हर हर महादेव! वणक्कम् काशी। वणक्कम् तमिलनाडु।
जे तामिळनाडूहून आले आहेत, त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी एआय तंत्रज्ञान असलेले आपले इअरफोन वापरावेत.
व्यासपीठावरील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, काशी आणि तामिळनाडू येथील विद्वान, तामिळनाडू येथून माझ्या काशी मध्ये आलेले बंधू आणि भगिनी, इतर सर्व सन्माननीय व्यक्ती, महिला आणि पुरुष, आपण सर्वजण शेकडो किलोमीटरचा प्रवास करून एवढ्या मोठ्या संख्येने काशी येथे आले आहात. काशीमध्ये तुम्ही सर्वजण पाहुणे म्हणून नव्हे, तर माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणून आले आहात. काशी-तमिळ संगमम मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो.
माझ्या कुटुंबियांनो,
तामिळनाडूमधून काशीला येणे म्हणजे महादेवाच्या एका घरातून दुसऱ्या घरात येणे! तामिळनाडूतून काशीला येणे म्हणजे मदुराई मीनाक्षीहून काशी विशालाक्षीला येणे. म्हणूनच तामिळनाडू आणि काशीमधील लोकांच्या हृदयात एकमेकांबद्दलचे प्रेम आणि बंध आगळे वेगळे आहे. मला खात्री आहे, काशीचे लोक तुमच्या सर्वांच्या सेवेत कोणतीही कसर सोडणार नाहीत.
येथून परतताना बाबा विश्वनाथांच्या आशीर्वादाबरोबर काशीची चव, काशीची संस्कृती आणि काशीच्या आठवणीही घेऊन जाल. आज येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा नवा वापरही झाला आहे. ही एक नवीन सुरुवात आहे आणि मला आशा आहे की, यामुळे माझे बोलणे तुमच्यापर्यंत पोहोचणे अधिक सुलभ झाले आहे.
हे ठीक आहे का? तामिळनाडूच्या मित्रांनो, ठीक आहे का? तुम्ही आनंद घेत आहात ना? तर हा माझा पहिला अनुभव होता. यापुढे मी त्याचा वापर करेन. तुम्हाला मला प्रतिसाद द्यावा लागेल. आता नेहमीप्रमाणे मी हिंदीत बोलतो, हे तंत्रज्ञान त्याचे तामिळमध्ये भाषांतर करायला मदत करेल.
माझ्या कुटुंबियांनो,
आज कन्याकुमारी-वाराणसी तामिळ संगमम रेल्वे गाडीला येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मला तिरुकुरल, मनिमेकलाई आणि अनेक तमिळ ग्रंथांचे विविध भाषांमधील भाषांतर प्रकाशित करण्याचाही बहुमान मिळाला आहे. सुब्रमण्य भारती, जे एकेकाळी काशीचे विद्यार्थी होते, त्यांनी लिहिले होते- “काशी नगर पुलवर पेसुम उरैताम् कान्चियिल केट्पदर्कु ओर करुवि सेय्वोम्” त्यांना असे म्हणायचे होते, की काशी मध्ये जे मंत्र पठण होते, ते तामिळनाडूमधील कांची शहरात ऐकण्याची सोय झाली, तर किती चांगले होईल. आज सुब्रमण्य भारती यांची ती इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. काशी-तमिळ संगममचा आवाज देशभर आणि जगभर घुमत आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सर्व संबंधित मंत्रालये, उत्तर प्रदेश सरकार आणि तमिळनाडूतील सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो.
माझ्या कुटुंबियांनो,
गेल्या वर्षी काशी-तमिळ संगम सुरू झाल्यापासून दिवसागणिक लाखो लोक या यात्रेत सहभागी होत आहेत. विविध मठांचे धर्मगुरू, विद्यार्थी, सर्व कलाकार, साहित्यिक, कारागीर, व्यावसायिक, कितीतरीक्षेत्रातील व्यक्तींना या संगममच्या माध्यमातून परस्पर संवाद आणि संपर्कासाठी प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि आयआयटी मद्रास हा संगमम यशस्वी करण्यासाठी एकत्र आले, याचा मला आनंद आहे. आयआयटी मद्रासने बनारसच्या हजारो विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित विषयात ऑनलाइन सहाय्य करण्यासाठी विद्याशक्ती उपक्रम सुरू केला आहे. काशी आणि तामिळनाडू यांच्यातील संबंध भावनिक आणि रचनात्मक आहेत याचा दाखला म्हणजे एका वर्षभरात झालेले हे सर्व काम आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
‘काशी तामिळ संगम’ हा असाच एक अखंड प्रवाह आहे, जो ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना सतत दृढ करत आहे. याच विचाराने काही काळापूर्वी काशीमध्ये गंगा-पुष्करलू उत्सव अर्थात काशी-तेलुगु संगममचे आयोजनही करण्यात आले होते. आम्ही गुजरातमध्ये सौराष्ट्र-तामिळ संगममचेही यशस्वी आयोजनही केले होते. आमच्या राजभवनांनीही ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’साठी खूप चांगले उपक्रम हाती घेतले आहेत. आता राजभवनांमध्ये इतर राज्यांचा स्थापना दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, इतर राज्यातील लोकांना आमंत्रित करून विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश करतानाही दिसून आली. नवीन संसद भवनात पवित्र सेंगोलची स्थापना करण्यात आली आहे.
आदिनम् च्या संतजनांच्या मार्गदर्शनाखाली 1947 मध्ये हाच सेंगोल सत्ता हस्तांतरणाचे प्रतिक बनला होता. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ याच भावनेचा प्रवाह आज आपल्या राष्ट्राच्या आत्म्याचे सिंचन करतो आहे.
माझ्या कुटुंबीयांनो,
आपण भारतवासी एक असूनही भाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, राहणीमान यांसारख्या विविधतेने नटलेले आहोत. ‘नीरेल्लाम् गङ्गै, निलमेल्लाम् कासी’ या तमिळ वचनात भारताच्या विविधतेच्या आध्यात्मिक चेतनेचे वर्णन करण्यात आले आहे. हे वचन महान पाण्डिय राजा ‘पराक्रम पाण्डियन्’ यांचे आहे. ‘प्रत्येक घरात गंगाजल आहे, भारताचा प्रत्येक भूभाग काशी आहे’ असा या वचनाचा अर्थ आहे.
जेव्हा उत्तरेत आक्रमणकर्त्यांकडून आपल्या श्रद्धा केंद्रांवर, काशीवर हल्ले केले जात होते तेव्हा राजा पराक्रम पाण्डियन् यांनी काशीचा कधीच विध्वंस केला जाऊ शकत नाही हे सांगत तेनकाशी आणि शिवकाशीमध्ये मंदिरांची निर्मिती केली. तुम्ही जगातील कोणत्याही सभ्यतेचे सिंहावलोकन करा, विविधतेमध्ये आत्मियतेच्या अशा सहज सुंदर आणि श्रेष्ठ मिलाफाचे उदाहरण इतरत्र सापडणार नाही. नुकत्याच पार पडलेल्या जी 20 शिखर परिषदेच्या काळातही भारताची ही विविधता पाहून जग विस्मयचकित झाले.
माझ्या कुटुंबीयांनो,
जगातील इतर देशांमध्ये राष्ट्राची राजनैतिक व्याख्या केली जाते पण भारत मात्र एक राष्ट्र म्हणून आध्यात्मिक विश्वासाने बनलेले आहे.
भारताला आदि शंकराचार्य आणि रामानुजाचार्य यांच्यासारख्या संतांनी आपल्या यात्रांद्वारे भारताच्या राष्ट्रीय चेतनेला जागृत करत देशाला एक बनवले आहे. तमिळनाडूतील आदिनम् संत देखील अनेक शतकांपासून काशीसारख्या शिवस्थानांची यात्रा करत आहेत. काशीमध्ये कुमारगुरुपरर् यांनी मठांची आणि मंदिरांची स्थापना केली होती. तिरूपनन्दाल आदिनम् यांचा या स्थानाबद्दल इतका स्नेहभाव आहे की ते आजही आपल्या नावापुढे काशीचे नाव लिहितात. याच प्रकारे तमिळ आध्यात्मिक साहित्यात ‘पाडल् पेट्र थलम्’ बाबत असे लिहिले आहे की या स्थानांचे दर्शन करणारी व्यक्ती केदार किंवा तिरुकेदारम् ते तिरुनेलवेली पर्यंत भ्रमण केल्याचे भाग्य प्राप्त करते. या यात्रा आणि तीर्थयात्रांद्वारे भारत हजारों वर्षांपासून एका राष्ट्राच्या रुपात अखंड आणि अमर राहिला आहे.
काशी तमिळ संगमम् द्वारे देशातील युवकांमध्ये आपल्या या प्राचीन परंपरेप्रति उत्साह वाढत आहे, याचा मला आनंद आहे. तामिळनाडूमधून मोठ्या संख्येने लोक, तेथील युवक काशीला भेट देत आहेत. येथून ते प्रयाग, अयोध्या आणि इतर तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी देखील जात आहेत. काशी-तमिळ संगमम् च्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी अयोध्या दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मला देण्यात आली आहे. महादेवासोबतच रामेश्वराची स्थापना करणाऱ्या भगवान रामांच्या दर्शनाचे सौभाग्य अद्भुत आहे.
माझ्या कुटुंबीयांनो,
आपल्या इथे असे म्हटले जाते की,
जानें बिनु न होइ परतीती। बिनु परतीति होइ नहि प्रीती॥
म्हणजेच, जाणून घेतल्याने विश्वास वाढतो आणि विश्वास वाढल्याने प्रेम वाढते. म्हणूनच, आपण एकमेकांच्या बाबतीत, एकमेकांच्या परंपरांच्या बाबतीत, आपल्या सामायिक वारश्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. दक्षिण आणि उत्तरेत काशी आणि मदुराईचे उदाहरण आपल्यासमोर आहेच. ही दोन्ही महान मंदिरे असलेली शहरे आहेत. दोन्ही महान तिर्थक्षेत्र आहेत. मदुराई वईगई नदीच्या किनारी वसलेले आहे तर काशी गंगमातेच्या तटावर वसलेले आहे. जेव्हा आपण या वारश्याबद्दल जाणून घेतो तेव्हाच आपल्याला आपल्या नात्याच्या दृढतेचीही जाणीव होते.
माझ्या कुटुंबीयांनो,
काशी-तमिळ संगमम् चा हा संगम, याच प्रकारे आपल्या वारश्याला सशक्त बनवत राहील, एक भारत-श्रेष्ठ भारताची भावना दृढ करत राहील, असा मला विश्वास आहे. तुम्हा सर्वांचा प्रवास सुखाचा होवो, ही कामना करत मी माझे भाषण संपवतो. आणि, सोबतच तामिळनाडूमधून आलेले प्रसिद्ध गायक भाई श्रीराम यांच्या काशीतील आगमनाबद्दल आणि त्यांनी सर्वांना आपल्या स्वरांनी मंत्रमुग्ध केल्याबद्दल मी श्रीराम यांचे हृदयपूर्वक आभार मानतो, आणि त्यांचे अभिनंदन करतो. आणि काशीनिवासी देखील ज्या तल्लीनतेने आणि भक्ती भावाने तमिळ गायक श्रीराम यांचे गायन ऐकत होते, त्यातूनही आपल्या एकतेच्या ताकदीचे दर्शन घडत होते. मी पुनश्च एकदा काशी तमिळ संगमम् च्या या यात्रेला, अविरत यात्रेला अनेक अनेक शुभेच्छा देतो. आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो.