सुमारे 14,850 कोटी रुपये खर्चाने 296 किमी लांबीच्या चार मार्गिका असलेल्या या द्रुतगती मार्गाची उभारणी
या द्रुतगती मार्गामुळे या भागातील दळणवळण आणि औद्योगिक विकासाला मिळणार चालना
“यूपी द्रुतगती प्रकल्प राज्यातील अनेक दुर्लक्षित भागांना जोडत आहेत”
“उत्तर प्रदेशातील प्रत्येक भाग नवी स्वप्ने आणि नवे संकल्प घेऊन पुढे जाण्यासाठी सज्ज”
“अनेक आधुनिक राज्यांना मागे टाकू लागल्यामुळे देशात यूपीची ओळख बदलत आहे”
“नियोजित वेळेपूर्वीच प्रकल्प पूर्ण होऊ लागल्यामुळे आपण जनतेने दिलेला कौल आणि त्यांचा विश्वास यांचा सन्मान करत आहोत”
“आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची आपण आठवण ठेवली पाहिजे आणि पुढील महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून नव्या संकल्पांचे एक वातावरण तयार केले पाहिजे”
“देशाची हानी करणाऱ्या, विकासावर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टींना दूर ठेवले पाहिजे”
“डबल इंजिनची सरकारे मोफत भेटींच्या शॉर्टकटचा आणि ‘रेवडी’ संस्कृतीचा अंगिकार करत नाही आहेत आणि कठोर परिश्रमांनी परिणाम साध्य करत आहेत”
“देशाच्या राजकारणातून मोफत वाटपाच्या संस्कृतीचे उच्चाटन करा आणि त्यांना पराभूत करा”
“संतुलित विकासाने सामाजिक न्याय साध्य होतो”

भारत माता की – जय, भारत माता की - जय, भारत माता की - जय,  वेदव्यास यांचे जन्मस्थळ बुंदेलखंड इथे आणि आमच्या महाराणी  लक्ष्मीबाई यांच्या भूमीवर आम्हाला पुन्हा भेट देण्याची संधी मिळाली आहे. आम्हाला खूप आनंद झाला आहे.  नमस्कार!

उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री  केशव प्रसाद मौर्य जी, उप-मुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि इथले रहिवासी भानूप्रताप सिंह जी, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्रिगण, खासदार, आमदार, अन्य लोक प्रतिनिधी आणि  बुंदेलखंडच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

उत्तर प्रदेशच्या जनतेचे, बुंदेलखंडच्या सर्व बंधू आणि भगिनींचे आधुनिक बुंदेलखंड एक्सप्रेसवे बद्दल  खूप खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा. हा द्रुतगती मार्ग बुंदेलखंडच्या गौरवशाली परंपरेला समर्पित आहे. ज्या भूमीत  असंख्य शूर वीर जन्माला आले,  जिथल्या रक्तात भारतभक्ति वाहत आहे, जिथे मुला-मुलीच्या शौर्याने आणि परिश्रमाने  देशाचे नाव नेहमीच उज्वल केले आहे, त्या बुंदेलखंड भूमीला आज उत्तर प्रदेशचा  खासदार म्हणून , उत्तर प्रदेशचा लोकप्रतिनिधी म्हणून  द्रुतगती मार्गाची ही भेट देताना मला विशेष आनंद होत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

मी अनेक दशकांपासून उत्तर प्रदेशला भेट देत आहे. उत्तर प्रदेशच्या आशीर्वादाने गेली आठ वर्षे देशाचा प्रधान सेवक म्हणून काम करण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी  माझ्यावर सोपवली आहे. मात्र  मी नेहमीच पाहिले आहे की, उत्तर प्रदेशमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट केल्या, तिथल्या त्रुटी पूर्ण केल्या तर  उत्तर प्रदेश आव्हानांना सामोरे जाण्यासाठी  मोठ्या ताकदीने उभा राहील.

पहिला मुद्दा इथल्या वाईट कायदा आणि सुव्यवस्थेचा होता . मी यापूर्वीच्या स्थितीबद्दल बोलत आहे. तुम्हाला माहिती आहे की काय परिस्थिती होती आणि दुसरा मुद्दा सर्वच प्रकारे खराब  दळणवळण सुविधांचा होता. आज योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातील जनतेने मिळून उत्तर प्रदेशचे संपूर्ण चित्र पालटून टाकले आहे. योगीजींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था देखील सुधारली आहे आणि कनेक्टिव्हिटी देखील वेगाने सुधारत आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांमध्ये उत्तर प्रदेशात वाहतुकीच्या आधुनिक साधनांसाठी जेवढे काम झाले  आहे, त्यापेक्षा अधिक काम आज होत आहे.  मी तुम्हाला विचारतो  आहे की होत आहे की नाही? होत आहे की नाही? डोळ्यांसमोर दिसत आहे की दिसत नाही? बुंदेलखंड एक्स्प्रेसवे मुळे चित्रकूट ते दिल्ली हे अंतर सुमारे  3-4 तासांनी कमी झाले असले तरी त्याचा फायदा त्याहून कित्येक पटीने अधिक आहे. या एक्स्प्रेसवे मुळे येथील वाहनांचा वेग तर वाढणार आहेच, शिवाय  संपूर्ण बुंदेलखंडच्या औद्योगिक प्रगतीलाही यामुळे गती मिळणार आहे. या द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक उद्योगधंदे उभारले जाणार आहेत, येथे साठवणूक सुविधा, शीतगृह  सुविधा  उभारल्या जाणार आहेत. बुंदेलखंड द्रुतगती मार्गामुळे या भागात कृषी आधारित उद्योग उभारणे खूप सोपे होणार आहे, शेतमाल नवीन बाजारपेठेत पोहचवणे  सोपे होणार आहे.  बुंदेलखंड इथे तयार होत असलेल्या संरक्षण कॉरिडॉरला देखील यामुळे मोठी मदत मिळणार आहे.म्हणजेच हा  द्रुतगती मार्ग बुंदेलखंडच्या कानाकोपऱ्याला  विकास, स्वयं रोजगार आणि नव्या संधींशी देखील जोडणार आहे.

मित्रांनो,

एक काळ होता, जेव्हा असे मानले जात होते की वाहतुकीच्या आधुनिक साधनांवर  पहिला अधिकार केवळ मोठ्या शहरांचाच आहे. मुंबई असो, चेन्नई असो, कोलकाता असो, बंगलोर असो, हैदराबाद, दिल्ली असो, त्यांना सर्व काही मिळत असे. मात्र आता सरकार बदलले आहे, स्वभावही बदलला आहे आणि हे मोदी आहेत, हे योगी आहेत, आता ती जुनी विचारसरणी मागे टाकून आपण आता नव्या मार्गाने पुढे जात आहोत. उत्तर प्रदेशमध्ये 2017 पासून  कनेक्टिव्हिटीची जी कामे सुरु झाली, त्यात मोठ्या शहरांसोबतच छोट्या शहरांनाही तेवढेच  प्राधान्य देण्यात आले आहे. हा बुंदेलखंड द्रुतगती मार्ग चित्रकूट, बांदा, हमीरपूर, महोबा, जालौन, औरैया आणि इटावामधून जातो.  पूर्वांचल एक्सप्रेस वे लखनौ बरोबरच बाराबंकी, अमेठी, सुलतानपूर, अयोध्या, आंबेडकर नगर, आझमगड, मऊ आणि गाझीपूरमधून जात आहे. गोरखपूर लिंक एक्सप्रेसवे आंबेडकरनगर, संत कबीरनगर आणि आझमगड यांना जोडतो. गंगा एक्सप्रेसवे मेरठ, हापूड , बुलंदशहर, अमरोहा, संभल, बदाऊन, शाहजहानपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराज यांना जोडण्याचे काम करेल. असे दिसत आहे की किती मोठी ताकद निर्माण होत आहे. उत्तर प्रदेशचा प्रत्येक कोपरा नवीन स्वप्ने आणि संकल्पांसह वेगाने धावण्यासाठी सज्ज झाला आहे आणि हाच तर सबका साथ, सबका विकास आहे . कोणीही मागे राहू नये, सर्वांनी मिळून पुढे जाऊ, या दिशेने दुहेरी इंजिनचे सरकार निरंतर काम करत आहे. उत्तर प्रदेशातील छोटे छोटे  जिल्हे हवाई सेवेने जोडले जावेत, त्यासाठीही  वेगाने काम सुरू आहे. गेल्या काही वर्षात प्रयागराज, गाझियाबाद येथे नवीन विमानतळ टर्मिनल, कुशीनगर येथे नवीन विमानतळ तसेच नोएडा मधील जेवर  येथे आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येत आहे. भविष्यात उत्तर प्रदेशातील आणखी अनेक शहरे  हवाई मार्गाने जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा सुविधांमुळे  पर्यटन उद्योगालाही खूप बळ मिळते. आणि आज जेव्हा मी इथे मंचावर येत होतो, त्याआधी मी या बुंदेलखंड एक्सप्रेस वे चे सादरीकरण  पाहत होतो, एक मॉड्यूल होते,ते  पाहत होतो, आणि मी पाहिले की या एक्सप्रेस वे च्या शेजारी जी ठिकाणे आहेत , तिथे अनेक किल्ले आहेत, केवळ झाशीचा एकच किल्ला आहे असे नाही, अनेक किल्ले आहेत. तुमच्यापैकी ज्यांना परदेशातील जग माहीत आहे त्यांना ठाऊक  असेल, युरोपमध्ये  अनेक देश असे आहेत जिथे किल्ले पाहण्याचा एक खूप मोठा पर्यटन उद्योग चालतो आणि जगभरातून लोक जुने किल्ले पाहायला येतात. आज बुंदेलखंड एक्स्प्रेस वे बनल्यानंतर मी योगीजींच्या सरकारला सांगेन की, तुम्हीही हे किल्ले पाहण्यासाठी भव्य सर्किट टुरिझम निर्माण करा ,  जगभरातून पर्यटक इथे यावेत  आणि माझ्या बुंदेलखंडचे हे सामर्थ्य पहावे. एवढेच नाही तर आज मी योगीजींना आणखी एक विनंती करणार आहे,  उत्तर प्रदेशातील युवकांसाठी  जेव्हा थंडीचा हंगाम सुरू होईल , तेव्हा पारंपारिक मार्गाने नव्हे तर सर्वात अवघड मार्गाने किल्ले चढण्याची स्पर्धा आयोजित करा आणि युवकांना बोलवा,  कोण सर्वात लवकर  चढाई करेल , कोण गडावर स्वारी करेल . तुम्ही पहाल  की उत्तर प्रदेशातील हजारो युवक या स्पर्धेत सहभागी  होण्यासाठी येतील आणि त्यानिमित्ताने  लोक बुंदेलखंडमध्ये येतील,  रात्री मुक्काम करतील , थोडा खर्च करतील, उदरनिर्वाहासाठी खूप मोठी ताकद उभी राहील. मित्रांनो, एक एक्सप्रेसवे किती प्रकारच्या कामांना संधी मिळवून देतो.

मित्रांनो,

डबल इंजिनाच्या सरकारच्या राज्यात आज यूपी, ज्या प्रकारे आधुनिक होत आहे ते खरोखरच अभूतपूर्व आहे. ज्या यूपीमध्ये जरा लक्षात ठेवा मित्रांनो मी काय म्हणतोय ते. लक्षात ठेवाल? लक्षात ठेवाल? जरा हात वर करून सांगा लक्षात ठेवाल? नक्की लक्षात ठेवाल? पुन्हा पुन्हा लोकांना सांगाल? तर मग लक्षात ठेवा ज्या यूपीमध्ये शरयू कालवा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 40 वर्षे लागली, ज्या यूपीमध्ये गोरखपुर फर्टिलायजर प्लांट गेल्या 30 वर्षांपासून बंद पडला होता, ज्या यूपीमध्ये अर्जुन धरण प्रकल्प पूर्ण व्हायला 12 वर्षे लागली,ज्या यूपीमध्ये अमेठी रायफल कारखाना केवळ एक फलक लावून पडून होता, ज्या यूपीमध्ये रायबरेली रेल्वे कोच कारखाना डबे तयार करत नव्हता, केवळ डब्यांची रंगरंगोटी करून काम चालवले जात होते, त्याच यूपीमध्ये आता पायाभूत सुविधांवर इतक्या गांभीर्याने काम होत आहे की त्याने आता चांगल्या चांगल्या राज्यांना देखील मागे टाकले आहे मित्रांनो. संपूर्ण देशात आता यूपीची ओळख बदलू लागली आहे. तुम्हाला अभिमान वाटतो की नाही? आज यूपीचे नाव सर्वत्र प्रसिद्ध होत आहे, तुम्हाला अभिमान वाटत आहे की नाही वाटत आहे? आता संपूर्ण हिन्दुस्तान यूपीकडे अतिशय चांगल्या भावनेने पाहत आहे. तुम्हाला आनंद होत आहे की नाही होत आहे?

आणि मित्रांनो,

मुद्दा केवळ हायवे किंवा एयरवेचा नाही आहे. शिक्षणाचे क्षेत्र असो, मॅन्युफॅक्चरिंगचे क्षेत्र असो, शेती- शेतकरी असो, यूपी प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात यूपीमध्ये दरवर्षी, हे देखील लक्षात ठेवा. ठेवाल? ठेवाल? जरा हात वर करून सांगा ठेवाल का?  पूर्वीच्या सरकारच्या काळात यूपीमध्ये दरवर्षी सरासरी 50 किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण होत असे. किती किलोमीटर? किती? पूर्वी आम्ही येण्यापूर्वी रेल्वेचे दुपदरीकरण 50 किलोमीटर. माझ्या उत्तर भारताच्या तरुण वर्गाचे भविष्य कसे तयार होते. बघा आज सरासरी 200 किलोमीटरचे काम होत आहे. 200 किलोमीटर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण होत आहे. 2014 च्या आधी यूपी मध्ये केवळ 11 हजार सामाईक सेवा केंद्रे होती. जरा आकडे लक्षात ठेवा. किती? किती? 11 हजार. आज यूपीमध्ये एक लाख 30 हजारपेक्षा जास्त सामाईक सेवा केंद्रे काम करत आहेत. ही संख्या लक्षात ठेवाल?  एके काळी यूपीमध्ये केवळ 12 मेडिकल कॉलेज असायची. आकडेवारी लक्षात  राहील, जरा जोरात सांगा? 12 मेडिकल कॉलेज। आज यूपीमध्ये 35 पेक्षा जास्त मेडिकल कॉलेज आहेत आणि 14 नव्या मेडिकल कॉलेजवर काम सुरू आहे. कुठे 14 आणि कुठे 50.

बंधू आणि भगिनींनो

विकासाच्या ज्या प्रवाहात देशाची वाटचाल सुरू आहे, त्याचे मुख्यत्वे  दोन प्रमुख पैलू आहेत. एक आहे विचार आणि दुसरा आहे मर्यादा. आम्ही देशाच्या वर्तमानासाठी नव्या सुविधाच नाही तर देशाच्या भविष्याची देखील निर्मिती करत आहोत. पीएम गतिशक्ति नॅशनल मास्टर प्लानच्या माध्यमातून आम्ही 21व्या शतकातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये गुंतलेलो आहोत.

आणि मित्रांनो,

विकासाकरता आमचा सेवाभाव असा आहे की आम्ही वेळेची मर्यादा तोडू देत नाही. आम्ही वेळेचे पालन कसे करतो याची अनेक उदाहरणे आपल्या याच उत्तर प्रदेशात आहेत. काशीमध्ये विश्वनाथ धामच्या सुशोभीकरणाचे काम आमच्या सरकारने सुरू केले आणि आमच्याच सरकारने ते पूर्ण करून दाखवले.

गोरखपुर एम्स चे भूमीपूजन देखील आमच्या सरकारने केले आणि त्याचे लोकार्पण देखील याच सरकारच्या काळात झाले. दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेचे भूमीपूजन देखील आमच्या सरकारने केले आणि त्याचे लोकार्पण देखील आमच्या सरकारच्या काळात झाले. बुंदेलखंड एक्सप्रेसवे हे देखील याचेच उदाहरण आहे. याचे काम पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होणार होते पण हा महामार्ग 7-8 महीने आधीच सेवेसाठी सज्ज आहे माझ्या मित्रांनो. आणि कोरोनाच्या परिस्थितीनंतर किती अडचणी आहेत याची प्रत्येक कुटुंबाला जाणीव आहे. या अडचणी असून देखील त्यांना तोंड देत आम्ही हे काम वेळेआधी पूर्ण केले आहे. अशाच प्रकारच्या कामांमुळे प्रत्येक देशवासियाच्या मनात ही भावना निर्माण होते की ज्या भावनेने त्याने आपले मत दिले, त्याचा खऱ्या अर्थाने सन्मान होत आहे, सदुपयोग होत आहे. यासाठी मी योगीजी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो. 

मित्रांनो,

ज्यावेळी मी एका रस्त्याचे उद्घाटन करतो, एखाद्या रुग्णालयाचे उद्घाटन करतो, एखाद्या कारखान्याचे उद्घाटन करतो तेव्हा माझ्या मनात एकच भावना असते की ज्या मतदारांनी हे सरकार स्थापन केले आहे मी त्यांचा आदर करत आहे आणि देशातील सर्व मतदारांना सुविधा देत आहे.

मित्रांनो,

आज संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. आपण आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याचे पर्व साजरे करत आहोत. पुढील 25 वर्षात भारत ज्या उंचीवर असेल त्याचा आराखडा तयार करत आहोत. आणि आज ज्यावेळी मी बुंदेलखंडच्या भूमीवर आलो आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या भागात आलो आहे. या ठिकाणी येथील वीर भूमीवरून मी हिंदुस्तानच्या सहा लाखांपेक्षा जास्त गावांमधील लोकांना हात जोडून विनंती करत आहे की आज आपण जे स्वातंत्र्याचे पर्व साजरे करत आहोत त्यासाठी  शेकडो वर्षे आपल्या पूर्वजांनी संघर्ष केला आहे, हौतात्म्य पत्करले आहे, यातना सहन केल्या आहेत. पाच वर्षे असताना, आपले हे उत्तरदायित्व आहे की आतापासूनच नियोजन करा, येत्या एका महिन्यात 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक गावात अनेक कार्यक्रम झाले पाहिजेत, गावांनी एकत्रितपणे कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या योजना तयार करा. वीरांचे स्मरण करा, हुतात्म्यांचे स्मरण करा, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करा, प्रत्येक गावामध्ये नवा संकल्प करण्यासाठी एक वातावरण तयार झाले पाहिजे. आज वीरांच्या भूमीवरून मी सर्व देशवासियांना ही विनंती करत आहे.

मित्रांनो,

आज भारतात असे कोणतेही काम होता कामा नये ज्याचा संबंध वर्तमानातील आकांक्षा  आणि भारताचे उज्ज्वल भवितव्या याच्याशी संबंध नसेल. आपण कोणताही निर्णय घेणार असू, कोणतेही धोरण तयार करणार असू त्यामागे सर्वात मोठा विचार हा असला पाहिजे यामुळे देशाचा विकास आणखी वेगवान व्हावा. अशी प्रत्येक गोष्ट ज्यामुळे देशाची हानी होईल, देशाच्या विकासावर परिणाम होईल, अशा गोष्टींना त्यापासून आपल्याला नेहमीच, नेहमीच दूर ठेवले पाहिजे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर भारताला विकासाची ही सर्वात चांगली संधी मिळाली आहे. आपल्याला या कालखंडात देशाचा जास्तीत जास्त विकास करून त्याला नव्या उंचीवर न्यायचे आहे, नवा भारत तयार करायचा आहे. 

मित्रांनो,

नव्या भारतासमोर एक असे आव्हान आहे, ज्याकडे आताच लक्ष दिले नाही तर भारताच्या युवा वर्गाचे आताच्या पिढीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकेल. तुमचा वर्तमानकाळाची दिशाभूल होऊ शकते आणि तुमचा भविष्यकाळ अंधःकारातून झाकोळून जाईल मित्रांनो. म्हणूनच आतापासूनच जागे राहणे गरजेचे आहे. सध्या आपल्या देशात मोफत भेटींच्या रेवड्या वाटून मते गोळा करण्याची संस्कृती आणण्याचे पुरेपूर प्रयत्न होत आहेत. ही रेवडी संस्कृती आपल्या देशाच्या विकासाकरता अतिशय घातक आहे. या रेवडी संस्कृतीपासून आपल्या देशातील लोकांनी विशेषतः माझ्या युवा वर्गाने खूप जास्त सावध राहण्याची गरज आहे. रेवडी संस्कृतीचे लोक तुमच्यासाठी नवीन द्रुतगती महामार्ग, नवीन विमानतळ किंवा संरक्षण कॉरिडॉर कधीच बांधणार नाहीत. जनता जनार्दनला मोफत रेवडी वाटून त्यांना विकत घेईल, असे रेवडी संस्कृतीतील लोकांना वाटते. आपण सर्वांनी मिळून त्यांच्या या विचारसरणीला हवायचे आहे, देशाच्या राजकारणातून रेवडी संस्कृती हटवायची आहे.

मित्रांनो,

रेवडी संस्कृतीला बाजूला सारुन देशात रस्ते बांधणे, नवीन रेल्वे मार्ग बनवून लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे काम आम्ही करत आहोत. आम्ही गरिबांसाठी कोट्यवधी पक्की घरे बांधत आहोत, अनेक दशकांपासून अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करत आहोत, अनेक छोटी-मोठी धरणे बांधत आहोत, नवीन विद्युत कारखाने उभारत आहोत, जेणेकरून गरिबांचे, शेतकऱ्याचे जीवन सुसह्य व्हावे आणि माझ्या देशातील तरुणांचे भविष्य अंधारात बुडू नये.

मित्रांनो,

या कामासाठी कष्ट घ्यावे लागतात, रात्रंदिवस खपावे लागते, जनतेच्या सेवेसाठी स्वत:ला झोकून द्यावे लागते.  मला आनंद आहे की देशात जिथे आमचे डबल इंजिनचे सरकार आहे, ते विकासासाठी खूप मेहनत घेत आहेत.  डबल इंजिनचे सरकार मोफत रेवडी वाटण्याचा शॉर्टकट स्वीकारत नाही, राज्याचे भविष्य सुधारण्यासाठी डबल इंजिनचे सरकार प्रयत्नशील आहे.

मित्रांनो,

आज मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगणार आहे. देशाचा समतोल विकास, लहान शहरे आणि खेड्यांमध्येही आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, हे कामही खर्‍या अर्थाने सामाजिक न्यायाचे काम आहे.  पूर्व भारतातील लोकांना, ज्या बुंदेलखंडमधील लोकांना अनेक दशके सुविधा नाकारल्या जात होत्या, आज जेव्हा तेथे आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत, तेव्हा सामाजिक न्यायही होतच आहे. उत्तर प्रदेशातील आधी मागास म्हणून परीस्थितीच्या हवाल्यावर सोडलेल्या जिल्ह्यात आज विकास होत आहे हाही एक प्रकारचा सामाजिक न्यायच आहे.  गावेच्यागावे रस्त्यांनी जोडण्यासाठी जलद गतीने काम करणे, घरोघरी एलपीजी जोडणी देणे, गरिबांना पक्के घर देणे, घरोघरी शौचालये बांधणे ही सर्व कामेही सामाजिक न्यायाला बळकटी देणारी पावले आहेत. आमच्या सरकारच्या सामाजिक न्यायाच्या कामांचा बुंदेलखंडच्या लोकांनाही खूप फायदा होत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

बुंदेलखंड पुढचे आणखी एक आव्हान कमी करण्यासाठी आमचे सरकार सतत काम करत आहे. प्रत्येक घरात जलवाहिनी द्वारे पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही जल जीवन मिशनवर काम करत आहोत. या अभियानांतर्गत बुंदेलखंडमधील लाखो कुटुंबांना पाण्याची जोडणी देण्यात आली आहे. आमच्या माता, भगिनींना याचा खूप फायदा झाला आहे, यामुळे त्यांच्या जगण्यातील अडचणी कमी झाल्या आहेत. बुंदेलखंडमधील नद्यांचे पाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. रतौली धरण प्रकल्प, भावनी धरण प्रकल्प आणि मझगांव-चिल्ली तुषार सिंचन प्रकल्प हे अशाच प्रयत्नांचे फलित आहेत.  केन-बेतबा जोड प्रकल्पासाठी हजारो कोटींचा निधी मंजूर झाला आहे.  यामुळे बुंदेलखंडमधील मोठ्या भागाचे जीवन बदलणार आहे.

मित्रांनो,

बुंदेलखंडच्या मित्रांना माझे आणखी एक आग्रहाचे सांगणे आहे.  स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने देशाने, अमृत सरोवरांची निर्मिती करण्याचा संकल्प सोडला आहे.  बुंदेलखंडच्या प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर बांधले जातील.  पाणी सुरक्षेसाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी हे मोठे काम होत आहे. मी आज तुम्हा सर्वांना या उदात्त कार्यात मदत करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने पुढे येण्यास सांगेन. अमृत सरोवरासाठी गावोगाव तार सेवा मोहीम राबवली जायला हवी.

