नमस्कार!
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी जी, श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, श्री सुभाष देसाई जी, या विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एस. बी. मुजुमदार जी, मुख्य संचालिका डॉ विद्या येरवडेकर जी, सर्व प्राध्यापक वृंद, विशेष अतिथि आणि माझ्या युवा मित्रांनो !
आज आपण सरस्वती देवीची एक तपोभूमी जिची काही सुवर्ण मूल्ये आहेत आणि तिचा स्वतःचा सुवर्णमयी इतिहास आहे, त्या संस्थेत आहोत. याशिवाय, एक संस्था म्हणून सिम्बॉयसिस आज आपला सुवर्णमहोसत्व साजरा करत आहे. एका संस्थेच्या या वाटचालीत कितीतरी लोकांचे योगदान असते. अनेक लोकांचा सामूहिक सहभाग असतो.
ज्या विद्यार्थ्यांनी इथे शिक्षण घेतांना सिम्बॉयसिसचे द्रष्टेपण आणि मूल्ये आत्मसात केली, आपल्या यशाने सिम्बॉयसिसला एक नवी ओळख मिळवून दिली, त्या सर्वांचे देखील या प्रवासात खूप मोठे योगदान आहे. आज मी या प्रसंगी, सर्व प्राध्यापक, सर्व विद्यार्थी आणि सर्व माजी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. माल याच सुवर्णमय प्रसंगी, ‘आरोग्य धाम’ संकुलाचे लोकार्पण करण्याची संधीही मिळाली आहे. मी या नव्या प्रारंभासाठी, सिम्बॉयसिसच्या संपूर्ण कुटुंबाला अनेक अनेक शुभेच्छा देतो.
माझ्या युवा मित्रांनो,
आपण अशा एका संस्थेचा भाग आहात, जी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारताच्या मूळ विचारांवर आधारलेली आहे. मला असेही सांगण्यात आले आहे की सिम्बॉयसिस असे एक विद्यापीठ आहे, जिथे ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारावर आधारित एक वेगळा अभ्यासक्रम आहे. ज्ञानाचा व्यापक प्रसार व्हावा, ज्ञान हे संपूर्ण विश्वाला एका कुटुंबाप्रमाणे जोडण्याचे माध्यम बनावे, हीच आपली परंपरा आहे. हीच आपली संस्कृती आहे, हेच आपले संस्कार आहेत. मला अतिशय आनंद आहे की ही परंपरा आजही आपल्या देशात जिवंत आहे. मला असे सांगण्यात आले की, एकट्या सिम्बॉयसिस मध्येच, जगातील 85 देशातले 44 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आपल्या संस्कृतीचे इथल्या संस्कृतीशी आदानप्रदान करत आहेत. म्हणजेच भारताचा प्राचीन वारसा आधुनिक पद्धतीने आजही पुढे चालतो आहे.
मित्रांनो,
आज या संस्थेचे काही विद्यार्थी अशा पिढीचे प्रतिनिधित्व करत आहेत, जिच्यासमोर अनंत संधी आहेत. आज आपला हा देश जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक झाला आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकांची सर्वात मोठी स्टार्ट अप व्यवस्था विकसित होण्याचे केंद्र आपला देश ठरला आहे. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांसारखी अनेक अभियाने आपल्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करत आहेत. आजचा भारत संशोधन करत आहे, सुधारणा करत आहे आणि संपूर्ण जगावर आपली छाप पाडत आहे.
तुम्हा पुण्यात राहणाऱ्या लोकांना तर माहितीच असेल, की कोरोना लसीबाबत भारताने कशाप्रकारे जगासमोर आपले सामर्थ्य दाखवले आहे. आता युक्रेनमध्ये आलेल्या संकटातही आपण बघत आहात, की कशाप्रकारे ‘ऑपरेशन गंगा’ सुरु करुन, भारत आपल्या नागरिकांना युद्धक्षेत्रातून सुरक्षित बाहेर काढत आहे. जगातल्या मोठमोठ्या देशांना असे करण्यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे. मात्र, भारताच्या वाढत्या प्रभावामुळेच आज आपण आपल्या हजारो विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणू शकलो आहोत.
मित्रांनो,
आपली पिढी एका अर्थाने नशीबवान आहे कारण या पिढीला आधीच्या बचावात्मक, भिडस्त आणि अवलंबित्व भावना असलेल्या मानसिकतेचा त्रास नाही सहन करावा लागला. मात्र, देशात जर हे परिवर्तन आले असेल, तर याचे सगळ्यात प्रथम श्रेय देखील तुम्हालाच आहे, आपल्या युवाशक्तीला आहे. आता आपण बघा, उदाहरणार्थ, ज्या क्षेत्रांत देश आधी आपल्या पायांवर पुढे वाटचाल करण्याचा विचार देखील करत नसे, त्या क्षेत्रांत देखील आता भारत जागतिक नेतृत्व करण्याच्या मार्गावर आहे.
मोबाईल उत्पादनाचे उदाहरण देखील आपल्यासमोर आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्यासाठी मोबाईल उत्पादन आणि अशी कित्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणे याचा एकच अर्थ असे- आयात करा ! जगातून कुठूनही घेऊन या. संरक्षण क्षेत्रांत देखील कित्येक दशकांपासून आपण असेच समजत होतो की दुसरे देश जे काही देतील, त्याच्या बळावर आपण काहीही करु शकतो. मात्र आज स्थिती देखील बदलली आहे, आणि परिस्थितीही बदलली आहे. मोबाईल उत्पादनाबाबत, भारत जगातील दूसरा सर्वात मोठा देश ठरला आहे.
सात वर्षांपूर्वी भारतात केवळ दोन उत्पादन कंपन्या होत्या. आज 200 पेक्षा अधिक उत्पादन केंद्रे या कामात व्यस्त आहेत. संरक्षण क्षेत्रांत देखील, जगातील सर्वात मोठा आयातदार अशी ओळख असलेला भारत आता संरक्षण उपकरणांचा निर्यातदार ठरला आहे. आज देशात दोन मोठे संरक्षण कॉरिडॉर विकसित केले जात आहेत, जिथे अतिशय मोठी, आधुनिक शस्त्रास्त्रे तयार केली जाणार आहेत. ज्यातून देशाच्या संरक्षणविषयक गरजांची पूर्तता होणार आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या या 75 व्या वर्षी आपण एका नव्या भारताच्या उभारणीचे उद्दिष्ट समोर ठेवून पुढे वाटचाल करतो आहोत. या अमृत अभियानाचे नेतृत्व आमच्या पुढच्या पिढीलाच करायचे आहे. आज सॉफ्टवेअर उद्योगापासून ते आरोग्य क्षेत्रापर्यंत, कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय या क्षेत्रापासून ते वाहनउद्योग आणि इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत, क्वांटम कम्प्यूटिंग पासून ते मशीन लर्निंग पर्यंत, प्रत्येक क्षेत्रात नवनव्या संधी निर्माण होत आहेत. देशात, भू-अवकाशीय व्यवस्था, ड्रोन्सपासून ते सेमी कंडक्टर आणि अवकाश तंत्रज्ञानापर्यंत, सातत्याने सुधारणा होत आहेत.
या सुधारणा सरकारचा रेकॉर्ड बनवण्यासाठी नाहीत, तर या सुधारणा तुमच्यासाठी संधी घेऊन आल्या आहेत. आणि हे मी निश्चित सांगू शकतो, सुधारणा तुमच्यासाठी आहेत, युवकांसाठी आहेत. मग तुम्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत असा, व्यवस्थापन क्षेत्रात असा किंवा वैद्यकीय क्षेत्रात असा, मला असे वाटते की या ज्या सगळ्या संधी निर्माण होत आहेत, त्या फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहेत.
आज देशात जे सरकार आहे, ते देशातील युवकांच्या सामर्थ्यावर, आपल्या सामर्थ्याच्या बळावर विश्वास ठेवणारे सरकार आहे. म्हणूनच, आम्ही एकामागोमाग एक क्षेत्र आपल्यासाठी मुक्त करतो आहोत. आपण या संधीचा पुरेपूर लाभ घ्या, वाट बघू नका. आपले स्टार्ट अप्स सुरु करा, देशासमोर जी आव्हाने आहेत, ज्या स्थानिक समस्या आहेत, त्यावर विद्यापीठातून तोडगा निघायला हवा. तुम्हा युवकांच्या मेंदूतून निघायला हवा.
आपण हे नेहमीच लक्षात ठेवा, की तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात असाल, ज्या प्रकारे आपण आपल्या करियरसाठी, ध्येय निश्चित कराल, त्याप्रमाणे काही ध्येय देशासाठी देखील असायला हवीत. जर आपण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील असाल, तर आपली संशोधने, आपले काम देशासाठी कसे उपयुक्त ठरू शकेल, आपण अशी काही उत्पादने विकसित करु शकाल का, ज्यातून गावातील शेतकऱ्यांना मदत होईल, दुर्गम भागात राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांना मदत मिळेल.
त्याचप्रमाणे, जर आपण वैद्यकीय क्षेत्रातील असाल तर आपल्या देशातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा कशा सक्षम, मजबूत करता येतील, यासाठी आपण तंत्रज्ञानातील मित्रांशी चर्चा करुन काही नवी स्टार्ट अप योजना बनवू शकता. आरोग्य धाम सारखा उपक्रम ज्या विचारातून सिम्बॉयसिस मध्ये सुरु करण्यात आला आहे, ते संपूर्ण देशासाठी देखील एक मॉडेल म्हणून कामी येऊ शकेल आणि जेव्हा मी आरोग्याविषयी बोलतो आहे, तेव्हा मी आपल्याला हे ही सांगेन, की तुम्ही स्वतःच्या आरोग्याची देखील चांगली काळजी घ्या. खूप हसा, विनोद करा, मस्त फिट रहा, आणि देशाला नव्या उंचीवर घेऊन जा. आपली ध्येय जेव्हा आपल्या वैयक्तिक विकासापासून पुढे जात, राष्ट्रीय विकासाशी जोडली जातात, त्यावेळी आपल्याला आपोआपच राष्ट्रनिर्मितीत आपला सहभाग असल्याची जाणीव होऊ लागते.
मित्रहो,
आज आपण आपल्या विद्यापीठाचे पन्नासाव्या वर्षातील पदार्पण साजरे करत आहात तेव्हा माझे सिम्बायोसिस परिवाराकडे काही आग्रहाचे मागणे आहे आणि जे इथे आहेत त्या सर्वांनाही माझ्याकडून आग्रहाने विचारणा आहे की प्रत्येक वर्ष कोणत्यातरी संकल्पनेसाठी द्यायचे अशी काही एक परंपरा आपण सिम्बायोसिसमध्ये विकसित करू शकतो का? इथे जे आहेत ते कोणत्याही क्षेत्रातील असोत त्यांनी एक वर्ष आपल्या इतर कामांशिवाय या संकल्पनेसाठी कोणते ना कोणते योगदान द्यावे, सहभाग द्यावा. आता समजा, इथे सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत तर पुढील पाच वर्षे, 2022 ची संकल्पना कोणती असावी, 2023 ची संकल्पना कोणती असावी, 2027 ची संकल्पना कोणती असावी हे आपण आतापासूनच ठरवून घेऊ शकतो का?
आता बघा.. की मी एक संकल्पना मांडतो आहे. याच संकल्पनेवर काम करावं असं काही नाही, आपण स्वतः विचार करुन ठरवा. पण समजा, कल्पना करा की ग्लोबल वॉर्मिंग हा विषय घेतला. 2022- संपूर्ण वर्ष आपला हा परिवार ग्लोबल वॉर्मींगच्या प्रत्येक पैलूवर अभ्यास करेल, त्यावर संशोधन करेल, त्यासंबंधी सेमीनार करेल, त्यासंबंधी व्यंगचित्र काढेल. त्यावर कथा लिहील, त्यावरच कविता होतील, त्यावर कोणते ना कोणते यंत्र उत्पादन करेल. म्हणजे इतर बाबींबरोबर एक अतिरिक्त काम म्हणजे ही संकल्पना घ्या. इतरांनाही जागृत करा.
याच प्रकारे आपले किनारी प्रदेश आहेत किंवा समुद्रावर हवामानबदलाचा होणाऱ्या परिणामावरही आपण काम करू शकतो. अशीच एक संकल्पना घेता येऊ शकेल आपल्या सीमा भागातील प्रदेशांच्या विकासावर. ही जी आमची सीमेवरची गावे आहेत जी गावे आमच्या सीमांच्या सुरक्षेसाठी लष्कराबरोबर खांद्याला खांदा लावून मनापासून एकत्र राहतात, याप्रकारे त्यांची पिढ्यान् पिढ्या ते आपल्या देशाचे रक्षण करतात. आपल्या विद्यापीठांमार्फत आपल्या परिवारातून या सीमा भागातील प्रदेशाच्या विकासाच्या काय योजना असू शकतात? यासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी त्या प्रदेशांमध्ये फिरावे. तिकडच्या लोकांच्या अडचणी त्यांनी समजून घ्याव्यात आणि त्या अडचणींवर येथे आल्यावर चर्चा करून उत्तरे शोधावीत.
आपले विद्यापीठ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही भावना दृढ करण्यासाठी आहे. वसुधैव कुटुम्बकम हे स्वप्न तेव्हाच साकार होतं जेव्हा एक भारत श्रेष्ठ भारत हे स्वप्न प्रत्यक्षात येईल. विद्यापीठात एका प्रदेशातील विद्यार्थी दुसऱ्या प्रदेशातील भाषांमधील काही शब्द शिकले तर ते अजूनच उत्तम होईल. सिम्बॉयसिसचा विद्यार्थी इथे शिकून बाहेर पडेल तेंव्हा मराठीबरोबरच भारताच्या कोणत्याही इतर पाच भाषांमधील किमान शंभर शब्द त्याच्या डोक्यात पक्के बसलेले असतील आणि त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग सुद्धा त्याला करता येईल हे उद्दिष्ट आपण बाळगू शकाल.
आपला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास कितीतरी समृद्ध आहे. या इतिहासातील एखादा पैलू डिजिटल करायचे काम सुद्धा आपण करू शकता. देशातील तरुण वर्गाला एनएसएस एनसीसी या धर्तीवरच्या एखाद्या नवीन उपक्रमाला प्रोत्साहन देऊ शकतो. यावर सुद्धा हा पूर्ण परिवार एक काम करू शकतो. जसे जलसंरक्षणाचा विषय असो, कृषी व तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याचा विषय असो, माती परीक्षण ते अन्न उत्पादनांचे दुर्भिक्ष आणि नैसर्गिक शेतीपर्यंत ज्या विषयांसंबधी आपण संशोधनापासून जलजागृतीपर्यंत कोणत्याही उद्देशाने काम करू शकतो असे अनेक विषय आहेत.
हे विषय कोणते असावेत याचा निर्णय मी आपल्यावर सोडतो. परंतु देशाच्या गरजा, देशातील अडचणीं यांवर उपाय शोधण्याच्या दृष्टीने, हे लक्षात घेत आपण पण असे विषय निवडावेत की आपण सारा तरुण वर्ग, सारी तरुण डोकी एकत्र येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधा, व्यवस्था यासंदर्भात काही ना काही काही उपाय योजना देऊ असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.
आणि मी आवर्जून सांगतो की आपल्या संकल्पना आणि अनुभव आपण सरकारलासुद्धा कळवा. या संकल्पना वर काम केल्यानंतर आपला रीसर्च, आपले रिझल्ट, आपल्या कल्पना, आपल्या उपाय योजना प्रधानमंत्री कार्यालयाला पाठवू शकता.
मला विश्वास आहे की येथील प्राध्यापक, विद्यार्थी हे सर्व मिळून जेंव्हा या अभियानाचा भाग बनतील तेंव्हा अगदी चांगले परिणाम मिळतील. आपण कल्पना करा की आज आपण 50 वे वर्ष साजरे करत आहात. पुढे 75 वे वर्ष साजरे कराल आणि या पंचवीस वर्षात देशासाठी पंचवीस संकल्पनांवर पन्नास पन्नास हजारांनी काम केलेले असेल. केवढे मोठा संचित आपण देशाला देत आहोत आणि मला कळू शकतं की याचा सर्वात जास्त फायदा सिम्बॉयसिसच्या विद्यार्थ्यांनाच होईल.
शेवटी सिम्बॉयसिसच्या विद्यार्थ्यांना अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. या संस्थेत असताना आपल्याला आपल्या प्रोफेसरांकडून, शिक्षकांकडून आपल्या सहकाऱ्यांपासून खूप काही शिकायला मिळाले असेल. मी आपल्याला एक सांगेन की आत्मसन्मान, संशोधनवृत्ती आणि धोका पत्करण्याची वृत्ती ही नेहमीच दृढ ठेवा. याच भावनेने आपण आपल्या जीवनात पुढे जाल याची मला खात्री आहे; आणि विश्वासही आहे. आपल्याकडे 50 वर्षांच्या अनुभवाची शिदोरी आहे. आपल्या वाटचालीत अनेक प्रयोग करत आपण येथपर्यंत आला आहात. आपल्याकडे हा एक खजिनाच आहे जणू. हा खजिना देशाला उपयोगी पडेल. आपण मोठे व्हा आणि इथे येणारा प्रत्येक आपल्या उज्वल भविष्याची खात्री घेऊन आत्मविश्वासाने बाहेर पडेल याच माझ्या आपणास शुभेच्छा.
मी पुन्हा एकदा आपले धन्यवाद यासाठी मानतो की मला किती तरी वेळा आपल्याकडे येण्याचा योग होता, पण येऊ शकलो नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा एकदा आपल्याकडे नक्की आलो होतो. आजही या पवित्र धरतीवर येण्याची संधी मिळाली आहे. मी आपला खूप आभारी आहे की मला या नवीन पिढीबरोबर ओळख करून घेण्याची संधी मिळाली.
खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार !!