उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, श्री किरेन रिजिजू जी, श्री किशन रेड्डी जी, जनरल व्ही के सिंग जी, श्री अर्जुन राम मेघवाल जी, श्री श्रीपाद नायक जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री श्री नंद गोपाल नंदी जी, संसदेतील माझे सहकारी श्री विजय कुमार दुबे जी, आमदार श्री रजनीकांत मणि त्रिपाठी जी, विविध देशांचे राजदूत - राजनीतिज्ञ, इतर लोकप्रतिनिधी, आणि बंधू आणि भगिनींनो!
भारत, जगभरातील बौद्ध समाजाच्या श्रद्धेचं, आस्थेचं प्रेरणा केंद्र आहे. आज कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाची ही सुविधा, एकप्रकारे जगभरातील बौद्ध अनुयायांच्या श्रद्धेला वाहिलेली पुष्पांजली आहे. हे क्षेत्र भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीपासून महापरिनिर्वाणापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचे साक्षीदार आहे. आज हे क्षेत्र संपूर्ण जगाशी थेट जोडले गेले आहे. श्रीलंकेच्या एअर लाईन्सचे विमान येथे उतरले, हे या पुण्यभूमीला केलेले वंदनच आहे. या विमानाने श्रीलंकेहून आलेल्या अतिपूजनीय महासंघ आणि इतर मान्यवरांचे कुशीनगर मोठ्या अभिमानाने स्वागत करत आहे. आज सुखद योगायोग म्हणजे, आज महर्षी वाल्मिकी यांची जयंती आहे. भगवान महर्षी वाल्मीकींपासून प्रेरणा घेऊन, सर्वांच्या प्रयत्नाने सर्वांचा विकास घडवून आणत आहे.
मित्रांनो,
कुशीनगरचे हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दशकांच्या आकांक्षा आणि अपेक्षांचं मूर्त रूप आहे. मला आज दुप्पट आनंद होत आहे. आध्यात्मिक ज्ञान यात्रेचा वाटसरू म्हणून मनात समाधानाची भावना देखील आहे आणि पूर्वांचल क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून वचनपूर्तीचाही आनंद देणारा हा क्षण आहे. कुशीनगरच्या जनतेला, उत्तर प्रदेशच्या जनतेला, पूर्वांचल - पूर्व भारतातील जनतेचे, जगभरातील भगवान बुद्धांच्या अनुयायांचे, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी खूप खूप अभिनंदन!
मित्रांनो,
भगवान बुद्धांशी संबंधित क्षेत्रांचा विकास करण्यासाठी, दळणवळणाच्या उत्तम सुविधा देण्यासाठी, भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यावर भारत सरकार विशेष लक्ष देत आहे. कुशीनगरचा विकास, उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमात आहे. भगवान बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनी येथून जवळच आहे. आताच ज्योतिरादित्यजींनी याचे सुंदर वर्णन केले आहे, मात्र तरीही मला ते पुन्हा यासाठी सांगायचे आहे, कारण देशाच्या प्रत्येक कोपऱ्याचे हे क्षेत्र केंद्रबिंदू आहे, हे सहजतेने समजावून घेता यावे. कपिलवस्तू देखील जवळच आहे. भगवान बुद्धांनी पहिला उपदेश दिला ते सारनाथ देखील शंभर ते अडीचशे किलोमीटरच्या परिसरात आहे. जेथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, ते बोधगया काही तासांच्या अंतरावर आहे. यामुळे हे क्षेत्र केवळ भारतातल्याच बुद्धांच्या अनुयायांसाठी नव्हे तर श्रीलंका, थायलंड, सिंगापूर, लाओस, कंबोडिया, जपान, कोरिया सारख्या अनेक देशांच्या नागरिकांसाठी देखील एक फार मोठं श्रद्धा आणि आकर्षणाचं केंद्र बनणार आहे.
बंधू आणि भगिनींनो,
कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ हवाई दळणवळणाचेच एक माध्यम बनणार नाही, तर यामुळे शेतकरी असो, पशुपालक असोत, दुकानदार असोत, श्रमिक असोत, इथले उद्योगपती असोत, सर्वांना याचा थेट लाभ मिळणार आहेच. यामुळे व्यापार – व्यवसायाची एक व्यवस्था विकसित होणार आहे. सर्वात जास्त लाभ इथल्या पर्यटनाला, बस - टॅक्सी चालकांना, हॉटेल - रेस्टॉरंट सारख्या लहान - मोठ्या व्यावसायिकांना देखील होणार आहे. यामुळे या क्षेत्रात युवकांसाठी देखील रोजगाराच्या अनेक नवीन संधी तयार होतील.
बंधू आणि भगिनींनो,
पर्यटनाचे स्वरूप काहीही असो, धार्मिक पर्यटन असो अथवा मनोरंजनासाठी केलेलं पर्यटन असो. यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा अतिशय गरजेच्या आहेत. पर्यटन क्षेत्राची पूर्वअट असते, ती म्हणजे पायाभूत सुविधा - रेल्वे, रस्ते, हवाई वाहतूक, जलमार्ग,.. पायाभूत सुविधांचा हा पूर्ण आराखडा आहे. या सोबतच हॉटेल - रुग्णालये तसेच इंटरनेट - मोबाईल सुविधा, पायाभूत सुविधा - सफाई व्यवस्था, मलनि:स्सारण आणि प्रक्रिया केंद्र, या देखील एक प्रकारच्या पायाभूत सुविधाच आहेत. स्वच्छ पर्यावरणपूरक अक्षय उर्जेचं केंद्र, हे देखील एकमेकांशी निगडित आहेत. कुठेही पर्यटनाला चालना देण्यासाठी या सर्व गोष्टींवर काम करण्याची गरज आहे आणि आज एकविसाव्या शतकातील भारत हाच दृष्टीकोन घेऊन पुढे जात आहे. पर्यटन क्षेत्राशी आता आणखी एक नवा पैलू जोडला गेला आहे, भारतातील लसीकरणाच्या प्रचंड वेगाने विकसित जगात भारताविषयी विश्वास निर्माण होईल, जर पर्यटक म्हणून भारतात जायचं असेल, काही कामानिमित्त भारतात जायचं असेल, तर भारतात व्यापक प्रमाणात लसीकरण झाले आहे, आणि म्हणूनच लसीकरण झालेला देश म्हणून सुद्धा जगातील पर्यटकांना एक आश्वस्त करणारी व्यवस्था, हे देखील त्यांच्यासाठी इथे येण्याचे एक कारण बनू शकते. यातही गेल्या काही वर्षांत, ज्यांनी याचा कधी विचारही केला नव्हता, अशा लोकांपर्यंत, अशा क्षेत्रात हवाई दळणवळण पोहोचविण्यावर भर देण्यात आला आहे.
हेच लक्ष्य निर्धारित करून प्रारंभ करण्यात आलेल्या उडान योजनेला आता चार वर्ष पूर्ण होत आहेत. उडान योजनेअंतर्गत गेल्या काही वर्षांमध्ये 900 पेक्षा जास्त नवीन हवाई मार्गांना स्वीकृती देण्यात आली आहे. यामध्ये 350 पेक्षा जास्त हवाई मार्गांवर विमान सेवा सुरूही झाल्या आहेत. नवीन तसेच जे पूर्वी सेवेत नव्हते अशी 50 विमानतळ कार्यान्वित करण्यात आले आहेत. या ठिकाणांवरून आधी हवाई सेवा उपलब्ध नव्हती, तिथं आता ही सेवा सुरू झाली आहे. आगामी 3-4 वर्षांमध्ये देशामध्ये 200 पेक्षा जास्त विमानतळे, हेलीपोर्टस आणि सागरी विमानांची सेवा देवू शकणा-या वॉटरड्रोमचे जाळे देशात तयार करण्याचा प्रयत्न आहे. सर्वसामान्य भारतीय आता मोठ्या संख्येने विमानतळांचा वापर करीत आहे आणि या नवीन सुविधांचा लाभ घेत आहेत, या गोष्टीचे तुम्ही आणि आपण सर्वचजण या गोष्टींचे साक्षीदार असणार आहे. मध्यम वर्गातले जास्तीत जास्त लोक आता हवाई सेवेचा लाभ घेवू लागले आहेत. उडान योजनेअंतर्गत इथे- उत्तर प्रदेशातही हवाई संपर्काचे जाळे सातत्याने वाढत आहे. उत्तर प्रदेशमध्ये 8 विमानतळांवरून विमानांचे उड्डाण सुरू झाले आहे. लखनौ, वाराणसी आणि कुशीनगर यांच्यानंतर जेवरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे. या व्यतिरिक्त अयोध्या, अलिगढ, आझमगढ, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती येथेही नवीन विमानतळांचे काम सुरू आहे. याचा अर्थ एकप्रकारे उत्तर प्रदेशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई मार्गाने संपर्क यंत्रणा लवकरच बळकट होवू शकणार आहे. आगामी काही आठवड्यातच दिल्ली आणि कुशीनगर यांच्यामध्ये स्पाइसजेटच्या माध्यमातून थेट विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मला देण्यात आली आहे; आणि ज्योतिरादित्य जींनी आणखी काही स्थानांची माहितीही मला दिली आहे. यामुळे देशांतर्गत प्रवाशांना, भक्तांना सुविधा उपलब्ध होणार आहे.
मित्रांनो,
देशाची नागरी उड्डाण सेवा क्षेत्राचे कामकाज व्यावसायिक पद्धतीने चालावे, सुविधा आणि सुरक्षितता यांना प्राधान्य दिले जावे, यासाठी अलिकडेच एअर इंडियासंबंधी एक मोठे पाऊल देशाने उचलले आहे. यामुळे भारतातल्या विमानसेवा क्षेत्राला नव्याने बळ मिळणार आहे. अशीच एक मोठी सुधारणा संरक्षण विमान वाहतुकीला नागरी वापरासाठी सुरु करण्यासंबंधी आहे. या निर्णयामुळे अनेक हवाईमार्गांवर नव्याने हवाई सेवेमधले अंतर कमी झाले आहे, त्यामुळे प्रवासाला लागणारा वेळही कमी झाला आहे. भारतातल्या तरूणांना इथेच चांगले प्रशिक्षण मिळावे, यासाठी देशातल्या 5 विमानतळांवर आठ नवीन उड्डाण अकादमी स्थापन करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. भारताव्दारे अलिकडे बनविण्यात आलेल्या ड्रोन धोरणामुळेही देशातल्या कृषी क्षेत्रापासून ते आरोग्य क्षेत्रापर्यंत, आपत्ती व्यवस्थापनापासून ते संरक्षणापर्यंत जीवन बदलून जाण्यास मदत होणार आहे. ड्रोनच्या निर्मिती- उत्पादनापासून ते ड्रोन उड्डाणाशी संबंधित प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी आता भारतामध्ये एक संपूर्ण कार्यसंस्कृती विकसित करण्यात येत आहे. या सर्व योजना, सर्व धोरणे, वेगाने पुढे जावेत आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण होवू नये, यासाठी अलिकडेच पंतप्रधान गतिशक्ती - राष्ट्रीय आराखडाही जाहीर करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनकार्यामध्ये तर सुधारणा होणारच आहे. त्याचबरोबर रस्ता असो, रेल्वे असो, हवाई वाहतूक असो... या सर्वांमध्ये एकमेकांना पूरकता असावी, या सुविधा एकमेकांच्या क्षमता वृद्धीला मदतगार ठराव्यात, अशा पद्धतीने काम व्हावे हे सुनिश्चित केले आहे. भारतामध्ये होत असलेल्या निरंतर सुधारणांचा परिणाम म्हणजे, भारतीय नागरी उड्डाण सेवेमध्ये एक हजार नवीन विमाने जोडली जातील असा अंदाज बांधण्यात आला आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या काळामध्ये भारताचे हवाई क्षेत्र राष्ट्राची गती आणि राष्ट्राची प्रगती यांचे प्रतीक बनेल. उत्तर प्रदेशाची शक्ती-ऊर्जा, यामध्ये सहभागी असावी, अशी कामना व्यक्त करून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल मी आपल्या सर्वांना, दुनियेतल्या बौद्ध धर्माचे अनुयायी, देशांतल्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातल्या पायाभूत सुविधांच्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करण्याचे भाग्य मिळावे यासाठी इथे मी देश आणि दुनियेतून आलेल्या बौद्ध भिक्षूंचे आशीर्वाद घेवू इच्छितो.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप-खूप धन्यवाद !