बंधू आणि भगिनींनो,

बुंदेलखंडच्या विकासात येथील कुटीर उद्योगांचाही मोठा वाटा आहे.  आत्मनिर्भर भारतासाठी या कुटीर परंपरेवरही आपले सरकार भर देत आहे. भारताच्या या कुटीर परंपरेमुळे मेक इन इंडिया सशक्त होणार आहे.  मला आज  तुम्हाला आणि देशवासियांना एक उदाहरण द्यायचे आहे की छोटे प्रयत्न किती मोठा प्रभाव पाडू शकतात.

मित्रांनो,

भारत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची खेळणी जगातील इतर देशांतून आयात करत आला आहे. आता सांगा लहान मुलांसाठी छोटी खेळणीही बाहेरून आणली जात होती. खेळणी बनवणे हा भारतातील कौटुंबिक आणि पारंपारिक उद्योग, व्यवसाय राहिला आहे. ते पाहता मी भारतातील खेळणी उद्योगाला नव्याने काम करण्याचे आवाहन केले होते. लोकांना भारतीय खेळणी खरेदी करण्याचे आवाहनही केले होते. एवढ्या कमी वेळात सरकारी पातळीवर जे काम होणे गरजेचे होते तेही आम्ही केले. या सगळ्याचा परिणाम असा झाला की आज.. आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, माझ्या देशातील लोक सत्य कसे मनापासून स्वीकारतात याचे हे उदाहरण आहे. या सगळ्याचा परिणाम असा झाला की आज परदेशातून येणाऱ्या खेळण्यांची संख्या खूप कमी झाली आहे. मी देशवासीयांचे आभार मानतो. एवढेच नाही तर आता भारतातून मोठ्या प्रमाणात खेळणी परदेशात जाऊ लागली आहेत. याचा फायदा कोणाला झाला? आपले बहुतेक खेळणी निर्माते गरीब कुटुंबे आहेत, दलित कुटुंबे आहेत, मागास कुटुंबे आहेत, आदिवासी कुटुंबे आहेत. खेळणी बनवण्याच्या कामात आमच्या महिलांचा सहभाग असतो. आमच्या या सर्व लोकांना या उद्योगाचा फायदा झाला आहे. झाशी, चित्रकूट, बुंदेलखंडमध्ये खेळण्यांची खूप समृद्ध परंपरा आहे. यांनाही दुहेरी इंजिनच्या सरकारद्वारे प्रोत्साहित केले जात आहे.

मित्रांनो,

शूरवीरांची भूमी असलेल्या बुंदेलखंडच्या वीरांनी मैदानावरही विजयाची पताका फडकवली आहे.  देशातील सर्वात मोठा क्रीडा सन्मान आता बुंदेलखंडचे सुपुत्र मेजर ध्यानचंद यांच्या नावावर आहे. ज्या मेरठमध्ये ध्यानचंदजींनी बराच काळ व्यतीत केला होता, तिथे त्यांच्या नावाने क्रीडा विद्यापीठही बांधले जात आहे. काही काळापूर्वी झाशीची आमची कन्या शैली सिंगनेही एक अद्भुत काम केले होते.  आपल्याच बुंदेलखंडची कन्या शैली सिंग हिने लांब उडीत नवा विक्रम रचला आहे आणि गेल्या वर्षी वीस वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.  बुंदेलखंड अशा तरुण प्रतिभावंतांनी भरलेले आहे. येथील तरुणांना पुढे जाण्यासाठी भरपूर संधी मिळाव्यात, येथून होणारे स्थलांतर थांबावे, येथे आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात, या दिशेने आमचे सरकार काम करत आहे. उत्तर प्रदेश, सुशासनाची नवीन ओळख दृढ करत राहो, या शुभेच्छांसह, बुंदेलखंड द्रुतगती महामार्गासाठी तुम्हा सर्वांचे पुन्हा खूप अभिनंदन, आणि मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो की, 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण महिना भारतातील प्रत्येक घरात, प्रत्येक गावात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा झाला पहिजे, दिमाखात साजरा केला पाहिजे, तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद. संपूर्ण ताकदीने बोला भारत माता की - जय, भारत माता की - जय, भारत माता की - जय, खूप खूप धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi