

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, डॉक्टर एस जयशंकरजी, अश्विनी वैष्णवजी, देवुसिंह चौहानजी, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ-आय टी यू च्या सरचिटणीस, अन्य मान्यवर आणि सभ्य स्त्री पुरुषहो,
आजचा दिवस खूप विशेष आहे, खूप पवित्र आहे. आज पासून हिंदू कालगणनेच्या नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. मी आपणा सर्वांना आणि सर्व देशवासियांना विक्रम संवत्सर 2080 या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या एवढ्या विशाल देशामध्ये, विविधतेनं नटलेल्या देशामध्ये, युगानुयुगे वेगवेगळ्या प्रकारच्या कालगणना प्रचलित आहेत. कोल्लम कालगणनेची मल्याळम दिनदर्शिका आहे, तामिळ कालगणना आहे. या सर्व कालगणना, शेकडो वर्षांपासून भारताला तिथीं बद्दलची माहिती आणि ज्ञान पुरवत आल्या आहेत. विक्रम संवत्सर सुद्धा 2080 वर्ष आधीपासून चालत आलं आहे. ग्रेगरियन कालगणनेनुसार सध्या 2023 हे वर्ष सुरू आहे, मात्र विक्रम संवत्सर, 2023 च्या 57 वर्ष आधीपासून आहे. मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय की नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, दूरसंचार, माहिती संवाद तंत्रज्ञान आणि या गोष्टींशी संलग्न नवोन्मेष यांच्या बाबतीत खूपच मोठी सुरुवात भारतात होत आहे. आज इथे, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ- आय टी यू चं क्षेत्रीय कार्यालय आणि फक्त क्षेत्रीय कार्यालयच नाही, तर क्षेत्रीय कार्यालया सोबत नवोन्मेष केंद्राची स्थापना झाली आहे. याबरोबरच आज 6-जी चाचणी उपकरणाचही (टेस्ट बेड) उद्घाटन झालं आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करु पाहणाऱ्या आपल्या व्हिजन डॉक्युमेंट म्हणजेच उद्दिष्टनाम्याचं अनावरण सुद्धा करण्यात आलं आहे. यामुळे डिजिटल भारताला नवी ऊर्जा मिळण्यासोबतच, दक्षिण आशियासाठी, दक्षिण जगतासाठी, नवे उपाय, नवे नवोन्मेष उपलब्ध होणार आहेत. विशेष करून आपलं शैक्षणिक क्षेत्र, आपले नवंउद्योजक(स्टार्ट अप्स), नवोन्मेषक, आपलं उद्योगजगत यांच्यासाठी नवनव्या संधी निर्माण होणार आहेत.
मित्रांनो,
भारत, जी 20 समुहाचं अध्यक्षपद भूषवत असताना भारताच्या प्राधान्यक्रमामध्ये, प्रादेशिक दरी कमी करण्याचा सुद्धा समावेश आहे. काही आठवड्यांपूर्वीच भारतानं दक्षिण जगत (ग्लोबल साउथ) परिषदेचं आयोजन केलं. जागतिक दक्षिण या गटाच्या अशा वेगळ्या गरजा पाहता, तंत्रज्ञान, रचना आणि प्रमाणबद्ध दर्जाची भूमिका महत्त्वाची आहे. जागतिक दक्षिण गट आता तंत्रज्ञान विषयक दरी सुद्धा वेगानं मिटवण्याच्या कामाला लागलं आहे. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचं क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र म्हणजे, या दिशेनं टाकलेलं एक खूप मोठं पाऊल आहे. जागतिक दक्षिण गट यात जागतिक संपर्क व्यवस्था निर्माण करण्याच्या कामात भारत देत असलेल्या योगदानालाही हे पाऊल गती देणारं ठरेल, यामुळे भारताच्या प्रयत्नांना अधिक जोर येईल. यामुळे दक्षिण आशियाई देशांमधील इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी-आय सी टी अर्थात माहिती आणि संवाद तंत्रज्ञान क्षेत्रात परस्पर सहकार्य आणि सहभाग-सहयोग अधिक दृढ होईल आणि या निमित्ताने परदेशातील पाहुण्यांची मोठी मांदियाळीच आपल्या या कार्यक्रमात उपस्थित आहे. मी आपणा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो, सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो!
मित्रहो,
जेव्हा आपण तंत्रज्ञान विषयक दरी मिटवण्याच्या गोष्टी करतो तेव्हा याबाबत भारताकडून अपेक्षा निर्माण होणं सुद्धा खूप स्वाभाविक आहे. भारताचं सामर्थ्य, भारताची नवोन्मेष संस्कृती, भारताच्या पायाभूत सुविधा, भारताकडे असलेलं कुशल आणि नवोन्मेषी मनुष्यबळ, भारताचं अनुकूल असं धोरणविषयक वातावरण या सर्व गोष्टींच्या आधारावर या अपेक्षा वाढल्या आहेत. या सर्व वैशिष्ट्यांसह भारताची दोन मुख्य शक्तिस्थानं आहेत ती म्हणजे विश्वास आणि दर्जात्मक गुणवत्तेचं मोठा आवाका ! या दोन शक्तींविना आपण तंत्रज्ञान, कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवू शकत नाही आणि मी तर म्हणेन की आजच्या काळातलं हे जे तंत्रज्ञान आहे त्याबद्दलचा विश्वास आहे , खरं तर, आजच्या काळातल्या तंत्रज्ञानासाठी विश्वासार्हता ही एक पूर्व अट आहे. याबाबतीत भारताच्या प्रयत्नांची, योगदानाची चर्चा आज संपूर्ण जगात सुरु आहे. आज भारत, शंभर कोटी भ्रमणध्वनी संचांसह, भ्रमणध्वनी ग्राहकांनी युक्त अशी संपर्क व्यवस्थेनं जास्तीत जास्त लोकांना एकत्र जोडणारी जगातील लोकशाही आहे. परवडणाऱ्या दरात स्मार्टफोन आणि इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे भारताच्या डिजिटल विश्वाचा कायापालट झाला आहे. भारतात आज प्रत्येक महिन्यात यूपीआय प्रणालीच्या माध्यमातून 800 कोटींहून अधिक डिजिटल आर्थिक व्यवहार होत आहेत. भारतात आज प्रत्येक दिवशी, सात कोटी जणांना ई-प्रणाली वापराची वैधता उपलब्ध होत आहे. कोविन अॅपच्या माध्यमातून देशाने दोनशे कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं एकूण 28 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम आपल्या नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा केली आहे, ज्याला आपण डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर म्हणजे थेट लाभ हस्तांतरण म्हणतो. जनधन योजनेच्या माध्यमातून आपण अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक लोकांची भारतात बँक खाती उघडली आहेत. आणि त्यानंतर, विशिष्ट ओळख
म्हणजेच आधार क्रमांका द्वारे या बँक खात्यांना वैधता मिळवून दिली आणि मग 100 कोटींहून जास्त लोकांना भ्रमणध्वनीच्या माध्यमातून एकत्र जोडलं आहे. जनधन-आधार-मोबाईल! जनधन चा 'जे' (J), आधारचा 'ए' (A), मोबाईलचा 'एम'(M)-JAM, जॅम! भारतातील जॅम या त्रिमूर्तीचं हे सामर्थ्य, जगासाठी एक अभ्यासाचा विषय आहे.
मित्रांनो,
भारतात तंत्रज्ञान फक्त शक्ती दाखवण्याचं साधन नाहीये, तर सक्षमीकरण साध्य करण्याचं एक उद्दिष्ट्य आहे. भारतात आज डिजिटल तंत्रज्ञान सार्वत्रिक आहे, सर्वसाध्य आहे, सर्वांच्या आवाक्यात आहे. भारतात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात डिजिटल समावेशन झालं आहे, म्हणजेच अनेक बाबींसाठी डिजिटल माध्यमं मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत.
जर आपण ब्रॉडबँड कनेक्टिविटीचा विचार केला तर 2014 पूर्वी भारतात 6 कोटी वापरकर्ते होते. आज ब्रॉडबँड वापरकर्त्यांची संख्या 80 कोटीपेक्षा अधिक आहे. 2014 पूर्वी भारतात इंटरनेट कनेक्शनची संख्या 25 कोटी होती. आज ही 85 कोटींपेक्षा अधिक आहे.
मित्रहो,
आता भारतातील गांवांमध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या शहरांमध्ये राहणाऱ्या वापरकर्त्यांपेक्षा जास्त झाली आहे. डिजिटल पॉवर कशा प्रकारे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे याचा हा दाखला आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये, भारतात सरकार आणि खाजगी क्षेत्राने एकत्रितपणे 25 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे जाळे उभारले आहे. 25 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर, या वर्षांमध्येच देशातील जवळपास 2 लाख ग्राम पंचायती ऑप्टिकल फायबर ने जोडल्या गेल्या आहेत. देशभरातील गांवांमध्ये आज 5 लाखांपेक्षा जास्त सामाईक सेवा केंद्रे, डिजिटल सेवा देत आहेत. याच गोष्टीचा हा प्रभाव आणि या सर्वांचाच हा प्रभाव आहे की आज आपली डिजिटल अर्थव्यवस्था, देशाच्या एकंदर अर्थव्यवस्थेच्या तुलनेत अडीच पट वेगाने पुढे जात आहे.
मित्रहो,
डिजिटल इंडिया मुळे बिगर डिजिटल क्षेत्रांना देखील बळ मिळत आहे आणि याचे उदाहरण आहे आपला पीएम गतीशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा. देशात तयार होत असलेल्या प्रत्येक प्रकारच्या पायाभूत सुविधांशी संबंधित डेटा लेयर्सना एका मंचावर आणले जात आहे. लक्ष्य हेच आहे की पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित प्रत्येक संसाधनाची माहिती एका ठिकाणी असली पाहिजे, प्रत्येक हितधारकाकडे रियल टाइम माहिती असली पाहिजे. आज या ठिकाणी ज्या ‘Call Before you Dig’ या ऍपचे उद्घाटन झाले आहे ते देखील याच भावनेचा विस्तार आहे आणि ‘Call Before you Dig’ चा अर्थ हा नाही की याचा political field मध्ये उपयोग करायचा आहे. तुम्हाला देखील माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जे खोदकाम होते, त्यामुळे नेहमीच टेलीकॉम नेटवर्कची देखील हानी होत असते. या नव्या ऍपमुळे खोदकाम करणाऱ्या ज्या एजंसी आहेत त्यांचा आणि ज्यांच्या मालकीची सामग्री जमिनीखाली आहे त्या विभागांमधील ताळमेळ वाढेल.यामुळे नुकसान देखील कमी होईल आणि लोकांना होणारा त्रास देखील कमी होईल.
मित्रहो,
आजचा भारत, डिजिटल क्रांतीच्या पुढच्या पावलाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. आज भारत, जगात सर्वात वेगाने 5G सेवा सुरू करणारा देश आहे. केवळ 120 दिवसात, 120 दिवसातच 125 पेक्षा जास्त शहरांमध्ये 5G सेवेचा प्रारंभ झाला आहे. देशातील सुमारे साडे 300 जिल्ह्यांमध्ये आज 5G सेवा पोहोचली आहे. इतकेच नाही, 5G सेवेचा प्रारंभ केल्यानंतर केवळ 6 महिन्यातच आपण आज 6G विषयी बोलू लागलो आहोत आणि यातून भारताचा आत्मविश्वास दिसून येत आहे. आज आम्ही त्यासंदर्भातले आमचे व्हिजन डॉक्युमेंट तयार ठेवले आहे. आगामी काही वर्षात 6G सेवा सुरु करण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होईल .
मित्रहो,
भारतात विकसित आणि भारतात वापरात यशस्वी ठरलेले दूरसंवाद तंत्रज्ञान आज जगातील अनेक देशांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे.भारत दूरसंवाद तंत्रज्ञानाचा एक वापरकर्ता होता, ग्राहक होता. मात्र, आता भारत जगात दूरसंवाद तंत्रज्ञानाचा निर्यातदार होण्याच्या दिशेने पुढे जात आहे. 5G ची जी शक्ती आहे, तिच्या मदतीने संपूर्ण जगाची कार्य-संस्कृती बदलण्यासाठी भारत अनेक देशांसोबत काम करत आहे. आगामी काळात भारत 100 नव्या 5G प्रयोगशाळा स्थापन करणार आहे.यामुळे 5G संबंधित संधी, व्यवसायाची मॉडेल्स आणि रोजगार क्षमता प्रत्यक्षात साध्य करण्यात मदत मिळेल. या 100 प्रयोगशाळा भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांनुसार 5G ऍप्लिकेशन्स विकसित करण्यात मदत करतील. मग 5G स्मार्ट क्लासरुम असोत, शेती असो, इंटेलिजेंट ट्रान्स्पोर्ट प्रणाली असो किंवा मग आरोग्यविषयक ऍप्लिकेशन्स असोत, भारत प्रत्येक दिशेने वेगाने काम करत आहे. भारताचे 5Gi निकष जागतिक 5G प्रणालीचा भाग आहेत. आपण आयटीयू सोबतही भावी काळातील तंत्रज्ञानाच्या प्रमाणीकरणासाठी एकत्रितपणे काम करणार आहोत. या ठिकाणी जी भारतीय आयटीयू क्षेत्रीय कार्यालये सुरू होत आहेत ती आपल्याला 6G साठी योग्य वातावरण तयार करण्यात मदत करतील. मला आज ही घोषणा करताना देखील आनंद होत आहे की आयटीयू ची जागतिक दूरसंवाद प्रमाणीकरण परिषद पुढील वर्षी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येईल. यामध्ये जगभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मी आतापासूनच या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देत आहे. मात्र, या क्षेत्रातील विद्वानांना देखील मी आव्हान देत आहे की आपण ऑक्टोबरपूर्वी असे काही करुया की जे जगातील गरिबातील गरीब देशांच्या जास्तीत जास्त उपयोगाचे असेल.
मित्रहो,
भारताच्या विकासाच्या या गतीला पाहिल्यावर हे दशक (decade) भारताचे टेक एड आहे, असे सांगितले जात आहे. भारताचे दूरसंवाद आणि डिजिटल मॉडेल अतिशय सुलभ आहे, सुरक्षित आहे, पारदर्शक आहे आणि विश्वासार्ह आणि चाचण्यांमध्ये योग्य ठरलेले आहे. दक्षिण आशियातील सर्व मित्र देश देखील याचा लाभ घेऊ शकतात. माझा असा विश्वास आहे की आयटीयू चे हे केंद्र यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावेल.मी पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण प्रसंगी जगातील अनेक देशांचे मान्यवर येथे आले आहेत, त्यांचे स्वागत देखील करतो आणि तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देत आहे.
खूप खूप आभार