मणिपूरचे राज्यपाल ला गणेशन, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह जी , उपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार सिंह जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी भूपेंद्र यादव जी, राजकुमार रंजन सिंह जी, मणिपूर सरकारमधील मंत्री बिस्वजीत सिंह जी, लोसी डिखो जी, लेत्पाओ हाओकिप जी, अवांगबाओ न्यूमाई जी, एस राजेन सिंह जी, वुंगजागिन वाल्ते जी, सिंग जी, सत्यव्रत्य सिंह जी, हे लुखोई सिंह जी , संसदेतील माझे सहकारी, आमदार, अन्य लोकप्रतिनिधी आणि मणिपूरच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो! खुरुमजरी!
मी मणिपूरच्या महान भूमीला, येथील लोकांना आणि इथल्या गौरवशाली संस्कृतीला नतमस्तक होऊन वंदन करतो.वर्षाच्या सुरुवातीला मणिपूरला येणे , तुम्हाला भेटणे , तुमच्याकडून इतके प्रेम मिळणे , आशीर्वाद मिळणे , यापेक्षा आयुष्यातला मोठा आनंद कोणता असू शकतो.आज जेव्हा मी विमानतळावर उतरलो, विमानतळावरून इथे आलो - सुमारे 8-10 किलोमीटरचा मार्ग पूर्णपणे लोकांनी,त्यांच्या उर्जेने, रंगांनी भरला होता. एक प्रकारे संपूर्ण मानवी भिंत, 8-10 किमीची मानवी भिंत; हे आदरातिथ्य, हे तुमचे प्रेम, हे तुमचे आशीर्वाद कोणीही कधीच विसरू शकत नाही.तुम्हा सर्वांना वर्ष 2022 च्या खूप खूप शुभेच्छा.
मित्रांनो,
आतापासून काही दिवसांनी म्हणजे 21 जानेवारीला मणिपूरला राज्याचा दर्जा मिळून 50 वर्षे पूर्ण होतील. सध्या देश आपल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने अमृत महोत्सवही साजरा करत आहे.ही वेळ त्याचीच एक महान प्रेरणा आहे.हे मणिपूर आहे जेथे राजा भाग्य चंद्र आणि पु खेतिन्थांग सिथलो यांसारख्या वीरांचा जन्म झाला होता. येथील मोइरांगच्या भूमीने देशवासीयांमध्ये स्वातंत्र्याचा जो विश्वास निर्माण केला आहे,हे त्याचेच एक उदाहरण आहे.आणि हो , नेताजी सुभाष यांच्या सैन्याने पहिल्यांदाच ध्वज फडकवला होता, तो ईशान्य भाग ज्याला नेताजींनी भारताच्या स्वातंत्र्याचे प्रवेशद्वार म्हटले होते, आज ते नवीन भारताच्या स्वप्नांच्या पूर्ततेचे प्रवेशद्वार बनत आहे.
देशाचा पूर्व भाग, ईशान्य भाग हा भारताच्या विकासाचा प्रमुख स्त्रोत बनेल, असे मी यापूर्वीही म्हटले आहे. आज आपण पाहत आहोत की, मणिपूर आणि ईशान्य भाग हे भारताच्या भविष्यात कशाप्रकारे नवीन रंग भरत आहेत.
मित्रांनो,
आज येथे एकाच वेळी अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले आहे. विकासाचे विविध मणी आहेत, ज्याचे हार मणिपूरच्या लोकांचे जीवन सुसह्य करतील , सना लईबाक मणिपूरच्या वैभवात आणखी भर घालेल. इंफाळच्या एकात्मिक कमांड आणि नियंत्रण केंद्रामुळे शहराची सुरक्षाही वाढेल आणि सुविधांचाही विस्तार होईल. बराक नदीवरील पुलाद्वारे मणिपूरच्या जीवनवाहिनीला सर्व प्रकारच्या हवामानाला अनुरूप एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळत आहे. थोउबाल बहुउद्देशीय प्रकल्पासोबतच, तामेन्गलाँगमधील पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून दुर्गम जिल्ह्यातील सर्व लोकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठयाची सोय होत आहे.
मित्रांनो,
आठवा,काही वर्षांपूर्वीपर्यंत मणिपूरमध्ये जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठयाची सुविधा किती कमी होती.केवळ 6 टक्के लोकांच्याच घरात जलवाहिनीने पाणीपुरवठा होत होता पण आज मणिपूरच्या जनतेपर्यंत 'जल-जीवन मिशन' नेण्यासाठी बिरेन सिंह यांच्या सरकारने अहोरात्र काम केले आहे. आज मणिपूरमधील 60 टक्के घरांना जलवाहिनीद्वारे पाणी मिळत आहे. लवकरच मणिपूर देखील 100% परिपूर्ततेसह 'हर घर जल' चे उद्दिष्ट साध्य करणार आहे.हा दुहेरी इंजिन सरकार असल्याचा फायदा आहे, दुहेरी इंजिन सरकारची ही ताकद आहे.
मित्रांनो,
आज पायाभरणी आणि लोकार्पण झालेल्या योजनांसोबतच मी आज पुन्हा मणिपूरच्या जनतेला धन्यवादही देईन. तुम्ही मणिपूरमध्ये पूर्ण बहुमताने असे स्थिर सरकार दिले आहे ,जे संपूर्ण ताकदीने कार्यरत आहे. हे कसे घडले - तुमच्या एका मतामुळे हे घडले. तुमच्या एका मताच्या बळाने मणिपूरमध्ये अशी कामगिरी केली आहे, ज्याची यापूर्वी कोणी कल्पनाही केली नसती. ही तुमच्या एका मताची ताकद आहे, ज्यामुळे मणिपूरच्या 6 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपये मिळाले. अशाच काही लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.ही सर्व तुमच्या एका मताची ताकद आहे, ज्यामुळे मणिपूरमधील 6 लाख कुटुंबांना पंतप्रधान गरीब कल्याण योजना, मोफत रेशनचा लाभ मिळत आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुमारे 80 हजार घरांना मंजुरी, ही तुमच्या एका मताच्या ताकदीची कमाल आहे. येथील 4 लाख 25 हजारांहून अधिक लोकांना आयुष्मान योजनेंतर्गत रुग्णालयात मिळालेले मोफत उपचार ,हे केवळ तुमच्या एका मतामुळे शक्य झाले आहे. तुमच्या एका मताने दीड लाख कुटुंबांना मोफत गॅस जोडणी , तुमच्या एका मताने 1 लाख 30 हजार कुटुंबांना मोफत वीज जोडणी दिली आहे.
तुमच्या एका मताने स्वच्छ भारत अभियानांतर्गत 30 हजाराहून अधिक घरांमध्ये शौचालये बांधली आहेत.कोरोनाशी लढण्यासाठी लसीच्या 30 लाखांहून अधिक मात्रा विनामूल्य देण्यात आल्या आहेत, ही तुमच्या एका मताची ताकद आहे. आज मणिपूरच्या प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन संयंत्रही उभारण्यात येत आहेत, हे सर्व तुमच्या एका मताने शक्य झाले आहे.
मी तुम्हा सर्व मणिपूरवासियांचे अनेक कामगिरींकरिता मनःपूर्वक अभिनंदन करतो. मणिपूरच्या विकासासाठी घेत असलेल्या मेहनतीबद्दल मी मुख्यमंत्री बिरेन सिंह आणि त्यांच्या सरकारचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
एक काळ असा होता की, आधीच्या सरकारांनी मणिपूरला वाऱ्यावर सोडले होते.जे दिल्लीत होते त्यांना वाटायचे की, इतका त्रास कोण घेईल, कोण इथवर दूर येईल, जेव्हा आपल्याच लोकांबद्दल अशी उदासीनता असते, तेव्हा दुरावा वाढतोच. मी पंतप्रधान नव्हतो त्याआधीही मी मणिपूरला अनेकदा आलो होतो.तुमच्या मनातील वेदना मी जाणून होतो. आणि म्हणून 2014 नंतर मी दिल्लीला, संपूर्ण दिल्लीला, भारत सरकारला तुमच्या दारापर्यंत आणले आहे.नेते असोत, मंत्री असोत, अधिकारी असोत, मी सर्वांना सांगितले की, या भागात या, बराच वेळ घालवा आणि नंतर गरजेनुसार योजना तयार करा.आणि आपल्याला काहीतरी देत आहोत, ही भावना त्यात नव्हती.तर भावना ही होती की, तुमचा सेवक बनून मला तुमच्यासाठी, मणिपूरसाठी, ईशान्येसाठी पूर्ण निष्ठेने, पूर्ण सेवाभावाने कार्य करायचे आहे. आणि तुम्ही पाहिले असेल, आज केंद्रीय मंत्रिमंडळात ईशान्येतील पाच प्रमुख चेहरे देशाची महत्त्वाची मंत्रालये सांभाळत आहेत.
मित्रांनो,
आज आपल्या सरकारची सात वर्षांची मेहनत संपूर्ण ईशान्येत दिसून येते, ती मणिपूरमध्येही दिसत आहे.आज मणिपूर बदलाचे, नवीन कार्यसंस्कृतीचे प्रतीक बनत आहे.हे परिवर्तन आहे - मणिपूरच्या संस्कृतीसाठी, जपणुकीसाठी , यामध्ये कनेक्टिव्हिटीलाही प्राधान्य आहे आणि सर्जनशीलतेचंही तितकेच महत्व आहे. सी-ट्रिपल आयटी' 'इथल्या तरुणांमध्ये सर्जनशीलता आणि नवोन्मेषाची भावना अधिक दृढ करेल.आधुनिक कर्करोग रुग्णालय गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी मणिपूरच्या लोकांची जपणूक करण्यासाठी मदत करेल.मणिपूर कलाविष्कार संस्थेची स्थापना आणि गोविंदजी मंदिराचा जीर्णोद्धार मणिपूरची संस्कृती जतन करेल.
मित्रांनो,
ईशान्य भारताच्या याच भूमीवर राणी गाइदिन्ल्यू ने परदेशी लोकांना भारताच्या स्त्रीशक्तीची प्रचिती दिली होती, इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. राणी गाइदिन्ल्यू संग्रहालय आपल्या युवकांना गौरवशाली भूतकाळाची ओळख करुन देईल, आणि त्याचवेळी त्यांना प्रेरणाही देईल. काही वर्षांपूर्वी आमच्या सरकारने अंदमान-निकोबारच्या माऊंट हैरियट- अंदमान निकोबारमध्ये जी एक छोटी टेकडी आहे तिचे नाव माउंट हैरियट असे होते. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होऊन गेल्यानंतरही ती टेकडी माउंट हैरियट नावानेच ओळखली जायची. आम्ही तिचे माऊंट हैरियट हे नाव बदलून माऊंट माणिपूर असे करण्याचा निर्णय घेतला आहे. आता जगातील कोणताही पर्यटक अंदमान-निकोबारला जाईल, तेव्हा तो हे माऊंट माणिपूर काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करेल.
ईशान्य भारताच्या बाबतीत, आधीच्या सरकारांचे एक निश्चित धोरण होते. आणि काय होते ते धोरण? ते धोरण हेच होते की--- Don’t Look East.(ईशान्य भारताकडे बघू नका). जेव्हा ईशान्य भारतात निवडणुका होत असत, तेव्हाच दिल्ली, त्याकडे लक्ष देत असे. मात्र आम्ही ईशान्य भारतासाठी ‘अॅक्ट ईस्ट’ असा संकल्प केला आहे. निसर्गाने, या क्षेत्राला नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत समृद्धतेचे वरदान दिले आहे, इतके सामर्थ्य दिले आहे. इथे विकासाच्या, पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. आता ईशान्य भारतातल्या या संधीचा विस्तार करण्याचे काम सुरु आहे.ईशान्य प्रदेश आता भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार ठरते आहे.
आता ईशान्य भारतात विमानतळे देखील बांधली जात आहेत आणि रेल्वेही पोहोचते आहे. ज़िरीबाम-तुपुल-इंफाळ रेल्वेच्या माध्यमातून, आता माणिपूर देखील देशाच्या रेल्वेमार्गांशी जोडले जाणार आहे. इम्फ़ाळ-मौरे महामार्ग म्हणजेच आशियाई महामार्ग-1 चे काम देखील वेगाने सुरु आहे. हा महामार्ग दक्षिण-पूर्व आशियासोबत, भारताची संपर्क यंत्रणा अधिक भक्कम करणार आहे. याआधी जेव्हा आपण निर्यातीविषयी बोलत असू, तेव्हा देशातल्या काही निवडक शहरांचीच चर्चा होत असे. आता मात्र, एकात्मिक मालवाहतूक टर्मिनलच्या माध्यमातून माणिपूर देखील व्यापार आणि निर्यातीचे एक मोठे केंद्र बनणार आहे. आत्मनिर्भर भारताला गती देणार आहे. आणि कालच देशातल्या लोकांनी एक बातमी ऐकली असेल. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाने काल 300 अब्ज डॉलर्सची निर्यात करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. लहान-लहान राज्ये देखील या निर्यातीत योगदान देत आहेत.
मित्रांनो
आधीही लोकांना ईशान्य भारतात येण्याची इच्छा असे. मात्र इथे पोचायचे कसे, हा विचार करुन ते थांबून जात. यामुळे इथल्या पर्यटनाचे खूप नुकसान होत असे. आता मात्र ईशान्य भारत शहरच नाही, तर गावागावात पोचणेही सोपे झाले आहे. आज इथे मोठ्या संख्येने राष्ट्रीय महामार्गांचे कामही प्रगतीपथावर आहे आणि गावात देखील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शेकडो किमीचे नवे रस्ते बांधले जात आहेत. नैसर्गिक गॅस पाईपलाईन सारख्या ज्या सुविधा अंजवळ केवळ काही विशेष क्षेत्रांपुरत्याच मर्यादित होत्या, त्या आता ईशान्य भारतापर्यंतही पोहोचत आहेत. वाढत असलेल्या या सुविधा, सुधारलेली संपर्क व्यवस्था, इथल्या पर्यटनाला चालना देईल, इथल्या युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करेल.
मित्रांनो,
माणिपूरनं देशाला एकाहून एक अनमोल रत्ने दिली आहेत. इथल्या युवकांनी आणि विशेषतः माणिपूरच्या लेकींनी जगभरात भारताचा झेंडा फडकावला आहे, अभिमानाने देशाचे मस्तक उंचावले आहे. विशेषत: आज देशातले युवक माणिपूरच्या खेळाडूंपासून प्रेरणा घेत आहेत. राष्ट्रकूल खेळांपासून ते ऑलिंपिकपर्यंत, कुस्ती, तिरंदाजी आणि मुष्टियुद्धापासून ते भारोत्तलनापर्यंत माणिपूरने एम.सी. मेरी कोम, मीराबाई चानू, बोम्बेला देवी, लायश्रम सरिता देवी अशी कितीतरी नावे आहे, असे मोठमोठे खेळाडू देशाला दिले आहेत. आपल्या या राज्यात अशी कितीतरी गुणी मुले असतील, त्यांना जर योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक ती साधने मिळलीत, तर हे युवा कमाल करुन दाखवतील. आपल्याकडे, आपल्या युवकांमध्ये, आपल्या मुलींमध्ये अशी प्रतिभा भरपूर आहे. आणि म्हणूनच आम्ही माणिपूर इथे, आधुनिक क्रीडा विद्यापीठाची स्थापना केली आहे. हे विद्यापीठ, या युवकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तर त्यांना मदत करेलच, त्याशिवाय क्रीडा जगतात, भारताला एक नवी ओळख निर्माण करुन देईल. ही देशाची नवी ऊर्जा आहे, नवा जोश आहे, ज्याचे नेतृत्व आता आपले युवक, आपल्या मुली करणार आहेत.
मित्रांनो,
केंद्र सरकारने पामतेलाच्या बाबतीत जे अभियान सुरु केले आहे,त्याचाही मोठा लाभ ईशान्य भारताला मिळणार आहे.आज भारत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात पामतेल आयात करतो. यावर आपण हजारो कोटी रुपयेही खर्च करतो आहोत. हे पैसे भारताच्या शेतकऱ्यांना मिळावेत, भारत खाद्य तेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावा, या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहेत. 11 हजार कोटी रुपयांच्या या पामतेल अभियानामुळे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास देखील मदत मिळेल. आणि या अभियानाची बहुतांश अंमलबजावणी ईशान्य भारतातच होणार आहे. इथे माणिपूर मध्येही त्यावर जलद गतीने काम सुरु आहे. पामतेलासाठीच्या वृक्षारोपणासाठी, तेल कारखाने सुरु करण्यासाठी, सरकार आर्थिक मदतही देत आहे.
मित्रांनो,
आज माणिपूरच्या कामगिरीचा गौरव करण्यासोबतच आपल्याला हे ही लक्षात ठेवायला हवे, की आपल्याला अजून खूप मोठा प्रवास साध्य करायचा आहे. आणि आपल्याला हे ही लक्षात ठेवायचे आहे, की आपण हा प्रवास कुठून सुरु केला आहे. आपल्याला कक्षात ठेवायचे आहे, आपल्या आधीच्या सरकारांनी माणिपूरची कशी सगळीकडून कोंडी केली होती. आधीच्या सरकारांनी राजकीय फायद्यांसाठी, मैदानी आणि पर्वतीय क्षेत्रात, दरी निर्माण करण्याचे कसे प्रयत्न केले. आपल्या हे ही लक्षात ठेवायचे आहे की लोकांमधील दुरावा वाढवण्यासाठीची कारस्थाने कशी रचली जात असत.
मित्रांनो ,
आज दुहेरी इंजिनाच्या सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या भागात, कट्टरपंथी संघटना आणि असुरक्षिततेच्या झळा जाणवत नाहीत, तर संपूर्ण क्षेत्रात शांतता आणि विकासाचा प्रकाश जाणवतो आहे. संपूर्ण ईशान्य भारतात, शेकडो युवक, शस्त्रे टाकून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाले आहेत. ज्या करारांची आपल्या कित्येक दशकांपासून प्रतीक्षा होती, ते ऐतिहासिक करार देखील आमच्या सरकारने केले आहेत. माणिपूर एक अडचणीचे राज्य राहिले नसून, आंतरराष्ट्रीय व्यापाराला मार्ग दाखवणारे राज्य बनले आहे. आमच्या सरकारने पर्वतीय क्षेत्र आणि मैदानी प्रदेश यांच्यात निर्माण करण्यात आलेली दरी मिटवण्यासाठी, “गो टू हिल्स” आणि “गो टू व्हीलेज” असे उपक्रम राबवले आहेत.
याच प्रयत्नांमध्ये आपल्याला हे ही लक्षात ठेवायला हवे की काही लोक सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा एकदा माणिपूरला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांना अपेक्षा आहे की कधीतरी आपल्याला संधी मिळेल, आणि आपण अशांततेचा आणि अस्थिरतेचा डाव सुरु करु शकू. मला अतिशय आनंद आहे की माणिपूरच्या लोकांनी आता या लोकांची मनोवृत्ती ओळखली आहे. आता माणिपूरचे लोक इथला विकास थांबू देणार नाही.माणिपूरला पुन्हा अंधारात जाऊ देणार नाही.
मित्रांनो,
आज देश, “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रावर काम करत आहे. आज देश ‘सबका प्रयास’ या भावनेने एकत्र काम करत आहे.सर्वांसाठी काम करत आहे. सर्वदूर काम करत आहे. एकविसाव्या शतकातील हे दशक, माणिपूरसाठी अत्यंत महत्वाचे आहे. आधीच्या सरकारांनी खूप वेळ वाया घालवला आहे. आता मात्र आपल्याला एक क्षणही वाया घालवायचा नाही. आपल्याला माणिपूर स्थिरही ठेवायचे आहे आणि माणिपूरला नव्या उंचीवर देखील पोचवायचे आहे. आणि हे काम दुहेरी इंजिनाचे सरकारच करु शकते.
मला पूर्ण विश्वास आहे, माणिपूर अशाच प्रकारे दुहेरी इंजिनाच्या सरकारवर आपला आशीर्वाद कायम ठेवेल. पुन्हा एकदा आजच्या विविध प्रकल्पांसाठी, माणिपूरच्या लोकांना, माणिपूरच्या माझ्या प्रिय बंधू- भगिनींना खूप खूप शुभेच्छा !
थागतचरी !!!
भारत माता की - जय !!
भारत माता की - जय !!
भारत माता की - जय !!
खूप-खूप धन्यवाद !