


महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैसजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री बंधू देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवारजी, इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष राकेश शर्माजी, सर्व ज्येष्ठ मान्यवर, सभ्य स्त्री-पुरुषहो!
सर्वात आधी मी इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या सर्व सदस्यांचे खूप-खूप अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांना आज मुंबईत एक भव्य आणि आधुनिक वास्तू मिळाली आहे. या नव्या वास्तूमध्ये तुमच्या कामकाजाचा जो विस्तार होईल, तुमची काम करण्यातील सुलभता वाढेल त्यामुळे आपली लोकशाही आणखी मजबूत होईल, अशी मला आशा वाटते. इंडियन न्यूजपेपर सोसायटी ही संस्था आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी देशात कार्यरत असलेल्या संस्थांपैकी एक आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या देशाच्या वाटचालीतील प्रत्येक चढ-उतार देखील फार जवळून बघितला आहे, ते क्षण तुम्ही प्रत्यक्ष जगला आहात आणि जन-सामान्यांना त्याबद्दल सांगितले देखील आहे; म्हणूनच, एक संस्था म्हणून तुमचे कार्य जितके अधिक प्रभावी बनेल तितका देशाला त्याचा अधिकाधिक फायदा होईल.
मित्रांनो,
प्रसार माध्यमे ही केवळ देशाच्या परिस्थितीची मूक साक्षीदार नव्हेत. माध्यमांमध्ये कार्यरत तुम्ही सर्वजण परिस्थिती बदलण्यात, देशाला दिशा दाखवण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावता. भारत आज एका अशा कालखंडात उभा आहे जेथून पुढील 25 वर्षांचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आहे. या 25 वर्षांमध्ये भारत विकसित व्हावा यासाठी वर्तमानपत्रे-मासिके यांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. ही प्रसारमाध्यमेच देशाच्या नागरिकांना जागृत करतात, त्यांच्या अधिकारांचे स्मरण करून देतात, आणि हीच माध्यमे देशातील लोकांकडे कोणते सामर्थ्य आहे, याची जाणीव त्यांना करून देतात. तुम्ही सुद्धा बघता की, ज्या देशाच्या नागरिकांमध्ये स्वतःच्या सामर्थ्याविषयी आत्मविश्वास जागृत होतो, तो देश यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करू लागतो. भारतात देखील आता हेच होऊ लागले आहे. मी एक लहानसे उदाहरण देतो, एके काळी, काही नेते उघड उघडपणे असे बोलत होते की, डिजिटल व्यवहार ही भारतीय जनतेला शक्य होणारी बाब नाही. त्या लोकांना वाटत होते की आधुनिक तंत्रज्ञानयुक्त गोष्टी या देशात टिकू शकणार नाहीत. पण, भारतातील जनतेचा विचारीपणा आणि त्यांची ताकद आता जगाला दिसते आहे. आजघडीला भारत डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत जगात मोठमोठे विक्रम मोडून काढत आहे. भारतात आज युपीआयमुळे आधुनिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेमुळे लोकांचे जीवनमान अधिक सुलभ झाले आहे. आज आपले जे देशवासीय जगभरात स्थायिक आहेत, विशेषतः आखाती देशांमधील भारतीय, सर्वाधिक प्रमाणात भारतात पैसे पाठवत आहेत. यासाठी त्यांना पूर्वी जो खर्च यायचा त्यात देखील मोठी कपात झाली आहे. आणि डिजिटल क्रांती हे यामागच्या कारणांपैकी एक कारण आहे. जगातील मोठमोठे देश आपल्याकडून हे तंत्रज्ञान आणि त्याच्या अंमलबजावणीची पद्धत जाणून घेण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत; आणि हे इतके मोठे यश केवळ सरकारचे आहे असे नव्हे. या यशात तुम्हा सर्व प्रसारमाध्यमांचादेखील वाटा आहे आणि यासाठीच तुम्ही अभिनंदनाला पात्र आहात.
मित्रांनो,
विचार विनिमय करणे, गंभीर विषयांबाबत चर्चेला प्रोत्साहन देणे ही माध्यमांची स्वाभाविक भूमिका असते. मात्र, माध्यमांच्या विचारांची दिशा देखील अनेकदा सरकारच्या धोरणांच्या दिशेवर अवलंबून असते. सरकारचे कामकाज नेहमी चांगले असो, वाईट असो पण मतांचा गुणाकार-भागाकार करण्याची पद्धत सुरु असते हे तुम्ही जाणताच. आम्ही सत्तेत आल्यावर ही मानसिकता बदलवून टाकली. आपल्या देशात अनेक दशकांपूर्वी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले, हे तुमच्या ध्यानात असेल. तरीही, नंतरच्या काळात म्हणजे अगदी 2014 पर्यंत देशात 40-50 कोटी लोक असे होते ज्यांचे बँकेत खाते सुद्धा नव्हते. जेव्हा राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्याचे काय झाले? आणि 2014 मध्ये असे दिसून आले की जवळजवळ निम्मे देशवासीय बँकिंग प्रणालीमध्ये सहभागी नाहीतच. पण कधी आपल्या देशात ही बाब चर्चेचा मुद्दा झाली? पण आम्ही जनधन योजनेला एका चळवळीच्या पातळीवर राबवले. सुमारे 50 कोटी लोकांना आम्ही बँकिंग व्यवस्थेमध्ये समाविष्ट करून घेतले. आमचे हेच कार्य डिजिटल इंडिया आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातील मोहिमेत आमचे सर्वात मोठे माध्यम बनले. याच पद्धतीने, स्वच्छता अभियान, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया यांसारखी अभियाने आपण पहिली तर आपल्याला दिसेल की, ही अभियाने वोट बँकेच्या राजकारणात कुठेच बसत नव्हती. पण, बदलत्या भारतात, देशातील प्रसारमाध्यमांनी या सर्व अभियानांना देशाच्या राष्ट्रीय चर्चांचा भाग बनवले. स्टार्ट-अप हा शब्द 2014 पूर्वी देशातील अधिकांश लोकांनी कधी ऐकला देखील नव्हता त्याला माध्यमांतील चर्चेमुळे आज घराघरात पोहोचवले आहे.
मित्रांनो,
तुम्ही माध्यम क्षेत्रातील दिग्गज आहात, अत्यंत अनुभवी आहात. तुमचे निर्णय देशातील प्रसार माध्यमांना देखील दिशा दाखवतात. म्हणूनच, आजच्या या कार्यक्रमात मी तुम्हाला काही विनंत्या देखील करणार आहे.
मित्रांनो,
एखादा कार्यक्रम जर सरकारने सुरु केला तर तो सरकारी कार्यक्रमच असला पाहिजे असे काही नाही. सरकार एखाद्या विचारावर भर देते म्हणजे तो केवळ सरकारचा विचार आहे असे नव्हे. देशाने अमृत महोत्सव साजरा केला, देशाने ‘हर घर तिरंगा’ अभियान साजरे केले, सरकारने याची सुरवात जरूर केली, पण हे अभियान संपूर्ण देशाने पुढे नेले. अशाच प्रकारे आज देश पर्यावरणावर इतका भर देत आहे. राजकारणापासून वेगळा हा मानवतेच्या भविष्याचा विषय आहे. आता ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान सुरु झाले आहे. भारताच्या या अभियानाची संपूर्ण जगात चर्चा सुरु झाली आहे. मी नुकताच जी-7 परिषदेसाठी गेलो होतो तेव्हा मी हा विषय मांडला तेव्हा त्यांना मोठी उत्सुकता होती कारण प्रत्येकाच्या हृदयात आपल्या आईचे खास स्थान असते. तिथे प्रत्येक जण म्हणत होता की हे लोकांना खूप भावेल. देशामधले जास्तीत जास्त माध्यम समूह या अभियानाशी जोडले गेले तर भावी पिढ्यांचेही कल्याण साधेल. असे प्रत्येक अभियान आपण देशाचे अभियान मानून ते पुढे न्यावे असे, माझे आवाहन आहे. हा सरकारचा प्रयत्न नव्हे तर देशाचा प्रयत्न आहे. या वर्षी आपण संविधानाची 75 वर्ष साजरी करत आहोत. संविधानाप्र्ती नागरिकांमध्ये कर्तव्यदक्षतेची जाणीव वृद्धिंगत व्हावी, त्यांच्यामध्ये जागरुकता वाढावी यामध्ये आपणा सर्वांची भूमिका मोठी असू शकते.
मित्रहो,
एक विषय पर्यटनाशीही संबंधित आहे.पर्यटन केवळ सरकारच्या धोरणाद्वारे वाढत नाही. आपण सर्वजण मिळून देशाचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग करतो, तेव्हा देशाच्या सन्मानाबरोबरच देशाच्या पर्यटन क्षेत्रातही वाढ होते. देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण स्वतःच्या पद्धतीही आणू शकता. आता समजा महाराष्ट्रातल्या सर्व वर्तमानपत्रांनी ठरवले की सप्टेंबरमध्ये आम्ही आपल्या वतीने बंगालच्या पर्यटनाला प्रोत्साहन देऊ, तर जेव्हा महाराष्ट्रातले लोक चहूकडे बंगाल पाहतील तेव्हा त्यांना वाटेल की या वेळी बंगाल पाहिला पाहिजे, तर बंगालच्या पर्यटनात वाढ होईल. समजा तीन महिन्यानंतर आपण ठरवले की आम्ही सर्व जण, एक जण एक आणि दुसरा वेगळेच करत आहे, असे न करता तामिळनाडूवर लक्ष केंद्रित करू. आपण पहा, महाराष्ट्रातले पर्यटक तामिळनाडूमध्ये जातील. देशातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी एक पद्धती असेल आणि आपण जेव्हा असे कराल तेव्हा त्या-त्या राज्यातही महाराष्ट्रासाठी असेच अभियान सुरु होईल, ज्याचा महाराष्ट्राला लाभ होईल. यातून राज्यांमध्ये परस्परांविषयी जिज्ञासा वाढेल, आकर्षण वाढेल अखेर याचा फायदा ज्या राज्यात आपण हा पुढाकार घेत आहात त्यालाही होईल, जास्तीचे परिश्रम न घेता, सहज होणारे हे काम आहे.
मित्रहो,
जागतिक पटलावर आपले अस्तित्व ठळक करण्यासंदर्भातही आपणा सर्वाना माझे आवाहन आहे. आपल्याला विचार करावा लागेल की आपले अस्तित्व फारसे नाही. माध्यमांसंदर्भात बोलायचे झाले तर आपण 140 कोटी लोकांचा देश आहोत. इतका विशाल देश, इतके सामर्थ्य आणि संधी, आणि थोड्याच काळात भारत जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होताना आपण पाहणार आहोत. भारताच्या या यशोगाथा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही आपण अतिशय कौशल्याने निभावू शकता. परदेशात राष्ट्राची छबी कशी आहे, याचा थेट प्रभाव त्या देशाची अर्थव्यवस्था आणि विकासावर पडतो. आज आपण पाहता भारतीय मूळ असलेल्या लोकांची प्रतिमा परदेशांमध्ये अधिकच उंचावली आहे, विश्वासार्हता वाढली आहे, सन्मान वाढला आहे कारण भारताचा दबदबा जगात वाढला आहे. जागतिक प्रगतीमध्ये भारताचे योगदान वाढले आहे. या दृष्टीकोनातून आपली माध्यमे जितके काम करतील तितकाच देशाला त्याचा फायदा होईल; म्हणूनच संयुक्त राष्ट्रांमध्ये जितक्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये आपल्या प्रकाशनांचा विस्तार व्हावा, अशी माझी मनीषा आहे. आपल्या मायक्रोसाईट, सोशल मिडिया अकाउंट या भाषांमध्येही असू शकतात, सध्या तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जमाना आहे. आपणासाठी हे काम अगदी सोपे झाले आहे.
मित्रहो,
मी आपणाला इतके सर्व सुचवले आहे. वर्तमानपत्रात अतिशय मर्यादित जागा असते हे मी जाणतो, मात्र आजकाल प्रत्येक वर्तमानपत्राकडे प्रकाशनाची एक डिजिटल आवृत्तीही प्रकाशित होत असते. तिथे तर जागेची समस्या नसते आणि वितरणाचीही समस्या नसते. आपण सर्वजण या प्रस्तावांवर नक्कीच विचार कराल, नवे प्रयोग कराल आणि लोकशाही अधिक भक्कम कराल याचा मला विश्वास आहे. आपणासाठी कदाचित दोन पानांचे छोटे प्रकाशन, जे संयुक्त राष्ट्रांच्या किमान भाषांमध्ये असले तरीही जगातला जास्तीत जास्त वर्ग ते पाहतो, वाचतो, दूतावासही ते पाहतात आणि आपल्या या डिजिटल आवृत्या आहेत त्या, भारताचा संदेश पोहोचवण्यासाठी आपल्याला एक मोठे माध्यम ठरू शकतात. आपण जितक्या सशक्तपणे काम कराल देश तितकाच प्रगती करेल. या विश्वासासह आपणा सर्वांचे खूप-खूप आभार! आपणा सर्वाना भेटण्याची संधीही मला मिळाली.
आपणा सर्वाना माझ्या अनेक शुभेच्छा, धन्यवाद!