दल ऐकतो जे आपल्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे योगदान किती मोठे आहे हे ठळकपणे दाखवतात. आमच्या इथे तर प्रत्येक राज्यात, प्रत्येक प्रदेशात, जगातल्या प्रत्येक देशात, जितकी शक्ती आहे तितकीच आमच्या प्रत्येक राज्यात आहे. अशा अनंत शक्यता आहेत. कोणत्याही राज्याचं नाव घेतलं की आधी काय मनात येतं? गुजरातचे नाव घेतले कि, सोमनाथ, द्वारका, स्टॅच्यू ऑफ युनिटी, धोलावीरा, कच्छचे रण अशी अद्भुत ठिकाणे आठवतात. उत्तर प्रदेशचे नाव घेतले तर अयोध्या, मथुरा, काशी, प्रयाग, कुशीनगर, विंध्याचल अशी अनेक नावे आपल्या मनःपटलावर विराजमान होतात. या सर्व ठिकाणी भेट द्यायला हवी, असे सर्वसामान्य माणसाला नेहमीच वाटत असते. उत्तराखंड ही देवभूमी आहे. बद्रीनाथ जी, केदारनाथ जी तिथेच आहेत. हिमाचल प्रदेशाविषयी बोलायचे झाले तर माता ज्वालादेवी तिथेच आहे, माता नयनादेवी तिथेच आहे, संपूर्ण ईशान्य दिव्य आणि नैसर्गिक तेजोमय आहे. अशाचप्रकारे रामेश्वरमला जाण्यासाठी तामिळनाडू, पुरीसाठी ओडिशा, तिरुपती बालाजीसाठी आंध्र प्रदेश, सिद्धिविनायकासाठी महाराष्ट्र, सबरीमालासाठी केरळचे नाव येते. तुम्ही कोणत्याही राज्याचे नाव घ्या, अनेक तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन केंद्रे आपल्या लक्षात येतील. ही ठिकाणे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे, एक भारत, श्रेष्ठ भारताच्या भावनेचे प्रतिनिधित्व करतात. या ठिकाणांना भेटी दिल्याने राष्ट्रीय एकात्मता वाढते, आज देश या ठिकाणांना समृद्धीचे एक मजबूत स्रोत म्हणून पाहत आहे. त्यांच्या विकासामुळे आपण मोठ्या क्षेत्राच्या विकासाला गती देऊ शकतो.
मित्रांनो,
गेल्या 7 वर्षांत देशाने पर्यटनाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. आज पर्यटन केंद्रांचा विकास हा केवळ सरकारी योजनेचा भाग नसून लोकसहभागाची मोहीम आहे. देशातील वारसा स्थळे, आपल्या सांस्कृतिक वारशाचा विकास हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पूर्वी दुर्लक्षित असलेली वारसा स्थळे आता सर्वांच्या प्रयत्नातून विकसित होत आहेत. यात खासगी क्षेत्रही सहकार्य करण्यासाठी पुढे आले आहे. अतुल्य भारत आणि देखो अपना देश यांसारख्या मोहिमा आज देशाची शान जगासमोर ठेवत आहेत, पर्यटनाला चालना देत आहेत.
स्वदेश दर्शन योजनेंतर्गत देशात 15 संकल्पनांवर आधारित पर्यटन सर्किटही विकसित करण्यात येत आहेत. ही सर्किट्स देशाच्या विविध भागांना जोडतातच शिवाय पर्यटनाला एक नवी ओळख देऊन सुविधा देतात. रामायण सर्किटद्वारे, तुम्ही भगवान रामाशी संबंधित सर्व ठिकाणांना, भगवान रामाशी संबंधित ज्या-ज्या गोष्टींचा उल्लेख होतो त्या सर्व ठिकाणांचे एकामागून एक दर्शन घेऊ शकता. यासाठी रेल्वेने एक विशेष गाडीही सुरू केली असून, ती खूप लोकप्रिय होत असल्याचे मला सांगण्यात आले.
उद्यापासून दिव्य काशी यात्रेसाठी दिल्लीहून विशेष रेल्वे गाडीही सुटणार आहे. बुद्ध सर्किटमुळे देश-विदेशातील पर्यटकांना भगवान बुद्धांच्या सर्व स्थळांपर्यंत पोहोचणे सोपे होत आहे. परदेशी पर्यटकांसाठी व्हिसाचे नियमही सोपे करण्यात आले असून, त्याचा देशालाही फायदा होणार आहे. सध्या कोविडमुळे काही समस्या आहेत पण माझा विश्वास आहे की, संसर्ग कमी झाला की पर्यटकांची संख्या पुन्हा वेगाने वाढेल. सरकारने सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेत, आपल्या पर्यटन राज्यांमध्ये प्रत्येकाला प्राधान्याने लसीकरण केले जाईल याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. गोवा, उत्तराखंड या राज्यांनी यामध्ये वेगाने काम केले आहे.
मित्रांनो,
आज देश पर्यटनाकडे सर्वांगीण दृष्टीकोनातून, सर्वसमावेशक मार्गातून पाहत आहे. आजच्या काळात पर्यटन वाढवण्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत. पहिली स्वच्छता- पूर्वी आपली पर्यटनस्थळे, पवित्र तीर्थक्षेत्रेही अस्वच्छ होती. आज स्वच्छ भारत अभियानाने हे चित्र बदलले आहे. स्वच्छता वाढत असल्याने पर्यटनातही वाढ होत आहे. पर्यटनाला चालना देणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे सोय. मात्र सुविधांची व्याप्ती केवळ पर्यटनस्थळांपुरती मर्यादित नसावी. वाहतूक सुविधा, इंटरनेट, योग्य माहिती, वैद्यकीय व्यवस्था सर्व प्रकारची असावी आणि या दिशेने देशात सर्वांगीण कामही सुरू आहे.
मित्रांनो,
पर्यटन वाढवण्यासाठी वेळ ही तिसरी महत्त्वाची बाब आहे. आज ट्वेन्टी-ट्वेंटीचे युग आहे. लोकांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ठिकाणे बघायची आहेत. आज देशात महामार्ग, द्रुतगती मार्ग तयार होत आहेत, आधुनिक गाड्या धावत आहेत, नवीन विमानतळ सुरू होत आहेत, यामध्ये त्यांची खूप मदत होत आहे. उडान योजनेमुळे विमान भाडेही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. म्हणजेच जितका प्रवासाचा वेळ कमी होत आहे, खर्च कमी होत आहे, तितकेच पर्यटन वाढत आहे. गुजरातमध्येच बघितले तर अंबाजीच्या दर्शनासाठी बनासकांठामध्ये रोपवे, कालिका मातेच्या दर्शनासाठी पावागडमध्ये, आता गिरनारमध्ये देखील रोपवे आहे, सातपुड्यात एकूण चार रोपवे कार्यरत आहेत. हे रोपवे सुरू झाल्यानंतर पर्यटकांच्या सोयी वाढल्या असून पर्यटकांची संख्याही वाढत आहे. सध्या कोरोनाच्या प्रभावाखाली बरेच काही थांबले आहे, परंतु आपण पाहिले आहे की जेव्हा शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी शैक्षणिक सहलीवर जातात तेव्हा ही ऐतिहासिक ठिकाणे त्यांना खूप काही शिकवतात. देशभरात अशा ठिकाणी सुविधा वाढत असताना विद्यार्थ्यांनाही सहज शिकता येईल, समजून घेता येईल, देशाच्या परंपरेशी त्यांचा संबंधही वाढेल.
मित्रांनो,
पर्यटन वाढवण्यासाठी चौथी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली विचारसरणी. आपली विचारसरणी नाविन्यपूर्ण आणि आधुनिक असणे आवश्यक आहे. पण त्याच वेळी आपल्याला आपल्या प्राचीन वारशाचा किती अभिमान आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. आम्हाला हा अभिमान आहे, म्हणून भारतातून चोरीला गेलेल्या मूर्ती, जुना वारसा आम्ही जगभरातून परत आणत आहोत. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप मोठा मौल्यवान वारसा मागे ठेवला आहे. पण एक काळ असा होता की आपल्या धार्मिक सांस्कृतिक अस्मितेबद्दल बोलायला संकोच वाटायचा. स्वातंत्र्यानंतर दिल्लीत काही विशिष्ट कुटुंबांचेच भले झाले. पण आज देश त्या संकुचित विचारसरणीला मागे टाकून नवी गौरव स्थळे निर्माण करत आहे, त्यांना भव्यता देत आहे. आमच्या सरकारनेच दिल्लीत बाबासाहेबांचे स्मारक बांधले. आमच्याच सरकारने रामेश्वरममध्ये एपीजे अब्दुल कलाम स्मारक बांधले. त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस, श्यामजी कृष्ण वर्मा या महापुरुषांशी संबंधित स्थळांनाही भव्यता देण्यात आली आहे. आपल्या आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास समोर आणण्यासाठी देशभरात आदिवासी संग्रहालयेही बांधली जात आहेत. आज केवडियामध्ये उभारलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा संपूर्ण देशाचा अभिमान आहे. कोरोनाचा काळ सुरू होण्यापूर्वी अगदी अल्पावधीत 45 लाखांहून अधिक लोक स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी गेले होते. कोरोनाचा कालावधी असूनही, स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी आतापर्यंत 75 लाखांहून अधिक लोक आले आहेत. हीच आपल्या नव्याने बांधलेल्या ठिकाणांची शक्ती आहे, आकर्षण आहे. येत्या काळात या प्रयत्नांमुळे पर्यटनाबरोबरच आपल्या ओळखीलाही नवी उंची मिळेल.
आणि मित्रांनो,
जेव्हा मी व्होकल फॉर लोकल बद्दल बोलतो तेव्हा मी पाहिले आहे की काही लोकांना असे वाटते की मोदींचे व्होकल फॉर लोकल म्हणजे दिवाळीत दिवे कुठून खरेदी करायचे. बाबांनो, इतका संकुचित विचार करू नका, मी जेव्हा व्होकल फॉर लोकल म्हणतो तेव्हा माझ्या दृष्टिकोनातून पर्यटनही त्यात येते. मी नेहमीच आग्रही असतो की, कुटुंबात मुलांची इच्छा असेल कि परदेशात जावे, दुबईला जावे, सिंगापूरला जावे, असे वाटत असेल तर जावे, पण परदेशात जाण्याचे नियोजन करण्यापूर्वी प्रथम भारतातील 15 ते 20 प्रसिद्ध ठिकाणी जाण्याचे कुटुंबात ठरवावे. प्रथम तुम्ही भारताचा अनुभव घ्याल, ते पहाल, नंतर तुम्ही जगातील इतर ठिकाणी जाल.
मित्रांनो,
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व्होकल फॉर लोकल चा अंगिकार करावाच लागेल. देश समृद्ध करायचा असेल, देशातील तरुणांना संधी निर्माण करायची असेल, तर हा मार्ग अवलंबावा लागेल. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण अशा भारताचा संकल्प करत आहोत जो आपल्या परंपरांशी जोडलेला असेल तितकाच आधुनिक असेल. आपली तीर्थक्षेत्रे, आपली पर्यटन स्थळे या नव्या भारतात रंग भरण्याचे काम करतील. हे आपल्या वारसा आणि विकास दोन्हीचे प्रतीक बनतील. मला पूर्ण विश्वास आहे, सोमनाथ दादांच्या आशीर्वादाने देशाच्या विकासाचा हा प्रवास असाच चालू राहील.
पुन्हा एकदा नवीन सर्किट हाऊससाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.
खूप खूप धन्यवाद.
जय सोमनाथ.